एक चाळीशी.. हवीहवीशी ..
हा लेख गेल्या वर्षी लिहिलेला लेख!
***
गेल्या दोन तीन वर्षांपासून मला एका गोष्टीचं अत्यंत कुतूहल वाटतंयं. काळा जाड्या फ्रेमचा चष्मा आणि अर्थात त्यामागील ते मिश्किल, प्रेमळ, आणि हसरे डोळे.. म्हणजे इतकं की तुम्हाला काय व्हायला आवडेल असा एखादा निबंधाचा विषय दिला तर माझा विषय अगदी पक्का- तो जाडा काळा चौकोनी चष्मा किंवा त्यापलीकडची ती दृष्टी.. ती जादुई नजर.. .
तसं तर आपल्या सगळ्यांनाच रोज शेकडो लोकं दिसत असतात. मुंबई सारख्या महानगरात राहत असू, लोकलने जात असू तर तोच आकडा हजारावरही जाऊ शकतो.
ही लोकं, काही अत्यंत कंटाळवाणी अगदी टाळू वाटावी अशी तर काही महाभयंकर अगदी चार हात दूर राहाव अशी, काही रागीट तर काही अतिप्रेमळ, काही बेफिकीर, तर काही बेरकी, काही भोळसट तर काही परोपकारी तर काही चाकोरीबद्ध जीवन जगणारी… हातावर पोट असणारी, दोन पैसे गाठीशी बाळगणारी, ऋण काढून सण साजरा करणारी, पोटाला चिमटा काढून पै न पै साठवणारी… अशी नाना प्रकारची, नाना स्तरावरची..
आपणही त्यांच्याशी कधी हसतो, बोलतो, चिडतो, टाळतो, दुर्लक्ष करतो, प्रेम करतो, द्वेष करतो, कौतुक करतो किंवा क्वचित कधी थोडी असुयाही बाळगतो.
आपण अगदी सामान्य माणसं, म्हणजे सूर्योदय किंवा सूर्यास्त बघितला म्हणजे काही लगेच आपल्याला कविता स्फुरणार नाही, की झाडाखाली बसलो म्हणून न्यूटन सारखे शोध लागणार नाहीत, किंवा परिस्थितीने चटके दिले वा प्रेमात पडलो म्हणून लगेच कादंबरी लिहायला सुचणार नाही …तेथे पाहिजे जातीचे.
या लेखक, कवी, नाटककार मंडळींचं आपल्यापेक्षा सगळंच वेगळं. पण तरी त्यातही डावं उजवं असतंच नाही? म्हणजे बघा अगदी कितीही श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लेखक म्हंटला तरी त्यांची काही पुस्तकचं लोकप्रिय होतात.. त्यातही एखादी लेखांची पुस्तकांची मालिका लिहिली की त्यातील एखादे पात्र अजरामर होणार ..
पण मग असा एखादा अवलिया, ज्याच्या एका पुस्तकात त्याने वीसेक पात्र तरी खुबीनं रंगवलीयेत आणि ती सगळी लोकप्रिय झालीयेत. आणि हे असं एखादच पुस्तक नाही तर कितीतरी पुस्तकं, नाटकं, कलाकृती.. आणि त्या प्रत्येक कलाकृतीतली अनेक पात्र, व्यक्तिरेखा लोकप्रिय झाल्यात नव्हे तर अजरामर झाल्यात. इतक्या की नंतरच्या तिसऱ्या, चौथ्या पिढीलाही एखादा शब्द किंवा वाक्य त्यांच्या कुठल्या पुस्तकातील कुठल्या पात्राच्या तोंडी होत हे अगदी तत्परतेनं सांगता येतं. बरं ती पात्र किंवा व्यक्ती रेखाही काही शूरवीर राजे महाराजे, किंवा अमानवी शक्ती असलेले जादूगार किंवा देवदूत नाहीत तर अगदीच सामान्य किंवा अतिसामान्य माणसं… परिस्थितीचे तडाखे सोसलेली, जनरीतीच्या रहाट-गाडग्यात फिरणारी तुमच्या आमच्यासारखीच सुख दुःख असलेली.. किंबहुना
कदाचित ती तशी होती म्हणूनच ती इतकी लोकप्रिय झाली असावीत का?
आपल्या भोवती चालणाऱ्या कोलाहलातून, गराड्यातून, माणसांच्या जत्रेतून छोटे छोटे बारकावे, त्यांच्यातील नातेसंबंध, देवाण-घेवाण टिपणारे, त्यांच्या लकबी, लय, ढब, शब्दफेक, चढउतार हेरणारे ते ठसठशीत काळ्या जाड्या फ्रेममागचे ते मिश्किल डोळे.
वयाच्या दहाव्या बाराव्या वर्षांपासून पुलंना ऐकायला, वाचायला सुरुवात केली, तेव्हापासून ते वेगवेगळे कळत गेले, उमजत गेले. अर्थात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते ते उमजणं, आवडणं वेगळं होतं.
शालेय किंवा महाविद्यालयीन दिवसांत त्यातला विनोद, कोपरखळ्या, गोष्टीवेल्हाळता ह्यांनी वेड लावलं.
पुढे नोकरी, संसार सुरु झाल्यावर त्यातील व्याप, ताणतणाव विसरायला लावून काही क्षण हसायला लावणारा तो एक हलकासा विरंगुळा झाला. चाळीशीच्या आसपास अजून आयुष्य, माणसे बघितल्यावर, त्यांचे अनुभव घेतल्यावर त्या विनोदामागचे कारुण्य, टोकदारता, विसंगती जाणवू लागली आणि तीच विसंगती, विक्षिप्त माणसे किंवा त्यांचे स्वभाव, परिस्थिती मग आपल्या स्वतःच्या आयुष्यात आल्यावर बसणारी तिची झळ जराशी सुसह्य होत गेली.
वाचता वाचता कधीतरी छोटे मोठे अनुभव, मनोगत लिहायला लागल्यावर मग मात्र पुलं च श्रेष्ठत्व, वेगळेपण अजूनच भावत गेलं. कारण त्यांची एक एक कलाकृती, आणि त्यात चपखल बसणारी ती पात्रं..
आता हेच बघा ना..
असामी असामी मधे फक्त ४०-५० च्या दशकातला कारकुनी करणारे धोंडोपंत जोशीच रंगवले नाही तर त्यांचं पूर्ण कुटुंब, कॉलनीतील, चाळीतील माणसे, कचेरीतील सहकारी, त्यावेळची मुंबई, आणि अर्थात सरोज खरे .. आपली .. सगळं सगळं चित्र शब्दसामर्थ्यावर उभं केलय.
तीन मजली बटाट्याची चाळ त्यातील अनेक बिऱ्हाडकरुंसकट इतकी सुंदर रंगवलीये की चाळसंस्कृती कधीही न अनुभवलेला, पाहिलेला वाचक/ श्रोताही त्यात रंगून जातो.
व्यक्ती आणि वल्ली म्हणजे तर एक खजिनाच आहे. नावाप्रमाणेच अनेक वल्ली तुम्हाला भेटतात अगदी कडकडून.
त्यात उच्चभ्रू नंदा प्रधान, साठाव्या दशकात मराठी कुटुंबियांच्या घरात सर्रास आढळणारा नारायण, गुलछबू नाथा कामत, बेरकी नामु परीट, अभ्यासातील किडा सखाराम गटणे, भोळसट गज खोत, परोपकारी गंपू, इरसाल पण तरीही हतबल असा अंतू बर्वा, उच्चमध्यमवर्गीय सरळमार्गी गुळगुळीत ते चौकोनी कुटुंब, नगण्य तरीही विक्षिप्त असा मिडिऑकर लखू रिसबूड, मिश्किल खट्याळ पेस्तनकाका - काकी, स्वतः मुखवटा घालून दुनियादारी करणारा आणि अंतर्मुख व्हायला लावणारा ‘तो’ …
सुंदर मी होणार मधील दीदीराजे, बेबी राजे किंवा तुज आहे तुजपाशी मधील जिंदादिल काकाजी, कठोर आचार्य किंवा ती फुलराणी मधील फुलराणी, प्राध्यापक किंवा रविवार सकाळ मधील एकेक हरहुन्नरी चाळकरी, मालू, तिच्या उच्चभ्रू मैत्रिणी किंवा वार्यावरची मधील गावातला महाबेरकी साक्षीदार, टुरिंग टॉकिज दाखवणारे गावकरी, स्वागत समारंभातील मान्यवर .. केव्हढा मोठा तो स्पेक्ट्रम!
जिथे एका लेखकाला एक पात्र तयार करून ते लोकांच्या मनावर ठसवायला फक्त एक पुस्तक नाही तर पुस्तक मालिका कराव्या लागतात.
तिकडे एका नाटकात, पुस्तकात असणारी अनेक पात्रे त्यांच्या संवादासह प्रेक्षकांच्या, वाचकांच्या मनावर राज्य करतात आणि पुस्तक/ नाटक संपल्यावरही हलकेच मनात त्यांची सोबत करत राहतात.. अगदी काही दशकांपूर्वीच्या काळातील त्या व्यक्ती अगदी ह्या काळातही त्यांना भेटत राहतात.. खरंच अगदी अद्भुत वाटतं सारं! म्हणूनच ते इंग्रजी मध्ये म्हणतात ना ‘अ फ्लाय ऑन द वॉल’ अगदी तसच त्या चष्म्यात बसून त्यांना काय काय आणि कस कसं दिसतं ते बघत राहावं .. अगदी तासनतास .. दिवसेंदिवस .. वर्षानुवर्षे पण म्हणजे आत्ता नाही हं कित्येक दशकं मागे जाऊन अगदी पार ६०च्या दशकापासून!
______________________________________________
गेल्या आठवड्यात पुलं चा स्मृतिदिन होता त्यानिमित्त हा लेख. कितीतरी महिने हे डोक्यात घोळत होतं. आज त्याला शब्दरूप देता आलं. पुलं च्या स्मृतीस त्रिवार वंदन !
-Prerana Kulkarni
Eye of the beholder?
नंदा प्रधान इतका काय विशेष आहे समजत नाही ?
या पात्रात नक्की काय विशेष आहे (किंवा, खरोखरच काही विशेष आहे का) हे (तुमच्याप्रमाणेच) मलाही समजलेले नाही. परंतु, हे पात्र अनेकांचे आवडते का असू शकेल, याची कल्पना मी करू शकतो.
यात नंदा प्रधानाची पार्श्वभूमी (किंवा त्याचे (असलेच तर) व्यक्तिमत्त्व) या गोष्टीस per se फारसे महत्त्व नाही. या गोष्टीस महत्त्व जे येते, ते पु.लं.चा जो विशिष्ट टार्गेट वाचकवर्ग होता (किंवा आहे), त्याची पार्श्वभूमी वा मानसिकता वा दृष्टिकोन हा पार्श्वभूमीस ठेवल्यामुळे, या दोन पार्श्वभूमींच्या विरोधाभासातून वा संघर्षातून येते.
म्हणजे असे पाहा. पु.लं.चा टिपिकल टार्गेट ऑड्यन्स कोण? ममव वाचक. राहणार गिरगाव, दादर, विलेपार्ले, किंवा फार फार तर डोंबोली. झालेच तर, पुणे क्र. २, ३०, किंवा (अगदीच मुठेत घोडे न्हायल्यास) ४ किंवा (दुसर्या बाजूस) ९. (आजकाल कदाचित २९ नि ३८सुद्धा, परंतु तूर्तास केवळ पु.लं.च्या लेखनकाळापुरता विचार करू.) 'महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व' वगैरे म्हणायला ठीक आहे, परंतु, त्यातला 'महाराष्ट्र' हा 'संयुक्त' खासा नसावा; त्याची व्याप्ती ही एवढ्या (वर उल्लेखिलेल्या) इलाख्यांबाहेर नसावी. (चूभूद्याघ्या.)
शिवाय, लिखाणाचा कालावधी लक्षात घ्या. नंदा प्रधानाचे उपद्व्याप हे बहुतांशी द्वितीय महायुद्धकाळातले ((इंदू वेलणकर जमेस धरल्यास) काही थोड्या अगोदरचे); त्याच्या आणि निवेदकाच्या भेटीचा काळ हा त्याच्या थोड्या नंतरचा (बहुधा स्वातंत्र्याच्या एकदोन वर्षे अगोदरपासून ते स्वातंत्र्यानंतर जास्तीत जास्त दहा ते पंधरा वर्षे एवढ्यातला; चूभूद्याघ्या). या काळात, ममवंमध्ये 'फॉरेन'ला जाऊन आलेल्यांचे प्रमाण अत्यल्प असावे, नि 'फॉरेन रिटर्न' माणसास आकाशातून टपकल्याप्रमाणे भाव असावा. (मराठी ममवंमध्ये ही स्थिती मला वाटते त्यानंतरसुद्धा दोनअडीच दशकांपर्यंत थोड्याफार प्रमाणात असावी. आजकालचे सोडून द्या; आजकाल जो-तो आणि ज्याचात्याचा काका भारताबाहेर पडलेला असतो. त्यामुळे, आजच्या पिढीला त्याचे (किंवा फॉर्दॅट्मॅटर पु.लं.चेसुद्धा) अप्रूप वाटणार नाही. परंतु, त्या काळी तसे नसावे.)
अशा परिस्थितीत, नंदा प्रधान हा:
१. इंग्लंडातच नव्हे, तर जर्मनीत (तेही भर हिटलरच्या काळात) नि आणखी कोठेकोठे नुसताच जाऊन आलेला नव्हे, तर अनेक वर्षे राहून आलेला आहे, नि
२. ज्या काळात ममवंमध्ये एखाद्या पुरुषाने 'परस्त्री'-कॅटेगरीत मोडणार्या एखाद्या स्त्रीशी नुसते बोलणे हेसुद्धा क्रांतिकारी (किंवा दोन्ही गालांना हात लावून उल्लेख करण्यासारखे) समजले जाऊ शकत असे, त्या काळात त्याने (युरोपातल्या!) अनेक (गोर्या!) स्त्रियांशी लग्ने केलेली आहेत (किंवा गेला बाजार त्यांच्याबरोबर नुसताच राहिलेला आहे), नि अनेक (पुन्हा: युरोपियन! पक्षी: गोर्या!) बायकांना त्याने अलौकिक अवस्थेत पाहिलेले आहे. (भले आजूबाजूची परिस्थिती काही का असेना!)
असा हा नंदा प्रधान (कदाचित एका प्रकारच्या सुप्त असूयेपोटी) तत्कालीन ममव (आणि त्यातही बहुतकरून पुरुषी) वाचकवर्गास आकर्षक वाटणार नाही? (कदाचित स्वतःच्या नकळतसुद्धा) असा वाचक हा स्वतःस नंदा प्रधानाच्या बुटात कल्पून स्वप्नरंजन करणार नाही?
त्यात पुन्हा, हा 'प्रधान'. बोले तो, हिंदू. परंतु, गडगंज श्रीमंत घरातला. त्यात याच्या बापाने मरतामरता ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला आहे. आणि आईने, (याच्या) बापाला टांग मारून, इस्लाम पत्करून, एका गडगंज श्रीमंत मुस्लिम घराण्यात दुसरा घरोबा केलेला आहे. (त्यानंतर मग बापाने शेवटपर्यंत 'नातिचरामि'च्या शपथेनिशी बाटलीबरोबर इमानेइतबारे संसार केलेला आहे.) सांगा, असे चित्र ममवंमध्ये साधारणतः किती टक्के घरांतून तेव्हा आढळत असे? 'बड्या लोकां'च्या (किंवा, (आपल्याहून) 'बडे लोक' मानले जाणार्यांच्या) जीवनशैलीबद्दल (नि त्यातही त्यांच्या 'आपल्याहून वेगळ्या' जीवनशैलीबद्दल) कोणाला (सुप्त का होईना, परंतु) आकर्षण असत नाही? (निदान तेव्हा तरी ते सर्रास असावे. आजकाल कदाचित कुत्रे विचारणार नाही.)
थोडक्यात, नंदा प्रधानात इतके काय विशेष आहे, असे तुम्ही विचारता. ते जे काही विशेष आहे, ते नंदा प्रधानात नसून, (पु.लं.चा टार्गेट ऑड्यन्स असलेल्या) टिपिकल ममव वाचकवर्गाच्या दृष्टिकोनात आहे. ('न्यूनगंडग्रस्त दृष्टिकोनात' म्हणणार होतो, परंतु, 'ममव' म्हटल्यावर 'न्यूनगंडग्रस्त' हे ओघानेच आले. असो.)
पु.लं.नी केवळ त्यावर capitalize केले, इतकेच. (ही पु.ल. किंवा त्यांचे साहित्य यांपैकी कशावरचीही टीका नसून, केवळ पु.लं.च्या वाचकवर्गाच्या मानसिकतेचे द्योतक आहे.)
(बाकी, लखू रिसबूड कोणे एके काळी वरवर वाचलेला असला, तरी, आता आठवत नाही. त्यामुळे, त्याबद्दल आपला पास. अंतू बरवा ठीकठीक आहे, हे ठीकच. असो.)
उत्कृष्ठ मार्मिक विश्लेषण !
नंदा प्रधान ही व्यक्तिरेखा का लोकप्रिय झाली असावी याचे तुम्ही जे मनोसामाजिक विश्लेषण केलेले आहे ते खरोखर अतिशय सखोल,मार्मिक, आणि तार्किक असेच आहे. हे नक्कीच पटण्यासारखे आहे.
आयडी नामाला जागून तुम्ही नवी बाजू दाखविली.
पुणें 38 चा उल्लेख करून कोथरूड हे आजचे म म व केंद्र आहे याकडे केलेला निर्देशही मनोरंजक वाटला. (कोथरुड मध्ये नातलग राहतो या पुण्यं पावन परिसराला फार थोडा explore करू शकलो याची खंत नेहमीच वाटते. तरी तेथील किमया का कोणते इथे ऐसी वर वाचलेले हॉटेल पाहण्याचे पण स्वप्न आहे बघू जमले तर कोथरूड ला पुन्हा जाणार एकदा तरी)
तसेच तुमच्या दिलेल्या वरील परिसरावरून
पुलं हे मुपूंचे (मुंबईपुणेकर) लाडके व्यक्तिमत्व होते
असे आपण म्हणू शकतो.
नंदा प्रधान इतका काय विशेष आहे समजत नाही ?
पुलं यांच्या व्यक्ती आणि वल्ली मधील नंदा प्रधान ही वल्ली का व्यक्ती अनेकांचे फार आवडते पात्र आहे. अनेकांना ते पुलं चे उत्कृष्ट पात्र वाटते एकूण लिस्ट मधले.
मला हे अनेकांकडून ऐकल्यावर मी पुन्हा पाटी कोरी करून हे नंदा प्रधान वाचले.
देवदासी shades असलेला , थोडा narcissistic उदास माणूस या पलीकडे काही हाती लागलं नाही.
याचं व्यक्तिमत्व बहुधा सिनेमा च्या नायका सारखं असल्याने पॉप्युलर असावा.
माझ्या मते पुलं ची सर्वोत्तम म्हणजे complex charecter रंगविण्याच्या अंगाने जमलेली वल्ली म्हणजे
लखू रिसबूड. आहाहा काय जबरदस्त व्यक्तिरेखा आहे. काय भारी वर्णन आहे त्याचा inferiority complex त्यातून आलेला पोकळ अहंगंड, त्यातूनच आलेली त्याची विखारी टीका करण्याची सवय, त्याचे ते judgement passing . त्याचे ते हायब्रीड असणे धड कशातच नसणे ,त्याच्या अतृप्त कामवासने चा निर्देश आणि शेवटी त्याचे कटू वास्तवाशी जुळवून घेणे !
काय खोलवर बुडी मारलेली आहे पुलं यांनी मी त्यांचा या वल्ली चा मोठा फॅन आहे.
बाकी सर्व वल्ली मध्ये काही फारसा दम नाही वाटला अंतू बरवा वगैरे ठीक आहे गटने पण एकदम जबरदस्त आहे. पण लखू रिसबूड पुलं च्या प्रतिभेचा उत्कृष्ठ आविष्कार आहे.