Skip to main content

अनश्रिंकिंग: केट मान

नीतिशास्त्रात चर्चेला घेतला जाणारा एक 'ट्रॉली प्रश्न' आहे. रुळावरून भरधाव जाणारी एक ट्रॉली आहे. ट्रॉलीच्या रस्त्यात रूळांवरच चार कामगार काम करताहेत. ट्रॉली थांबू शकत नाही त्यामुळे आता ते चारही कामगार मरणार आहेत. पण ट्रॉलीचा मार्ग बदलण्याच्या खटक्याजवळ तुम्ही उभे आहात. तो खटका ओढला तर ट्रॉली एका फाट्यावरून वळेल. पण तिथेही एक कामगार काम करतोच आहे. मग तुम्ही एका माणसाला मरावं की चार? या प्रश्नाचं उपयुक्ततावादानं दिलेलं उत्तर असं आहे की समोर असलेल्या परिस्थितीतून जास्तीत जास्त लोकांचं भलं व्हावं असा निर्णय घ्यायचा असेल तर एका माणसाला मारून चार जणांची आयुष्यं वाचवली पाहिजेत. हा प्रश्न बारीकसारीक बदल करून वेगवेगळ्या पद्धतीनं विचारला जातो. त्यातला एक प्रकार असा की ट्रॉली एका पुलाखालून भरधाव जाते आहे. समोर तसेच पाच कामगार आहेत पण यावेळी पुलावर एक सामान्य वजनाचा बघ्या (तुम्ही) आणि त्याच्या शेजारी उभा असलेला एक लठ्ठ माणूस आहे. खटक्याजवळही एक व्यक्ती आहे जी गाडी वळवायचा निर्णय घेऊ शकते. पण त्या लठ्ठ माणसाला वरून खाली फेकलं तर तो ट्रॉलीसमोर येईल आणि त्याच्या वजनामुळे ट्रॉली थांबेल (अर्थातच तो मरेल). अशावेळी तुम्ही काय कराल? खटका ओढायला सांगून एका कामगाराला माराल की पुलावरून फेकून देऊन लठ्ठ माणसाला माराल?

Unshrinking Kate Manne

केट मान या कॉर्नेल विद्यापीठात तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या ऑस्ट्रेलियन प्राध्यापिकेच्या 'अनश्रिंकिंग: हाऊ टु फाईट फॅटफोबिया' या पुस्तकात ती हा प्रश्न वर्गात विचारल्यावर विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया येतात त्याबद्दल लिहिते. प्रश्नात लठ्ठ माणूस आल्यावर बहुतांश विद्यार्थी त्याला न मारण्याचा निर्णय घेतात कारण एखादा खटका ओढून एखाद्याचा जीव घालवणे - ही तुलनेनं अप्रत्यक्ष वाटावी अशी कृती आहे. पण एखाद्याला पुलावरून ढकलून देऊन त्याचा जीव घेणे ही कृती  अधिक थेट आणि मानवी आहे. मात्र, जेव्हा प्रश्नात लठ्ठ व्यक्ती अवतरते तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकतो, या निरीक्षणामुळे, लेखिकेला त्या हसण्याबद्दल जास्त लिहावंसं वाटतं. एखाद्या व्यक्तीच्या शरीराचे आकारमान वापरून आपण एखादी आपत्ती टाळतो, पण ते करत असताना त्या व्यक्तीचा जीव जातो, ही कल्पना एखाद्याला गंभीरपणे विचार करायला लावणारी आहे. पण त्या प्रश्नात वापरलेले शब्द, 'वुड यू किल द फॅट मॅन?' आणि 'फॅट' या शब्दाबद्दल लोकांच्या मनात असलेली अनेक गृहीतकं, यामुळे एखाद्या लठ्ठ व्यक्तीला पुलावरून फेकून देऊन पाच जणांची आयुष्य वाचवाल का, या प्रश्नावर हशा पिकतो.

पुस्तकाच्या शीर्षकात येणाऱ्या 'फॅटफोबिया' या शब्दामुळे हे काहीतरी तथाकथित 'वोक' लोकांचं प्रकरण आहे आणि आपण या पुस्तकाच्या वाटेला जाऊ नये असं वाटायची शक्यता आहे. पण असं ज्यांना वाटतं त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावं. कारण मुळात 'वोक' लोक वोक कसे आणि कशामुळे होतात याचाच प्रवास या पुस्तकातून अनुभवायला मिळेल. समाजात वावरत असताना जेव्हा एखाद्या व्यक्तीला नाकारलं जातं, कमी लेखलं जातं -  मग ते वंश, लैंगिक कल, स्त्री असणं - अशा कोणत्याही कारणांनी असो, अशावेळी नाकारलेली व्यक्ती नाकारणाऱ्या व्यक्तीपेक्षा त्या भेदभावाचा अधिक मूलगामी विचार करते. हे साहजिक आहे कारण, अगदी लहानपणापासूनच मिळणारी वेगळी वागणूक मनात अनेक प्रश्न निर्माण करत असते जे समाजात सहज मिसळू शकणाऱ्या व्यक्तींना पडत नाहीत. केटनं 'लठ्ठपणा' मध्यवर्ती ठेवून समाजातल्या अनेक असमतोलांबद्दल सहज आणि साहजिक प्रश्न उपस्थित केले आहेत आणि त्यांची उत्तरंही दिली आहेत.

हे लेखन वाचताना सर्वप्रथम जी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे लेखनात वापरलेलं सर्वनाम. हे कथन प्रथमपुरुषी एकवचनी नसून प्रथमपुरुषी अनेकवचनी आहे. कदाचित लठ्ठ माणसं हे पुस्तक आवर्जून वाचतील म्हणून लेखनात 'आय'च्या जागी 'वी' हे सर्वनाम वापरलं असावं असं सुरुवातीला वाटलं. पण नंतर लक्षात आलं की ते आपण - म्हणजे लठ्ठ व्यक्ती आणि आपण - म्हणजे समाज, अशा दोन्ही अर्थांनी वापरलं गेलं आहे. या एका सर्वनामामुळे कथनाचा आवाकाच बदलून गेला आहे. केट स्वतः लहान असल्यापासून लठ्ठपणाशी झुंज देते आहे. या पुस्तकात, कोवळ्या वयातल्या तिच्या काही कटू आठवणी आहेत. शाळा - युनिव्हर्सिटी - डेटिंग - लग्न - मातृत्व  अशा सगळ्या अवस्थांतरांतून जात असतानाच्या केवळ शरीराशी संबंधित आठवणी तिनं लिहिल्या आहेतच पण त्यांचा एक एक धागा तिनं तिची जडणघडण ज्या समाजात झाली त्या समाजाशीही जोडला आहे. लठ्ठ व्यक्ती जेव्हा त्यांची बाजू मांडतात तेव्हा त्याकडे एखाद्या अपराध्यानं, कामचुकार माणसानं दिलेली कारणं असंच बघायची पद्धत आहे.

पुस्तकाची सुरुवातच वैद्यकीय क्षेत्रात लठ्ठ माणसांच्या तक्रारींकडे केवळ त्या व्यक्ती लठ्ठ आहेत म्हणून पुरेसं लक्ष कसं दिलं जात नाही याची उदाहरणं आहेत. कॅन्सरसारखा आजार बळावत असताना, त्याच्या लक्षणांना लठ्ठपणाशी जोडल्यामुळे काही रुग्णांचे हकनाक बळी गेलेले आहेत. 'बीएमआय' (आपल्या किलोग्रॅममध्ये मोजलेल्या वजनाला, मीटरमध्ये मोजलेल्या उंचीच्या वर्गानं भागून जो आकडा मिळतो तो. तो २५ च्या आत असायला हवा हा निकष वैद्यकीय क्षेत्रातही रूढ आहे) ही संकल्पना गोऱ्या पुरुषांच्या शरीरावर बेतली आहे. आणि त्या वर्गातल्या सगळ्या पुरुषांनाही ती सरसकट लागू होत नाही. उदाहरणार्थ, एखाद्याच्या शरीरातल्या स्नायूंचं वजन, चरबीच्या वजनापेक्षा जास्त असेल - बॉडीबिल्डर लोकांमध्ये असतं तसं - तर त्यांचा बीएमआय अनेकदा तीसच्या वर जातो. बीएमआय ही संकल्पना ज्या वर्गावर बेतली आहे त्या वर्गातही तिला अपवाद आहेत. पण हे गणित काळ्या स्त्रियांना सरसकटपणे अजिबातच लावता येत नाही. काळ्या स्त्रियांची शारीरिक ठेवण, त्यांची शरीरात मेद साठवण्याची प्रकृती, वय वाढेल तसा त्यात होणारा बदल - हे सगळं बीएमआयच्या गणिताच्या बाहेरचं आहे. आणि या गटांतल्या स्त्रिया स्वास्थ्यावर विशेष विपरीत परिणाम न होताही लठ्ठ राहू शकतात. तरीही त्यांनाही या गणितात बसवण्याचा अट्टाहास केला जातो.(याउलट, जिथे मधुमेह जवळपास 'जनुकीय'च आहे अशा भारतासारख्या देशात, मधुमेहाचा प्रादुर्भाव बारीक लोकांमध्येही बघायला मिळतो!)

मुळात जाड असणं वाईट आणि बारीक असणं चांगलं ही संकल्पनाच काळ्या आणि गोऱ्या व्यक्तींच्या अभ्यासातून आलेली आहे असं मत लेखिका व्यक्त करते. अटलांटिक महासागरावरून गुलामगिरीसाठी आफ्रिकी मनुष्यबळाचा व्यापार होऊ लागला तेव्हा त्यांचं निरीक्षण करून, गोऱ्या आणि काळ्या लोकांमध्ये नेमके काय फरक आहेत याचा 'शास्त्रीय' अभ्यास करण्यात आला. निष्कर्षापासून सुरुवात करून केलेल्या असल्या अनेक अभ्यासांतून काळे लोक मंद असतात, जाड असतात, आळशी असतात अशी निरीक्षणं मांडून शेवटी ते गोऱ्यांपेक्षा कमी बौद्धिक कुवतीचे असतात असा आधीच ठरवलेला निष्कर्ष काढण्यात आला. गुलामगिरीचं समर्थन करण्यासाठी असे निष्कर्ष आवश्यक होते. पण त्याआधीच्या काळातली कला बघितली तर अनेक  शिल्पांतून आणि चित्रांतून व्यवस्थित लठ्ठ बायका दिसतात. त्या काळ्या नसल्या तरी लठ्ठ असतात. काही चित्रांतून तर सेल्युलाइटमुळे शरीरावर तयार झालेल्या खळ्याही खुलवून दाखवल्या आहेत.  एक काळ होता जेव्हा जाड असणं सुबत्तेचं लक्षण होतं. आज आपण अशा काळात जगतो, ज्या काळात लठ्ठ असणं म्हणजे (बारीक लोकांपेक्षा) मठ्ठ असणं असं समीकरण झालं आहे. केवळ आपण बारीक आहोत म्हणून अधिकारवाणीनं सल्ले देणाल्या 'थिनस्प्लेनिंग' म्हणतात ही नवी संज्ञा मला हे पुस्तक वाचून समजली. आणि एखाद्याच्या आरोग्याची काहीही माहिती नसताना केवळ त्यांच्या बाह्यरुपाकडे बघून त्यांना 'काळजीने' आरोग्यविषयक सल्ले देण्याला 'कन्सर्न ट्रोलिंग' असाही एक छान शब्द गवसला.


आपल्यावर सातत्यानं केल्या जाणाऱ्या 'डाएट'च्या माऱ्यामुळे मात्र, बारीक असलो तरच आपण निरोगी आहोत असा बहुसंख्य लोकांचा समज झालेला आहे. याविषयी लिहिताना केट अनेक विचार करायला लावणारी उदाहरणं देते. वजन कमी करण्यासाठी जितकी ऊर्जा खर्ची घालावी लागते त्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक ऊर्जा कमी झालेलं वजन टिकवून ठेवायला लागते. वजनघटीचा आकडा जितका मोठा तितकी जास्त ऊर्जा ते वजन परत वाढू नये यासाठी खर्च करावी लागते. 'बिगेस्ट लूझर'मधून बारीक होऊन आल्यावर तिथली वजनघट टिकवू शकणारे लोक फार कमी असतात. अशा मोजक्या लोकांना जेव्हा ती वजनघट टिकवायला ते काय करतात असं विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी जे काही सांगितलं त्यातलं काहीही 'निसर्गदत्त बारीक' व्यक्ती करत नाही हे स्पष्ट होतं. वजन वाढू नये म्हणून पोटात जाणाऱ्या अन्नाच्या प्रत्येक कणाचं अशा लोकांना वजन करावं लागतं. वजन वाढू नये म्हणून असे लोक मित्र मैत्रिणींबरोबर बाहेर जेवायला किंवा दारू प्यायला जात नाहीत. ते दिवसाला दोन किंवा अधिक तास व्यायाम करतात आणि हे सगळं करूनही ते कायम काठावरच असतात.


या पुस्तकात मांडलेले अनेक प्रश्न वाचकांना वेगळ्याच दिशेला नेऊन विचार करायला लावतात. पीटर सिंगर नावाच्या एका ऑस्ट्रेलियन तत्वज्ञानं 'वे मोअर - पे मोअर' अशी एक चटपटीत घोषणा दिली होती. लठ्ठ व्यक्तींनी विमानप्रवासाचे जास्त पैसे द्यायला हवे असं त्याचं मत कारण अधिकच्या वजनाचा यंत्रणेवर ताण येतो. एखाद्या सडपातळ बाईनं समजा नव्वद पौंडाचा ऐवज सामान म्हणून आणला असेल, आणि तिच्या मागे लाईनीत जर एखादा शंभर पौंड अधिकचं वजन असणारा जाड माणूस उभा असेल तर त्या बारीक बाईला आपण जसे सामानाचे पैसे भरायला लावतो तसेच त्या लठ्ठ पुरुषाला त्याच्या वजनाचे भरायला लावले पाहिजेत असं सिंगर सांगतो. पण मग याच दिशेने जायचं असेल, तर लहान मुलांनाही त्यांच्या वजनाप्रमाणे तिकीट लावायला पाहिजे! (मूल एक संबंध खुर्ची अडवू लागल्यावर लगेच त्याला पूर्ण तिकीट लागू केलं जातं. याउलट अनेक अतिलठ्ठ व्यक्ती आपल्यामुळे इतरांची गैरसोय होऊ नये याची जाणीव ठेवून कोणतीही सक्ती नसताना स्वतःसाठी दोन खुर्च्यांची तिकिटं काढतात)

एखादी व्यक्ती सव्वा सहा फूट असेल आणि इतरांपेक्षा तिचं वजन अधिक भरत असेल तर तिलाही अधिक वजनाचं शुल्क आकारायला हवं. पाच फूट उंची असलेली शंभर किलो व्यक्ती आणि सव्वा सहा फूट उंची असलेली सव्वाशे किलो व्यक्ती यांची तुलना कशी करणार? कारण शेवटी विमानात ते आपापलं ‘वजनच’ घेऊन जाणार आहेत. पण जाड व्यक्तींची चर्चा होत असताना असे मुद्दे तिथे उपस्थित करायची गरज नाही कारण जाड व्यक्तींवर लागणारे कर, त्यांना त्यांच्या जाड असण्याची सतत करून दिलेली आठवण हे सगळं अंतिमतः त्यांच्याच भल्यासाठी चाललं आहे असं आपण ठरवलेलं असतं. त्यामुळे तो अन्याय असला तरी त्यांच्या चांगल्यासाठीच आहे हे गृहीत धरलं जातं.

अलीकडेच बाजारात आलेल्या ओझेम्पिकसारख्या औषधांची तुलना लेखिका रंग उजळवण्यासाठी, नाकाचा आकार बदलण्यासाठी, सुरकुत्या घालवण्यासाठी केलेल्या प्रक्रियांशी करते. या सगळ्या प्रक्रिया जगात दिसणाऱ्या शरीरांचं वैविध्य नष्ट करून एकाच प्रकारच्या सौंदऱ्याला मान्यता मिळवून देणाऱ्या आहेत. ते सौंदर्य पाश्चात्य, गौरवर्णीयांच्या कल्पनेतलं सौंदर्य आहे. ‘मानवी शरीरांचं वैविध्य’ हे शब्दं वाचल्यावर माझ्या डोळ्यासमोर नॅशनल जॉग्रफिक मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकलेल्या अनेक प्रतिमा  आल्या. घाऱ्या डोळ्यांची अफगाण मुलगी, सुरकुतलेल्या हातांच्या आणि चेहऱ्यांच्या आज्या, कधी भारतीय, कधी मंगोल, कधी आफ्रिकन असे वागवेगळ्या वंशांचे लोक! केवळ वैविध्य हा शब्द वापरल्यानं आपल्या कल्पनेला किती वेगळं वळण मिळतं. हेच नॉर्मल/ॲब्नॉर्मल; जाड/बारीक; काळे/गोरे असे ध्रुव तयार केले की मधल्या सगळ्या जागा हरवून जातात.

हे पुस्तक वाचून बरेच महिने झाले. यात आलेले अनेक मुद्दे समाजमाध्यमांवर वेळोवेळी चर्चिले जातात म्हणून लिहायचा कंटाळा केला. पण तसं असलं, तरी केट माननं काही ठिकाणी त्यांचा जसा कीस पडला आहे तो वाचताना फार मजा येते. समाजात लठ्ठपणा रुजवण्याचं, त्यावर (अनेक चुकीचे) उपाय शोधून काढण्याचं आणि शेवटी ओझेम्पिकसारखं औषध देण्याचं काम भांडवलशाहीनेच केलं आहे. लठ्ठ व्यक्तींच्या असह्य आयुष्यांत डोकावून बघत त्यांतून लोकांची करमणूक घडवणाऱ्या मालिका आपण बघू लागलो आहोत. असा एक सिनेमादेखील तयार झालेला आहे (व्हेल!). लठ्ठपणाचा तमाशा केला गेला आहे. अशा प्रचाराचे पडसाद सामान्य माणसांच्या आयुष्यातही पडतात. शाळांच्या मैदानांवर उमटतात. लहान मुलांना त्यांच्या शरीराबद्दल कायमचा गंड देऊन जातात. कदाचित ओझेम्पिकसारखी औषधं सर्रास मिळू लागली तर आपण सगळेच एका आकाराचे होऊ. जगातून लठ्ठपणाचे उच्चाटन होईल. पण आपण असाही एक काळ बघितला आहे ज्या काळात जगातले जवळपास एक तृतीयांश लोक आपल्या शरीरमानाचा विचार करण्यात, त्यावर उपाय शोधण्यात आणि अपयशी ठरण्यात, प्रचंड शारीरिक आणि बौद्धिक ऊर्जा खर्ची घालत असत. याबद्दल सर्व बाजूने केलेलं चिंतन या पुस्तकात सापडेल. 

चिमणराव Sat, 07/06/2025 - 11:56

लेखिका (पुस्तकाची) स्वतः लठ्ठ आहे का?
कुणी दुसऱ्या काटकुळ्या व्यक्तीला लठ्ठ लोकांचे संशोधन करायला किंवा प्रश्न शोधायला देता कामा नये. म्हणजे काय की लठ्ठ लोकांचा काळे/गोरे पणा बाजूला टाकून फक्त लठ्ठपणावर फोकस राहावा. गुटगुटीत फुगीर लोकांना लठ्ठपणातून वगळावे.

सई केसकर Sat, 07/06/2025 - 14:51

In reply to by चिमणराव

>>>केट स्वतः लहान असल्यापासून लठ्ठपणाशी झुंज देते आहे. या पुस्तकात, कोवळ्या वयातल्या तिच्या काही कटू आठवणी आहेत. शाळा - युनिव्हर्सिटी - डेटिंग - लग्न - मातृत्व अशा सगळ्या अवस्थांतरांतून जात असतानाच्या केवळ शरीराशी संबंधित आठवणी तिनं लिहिल्या आहेतच पण त्यांचा एक एक धागा तिनं तिची जडणघडण ज्या समाजात झाली त्या समाजाशीही जोडला आहे. लठ्ठ व्यक्ती जेव्हा त्यांची बाजू मांडतात तेव्हा त्याकडे एखाद्या अपराध्यानं, कामचुकार माणसानं दिलेली कारणं असंच बघायची पद्धत आहे.<<<<

पुस्तकाची लेखिका वेगवेगळ्या वयात वेगवेगळ्या आकाराची होती असं तिनं नमूद केलं आहे. या लेखाची लेखिकाही वेगवेगळ्या वयांत वेगवेगळ्या आकाराची राहिलेली आहे. अगदी ४८ किलो पासून ते नवव्या महिन्यात नव्वद किलो वगैरे!

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 08/06/2025 - 05:08

गेल्या दोनेक वर्षांत चिमामांडा ङगोझी अडिचीेए (उच्चाराची चूभूदेघे) हिच्या कादंबऱ्या वाचल्या. ती मूळची नायजेरियातली. आता अमेरिका आणि नायजेरियात राहते. 

तिच्या कादंबऱ्यांमध्ये, विशेषतः हाफ ऑफ अ यलो सन आणि अमेरिकान्नाह, यांत नायजेरियातल्या सुंदर पुरुषांची शारीरिक वर्णनं आहेत. त्या वर्णनांमध्येही या पुरुषांचे भारदार नितंब आणि मांड्या असा उल्लेख सतत असतो. 

मारवा Tue, 10/06/2025 - 02:57

या पुस्तकात वरील सर्व उहापोहा व्यतिरीक्त लठ्ठपणाच्या समस्येशी ग्रस्त असलेल्या व्यक्तीला मानसिक बळ देणारं मार्गदर्शनही चांगले आहे का ?
कधींकधी समस्या फार सखोलतेने मांडलेली असते जे आवश्यकच असते.पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग ही तितकाच आवश्यक असतो. म्हणजे असे मार्गदर्शन नसेल तर समस्याग्रस्त व्यक्ती अधिकच डिप्रेस्ड होताना बघितलेल्या आहेत.
हे पुस्तकं एका नातेवाईक तरुण मुलीला देण्यासाठी हे विचारतोय तिचा लठ्ठपणाकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन सुधारेल कदाचित अशी आशा.

सई केसकर Tue, 10/06/2025 - 11:34

In reply to by मारवा

या पुस्तकात मार्गदर्शन नाही. म्हणजे काय खावं आणि किती व्यायाम करावा याचं मार्गदर्शन नाही. पण लठ्ठ लोकांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन किती पूर्वग्रहयुक्त आहे याबद्दल वेगवेगळ्या मार्गानी केलेलं विवेचन आहे. कोणत्याही लठ्ठ व्यक्तीला हे पुस्तक वाचून मानसिक आधार नक्कीच वाटेल. लठ्ठ व्यक्तींना दोन आघाड्यांवर संघर्ष करावा लागतो. पहिली म्हणजे आपण वजन कमी करायला हवं याची सतत जाणीव असणे (लठ्ठ लोकांना त्यांनी वजन नियंत्रणात ठेवायला हवं हे माहितीच नसतं असं आजूबाजूच्यांना वाटतं. पण कोणत्याही लठ्ठ व्यक्तीला विचाराल तर त्यांच्या जागृतावस्थेचा बराच भाग केवळ शरीरावर विचार करण्यात जातो). ही जाणीव जरी असली तरी तिची अंमलबजावणी यशस्वीपणे करता येत नाही हा एक संघर्ष. आणि आजूबाजूच्या लोकांची टीका, सल्ले, उपदेश यांचा सामना करणे ही दुसरी आघाडी. बऱ्याचदा दुसऱ्या आघाडीवर मानसिक शक्ती वाया घालवण्याचा विचार सोडून दिला तर आरोग्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष देता येतं. हे पुस्तक वाचून लोकांच्या टीका टिप्पणीचा विचार कमी करता येऊ शकेल.