Skip to main content

माउंटनहेड : टेकमोगल्सच्या अहंकाराचं शिखर

कल्पना करा : चार टेकमोगल एका पर्वताच्या टोकावरच्या आलिशान घरात भेटतात, त्यांच्या कुशीत असतात लाखो डॉलर्स आणि मनात जग जिंकायच्या अर्धवट कल्पना! गाजलेल्या ‘सक्सेशन’ मालिकेचा कर्ता जेस्सी आर्मस्ट्रॉंगच्या खोडकर शैलीतला हा सिनेमा आहे. जर तुम्हाला त्या मालिकेतले वेगवान संवाद आणि उपरोधिक टोमणे आवडत असतील, तर इथली कॉमेडी नक्कीच तुमच्या पसंतीला उतरेल. अर्थात, अनेक सीझन्समध्ये पसरलेल्या सक्सेशनच्या पात्रांना जास्त खोली देता आली ती इथे शक्य नाही. पण लेखणीची धार आणि कॉमेडीचं टायमिंग इथेही जमलेलं आहे. 

 

कथेच्या केंद्रस्थानी आहेत चार सुप्रसिद्ध, उद्धट आणि (एक अपवाद वगळता) बिलियनेअर पुरुष. जो अपवाद आहे तो मल्टी-मिलियनेअर आहे, पण इतर तिघांपेक्षा ‘गरीब’ असल्यामुळे त्याला ‘सूप किचन’ म्हणतात. माउंटनहेड हे त्याचं आलिशान घर आहे आणि त्यामुळे तो यजमान आहे. पोकर खेळायचं आणि एकमेकांना टोमणे हाणायची मजा घ्यायची ह्या हेतूनं चौघे तिथे आले आहेत.

 

स्वतःला महासत्ता समजणारा वेनिस स्पष्टपणे इलॉन मस्कवरून बेतलेला आहे. त्याच्या मालकीचा एक लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. त्यावर त्याने नुकतंच एक नवं एआय टूल लोकांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. ते वापरून खूप खऱ्यासारखे फेक व्हिडिओज बनवता येतात. त्याद्वारे केलेले फेक व्हिडिओज व्हायरल झाले आहेत आणि त्यांनी जगभर धुमाकूळ माजवला आहे – दंगली, जाळपोळ, मोठमोठ्या राष्ट्रीय बँका दिवाळखोर होणे वगैरे. 

 

रँडल त्यांच्यातला सर्वात वयस्कर माणूस आहे. फेसबुक, पेपाल, इ. टेक कंपन्यांचं भविष्य हेरून त्यांत लवकर गुंतवणूक करणाऱ्या पीटर थीलसारखं हे पात्र आहे. तो सारखा हेगेल, कांट, नित्शे वगैरेंची नावं घेऊन तत्त्वचिंतनात्मक वाटेल अशी वक्तव्यं स्रवत असतो, पण त्याला खरंच ह्या लोकांचं तत्त्वज्ञान कळलेलं आहे असं काही त्यातून दिसत नाही, त्यामुळे विनोदनिर्मिती होत राहते. त्यातच त्याला कॅन्सर झालेला आहे, आणि येऊ घातलेल्या मृत्यूशी कसं डील करायचं ते त्याला समजत नाही, त्यामुळे माझा अख्खा कॉन्शसनेस एआयला अपलोड करून ठेवता येईल का, वगैरे भन्नाट कल्पना त्याच्या (त्याच्या मते उच्च दर्जाच्या) मेंदूतून येत राहतात.

 

चौथा सदस्य जेफ हाच त्यातल्या त्यात ह्या अल्फा मेल लोकांतला बरा म्हणता यावा. ‘सक्सेशन’मधल्या रोमन रॉयप्रमाणे हा बाकीच्यांच्या इगोला टाचण्या लागतील अशा तिरकस टिप्पण्या आणि विनोद सतत करत राहतो.

 

जग जळत असताना मित्रांबरोबर चिल करायला हे चौघे "माउंटनहेड"ला आलेले आहेत. या नावाबद्दल बोलायचं झालं तर – ते जिथे भेटलेत ते पर्वताच्या कुशीतलं घर "माउंटनहेड" नावाचं आहे. ह्याला एक स्पष्ट संदर्भ आहे फाउंटनहेड या एन रँडच्या सुप्रसिद्ध कादंबरीचा. तिथल्याप्रमाणेच हे अब्जाधीश टेकगुरू अल्फा मेल स्वतःला हीरो मानतात, ते मानवजातीच्या उद्धारासाठी काहीही करू शकतात, आणि त्यांच्या अत्याधुनिक कल्पना हाच जगाला उत्तमरीत्या चालवण्याचा अंतिम उपाय आहेत असं त्यांचं मत आहे! पण सत्य हे आहे की त्यांचे इगो त्यांच्या कल्पकतेपेक्षा खूप मोठ्ठे आहेत. नमुन्यादाखल एक प्रसंग – हे चौघे बर्फात छाती उघडी काढून आपली नेट वर्थ आपल्या छातीवर लिहितात आणि त्याच्या क्रमवारीनुसार कोणाला मुकुट, कोणाला कप्तानाची टोपी, कोणाला सेलर कॅप वगैरे मिळते! 

 

Mountainhead (2025) film

'नो डील्स, नो मील्स, नो हाई हील्स' हे नियम त्यांच्या भेटीला लागू आहेत – म्हणजे व्यवहार करायचे नाहीत (पण त्यांच्या गप्पांमध्ये फक्त त्याचेच संदर्भ येतात), अन्न नाही (फक्त जंकफूड), आणि अर्थातच स्त्रिया नाहीत. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात, विशेषतः स्त्रियांसोबतच्या नातेसंबंधांत अडचणी दिसतात.

 

वेनिसला जे डील करण्यात रस आहे ते म्हणजे जेफशी – कारण जेफच्या कंपनीने वेनिसचे फेक व्हिडिओज ओळखून काढायचं टूल डेव्हलप केलेलं आहे. पण हे डील करून त्याला जेफचं टूल आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांना वापरायला द्यायचं आहे की ते टूल मारून टाकून चालू असलेला गोंधळ आणखी तीव्र होऊ द्यायचा आहे ते कळत नाही. कारण मुळात वेनिसमध्ये (आणि जेफ वगळता इतर दोघांमध्येही) सोशिओपाथ असण्याची अनेक लक्षणं दिसतात. मासल्यादाखल हा संवाद पाहा –

 

  • “Do you believe in other people?” 
  • “Obviously not!”

 

 

राष्ट्रं आणि त्यांचे शिंचे कायदे आणि निर्बंध म्हणजे एक तुच्छ समस्या आहे आणि आपण त्यापेक्षा उच्च ठिकाणी कुठे तरी आहोत ह्या भूमिकेतून ते जगाकडे बघतात, आणि सगळीकडे अंदाधुंद चालू असताना अर्जेंटिना किंवा तत्सम काही राष्ट्रं (किंवा कदाचित यूएसदेखील! व्हाय द फकिंग नॉट?) विकत घ्यावीत का, असा विचार ते गांभीर्यानं करतात. ह्या सगळ्यातून एक डार्क कॉमेडी उभी राहते. इथे हे लक्षात घ्यायला हवं की यातली पात्रं म्हणजे अर्कचित्रं आहेत, आणि गोष्ट म्हणून जी काही आहे ती केवळ चमकदार संवादांतून या पात्रांची आणि ते ज्यांचं प्रतिनिधित्व करतात त्या, पैसा बक्कळ आहे म्हणून स्वतःला फार अक्कल आहे असं समजणाऱ्या अख्ख्या टेक इंडस्ट्रीची खिल्ली उडवण्यासाठी आहे. मात्र, आजच्या परिस्थितीत अशा माणसांकडे नको तेवढी सत्ता आल्यामुळे जगाला कसा धोका संभवतो ह्याची जाणीवही त्यात होत राहते. नुकत्याच झालेल्या ट्रम्प-मस्क ब्रोमान्सच्या आणि त्याच्या अंताच्या पार्श्वभूमीवर हे अधिकच टोकदार वाटेल.

 

थोडक्यात काय, तर हा काही ह्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट सिनेमा नाही, किंवा ऑस्करच्या शर्यतीत वगैरेही हा असेल असं वाटत नाही, पण सद्य परिस्थितीचं गांभीर्य अतिशय चमचमीत पद्धतीने मांडण्यात तो यशस्वी ठरतो.

 

भारतात हा जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे, तर अमेरिकेत एचबीओ मॅक्सवर असावा.

 

ट्रेलर : https://youtu.be/27cN2_k0JF0?si=U2M8N9bIv6nas2KF

चिमणराव Tue, 10/06/2025 - 05:27

पुढे कधी ध्रृवांवरचे बर्फ वितळले आणि किनाऱ्यांवरची शहरे बुडाली तरी हे सुरक्षित आहेत हेच ते जगाला ओरडून सांगत असावेत.
( पर्वतांवरचे बर्फ वितळून तेही खाली जातील यावर त्यांनी काही उपाय शोधला असेलच.).....
.........
अमेरिकन उच्चार(accent) समजला तर चित्रपट पाहिनच.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/06/2025 - 06:19

डिसेंबरात न्यू यॉर्करनं जेसी आर्मस्ट्राँगची प्रोफाईल प्रकाशित केली होती तेव्हाच हा सिनेमा बघायचं ठरवलं होतं. (पण मी ठरवते किती आणि खरोखर बघते किती!) 

सिनेमा आता बघेन लवकरच.

मारवा Wed, 11/06/2025 - 09:21

फोटो कसा डकवायचा
पूर्वी केला होता पण आता कळ
त नाहीये ऑप्शन कुठे आहे ?
म्हणजे तुम्ही जसा या लेखात फोटो डकवला आहे तसा.मला एका लेखात दाखवायचा आहे

चिंतातुर जंतू Wed, 11/06/2025 - 19:42

फोटो कसा डकवायचा

Text format -> Full HTML

मग वर ऑप्शन्स येतील त्यात Insert image via URL.