Skip to main content

रहस्य


नुकत्याच निधन पावलेल्या फ्रेडरीक फोरसाइथ या लेखकाच्या Used in Evidence या कथेवर ही कथा बेतलेली आहे.

 

रिंग रोडचं बरीच वर्षं रेंगाळलेलं काम अखेरीस मार्गी लागणार अशी चिन्हं होती. सगळे सरकारी अडथळे दूर झाले होते. खर्चात राज्य सरकारनं किती भाग उचलायचा आणि केंद्र सरकारनं किती हा महत्त्वाचा मुद्दा धसाला लागला होता. या रस्त्यामुळे बाधित होणार्‍या शेतजमिनीचा मोबदला किती द्यायचा यावर सरकारी प्रतिनिधी आणि शेतकर्‍यांच्या संघटनेचे प्रतिनिधी यांचं बर्‍याच चर्चेनंतर एकमत झालं होतं. ज्या काही मोजक्या लोकांची घरं या रस्त्यात जाणार होती त्यांच्या पुनर्वसनाचा मार्गही मोकळा झाला होता. रस्ते आणि पृष्ठभागवहन मंत्र्यांच्या धडाक्याला अनुसरून वीस तारखेला मोठ्या दणक्यात या मार्गाचं खुद्द मंत्रीमहोदयांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. 'चोवीस महिन्यांत पूर्ण होणारा जगातला पहिला रिंग रोड' अशा जाहिरातीची वर्तमानपत्रांत येऊ लागल्या होत्या. एकूण धामधूम होती. 

 

रहस्यसर्व्हेवर असलेल्या चीफ इंजिनीअर साहेबांनी मागून त्यांच्या ड्रायव्हरच्या खांद्यावर टकटक केली आणि ड्रायव्हरनं गाडी थांबवली. शेराटी गावाच्या बाहेरून ते चालले होते. 

"ते, एकच शिल्लक राहिलेलं घर, ते  कुणाचं आहे?" चीफ इंजिनीअर गाणबावलेनी विचारलं. असिस्टंट इंजिनीअर चौगुले चपापले. रिंग रोडच्या आखणीमधली बाकीची सगळी घरं रिकामी झाली होती. ती घरं पाडून त्यांचा राडारोडा जागेवरून हटवला होता. सपाटीकरणही पूर्ण झालं होतं. फक्त हे एकच घर अजून शाबूत होतं. आजूबाजूच्या सपाट जागेवर, एखाद्या म्हातारीच्या बोळकं झालेल्या तोंडात एकच दात शिल्लक असावा तसं दिसणारं हे घर.  

"माहिती घेऊन सांगतो, साहेब." चौगुले म्हणाले. 

"च्च.. अशी सरकारी भाषेतली गुळमुळीत उत्तरं देत जाऊ नका हो, चौगुले." गाणबावले वैतागून म्हणाले. "कोण आहे बघा, अजून ते रिकामं का झालं नाही बघा. पंधरा तारखेच्या आधी ती जागा रिकामी पाहिजे. वाटल्यास पोलिसांना इनव्हॉल्व्ह करा. शेराटी पोलीस ठाण्यावर एसएचओ कोण आहे?

या वेळीही 'माहिती घेऊन सांगतो, साहेब' म्हणणं चुकीचं दिसलं असतं म्हणून चौगुले गप्प राहिले, पण काय ते गाणबावलेंच्या लक्षात आलं.

दोन दिवस निघून गेले. चौगुलेंनी नुसतीच माहिती घेतली नव्हती, तर तिच्यावर कारवाईही केली होती. ते घर गजानन शिंदेचं होतं. आधी त्यात शिंदे आणि त्याची बायको राहात होते, पण आता गेली काही वर्षं शिंदे एकटाच राहात होता. त्याची बायको त्याला सोडून गेली अशी वदंता होती, पण नक्की कुणाला काही माहीत नव्हतं. रिंग रोडमुळं बाधित होणार्‍या सगळ्या घरांप्रमाणं शिंदेला पीडब्ल्यूडीकडून नोटीस दिली गेली होती. एकदा, दोनदा, तीनदा. शिंदेनं त्यावर काही प्रतिक्रिया दिली नव्हती. बाधित लोकांसोबत झालेल्या राज्य शासनाच्या बैठकांनाही तो आला नव्हता. त्याच्या शेजार्‍यांशी त्याचा अजिबातच संबंध नव्हता. कुणाकडे त्याचं येणंजाणं नव्हतं. त्याच्याकडे मोबाईल फोन होता, पण शिंदे तो कधीच उचलत नसे. त्याच्या घरी गेलेल्या लोकांनी 'संबंधित व्यक्ती दार उघडत नाही,  घरात असूनही काहीही प्रतिसाद देत नाही' असा त्याच्या फाईलवर शेरा मारला होता. सामोपचारानं गोष्टी होत नाहीत असं लक्षात आल्यावर 'बाधित मालमत्ता' रिकामी करण्याची ऑर्डर अधिकार्‍यांनी कलेक्टरकडून मिळवली होती. ती ऑर्डर घेण्यासाठीही शिंदेनं दार उघडलं नव्हतं. ऑर्डरची दारावर चिकटवलेली प्रत शिंदेंनं रात्रीतनं कधीतरी फाडून टाकली होती. या पुढे त्या फाईलमध्ये काही माहिती नव्हती. पोलिसांची मदत घेऊन ते घर, वाटल्यास जबरदस्ती करून, रिकामं करणं हे काम, कसं कुणास ठाऊक पण राहून गेलं होतं.

 

तिसर्‍या दिवशी चौगुले स्वत: शेराटी ठाण्यावर आले. शिलेदार साहेब त्यांच्या ओळखीचेच निघाले. ठाण्याच्या जीपमधून ते दोघेही त्या घराजवळ आले. कंत्राटदाराचा जेसीबी जागेवर यायला निघाला होताच. कंत्राटदाराच्या मजूरांची गाडी आधीच आली होती. घर म्हणजे एका लहानशा प्लॉटवर बांधलेल्या त्या दोन जुन्या खोल्या होत्या. अंगण, परसू होतं, पण त्याच्याकडे गेल्या कित्येक वर्षांत कुणी लक्ष दिलेलं दिसत नव्हतं. वाळून गेलेल्या झाडांचे खराटे उन्हात उभे होते. बाहेरच्या तुळशीवृंदावनात तर मातीसुद्धा नव्हती. आवारात वाढलेलं तणसुद्धा आता सुकून गेलं होतं. त्यांच्या वाळक्या शेंड्यांवर वार्‍यानं वाहून आलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या फडफडत होत्या. कोपर्‍यात एक लहानसं आड दिसत होतं. त्याची एक बाजू ढासळली होती. दुसर्‍या बाजूनं वाढलेल्या रानवेली आडाच्या तोंडावर वाकल्या होत्या. रहाटाची जागा मोकळी होती आणि तिथल्या दगडी बांधकामातून उगवून चांगलं वर आलेलं एक हिरव्या-पोपटी पालवीचं पिंपळाचं झाड त्या भकास पार्श्वभूमीवर चमत्कारिक  दिसत होतं. रिकाम्या जागेत एक कोंबड्यांचा पिंजरा होता. कधीतरी त्यात कोंबड्या पाळलेल्या असाव्यात. आता त्याच्यावरच्या पत्र्याच्या छपराला भोकं पडली होती. तळातल्या जमिनीला कोबा केला होता, तो तेवढा धड होता. पिंजर्‍याची जाळी जागोजागी उसवलेली होती. घराचा दरवाजा बंद होता. दोन्ही बाजूच्या खिडक्याही बंद होत्या. 'इतक्या उन्हाळ्यात दारं खिडक्या बंद करून राहाणारा माणूस चक्रमच असला पाहिजे' चौगुलेंच्या मनात आलं. दारावर बेल नव्हती. पुढं होऊन त्यांनी दार वाजवलं. आतून कसलीच चाहूल ऐकू आली नाही. एक नाही की दोन नाही. चौगुलेंनी पुन्हा दार वाजवलं. या वेळी जोरात आणि बराच वेळ.  आत काहीतरी खुडबुड ऐकू आली. दाराच्या आतली कडी काढल्याचा आवाज आला. दार उघडलं. 

 

दारात एक उंच, किडकिडीत माणूस उभा होता. डोक्यावरचे विरळ केस पिंजारलेले, दाढी वाढलेली, चेहर्‍यावर वयाच्या रेषा, कायम घरात राहाणार्‍या माणसाच्या चेहर्‍यावर जो एक फिकटपणा आलेला असतो तसली फिकट, पिवळसर त्वचा, त्या त्वचेतून जागोजागी दिसणारी काही ठिकाणी गुठळया झालेली, निळ्या शिरांची जाळी, वय सत्तर तर नक्कीच. अनवाणी… 

"शिंदे? गजानन शिंदे?" शिलेदारांनी विचारलं. 

तो माणूस काही बोलला नाही, पण त्यानं तोंडातून एक विचित्र आवाज काढला. तो एक पाऊल मागं सरकला आणि त्यानं दार लावून घेण्याचा प्रयत्न केला.

 

शिलेदार तरुण होते, चपळ होते आणि त्यांना असलं काहीतरी होईल असा अंदाज होता. एका फटक्यासरशी त्यांनी दार सताड उघडलं, दुसर्‍या फटक्यासरशी शिंदेला जवळजवळ आडवंच केलं. ते आणि चौगुले घरात आले. 

"दार का उघडत नव्हता रे मा… माय गॉड!"  ते उद्गारले. 

 

 खोलीभर पसाराच पसारा होता. जुनी रद्दी, कार्डबोर्डची खोकी, जुन्या चपला, कपड्यांचे मळकट बोळे, जुने स्टोव्ह, पोचे आलेली भांडी आणि अनेक बोचकी… सगळा पसारा धुळीनं भरलेला होता. जमिनीवरही धुळीचा दाट थर होता आणि त्यात गजाननाच्या पावलांचे ओबडधोबड आकार उमटले होते. खोलीला बंगलोरी कौलांचं छप्पर होतं. कधीकाळी ते उत्तम लाकडात बांधलेलं असावं, पण आता त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालेलं दिसत होतं. कित्येक वर्षांत शाकारणी केलेली नसावी. कौलं विस्कटलेली होती, एक-दोन ठिकाणी पावसाळ्यात पाणीही गळत असावं. कधीकाळी उजेडासाठी बसवलेलं काचेचं कौल तडकलं होतं, धुळीनं माखलेलं होतं. तुळीवरून, छपरावरून केंबळं लोंबत होती. भुतासारखा दिसणारा शिंदे धडपडत तोल सावरण्याचा प्रयत्न करत होता. 

 

पुढच्या गोष्टी सरकारी खाक्यानुसार झाल्या. बिगार्‍यांच्या मदतीनं शिंदेच्या घरातला पसारा उचलला गेला. कसल्याही कामाची सवय असलेल्या रोजंदारीवर आलेल्या बायकांनीही शिंदेच्या घरातली कुबट बोचकी उचलताना नाकाला पदर लावला. रद्दी, फुटक्या बाटल्या, तुटक्या चपला... बर्‍याच गोष्टी उचलताना त्यांचे तुकडेच पडत होते. शिंदे स्वयंपाक घरातच करत असावा. स्वयंपाक कसला, काहीतरी उकडून खात असावा. घरात फ्रीज होता आणि त्यात वाटेल ते सामान कसंबसं कोंबून भरलं होतं.  सगळीकडे धूळ आणि कचरा. माणूस या ठिकाणी कसा राहात होता अशी शंका येण्यासारखी परिस्थिती होती. शिंदेचं सामानसुमान कुठं हलवायचं, त्याला तात्पुरता का होईना, पण निवारा कुठं द्यायचा... सगळे प्रश्नच होते. त्यातून शिंदे एक म्हणजे एक अक्षर बोलायला तयार नव्हता. काही विचारलं की तो तो तोंडातनं एक जनावरासारखा आवाज काढत होता आणि त्याच्या तांबूस डोळ्यांनी टकटका बघत होता. शेवटी शिलेदारही वैतागले. संध्याकाळपर्यंत चौकीत ठेवू आणि तोपर्यंत त्यानं तोंड उघडलं नाही तर नाईट ड्यूटीच्या जांगडे हवालदारच्या ताब्यात देऊ असा विचार त्यांनी केला. जांगडे हवालदार म्हणजे दगडाकडूनही कबुलीजबाब वदवून घेईल अशी ख्याती असणारा होता. पोलीस स्टेशनच्या आवारात बेवारस गोष्टी ठेवायला एक जागा असते. त्यातच शिंदेचा पसारा ओतला गेला. बाहेरच्या बाकावर बसलेल्या शिंदेला हवालदारानं राईस प्लेट आणून दिली. काही नं बोलता शिंदेनं ती संपवली आणि तो बाकावर भकास डोळ्यांनी बिडी ओढत बसला. 

 

जेसीबीचं खोरं लागताच शिंदेच्या घराच्या भिंती वाटच बघत असल्यासारख्या कोसळल्या. आतलं लाकूडसामान किडलं होतं, जरा धक्का लागताच त्यांचा भुगा होत होता. घराच्या आतल्या फरशा उचकटल्या होत्या, त्यांचे तुकडे होत होते. बघता बघता शिंदेचं घर खाली आलं. आता दोन खोल्यांच्या मधली जाड भिंत आणि घराच्या मागची भिंत एवढं झालं की मग बाकी सगळं सटरफटरच, चौगुले मनाशी म्हणाले. शिलेदार चौकीवर परत गेलेच होते, आपणही ऑफिसला जावं, त्यांनी घड्याळाकडं बघितलं. 

 

जेसीबीचा धक्का लागून मधली भिंत कोसळली. धुरळा खाली बसला. लोकांनी डोळे पुसून नीट पुढं बघितलं. 

राडारोडा गोळा करणार्‍या बायकांपैकी एक बाई एक पाऊल पुढं गेली, तिनं समोर बघितलं आणि ती जोरात किंचाळली. 

 

जाड भिंतीच्या आत असलेली एक पोकळी उघडी झाली होती. तिच्यातून एक वाळलेला मानवी पाय बाहेर आला होता. मांस वाळून गेलेल्या त्या पायाच्या बोटावरची चांदीची जोडवी धुरळ्यात चमकत होती. 

शिलेदारांना पुन्हा बोलावलं गेलं. काय प्रकार आहे हे कळाल्यावर ते वैतागले आणि शिंदेच्या कुळाबद्दल त्यांच्या तोंडून काही शेलकी विशेषणं बाहेर पडली. घर उतरवण्याचं काम तर थांबलंच होतं, पण भिंतीचा तेवढा भाग पाडून आतला मृतदेह बाहेर काढला गेला. देह सगळा वाळून कोळ झाला होता. त्यावर असलेली आता विरून गेलेली आणि तुकडे पडत चाललेली कॉटनची साडी आणि मूळ रंग कसला होता याची कल्पनाही करता येणार नाही असला ब्लाऊज यांमुळे ती दुर्दैवी व्यक्ती एक स्त्री होती हे लक्षात आलं. तिच्या डोक्यावर अजूनही शाबूत असलेल्या काळ्या-पांढर्‍या केसांची कुरळी वळणं स्पष्ट दिसत होती. तिच्या हातापायांच्या लांबरुंद हाडांवरून तिच्या थोराड अंगापेराचा अंदाज येत होता.

 

मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला गेला. पंचनामा वगैरे होऊन पोलिसांचा किमान प्राथमिक तपास होईपर्यंत रस्त्याचं काम बंद ठेवायलाच लागणार होतं. चौगुलेंची घालमेल होत होती. ते दोनतीन वेळा शिलेदारांना भेटले पण त्यांचाही नाईलाज होता. ऑन ड्यूटी पोलीस ऑफिसर भगाटे आता शिंदेकडून कबुलीजबाब काढून घेण्याच्या नादात होते. जांगडे ड्यूटीवर आला होता आणि आपल्या कौशल्याचा वापर करायला मिळणार या कल्पनेनं तो उत्तेजित झाला होता. शिंदेला भगाटेंनी अटक केली होती आणि दिवसभर बाहेरच्या बाकड्यावर बसून राहिलेला शिंदे आता पोलीस कस्टडीत बसून राहिला होता. शिंदेची शारीरिक अवस्था बघता जरा 'आस्ते कदम' असं भगाटेंनी जांगडेला सांगितलं. जांगडे पहाटेपर्यंत शिंदेच्या कस्टडीत प्रयत्न करत राहिला. पहाटेपहाटे थकलेला आणि थोडासा खजील झालेला जांगडे कस्टडीच्या बाहेर आला. भगाटेंनी कस्टडीच्या गजांतून आत बघितलं. किंचित काळानिळा पडलेला शिंदे कस्टडीच्या एका कोपर्‍यात मुरगाळून झोपला होता.

 

"पीएमचा रिपोर्ट येऊ दे. मग पोपटासारखा बोलायला लागेल साला." ते चहा घेताघेता म्हणाले. "कमांडर, सात वाजता एक कप चहा पाठवा त्याला. मी डॉक्टरांना भेटून येतो, मग बघू कसा बोलत नाही ते."

 

मेडिकल ऑफिसर डॉक्टर केरीपाळे अकरा वाजता येणार होते. त्याच्या आधी शिंदेच्या जुन्या शेजार्‍यांपैकी कुणी सापडतो का हे बघायला भगाटे चौगुलेंच्या ऑफिसमध्ये गेले. पुनर्वसन झालेले लोक वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेले होते. शिंदेच्या घराच्या उजव्या बाजूला पूर्वी राहात असलेले करिआप्पा  त्यांच्या मुलाकडं, हैदराबादला गेले होते. त्यांचा फोन नंबर होता पण तो पर्याय भगाटेंनी मागे टाकला. शिंदेच्या घराच्या समोर एका लहान घरात पूर्वी हिराबाई एकट्याच राहात होत्या. त्या आता त्यांच्या मुलीकडं उत्तमनगरला राहायला गेल्या होत्या. उत्तमनगर जवळच होतं, पत्ताही पूर्ण होता. एक मिनीट विचार करून भगाटेंनी जीप तिकडे वळवायला सांगितली.

 

"अहो, काय माणूस का काय म्हणायचा हा, शिंदे!" हिराबाई रंगात येऊन सांगत होत्या. भगाटे स्वत:शीच थोडेसे हसले. एकटी राहाणारी बाई म्हणजे इतरांच्या भानगडीत रस असणारी, बडबडी, भोचक, अटेन्शन सीकर असणार हा त्यांचा तर्क खरा ठरत होता. "सोन्यासारखी बायको, पण याचा सारखा तिच्यावर संशय. कुठं गेली होतीस, एवढा उशीर का झाला, कुणाशी बोलत होतीस, एक ना दोन!" हिराबाई सांगत होत्या. "आता नवरा बायकोच्या वयात अंतर फार होतं ते सोडा. पूर्वीच्या काळात तसंच असायचं. आमचे हे चांगले तेरा वर्षांनी मोठे होते माझ्यापेक्षा. होय, ते राहिलं. पण आमचा नाही झाला संसार? नाही झालीत मुलंबाळं? नवरा बायको दोघांनीही समजुतीनं घ्यायचं असतंय की नाही सांगा बरं इन्स्पेक्टरसाहेब?

"ही कशी होती दिसायला वगैरे… ही गजानन शिंदेची बायको?"

"सपना होय? चांगली होती गोरीगोमटी. उंचीला काही फार नव्हती, माझ्यापेक्षा कमीच असेल." हिराबाई म्हणाल्या. पाच फूट एक, फारतर दोन इंच... भगाटे मनाशीच म्हणाले. "पिंगट, लांबसडक, सरळ केस होते तिचे. मोकळे सोडायची बघा. चांगले दिसायचे म्हणा तसे. कायम झगा घालायची. पाय गुडघ्यापासून खाली उघडे. आता लग्न झालेल्या बाईला शोभतं का हे असले कपडे घालणं  इन्स्पेक्टरसाहेब? पण कोण सांगणार आणि कसं सांगणार. हा बाब्या असला खवीस. आणि सांगायचं म्हणजे…"

"तुम्हाला शेवटची कधी दिसली होती ही? सपना?" भगाटे संभाषण मार्गावर आणत म्हणाले. 

"सांगते ना. अगदी नक्की लक्षात आहे माझ्या. म्हणजे झालं काय, यांचं हर्नियाचं ऑपरेशन ठरलं होतं. म्हणजे आधीच होणार होतं, पण त्यावेळी यांची शुगर जास्ती निघाली. मग डॉक्टर म्हणाले महिनाभर पथ्य पाळून शुगर कमी झाली की या. आता डायबेटीस आहे म्हणजे माणसाचा तोंडावर ताबा पाहिजे की नाही सांगा बरं? सारखं हे तोंडात टाक, ते तोंडात टाक असं केलं तर कशी कमी होणार शुगर? तासातासाला चहा..."

"वर्ष? महिना? हिराबाई?" 

"तर सांगत काय होते, की आम्ही गाडीत बसत होतो तेव्हा ही अंगण झाडत होती. सपना. आमची गाडी बघून आली लगालगा. म्हणाली, कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ऑपरेशन काकांचं? मी येईन हो बघायला. हे काही तिनं काका म्हणावं एवढे मोठे नव्हते, केस पिकले होते म्हणून जरा मोठे वाटायचे. पण ते काय अनुवंशिकच असतंय म्हणे. यांच्या वडीलांचेपण…"

"हिराबाई..." 

"हो, ऑगस्ट महिना होता, पाऊस लागला होता वरंधार. पंधरा दिवसांपूर्वीच देऊळ बंद बघून आलो होतो आम्ही. जुलै मध्येच रिलीज झाला होता तो. गर्दी नव्हती विशेष पण."

 

भगाटेंनी मोबाईल काढला. देऊळ बंद रिलीज डेट , जुलै २०१५. त्यांनी नोंद केली. "त्यानंतर तुम्हाला कधीच दिसली नाही, ही सपना?" त्यांनी विचारलं.

"नाही. आम्ही दुसर्‍या दिवशी परत आलो तेव्हा हे सोंग होतं दारात उभं. गजानन. मी विचारलं की काल का नाही आली सपना म्हणून तर म्हणाला, माहेरी गेलीय म्हणून. तेव्हापासून ती गेली ती गेलीच. एक आडात माणूस पडावा तशी गेलीच."

"हं. आणि काय सांगता येईल हिच्याबद्दल? सपनाबद्दल?"

"काय हेच की, बोला-वागायला चांगली होती. मनानं मोकळी होती. तिची काहीतरी बाहेर भानगड… म्हणजे असं कानावर आलं होतं. पण असणारच की हो. ती असेल जेमतेम चाळीशीची. चाळीशीच्या आतलीच असेल. मूलबाळ काही नाही पोटाला. हा गणपा साठीच्या पुढचा. त्यातनं हा काही दिसतोय तेवढा साधा नाही. आतमध्ये जाऊन आलाय म्हणे दोन वर्षं. तिला मन म्हणून काहीतरी आहे की नाही..." हिराबाई बोलतच होत्या.

 

अकरा वाजून गेले आणि तरीही पीएमचा प्राथमिक अहवालदेखील आला नाही हे कळाल्यावर भगाटे जरासे वैतागले होते. डॉक्टर केरीपाळे हा काही कामचुकार माणूस नव्हता, उलट जास्त वेळ थांबायला लागलं तर थांबून त्या-त्या दिवसांची कामं पूर्ण केल्याशिवाय घरी न जाणारा माणूस म्हणून त्यांची ओळख होती. भगाटे पीएम रूममध्ये आले तेव्हा डॉक्टर केरीपाळे एका टबमधल्या द्रव पदार्थाकडे अतिशय प्रेमानं बघत होते. शवविच्छेदन या विषयात इतका रस असणारा दुसरा मेडिकल ऑफिसर इन्स्पेक्टर भगाटेंच्या बघण्यात काय, पण स्मरणातदेखील नव्हता.

 

"काय रिपोर्ट, डॉक्टर?"

"वेळ लागणार, भगाटेसाहेब." डॉक्टर केरीपाळे म्हणाले. "बॉडी पूर्ण ड्राय झाली आहे, किमान चोवीस तास कोमट ग्लिसरीनमध्ये बुडवून ठेवावी लागेल, मग जरा मसल्स वगैरे मऊ पडतील. मगच पीएम सुरू करता येईल." 

"तरी काही प्राथमिक अंदाज?" 

"हां, तसं थोडं सांगता येईल." डॉक्टर केरीपाळे म्हणाले. "फीमेल नक्कीच. उंची चांगली आहे. पाच आठ, पाच साडेआठ."

"किती?"

"कदाचित पावणे सहा फूटदेखील. सध्या पाय गुडघ्यात वाकले आहेत, पण पायाची सगळी बोन्स मोकळी झाली की नक्की सांगता येईल. स्किन कलर खूप डार्क असावा. म्हणजे बाई सावळ्या रंगाच्या असाव्यात. कदाचित काळ्या. पेल्व्हिक स्ट्रक्चरवरून एक  प्राथमिक अंदाज असा की किमान दोन डिलीव्हरीज झाल्या असाव्यात. केस काळे आणि कुरळे. बरेचसे पिकले आहेत. बॉब कट असावा. वय किमान पंचेचाळीस.."

"किती?"

"डीटेल्ड रिपोर्टला वेळ लागेल, भगाटेसाहेब. संध्याकाळापर्यंत देतो. पॅथॉलॉजी वगैरेला मात्र वेळ लागेल हां."

"वय किती म्हणालात, डॉक्टर?"

"पंचेचाळीस. किमान पंचेचाळीस. बॉडी वीस वर्षं तरी भिंतीत आहे. उन्हाळ्यामुळं किती डिहायड्रेट  झाली आहे बघा ना. मानेवर फ्रॅक्चर आहे, त्यामुळं मृत्यूचं कारण मानेवर आघात हेच असावं. गळा आवळून खून, म्हणजे होमिसाईडची केस. दोन हजार ते दोन हजार दोनच्या दरम्यान हा खून झाला असावा. अजून तपशील मी संध्याकाळपर्यंत... काय झालं भगाटे? आर यू ऑल राईट? फॉरमॅलिनच्या वासाचा त्रास होतोय का? बाहेर जाणार का?" डॉक्टर केरीपाळेंनी  विचारलं. 

 

 

 "गजानन शिंदे. हाच माणूस आहे, सर." पोलिस रेकॉर्ड रूमचा ऑपरेटर म्हणाला. त्याच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर उमटलेला फोटो आणि आजचा गजानन शिंदे यांची ओळख अंदाजानंच पटवून घ्यायला लागत होती. भगाटेंनी डोळ्यांवर चष्मा चढवला. 

"काय रेकॉर्ड आहे, आपल्याकडे?" ते म्हणाले. 

"पत्ता वेगळा आहे. सी. आय. जी. कॉलनी आहे. सेंटरिंगची कामं करत होता हा माणूस. फारसं बरं चालत नसावं काम. क्रिमिनल रेकॉर्ड आहे, सर. स्टेट बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न, रखवालदारावर हल्ला. अटेम्टेड मर्डर. चार वर्षं तळोजा जेलमध्ये काढून आले आहेत हे साहेब." 

"कधी?"

"पाच मे एकोणीसशे नव्याण्णवला अटक, सतरा जून दोन हजार तीनला सुटका." ऑपरेटर म्हणाला. "दोन हजार ते दोन हजार दोनच्या दरम्यान म्हणाले ना डॉक्टर? गजानन त्या काळात जेलमध्ये होता, सर. पॅरोल, फर्लो कसल्याही लीव्हचं रेकॉर्ड नाही."  

भगाटेंनी घाम पुसला. 

"काही समजत नाही, साहेब." शिलेदार म्हणाले. "डॉक्टर केरीपाळेंचा रिपोर्ट आला आहे. त्यात त्यांनी बॉडीचं जे वर्णन दिलं आहे ते सपना शिंदेच्या वर्णनाशी अजिबातच मॅच होत नाही. शिवाय मर्डरची डेट. सन दोन हजार ते दोन हजार दोन. तळोजाला त्या वेळी हातगिणेसाहेब जेलर होते. मी त्यांना भेटून आलो. त्यांना गजानन स्पेसिफिकली आठवत नाही, पण रेकॉर्ड बघून तेही शपथेवर सांगतात की त्या काळात गजानन तळोजा जेलमध्ये होता. त्या काळात त्याच्याबरोबर जेलमध्ये असलेल्या आणि आता बाहेर आलेल्या किमान चार कैद्यांशी आपण बोललो आहोत. तेही शपथेवर सांगतात की गजानन शिंदे त्या दोन वर्षांत तळोजा जेलच्या बाहेर पडलेला नाही." 

"आणखी काही?"

"आणखी त्याच्या राहाण्याचा पत्ता. गजानन दोन हजार तीनला सुटला. दोन हजार दहाला तो या पत्त्यावर राहायला आला. त्या दरम्यानच त्याचं लग्न झालं असावं. म्हणजे ही बॉडी ज्या बाईंची आहे त्यांचा मर्डर झाला तेव्हा गजानन इथे राहातपण नव्हता." 

"मग त्यावेळी या घरात कोण राहात होतं?"

'माहिती घेऊन सांगतो, साहेब.' हे ओठावर आलेले शब्द शिलेदारांनी गिळले. 

"आणि दुसरं असं शिलेदार, की ही जर गजाननच्या बायकोची बॉडी नाही, तर कुणाची आहे आणि गजाननच्या बायकोचं काय झालं?"

शिलेदार काहीच बोलले नाहीत. 

दोन तासांनी गजाननला पोलिस स्टेशनमधून सोडण्यात आलं. "आता पुरावा नाही, म्हणून तुला सोडतोय, पण पुरावा मिळाला की तुला असा अंदर करू की मरेपर्यंत बाहेर येणार नाहीस तू साल्या." भगाटेंनी आपलं सगळं फ्रस्ट्रेशन त्याच्यावर काढलं. "आमची नजर असेल तुझ्यावर. गाव सोडून गेलास बिलास तर याद राख." ते म्हणाले. गजानन काहीच बोलला नाही. 

 

 

"इथं सगळं खणून त्यावर नवीन रस्ता करायची गरज नाही." कंत्राटदाराचा सुपरव्हायजर मुकादमाला म्हणाला. "तेवढा वेळपण नाही. "हे लेव्हलिंग झालेलंच आहे. यावरच खडीचा लेअर टाकून घ्या. आज संध्याकाळपर्यंत इथला सगळा रस्ता पूर्ण झाला पाहिजे."

"तो कोंबड्यांच्या खुराड्याचा कोबा मध्ये येतोय साहेब." मुकादम म्हणाला. "त्याचं काय करायचं?"

सुपरव्हायजरच्या कपाळावर एक आठी आली. 

"त्याच्यावर पहार मारून बघा बरं. आत कुठं पोकळबिकळ नाही ना ते बघायला पाहिजे."  तो म्हणाला. एका बिगार्‍यानं हातातली पहार त्या कोब्यावर दोन-चार ठिकाणी मारून बघितली. "हाय, घट्ट हाय, सायेब." तो म्हणाला.  

"मग असू द्या तसंच. त्यावर खडी टाकून  जाऊ द्या पुढं काम." सुपरव्हायजर म्हणाला.

 

काम सुरू झालं. खुणा केलेल्या पट्ट्यावरून खडी आणि डांबराचं मिश्रण पसरत ट्रक पुढेपुढे जाऊ लागला. बिगारी त्यावर पाटीनं खर पसरत पुढे जाऊ लागले. मागोमाग त्यावर तापलेल्या पातळ डांबराचा थर टाकणारा टँकर  जायला लागला. खडखडाट करत जमीन समतल करणारा रूळ त्यामागून जायला लागला. बघता बघता  शिंदेच्या अंगणातून जाणारा तो नवा रस्ता आकार घेऊ लागला. कोंबड्यांच्या पिंजर्‍याच्या पायाला असणारा तो दोन फूट बाय सहा फूट आकाराचा सिमेंटचा कोबा त्या नव्या रस्त्याखाली दिसेनासा झाला.

 

बघ्यांच्या गर्दीत असणार्‍या त्या विरळ पिंजारलेल्या केसांच्या, उंच, किडकिडीत माणसाच्या चेहर्‍यावर प्रथमच समाधानाचं हास्य उमटलं. त्यानं एकदा इकडं एकदा तिकडं नजर टाकली आणि तो तिथून निघून गेला.  

सोकाजीरावत्रिलोकेकर Fri, 17/10/2025 - 08:40

संजोपराव, सिर्फ नाम ही काफी है! एकदम झक्कास!

- (संजोपरावांचा पंखा) सोकाजी

सुधीर Fri, 17/10/2025 - 21:59

In reply to by सोकाजीरावत्रिलोकेकर

कथालेखनाचे कसब वादातीत आहे. याच मातीतलीच कथा वाटते.

मारवा Sat, 18/10/2025 - 09:13

In reply to by सुधीर

अनुवादाचे कसब म्हणणे योग्य ठरेल.
किंवा भाषेवरची पकड म्हणता येईल फारतर.

सुधीर Sat, 18/10/2025 - 09:54

In reply to by मारवा

ह्याच कथेबद्धल नाही म्हणत आहे. गेल्या वीस एक वर्षात त्यांनी जे काही लिहिले आहे त्यावरून.

सन्जोप राव Fri, 17/10/2025 - 17:33

In reply to by विसुनाना

धस या शब्दाचा अर्थ खुंटी असा आहे. धसाला लावणे म्हणजे एखाद्या गोष्टीचा निकाल लावणे. तडीला लावणेचा अर्थही तोच.