Skip to main content

ट्रम्पचा हैदोसधुल्ला

ट्रम्प दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यापासून अक्षरशः धुमाकूळ चालू आहे. त्याचा काही प्रमाणात अर्थ लावण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. कदाचित हे खूप घाईत होईल. ट्रम्पने पूर्वीही अनेकदा दिशा बदलली आहे. किंबहुना काही वेळा तर तो ब्राउनियन मोशनसारखा रँडम धावत असतो असं वाटतं. पण ठीक आहे. नंतर बदल झाल्यास आपण पण म्हणू की बदल झाला. हाकानाका.

ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष व्हान्स यांनी युरोपियन युनियनवर हल्ला चढवला आहे. अमेरिका मिलिटरी मदत करते म्हणून युरोपियन युनियन/नेटो जिवंत आहे अशा प्रकारचं वक्तव्य ट्रम्प करत आला आहे.  असंच तो युक्रेनबद्दलही म्हणतो (पण इस्राएलबद्दल नाही म्हणत.) असंच तो आर्थिक बाबतींतही म्हणतो — म्हणजे चीन, मेक्सिको, कॅनडा वगैरे देशांचा माल (कच्चा किंवा पक्का) अमेरिकेत सहज आणि स्वस्तात येऊ शकतो म्हणून अमेरिकेत नोकऱ्या नाहीत वगैरे. थोडक्यात, आपण ज्याला जागतिकीकरण म्हणत आलो त्या गोष्टीच्याच तो विरोधात दिसतो. अमेरिकेत नोकऱ्या तयार व्हायला हव्यात, अमेरिकेत मालाचं उत्पादन व्हायला हवं आणि अमेरिकन लोकांनी स्वदेशी वस्तू घ्यायला हव्यात अशी ही मांडणी दिसते. खुली आंतरराष्ट्रीय बाजारपेठ अमेरिकेच्या हिताची नाही असं त्याचं म्हणणं दिसतं. यात युरोपियन युनियनला पण धरल्यामुळे तर असं होतंय की दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं युरोपशी ज्या प्रकारचे व्यापारसंबंध सुरू केले, ज्याद्वारे पाश्चात्त्य जगाशी आणि जपान-कोरिया वगैरेशी व्यापार करून अमेरिका आर्थिक महासत्ता बनली आणि डॉलर सर्व व्यापाराच्या केंद्रस्थानी आला — तेसुद्धा त्याला नकोय. याचाच अर्थ असा की पश्चिम युरोपात ज्यामुळे १९४५नंतर शांतता नांदली ते दोन घटक — खुला आर्थिक व्यापार आणि अमेरिकन सैन्य — ट्रम्पला नकोसे आहेत. नकोसे म्हणजे लगेच हे सगळं थांबेल असं नाही, पण यात इतर देशांनी अमेरिकेला येडा बनवून आपला फायदा करून घेतलाय असा ट्रम्पचा समज दिसतो. म्हणून त्यानं जास्तीचे टॅरिफ लादणं वगैरे चालू केलंय. 

थोडक्यात, जर आज अमेरिका महासत्ता असेल (जी ती आर्थिक आणि मिलिटरी दोन्ही पातळ्यांवर आहे), तर मग आम्हाला तुमचे हे जाचक नियम नकोत, उलट आम्हाला स्वैरपणे आमची दादागिरी करायची मुभा हवी, असा त्याचा दावा दिसतो.

पण यात एक खोच आहे. आज कॅनडा, युरोप किंवा मेक्सिकोवर जास्तीचे टॅरिफ लादण्याची धमकी देता येते कारण त्यांच्याबरोबर अमेरिका मोठ्या प्रमाणात व्यापार करते आणि सुरक्षेसाठी ते अमेरिकेवर अवलंबून आहेत. म्हणजेच ही मित्र राष्ट्रं आहेत. असं उत्तर कोरिया, इराण किंवा रशियाबरोबर करताच येणार नाही, कारण तसे संबंधच नाहीत. म्हणजे अमेरिका आपल्याच मित्रांचे हात पिरगाळत आहे.

यातून निष्पन्न काय होईल? इतर देश अर्थातच आपापले टॅरिफ अमेरिकेवर लादतील. हे सुरू झालंच आहे. चीन किंवा युरोपकडून असे टॅरिफ आले तर त्याचा व्यापक परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, कारण या देशांबरोबर सध्या होणारा व्यापार बऱ्यापैकी आहे. पण मुळात मुक्त व्यापार ही संकल्पनाच धोक्यात येऊ शकते का? कारण अमेरिका ही प्रचंड मोठी बाजारपेठ आहे.

अशा धोरणांद्वारे अनेक गोष्टींचं उत्पादन अमेरिकेतून होऊ लागेल का, आणि अमेरिकेत नोकऱ्या तरी निर्माण होतील का? माहीत नाही. कारण त्यासाठी लागणारं सक्षम मनुष्यबळ तरी तिथे आहे का? आणि मायग्रंट्स आत घेणं थांबवलं तर मनुष्यबळाची कमतरता अधिकच भासण्याची शक्यता आहे.

दुसऱ्या महायुद्धानंतर जगात झालेला आणखी एक बदल म्हणजे महासत्ता होण्यासाठी तुम्हाला प्रत्यक्ष वसाहती करण्याची किंवा देशाचा भूभाग वाढवण्याची गरज उरली नाही. त्याआधीच्या वसाहती करण्याच्या धोरणांना त्यामुळे नंतर फारशी किंमत राहिली नाही. अमेरिकेला जगातल्या अनेक देशांत स्वतःला अनुकूल सरकारं स्थापन करता येत होती.  विविध देशांशी व्यापार करार करून आपल्याला हवं ते (खनिजं असोत की कापड असो की पनामा कालवा वापरणं किंवा इतर काही) मिळत होतं. वसाहती करण्याची गरज नव्हती. पण ट्रम्पला मात्र कॅनडा, ग्रीनलँड ते गाझा ते पनामा कालवा असे अनेक भूभाग आपल्या अमलाखाली असावेत असं वाटतंय.

व्हाईट हाऊसमधली झेलेन्स्की-व्हान्स-ट्रम्प जुगलबंदी आता आपल्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. युनायटेड नेशन्समध्ये अमेरिकेनं रशिया, उत्तर कोरिया आणि बेलारूसच्या बाजूला राहणं पसंत केलं. आता तर युक्रेनला मिळणारी मिलिटरी मदत थांबवल्याचं ट्रम्पनं जाहीर केलं आहे. ट्रम्पचं म्हणणं असं दिसतंय की शांतता प्रस्थापित करण्यात झेलेन्स्की अडथळा आहे. त्यामुळे सर्वात जास्त मिलिटरी मदत करणाऱ्या अमेरिकेनं मदत थांबवली की झेलेन्स्की वठणीवर येईल किंवा… पराभूतच होईल? थोडक्यात, युक्रेन रशियाचा भागच असल्याचा पुतिनचा दावा ट्रम्पला मान्य असावा. मग नेटोमध्ये किंवा युरोपियन युनियनमध्ये युक्रेन वगैरे शक्यता तर मुळापासूनच उखडल्या जातील. न रहेगा बाँस न बजेगी बांसुरी.

नेता जितका जास्त प्रखर तितका तो ट्रम्पला आवडतो असाही एक भाग दिसतो. म्हणूनच त्याला पुतिन, शी जिनपिंग, नेतान्याहू, मोदी, अर्दोआन (तुर्की), ओर्बान (हंगेरी) वगैरे लोक आवडतात, आणि युरोपियन युनियन किंवा कॅनडा त्याउलट बुळचट वाटते. आणि म्हणूनच जर नाझी विचारांची एएफडी जर्मनीत सत्तेवर आली तर ट्रम्पला ते आवडेल. एकंदरीत ‘आपल्या’वर (म्हणजे उच्चवर्णीय, गोरे वगैरे, ज्यांनी शेकडो वर्षं सामाजिक आणि इतर उच्चस्तर भोगला आहे) आता या नव्या उदारमतवादी जगात मूठभर अल्पसंख्य लोकांनी अन्याय केला आहे हे नॅरेटिव्ह ट्रम्पला आणि त्याच्या समर्थकांना आवडतं. म्हणजे काय ते नीट लक्षात येतंय का? ज्या देशांतली व्यवस्था समतावादी, स्वातंत्र्यवादी आहे, नेमक्या त्याच देशांना बुळं मानून ‘बळी तो कान पिळी’ किंवा जंगलचा कायदा किंवा द्वेषमूलक व्यवस्था आणू पाहणाऱ्या लोकांविषयी ट्रम्पला जवळीक वाटते.

याचाच पुढचा भाग म्हणजे पुरुषांचा पुरुषीपणा — समलैंगिकता, प्रवाही लैंगिक अस्मिता, ट्रान्सजेंडर लोक, या सर्व गोष्टी पुरुषांच्या पुरुषीपणावरच घाला आहेत असं ट्रम्पला वाटत असावं. त्यामुळे सत्तेवर आल्याआल्या Diversity, equity, inclusion (DEI) या मूल्यांवर ट्रम्पची कुऱ्हाड चालली.

आजच्या रिपब्लिकन पक्षातही सर्व लोक अशा विचारांचे नक्कीच नाहीत, पण ट्रम्पला विरोध करण्याइतपत धैर्य (ट्रम्पच्या पुरुषी भाषेत बॉल्स) मात्र कुणाकडे दिसत नाही. याचा परिणाम म्हणजे उदारमतवादी लोकशाहीकडून अनुदार लोकशाहीकडे चाललेल्या अनेक देशांमधल्या प्रवासात आता अमेरिकाही सामील आहे.

मग (उदारमतवादी) युरोपसाठी या सगळ्याचा अर्थ काय होतो? दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपला आपलं अमेरिकेवरचं परावलंबित्व कमी कसं करायचं याचा विचार करायला भाग पडतं आहे. यूकेने आपलं मिलिटरी बजेट वाढवायचं जाहीर केलं आहे. उद्या युक्रेन खरंच रशियाच्या ताब्यात गेला आणि अमेरिका मदतीला येणार नाही हे स्पष्ट असेल तर नेटोतल्या सर्वच देशांना हे करावं लागणार आहे. पण तंत्रज्ञानाचं काय? गूगल असो, फेसबुक असो की नव्यानं येणारं एआय असो, अलीकडच्या  काळातली तंत्रज्ञानातली प्रगती पाहता युरोप अमेरिकेपेक्षा फार मागे आहे. आणि ही गॅप भरणं सोपं नाही.

पण मग अमेरिका महासत्ता तरी राहील का? १९४५पासून आतापर्यंत अमेरिकेची दादागिरी लोकांनी सहन केली आहे कारण ते आपला पैसा आणि आपली मिलिटरी वापरून इतरांना ‘मदत’ करत होते. हे थांबवून कसं चालेल? ट्रम्पनी यूएसएडही थांबवलीय. छोट्यामोठ्या गरजू देशांना अन्न औषधं वगैरे पुरवणाऱ्या या योजनेमार्फत जगभर मदत जात होती आणि गोरगरिबांच्या दुवा अमेरिकेला मिळत होत्या. आणि त्यासाठी घातला जाणारा पैसा काही फार नव्हता. हे थांबवायची काय गरज होती? आणि त्याहीपेक्षा हे काही तरी वाईट आहे असं म्हणून त्याची बदनामी करायची काय गरज होती? 
USAID's spending "IS TOTALLY UNEXPLAINABLE... CLOSE IT DOWN!” - ट्रम्प
“It’s a criminal organization” - मस्क
संदर्भ : What is USAID and why is Trump poised to 'close it down'? 

हॉलिवूडच्या नॅरेटिव्हमध्ये जेव्हा जेव्हा जगाचं अस्तित्व धोक्यात येतं तेव्हा तेव्हा अमेरिकन हीरो जगाला वाचवतात. पण ट्रम्पच्या अमेरिकेत असा आभासही निर्माण करायची गरज भासत नाही.

‘माझी बॅट म्हणून मी कॅप्टन’ या खेळात बॅट माझी असावीच लागते ना? जगातला सर्वात श्रीमंत देश इतक्या कोत्या मनोवृत्तीचा असल्याचं दिसू लागलं तर त्याची पत काय राहील?

आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या (पश्चिम) युरोप-अमेरिका सहकार्यातून आणि मुक्त व्यापार धोरणांतून एक दीर्घ काळ त्या जगात शांतता प्रस्थापित झाली होती. ज्यामुळे खरं तर असं वाटू लागलं होतं की या व्यवस्थेतून जगात मोठ्या प्रमाणात शांतता प्रस्थापित करता येईल. म्हणजे, चीन किंवा रशिया जर पाश्चात्त्य जगावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून असतील तर त्यांच्यापासून जगाला फारसा धोका नसेल. मात्र, पुतिनसारख्यांनी हे उलथवून टाकलं आहे, आणि आता ट्रम्पही त्याच बाजूला चाललेला आहे असं दिसतं. मग आपण पुन्हा एकदा दुसऱ्या महायुद्धाच्या आधीच्या जगाकडे चाललो आहोत का? त्या जगात केवळ काही राष्ट्रं बळाच्या जोरावर आपली सत्ता गाजवत होती, आणि गरीब देशांचे हाल कुत्रं खात नव्हतं. महासत्ता आहोत म्हटल्यावर आपल्यावर काही एक नैतिक जबाबदारी आहे असं किमान तत्त्वतः तरी गेली कित्येक दशकं मानलं जात होतं, पण आता ते तत्त्वच अस्तित्वात नाही असं दिसतंय. रशिया किंवा उत्तर कोरिया किंवा इराणसारखे देश असंच वागणार असं गृहीत धरलं जातं, कारण त्यांना ही नैतिकता मान्यच नाही. या रांगेत ट्रम्पची अमेरिका आता सामील झालेली दिसते.  

Just an orange-haired gorilla

सामान्य Thu, 06/03/2025 - 17:12

हा इसम इदी अमीन सारखा  परप्रांतीयास अमुक तासात/दिवसात/महिन्यात  देश खाली करा असा फतवा काढू शकेल  काय

(तसे झाल्यास  तिथल्या खाल्ल्या मिठाला जागणाऱ्या परप्रांतीयांचे काय होईल )

'न'वी बाजू Thu, 06/03/2025 - 23:23

In reply to by सामान्य

(तसे झाल्यास  तिथल्या खाल्ल्या मिठाला जागणाऱ्या परप्रांतीयांचे काय होईल )

ते सोडा. त्यांचे ते पाहून घ्यायला समर्थ असावेत. (आणि नसले, तरी तो तुमचा प्रश्न नसावा, नाही काय?)

प्रथम हे सांगा, की या इसमाने असे काही केल्यास त्यातून तुमचा काय वैयक्तिक फायदा होईल? (बघ्याची करमणूक वगळल्यास?)

बाकी चालू द्या.

'न'वी बाजू Sat, 08/03/2025 - 18:04

In reply to by सामान्य

ती ब्याद मूळ ठिकाणी जाईल का हि भीतीही

(अवांतर)

इस्राएल( या राष्ट्राच्या स्थापने)बद्दल आपले काय मत आहे?

(एकंदरीतच, ‘घरवापसी’ या संकल्पनेबद्दल आपले काय मत आहे?)

Rajesh188 Thu, 06/03/2025 - 17:23

स्वलंबी खेड ह्याच धर्तीवर स्वलंबी राज्य, देश हीच धोरने असावीत.

जागतिक करणामुळे खूप गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत आणि मानवाचे अस्तित्व च नष्ट होण्याची शक्यता जागीतिक karna मुळ येण्याची खूप मोठी शक्यता आहे.. ट्रम योग्य मार्गाने जात आहेत 

तिरशिंगराव Fri, 07/03/2025 - 15:01

हा इसम जगाच्या मुळावर येणार असे दिसत आहे. तो आणि त्याच्या भोवतालचे खुशमस्करे आणि एलियन्(मस्क) यांचे पारंपारिक अर्थशास्त्राच्या सिद्धांतांशी वैर दिसते. एकाच वेळी अनेक देशांत, स्वतःच्या देशालाच बुडवणारे राज्यकर्ते वर आलेले दिसत आहेत. त्यामुळे काहीतरी भयाण होणार, याची दुश्चिन्हे दिसु लागली आहेत. युगपरिवर्तन होणार असे बोंबलून सांगणार्‍या कुडमुड्या ज्योतिषांचे भविष्य खरे ठरवण्यासाठी ही मंडळी झटत आहेत हे मात्र खरं!

'न'वी बाजू Fri, 07/03/2025 - 17:35

In reply to by तिरशिंगराव

हा इसम जगाच्या मुळावर येणार असे दिसत आहे.

या हिशोबाने, त्याला ‘जगाची मूळव्याध’ म्हणून संबोधता येईल काय?

नाहीतरी अवघड जागचे दुखणे आहेच तो!

'न'वी बाजू Fri, 07/03/2025 - 17:32

(ट्रंपसंबंधीच्या या) लेखाखाली नारिंगी रंगाच्या एका भल्या मोठ्या मर्कटाचे छायाचित्र आहे. हा समस्त मर्कटप्रजातीचा अपमान आहे, एवढेच (त्या प्रजातीचा प्रतिनिधी या नात्याने) नमूद करून त्याचा निषेध करतो (हुप! हुप!!!!!) नि खाली बसतो.

Nile Thu, 13/03/2025 - 00:06

In reply to by 'न'वी बाजू

नारंगी रंग पण चंदेरी मर्कटाचे रंगरूप असलेला फोटो काल्पनिकच असणार. तेव्हा मर्कट जातीचा अपमान फार तर "आधीच मर्कट त्यात.." यापलिकडे झालेला नसावा असे वाटते.- आपलाच प्राणीप्रेमी. 

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/03/2025 - 07:35

तात्यानं National Oceanic and Atmospheric Administration - NOAAचं बजेटही कमी केलं. तात्यानं कमी केलं का मस्कनं केलं, या तपशिलात नको शिरायला. याचा एक थेट परिणाम असा झाला की माझ्या सध्याच्या एका बॉसचं एक काम गेलं. त्यावरून तो वैतागला होता. त्यातही त्यानं महत्त्वाचा मुद्दा मांडला. 

तात्यानं हे बजेट कापलं त्यात एक भाग असा की हवामानाची भाकितं करण्यासाठी गूगलचं AI - कृत्रिम बुद्धिमत्तेचं मॉडेल आता ते वापरणार आहेत. हवामानाचं मॉडेल म्हणून जे काही असतं ते वापरणार नाहीत. कारण ते तयार करणं स्वस्त नाही. गूगलला हे स्वस्तात करता येतं कारण मुळात NOAA हवामानाचा डेटा गोळा करतं आणि तो सगळ्यांसाठी खुला ठेवतं. ही एक बाब.

दुसरं असं की ही जी AI मॉडेलं असतात ती आधी काय झालं हे शिकून त्यानुसार भाकितं करण्यासाठी छान असतात. म्हणजे पन्नास-शंभर वर्षांपूर्वीच्या घटनांची, वादळांची आणि दुष्काळांची भाकितं करण्यासाठी ही मॉडेलं छान आहेत. पण आता हवामान झपाट्यानं बदलत आहे. माणसाच्या कारवायांमुळे जागतिक हवामानबदल होत आहे का नाही, याबद्दल कुणाला काही शंका असली तरीही गेल्या काही वर्षांमध्ये वादळं आणखी जोरदार येत आहेत, आणि पाऊस बेभरवशाचा झाला आहे, हे सिद्ध करणं तसं कठीण नाही. पण ही जी AI मॉडेलं आहेत, यांचा बहुतेकसा डेटा जागतिक तापमानवाढीचं संकट बिकट होण्याआधीचा आहे. सध्या हवामान कसं सुरू आहे हे पाहता येणाऱ्या काळातली वादळं आणखी भीषण असतील, पाऊसपाण्याची परिस्थिती आणखी बिकट असेल, पण हे भाकीत त्या AI मॉडेलांंना करता येणार नाही. त्यांची तेवढी क्षमताच नसेल. 

आमचा हा संवाद झाला गेल्या महिन्यात.

याच बॉसबरोबर आणखी एका प्रकल्पावर मी काम करत आहे. कृत्रिम उपग्रहातून घेतलेले फोटो वापरून जगात कुठे बेकायदेशीर खाणकाम सुरू आहे का, हे शोधता येईल का, यावर आम्ही काम करत आहोत. यासाठी खाणकाम, भूगर्भशास्त्र यांत अनुभव असलेल्या लोकांशी बोलायचं आहे. सॅटेलाईट इमेजरी वापरून काय बघायचं हे त्यांना विचारायचं, मग त्यांची पद्धत कोड वापरून कशी गिरवायची, ते काम आमचं. 

तर आजच एका कनेडियन खाणकामतज्ज्ञानं आमच्याशी बोलायला नकार दिला. तात्या टॅरिफवरून जे काही करत आहे, ते पाहता स्टेट डिपार्टमेंट (गृहखातं) आणि त्यांच्याशी संबंधित कुठल्याही प्रकल्पात मी भाग घेणार नाही, असं त्यानं उत्तर दिलं.

वास्तविक पाहता, हा प्रकल्प अमेरिकेच्या फारच सोयीचा ठरेल. कारण सध्या कळीचे धातू (critical minerals) म्हणजे तांबं, लिथियम, कोबॉल्ट वगैरे, यांचा ८०%+ पुरवठा चीनकडून होतो. आफ्रिकेतल्या आणि चीनमधल्या खाणींमधून. यात चीनची एकाधिकारशाही मोडून अमेरिकेला शिरकाव करायचा असेल तर अशा प्रकल्पांमुळे फायदाच होईल. पण तात्याला काय त्याचं!

तर ही कालच्या 'द अनियन'मधली बातमी - Trump Outlines Bold Vision For Golden Age Of China

उमेश घोडके Sat, 08/03/2025 - 10:17

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

१) भारतातल्या वेधशाळांचं बऱ्यापैकी काम आणि निरीक्षणं नोआच्या उपग्रहांवर आधारित आहेत. त्यामुळे यंदा आपल्याकडच्या मॉन्सूनच्या किंवा वादळांच्या अंदाजांवर या सगळ्या गाढवपणाचा परिणाम होऊ शकतो.   
२) वर मांडलेला AI मॉडेल्सचा मुद्दा अगदी बरोबर आहे.  याशिवाय स्टारलिंक कंपनीला सरकारी पातळीवरची उपग्रहांची सगळी कामं स्वतःकडे घ्यायची आहेत. त्यामुळे त्यांचा डोळा NASA, NOAA, FAA या सगळ्यांवर आहे. कस्तुरीसाहेबांना नवी काँट्रॅक्टस कुठे आणि कशी मिळवता येईल याचं ऑडिट किंवा फीजिबिलिटी रिपोर्ट तयार करणं हे डॉजचं खरं प्रयोजन आहे.  
३) गेली अनेक वर्षं उजव्या बाजूला हवामानशास्त्राविरुद्ध जाणूनबुजून जो मूर्खपणा चालू आहे, त्याचा फायदा घेण्याची वेळ आता जवळ आली आहे. नवी मॉडेल्स तयार करून लोकांपुढे पर्यायी अंदाज मांडून सावळागोंधळ तयार करायला अशा संस्था पूर्णपणे ताब्यात असणं फार जरुरीचं आहे. जीवाष्म इंधनं हेच जगाचं भवितव्य असल्याचं अमेरिकेच्या ऊर्जा मंत्र्यांनी कालच केलं आहे (https://www.nytimes.com/2025/03/07/climate/africa-chris-wright-energy-f…).

'न'वी बाजू Sat, 08/03/2025 - 18:20

In reply to by उमेश घोडके

गेली अनेक वर्षं उजव्या बाजूला हवामानशास्त्राविरुद्ध जाणूनबुजून जो मूर्खपणा चालू आहे

तो मूर्खपणा नसून, जाणूनबुजून दिशाभूल करण्याचा पाजीपणा आहे, एवढीच दुरुस्ती सुचवू इच्छितो.

थोडक्यात, Don’t let them get away with it by saying that they know no better.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/03/2025 - 22:09

In reply to by उमेश घोडके

कस्तुरी कसली! हा वासमाऱ्या आहे!!

फक्त स्टारलिंकच का, इतरही काही कंत्राटं वासमाऱ्याला मिळाल्याच्या बातम्या होत्या. (मात्र तुमचा प्रतिसाद वाचून बऱ्यापैकी हताशा आल्यामुळे सध्या याचे तपशील शोधणार नाहीये.)

'न'वी बाजू Sat, 08/03/2025 - 16:33

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्टेट डिपार्टमेंट (गृहखातं)

हे ‘स्टेट डिपार्टमेंट (परराष्ट्रखातं)’ असे पाहिजे.

बाकी चालू द्या.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/03/2025 - 21:50

In reply to by 'न'वी बाजू

बरोबर. आभार. ह्या भाषांतरांची अजिबातच सवय नाही.

Deepu Thu, 13/03/2025 - 12:58

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

AI मॉडेल्सनी केलेली १५ दिवसांपर्यंतची भाकितं उपयोगी आहेत पण त्यापलीकडे त्यांचं skill जास्त नाहीय. हंगामी अंदाज (seasonal forecasts) आणि पुढचे उपयोगी अंदाज त्यांना जमत नाहीत.
तसेच ही AI मॉडेल्स फक्त pure observations वर trained नाहीत. ERA5 किंवा तत्सम Reanalysis त्यांना train करण्यासाठी वापरले जातात. NOAA तील NCEP हा विभागही खूप महत्वाची भाकितं आणि Reanalysis products तयार करतो. जगभरातील सेंटर्स (IMD सुद्धा) त्यांचे सुधारित अंदाज देण्यासाठी हे products वापरतात.  जगभरातील Observations हवामानाच्या भौतिक मॉडेल्स मधे फ़ीड करून Reanalysis products तयार केली जातात. मुद्दा असा की हवामानाचे भौतिक मॉडेल्स लागतीलच आणि त्यात सुधारणा होत राहिली पाहिजे.  हवामानाच्या भौतिक मॉडेल्सच्या सुधारणांवर मुलभूत काम करणार्या चांगल्या  scientists ना तात्यांच्या धोरणामुळे घरी पाठवण्यात येत आहे. तात्यांचा climate change ला असणाऱ्या विरोधतून त्यांनी climate scientists आणि climate science चा जो बट्ट्याबोळ चालवला आहे तो सगळ्यांच्याच मुळावर येईल. 

चिमणराव Sat, 08/03/2025 - 15:17

या बाबाची दुसरी आणि शेवटची खेप आहे अध्यक्षपदाची. पुढे काय? पुढचा कुणी नेता हीच धोरणं चालवेल काय किंवा त्यांचा विरोधक आला तर तर जुना घोळ निस्तरणे जमेल का?

पुढची तीस वर्षे पाणी, इंधन आणि अन्न यासाठी हाणामारी होणार आहे. 

'न'वी बाजू Sat, 08/03/2025 - 19:22

In reply to by चिमणराव

पुढचा कुणी नेता हीच धोरणं चालवेल

माझी बायको स्थानिक निवडणूकखात्यात अधिकारी आहे. ट्रंप येऊ घातल्यापासून, ‘तुझे खाते ट्रंप बंद करणार आणि तुला दुसरी नोकरी बघावी लागणार’ असा (खाजगी) विनोद आमच्यात चालतो.

थोडक्यात, पुढचा कोणी नेता येऊ दिला, तर ना? राज्यघटना पूर्णपणे धाब्यावर बसवून सत्ता पूर्णपणे हातात घेण्याची (आणि कायम ठेवण्याची) जय्यत तयारी आहे, आणि काँग्रेस(संसदे)पासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत ते उचलून धरायला (किंवा त्याला कोठल्याही प्रकारे विरोध न करायला) आवश्यक ती सर्व सेटिंग करून झालेली आहे. आवश्यक त्या ठिकाणी आपले पित्थे भरून ठेवलेले आहेत. यापुढे अमेरिकेत जर निवडणुका झाल्या नाहीत (किंवा दिखाऊ निवडणुका झाल्या), आणि ट्रंप तहहयात अध्यक्ष राहिला, तरी आश्चर्य मानायला नको.

(घटनेप्रमाणे आजमितीस कोणीही दोनहून अधिक वेळा अध्यक्ष होऊ शकत नाही, हे तत्त्वतः जरी खरे असले, तरी ते म्हणजे जर घटना पाळायची, म्हटली तर. घटनाच जर धाब्यावर बसवायची म्हटली, आणि त्याला जिथून व्हायला पाहिजे तिथून जर विरोध होणार नसेल, तर मग आनंदीआनंद आहे.)

थोडक्यात, the best government system that money can buy! आणि, हे सेटिंग एका रात्रीत झालेले नाही; अनेक दशकांपासून हळूहळू, पद्धतशीरपणे करण्यात आलेले आहे.

Trump is not an aberration. He is the culmination of a deliberately designed process, executed gradually over decades, to systematically destroy America. For the sake of unrestricted power to a narrow, moneyed political class.

पुढचा कुणी नेता हीच धोरणं चालवेल काय किंवा त्यांचा विरोधक आला तर तर जुना घोळ निस्तरणे जमेल का?

यामागे, पुढचा कोणी नेता येईल (आणि तो ट्रंपविरोधक असेल), किंवा, फार कशाला, तोवर अमेरिका (as we know it) टिकेल, ही फार मोठी गृहीतके आहेत.

ठीक आहे. वादाच्या सोयीकरिता हीदेखील गृहीतके मानू. (आफ्टर ऑल, बायकोची नोकरी आज तरी शाबूत आहे; उद्याची चिंता आजच का करावी?) समजा पुढचा कोणी नेता आला (तो यायला तोवर अमेरिका शाबूत राहिली), आणि तो समजा ट्रंपविरोधक जरी असला (ट्रंपनेच निवडलेला ट्रंपचा कोणी वारसदार जरी नसला), तरी तोच कशाला, परमेश्वराचा बापदेखील जुना घोळ निस्तरू शकणार नाही. (But, wasn’t that the idea in the first place? याचिसाठी केला होता अट्टाहास!)

पुढची तीस वर्षे पाणी, इंधन आणि अन्न यासाठी हाणामारी होणार आहे. 

होईल. मग? यांना काय त्याचे? ‘लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे’ (महाराजांची क्षमा मागून) हीच जेथे फिलॉसफी आहे, तेथे काय फरक पडतो? (लाखांचे फक्त नाव आहे, पोशिंदा फक्त स्वतःचा आहे, वगैरे मामुली तपशील सोडून द्या.)

असो चालायचेच.

Rajesh188 Mon, 10/03/2025 - 20:06

In reply to by चिमणराव

खूप मोठे network लगते एक नेता काही करू शकत नाही.

 

जास्त खोलात गेला तर सहज लक्षात येईल नेता एक खेळणे असते आणि त्याला नाचवणारे वेगळेच असतात.

पडद्या मागे.सत्तेवर येण्यासाठी तुम्ही कोणची मदत घेता ह्या वर नेत्याचे निर्णय अवलंबून असतात.

 

निवडून येण्या साठी चोर, गुंड लबाड, आर्थिक घोटाळे बाज, लबाड उद्योग पती ह्या लोकांची मदत घेतली की राष्ट्र प्रमुख चीं धोरणे पण लबाड, चोर, गुंड, लबाड उद्योग पती ह्यांचे हित जपणारी च असतात.

ट्रम्प ला निवडणुकीत कोणी मदत केली ते शोधा माझे मत पटेल.

एकटे ट्रम्प कोणता च निर्णय घेऊ शकत नाहीत.

राजे शाही मध्ये पण ते शक्य नव्हते vatandar, जाहिगीरदार ह्यांना राजा विरोध करू शकत नव्हता.

लोकशाही मध्ये त्या पेक्षा बिकट स्थिती नक्की असणार 

उद्योग पती हा कधीच उत्तम राज्य करता होऊ शकत नाही.

 

Elon mask सारखी लोक अमेरिकेत सत्तेत निर्णय घेऊ लागले तर अमेरिका नक्की च बुडणार आहे 

Rajesh188 Sun, 09/03/2025 - 16:30

ज्या ज्या  राष्ट् प्रमु  लोकांनी डोळे बंद करून डोक्यावर घेतले तेच नेते हुकूम शाही वृत्ती चे निघाले.

हिटलर पहिला ह्याला लोकांनी डोक्यावर घेतला.

कंबोडिया च हुकूम शाह त्याला पण पहिला लोकांनीच डोक्यावर घेतला.

प्रत्येक हुकूम शाह बाबत हेच सूत्र लागू होताना दिसेल..

 

आणि देशाची उत्तम आर्थिक प्रगती होत आहे, खूप छान भ्रष्टाचार मुक्त प्रशासन आहे.

आणि तो राष्ट अध्यक्ष खूप उत्तम काम करत आहे तरी. भावनिक उन्माद  निर्माण करून अशा व्यक्ती ला सत्तेतून खाली खेचले जाते आणि आश्चर्य म्हणजे लोक भावनिक उन्माद लाच प्राथमिकता देतात.

तुमच्या चांगल्या कामाचीं दखल लोक घेत नाहीत.

घेतली तरी त्याला दुय्यम स्थान असते.

बांगलादेश च पण उदाहरणं बघा छान प्रगती करत होता देश भावनिक उन्माद निर्माण केल लोक विरोधी गेली सरकार पडले 

मनीषा Tue, 11/03/2025 - 10:52

क्षणभंगुर Thu, 13/03/2025 - 16:17

आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या (पश्चिम) युरोप-अमेरिका सहकार्यातून आणि मुक्त व्यापार धोरणांतून एक दीर्घ काळ त्या जगात शांतता प्रस्थापित झाली होती. ज्यामुळे खरं तर असं वाटू लागलं होतं की या व्यवस्थेतून जगात मोठ्या प्रमाणात शांतता प्रस्थापित करता येईल. 

खरंच. अनेकांनी ही शांतता गृहीत धरली आहे. कोणत्याही अस्मितेने (जसे की जात, धर्म, संस्कृती, भाषा) पछाडलेल्या  लोकांना या शांततेने आपले नुकसान झाले आणि इतरांचा मात्र फायदा झाले असे वाटत आहे. याचं मोठं उदाहरण म्हणजे ब्रेक्झिट आणि कदाचित फ्रेक्झिट. 
आजच्या द इंडियन एक्सप्रेस मधे विजयालक्ष्मी पंडित यांच्या एका वाक्याचा एक समर्पक संदर्भ मिळाला 
“The more we sweat in peace, the less we bleed in war.” 

दुसरं महायुद्ध आणि शीतयुद्ध (खरंतर कोणतंही युद्ध) हेच सांगत की युद्धात कोणीच जिंकत नाही.