नुकताच नेटफ्लिक्सवर मंचकदृष्यांनी खचाखच भरलेला एक स्पॅनिश चित्रपट बघितला. एका पोरसवदा अल्लड तरूण-तरूणीच्या प्रेमाभोवती गुंफलेली ती कथा होती. या चित्रपटात कामक्रीडेचे जे चित्रण आहे, ते नेहेमीपेक्षा वेगळे आहे असे लक्षात आले. कामक्रीडेत आलापी संपल्यानंतर बंदीश चालू करताना नायक नायिकेची "परवानगी" मागताना दाखवला आहे. "consent" ही कल्पना जनमानसात रुजावी म्हणून लेखक/दिग्दर्शकाने हे केले असावे. पण मला याचे कौतूक वाटले कारण चित्रपटात "consent" स्पष्टपणे प्रथमच बघायला मिळाला.
माणसे जोखायच्या प्रत्येकाच्या काही ना काही कसोट्या असतात, तशाच माझ्या पण काही आहेत. आयुष्याच्या वेगवेगळ्या कालखंडात तेव्हाच्या प्राधान्यक्रमानुसार त्या बदलत गेल्या. उदा० एकेकाळी मी एखाद्या व्यक्तीचे वाचन, स्मरणशक्ती यावर त्या व्यक्तीचे "मोठेपण" ठरवत असे. नंतर माणसांनी केलेला जीवनसंघर्ष मला भारावून टाकू लागला. पन्नाशीनंतर मात्र माझा माणसे जोखायचा निकष मात्र वेगळा आणि एकच आहे. तो असा-
० वैयक्तिक सीमारेषांचा आदर
माझी बायको आणि माझी मुलगी अधूनमधून "पर्सनल बाऊण्ड्री" या विषयावर माझी "शाळा" घेत असतात. मन:स्वास्थ्य टिकविण्यासाठी आपल्या अवतीभवतीचा समाज आपल्या वैयक्तिक सीमारेषांचा किती आदर ठेवतो हे फार महत्त्वाचे ठरते.
माझे सामाजिक वर्तूळ आणि माझ्या बायकोचे आणि मुलीचे सामाजिक वर्तूळ यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. माझ्या बायकोच्या आणि मुलीच्या वर्तूळातली माणसे त्या दोघीनी आखलेल्या बाऊण्ड्रीचा आदर ठेवतात. माझ्या वर्तूळातले बरेच लोक मला वैयक्तीक सीमारेषांचा आदर राहू दे, पण अक्कल शिकवायला, मनस्ताप द्यायला मागेपुढे कमी करत नाहीत.
एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक सीमारेषांचा अनादर करणे हे टप्प्याटप्प्याने सुरु होते. ’अहो-जाहो’ ऐवजी परवानगी न घेता ’अरे-तुरे’ करणे ही त्याची १ली पायरी. हे मला वैयक्तिक सीमारेषेचे उल्लंघन वाटते.
आमच्या भागात एक गृहोपयोगी वस्तूंचे दुकान आहे. या दुकानाच्या मालकांना अचानक काय हुक्की आली माहित नाही. अचानक ते दुकानात आलेल्या स्त्री आणि पुरूष ग्राहकांना ’अरे-तुरे’ किंवा ’अगं-तुगं’ ने संबोधू लागले. अनेक लोकांना वि० वयस्कर स्त्रियांना ही ’सलगी’ आवडत नसे. पण अचानक हे अरे-तुरे थांबले आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
कुणाच्याही घरी जाताना पूर्वसूचना न देता, वेळीअवेळी जाणे, हे एक प्रकारे वैयक्तिक सीमारेषेचे उल्लंघन असते. आपल्यामुळे दूसर्या व्यक्तीची गैरसोय होणार असेल तर त्याकडे दूर्लक्ष करून आपले अस्तित्व (आणि महत्त्व) लादण्याचा तो प्रयत्न असतो.
वैयक्तिक सीमारेषेचा अनादर करणे याला "गृहित धरणे" असे सोप्या शब्दात म्हणता येते. आधुनिक मानसशास्त्रामध्ये व्यक्तीमत्त्वाच्या अनेक विकृतींची चर्चा केलेली आहे. त्यात "नार्सिसिस्टीक"(आत्मकेंद्रित?) विकृतीची शिकार झालेली माणसे कायम इतरांना गृहित धरतात. या विकृतीवर मी जेव्हा अधिक माहिती मिळ्वण्यासाठी शोध घेतला तेव्हा मला मोठा धक्का बसला. कारण माझे तरूण वयात अनेक नार्सिसिस्ट व्यक्तीनी प्रचंड नुकसान केल्याचे लक्षात आले. त्यांना कसे हाताळायचे हे तेव्हाच कळले असते तर कदाचित आयुष्य कमी त्रासदायक झाले असते.
नार्सिसिस्टीक व्यक्ती दुसर्याला व्यक्तीला गृहित धरते तेव्हा ती त्या व्यक्तीवर आपले नियंत्रण निर्माण करते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याचा ताबा घेते. स्त्रिला गृहित धरणे हे सर्व धर्म आणि संस्कृतीमध्ये शतकानुशतके होत आले आहे.
वैयक्तिक सीमारेषांचा आदर ठेवणे यात अनेक लोकांना औपचारिकता आणि कृत्रिमता वाटते. पण नातेसंबंध निर्माण होण्या अगोदरच एखाद्याला गृहित धरणे हे अयोग्य आहे, हेच बर्याच लोकांना मान्य नसते. एकमेकांबरोबर राहून विश्वास निर्माण झाल्यावर मग अपवादात्मक परिस्थितीमध्ये गृहित धरणे समजून घेता येते.
नार्सिसिस्ट व्यक्ती ओळखायची माझी एक पद्धत आहे. यामुळे नार्सिसिस्ट व्यक्ती आपले जाळे टाकायच्या अगोदरच ओळखता येतात आणि त्यांच्या पासून लांब राहता येते.
एखादी व्यक्ती माझ्या आनंदात किती सहभागी होते हे तपासण्यासाठी मी माझी प्रगती त्या व्यक्तीला मुद्दामून ऐकवतो. उदा० नुकत्याच एका माजी मित्राशी बर्याच काळानंतर संबंध प्रस्थापित करायचा प्रयत्न केला. त्याला मी माझ्या मुलीचा स्कॉटलंडमधील एम०डेस० ची पदवी घेतानाचा व्हिडीओ व्हॉटसॲपवर पाठवला होता. या माणसाने त्याकडे सपशेल दूर्लक्ष केले. सर्वसाधारणपणे बहुतेक सामान्य माणसे एकमेकांच्या मुलांच्या प्रगतीत आनंदाने सहभागी होतात. त्यासाठी खिशातले काहीही खर्च करावे लागत नाही. फुकटच्या कौतूकाला जर तुम्ही महाग होत असाल तर अर्थातच थारा करण्यास योग्य नसता!
ही पद्धत वापरून ९०%वेळा आपल्याला धोकादायक माणसे वेळीच खड्यासारखी बाजूला करता येतात.
केवळ व्यक्तीच नार्सिसिस्टीक नसते तर समूह किंवा समाज पण या विकृतीने पछाडलेले असतात. वैयक्तिक सीमारेषांचा आदर राखणे हे त्या त्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. जो समाज व्यक्तीच्या पर्सनल बाऊण्ड्रीजचा आदर ठेवत नाही तो कधी सशक्त राहत नाही.
माझ्या मते भारतीय समाजात या विकृतीने सध्या परमोच्चबिंदू गाठला आहे...
.
लोक आपली पर्सनल बाउंडरी ओलांडतात असं जेव्हा आपल्याला वाटतं, तेव्हा त्यावर 'का?' हा प्रश्न स्वतःलाच विचारावा. मी तुम्हाला विरोध करायला म्हणून हे लिहीत नाहीये. मला वारंवार असे अनुभव आल्यानं मीच एक दिवस हा प्रश्न स्वतःला विचारला. जगात नार्सिसिटिक लोक आहेत, ते इतरांना त्रास देतात हे मान्यच आहे. पण फोनवरून ओटीपी मागून पैसे काढून घेणाऱ्या लोकांबद्दल आपण जशी खबरदारी घेतो तशीच या बाबतीत घेतली पाहिजे. माझ्या बाबतीत मला लक्षात आलेले काही मुद्दे असे होते.
१. ठामपणे नाही म्हणता न येणे
अनेकदा मैत्री वरवरची ओळख आणि खोल मैत्री या दोन स्थितीच्या मध्येच कुठेतरी असते. तेव्हा कधीकधी समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला आवडत नाहीत अशा गोष्टी केल्या जातात. मग ते कुठे भेटल्यावर आपल्यालाच बिल भरायला लावणे, किंवा ऐन वेळी एखादी भेट रद्द करणे, किंवा आपल्या नेटवर्कमधल्या लोकांशी ओळख करून देण्याबद्दल आग्रह करणे - असं काहीही असू शकेल. आपल्याला जर ती गोष्ट करावीशी वाटत नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणता आलं पाहिजे.
२. आपल्याला जे वर्तन आवडत नाही, ते करू नका असं ठामपणे सांगून माघार न घेता येणे
अनेकदा लोक एकमेकांची मस्करी करतात. किंवा थोडी टवाळी करतात. अशी टवाळी कधीकधी खूप विखारी होऊ लागते. पण ती गंमत आहे हे कारण सांगून चालू ठेवली जाते. किंवा काही लोक कधी एकदम चिडून फोन बंद करतात. ते कशामुळे चिडले आहेत हे स्पष्ट न सांगता आपल्याला ओळखायला लावतात. आपल्या हातून चुकून जर काही झालं असेल तर आपण नक्कीच माफी मागतो. पण अनेकांना माफी नकोच असते. त्यांना राग व्यक्त करण्याचं काहीतरी कारण हवं असतं. या दोन्ही बाबतीत योग्य वेळी त्यांना नमस्कार करून माघार घेता यायला हवी.
३. ओव्हरशेअर न करणे
अनेकदा मैत्री झाल्यावर आपण तथाकथित मित्रांना आपल्या मनातलं सगळं काहीही आडपडदा न ठेवता सांगू लागतो. अनेकदा अशा गोष्टींचा आपल्या विरोधात वापर करायला सुरुवात होते. उदाहरणार्थ, एखाद्या भांडणाबद्दल तुम्ही तुमच्या मित्राला सांगितलं आणि मग त्याच्याशी काही वादविवाद चालू असताना, त्यानं तुम्हीच सांगितलेली माहिती वापरून, "तू अशीच आहेच कारण त्यावेळी तू अशी वागली होतीस" वगैरे सुरु केलं तर तीही धोक्याची घंटा असते. यासाठी आपण एखाद्याशी नियमित बोलू लागलो आहोत आणि त्याला नियमित भेटू लागलो आहोत या एकाच कारणानं त्याला आपल्या आयुष्याबद्दल अधिक माहिती देऊ नये.
४. मैत्री तुटण्याची भीती असणे
जे आपल्याला गृहीत धरतात, त्यांना आपल्याला नाती तुटायचं भय आहे हे माहिती असतं. आपण तडकाफडकी कुणाला फूट म्हणणार नाही या विश्वासावरच आपल्याला सतत मनस्ताप होईल अशा गोष्टी केल्या जातात. त्यामुळे कोणतंही नातं/मैत्री जगाच्या अंतापर्यंत टिकवायची आहे अशी भाबडी, बिनडोक समजूत करून घ्यायची नाही.
आपल्या भूमिकेशी बर्यापैकी…
आपल्या भूमिकेशी बर्यापैकी सहमत आहे.
आपलं जग
आपलं जग वा वर्तुळ हे प्रत्येकालाच प्रिय असतं. पण ते दुसर्यालाही प्रिय वाटलंच पाहिजे, असा अट्टाहास नसावा. तुमच्या मुलांचे वा नातवंडांचे कौतुक तुम्हाला असते. पण म्हणून ते आपल्या नातेवाईक वा मित्रांना सतत ऐकवणे कितपत योग्य? आणि त्यांत त्यांनी फारसे स्वारस्य दाखवले नाही तरी तो त्यांचा दोष म्हणता येणार नाही. उलट असे करुन, तुम्हीच त्यांच्या वर्तुळाची सीमारेषा ओलांडत असाल कदाचित!
सतत ऐकवणे आणि एकदा ऐकवणे यात…
सतत ऐकवणे आणि एकदा ऐकवणे यात फरक आहे. तुम्ही एखाद्याच्या आनंदात किती सहभागी होऊ शकता हा मुख्य मुद्दा आहे.