Skip to main content

महाराज आणि बाबा

महाराज आणि बाबा
ज्या ठिकाणी गर्दी जमलेली असते तिथे जाऊन डोकावण्याची खोड लहानपणापासून आहे. म्हणजे रस्त्यावरचे जादुगार, माकडवाले,(हे हल्ली दिसत नाहीत), डोंबार्यांचे खेळ, कडकलक्षुमि, नंदीबैलवाले, सालन्मिसरी सफेद मिसरी, पोपटज्योतिषी, घोरपडीचे तेल, शिलाजित अशा गोष्टींचे अति आकर्षण! काला जादू, मूठ मारणे, लिंबू फिरवणे, भानामती, बगाड, जिभेत त्रिशूळ खुपसून काढलेल्या मिरवणुका, निखार्यावरून पळणारे भक्त आणि अखेर प्लान्चेट! पैकी रस्त्यावरचे जादुगार माझे फेवरीट. लहानपणी शरदबाबूंची (चट्टोपाध्याय) पुस्तके वाचत असे. त्यातल्या श्रीकांत ह्या व्यक्तिमत्वाचा परिणाम असेल. तर ह्या जादूच्या प्रयोगावर एक लेख लिहायचा आहे.
बागेश्वर धाम सरकार!
ह्या भारत वर्षात काय काय आश्चर्ये दडली आहेत. कल्पना शक्तीला आव्हान देणारी. ह्या छतरपूर जिल्ह्यात अनेक महाराज आहेत उदाहरणार्थ बागेश्वर धाम सरकार! ह्यांचा दिव्य दरबार. ह्या तरुणाचे मूळ नाव आहे धीरेंद्र कृष्ण शास्त्री. उमद्या व्यक्तिमत्वाची जन्मजात देणगी, खणखणीत शुद्ध वाणी. मूळचे हे कथावाचक. म्हणजे रामायण (बहुतेक तुलसी रामायण) हे खुलवून खुलवून सांगणारे. आता रामायणाची मोहिनी काय वर्णावी. ही कथा म्हणजे मानव जातीचा अमोघ ठेवा.
पण महाराज प्रसिद्धीच्या झोतात आले, यू ट्यूबवर व्हायरल झाले ते दुसऱ्या कारणा मुळे. त्यांच्या “दिव्य दरबार” मुळे. न्या दरबारात “संसारतापामुळे बहु शिणलेले” लोक हजेरी लावतात. जगी सर्व सूखी असा कोण आहे? कुणाच्या घरात कटकटी आहेत, धंद्यात तोटाच तोटा, मुलीचे लग्न अडले आहे, मुलगा मंदबुद्धी, शिक्षणात गती नाही, बायको पळून गेली आहे, नोकरी मिळत नाहीये, कुणी कँसरग्रस्त ... बापरे बाप. कुणाचे काय तर कुणाचे काय. पण ज्या कुणी ह्या दुःखांची निर्मिति केली आहे त्याने त्यावर इलाजही योजले आहेत.
“जा वत्सा जा, फलाणा धीकाना महाराजांच्या चरणी मिलिंदायमान हो. तुजप्रती कल्याण असो.”
हे महाराज लोक पृथ्वीवर देवाचे प्रतिनिधी म्हणून काम करतात. त्यांना देवाने अमोघ शक्तींचे वरदान दिले आहे. काय आहेत त्या शक्ती?
१. भक्तांच्या समस्या भक्ताने तोंड उघडायच्या आधीच त्यांना अंतर्ज्ञानाने समजतात. समजतात म्हणजे काय ते एकदम रायटिंगमध्येच देतात. रे मूर्ख, तुझे नाव हे आहे, तुझ्या बापाचे सॉरि पित्याचे नाव हे आहे. तुझी समस्या अमुक अमुक आहे. जा देवाचे नामस्मरण कर. वर्ष सहामासी तुझ्या कटकटी संपतील. आशीर्वाद आहे. हे सगळे ते पी ए सिस्टीमवर वाचून दाखवतात. ह्या कागदाला “पर्ची” असे संबोधले जाते. (म्हणून पर्चीवाले बाबा). आपला डॉक्टर पण आपल्याला तपासून आपल्याला विचारतो काय प्रॉब्लेम्स आहेत? आपण त्याला आपले डायग्नॉसीस सांगतो. तो ते इंग्रजीत लिहितो आणि आपल्याला “पर्ची” देतो. त्याला आपण प्रिस्क्रिप्शन म्हणतो जी फक्त दुकानदार त्यांच्या दिव्य दृष्टीने वाचू शकतात. महाराजांचे टीकाकार हेच म्हणतात कि त्यांचे हस्ताक्षर तेच वाचू जाणोत. असो. भक्त गदगदून माना डोलावतात. पाया पडतात. लाख एक भक्त एकमुखाने दोनी हात वर करून जय जय कार करतात, “@#$ की जय!” आता पुढच्या भक्ताची पाळी.
“देखो, पीछे कोई युवा टी-शर्ट और जीन्स पहनकर खडा है. बुलाव उसको. उसकी पर्ची हमने लिखी है. नाम है...”
असा दरबार रंगतो.
अनेक बाबा आहेत. त्यांचा धावता परिचय, उल्लेख केला नाही तर त्यांच्यावर अन्याय होईल.
पंडोखर महाराज. भक्तांच्या मते हे बागेश्वर महाराजांपेक्षा जास्त पॉवरफुल आहेत. बागेश्वर महाराजांच्या दरबारात गुण आला नाही असे लोक येथे पोचतात. येथे गुण नाही आला तर? कुट्टी महाराज! महाराजांची कोई कमी नाही. एक धुंडो, हजार मिल जायेंगे.
एक बेटी रडत रडत आपली समस्या सांगते.
“बेटी, रो नाही. तू दरबारमे आई हो. यहा रोते नाही हसते है. अच्छा बोलो शमश्या क्या है?”
४५-५० वर्षाची बेटी आसू पोछकर आपली “शमश्या” सांगते.
“बेटी, सवेरे नाश्तेमे क्या खाया?”
“सामोसा, गुरुजी.”
“साथमे चटणी?”
“वो ही. लाल चटणी.”
“येही तेरे शमश्याका जड है. कलसे हरी चटणीबरोबर खाव.”
“नेक्स्ट?”
महाराज आणि बाबा ह्यांचे आणि राजकारणी लोक ह्याचे अतूट नाते आहे. दोघानाही एकमेकांची गरज आहे. ह्या बागेश्वर सरकारच्या चरणी मध्य प्रदेशातील बडे बडे नेते मंडळी माथा टेकवून गेली. काँग्रेस तसेच बीजेपी पण. एव्हढेच नव्हे तर आपले “हे” पण तिकडे जाऊन दर्शन घेऊन आणि देऊन आले.
त्याच्यामुळे काय कि कुणास ठाव प्रेरित होऊन महाराजांनी नागपूरला कथा वाचनाचा कार्यक्रम केला. छान. मला वाटतंय सात किंवा नौ दिवस. (हा थोडा वादाचा विषय आहे. तूर्तास आपण तो बाजूला ठेऊ या.)
मग महाराजांनी दोन दिवसांच्या दिव्य दरबाराची घोषणा केली. इथच मुसळ केरात गेले. श्याम मानव –नाम तो सुनाही होगा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अग्रणी. त्यांनी ह्यावर आक्षेप घेतला. तक्रार नोदवण्यात आली. कार्यक्रम रद्द झाला. मानव ह्यांचा कथावाचनावर आक्षेप नव्हता तर दिव्य दरबारावर होता.
दिव्य दरबारामध्ये महाराज “भूतप्रेत समंधादि रोगव्याधी समस्तही” वर इलाज करतात. मानव ह्यांच्या मते हा कायद्याचा भंग आहे. त्यांनी महाराजांनी आपले प्रयोग कंट्रोल्ड इंव्हायरॉनमेंटमधे करून दाखवावेत, दहा स्वयंसेवकांची माहिती महाराजांनी सांगावी. जर ते ह्या परिक्षेत पास झाले तर त्यांना तीस लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल आणि -हे महत्वाचे आहे- मानव आपला पराभव मान्य करून महाराजांच्या चरणी “घालीन लोटांगण. वंदिन चरण, भावे ओवाळीन रूप तुझे” करतील. बागेश्वर महाराजांनी हा चॅलेंज स्वीकारला नाही. म्हणजे नाही असे नाही. उलट ते म्हणाले कि तुम्ही माझ्या दरबारात या. तेथेच दुध का दुध पाणी का पाणी होईल.
म्हणून मी त्या रस्त्यावरच्या जादुगाराला मानतो. आपल्या हंडीबागाची जीभ कापून रक्ताच्या ओघळात त्याला झोपवून त्याच्यावर जादूची काळी चादर टाकतो. बघ्यांनी गर्दी केली आहे. सर्कल थोडे मोठे करण्यासाठी जादुगार हातात एका अजगराची शेपूट धरून डमरू वाजवत गर्दीवरून फिरवतो.
“बच्चे लोग, एक कदम पीछे.”
पाठी नाही गेलात तर तो अजगर चुम्मा घेईल. भीतीने सर्वे मागे सरकतात.
“बच्चे लोग, एक बार जोरदार तालीया हो जाय. जो तालीया नही बजायेगा उसकी मा दो दिनमी मर जायेगी.”
बच्चे लोग टाळ्या वाजवतात!
त्या वक्ताला मी पण थोडा मोठा बच्चू होतो. मी काय करतो दोनी हात मागे घेऊन इकडे तिकडे बघून एक टाळी टाकतो. एकच हा. उगाच कशाला रिस्क घ्या.
“ए साले, सो गया क्या रे.”
“नही जादुगार, सोयेगा कैसे? तूने मेरी जीभ काटी. वो दर्द...”
“अबे तेरी तो, जीभी ही काटी ना. वो तो नाही काटा ना.”
पब्लिक खदखदून हसतेय. मी नाही हसलो. कारण त्या वयात तो जोक समजला नव्हता. आता हसतो.
“इधर देख, अबी यहासे गाडी गुजरी. नंबर क्या था?
“६६६६”
“अबे ओ छक्के. तेरा बाप छ... तेरी मा छ...”
“जादुगार तू भी... जैसा सवाल वैसे जवाब.”
“फिरसे एक बार बोल गाडीका नंबर क्या?”
“८५१६.”
पब्लिक मान गयी.
शेवटी जादूगार एक एक रुपयाला जादूचे ताईत विकतो. काही नाही त्याला फक्त दर गुरवारी उदबत्ती “दाखवाय ची.” मी पण खाऊच्या पैशातून एक ताईत विकत घेतला. त्या वर्षी वार्षिक परिक्षेत माझा सातवा नंबर आला. आई बाबा आश्चर्यचकित!
“बेंबट्या लेका काय कॉपी बिपी केलीस कि काय?”
तो ताईत अजून मी जपून ठेवला आहे. माझा लकी चार्म.
तर असे हे रस्त्यावर खुले आम जादू दाखवणारे जादूगार. असो.
नागपूरच्या पोलीस कमिशनरने मानव ह्यांच्या तक्रारीची दाखल घेतली. त्यांनी खुद्द स्वतः ह्या केसचा अभ्यास केला आणि ते निर्णयाप्रत आले की, श्री बागेश्वर महाराजांनी कुठल्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाहीये. अशी क्लीन चीट दिली. यावर श्याम मानव ह्यांची काय प्रतिक्रिया झाली ते त्यांनी एका इंटरव्हूमाशे सांगितले आहे. त्यांच्या मते त्या कामिशनाराला कायदा समाजाला नाही. श्याम मानव म्हणाले कि त्या कायद्याचे ते स्वतः एक शिल्पकार आहेत. ते पोलिसांना ह्या कायद्यावर पोलीस अकादेमी मध्ये व्याख्यान देतात. त्यांना कायदा समजतो कि पोलीस कामिशनरला?
माझ्या मते श्याम मानव यांचीच चूक आहे. कशी ते पहा.
महाराज एक गोष्ट कटाक्षाने सांगतात. कि मी माझ्या मनाने काही लिहित नाही. बालाजी माझ्या हातून लिहून घेतात. इथे बालाजी म्हणजे जय बजरंगबली,
म्हणजे याचा अर्थ असा झाला कि खटला करायचा असेल तर त्याच्यावर करा.
बोला आहे कुणाची हिंमत? आता जरा दिव्य दरबार बद्दल. इथे बहुतांश स्त्रिया हजेरी लावतात. अशा उन्मन होऊन देहभान विसरून बेदुंध नाचणार्या स्त्रिया बघितल्या कि काळजाचे पाणी पाणी होते. बिचाऱ्या मानसिक रोगाने पछाडलेल्या यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे ना कि वैदिक उपचारांची. खर तर या प्रकारांचे चित्रीकरण करण्यास बंदी असायला पाहिजे.
मग बाबा त्यांच्या अदृश्य सेनापतीला सांगतात, “मारो उसको.” मग ती स्त्री गगनभेदी किंकाळी फोडते. अजून नाही वर्णन करवत.
मला माहित आहे कि काही लोक म्हणणार आहेत कि तुम्ही बरे हिंदुन्वरच टीका करता. असे नाही. मुस्लीम, ख्रिश्चन धर्मातही असे प्रकार सर्रास चालतात. त्याच्याही चित्रफिती तुम्हाला पाहायला मिळतील. मला खात्रीने ठिकाण आठवत नाही पण एका दर्ग्यात असे मनोरुग्ण येतात. मौलवी झाडपूस करतात. त्या दर्ग्याधीपतीला एका सेवाभावी संस्थेने त्यांच्याशी संपर्क साधून त्या जागेतच एक चिकित्सालय सुरु करण्याची परवानगी मिळवली. पण अशी उदाहरणे विरळाच. कुणाला ह्या स्थळाचे नाव माहित असेल तर प्लीज इथे लिहा.
माझा नेट प्रवास चालूच होता. त्यातून मग मेंटॅलिस्ट ह्या प्रकारच्या जादूगारांचे प्रयोग पाहिले. त्या मध्ये सुहानी शहा ही तरुणी प्रमुख होती. अजूनही आहेत. हे जादुगार जे प्रयोग करतात त्यापुढे पर्चीवाले बाबा म्हणजे कीस झाड कि पत्ती. हे तुमच्या मनात काय विचार चालले आहेत ते अचूक ओळखतात. तुमची जन्मतारीख सांगू शकतात. पण ते एक गोष्ट निक्षून सांगतात कि ही एक कला आहे. ज्यांना ह्यात रुची आहे ते अभ्यास करून ही कला साध्य करू शकतात. ही काही दैवी किंवा अतिंद्रिय शक्ति नाही.
आता बाबांनी सनातन धर्माची धुरा खांद्यावर घेतली आहे. अखंड भारत, हिंदू राष्ट्र, घर वापसी इत्यादी शब्द ते चपखलपणे वापरतात. तुम्हाला हि बातमी माहित असेलच कि जोशी मठ हळू हळू खचत चालले आहे. हे खचणे थांबवा अशी कळकळीची विनंती त्या ठिकाणच्या जगद्गुरू शंकराचार्यांनी महाराजांना केली आहे. निसर्ग वगैरे असे थातूर मातुर कारण सांगून महाराजांनी हात वर केले. आज एव्हढे बस. अजून बरेच लिहायचे आहे.

Node read time
7 minutes
7 minutes

चिमणराव Sun, 22/06/2025 - 15:57

नाशिक त्र्यंबकेश्वरजवळच्या फरशीवाले बाबांचेही( देवबाप्पा) असेच आहे. आयुर्वेदिक औषधे देतो. डॉ लोकांनी त्यावर केस ठोकली .तो पुरून उरला. पिढिजात धंधा करतो म्हणाला. पण
दोन डॉक्टर ठेवले आहेत. पर्ची हाच देतो पण त्यावर डॉक्टरांच्या सह्या असतात. जडीबुटी देणे आदिवासींचा हक्क आहे.

एका पत्रकार आणि डॉ ने मुलाखत घेतली. "तुम्ही शिकलेले डॉ नाही तरी औषधे कशी काय देता? कुणाचे वाईट झाले तर? औषधे कुठे लिहून ठेवली आहेत का?"
" आम्ही आदिवासी. आम्ही तुमच्या डॉक्टरांकडे कधी येत नव्हतो.आमच्या बापजाद्यांनी आम्हाला जडीबुटींची माहिती दिली तीच वापरतो. आणि तुम्ही आम्हाला शिकू दिले काय? तर लिहिणार कुठून?"
मुलाखतवाले पळाले.

Rajesh188 Mon, 23/06/2025 - 12:23

Maulvi, आणि father काय काय त्यांच्या शिष्य ना सांगतात त्याचा एकदा अनुभव घ्या coma मध्ये जाल तुम्ही आणि अनिस पण coma मध्ये जाईल.

तुलनेने हिंदू बाबा खूप उच्च मूल्य पाळतात हे माहित पडेल.

अनिस आणि डावे मुस्लिम आणि chirst लोकांच्या अंध श्रद्धा नं बद्दल एक शब्ध बोलत नाहीत अजून एक धर्म राहिलाच आहे.
पण हिंदू ना चं फक्त डावे ज्ञान देण्यात पुढे असतात.
त्या मुळे ह्यांना कोणी गंभीर पणे घेत नाही.

कॉमेडी म्हणून चं ह्यांचे divy ज्ञान ऐकून सोडून देतात.