ठिपके
ठिपके
- सन्जोप राव
सदानंदचं फेसबुकवरचं नाव एच. सदानंद आहे हे बघून सुमेधाला हसू आलं. हिप्परगीकर या आपल्या आडनावाची सदानंदला लाज वाटत असे. प्रोफाईल पिक्चर म्हणून त्यानं कुठल्या तरी मोठ्या पोटाच्या स्वामीचं चित्र लावलं होतं. आपल्या दिसण्याबद्दलही सदानंदला असलाच कॉम्प्लेक्स होता.आपलं रूप काही आपल्या हातात असत नाही वगैरे सगळं ठीक आहे, पण एकूण लाज वाटावी असलंच सदानंदचं ध्यान होतं. पाच फूट दोन किंवा तीन इंच उंची, इतक्या कमी उंचीमुळं जास्त वाटणारी जाडी, पिठूळ, पांढरट वर्ण, म्हणायला गोरा, पण गोरेपणाचं अजिबात तेज नसणारा, चेहर्यावर वांगाचे ठिपके, डोळ्यांवरून सारखा घसरणारा चष्मा आणि अडखळत बोलताना मधूनमधून जीभ बाहेर काढण्याची, बघणार्याला अतिशय संताप आणणारी लकब. बोलताना वाक्यांची सुरुवात तो 'म्हणजे..' किंवा 'मी काय म्हणतो..' किंवा 'मला एक कळत नाही..' असल्या पाणचट शब्दांनी करत असे. तिच्याशी बोलताना तर.. काहीतरी आठवून तिला पुन्हा जरासं हसू आलं.
तीस वर्षांपूर्वीची ओळख. आता कुठं असतो, काय करतो कुणास ठाऊक, सुमेधाच्या मनात आलं. जरासा विचार करून तिनं त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली.
"हा कोण म्हणायचा, सदानंद?" वेंकटनं सुमेधाच्या मागून तिच्या हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनकडे बघत विचारलं.
"आहे एक जुना ओळखीचा." स्क्रीन स्क्रोल करत सुमेधा म्हणाली. "फेसबुकवर भेटला. अगदी अलीकडे. कॉलेजमध्ये एकत्र होतो आम्ही. नंतर नोकरीतही काही दिवस एकत्र होतो."
"हं... सदानंद... कधी ऐकलं नाही नाव तुझ्या तोंडून, म्हणून विचारलं."
"अरे, काही विषयच झाला नाही आपला. मलाही परवा फेसबुकवर 'पीपल यू मे नो'मध्ये याचं नाव आलं म्हणून आठवला हा. सदानंद हिप्परगीकर. आमचे बरेच कॉमन मित्र असतील. एकच कॉलेज ना, त्यामुळं."
"हिप्परगीकर? कानडी आहे वाटतं."
"कानडी नाही, आहे मराठीच, पण नाव तसं आहे. तिकडचाच आहे कुठला तरी." सुमेधा म्हणाली. "आपल्या लग्नाला आला होता की हा, पण आपल्या लग्नाला काय, खूप लोक आले होते. आणि त्यातले बरेचसे माझ्याच बाजूचे होते. सगळे तुला आठवणार नाहीत. शिवाय किती जुनी गोष्ट. कोण आलं होतं, कोण नाही हे तुझ्या लक्षात पण असणार नाही."
"पण तुझ्या लक्षात आहे."
"हो, सदानंद होताच लक्षात राहण्यासारखा. ध्यान होतं ते ध्यान. माझ्या चांगला लक्षात आहे तो." सुमेधा अजून तिच्या मोबाईलमध्येच गर्क होती.
"सदानंद लक्षात आहेच तुझ्या, आणि तो आपल्या लग्नाला आला होता हेही तुझ्या लक्षात आहे." वेंकट म्हणाला.
"अं? म्हणजे?"
"काही नाही." वेंकट डायनिंग टेबलाकडे जात म्हणाला. "आज नाश्ता काय?"
"इडली सांबार. सांबार तुला आवडतं तसं. छोटे कांदे घातलेलं आणि शेवग्याच्या शेंगा न घातलेलं. झालंय बघ. गरमच असेल. तू वाढून घेशील का प्लीज, साई?"
वेंकटच्या कपाळावर नकळत एक लहानशी आठी उमटली. त्याला डायनिंग टेबलवर वाढून घ्यायला अगदी आवडत नसे, आणि हे सुमेधाला माहिती होतं. त्यानं जराशा नाराजीनं सुमेधाकडे बघितलं पण सुमेधाची नजर तिच्या हातातल्या मोबाईलच्या स्क्रीनला चिकटलेली होती. हे काहीतरी वेगळं होतं. वेगळं आणि पहिल्यांदाच घडणारं. सुमेधा कितीही कामात असली तरी वेंकटला आजवर वाढून घ्यायला कधी लागलं नव्हतं. इडली त्याला अगदी वाफाळती गरम लागत असे. सांबारही तसंच. हे सुमेधाला माहीत होतं. पण हे आज काहीतरी वेगळं.
"मी घेतो हं वाढून. मुलांना तू वाढशील ना?" वेंकट म्हणाला, पण सुमेधाचं तिकडं लक्षच नव्हतं. ती तिच्या हातातल्या स्क्रीनकडे बघत होती. वेंकट बाहेर पडला तेंव्हा नेहमीप्रमाणं सुमेधा दाराशी आली होती, पण तिच्या हातात मोबाईल होताच.
तिच्या रिक्वेस्टची वाटच बघत असल्यासारखा सदानंदनं ती स्वीकारल्याचा मेसेज आला. तो आता चेन्नईमध्ये एका कॉलेजमध्ये इंडॉलॉजी शिकवत होता. इंडॉलॉजी! एकदम वेगळा विषय. पण सुमेधाला फारसं नवल वाटलं नाही. सदानंद असल्याच काहीतरी मुलखावेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असे. त्यांतली एकही त्याला धड जमत नसे, पण त्याला हौस भारी होती. एकदा कॉलेजच्या कसल्या तरी कार्यक्रमात सूत्रसंचालन करायचं काम त्यानं हट्टानं मागून घेतलं होतं. याला-त्याला विचारून त्यानं खूप तयारी केली होती. ते सगळं लिहून काढून त्यानं सुमेधाला एकदा वाचूनही दाखवलं होतं. अगदी बाळबोध, शाळेच्या गॅदरिंगमध्ये असतं तसं सुभाषिते, गांधींनी म्हटलंच आहे, फक्त लढ म्हणा, सुख म्हणजे नक्की काय असतं, निसर्गराजा ऐक सांगतो वगैरे असलं सगळं पुस्तकी. त्याला तोंडावर काही म्हणायला नको म्हणून सुमेधा काही बोलली नव्हती, पण त्या कार्यक्रमात सदानंदची घाबरून एवढी फेफे उडाली की मध्यावर दुसर्या कुणीतरी माईक हातात घेतला होता आणि सदानंद घाम पुसत खाली बसला होता. आताही तो फेसबुकवर मोटिव्हेशनल व्हिडिओ, जगात जगावे कसे, शेवटी पैसा हेच सर्वस्व नव्हे, आपल्या भाकरीतली अर्धी भाकरी, मनाची श्रीमंती हेच खरं वैभव असलं काहीतरी फडतूस लिहीत असे आणि इतर वेळी दुसर्या कुणाच्या तरी वॉलवरुन शेअर केलेलं काहीतरी बकवास टाकत असे आणि बर्याच वेळा भरपूर ट्रोलही होत असे. त्याची या आभासी जगात होणारी फजिती बघताना सुमेधाला फार हसू येत असे. काही लोक कधीच बदलत नाहीत, बदलू शकत नाहीत असं तिला वाटत असे.
*
"येताना पोर्ट ब्लेयर टू चेन्नई अशी फ्लाईट आहे आपली." वेंकट म्हणाला. "डायरेक्ट मुंबईची नाही आहे. चेन्नईमध्ये तीन तासांचा लेओव्हर आहे आणि मग ही इंडिगोची मुंबईला येणारी फ्लाईट."
"चेन्नईत तीन तास?" सुमेधानं विचारलं.
"येस, सॉरी अबाऊट दॅट. पण काही इलाजच नव्हता. आपली पोर्टब्लेयरची फ्लाईट लँड व्हायच्या जस्ट आधी मुंबईला येणार्या तीन फ्लाईट्स निघून जातात. वी मिस देम जस्ट बाय फिफ्टीन मिनिट्स ऑर सो. पण आपल्याला लाऊंज आहे. मुलांना चांगलं खायला प्यायला मिळेल. शिवाय.."
"नाही, साई, मी विचार करत होते की आपल्याला तीन तास वेळ आहे, आणि सदानंद चेन्नईला असतो. त्याचं कॉलेज एयरपोर्टच्या जवळच कुठं तरी आहे."
"सो?" वेंकटचा आवाज आता एकदम कोरडा होता.
"नाही, मी म्हणत होते, आपण नुसतं एयरपोर्टवर बसून राहाण्यापेक्षा बाहेर पडू. सदानंदला भेटू, त्याच्या बायकोला वेळ असेल तर तिलाही बोलावू. एकत्रच जेवू कुठेतरी आणि मग मुंबईची फ्लाईट घेऊ."
"आपण ॲज इन?"
"ॲज इन म्हणजे काय अरे? आपण सगळे. तू, मी, प्रभू, भूमी सगळेच."
वेंकटनं हातातला फोन खाली ठेवला. सुमेधाच्या नजरेला नजर भिडवत तो वेगळ्याच आवाजात म्हणाला, "नाही सुमेधा. तुला भेटायचं असेल तर भेट तू त्याला. सदानंद ऑर व्हॉटएव्हर हिज नेम इज. आम्ही नाही येणार त्याला भेटायला. तो तुझा मित्र आहे. मित्र ऑर व्हॉटएव्हर. माझा नाही. मी येणार नाही आणि माझी मुलं पण नाही."
माझी. माझी मुलं!
सुमेधा एकटी काही सदानंदला भेटायला गेली नाही. वेंकटही त्यावर नंतर काही बोलला नाही. पण हा विषय त्याच्या डोक्यातून गेला नसावा असं सुमेधाला जाणवत राहिलं.
वेंकट फक्त लिंक्डइनवर होता. तेपण त्याचे व्यावसायिक संबंध वाढवण्यासाठी. फेसबुक, इन्स्टाग्राम मुलांनीही वापरणं त्याला फारसं पसंत नव्हतं. सुमेधाही हल्लीच फेसबुकवर जास्त वावरायला लागली होती. तिच्या पोस्ट्स फारशा नव्हत्या, पण तिला फेसबुकवर बरेच जुने मित्र-मैत्रिणी सापडले होते. त्यांतलाच एक सदानंद. आपण सदानंदबद्दल वेंकटला सांगून चूक केली की काय असं अलीकडे सुमेधाच्या मनात यायला लागलं होतं. सुमेधाचे इतर मित्र-मैत्रिणी वेंकटच्या चांगल्या परिचयाचे होते. त्यांच्यांकडे यायला-जायला वेंकटची नेहमीच तयारी असे. तिच्या वर्गातला अनिमेष तर तिच्याच कॉलनीमध्ये राहात असे. वाटेत कुठे भेट झाली तर त्याच्या आणि वेंकटच्या गप्पा इतक्या रंगत की काही वेळा सुमेधा त्या दोघांना सोडून एकटी पुढे येत असे. सुमेधाच्या मैत्रिणी, त्यांचे नवरे हे तिच्या घरी येणार असतील तर वेंकट एका चांगल्या 'होस्ट'ची भूमिका मनापासून पार पाडत असे. आणि खरोखर मनापासून. साधी बीयरसुद्धा न घेणारा वेंकट, पार्टी असली की, अगदी मित्रांना विचारून म्हणा, इंटरनेटवर शोधाशोध करून म्हणा, शेलक्या स्कॉच, जिन, वगैरे आणून ठेवत असे. सुमेधाच्या वर्गातल्या लोकांचं गेट-टुगेदर गेल्याचा महिन्यात झालं होतं. त्यालाही वेंकट मोठ्या उत्साहानं आला होता. पण हल्ली सदानंदचा उल्लेख झाला की वेंकटचा चेहरा बदलल्यासारखा होई. तो बोलत काही नसे, पण आवंढा गिळताना वराखाली होणारा त्याचा कंठमणी जास्तच वेगानं हलल्यासारखा होई. जसे इतर मित्र तसा सदानंद. खरं तर सदानंद मित्र वगैरे नाहीच. मग त्याच्या बाबतीत वेंकट असा संशयी का?
घुम्या स्वभावाचा, आत्मविश्वास नसलेला, अनेक प्रकारचे गंड असलेला आपल्याआपल्यातच राहाणारा, हळुवार आवाजात बोलणारा, सामान्य दर्जाच्या कविता करणारा खुळचट सदानंद. तिला आवडतात म्हणून त्याच्या बागेतली चाफ्याची फुलं आठवणीनं आणणारा, पण ती आणताना ती धुतलेल्या दुधाच्या पिशवीतून आणू नयेत एवढं समजण्याचीही पोच नसलेला सदानंद, तिच्या हाताचा चुकुनही स्पर्श झाला तरी अवघडून चोरट्यासारखा होणारा सदानंद, 'तू माझी होऊ शकशील का?' असं तिला घाबरत घाबरत विचारणारा आणि त्यावर तिनं झिडकारल्यासारखा नकार दिल्यानंतर काही न बोलता डोळ्यांच्या कडांना आलेले पाणी लपवत तेथून निघून गेलेला बावळट सदानंद.
सदानंद!
नोकरीत असताना सदानंदच्या मनात आपल्याविषयी असं काही आहे हे सुमेधाच्या अगदी लवकर लक्षात आलं होतं. तिच्या अपेक्षांच्या चौकटीत सदानंद कुठेच बसणारा नव्हता. ती दहाजणीत काय, पण शंभरजणींत उठून दिसणारी होती आणि त्याची तिला चांगली जाणीव होती. एमए होईपर्यंत किमान सहा लोकांनी तरी तिला लग्नाबद्दल विचारलं होतं. त्या सगळ्यांना नकार देताना प्रत्येक वेळी तिचा इगो फुगत गेला होता. आणि सदानंद? तो त्या सहा लोकांपैकी एकाच्याही जवळपास जाणारा सुद्धा नव्हता. त्याला तर चिरडल्यासारखं करून भिरकावून देताना तर सुमेधाला पुन्हा एकदा जिंकल्यासारखंच वाटलं होतं. सदानंदला पराभूत करून अगदी शरमेनं मेल्यासारखं करताना आपल्याला नेमका कसला आनंद झाला होता हे सुमेधाला आठवेना. सदानंदपेक्षा सर्वार्थानं उजव्या असलेल्या वेंकटशी लग्न ठरल्यावर सुमेधानं तिच्या लग्नाची पत्रिका सदानंदला मुद्दाम पाठवली होती आणि ती पत्रिका बघूनच तो खचल्यासारखा होईल या विचारानं ती जरा फुलल्यासारखी झाली होती. तो तिच्या लग्नाला येणार नाही या कल्पनेनं तिच्या गर्वाचा रथ आणखी चार अंगुळे हवेत गेल्यासारखा झाला होता, पण हॉलच्या दरवाज्यातून सदानंदला बिचकत आत येताना तिला एकदम जमिनीवर आल्यासारखं वाटलं होतं. ते तसं का, हे तिला त्यावेळीही सांगता आलं नसतं आणि आता तर अजिबातच सांगता येणार नाही या विचारानं सुमेधा अस्वस्थ झाली. 'सुमेधा, तुला अनेक शुभेच्छा अँड काँग्रॅट्स वेंकट' असं म्हणून तिच्या हातात विंदा करंदीकरांच्या कवितांचं पुस्तक देताना सदानंदचे डोळे अगदी नितळ, बिनडहुळलेले कसे काय होते आणि बाकी सगळं सोडून हेच नेमकं आपल्या का लक्षात राहिलं आहे हेही सुमेधाला कळेना. आणि एवढं सगळं झाल्यानंतर, मध्ये काळाचा एवढा मोठा प्रपात वाहून गेल्यानंतर आपण त्याच्याशी स्वत:हून संपर्क साधणं आणि सदानंदनं मधलं काहीच न झाल्यासारखं आपल्याशी गप्पा मारायला सुरुवात करणं यानं शेवटी सगळी हुकुमाची पानं आपल्या हातातून गेली असं आपल्याला का वाटतं हेही तिला कळेना. आधीचे सहा आणि त्यानंतरचा सातवा सदानंद, या सगळ्यांना शरमिंदं करून आपण काय मिळवलं? काही मिळवलं तरी का? आणि जे मिळवलं तेच आपल्याला मिळवायचं होतं का असे उलटेसुलटे विचार मनात आल्यानं सुमेधा विस्कटल्यासारखी झाली.
पन्नाशी जवळ आली की आपल्या आयुष्यातलं काहीतरी हातातून निसटून गेलं का,आपलं काही राहून गेलं का अशी खंत काही लोकांना वाटायला लागते, असं सुमेधानं ऐकलं, वाचलं होतं; पण आपलं असं काही होईल असं तिला वाटलं नव्हतं. सदानंदचं जाड, देशी केळांसारखं टरटरीत आयुष्य कुठे आणि आपलं क्लासी, रेशमी आयुष्य कुठे याच विचाराबरोबर तिला आपल्या वैभवशाली आयुष्यातला बारीक पण टोचणारा कंटाळा आठवला. आपण सदानंदच्या आयुष्यात असतो तर आपणही त्याच्यासारखे मुर्दाडपणे नाकासमोर बघून जगत राहिलो असतो का असा विचार तिच्या मनात आला तेंव्हा तिला स्वत:लाच आश्चर्य वाटलं. असं आपल्याला का वाटावं? वेंकटबरोबरच्या आपल्या आयुष्यात काढायचं म्हटलं तरी काही वैगुण्य सापडणार नाही. भरपूर पैसा, ऐषोआराम, वेंकटचं आपल्यावर असलेलं निर्भेळ, इतक्या वर्षांत जराही शिळं नं झालेलं प्रेम, दोन सोन्यासारखी मुलं. एका स्त्रीला संसारात काय पाहिजे असतं? आपल्याला आपल्या संसारातलं काही उणं सापडलं नाहीच, पण आपल्याशिवाय सदानंदच्या संसारातही काही उणं नाही या जाणीवेनेही आपल्याला कसंतरीच झालं, हे काय आहे या प्रश्नांच्या वेटोळ्यांतून सुमेधाला बाहेर पडता येईनासं झालं. सदानंदनं फेसबुकवर त्याच्या भळभळीत स्वभावानुसार आपल्या अपयशांच्या, आपल्या आयुष्यातल्या दु:खांच्या बावळट कहाण्या फेसबुकवर लिहिल्या असत्या तर आपल्याला बरं वाटलं असतं का?
ज्या शरीराचा आपल्याला एवढा अभिमान, गर्व होता ते आता सैलसर झालं आहे. ज्या प्रज्ञेचा आपल्याला एवढा ताठा होता ती मंदावली आहे, आपल्यात लखलखणारी वीज आता भिजून गेली आहे आणि म्हणूनच आपल्याला, आपल्या या दुसर्या आवृत्तीला, सदानंदचा स्वीकार करावासा वाटतो, एवढंच नाही, तर अगदी नकळत कुठेतरी सदानंदचा मोह होतो, एवढं आपलं अध:पतन झालं आहे की काय आणि म्हणून आपलं सगळं स्वत्वच आता तडजोडीच्या पातळीवर येऊन ठेपलं आहे की काय या विचारानं सुमेधा सैरभैर झाली.
सुमेधा, वेंकट आणि मुलांची अंदमानची ट्रिप जशी व्हायची तशीच छान झाली. येताना चेन्नई एयरपोर्टवर उतरल्यावर सुमेधा आणि वेंकट यांच्यांत काही क्षण एक अवघडलेली शांतता आली, पण ते तेवढंच. मुंबईच्या विमानात बसल्यावर वेंकट नेहमीसारखा हसरा, विनोदी बोलणारा, बायकोची, मुलांची काळजी घेणारा नवरा झाला. परतल्यावर त्यांचं नेहमीचं सुखी, समृद्ध, आनंदी (आणि कदाचित थोडंसं कंटाळवाणं, टू प्रेडिक्टेबल? सुमेधाच्या मनात येऊन गेलं) सुरू झालं.
सदानंदशी रोज फेसबुक मेसेंजरमधून बोलावं असं सुमेधाला वाटायला लागलं. तोही सकाळी जिमला जाताना, दुपारी लंच ब्रेकमध्ये तिला एक-दोन ओळींचे निरोप (तेही बाटबटीत शब्दांचे! सुभाषितांचे! या वयात सुभाषितं!) टाकू लागला. त्यानं विचारलेलं नसताना सुमेधानं त्याला तिचा नंबर देऊन टाकला. लगेचच त्यानं तिला त्याचा नंबर दिला. सदानंदशी बोलायचं आहे तर खरं, पण ते घरी इतर कुणी असताना नको – विशेषत: वेंकट घरात असताना तर नकोच असं सुमेधाला वाटायला लागलं. तसा तिच्या घरात खाजगीपणाला पूर्ण वाव होता. वेंकटचे कामाचे कॉल्स तर त्याच्या वेगळ्या खोलीतूनच चालत, पण तिची मुलंही आपल्या मित्र-मैत्रिणींशी बोलताना त्यांच्या खोलीचं दार लोटून घेत. त्यात कुणालाच काही वाईट, वेगळं किंवा वावगं वाटत नसे. एकमेकांच्या फोनवरचे मेसेजेस बघणं, कॉल लॉग बघणं असलं काही करावं असं तिच्या घरी कुणीच करत नसे, कुणाला करावंसं वाटतच नसे, मग सदानंदबाबत आपल्याला हा चोरटेपणा का वाटतो हे सुमेधाला उमगेनासं झालं. वेंकटला फेसबुकमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता, पण तरीही सुमेधा त्याला आपल्या मित्र-मैत्रिणींच्या पोस्ट्स, फोटो दाखवत असे. सदानंदच्या कविता मात्र वेंकटला दाखवाव्यात असं तिला वाटलं नाही. आणि त्यात वेंकट अमराठी असल्यामुळं त्याला त्या कविता कळणार नाहीत हा, असलाच तर फार कमी महत्त्वाचा भाग होता. तिच्या स्वभावाला अनुसरून खरं तर तिनं सदानंदच्या बालिश कविता आपल्या अमराठी नवर्याला इंग्रजीत भाषांतर करून सांगितल्या असत्या, आणि त्यांची टर उडवली असती, पण तिला ते तसं करावंसं वाटेना.
सुमेधाचं काही तरी बिनसलं आहे हे वेंकटच्या लक्षात येत होतं. वेंकट थोडासा डिस्टर्ब्ड आहे असं सुमेधाला वाटत होतं. दोघांमध्ये, आजवरच्या चोवीस वर्षांच्या सहजीवनात कधी जाणवला नव्हता तसा आणि तेवढा ताण आला होता. कधी तरी आणि कुणी तरी याला तोंड फोडणार हे उघड होतं.
"हल्ली फेसबुकवर फार वेळ असतेस तू." जेवणाच्या टेबलवरची आवराआवर करणार्या सुमेधाला मदत करताना वेंकट म्हणाला. प्रभू आणि भूमी जेवण संपवून, त्या दोघांना गुडनाईट म्हणून त्यांच्या खोलीत गेले होते.
"अं... हो. असते. फार वेळ असं नाही, पण असते." सुमेधा म्हणाली.
"हा सदानंद भेटल्यापासून जरा जास्तच असतेस का?" वेंकटनं जरा धारदार आवाजात विचारलं.
"व्हॉट डू यू मीन?"
"नथिंग. साधा प्रश्न आहे हा. सदानंदशी तुझ्या जरा जास्तच गप्पा चालतात का असं मी विचारलं." वेंकट म्हणाला.
"हो, चालतात. जुना सहकारी आहे तो माझा. बर्याच वर्षांनंतर भेटला, भेटला म्हणजे असा व्हर्च्युअल... म्हणून गप्पा."
"होय, पण आता तुझा स्वयंपाक बिघडतो, तुझे टोस्ट करपतात, सकाळची कॉफी करताना पूर्वी तू विविधभारती ऐकायचीस, आता यूट्यूबवर कुठली कुठली जुनी गाणी ऐकत असतेस. रात्री झोपसुद्धा तुझी पूर्वीसारखी शांत, गडद असत नाही, हे सगळं मी बोलून दाखवत नाही म्हणजे माझ्या लक्षात येत नाही असं तुला वाटतं का सुमेधा? याला कारण म्हणजे तो तुझा सदानंद आहे ना?"
"काही तरी बोलू नकोस, साई. माझा मेनॉपॉज जवळ आला आहे. हार्मोनल इमबॅलन्स असतो, मूड स्विंग्ज..."
"डोन्ट गिव्ह मी दॅट शिट." वेंकट म्हणाला. "हा तुझा मिडलाईफ क्रायसिस आहे की तुला आता वेळच वेळ आहे म्हणून तुझा चाललेला हा चाळा आहे की खरोखर तू या माणसाच्या प्रेमात पडली आहेस?"
"मला या विषयावर बोलायचं नाही, साई. असलं काहीतरी तुझ्या मनात येत असेल तर, सॉरी टु से, पण तुला लाज वाटायला हवी. मी सदानंदच्या प्रेमात?"
"बोल तू तुला पाहिजे ते." वेंकट म्हणाला. "तुला जे पाहिजे ते करायला मी नेहमीच मुभा दिली. कधी विचारलंसुद्धा नाही तू काय करतेस, कुणाशी बोलतेच, कुणाला भेटतेस ते. पण आता तुझं जे चाललं आहे, ते नॉर्मल नाही असं मला वाटतं एवढंच. तुला हे थांबवायला हवं."
"तू मला हे असं सांगू शकत नाहीस, वेंकट." सुमेधा आता चिडली होती. हा कुणीतरी वेगळाच वेंकट होता. पुरुषांनाही एका वयात शरीरातली टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी झाली की ॲन्ड्रोपॉज येतो का? त्यांना असुरक्षित वाटायला लागतं का?
"मी काय करू शकतो हे तुला बघायचं आहे का?" वेंकटनं आवाज चढवून विचारलं. "बघशील तू. हा जो कोणी सदानंद का फिदानंद आहे ना, त्याच्याशी तू पुन्हा संपर्क साधलास किंवा त्याला भेटलीबिटलीस तर तुला कळेल मी काय करू शकतो ते, सुमेधा. मग बघशीलच तू."
सदानंदबरोबर चे संबंध तोडून टाकायचे असतील तर आपण फेसबुक वापरणं पूर्णपणे बंद केलं पाहिजे हे सुमेधाच्या लक्षात आलं. म्हणजे फोनमधनं ते ॲप अनइनस्टॉल करणं आलं. ते करणं सुमेधाला जमेना. फेसबुकची नोटिफिकेशन्स तिनं डिसेबल करून टाकली होती तरी वारंवार तिचा हात फोनकडे जात होता. आपल्या या परोपजीवी अवस्थेची जाणीव होऊन तिला स्वत:चा रागच आला. सदानंदच्या आभासी अस्तित्वानं आपलं आयुष्य खळबळत आहे, म्हणजे आपल्या या अवस्थेला तोही जबाबदार आहे आणि त्याला त्याची जाणीवही नाही या विचारानं तिला त्याचाही राग आला. त्याला अनफ्रेंड करून बघावं का असाही विचार तिच्या मनात आला, पण तोही फार वेळ टिकला नाही. सदानंद मात्र देशभक्ती, समाजसुधारणा, लहान बाळाच्या गालावरची खळी, आईसारखे दैवत सार्या अशा विषयांवर हास्यास्पद कविता करून त्या फेसबुकवर टाकत होता, सुमेधाला टॅग करत होता.
सदानंदला मेसेंजरवर तिनं विचारलं, 'मला तुला भेटायचं आहे. भेटशील का एकदा मुंबईत आलास तर?' कायम ऑनलाइन असलेल्या सदानंदचं दुसर्या मिनिटाला उत्तर आलं. 'जरूर. तू भेटणार असशील तर मी मुद्दाम येईन मुंबईला. कधी भेटूया?' इतक्या लगेच? असला कसला हा वितळलेला मेणबत्तीसारखा माणूस? कुठे कडकपणा नाही, कुठे पुरुषी ताठा नाही.. सदानंद समोर असता तर आपण त्याच्या कानाखाली काडकन ठेवून दिली असती असं सुमेधाला वाटलं.
'मी काय, मोकळीच असते. तू बघ. तुला कधी वेळ आहे ते.' तिनं रागारागानं टाईप केलं. तिला खिजवण्यासाठीच की काय, ते तीन ठिपके नागमोडी वरखाली होऊ लागले.
'मी बघतो माझ्या किती रजा शिल्लक आहेत ते. रविवारला जोडून रजा घेईन पाच दिवसांची. येण्या-जाण्यातच दोन-तीन दिवस जातील. तुला भेटून लगेचच माघारी येईन.'
म्हणजे सेकंड क्लासनं डकांव डकांव करत हा माणूस येणार आणि तसाच आपल्या लोखंडी वासासकट आपल्याला भेटणार! सुमेधाला किळस आली. काळे ठिपके वरखाली होतच होते.
'मलाही किती इच्छा आहे तुला भेटायची. किती वर्षं झाली तुला भेटून. झालं गेलं सगळं विसरून तू माझ्याशी मैत्री केलीस याचा केवढा आनंद झाला आहे मला सांगू..'
सगळे तसलेच पूर्वीसारखे कंटाळवाणे शब्द. तीच रडकी अगतिकता. त्याची पांढरट, गोबर्या गालाची स्थूल मूर्ती तिच्या डोळ्यांसमोर आली.त्याच्या गालावरचे वांगाचे ठिपके, त्याचा घसरणारा चष्मा, त्याच्या तोंडावरचं ओशाळवाणं हसू. ठिपके वरखाली होतच होते.
'मी आता कॅलेंडर बघितलं, सुमेधा. सतरा तारखेला सुट्टी आहे मला. शुक्रवारी. तिला जोडून शनिवार-रविवार आहे. सोमवारी रजा घेता येईल मला. घेऊ?'
'चालेल.' तिनं टाईप केलं.
'घेतो. ट्रेनचं बुकिंग करतो त्याप्रमाणं. कुठं भेटूया? तुझ्या घरी?'
घरी? सदानंदला घरी आणायचं? असल्या माणसाला घरी? तेही वेंकटनं असं बजावलेलं असताना? वेंकटच्या बोलण्याची आठवण होऊन तिला परत डोकं चढल्यासारखं वाटलं.
'नाही, घरी नको. जिगसॉ हॉटेल आहे. तिथं भेटू. मॅपवर बघ. सापडेल तुला.' तिनं रुक्षपणे टाईप केलं. 'दुपारी दोन वाजता.'
ती लॉग आऊट झाली. तरीही ते तीन ठिपके वरखाली होतच असणार असं तिला वाटलं.
कुणाला वेळ दिली असली की उशीर झालेला सुमेधाला आवडत नसे. कुणी उशीर केला तरी तिच्या कपाळावर आठ्या पडत असत. पण दोन वाजून गेले तरी ती पार्किंगमध्ये गाडीतच बसून होती. वेळ पाळायची वगैरे इतरांसाठी ठीक आहे, पण सदानंदच्या बाबतीत थोडा वेळ झाला म्हणून कुठं बिघडलं?
हॉटेलात जावं? जाऊ नये?
शेवटी ती हॉटेलात शिरली तेंव्हा सव्वा दोन झाले होते. बरीच टेबल्स भरलेली होती. सदानंद कसा दिसत असेल? त्याच्या चेहर्यावर तेच तेलकट हसू असेल का? दाढी करताना कानाच्या खाली त्याच्या एकदोन जागा सुटलेल्या असत आणि त्यावरचे विरळ खुंट ताठ उभे राहिलेले असत. आताही तसंच असेल का? तो तेवढाच असेल की आणखी सुटलेला, बेढब झालेला असेल? कधीकधी तर कानात आंघोळीचा साबण तसाच... ती शहारली. आपण इथे या माणसाला भेटायला का आलो आहोत?
डोळ्यांवरचा गॉगल काढताना तिला समोरच्या आरशात तिचं प्रतिबिंब दिसलं. कानशिलावरच्या एकदोन बटा पांढर्या, बाकी फारसा फरक नाही. वजन तर कॉलेजात होतं त्याच्यापेक्षा एक, फारतर दोन किलो वाढलेलं. सदानंद आपल्याला नक्कीच ओळखेल. आपणच त्याला ओळखू की नाही सांगता येत नाही, तिच्या मनात आलं. पण तो आहे कुठे?
"सुमेधा? मिसेस यार्दी?"
समोरचा माणूस सदानंद असणं शक्यच नव्हतं. तो सदानंदपेक्षा किमान पाच सहा इंच उंच असावा. नाकनक्षा पण एकदम वेगळा. वय साधारण सदानंदएवढंच असावं. एखादं वर्ष इकडे तिकडे. पण हा सदानंद नक्कीच नव्हता. सुमेधा सावध झाली. "एक्सक्यूज मी?"
"मी रत्नाकर. रत्नाकर उपाध्ये."
"सॉरी, मी ओळखत नाही तुम्हाला. आणि मी... वेल मी इथे माझ्या क्लायंटला भेटायला आले आहे. त्यामुळं..." ती जायला वळली.
"सदानंदला ना?"
"एक्सक्यूज मी?"
"किती वेळा एक्सक्यूज मी म्हणाल मिसेस यार्दी? सदानंद हिप्परगीकरला भेटायला आला आहात ना तुम्ही? अशा चमत्कारिक नजरेनं बघू नका... मी..."
"सदानंदनं पाठवलं आहे का तुम्हाला?
"आपण जरा बसून बोलूया का, मिसेस यार्दी? इथे पन्हं छान मिळतं."
थोड्याशा अनिश्चिततेनं सुमेधा बसली. वेटर आल्यावर मात्र तिचा विचार बदलला.
"हे बघा, ना काय म्हणालात... रत्नाकर नाही का? रत्नाकर, मला पन्हं वगैरे नको आहे. मी फार वेळ थांबणार पण नाही आहे. तुम्ही सदानंदचं नाव घेतलं म्हणून एवढी तरी थांबले. तो येणार नाहे का? एनीवे त्याला भेटण्यात मला.."
"फारसा रस नाही, असंच ना, मिसेस यार्दी? मला ठाऊक आहे ते. आणि सदानंदलाही ठाऊक होतं ते."
"होतं म्हणजे?"
"थोडं ऐका माझं, मिसेस यार्दी. सदानंद आणि मी मित्र, अगदी शाळेपासूनचे. कॉलेजमध्ये आमचे मार्ग वेगळे झाले, तरी आमची मैत्री तशीच राहिली. मी आयटीमध्ये गेलो. सदानंद वेगळीकडे नोकरीला लागला. तिथंच तुमची आणि त्याची ओळख झाली आणि मग नंतर, वेल, पुढच्या सगळ्या गोष्टी मला ठाऊक आहेत मिसेस यार्दी."
"कुठे आहे तो?"
"सांगतो ना. सदानंद अगदी सरळ मनाचा होता, मिसेस यार्दी. तुमच्या मानानं कुठेच काही नसलेला. काही स्मार्टबिर्ट नाही, पण मनानं एकदम सच्चा माणूस. तुमच्याविषयी फार आदर होता त्याला. म्हणायचा, वीज आहे ही मुलगी, वीज. तुम्ही त्याला धुडकावून लावलंत, त्याला फार लागलं ते. पण म्हणाला की बरोबरच आहे रे. कुठे ती आणि कुठे मी. पण म्हणाला की अगदी पोतेरं करून नाही म्हणाली रे. नाहीच म्हणायचं होतं तर माझ्या भावनांचा थोडा तरी आदर करून म्हणायचं ना. म्हणजे मला इतकं लागलं नसतं. शेवटी कसाही असलो तरी मीही माणूस आहे, मलाही हृदय आहे." रत्नाकर हसला. "असलं पोएटिक बोलायचा तो. पुस्तकी. खुळाच म्हणायचा. दुसरं काय?"
वेटरनं पन्ह्याचा ग्लास आणून ठेवला.
"मी निघते, रत्नाकर." सुमेधा म्हणाली. "एकतर मी तुम्हाला ओळखत नाही, आणि दुसरं तुम्ही मला सदानंदबद्दल जे सांगताय ते ऐकण्यात मला काही इंटरेस्ट नाही."
"एक मिनिट, मिसेस यार्दी. तुम्हाला कधीच इंटरेस्ट नव्हता सदानंदमध्ये. होय ना? सदानंदला आधीच एवढा न्यूनगंड होता, तुम्ही त्याला झुरळासारखं झटकून टाकल्यावर तर तो डिप्रेशनमध्येच गेला. लग्नबिग्न करणं शक्यच नव्हतं त्याला. तुमच्यापासून लांब जायचं म्हणून तो चेन्नईला गेला. तिथंही काही फारसं सेटल होता आलं नाही त्याला. अलीकडे तर तब्येतीच्या तक्रारी सुरू झाल्या. एक माईल्ड हार्ट अटॅकही येऊन गेला आणि कोव्हिडच्या सेकंड वेव्हमध्ये तो गेला, मिसेस यार्दी."
"तुम्ही खोटं बोलता आहात, रत्नाकर. अगदी कालपरवापर्यंत.. आय मीन.."
"फेसबुकवर ना?" रत्नाकरनं त्याच्या हातातला फोन सुमेधापुढे केला. सदानंदचं अकाऊंट. त्यात अगदी काल परवापर्यंतचे मेसेजेस. सदानंदचे फिकट, पांढर्या रंगाचे फोटो. चेहर्यावरचे वांगाचे ठिपके. प्रोफाईल पिक्चर म्हणून तोच कुठल्यातरी मोठ्या पोटाच्या स्वामीचा फोटो.
"आयडी आणि पासवर्ड माहिती असला की कुणालाही कुठलंही अकाऊंट चालवता येतं, मिसेस यार्दी. काही हॅक वगैरे करायला लागत नाही. सदानंदनं जायच्या आधी मला त्याचा पासवर्ड दिला. म्हणाला. बरेच दिवस झाले त्याला, पण म्हणाला माझं अकाऊंट चालू ठेव. जसं मी आतापर्यंत लिहिलं आहे तसलंच काहीतरी फालतू लिहीत रहा." रत्नाकर हसला. "आपण फालतू आहोत, फालतू लिहितो हे त्याला माहिती होतं, मिसेस यार्दी. तसलाच होता तो. आमचा भाबडा, तुमचा बावळट सदानंद. पण म्हणाला, एक दिवस बघ ही बाई माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करेल. एक दिवस ती मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवेल. माझा शोध घेत येईल."
सुमेधा जागेवर खिळल्यासारखी झाली होती. तिच्या डोळ्यांसमोर सदानंदच्या निरोपाचे तीन ठिपके वरखाली होत होते.
"तो म्हणाला होता, त्यांना फक्त सांग, मीही माणूसच होतो, माझ्याशी जरा माणसासारखं वागायला काय हरकत होती? थोडी माणुसकी दाखवली असती तर काय बिघडलं असतं?" रत्नाकर पुन्हा हसला. "सदानंदचे शब्द, मिसेस यार्दी. भाबडे, बालिश, फालतू शब्द."
मोठा प्रयत्न करून सुमेधा उठली.
"आता खरोखर फक्त एकच मिनिट, मिसेस यार्दी. सदानंद म्हणाला होता की सुमेधा माझ्या शोधात आली की माझाही शोध संपेल. तो भला माणूस होता. साधा होता, पण मी तसा नाही. मला सदानंदइतकं चांगलं होता येणार नाही. मला सदानंदसारख्या भावना कळत नाहीत, मला व्यवहार कळतो. मला काय तो त्याचा शोध की काय ते कळत नाही, मला प्रतिशोध कळतो."
पन्ह्याचा ग्लास संपवून रत्नाकर उभा राहिला.
"वेंकट सरांशी लिंक्डइन वर कनेक्ट होणं फारसं अवघड नव्हतं. चार लोकांकडून त्यांचा स्वभाव समजून घेणंही सोपं होतं. काही निनावी मेसेजेस, काही तुमच्या आणि सदानंदच्या गप्पांचे स्क्रीनशॉट्स... माणूस चांगला आहे, वेंकट सर, पण संशय काय कुणाच्याही मनात रुजवता येतो. वेंकट सरांना हे हॉटेलही चांगलं माहीत होतं."
"वेंकट? त्याचा काय संबंध?"
"ते तुम्ही बघा, मिसेस यार्दी. सदानंद बिचारा मरून गेला. तुम्ही त्याच्या शोधात याल अशी खुळी आशा बाळगून निघून गेला. खुळा पण माझा अगदी जवळचा मित्र सदानंद. त्याच्यासाठी एवढं करणं तर माझं कर्तव्यच होतं. सदानंदच्या वतीने, त्याच्याच शब्दांत सांगायचं तर 'त्याची शेवटची भेट'! रत्नाकरनं दरवाजाकडे बोट दाखवलं.
सुमेधानं त्या दिशेला बघितलं. समोरच्या दरवाजातून वेंकट आत येत होता. त्याच्या पुढेमागे, आसपास असंख्य ठिपके वरखाली होत होते.
प्रतिक्रिया
कथा रोचक वाटली. रत्नाकर
कथा रोचक वाटली. रत्नाकर उपाध्येंकडे इतका एलॅबोरेट प्लान करायला लई वेळ होता असे ह्यातून दिसले.
नो आयडियाज् बट इन थिंग्ज.