Skip to main content

'लाईव्ह एड'चं भारूड

अललित

 

इथिओपियामध्ये १९८३ - ८५ ही तीन वर्षं भीषण दुष्काळ पडला होता. तिथल्या दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी निधी उभारण्यासाठी बॉब गेलडॉफ आणि मिज उर या दोन किंचित पॉपस्टार्सनी १३ जुलै १९८५ या दिवशी दोन ठिकाणी, म्हणजे लंडन आणि फिलाडेल्फिया इथे मोठ्या कॉन्सर्ट आयोजित केल्या. लंडनमध्ये सुमारे ७०,००० आणि फिलाडेल्फियात सुमारे ८०,००० लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

 

हा कार्यक्रम टीव्हीवर सुमारे दीडशे देशांमध्ये लाईव्ह दाखवला गेला. सुमारे दीड अब्ज लोकांनी तो टीव्हीवर बघितला, असा अंदाज आहे.

 

या कार्यक्रमाची संकल्पना ते सिद्धी(!) हा प्रवास कमालीचा चित्तचक्षुचमत्कारिक आहे. जुलै महिन्यात या कार्यक्रमाला चाळीस वर्षं झाली त्या निमित्तानं हा लेख. 

 

ऐशीच्या दशकाच्या सुरुवातीला इथिओपियाच्या उत्तर भागात तीन वर्षं भयंकर दुष्काळ पडला होता. ऑक्टोबर १९८४मध्ये मायकेल बर्क यांनी या दुष्काळाविषयी एक रिपोर्ट बीबीसीवर प्रसारित केला. त्यात त्यांनी दुष्काळाचं वर्णन biblical famine असं केलं होतं. त्यात इथिओपियाची जी दृश्यं दाखवली तीही बरीच भयानक होती. हा रिपोर्ट इतका परिणामकारक होता की जगातल्या चारशेहून अधिक टीव्ही स्टेशनांनी हा रिपोर्ट पुनःप्रसारित केला. 

 

त्याच वर्षी EECनं (युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी) साडेसव्वीस कोटी पाऊंड खर्च करून वीस लाख टन भाजीपाला आणि फळं नष्ट केली. एकीकडे युरोपमध्ये अन्नपुरवठा, किमान नाशिवंत अन्नाचा, गरजेपेक्षा खूप जास्त होता. इतका की तो खराब होईल म्हणून खराब होण्यापूर्वी नष्ट करून टाकावा लागत होता आणि दुसरीकडे आफ्रिकेमधल्या दुष्काळग्रस्त भागांत सामान्य जनतेची अन्नान्नदशा होती.

 

हा कार्यक्रम बीबीसीवर बघून प्रेक्षकांना मोठा धक्का बसला. त्यांनी 'सेव्ह द चिल्ड्रन' अशासारख्या संस्थांना आपापल्या कुवतीनुसार मदत करायला सुरुवात केली. 

 

हे प्रसारण बघणाऱ्या हजारो लोकांमध्ये एक होता बॉब गेलडॉफ. बुमटाऊन रॅट्स नावाच्या एका छोट्या आयरिश पॉप बँडमध्ये तो गायक होता.

 

बॉब गेलडॉफ
बॉब गेलडॉफ

१९८०चं दशक म्हणजे अमेरिकेत रेगनबुवा आणि ब्रिटनमध्ये थॅचरबाई यांचा काळ. या काळात थॅचर यांनी जुनी व्यवस्था बदलून नवमुक्त अर्थव्यवस्था स्वीकारली होती. या व्यवस्थेत खाजगीकरणावर भर होता. त्यावेळी एकीकडे संप, मोर्चे, खाणकामगारांचे संप आणि निदर्शनं, बेरोजगारी, आणि असंतुष्ट लोकांना व्यवस्थेनं दिलेली हिंसक वागणूक असं एक वास्तव होतं. दुसरीकडे श्रीमंत लोक आणखी श्रीमंत होत आहेत, हेदेखील वास्तवच होतं. सगळे पॉप आणि रॉक स्टार या श्रीमंतीच्या जगातले होते. पॉप स्टार्सची अतिरेकी चंगळवादी लाईफस्टाईल होती – लांबलचक गाड्या, लांब केस, ड्रग्स, सेक्स – वगैरे.

 

प्रसारणात बघितलेले फोटो आणि रिपोर्ट बघून, आपण काहीतरी करायला पाहिजे असा विचार करून बॉब गेलडॉफनं आपला मित्र मिज उर याला फोन केला. मिज उर हासुद्धा पॉप संगीतामधलाच, अल्ट्राव्हॉक्स या बँडमधला गायक. या दोघांना दुष्काळग्रस्तांसाठी काही करायचं होतं. त्यांनी चाळीसेक प्रसिद्ध कलाकारांबरोबर एक तात्पुरता नवा सुपरग्रूप काढला, बँड एड. त्या ग्रूपनं Do they know its Christmas अशी एक रेकॉर्ड डिसेंबर महिन्यात प्रकाशित केली. 

 

ब्रिटनमध्ये हा विषय चर्चेत असल्यामुळे या रेकॉर्डचा खप प्रचंड प्रमाणात झाला. पाच आठवडे ही रेकॉर्ड युके सिंगल्स चार्टसमध्ये पहिल्या नंबरावर राहिली. जगभरात सुमारे वीस लाख रेकॉर्डस् खपल्या आणि दोन कोटी चाळीस लाख यूएस डॉलर एवढा भक्कम निधी जमा झाला. 

 

कलाकारांच्या या ग्रुपनं एक ट्रस्ट स्थापन केला होता. सगळा निधी त्या ट्रस्टमध्ये जमा झाला. जमा झालेल्या निधीतून त्या ट्रस्टनं मदतसामुग्री (दीडशे टन हाय एनर्जी बिस्किटं, १३३५ टन मिल्क पावडर, ५६० टन खाद्य तेल आणि १००० टन धान्य) इथिओपियाकडे रवाना केली. पाठवलेल्या मदतसामुग्रीचा विनियोग नक्की दुष्काळग्रस्तांना होणार का, अशी शंका व्यक्त होऊ लागली. मदतीचं सामान दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहोचत आहे का हे बघण्यासाठी बॉबनं स्वतः तिथे जाऊन खात्री करून घ्यावी यासाठी त्याच्यावर दबाव येऊ लागला.

 

या पाठोपाठ तिकडे अमेरिकेतही याच कार्याकरिता निधी जमवण्यासाठी हॅरी बेलाफॉन्टेनं अशीच एक रेकॉर्ड काढण्यासाठी पुढाकार घेतला. अमेरिकेतले पॉप-रॉक संगीतातले अनेक सुपरस्टार यात सहभागी झाले. या ग्रुपनं USA for Africa असं नाव धारण केलं. मायकेल जॅक्सन आणि लायनेल रिची यांनी मिळून एक गाणं लिहिलं. ७ मार्च १९८५ या दिवशी We are the World ही रेकॉर्ड बाजारात आणली. त्या रेकॉर्डच्या सुमारे दोन कोटी प्रती खपल्या. रेकॉर्ड आणि तिच्याबरोबर म्युझिक व्हिडिओ आणि इतर मर्चन्डाइझ विकून सुमारे आठ कोटी डॉलर एवढा निधी जमा झाला.

 

मार्च महिन्यातच बॉब गेलडॉफ इथिओपिया गेला. तिथल्या दुष्काळग्रस्तांच्या कॅम्पमध्ये जाऊन तिथली विदारक दृश्यं स्वतः बघून आला.

 

तिथलं एक भयंकर वास्तव बॉब आणि इतर ट्रस्टींना कळलं. दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवलेलं सामान – धान्य, औषधं आणि इतर सामुग्री – तिथल्या बंदरावरच पडून राहणार आहे. कारण इथिओपियामधली ट्रान्सपोर्ट कार्टेल सामुग्री कॅम्पपर्यंत पोहोचवण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करत होती. आता प्रश्न उभा राहिला की एक तर त्या ट्रान्सपोर्ट कार्टेलची मागणी पुरी करायची किंवा त्याला पर्यायी व्यवस्था निर्माण करायची. कुठलाही पर्याय निवडला तरी त्यासाठी प्रचंड निधी लागणार होता. आणि तो त्यांच्या ट्रस्टकडे नव्हता.

 

इथिओपियाचा हुकूमशहा मेंगित्सुु हाइले मरियम याला तिथे इथिओपियात, आणि परत आल्यावर मार्गारेट थॅचर यांनाही बॉब भेटला. परंतु या दोन राष्ट्रप्रमुखांना भेटून एकंदरीत काही उपयोग झाला नाही. 

 

मग बॉब गेलडॉफच्या डोक्यात एक अजून तिरपागडी कल्पना आली आणि ती त्याने ट्रस्टींसमोर जाहीर करून टाकली.

"निधी जमविण्यासाठी आपण एक मेगा कॉन्सर्ट करणार आहोत. जगातल्या सर्व मोठ्या कलाकारांना घेऊन, एकाच वेळी दोन ठिकाणी लंडन आणि न्यूयॉर्क, आणि त्याच सगळीकडे लाईव्ह ट्रान्समिशन करणार आहोत!"

 

ही कल्पना अत्यंत अव्यवहार्य आणि हास्यास्पद होती. 

 

नॉर्मल विचार करणाऱ्या कुणीही असली कल्पना भंपक, म्हणून उडवून लावली असती. परंतु बॉब गेलडॉफ दुसऱ्याच कॅटेगरीमधला माणूस होता (कुठला नॉर्मल विचार करणारा मनुष्य इथिओपियातल्या दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून रेकॉर्ड काढण्याचे पालथे धंदे करणार होता! )

 

या अचाट संकल्पनेत अनंत अडचणी होत्या. 

 

एक म्हणजे त्याला एकाच वेळी लंडन आणि न्यूयॉर्कमध्ये कार्यक्रम करायचा होता. दुसरं म्हणजे या चालणाऱ्या कॉन्सर्टचं ट्रान्स-अटलांटिक लाईव्ह ट्रान्समिशन हवं होतं. आज ही सहजसाध्य वाटणारी गोष्ट असली तरी १९८०च्या दशकात हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत होतं. अगदी ऑलिंपिकही जगभर लाईव्ह दाखवणं शक्य होत नसे तेव्हा. आणि तिसरी मोठी अडचण म्हणजे म्हणजे बॉबला या कार्यक्रमात रॉक-पॉपमधले सगळे मोठे कलाकार हवे होते. वर या मोठ्या कलाकारांनी कार्यक्रमस्थळी स्वखर्चानं येऊन मानधन म्हणून कपर्दिकही न घेता कार्यक्रम सादर करावा, अशी त्याची अपेक्षा होती.

 

दिवसेंदिवस याच्या कल्पनेचे पतंग जोरात उडत होते.

 

हा इव्हेन्ट त्याला जागतिक करायचा होता. त्याची टॅगलाईन ग्लोबल ज्यूकबॉक्स अशी झाली होती. लंडनमधला कार्यक्रम दुपारी बाराला सुरू करायचा, आणि अमेरिकेतला त्यानंतर पाच तासांनी. या दोन्ही कॉन्सर्ट्सचं जगभर उपग्रहांमधून प्रक्षेपण होणार… वगैरे 

 

असा मेगा कार्यक्रम करायचा असेल तर ब्रिटनमधला सर्वात मोठा इव्हेंट प्रमोटर हार्वी गोल्डस्मिथला गाठणं आवश्यक होतं. आणि अमेरिकेत कार्यक्रम करण्यासाठी माईक मिचेल. मिचेलनं नुकतंच लॉस अँजेलिस ऑलिंपिकचं प्रसारण केलं होतं. हार्वी आणि माईक मिचेल हे दोघेही या संकल्पनेविषयी साशंक होते; पण बॉब गेलडॉफनं अखेर त्यांना पटवलं. 

 

कार्यक्रमाची तारीख ठरली होती १३ जुलै १९८५.

 

कार्यक्रमापूर्वी केवळ दोन महिने उरलेले होते, तेव्हा ना फारसे कलाकार ठरले होते, ना अमेरिकेतली कार्यक्रमाची जागा ठरली होती, ना कुठलं टीव्ही स्टेशन हा कार्यक्रम करायला तयार होतं.

 

एवढ्या सगळ्या अडचणी असूनही संयोजक (म्हणजे खरं तर, वन मॅन आर्मी बॉब गेलडॉफ) मागे हटायला तयार नव्हते. 

 

ह्या  मोठ्या कार्यक्रमाचं टीव्हीवर लाईव्ह प्रसारण करण्याची क्षमता फक्त बीबीसीकडेच होती. पण बीबीसी कुठल्याही कार्यक्रमाचं दोन तासांपेक्षा जास्त प्रसारण करत नसे. कोण-कोण कलाकार या कार्यक्रमात सहभागी आहेत याची माहिती बीबीसीला दिली तेव्हा बीबीसीच्या अधिकाऱ्यांनी ती माहिती हसण्यावारी नेली. (तशीही ही माहिती बीबीसीला दिली तेव्हा या सगळ्या थापाच होत्या.) परंतु मायकेल बर्कचा रिपोर्ट, पाठोपाठ Do they know it's Christmas आणि We are the World या रेकॉर्डना मिळालेली अमाप लोकप्रियता म्हणा, यात भर म्हणून बॉब गेलडॉफची थापेबाजी, आणि हार्वी गोल्डस्मिथची पटवून देण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टींमुळे बीबीसी नावाची प्रचंड मोठी, पण पारंपरिक सरकारी संस्था अखेर या कार्यक्रमाचं लाईव्ह प्रसारण करायला तयार झाली. तोपर्यंत मे महिना अर्धा संपला होता. आणि अजून बाकीच्या कशाचाही, काहीही पत्ता नव्हता. 

 

कार्यक्रमासाठी फक्त एक महिना राहिला होता. तेव्हासुद्धा कार्यक्रमाची जागा आणि बीबीसी प्रसारण करणार, यांव्यतिरिक्त इतर काहीही ठरलं नव्हतं. 

 

अशात बॉब गेलडॉफ आणि हार्वी गोल्डस्मिथ यांनी लंडनमध्ये एक पत्रकार परिषद घेतली. त्यात अनेक लोकप्रिय आणि मोठे कलाकार सहभागी होणार आहेत, असं त्यांच्या प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करून ठोकून दिलं. वस्तुस्थिती अशी होती की यांपैकी बहुतांश कलाकारांनी होकार देणं लांबच राहिलं, या कलाकारांशी प्राथमिक बोलणंही झालं नव्हतं. एव्हाना मूळ विषय आणि कार्यक्रमाची जाहिरात आणि हवा इतकी झाली होती की या कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाल्यावर नकार देण्यामुळे कुप्रसिद्धी होईल अशी शक्यता होती. 

 

बॉब गेलडॉफनं अतिशय कौशल्यानं, 'महत्त्वाचं काम आहे; ग्लोबल ज्यूकबॉक्स आहे; बाकी सगळे मोठे कलाकार येत आहेत', असा थापावजा दबाव टाकून बहुतांश मोठ्या कलाकारांना लंडन किंवा फिलाडेल्फियामध्ये येण्यासाठी पटवलं. त्याला वाटलं की जगातला सगळ्यात लोकप्रिय ग्रूप, म्हणजे बीटल्स, त्यांच्या पॉल मकार्टनीला, म्हणजे त्याच्या भाषेत 'पॉप रॉयल्टी'ला कार्यक्रमात सहभागी करता आलं, तर कार्यक्रम वेगळ्या उंचीवर नेता येईल. अडचण अशी होती की पॉल मकार्टनीनं जॉन लेननचा खून झाल्यानंतर (१९८०) जाहीर कार्यक्रमात सहभागी होणं टाळलं होतं. पण या कार्यक्रमाची हवा इतकी झाली होती की पॉल मकार्टनीनं तात्काळ होकार दिला. हे सगळे मोठे कलाकार 'महत्त्वाचं कार्य' असल्यानं स्वतःच्या खर्चानं तिथे येऊन विनाबिदागी कला सादर करणार होते.

 

ए‌वढं ग्लॅमर कमी म्हणून का काय, तर रॉयल जोडप्यानं, प्रिन्स चार्ल्स आणि डायना यांनी, कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोडा वेळ येण्याचंही मान्य केलं.

 

मायकेल बर्कचा ऑक्टोबर १९८४मधला रिपोर्ट, पाठोपाठ निधी गोळा करण्यासाठी आधी ब्रिटनमधल्या कलाकारांनी काढलेली Do they know it's Christmas ही रेकॉर्ड, पाठोपाठ अमेरिकेतल्या कलाकारांनी काढलेली We are the World ही रेकॉर्ड, या रेकॉर्डना लोकांकडून मिळालेला प्रचंड प्रतिसाद, त्यानंतर दुष्काळग्रस्त लोकांसाठी पाठवलेली मदत त्यांच्यापर्यंत पोचवण्यात आलेल्या अडचणी, मग या अडचणी सोडवण्यासाठी आणि निधी जमा करण्यासाठी बॉब गेलडॉफनं आयोजित केलेला हा महाकार्यक्रम, हे सगळे विषय आठ-दहा महिने रोज वर्तमानपत्रं आणि टीव्हीवर सातत्यानं चर्चेत होते. त्यामुळे फक्त ब्रिटन आणि अमेरिकेतच नाही तर युरोपमधल्या इतर देशांमध्येही या कार्यक्रमाविषयी प्रचंड उत्सुकता आणि उत्साह होता. या कार्यक्रमाला नैतिक पाठिंबा म्हणून अनेक देशांमध्ये, अगदी पूर्व युरोपमधल्या कम्युनिस्ट देशांमध्येही काही पॉप-रॉक ग्रुपांनी छोटे-छोटे कार्यक्रम केले.

 

सोळा तासांमध्ये सुमारे सत्तर कलाकार आपापले २० मिनिटांचे सेट सादर करणार होते. वेळ वाया जाऊ नये म्हणून तीन भागांमध्ये विभागलेलं एक फिरतं स्टेज उभं करण्यात आलं होतं.

 

आणि अखेर १३ जुलैचा दिवस उजाडला.

 

वेम्बली स्टेडियम, लंडन इथे बारा वाजता कार्यक्रम सुरू होणार होता. दहा वाजता दारं उघडल्यावर अर्ध्या तासातच ७०,००० लोकांनी पूर्ण स्टेडियम भरून गेलं. वातावरण उत्सवी होतं.

 

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या कलाकारांची संख्या खूप असल्यामुळे बऱ्याच कलाकारांना कार्यक्रमस्थळी हेलिकॉप्टरनं आणायचं ठरलं होतं. त्यासाठी लंडनमधल्या काही धनाढ्य लोकांनी आपली हेलिकॉप्टरं विनामोबदला उपलब्ध करून दिली होती. कार्यक्रमस्थळाजवळ एक क्रिकेटमैदान होतं. हेलिकॉप्टरं उतरवण्यासाठी तीच जागा सोयीची होती. (त्यावेळी तिथे मॅचही सुरू होती. हेलिकॉप्टर आलं की अंपायर बेल्स काढून मॅच थांबवत होता. हेलिकॉप्टर उडाल्यावर परत मॅच सुरू; असा गमतीशीर प्रकार सुरू होता.) तक्रार कुणाचीच नव्हती. काम पुण्याचं  होतं. सर्वांनाच हातभार लावायचा होता. 

 

लंडनमधल्या बहुतांश घरांमध्ये टीव्हीवर हाच कार्यक्रम लावला होता. कुठल्याही रस्त्यावर हीच कॉन्सर्ट ऐकू येत होती, असं बऱ्याच लोकांनी नोंदवून ठेवलं आहे.

 

बारा वाजता प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना यांचं आगमन झालं. 'स्टेटस को' या बँडच्या 'रॉकिंग ऑल ओव्हर द वर्ल्ड' या गाण्यानं Live Aid या कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्टेडियममधले सगळे लोक नाचायला लागले. (यूट्यूबचा दुवा.)

 

बऱ्याच बँकांनी निधी जमा करण्यासाठी स्पेशल काउंटर उघडले होते. लोकं चेकद्वारेही पैसे पाठवू शकत होते. मदतनिधी जमा करण्यासाठी बीबीसीनं तीनशे फोनलाईन सुरू ठेवल्या होत्या. कार्यक्रम सुरू झाल्यावर काही मिनिटांतच तेवीस-चोवीस हजार पौंड जमा झाले.

 

परंतु ज्याकरता हा सगळा खेळ मांडला होता, त्यासाठी हा वेग पुरेसा नव्हता. 

 

फिल कॉलिन्सनं वेम्बली स्टेडियममध्ये स्वतःच्या गाण्यांचा सेट सादर केला. लगेच तो हेलिकॉप्टरनं विमानतळावर गेला आणि तिथून काँकॉर्ड पकडून फिलाडेल्फियाला रवाना झाला. एकाच दिवशी त्यानं लंडन आणि तिथून साडेपाच-सहा हजार किलोमीटर अंतरावर असलेल्या फिलाडेल्फियाच्या स्टेजवरही आपला कार्यक्रम सादर केला. 

 

फिलाडेल्फियात दुपारचे बारा वाजल्यावर तिथे ब्रायन ॲडम्सच्या गाण्यानं तिकडचाही कार्यक्रम सुरू झाला. 

 

१९८५ म्हणजे अमेरिका आणि रशियामधल्या शीतयुद्धाचा तो काळ. असं असूनही या निधीसंकलनाला पाठिंबा म्हणून मॉस्कोमध्ये रशियातल्या रॉक ग्रूपनी कार्यक्रम केला आणि तोही या दोन्ही स्टेडियममध्ये दाखवला गेला. 

 

सामान्य नागरिकच देणग्या देत असल्यानं निधी संकलनाचा वेग कमी होता, असं बॉब गेलडॉफला वाटतं होतं. कार्यक्रम सुरू होऊन सहा तास झाले तरी फक्त पंधरा लाख पौंडाच्या आसपासच निधी जमा झाला होता. 

 

फ्रेडी मर्क्युरी
फ्रेडी मर्क्युरी

लंडनमध्ये संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी क्वीन हा रॉक ग्रूप स्टेजवर आला. क्वीन ग्रूप सत्तरच्या दशकात खूप लोकप्रिय होता, पण ऐशीच्या दशकात तसा उतरणीला लागला होता. जमेची बाजू म्हणजे हा ग्रुप नुकताच एका मोठ्या टूरवरून आला होता. या कार्यक्रमासाठी त्यांनी व्यवस्थित तयारी केली होती. अजून एक म्हणजे त्यांचा मुख्य गायक फ्रेडी मरक्युरी (फारोख बलसारा) हा स्टेजवरून प्रेक्षक समुदायाशी कनेक्ट होऊन त्यांना खेळवणारा म्हणून प्रसिद्ध होता. त्यांनी त्यांना दिलेल्या वीस मिनिटांमध्ये स्वतःची सगळ्यांत लोकप्रिय गाणी ठासून भरली होती. फ्रेडीनं त्याच्या खास पद्धतीनं लोकांना या गाण्यांमध्ये सहभागी करून घेतलं आणि काही गाण्यांत पूर्ण स्टेडियम नाचायला, गायला लागलं ( हा परफॉर्मन्स अजूनही जगातील सर्वोत्तम लाईव्ह परफॉर्मन्स म्हणून गणला जातो. यूट्यूबवर उपलब्ध आहे. रॉकमध्ये रस नसेल तरीही जरूर बघावा. (यूट्यूबचा दुवा

 

क्वीनचा सेट झाल्यावर बॉबनं बीबीसी रेडिओचा माईक हातात घेतला आणि त्यानं त्याच्या थेट भाषेत लोकांना निधी देण्यासाठी आवाहन केले. पैशांचा ओघ वाढला. 

 

त्यानंतर डेव्हिड बोवी या अत्यंत लोकप्रिय कलाकाराने स्वतःचं एक गाणं कमी करून त्याऐवजी इथिओपियातली सद्यस्थिती दर्शवणारा एक व्हिडिओ (यूट्यूबचा दुवा) दाखवला. त्यावर सर्व स्टेडियम शांत झालं. त्या व्हिडिओतली अत्यंत भयाण दृश्यं बघून स्टेडियममध्ये अनेक लोक रडायला लागले. 

 

दुबईचा तत्कालीन राजकुमार मुहम्मद बिन रशीद आल मक्तुम हा लाईव्ह एड कार्यक्रम टीव्हीवर बघत होता. त्यानं लगेच फोन करून दहा लाख पौंड या निधीसाठी देत असल्याचं जाहीर केलं.

 

फ्रेडी मर्क्युरी आणि जनसमुदाय
फ्रेडी मर्क्युरी आणि जनसमुदाय

 

वेम्बलीमध्ये कार्यक्रमाच्या शेवटी 'बीटल्स'चा पॉल मकार्टनी आपलं गाणं सादर करायला पियानोवर बसला. 

 

इतक्या घाईगडबडीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात एवढ्या वेळात कुठलाही तांत्रिक घोळ झाला नव्हता. परंतु सगळ्यांत लोकप्रिय कलाकाराच्या सादरीकरणाच्या वेळी नेमकी पहिली काही मिनिटं माईक बंद पडला. पण जमलेले सत्तरहजार लोक या सगळ्या प्रकारात फार गुंतले होते. पॉल जे गाणं म्हणत होता, 'लेट इट बी', हे गाणं सगळं स्टेडियम म्हणायला लागलं. दोनेक मिनिटांनी माईक परत सुरू झाला. 

 

पॉल मकार्टनी
पॉल मकार्टनी

 

शेवटी सगळे कलाकार स्टेजवर आले. त्यांनी 'डू दे नो इट्स क्रिसमस' हे 'बँड एड' ग्रुपनं इथिओपिया निधी संकलनासाठी आदल्या वर्षी तयार केलेलं गाणं समस्त प्रेक्षकवर्गाच्या साथीनं गायलं; आणि लंडनमधला कार्यक्रम संपला. 

 

हा कार्यक्रम सुमारे दीडशे देशांमध्ये दाखवला गेला.

 

कार्यक्रमाचा हा शेवटचा भाग मी पुण्यात, सदाशिव पेठेत बसून दूरदर्शनवर बघितला. (लाईव्ह की रेकॉर्डेड हे आता आठवत नाही.)

 

या कार्यक्रमातून इथिओपियातल्या दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून सुमारे १२ कोटी ७० लाख डॉलर एवढा निधी जमा झाला. त्यामुळे झालेल्या पब्लिसिटीचा परिणाम म्हणजे पाश्चात्य राष्ट्रं या अशा, मानवतावादी विषयांकडे गांभीर्यानं बघू लागली. पाश्चात्य राष्ट्रांकडे जे अतिरिक्त धान्य होतं, त्याचा अशा कामाकडे ओघ वळवण्याकडे कल वाढायला लागला. 

 

एखाद्या वेगळ्या खंडातल्या कुठल्यातरी देशामधल्या गंभीर संकटाकडे लक्ष वेधून, निवारणाकरता एका रात्रीत एवढा मोठा निधी पाश्चात्य जगाकडून जमा करणं, हे एक प्रचंड मोठं काम या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालं. 

 

एरवी अत्यंत पॉश आणि चंगळवादी आयुष्य जगणारे, टॉपचे सत्तरेक रॉक-पॉप स्टार स्वखर्चाने कार्यक्रमस्थळी येऊन मदतनिधी जमा करण्यासाठी, विनाबिदागी कला सादर करून गेले हेही विशेष.

 

अशा चांगल्या कामासाठी अशी कॉन्सर्ट करण्याचा पायंडा लाईव्ह एड १९८५मुळे पडला. त्यानंतर इतक्या मोठ्या नाहीत, पण तुलनेनं छोट्या फार्म एड, सेल्फ एड, लाईव्ह एड, स्पोर्ट एड अशा अनेक कॉन्सर्ट्स आयोजित केल्या गेल्या, हे एकंदर फलित म्हणावं. 

 

हे मोठं काम केल्याबद्दल १९८६ साली ब्रिटनच्या राणीनं बॉब गेलडॉफचा नाईटहूड देऊन सन्मान केला. 

 

 

या कार्यक्रमाशी संबंधित चुकवू नये असं काही –

 

१. BBC डॉक्युमेंटरी भाग १ : Live Aid, Against all odds 

२. BBC डॉक्युमेंटरी भाग २ : Live Aid, Rocking all over the world  (दोन्ही भाग यूट्यूबवरही उपलब्ध आहेत.)

३. The Eighties, One day One Decade . Author: Dylon Jones.

४.  Live Aid, as told by those who weren’t there: ‘We switched it off when Status Quo came on’

५. 40 years after Live Aid, the world is experiencing a compassion gap

६.  Live Aid at 40: 10 moments that made musical history

७. Bob Geldof told Freddie Mercury ‘don’t get clever’ before 1985 Live Aid set

८. Live Aid 1985: The Day the World Rocked

९.  Queen’s Live Aid performance nearly didn’t go ahead, band recalls 

१०. Explained: The historical significance of the 1985 Live Aid concert, and questions around Western relief efforts

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 14/10/2025 - 20:19

मला कुठल्याच संगीतातलं फारसं काही समजत नाही; तरीही मला लेख महत्त्वाचा वाटतो. 

एकीकडे मला फेसबुक हसन मिन्हाज (कॉमेडियन), ॲशली पार्क (अभिनेत्री आणि गायिका) यांचे रील दाखवतं की द. सुदानमध्ये भुकेचा प्रश्न टोकाला गेलेला आहे. गाझामधला बातम्या बहुतांश इस्रायलबद्दल असतात; पॅलेस्टिनी जनतेचे होणारे हाल बातम्यांमध्ये फार दिसत नाहीत; ना फेसबुकवरच्या रिळांमध्ये!

लेखाखाली दिलेल्या दुव्यांमध्ये एक आहे -  40 years after Live Aid, the world is experiencing a compassion gap

मी ते पूर्ण वाचलेलं नाही; पण त्या शीर्षकातला compassion gap हा शब्दसमूह मला चपखल वाटला. एकीकडे सगळ्या समाजाचंच विखंडन झालेलं दिसतं; तंत्रज्ञान त्याला हातभार लावत आहे. 'लाईव्ह एड'ला ४० वर्षं पूर्ण होताना लोकांनी कुठल्या कुठल्या अडचणी तंत्रज्ञान आणि मानवी स्वभाव वापरून सोडवल्या हे महत्त्वाचं आहे.

चिमणराव Wed, 15/10/2025 - 12:03

निधी गोळा करायला पाश्चिमात्य देशांत संगीत जलसे हे चांगले माध्यम आहे. पण समायोजक आणि सशक्त नेता हवा. ते काम या कलाकाराने केले याचे कौतुक वाटले.
बाकी दुष्काळाची झळ बसलेल्या इथिओपिया देशात जनतेचे हाल होत आहेत पण .....
....तिथलं एक भयंकर वास्तव बॉब आणि इतर ट्रस्टींना कळलं. दुष्काळग्रस्तांसाठी मदत म्हणून पाठवलेलं सामान – धान्य, औषधं आणि इतर सामुग्री – तिथल्या बंदरावरच पडून राहणार आहे. कारण इथिओपियामधली ट्रान्सपोर्ट कार्टेल सामुग्री कॅम्पपर्यंत पोहोचवण्यासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी करत होती. ........
तिथल्या हुकुमशहाला कार्टेलकडून कमिशन मिळतच असणार. टाळूवरचे लोणी सोडायला तो तयार असता तर?

लेखातून वास्तव कळलं.