बियरचा कुंभमेळा आणि इम्पॉर्टन्ट इंडियन डॉक्युमेंट
माझ्यासारख्या साध्याभोळ्या, उसंतपदाला पोहोचलेल्या स्त्रीला, जर्मनीत “म्युनिक बियर फेस्टिवलला चलणार का? तिकीट एकदम स्वस्त आहे”, असा प्रश्न विचारल्यावर, मी भयंकर दचकून खुर्चीतून खालीच पडले. आमच्या अख्ख्या गणगोतात कुणीही स्वप्नातसुद्धा दारू पिण्याच्या उत्सवाला, समुद्र ओलांडून गेल्याचा इतिहास नाही. इश्श! स्त्रीच्या जातीला शोभतं का असलं अगोचर वागणं? दिसायला नुसतीच सुंदर, सोनेरी, फेसाळती, कडवट बियर, फारशी नशाही न देता लोकांना इतकी कशी आवडते बुवा? मला कसं माहीत? जाऊ द्या झालं!
प्रस्तावित कार्यक्रमानुसार दोन लाख रुपयांत, तीन देश – जर्मनी, ऑस्ट्रिया आणि डेन्मार्क! तेसुद्धा विमानातून लँड झाल्यावर पुन्हा परतीच्या विमानात बसेपर्यंत टॅक्सीनं सगळा युरोपप्रवास असेल; हे आमिष गळाला लागण्यासाठी पुरेसं आकर्षक होतं. आमचं तिकीट आणि व्हिसा झाल्यावर सहलीचे आयोजक गंभीर आजारी पडल्यानं वेळापत्रक आणि काही हॉटेल बुकिंग शेवटपर्यंत गंडलेली होती. त्यामुळे सहल संपेपर्यंत या दोन गोष्टींतलं रहस्य कायम होतं. बुकिंग नसणं पथ्यावर पडून आम्ही चेकोस्लोवाकियामधलं प्राग आणि स्वीडनमधलं माल्मो अशा आणखी दोन शहरांत आणि देशांत भटकून आलो. पाच देशांत टॅक्सीनं प्रवास करताना फक्त एकदाच टोल नाका दिसला आणि आमचे पासपोर्ट, व्हिसा वगैरे कोणीही कुठेही विचारले नाहीत.
सहलीचा व्हाट्सॲप ग्रुप तयार झाला होता. या आयोजकांसोबत प्रथमच प्रवास करणारे चिंतातुर जंतू (इथले मान्यवर आणि आदरणीय सदस्य निराळे) बुकिंग आणि वेळापत्रकाबद्दल उगीच प्रश्न उपस्थित करत होते. काही अनुभवी प्रवासी मनोमन हसत होते. दोन सदस्यांनी सहल संपेपर्यंत ग्रुपात आपलं मौनव्रत अभंग राखून एक अनोखा आदर्श ठेवला. शेवटी सुखरूप परतल्यावर, “सहलीत झालेला जास्तीचा खर्च देणार नाही”, असलं भयंकर बाणेदार विधान करून त्या दोन व्यक्ती अचानक ग्रुप सोडून चालत्या झाल्या. दोन जणांचे पैसे फाट्यावर मारून त्या गेल्याने सगळीकडे सुईपटक सन्नाटा पसरला.
आमच्या आठ जणांच्या लहानशा ग्रुपमध्ये मी स्वतःसकट फक्त चार सदस्यांना ओळखत होते. आम्ही सगळेच ज्येष्ठ नागरिक ६०+ आणि ७०+ असे होतो. ज्येष्ठतम सदस्या आपला इतरांनी लाडिक सांभाळ करावा अशी गोड अपेक्षा बाळगून इकडची काडी तिकडे करत नव्हत्या. (मॅनेजरनं) त्यांच्या ब्यागा उचलणं, त्यांना चालेल असं खाऊ घालणे, थंडीसाठी उपयुक्त जॅकेट घेऊन देणं, अशा अतोनात जबाबदाऱ्या एका करुणेचा महासागर सदस्याच्या गळ्यात आपोआप पडल्या. कधी वॉशरूममध्ये अडकल्यावर बाहेरून हँडलवर कॉईन फिरवून दरवाजा उघडावा लागे. काही ठिकाणी वजनदार, घट्ट दरवाजे उघडायला त्यांची शक्ती कमी पडायची. पुढच्या प्रवासाच्या आधी त्यांनी वजनं उचलून सराव करावा, असं मी त्यांना सांगितलं नाही. कारण हा त्यांचा शेवटचाच विदेश प्रवास आहे असे त्या म्हणत होत्या.
आमच्या सोबत येणारा मूळ श्रीलंकन, आता जर्मनीत स्थायिक असणारा ड्रायव्हर कम मॅनेजर कम ऑलराऊंडर मोहन यानं काही हॉस्टेल / एअरबीएनबी अशी बुकिंग सहज, फटाफट करून आमच्या चिंता मिटवल्या. त्यानं विविध प्रसंगी अफाट मदत केल्यानं मी त्याला, 'मोहन है तो मुमकिन है' म्हणू लागले. कार चालवत असताना बरेचदा श्रीलंकन राजकारणावर ऑनलाईन मोबाईल चर्चांमध्ये, सिंहली भाषेत हिरीरीनं भाग घेऊन तो तुफान बडबड करत होता. ‘राजकारणावर चर्चा केली नाही तर कसली आलीय सहल’, नाही का? अशी अफलातून वल्ली सारथी असल्याने सहलीला चार चांद लागले.
शाकाहारी मंडळी कासावीस होऊन, खायच्या कोणत्या गोष्टी सोबत न्यायच्या याच्या अंतहीन याद्या करून गुजराथ्यांना लज्जित करत होती. काही ठिकाणी किचनची सोय असल्याने ब्रेकफास्टच्या पदार्थांची यादी मारुतीच्या शेपटाप्रमाणे वृद्धिंगत होऊ लागली. त्यामुळे मांसाहारी सदस्य धुमसू लागले. रेडी टू कुक पोहे, शिरा, उपमा, पावभाजी, पिठलं, शेवयांचा उपमा, तसंच चटणी, लोणची आणि चिवड्याचे ३-४ प्रकार, शंकरपाळे, करंजी, खाकरा, ५-६ प्रकारचे लाडू, शेव, बिस्किटं इत्यादी सटरफटर फराळी पदार्थांनी ब्यागा ओसंडून गेल्या होत्या. ग्रुपचा मूळ उद्देश पर्यटन नसून आंतरराष्ट्रीय अन्न वाहतूक करणं असा असावा की काय अशी शंका मेंदूला कुरतडू लागली.
निवासी किचनमध्ये मॅनेजर त्याच्या राईस कुकरमध्ये चिरलेल्या भाज्या घालून चविष्ट भात करायचा. कधी लंच तर कधी डिनरला भात खाऊन लोक्स त्याला दुवा द्यायचे. वाण्याच्या दुकानात गेलं की अंडी, सॉसेज, ब्रेड, बटर, चीज, सॅलड, वाईन, बियर अशी खरेदी व्हायची. पोटभर ब्रेकफास्ट करून निघालो तरी प्रवासात सटरफटर खाणं सुरूच असे. प्रेक्षणीय स्थळाजवळ पार्किंग एरियात मॅनेजर गाडीतल्या बॅटरीवर किटलीत गरम पाणी करून रेडीमिक्स चहा, कॉफी करून सगळ्यांच्या दिलाचं गार्डन करायचा. सहल संपल्यानंतर पाकीटबंद असलेले विविध पोतंभर पदार्थ मॅनेजरला भेट म्हणून देण्यात आले.सतत छप्पन भोग पाकीटं पाहून मला नॉशिया आला. अधूनमधून रात्रीचं जेवण टाळून मी पोटाला विश्रांती दिली. भूक असावी पण शिदोरी नसावी असं वाटू लागलं.
आमची प्रवासाची सुरुवात, मुंबई-दोहा-म्युनिक अशी होती. ग्रुप बुकिंग केले होते. वेब चेकइन झाले नसल्याने आम्ही कतार एअरवेज ऑपरेटेड बाय इंडिगोच्या लाईनीत उभे राहिलो. ग्रुपचे सहा सदस्य मुंबईहून दोहाला जाणार होते.दोन सदस्य थेट दोहा येथे भेटणार होते. इंडिगोचा भोंगळ कारभार सुरू होता. ३ सदस्यांना दोन्ही बोर्डिंग पास सीट नंबरसकट मिळाले. तिघांच्या दोहा-म्युनिक पासवर सीट नंबर नव्हते. त्याचा पाठपुरावा न करता सगळे विमानात चढले. दोहा विमानतळावर कळले की फ्लाइट फुल असल्याने त्या तिघांना जाता येणार नाही. दोहाच्या अतिशय तत्पर आणि कुशल स्टाफनं त्यांना घाईघाईने दोहा-इस्तंबूल-म्युनिक असे आणखी उड्या मारत आमच्यानंतर तासाभरानं पोहोचणाऱ्या विमानात बसवून दिलं.
म्युनिकला उतरल्यावर अत्यंत अडचणीच्या, लहानशा हॉलमध्ये दीड तास रांगेत उभं राहून इमिग्रेशन झालं. तोपर्यंत इतर तिघेही म्युनिकला पोहोचले. शुकशुकाट असलेल्या बॅगेज क्लेम एरियात आता ड्रायव्हरची वाट बघणारे आम्ही फक्त आठ भारतीय प्रवासी शिल्लक होतो. सिक्युरिटी स्टाफनं तासभर बसू दिलं, मग गोड बोलून बाहेर हाकललं. आमचा मॅनेजर वाहतूक मुरंब्यात फसल्याने दीड तास उशिरा आला. आमचा सारथी रथ घेऊन आला आणि सामान आणि आम्ही रथारूढ होऊन मार्गस्थ झालो. रात्री एका सुरेख दुमजली घरात राहिलो. सकाळी डखाऊ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प आणि दुपारी म्युनिक बियर फेस्टिवल असे अफाट कार्यक्रम त्या दिवशी होते.
भर पावसात, थंडगार हवेत म्युनिक बियर फेस्टिवलमध्ये तरुण मुलं-मुली सुरेख ड्रेस कोडमध्ये बागडत होती. जायंट व्हील, मेरी-गो-राउंड वगैरे अनेक राईड्स आनंदात भर घालत होत्या. फेसाळती बियर प्यायला गर्दी ओसंडून वाहत होती. बियरकुंभात शून्य रस असलेल्या दोन ज्येष्ठ सदस्या गर्दीत हरवल्या, तर कसं शोधायचं असा प्रश्न पडला होता. तर तो प्रश्न अनपेक्षितरीत्या मी सोडवला. मैत्रिणींना सांगून एका ठिकाणी वॉशरूमला गेले होते. हो म्हणत त्या फोटो काढत समोरून निघून गेल्या होत्या. मी बाहेर आल्यावर मला कोणीच दिसलं नाही; म्हणून मी सरळ समोर जाऊन शोधलं. पुन्हा परत येऊन शोधलं अन... मी मज हरपून बसले गंऽऽऽ! शोधाशोध करून एकही ओळखीची व्यक्ती आढळली नाही. आता काय करावं, कुठला लँडमार्क शोधून उभं राहावं हा मुख्य प्रश्न होता. फुकट वायफाय शोधण्यात तज्ज्ञ असल्यानं प्रथम ते हुडकलं तर मेल्यांनी आंतरराष्ट्रीय बियर उत्सवात ती सोय ठेवली नव्हती. धिक्कार असो!
विनंती करून मॅनेजरला फोन करण्यासाठी गिऱ्हाईक शोधायला सुरुवात केली. एका बूथवर चौकशी केली पण त्यांना इंग्रजी समजत नव्हतं. एका इंग्रजी भाषा समजणाऱ्या, देखण्या, जर्मन तरुणाला विनंती केल्यावर त्यानं मॅनेजरला फोन लावून मी कुठे आहे ते सांगितलं. मॅनेजरला कोणी तरी ग्रुपमधून हरवलं आहे, इतकंच समजलं होतं पण जत्रेतल्या खाणाखुणा समजणं ब्रह्मदेवाच्याही आवाक्याबाहेर होतं. मी पाच मिनिटांनी एका भारतीय तरुणाला गाठून त्याला फोन करायची विनंती केली. त्यानं मला सांगितलं, “ह्या बव्हेरियाच्या पुतळ्याजवळ उभी राहा.” मी विचारलं, “इथे असे किती पुतळे आहेत?” तर तो म्हणाला, “अख्ख्या जर्मनीत हा एकच पुतळा आहे.” माहितीचा अनपेक्षित ज्ञानदीप प्रकाशित झाला. भक्कम खूण सापडल्यानं मला आनंद झाला. त्यानं मॅनेजरला फोन लावून, मी त्या मोठ्ठ्या पुतळ्याच्या पायऱ्यांशी उभी आहे, असं सांगितलं. मॅनेजरनं ग्रुप सदस्याला कळवलं. मग मी वाट बघू लागले. तिथे बाजूलाच चार पोलीस उभे होते. त्यांची मदत घ्यायची वेळ आली नाही.
पंधरा मिनिटांत एक ओळखीचा चेहरा मला शोधताना दिसला. आमच्या ग्रुपमध्ये फक्त त्याच्याकडेच इंटरनॅशनल रोमिंग होतं. मग त्यानं आमची विजयी सेल्फी काढून ग्रुपवर पोस्ट केली. त्यामुळे मॅनेजरला मी सापडल्याची वार्ता पोचली. त्यानंतर आम्ही दोघंही जत्रेत गल्ली चुकलो आणि आमचा ग्रुप दहा मिनिटांनी सापडला. मैत्रिणी दिसल्यावर मी, ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहाऽऽऽ’ हे गाणं ओरडून गायला लागले. तरीही कुणी पोलिसांना पाचारण केलं नाही. त्या मला मिठ्या मारून आनंद व्यक्त करू लागल्या. काही तरी खटाटोप करून ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’, याची त्यांना खात्री वाटत होती म्हणे. हरवण्याची भीती असलेल्या ज्येष्ठा मात्र मनोमन हादरून गेल्या होत्या. हरवण्याची ख्याती असलेल्या कुंभमेळ्यात जाऊन मी सुखरूप परत आले होते, त्यापुढे बियरकुंभ किस झाड की पत्ती!! मैत्रिणींनी मला आनंदानं वाईन प्यायला दिली. लवकरच बियरजत्रेचा मेरुमणी असलेले प्रचंड फेसाळते मग्ज/कुंभ पुढ्यात घेऊन आम्हीही भर पावसात थंडगार बियर ढोसण्याचा प्रयत्न करू लागलो. आम्ही दोघी मैत्रिणी मिळून एक मगसुद्धा संपवू शकलो नाही हे सांगताना मला मुळीच लाज वाटत नाही. दर्दी सदस्यांचं मात्र समाधान झालं नाही. त्यांना सकाळपासून निवांतपणे बियरजत्रा अनुभवायची इच्छा होती.
बियरला नावं ठेवून शेवटी बियरबरोबर फोटो काढणाऱ्या सुंदऱ्यांना पश्चात्ताप झाल्यामुळे त्यांचे चेहरे झाकले आहेत.
त्या रात्रीचं बुकिंग प्लास्टिकच्या तंबूमध्ये असल्याचं आढळल्यावर थंडीत, पावसात काकडून मरायच्या भीतीनं ते रद्द करून दुसरीकडे गावाबाहेर हॉटेलमध्ये केले. बुकिंगच्या फोटोत वेगळे तंबू दाखवले होते.
ऑस्ट्रिया आणि इतर ठिकाणी, ए&ओ हॉस्टेलमध्ये बंकबेडची सोय होती. त्यावर चढून झोपणं ही एक कसरत होती. ज्येष्ठतम सदस्या पहिल्या निवासापासून रोज सकाळी भलतीकडेच झोपलेली आढळून येत होती.कधी किचनमधला सोफा, कधी शुभ्र पांघरुणासह खुशाल जमिनीवर! तिची रुम पार्टनर फार घोरते म्हणून दुसरीकडे झोपावं लागतं असं तिनं सांगितलं. झोपेत चालायची सवय असताना तिला कुटुंबियांनी एकटीला सहलीला का बरं पाठवलं, अशी खुसफुस आम्ही करत असू. नवीन राहायचं ठिकाण आलं की, उद्या सकाळी ही ज्येष्ठा कुठे झोपलेली आढळेल, याच्या पैजा आम्ही घेऊ लागलो.
आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी बरेचदा रात्री ९-१० वाजता पोहोचत होतो. एअरबीएनबी गावाबाहेर असे. गरम कपड्यांनी अलंकृत मॅनेजर आणि एक सदस्य मोबाईलच्या अंधुक उजेडात किल्ल्या, कोड नंबर शोधत असताना एखाद्या रहस्यमय चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे असं वाटे. आम्हीपण संभाव्य दरोड्यासाठी गाडीत दबा धरून बसलो आहोत वाटत असताना, माझ्या मनात पिंक पँथरचं पार्श्वसंगीत सुरू असे. ‘खुल जा सिम सिम’ झाल्यावर आम्ही आनंदानं बडबडत, गाडीतून उतरून खोल्या ताब्यात घेत असू. मॅनेजरला, ‘हळू बोला, सगळे झोपलेत’ सांगताना कंठशोष करावा लागे. बहुतेकदा पहिल्या, दुसऱ्या मजल्यांवर खोल्या असायच्या; त्यात वर्तुळाकार त्रासदायक जिने! प्रचंड सामान नेणं आणि उतरवणं यात सगळ्यांची कसोटी लागायची.
जर्मनी, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, स्वीडन, चेकोस्लोवाकिया अशा पाच देशांत, आल्प्स पर्वतरांगांमधून, सुंदर रस्त्यांवर, लहान गावांतून, हिरव्यागार शेतांमधून आमचा छान प्रवास सुरू होता. ऑस्ट्रियात एका मिठाच्या खाणीत छोट्या रेलगाडीतून प्रवास केल्यावर एका लाकडाच्या घसरगुंडीवरून खोलवर पाताळात घसरून जायचं होतं. या स्टंटमध्ये माझ्या भीषण किंकाळ्यांनी अवघी मिठाची खाण दणाणून गेली होती. तिथे माझ्यापेक्षा ज्येष्ठ निमूट घसरून येताना आढळले.
बर्लिनला आम्ही रात्री दहा वाजता हॉस्टेलवर पोहोचलो. तिथे मैत्रिणीचा भाऊ मला भेटायला येऊन थांबला होता. तो मला आणि माझ्या मैत्रिणीला, ट्रामनं एका उत्तम भारतीय हॉटेलात जेवायला घेऊन गेला. भरपूर गप्पा मारून रात्री दीड वाजता पुन्हा हॉस्टेलवर परतलो. त्याच्यामुळे रात्रीबेरात्री बर्लिनमध्ये हिंडण्याची मौज अनुभवली. हॅम्बुर्गला क्रूझ राईडनंतर मेहंदी नावाच्या भारतीय हॉटेलात जेवायला गेलो.
भारतीय हॉटेलात जेवायचं असा हट्ट धरला की मॅनेजर म्हणायचा, ३६५ दिवस तुम्ही तेच खाता ना! मग इकडे जे पर्याय आहेत ते खाऊन बघा! भारतीय हॉटेलात जेवून आल्यावर, त्याचा हट्ट धरणारे लोक्स पदार्थांना नावं ठेवत होते. मेल्यांनो, तुमच्या आग्रहाखातर जेवलो ना, मग गप खावा की गुमान! लंचनंतर दोन-तीनदा साबणानं हात धुतले तरी, तो मेला बटर पनीरचा वास अगदी डिनरपर्यंत गेला नव्हता.
रिपरबान हा हॅम्बर्गमधला रेड लाईट एरिया आहे. प्रथम फक्त पुरुष सदस्य तिथे जाणार असं ठरलं होतं. आम्ही का नाही जायचं? आम्हीपण येणार असं स्त्री सदस्या म्हणू लागल्या. खुलेआम फुकटात कामक्रीडा बघायला मिळणार म्हणून काही जण हुरळून गेले होते. फुकटात कोण दाखवेल, असा बाळबोध विचार माझ्या मनात रुंजी घालत होता. तिथे सेक्स शॉप होती, सेक्स टॉयची दुकानं होती. तिकीट काढून आत गेल्यावर अर्थातच शोज असतील. रस्त्यावर इतर साधी दुकानंही दिसली. आम्ही मैत्रिणी तिथल्या मेकअपच्या दुकानांत जाऊन रंगीबेरंगी विग घालून फोटो काढून फिदीफिदी करून आलो. आशेची पाखरं आणखी दूरवर जाऊन फुकटात काहीच दिसलं नाही म्हणून निराश होऊन परतली.
आमचं परतीचं तिकीट मंगळवारचं होते. कोपनहेगन, स्वीडन असा परतीचा प्रवास सुरू झाला होता. रविवारी एक म्युझियम बघायला गेलो तेव्हा माझं बॅकपॅक गेटजवळच ठेवायला सांगितलं. म्हणून आतल्या खणात ठेवलेले १५५ युरो आणि पासपोर्ट काढायला गेले तर ते चोरीला गेले होते. शनिवारी कुठे तरी गर्दीत पाकीट आणि रायटिंग पॅड चोरीला गेलं होतं, असं लक्षात आलं. पाकीटमारांपासून सावधान वगैरे सूचना वाचल्याचे आठवले.माझं रायटिंग पॅड चोरून कुणाला काय मिळणार होतं? मी काही लिहू नये म्हणून हे आंतरराष्ट्रीय कारस्थान होतं, चाणाक्ष असल्यानं मला ते तत्काळ समजलं.
अंधारात हरवलेली सुई उजेडात शोधून सापडणार नाही हे १००% माहीत असूनही मी शोधलं. काळजीवाहू सदस्यांनी, चुकून आपल्या सामानात तर गेलं नाही ना, म्हणून शोधलं. रात्री मुक्कामाला होतो त्या एअरबीएनबीमध्ये फोन करून विचारलं. रायटिंग पॅडपेक्षा पासपोर्ट जास्त महत्त्वाचा आहे असं सर्व म्हणू लागले. परतीच्या प्रवासासाठी इमर्जन्सी पासपोर्ट कुठे करायचा याचा विचार सुरू झाला. चुलत मैत्रीण एका देशात भारतीय दूतावासात मोठ्या पदावर कार्यरत आहे. तिला पुढचं प्रोसिजर विचारलं. जर्मनीत पोलीस स्टेशनला पासपोर्ट, पैसे हरवल्याची तक्रार दाखल करून, तो रिपोर्ट फ्रँकफर्टच्या दूतावासात देऊन इमर्जन्सी पासपोर्टसाठी अर्ज करायचा होता. त्या रात्री आम्ही फ्लेन्सबर्ग इथे होतो. तिथल्या छोट्याश्या स्टेशनातला देखणा पोलीस म्हणे, रिपोर्टची आवश्यकता नाही. रविवार सुट्टीचा दिवस होता किंवा माहितीच्या अभावामुळे त्यानं नकार दिला असावा.
इमर्जन्सी पासपोर्ट करून घेण्यासाठी सोमवार हा एकमेव वर्किंग डे मिळणार होता; कारण मंगळवारी फ्रँकफर्टहून सकाळी साडेदहाची फ्लाईट होती. सोमवारी थेट फ्रँकफर्टला गेलो असतो तरी दुपारी पोहोचणार होतो. त्यामुळे सकाळी ९ वाजता हॅम्बर्गला पोहोचून, पोलीस स्टेशनमधून रिपोर्ट घेऊन तिथल्या दूतावासात अर्ज करायचं ठरलं. पोलीस स्टेशन स्वच्छ, सुंदर होतं. उत्साही, तरुण स्टाफ कार्यरत होता. तक्रार दाखल करून घेणारी सहा फूट, उंच हसरी ऑफिसर फारच तत्पर होती. जर्मन भाषा येणारा मॅनेजर असल्याने काम सोपे झाले. "पोलीस स्टेशन" हे अनपेक्षित प्रेक्षणीय स्थळ बघून ग्रुप सदस्य खुश झाले. इतक्यात सायरनवाली गाडी आली आणि दोन पोलीस धावत निघाले. एक मित्र मला चिडवू लागला की, तुझे १५५ युरो शोधायला पोलीस फोर्स पाठवला आहे. आम्ही सगळ्यांनी तिथल्या वॉशरूमचा अलभ्य लाभ घेतला. तिथून आमची वरात भारतीय दूतावासाकडे निघाली.
तिथे आमचा गलबला पोहोचला तेव्हा दहा वाजले होते. तिथल्या अधिकाऱ्यानं, "यु हॅव लॉस्ट ॲन इम्पॉर्टन्ट इंडियन डॉक्युमेंट!" असं जोरात सांगून आधीच मेलेल्या मला अपराधबोधाखाली पुन्हा ठार मारलं. त्यानं जर्मन भाषेत लिहिलेल्या पोलीस तक्रारीत पासपोर्ट नंबरऐवजी फाईल नंबर टाकल्याची चूक दाखवली. रिपोर्ट पुन्हा पोलीस स्टेशनात जाऊन दुरुस्त करून, सायबर कॅफेत ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितलं. सगळी कागदपत्रं घेऊन एक वाजायच्या आत फॉर्म भरायचा होता. संध्याकाळी साडेपाचपर्यंत पासपोर्ट देण्याचा प्रयत्न करू असं अधिकारी म्हणाला. जुन्या पासपोर्टची फोटोकॉपी, व्हिसाची फोटोकॉपी आणि दोन फोटो हवे होते. माझ्याकडे सगळं डिजिटल उपलब्ध होतं. मग एक ग्रुप सदस्य, त्यांनी कसं सग्गळं दोन प्रतींसकट सोबत आणलं होतं, ते सांगून मला खजील करायचा व्यर्थ प्रयत्न करू लागले. “अबे हो! मग एवढी तयारी करून काही उपयोग झाला का? पासपोर्ट तर माझा चोरीला गेला ना, मॅड लेकाचे!” धड पासपोर्टही हरवता येत नाही!
आज फिर जीने की तमन्ना ( भाटीया) है
आज फिर खोने का इरादा है उर्फ सखूबाईंचा चेहरा का तमन्ना भाटीयाचा!
त्यांच्या फोटोकॉप्याच चोरीला गेल्या असत्या तर बॅकअप काय होता माहीत नाही. ग्रुप सदस्यांना सिटी सेंटरमध्ये सोडून मॅनेजर, मी आणि तारणहार मैत्रीण पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट दुरुस्त केला.मॅनेजरच्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात पासपोर्ट चोरीला जाण्याचा पहिलाच प्रसंग होता. एक फोटोबुथवर माझा फोटो काढून घेतला. कुठेही सायबर कॅफे किंवा फोटोकॉपी सेंटर सापडले नाहीत. कसंबसं १२ वाजेपर्यंत दूतावासात पोहोचलो. तिथे आमचं नशीब जोरदार असल्यानं शुकशुकाट होता. आमच्या चुलत मैत्रिणीनं तिथल्या अधिकाऱ्याला मेसेज करून मदत करायची विनंती केली होती. त्यामुळे अत्यंत प्रेमानं आम्हांला सगळी मदत मिळाली. मोबाईलवरून काही केल्या लॉगइन रजिस्टर होत नव्हतं. अधिकाऱ्यानं आमच्या मॅनेजरच्या लॅपटॉपवरून माझं लॉगइन रजिस्टर करून दिलं. मग आम्ही तिघांनी मिळून एक वाजेपर्यंत आठ पानी फॉर्म भरून दिला. अधिकारी म्हणाला, “४-४:३०पर्यंत या, तुम्हाला पासपोर्ट दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही.” मला गहिवरून येऊ लागलं. त्या दिवशी पासपोर्ट मिळाला नसता तर मला एक दिवस राहून, तिकीट पोस्टपोन करावं लागलं असतं. मग आम्ही चिंतामुक्त होऊन जेवण, शॉपिंग वगैरे करून चार वाजता हजर झालो. माझा इमर्जन्सी पासपोर्ट लॅमिनेट करायला एक जण घेऊन गेला होता. तो साडेचार वाजता आला. तोपर्यंत हळूहळू सगळा ग्रुप भारतीय दूतावासात बागडू लागला. फोटो काढणं, वॉशरूम वापरणं होईपर्यंत माझा पासपोर्ट आला. अधिकाऱ्यानं तो देत असताना सांगितलं की, आता जुना पासपोर्ट सापडला तरी तो वापरायचा नाही. भारतात गेल्यावर नवीन पासपोर्ट इश्यू करून घ्यायचा. मी विचारलं, “समजा माझा पासपोर्ट पोलिसांना सापडला तर ते माझ्या पत्त्यावर पाठवतील का? कारण त्यावर माझा १० वर्षांचा अमेरिकन व्हिसा आहे.” “जगातले कुठलेच पोलीस असं करणार नाहीत, फार तर इथे दूतावासात पाठवतील”, असं त्यानं सांगितलं. आम्ही सगळ्यांनी स्टाफचे तहे दिलसे आभार मानून, दुवा देऊन फ्रँकफर्टच्या दिशेनं प्रस्थान केलं. माझ्या पांढऱ्या पासपोर्टमुळे फ्रँकफर्ट आणि मुंबईला इमिग्रेशनला थोडा वेळ लागला. मुंबईला मला इमर्जन्सी फॉर्मात यावं लागलं.चित्रविचित्र घटनांनी मौजमजेची झालेली सहल आटोपली आणि हिंडकावळी अपुल्या घरट्यात परतली.
हिंडकावळीचा पांढरा पासपोर्स
पुढच्या प्रवासासाठी नवीन पासपोर्ट करायला टाकला आहे. शिर सलामत तो पासपोर्ट पचास!
प्रतिक्रिया
हिंडकावळी मौसी
इतके सगळे अनुभव एकाच ट्रिपेत घ्यायचं काही खास कारण?
पासपोर्टसाठी, उसगावाच्या व्हिसासकट, शुभेच्छा.
This too shall pass!
धन्यवाद!
आता वीणा वर्ल्ड ,केसरीनेच फिरणार आहे. नो नाट्य!!
लोल
सखूमावशी, तरी त्या पोतंभर खाण्याचा फोटो दाखवून भावना न चाळवण्याबद्दल आभार.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
आता फक्त.......
आता फक्त केसरी, वीणा वर्ल्ड आणि श्रीखंड पुरी, बटाटावडा, मसालेभात आणि काकडीची कोशिंबीर @ टिंबक्टू !!!
(अतिअवांतर) शंका (स्वगत)
एमर्जन्सी सर्टिफिकेट गहाळ झाल्यास/चोरीला गेल्यास/त्याच्यावर चहा, केचप अथवा लोणचे सांडल्यास (किंवा 'चुकून' फ्लश झाल्यास) काय करत असतील?
सोप्प आहे
लगेज सोबत ढकलून डिपोर्ट करतील. पुन्हा कधीच पासपोर्ट इश्यू करणार नाहीत.
मलाच पुन्हा पासपोर्ट हरवला/चोरीस गेला तर लिगल ॲक्शन होईल असे फाॅर्मात दिसले. म्हणजे मी पीडित आणि कारवाई माझ्यावरच ?
…
पूर्वी कधीतरी, भारतीय नागरिक असताना, याचा (उगाच) अभ्यास केला होता. (म्हणजे, भारतीय दूतावासाच्या वेबसाईटची छाननी ही केवळ पासपोर्ट नूतनीकरणाकरिता केली होती. मात्र, ती करत असताना, आजूबाजूला लक्ष गेलेच, नि काही मनोरंजक (!) मौक्तिके सापडली.)
बोले तो, परदेशात असताना जर तुमचा पासपोर्ट हरवला/चोरीला गेला/खराब झाला. तुम्ही जर त्या परदेशात दीर्घ मुदतीकरिता राहत असाल (तसे तुमचे स्टेटस असेल — उदा. दीर्घकालीन विद्यार्थी/नोकरी/कायमस्वरूपी रहिवासी वगैरे), आणि तुम्हाला भारतात परतण्याची जर तातडी नसेल, तर, सर्व कायदेशीर सोपस्कार केल्यानंतर तुम्हाला एमर्जन्सी सर्टिफिकेटऐवजी रीतसर नवा पासपोर्टसुद्धा मिळू शकतो. (एमर्जन्सी सर्टिफिकेट हे शक्यतो वरील कॅटेगरीत तुम्ही मोडत नसाल, आणि/किंवा तुम्हाला भारतात परतण्याची तातडी असेल, आणि/किंवा तुम्हाला हाकलून भारतात परत पाठवले जात असेल, तरच देतात.) मात्र, वारंवार जर तुमचा पासपोर्ट हरवू/चोरीला जाऊ/खराब होऊ लागला, तर मग त्याउपर अतिरिक्त दंड आकारला जाऊ शकतो वा नवाकोरा पासपोर्ट नाकारलासुद्धा जाऊ शकतो, वगैरे वगैरे.
(हरविलेल्या अमेरिकन व्हिसाबद्दल)
तुमचा पासपोर्ट नंतर जरी सापडला, तरी त्यातील यूएस व्हिसा वापरता येणे शंकाजनक आहे.
१. जेव्हा तुम्हाला एमर्जन्सी सर्टिफिकेट जारी केले जाते, तेव्हा तुमचा (हरविलेला) पासपोर्ट आपोआप रद्दबातल ठरतो. त्यामुळे, 'आता जुना पासपोर्ट सापडला तरी तो वापरायचा नाही' हे जे भारतीय कॉन्सुलर अधिकाऱ्याने सांगितले, ते योग्यच आहे.
२. तुम्हाला कधीही जेव्हा नवीन भारतीय पासपोर्ट जारी केला जातो, तेव्हा तुमचा जुना भारतीय पासपोर्ट (असल्यास) हा रद्द केला जातो. मात्र, हे सामान्य कारणांकरिता जेव्हा होते (उदा. तुमच्या जुन्या पासपोर्टाची मुदत संपली म्हणून, अथवा तुमच्या जुन्या पासपोर्टातली कोरी पाने संपली, म्हणून), तेव्हा तुमच्या जुन्या पासपोर्टात जर मुदत न संपलेला एखादा व्हिसा असेल, तर तो मात्र रद्द होत नाही. अशा वेळेस तुम्ही दोन्ही पासपोर्ट (चालू पासपोर्ट + वैध व्हिसा असलेला जुना रद्दबातल पासपोर्ट) एकसमयावच्छेदेकरून दाखवून काम भागवू शकता.
३. मात्र, तुमचा जुना पासपोर्ट हरविला म्हणून जर तुम्ही रिपोर्ट केलेला असेल, तर परिस्थिती वेगळी आहे. अशा परिस्थितीत, पासपोर्ट हरविल्याचे स्थानिक पोलिसांना तथा भारतीय वकिलातीला/कॉन्सुलेटला कळवावे लागतेच, परंतु त्याचबरोबर, ज्या अमेरिकन वकिलातीने/कॉन्सुलेटने तुमचा अमेरिकन व्हिसा जारी केला, तिलासुद्धा (अमेरिकन व्हिसा असलेला) पासपोर्ट हरविल्याचे कळविणे (पासपोर्ट आणि व्हिसाच्या तपशिलांसहित तथा पोलीस रिपोर्टाच्या प्रतीसहित) अपेक्षित आहे. आणि, अमेरिकन वकिलातीस/कॉन्सुलेटास कळविल्यावर तुमचा व्हिसा आपोआप आणि ताबडतोब रद्दबातल ठरतो. आणि त्यानंतर तुमचा जुना पासपोर्ट सापडला जरी, तरी तो व्हिसा वापरता येत नाही.
(त्यानंतर मग एकच उपाय. अमेरिकेबाहेर असताना जर तुमचा (अमेरिकन व्हिसा असलेला) पासपोर्ट हरवला असेल, तर, नवीन पासपोर्ट जारी करून घेतल्यावर, तुम्ही ज्या अमेरिकन वकिलातीच्या/कॉन्सुलेटच्या कार्यक्षेत्रात येता, त्या वकिलातीकडून नव्याने अमेरिकन व्हिसा बनवून घेणे, आणि नव्या व्हिसाच्या आवेदनात तुमचा जुना व्हिसा हरविल्याचे पूर्ण तपशील (पोलीस रिपोर्टासह) पुन्हा एकदा पुरविणे. US Missions in third countries (where you do not habitually reside) will not entertain you in this regard. Also, technically, a lost or stolen US visa (or even an expired US visa) cannot be 'reissued'; you will have to apply for a fresh visa. आणि, अमेरिकेत असताना हरविला, तर, अमेरिकेत प्रवेश करतेवेळी तुम्हाला दिलेल्या परवान्याच्या मुदतीपर्यंत तुम्ही तशाही राहू शकता, आणि तुमच्या येण्याजाण्याची नोंद आजकाल तशीही बहुतकरून ऑनलाइन आणि परस्पर होत असल्याने (हल्ली तुमच्या पासपोर्टात ठप्पासुद्धा मारत नाहीत.), तुमच्या चालू परवान्याची तथा येण्याजाण्याची नोंद (गरज पडल्यास पुरावा म्हणून) ऑनलाइन उतरवू शकता. (पूर्वीप्रमाणे कागदी नोंद हल्ली फक्त क्वचित आणि अपवादात्मक परिस्थितीतच होते, आणि विमानाने येतजात असल्यास सहसा ऑनलाइनच व्हावी.) मात्र, अमेरिकेत असताना नव्याने व्हिसा जारी करण्याची कोणतीही तरतूद नाही. (याला काही मर्यादित अपवाद आहेत; मात्र, ते बिझनेस/टूरिस्ट व्हिसाकरिता लागू नाहीत.) त्यामुळे, नव्या अमेरिकन व्हिसाकरिता भारतात परतल्यावरच नव्याने आवेदन करावे लागेल.)
अधिक माहिती इथे.
४. (ग्रे एरिया): समजा, तुम्ही एमर्जन्सी सर्टिफिकेटासहित भारतात परतलात, परंतु अमेरिकन कॉन्सुलेटला पासपोर्ट (आणि त्यातला व्हिसा) हरवल्याचे कळविले नाहीत. आणि मग तुमचा जुना पासपोर्ट सापडला. तर मग तुमच्या जुन्या (आता रद्दबातल) पासपोर्टातला अमेरिकन व्हिसा वैध आहे की नाही? ('जुना + नवा पासपोर्ट एकसमयावच्छेदेकरून दाखविण्या'च्या नियमानुसार?)
Well, I would not risk it if I were you. It would most likely be considered invalid, and you could possibly find yourself subject(ed) to all kinds of undesirable questioning, from Indian as well as American immigration authorities. I would not consider it worth the trouble.
----------
सांगण्याचा मतलब, तुमच्या हरविलेल्या पासपोर्टातल्या अमेरिकन व्हिसाविषयी (तो पासपोर्ट यदाकदाचित पुन्हा जरी सापडला, तरीसुद्धा) विसरा, आणि नवा व्हिसा करवून घ्या.
माहिती रोचक आणि तपशीलवार आहे.
माहिती रोचक आणि तपशीलवार आहे.
एक प्रश्न पडला. की अशा स्थितीत नवीन व्हिसा करून घेणे प्राप्त असेल तर, किमान जुना व्हिसा होता पण तो हरवला या फॅक्टमुळे नवीन / फ्रेश व्हिसा मिळणे काहीसे सुलभ होत असेल की नव्याने व्हिसा म्हणजे पुन्हा पहिल्या वेळी जेव्हा मिळाला तेव्हाप्रमाणे पूर्णपणे नव्याने केसचा विचार होत असावा?
सांगणे कठीण आहे.
नक्की सांगता येत नाही. कदाचित तुमच्याकडे अगोदर व्हिसा होता, ही बाब विचारात घेतली जाईलसुद्धा, कदाचित घेतली जाणार नाहीसुद्धा; माझ्या कल्पनेप्रमाणे, ते सर्वस्वी व्हिसा ऑफिसरच्या मर्जीवर अवलंबून आहे. In any case, the matter would be subject to fresh adjudication.
आणि तसेही, there is no entitlement in visa matters; व्हिसा ऑफिसर तुम्हाला कोणत्याही कारणाकरिता किंवा कारणाविना व्हिसा देऊ किंवा नाकारू शकतो, त्यामुळे१… अगोदर तुमच्याकडे व्हिसा होता, तो संपला किंवा हरवला, म्हणून पुन्हा तुम्हाला व्हिसा मिळेलच, याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही.
(हं, तुमच्या एकंदर परिस्थितीप्रमाणे२, पहिल्या वेळेस व्हिसा मिळवताना तुम्हाला जर फारसा त्रास झाला नसेल, आणि परिस्थिती फारशी बदलली नसेल, तर पुढच्या वेळेस तुम्हाला त्रास होण्याची शक्यता कमी आहे, एवढेच फार फार तर म्हणता येईल. परंतु, शाश्वती नाहीच.)
——————————
१ फार कशाला, तुमच्याजवळ अमेरिकेचा व्हिसा असला, तरीसुद्धा, तुम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळेलच, याचीही शाश्वती नसतेच. That decision is entirely up to the immigration officer at the port of entry. Technically, a visa is not an entry permit, let alone a stay permit. It is, at best, a permit to travel to a port of entry in order to apply for entry; at worst, it is merely a recommendation — a suggestion — from the consular officer to the immigration officer, stating that your documents have been viewed and appear to be in order, and that you may, at the discretion of the immigration officer, be granted entry for the purpose stated. त्यापुढचा निर्णय सर्वस्वी त्या इमिग्रेशन अधिकाऱ्याचा असतो; त्याला जर काही गडबड वाटली, तर तो (व्हिसा असूनसुद्धा) तुम्हाला प्रवेश नाकारू शकतोच.
त्याउपर, काही देशांच्या नागरिकांना, अमेरिकेत टूरिस्ट म्हणून किंवा बिझनेसकरिता तात्पुरत्या प्रवेशासाठी व्हिसा लागत नाही.१अ याचा अर्थ असा नव्हे, की त्यांना प्रवेशाची हमी असते. (किंबहुना, अमेरिकन नागरिक वगळता कोणालाही प्रवेश नाकारला जाऊ शकतो.) फक्त, तुमच्या नागरिकत्वाकरिता जर व्हिसा आवश्यक असेल, आणि तुम्ही जर तेथे व्हिसाविना गेलात, तर तो व्हिसा ऑफिसर तुम्हाला entertainसुद्धा न करता तुम्हाला परत पाठवेल (किंबहुना, या भीतीने मुळात तुमची विमानकंपनी तुम्हाला विमानात पाऊल ठेवू देणार नाही, कारण या सगळ्याचा भुर्दंड त्यांच्यावरही पडतो.); मात्र, तुमच्या नागरिकत्वाला जर व्हिसा आवश्यक नसेल, तर निघण्यापूर्वी व्हिसा न घेता तुम्ही त्या इमिग्रेशन ऑफिसरपर्यंत पोहोचू शकाल, इतकाच फरक. मात्र, एकदा इमिग्रेशन ऑफिसरपर्यंत पोहोचल्यावर तुम्हाला परवानगी द्यायची की नाही (भले तुमच्याकडे व्हिसा असला, तरीही), हा सर्वस्वी त्या इमिग्रेशन ऑफिसरचा निर्णय.
१अ तरी आजकाल त्याही लोकांना (कनेडियन नागरिक वगळता१अ१) ESTA नावाच्या भानगडीत आगाऊ ऑनलाइन नोंद करावी लागतेच.
१अ१ कॅनडाची गोष्ट किंचित वेगळी आहे. अमेरिकन आणि कनेडियन नागरिक जे एकमेकांच्या देशांत विनाव्हिसा येऊजाऊ शकतात, त्याचा या व्हिसामुक्ती योजनेशी संबंध नाही. त्याचे मूळ अमेरिका आणि ब्रिटन यांच्यातील एका पुरातन करारात आहे. कराराच्या भाषेस अनुसरून, अमेरिकन तथा कनेडियन नागरिकांव्यतिरिक्त, अमेरिकेतील तथा कॅनडातील नोंदणीकृत मूलनिवासी, झाले तर अमेरिकेचे कायम रहिवासी (ग्रीनकार्डहोल्डर) हेदेखील या कराराच्या लाभार्थींमध्ये अंतर्भूत आहेत. (पूर्वी कॅनडाचे कायम रहिवासी असलेले ब्रिटिश राष्ट्रकुलातील देशांचे नागरिक हेदेखील या कराराच्या भाषेनुसार लाभार्थींमध्ये गणले जात, परंतु २००१नंतर कधीतरी त्यांना वगळण्यात आले.) या करारात मोडणाऱ्यांना आगाऊ नोंदणीची भानगड नाही; मात्र, प्रवेश नाकारला जाऊ शकतोच.
२ ‘परिस्थितीप्रमाणे’ बोले तो, काही कॅटेगरीतील लोकांना व्हिसा नाकारला जाण्याची शक्यता तुलनेने पुष्कळच कमी असते. जसे, एच१बी-धारकाचा/ची वैवाहिक जोडीदार तथा १८ वर्षांच्या आतील अविवाहित मुले, यांचा एच४ व्हिसा सहसा नाकारला जाऊ नये. किंवा, एका विशिष्ट वयापलीकडील वृद्ध, भारतात राहते घर आहे, अमेरिकेतील मुले अमेरिकेतील खर्च देण्याचे हमीपत्र देत आहेत — दीर्घ मुदतीचा (१० वर्षांपर्यंत२अ) टूरिस्ट व्हिसा मिळायला सहसा अडचण येऊ नये. (अर्थात, हमी नाहीच.) मात्र, एखादा तिशीतला, नोकरीक्षम तरुण आहे… टूरिस्ट व्हिसा नाकारला जाण्याचीच शक्यता अधिक.
२अ ‘दहा वर्षांचा टूरिस्ट व्हिसा’ याचा अर्थ इतकाच, की दहा वर्षांच्या मुदतीत अनेक वेळा जाता येते. कोठल्याही एका खेपेस सहा महिन्यांहून अधिक काळ राहण्यास परवानगी मिळत नाही, आणि भेटींची वारंवारिता खूपच वाढल्यास आणि/किंवा दोन भेटींमध्ये खूपच कमी वेळ राहिल्यास हा परवानगीचा काळ त्याहून कमीही केला जाऊ शकतो, अथवा क्वचित्प्रसंगी प्रवेश नाकारलासुद्धा जाऊ शकतो.
धन्यवाद!
काय अभ्यास!! ओमायगाॅड!!
पाकिटमारी
पाकिटमारी हा युरोपमधल्या बऱ्याच देशांतला उपद्रव आहे. त्यासाठी सहल आयोजक नेहमीच आधी सूचना देतात. पासपोर्ट तर जिवापेक्षा जास्त जपायचा, असं पुन्हा पुन्हा सांगितलं जातं. उसाच्या व्हिसाचा एवढा मोठा लॉस झालेला अस्ताना सुद्धा, तुम्ही इतक्या मजेत हे लिहिलं आहे हे पाहून तुमच्या विषयीचा आदर वाढला.
म्युझियम?
हे महान म्युझियम कोणतं?
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
डेव्हिडस् कलेक्शन
कोपनहेगन
डेव्हिडस् कलेक्शन
कोपनहेगन
अच्छा. म्हणजे तिथे पासपोर्ट
अच्छा. म्हणजे तिथे पासपोर्ट घेऊन जायचे नाही अशी खूणगाठ बांधून ठेवावी हे बरे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
.
पासपोर्ट हरवल्याचा परिच्छेद वाचताना माझ्याच हृदयाचे ठोके काळजीने वाढले होते. मागच्या वर्षी मी, माझा लेक आणि माझी आई आणि तिच्या वयाच्या अजून दोन ज्येना असे स्वित्झर्लंड आणि येता येता तीन दिवस पॅरिस अशी ट्रिप करून आलो. स्वित्झर्लंडमध्ये युंगफ़्राउ पर्वतावर जाऊन मी आमची परतीची तिकिटं हरवली. तेव्हा तिथे माझं आणि आईचंच इतकं वाजलं की शेवटी दोन स्विस टीसी काकूंनी मध्यस्ती केली आणि, "हे सगळे येतानाच्या ट्रेनमध्ये होते. आम्ही त्यांची तिकिटं बघितली आहेत" असं सांगून चिठ्ठ्या लिहून दिल्या. तरीही ट्रेन पुन्हा लुत्त्झर्नला येईपर्यंत माझ्या डोळ्यांतल्या गंगा-यमुना थांबल्या नाहीत.
आता आठवल्यावर सगळेच किस्से विनोदी वाटतात. पण ते असे लिहून काढता आले पाहिजेत!
...
१. Gravity is your friend.
२. तिकीट हरवण्याच्या तुलनेत पासपोर्ट हरवणे हे किञ्चित गंभीर आहे, नव्हे काय? (परतीची तिकिटे हरवली, तर, in the worst case, नवी काढता येतात. पैसे जातात फार फार तर. (किंवा, तेही करायचे नसेल, तर हिरकणी मार्ग आहेच.) पासपोर्ट हरवला, तर... असो.)
----------
आता, आमचे किस्से.
१. सर्का नोव्हेंबर १९९२. भारतातून बाहेर पडण्याची (आणि अमेरिकेस येण्याचीसुद्धा) आयुष्यातली पहिलीच वेळ. तसाही भांबावून वगैरे गेलेलो होतोच. मुंबई ते सान फ्रान्सिस्को मार्गे सिंगापूर आणि हाँगकाँग अशी फ्लाइट होती. (सिंगापूरला मोठ्ठा लेओव्हर होता नि विमान बदलायचे होते; हाँगकाँगला मात्र विमान बदलायचे नव्हते, आणि जेमतेम विमानातून उतरून विमानतळाच्या इमारतीपर्यंत (बसने) पाय मोकळे करून (इमारतीत न शिरता) विमानात परत येता येण्याइतकाच थांबा होता. (अतिअवांतर: तेव्हा हाँगकाँग अद्याप राणीचेच नाव लावत होते, आणि जुनाच विमानतळ अद्याप कार्यरत होता.) तर ते एक असो.)
हं, तर... सांगत काय होतो... स्थळ: सिंगापूरचा चांगी विमानतळ. साडेनऊ तासांच्या लेओव्हरकरिता एअरलाइनने हॉटेल दिले होते, त्यात झोप काढूनसुद्धा कंटाळा आल्यावर, पुढील चेकइनसाठी पुन्हा विमानतळावर आलो होतो, परंतु इतके करूनसुद्धा फ्लाइटला भरपूर वेळ होता. मग टिवल्याबावल्या करीत विमानतळावर वेळ काढीत होतो. खिशात अजूनही काही भारतीय रुपये शिल्लक होते. म्हटले, काय करायचे आहेत? इत:पर आपल्याला त्यांचा काही उपयोग नाही. म्हटले, बदलून घेऊ. म्हणून करन्सी एक्सचेंजकडे गेलो. भारतीय रु. --> सिंगापूर डॉ. --> यूएस डॉ. अशी द्राविडी अदलाबदल करताना दुहेरी फटका बसला खरा, परंतु, नाहीतरी ते भारतीय रु. तसेही वायाच गेले असते, त्यापेक्षा निदान काही यूएस डॉ. तरी खिशात आलेले बरे, म्हणून बदलून घेतले, झाले. तर तेही असो.
आता, वास्तविक, सिंगापुरातल्या करन्सी एक्सचेंजमध्ये पासपोर्ट वगैरे विचारीत नाहीत (निदान, (माझ्या आठवणीप्रमाणे) मला तरी विचारला नव्हता (चूभूद्याघ्या.)), परंतु तरीही, just in case म्हणून हातात काढून ठेवला होता. यूएस डॉ. घेतले, नि तो पासपोर्ट तसाच काउंटरवर ठेवून शांतपणे चालू लागलो.
कोणीतरी ताबडतोब हाक मारून बोलाविले, म्हणून बरे!
२. सर्का जून २०१५. स्थळ: माँटेगो बे, जमैका येथील विमानतळ.
वास्तविक, सिंगापुरातला वर सांगितलेला अनुभव जरी शिळा असला, तरी विसरायला नको होता. पण म्हणतात ना, Public memory is short... तशातली गत.
तर मी, बायको, मुलगा, आणि श्वशुर असे चौघेजण नुकतेच जमैकाच्या माँटेगो बे विमानतळावर उतरलो होतो. तिघे यूएस पासपोर्टधारक आणि श्वशुर भारतीय पासपोर्टधारक. यूएस पासपोर्टधारकांचे इमिग्रेशन विनाअडचण पटापट पार पडले. भारतीय पासपोर्टधारकाच्या इमिग्रेशनला अडचण अशी आली नाही (तसेही, भारतीय पासपोर्टधारकांना जमैकाकरिता व्हिसा लागत नाही.); मात्र, (१) ते भारतीय पासपोर्टधारक असल्याकारणाने, आणि (२) नजीकच्या भूतकाळात भारतात असल्याकारणाने, 'आरोग्य प्रश्नावली'करिता त्यांना वेगळे काढून दुसऱ्या लाइनीत पाठविण्यात आले, नि तेथे बराच वेळ मोडला, नि तोवर ताटातूट. (यात डोके थोडे औट झालेले होते.) मग पुनर्मीलनानंतर, रेसॉर्टकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहण्यापूर्वी, म्हटले थोडे स्थानिक चलन घ्यावे, म्हणून करन्सी एक्सचेंजकडे गेलो. (एका यूएस डॉ. ला जवळजवळ शंभर जमैकन डॉ. या दराने मिळाले. तर तेही एक असो.) अशा रीतीने, जे काही जमैकन डॉ. पदरी पडले, ते घेतले, नि निघालो.
मात्र, या खेपेस पासपोर्ट कौंटरवर विसरलो नाही. (आमचे दिवंगत तीर्थरूप आम्हांस नेहमी सांगत, दर वेळेस तीचतीच चूक करत जाऊ नकोस, प्रत्येक वेळेस नवीन चूक कर, म्हणून.) पासपोर्ट गळ्यातल्या पाउचमध्ये घट्ट होता, राजिवड्यावरच्या विश्वेश्वरासारखा. (उपमेच्या तपशिलाची चूभूद्याघ्या.)
या खेपेस आख्खा लॅपटॉप (बॅगेसह) कौंटरवर विसरून आलो. (आमचे नशीब नेहमीप्रमाणेच बलवत्तर असल्याकारणाने, निघाल्यावर लवकरच लक्षात आले, आणि परत कौंटरवर गेल्यावर लॅपटॉप मिळालादेखील.)
३. सर्का मे २०१९. स्थळ: न्यूयॉर्क शहरातील कोठल्याशा फेरीचे तिकीटऑफिस. (कोठली फेरी, ते महत्त्वाचे नाही. तसेही, येथे मी कोठल्याही फेरीचे नाव ठोकून दिले, तरी कोणाला पत्ता लागणार आहे, म्हणा! परंतु, ते जाऊ द्या.)
तर, तिकीट काढले, आणि धक्क्याकडे जाऊ लागलो. बोटीत चढण्याच्या लाइनीत उभे राहिल्यावर लक्षात आले, की कॅमेरा तिकीटऑफिसात कोठल्याशा खुर्चीवर राहिला, म्हणून. परत जावे, तर बोट हुकणार. आणि, परत गेल्यावर तरी तेथे कॅमेरा असेलच की नाही, कोण जाणे. ('गाढव गेले, नि ब्रह्मचर्यही गेले' यालाच म्हणत असावेत काय?) म्हटले, मरो! तसाच बोटीवर गेलो. फेरी उरकून परत आल्यावर मुलगा तिकीटऑफिसात चौकशीस गेला. नशिबाने याही वेळेस साथ दिली. कॅमेरा जेथे सोडला होता, तेथे जसाच्या तसा सापडला.
तर, आहे हे असे आहे.
----------
खरे सांगू? हे सगळे किस्से थोड्याफार फरकाने एकसारखेच असतात. Once you have experienced one, you have experienced them all. फक्त, स्वित्झर्लंड, पॅरिस, युंगफ्राउ पर्वत, लुत्झर्न, सिंगापूर चांगी विमानतळ, हाँगकाँग, माँटेगो बे, न्यूयॉर्क, वगैरे मामूली तपशिलांचाच काय तो फरक.
किंबहुना, हे असे किस्से लिहून काढण्याऐवजी, 'स्वित्झर्लंड, पॅरिस, युंगफ्राउ पर्वत, लुत्झर्न, सिंगापूर चांगी विमानतळ, हाँगकाँग, माँटेगो बे, न्यूयॉर्क', एवढे जरी लिहिले, तरी वस्तुत: ते पुरेसे आहे. कारण, ते लिहिणे एवढेच काय ते खरे तर महत्त्वाचे असते. (Kilroy was here!) अन्यथा, हे किस्से, अनुभवणाऱ्याकरिता (नि अनुभवताना) रोमहर्षक असतीलही कदाचित, परंतु, वाचणाऱ्याच्या दृष्टीने, 'लेखकाने आपले नाक रुमालात कसे शिंकरले', इतपतच चित्तथरारक असतात.
असो चालायचेच.
----------
तरी बरे. तुम्ही (१) काही ज्येना, आणि (२) एक ज्युना, अशा कळपासहित गेला होतात, नि तिकिटे तुमच्या ताब्यात होती, नि ती हरवली. (चालते. होतात चुका माणसाच्या हातून कधीकधी.) वैताग तेव्हा येतो, जेव्हा ही (भारतीय) ज्येनामंडळी, 'तुम्ही तरुण मंडळी, जबाबदार नसता, तिकीट (/पासपोर्ट/जे काही असेल ते) हरवाल', म्हणून ते तिकीट (/पासपोर्ट/जे काही असेल ते) स्वत:च्या ताब्यात घेतात, नि मग स्वत: गहाळ तरी करतात, किंवा तत्सम काहीतरी गोंधळ घालतात. (काहीही क्लू नसताना सगळ्याचा ताबा घेण्याची त्या पिढीची propensity निव्वळ अवर्णनीय आहे. आणि, म्हशींचा तांडा हाकण्याचा मला अनुभव नाही (कदाचित आपले राजेश१८८जी त्याबद्दल काही तपशील पुरवू शकतील (चूभूद्याघ्या.)), परंतु, ज्येनांचा तांडा हाकण्याच्या तुलनेत ते बहुधा बरेच सुकर असावे. त्यापेक्षा ज्युना परवडले. फार फार तर, आपले आईबाप आपल्या पाठोपाठ चढू शकतील की नाही, याची पर्वा न करता, स्टेशनातून नुकत्याच सुटलेल्या चालत्या गाडीत चढू पाहतील. (सर्का इ.स. २०१३ (महिना आठवत नाही, परंतु मे/जून/जुलै/उन्हाळ्यात कधीतरी), स्थळ: पॅरिसच्या चार्ल्स द गॉल विमानतळानजीकचे रेल्वे स्थानक.))
असो.
कंपनी मॅटर्स
>>लेखकाने आपले नाक रुमालात कसे शिंकरले', इतपतच चित्तथरारक असतात.
मार्था गेल्हॉर्न नावाच्या अमेरिकन बाईंनं 'ट्रॅव्हल्स विथ मायसेल्फ अँड अनदर' असं एक पुस्तक लिहिलं आहे. गेल्हॉर्न प्रखर स्त्रीवादी तर होतीच पण ती एका वृत्तपत्राची war correspondent देखील होती. तिची अजूनही एक महत्त्वाची ओळख आहे जी सांगितलेली तिला अजिबात आवडायचं नाही.
चीन आणि कॅरिबियनमध्ये केलेल्या प्रवासांचं वर्णन या पुस्तकात आहे. त्यात मुख्यत्वे तिथे तिच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे संडास आहेत आणि अमेरिकन अहंगंडातून येणारी इतरांच्या जीवनपद्धतीवर केलेली विनोदी (रीड: काहीशी रेसिस्ट) टिप्पणी आहे. असं असलं तरी हे पुस्तक आवडलं होतं असं पुसट आठवतं आहे. पण “माझे अनुभव” याच्या पलीकडे जाऊ पाहणारं ते नक्कीच आहे. शेवटी मात्र असं वाटतं की मार्थाबाईंपेक्षा त्या शिर्षकातील “अनदर”च त्या प्रवासाचा कोणतीही कटकट न करता मनमुराद आस्वाद घेत होता. आणि तिच्या रेसिस्ट असण्याचा नंतर मला अंमळ कंटाळा आला. अर्थात ७८-७९ साली त्याला रेसिस्टपणा म्हणतही नसावेत. आणि मीही अकारण वोक आहेच.
प्रवासातल्या परिस्थितीबद्दल (जी सहप्रवाश्यांच्या हातात तर नसतेच पण कदाचित त्या संपूर्ण देशाच्या हातातही नसावी) कटकट करणारे लोक अतिशय अतिशय तापदायक असतात. विनोदाची फोडणी देऊन ती कटकट सुसह्य केली तरीही तिचा त्रासच होतो. अशाच एका प्रवासातली एक कटकट, “हे शहर किती बकाल आहे. बाहेरचे फिरंगी इथे का येतात?” (हा प्रश्न दिवसांतून २० वेळा). मग एकदा समोर २-३ फिरंगी सिगरेट ओढत उभे होते. त्यांना जाऊन विचार असा सल्ला दिला. अचानक भूक लागली असं सांगून “माझे पाय थरथरताहेत” हे वाक्य उच्चारून दिसेल त्या हॉटेलात घुसणे आणि खाऊन झाल्यावर अन्न किती महाग होतं याबद्दल तक्रार करणे. आपण काही वाचायला बसलो की मध्येच एक मोठा एकतर्फी संवाद सुरू करणे (त्यातही आयुष्यातील विविध जनसमुदायांबद्दल कटकट). ती ट्रीप करून आल्यानंतर काही महिन्यांतच मैत्रीही संपुष्टात आली. त्या मानाने स्विस - पॅरिसमधील ज्येना बायका अतिशय सुसह्य आणि आनंदी होत्या. वय वर्षं ९ ते वय वर्ष ७२ असा चमू असूनही आम्ही ते सगळे दिवस मोस्टली आनंदात घालवले आणि परत आल्यावरही आमची मैत्री वृध्दींगत झाली.