"...बट ही वॉज नेव्हर अग्ली!"
"कधी थांबणार आहात की नाही तुम्ही?" हा प्रश्न वयाची साठी ओलांडलेल्या अजितदादांनी त्यांच्या वयाची ऐंशी ओलांडलेल्या काकांना उद्वेगानं आणि जाहीरपणे विचारला होता. त्याच अजितदादांना नियतीनं अकाली थांबवलं. ट्रॅजिक एंड! दुर्दैवी अंत. महाराष्ट्र हळहळला. राजकीयदृष्ट्या अजितदादा जवळचे असोत, की नसोत हा मृत्यू चटका लावून गेला. सहानुभूती, आठवणी, उमाळे, दुःख, वेदनांच्या लाटा उसळल्या. अजित आशाताई अनंतराव पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं झंझावाती नेतृत्व. महाराष्ट्राच्या राजकारणात 'पवार' आणि 'बारामती' या नावांचा दबदबा ज्यांनी वाढवला ते अजितदादा गेले. गेल्या तीन दशकांपासून स्वतःचं अढळस्थान कायम ठेवणारा नेता हरवला. 'अजितदादा' म्हटल्यावर मला पहिल्यांदा आठवतो तो त्यांचा जरब असलेला, करारी, करकरीत आवाज. आवाजातच हुकमत होती. आणि मग आठवतं त्यांचं दिलखुलास हास्य. ज्याला खळखळून हसता येतं, प्रसंगी जो स्वतःवरही विनोद करून हसतो, तो माणूस मनानं नक्कीच वाईट नसतो, हा माझा आपला सरधोपट आडाखा आहे. (खोटं हसणारे, कृत्रिम हास्य कमावलेले बनेल चटकन ओळखू येतात.) असं असलं तरी अजितदादांबद्दल टोकाची मतं आहेत. म्हणजे खूप सारे बारामतीकर म्हणतील, की उगवत्या सूर्याबरोबर झपाटल्यासारखा कामाला लागणारा नेता म्हणजे आमचे अजितदादा. पण त्याच बारामतीमधून असाही सूर उमटेल, की "सकाळी लवकर उठून दादा काय करतात? जमिनी बघत फिरतात. चाराण्याच्या वस्तूची किंमत रुपयावर नेऊन भ्रष्टाचार करतात." पण हे तर होणारच. सलग चाळीसहून अधिक वर्षें अहोरात्र सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या नेत्याबद्दल अशी विरोधाभासी मतं ऐकू येणारच.
थोडा जुना प्रसंग. आम्हा मित्रांना पुण्यातल्या बंगल्यावर अजितदादांनी वेळ दिली होती. सुरुवातीलाच त्यांना म्हटलं, की तुम्ही फटकून वागता पत्रकारांशी. संवाद-संपर्क जरा वाढवा. अजितदादा ताबडतोब म्हणाले, "ह्यो का...पवारसाहेबांनी कितीतरी संपादक-पत्रकारांना आयुष्यभर पोसलं. पदं मिळवून दिली. फ्लॅट दिले. काय नाही ते केलं पत्रकार-संपादकांसाठी. काय उपयोग झाला त्याचा? जेव्हा पवारसाहेबांवर वाट्टेल ते आरोप होत होते, तेव्हा एक पत्रकार-संपादक त्यांच्या बाजूनं उभा राहिला नाही. त्यामुळं आपण बरं, आपलं काम बरं. लोकांमध्ये राहावं आणि भरपूर काम करावं, या मताचा मी आहे." नमनालाच अशी सुरुवात झाल्यानं आता लवकर निघावं लागणार असं वाटलं. पण लगेचच अजितदादांनी त्यांच्या पीएला हाक मारली अन् म्हणाले, "आता पवारसाहेब, आर.आर. आणि भुजबळसाहेब यांच्यापैकी कोणाचा फोन आला तरच आत यायचं. नाहीतर आता मध्येमध्ये कोणी येऊ नका." आमच्या सुदैवानं यातल्या कोणाचाच फोन नंतरचे काही तास आला नाही. त्यामुळं कितीतरी तास अखंड गप्पा मारणारे अजितदादा आमच्या वाट्याला आले. इतके विनाव्यतय, की अखेरीस आमचे प्रश्न संपले तरी अजितदादा 'बसा हो', म्हणून नवीनच विषय काढायचे. अलिकडच्या तीन-चार वर्षांमध्ये जाहीर सभांमधून जे अजितदादा दिसू लागले होते, तेच मोकळेढाकळे, आरपार, पारदर्शक अजितदादा तेव्हा अनुभवले होते.
क्लिंट ईस्टवुडच्या गाजलेल्या वेस्टर्नपटाचं टायटल उसनं घेऊन त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं वर्णन करण्याचा मोह मला होतोय.
सिनेमाचं नाव आहे, 'द गुड, द बॅड अँड द अग्ली.'
अजितदादांच्या बाबतीत मी म्हणेन, ''मोस्ट ऑफ द टाईम ही वॉज द गुड, फ्यू टाईम्स द बॅड, बट ही वॉज नेव्हर अग्ली...नॉट ॲट ऑल!''
दिलेला शब्द आणि वेळ चुकूनही न चुकवणारा. पारदर्शक.
गुळमुळीत, तोंडदेखलं खोटं न वागणारा.
प्रचंड मेहनती. अथकपणे काम करण्याची आणि प्रवासाची क्षमता.
स्मरणशक्तीचं वरदान. आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा धनी. निर्व्यसनी.
राज्याच्या दृष्टीनं आवश्यक आर्थिक आणि विकासाच्या मुद्द्यांमध्ये अजिबात राजकारण न आणणारा.
आधुनिकतेचा स्वीकार करणारा. धर्मभोळेपणा-अंधश्रद्धा यांचा मनस्वी तिटकारा असूनही इतरांच्या श्रद्धा जपणारा.
ग्रामीण समाजकारण-अर्थकारणाचं जबरदस्त आकलन असणारा.
संसदीय राजकारणाच्या मर्यादा, नियमांचं काटेकोर पालन करणारा. जबाबदार.
विरोधकाच्या मतदारसंघात जाऊन "तू कसा निवडून येतो तेच बघतो," अशी राजकीय दमबाजी करणारी गावरान रग ठासून भरलेला.
थेट अंगावर जाणारा, कुटील नसणारा.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातीय विद्वेषाची दुर्गंधी नसणारा....हे सगळे गुण अजितदादांचे.
या पार्श्वभूमीवर मला असं स्पष्ट दिसतं, की अजितदादांच्या राजकीय जीवनाचे तीन टप्पे आहेत.
या प्रत्येक टप्प्यावरचे अजितदादा वेगवेगळे आहेत.
*******
१९९१-९९....
नव्वद ते १९९९ या काळातले अजितदादा राजकारणात नवखे, शरद पवार यांच्या पूर्ण छायेत प्रवास करणारे, या छायेतून बाहेर पडत स्वतःचा अवकाश निर्माण करण्यासाठी तयारी करणारे, राज्याच्या राजकारणातली स्वतःची जागा शोधणारे. सामान्य कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे असे आहेत. १९९१ मध्ये अजितदादा पुणे जिल्हा बँकेचे संचालक झाले. तेव्हाचे त्यांचे सहकारी सांगतात, की अजितदादा प्रत्येक बैठकीला तयारी करून यायचे. निर्धारीत वेळेआधी बँकेत उपस्थित राहायचे. बँकेचे अधिकारी, शेतकरी, जुने संचालक यांच्याशी चर्चा करून विषय समजावून घ्यायचे. जिथं काम करायचं, तिथं पूर्ण डोकं लावायचं, हा त्यांचा स्वभाव तेव्हापासूनचा. जिल्हा बँकेच्या राजकारणातून त्यांनी पुणे जिल्हा समजून घेतला.
जिल्हा बँकेच्या राजकारणातून ते थेट देशाच्या संसदेत पोहोचले. शरद पवारांनी सांगितलेला किस्सा असा - "एकदा अजित आणि त्याचे काही कार्यकर्ते-मित्र भेटायला आले. म्हणाले, अजितला लोकसभेची उमेदवारी पाहिजे. तेव्हा मी चिडून म्हणालो, ठीक आहे. तू हो खासदार. मी काटेवाडीला जाऊन गुरं राखत बसतो." अर्थात किस्सा सांगणारे पवार होते. त्यांनी त्यांच्या लाडक्या अजितचं पाणी फार आधीच ओळखलं असणार. हा लटका राग खांब हलवून बळकट करण्यासाठीचा होता. अन्यथा इतक्या सहजी अजित पवारांना बारामती लोकसभेची उमेदवारी मिळाली नसती. ती मिळाली अन् ते खासदारसुद्धा झाले. पुढं शरद पवारांना दिल्लीच्या राजकारणात जावं लागलं. त्यांच्यासाठी अजितदादांनी बारामती लोकसभेची जागा मोकळी केली अन् बारामती विधानसभेवर मांड ठोकली. काकांच्या पुण्याईमुळं पहिल्यांदाच निवडून आल्यानंतरही राज्याच्या मंत्रीमंडळात अजितदादांना संधी मिळाली. सत्तेची उब पहिल्याच आमदारकीला त्यांना मिळाली. या सत्तेचं आकर्षण त्यांना आयुष्यभर राहिलं. सत्तेशिवाय अजितदादा, सत्तेविरुद्ध अजितदादांचा संघर्ष याची कल्पनाच करता येऊ नये इतकं हे सत्तेचं आकर्षण गडद होतं. १९९५ मध्ये शिवसेना-भाजपाचं सरकार आलं आणि विरोधी बाकांवर बसण्याची पाळी अजितदादांवर आली. या दिवसांमध्ये सत्ताधाऱ्यांचे वाभाडे काढणारे, अभ्यासू भाषणं करणारे विरोधी आमदार अशी ख्याती अजितदादांची फारशी झाली नाही. मोठी झेप घेण्यापूर्वीचा हा काळ अजितदादांनी राज्याचं राजकारण समजून घेण्यात, विविध पक्ष-नेते आजमावण्यात, शिकण्यात आणि अनुभव गाठीस बांधून घेण्यात घालवला.
*******
१९९९-२०१४....
हा अजितदादांच्या राजकीय आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा काळ. या पंधरा वर्षात अजितदादांच्या महत्त्वाकांक्षा गगनाला भिडल्या. आर्थिकदृष्ट्या ते पॉवरफुल झाले. इतके की एका माजी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत गांभीर्यानं सांगितलं होतं, "या काळात महाराष्ट्रातले सर्वाधिक 'कॅश रिच' राजकारणी अजितदादा बनले. वेळप्रसंगी कितीही आमदार विकत घेता यावेत, इतकी रोख रक्कम या काळात अजितदादांनी गोळा केली होती." यात अतिशयोक्ती आहे, असं मानलं तरी एक वास्तव उरतं. ते म्हणजे आर्थिकदृष्ट्या राज्याचं राजकारण खेळवण्याची क्षमता अजितदादांनी याच काळात हस्तगत केली. निवडणुकीत रोख रकमेची ताकद देऊन आमदार निवडून आणायचे वा पाडायचे आणि आपला गट निर्माण करायचा, यासाठी अजितदादांनी धनशक्तीचा नेमका वापर केला. राज्याच्या अर्थमंत्रीपदाचा उपयोग आमदारांना अंकित करून घेण्यासाठी कसा करायचा, याचंही त्यांना अचूक भान होतं.
१९९९ मध्ये शरद पवारांना सोनिया गांधी यांच्या परकीयत्वाची आठवण झाली आणि त्यांनी वेगळी चूल मांडत राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. येथून अजितदादांच्या राजकारणातला दुसरा टप्पा सुरू होतो. निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेसनी आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्या वेळी शरद पवारांनी मंत्रीमंडळासाठी नवी फळी उतरवली. अजितदादा, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटील, आर. आर. पाटील इत्यादी. काँग्रेसकडून विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले होते. देशमुखांच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनीच हवा केली. इतकी की २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा 'राष्ट्रवादी'चे आमदार संख्येने जास्त निवडून आले. राज्याचे मुख्यमंत्री होण्याची अजितदादांपुढे चालून आलेली तीच पहिली आणि शेवटची संधी ठरली. पण तेव्हा काका दिल्लीतल्या राजकारणात दंग होते. महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद काँग्रेसला देऊन त्यांनी केंद्रातली मंत्रिपदं आणि राज्यातली महत्त्वाची खाती पदरात पाडून घेणं जास्त महत्त्वाचं मानलं. काकांच्या या राजकारणाबद्दल पुतण्याला पहिली तिडीक तेव्हा आली. उपमुख्यमंत्रीपददेखील आर. आर. पाटील यांच्याकडं सोपविण्याचा निर्णय काकांनी केला, तेव्हा त्याचं रुपांतर चिडचिडीमध्ये झालं.
राजकीयदृष्ट्या काका बरोबर होते. फाटक्या चड्डीच्या गोष्टी सांगणारा, झेडपी शाळेत शिकलेला, सामान्य कुटुंबातून मोठ्या कष्टानं पुढं आलेला नेता पक्षाच्या प्रतिमेसाठी जास्त आदर्श होता. त्या वेळी खासगीमध्ये फणफणणारे अजितदादा अनेकांनी ऐकले - "पक्षासाठी निधी आणायचा आम्ही. पक्ष चालवायचा आम्ही. संघटना वाढीसाठी राबायचं आम्ही अन् पदं मात्र नुसती भाषणं ठोकणाऱ्या बोलक्या पोपटांना. आम्ही पण काय सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाही."
पण ही चिडचिड बाजूला ठेवून अजितदादा काम करत राहिले. मंत्रीमंडळातही त्यांचाच आवाज मोठा होता. कारण सर्वाधिक आमदार पाठीशी राखण्यात त्यांनी विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड, अरुण गुजराथी अशा ज्येष्ठांना आणि आर. आर. पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील, सुनील तटकरे आदी समवयस्कांना मागं टाकलं. विरोधी पक्षांमधल्या महत्त्वाच्या नेत्यांची कामं चुटकीसरशी करुन त्यांनाही अनुकूल करून घेण्याची हातोटी अजितदादांनी या काळात साधली. या सगळ्या जोडीला वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये पक्षाला राजकीय यश मिळवून देण्याची लखलखती किनार होतीच.
अमर्याद सत्ता, अफाट पैसा आणि निर्विवाद यश हे कॉकटेल जबरी असतं.
बघता, बघता अजितदादांच्या फटकळपणाचं, स्पष्टवक्तेपणाचं रुपांतर उर्मटपणात, तुसडेपणात होण्यास वेळ लागला नाही.
सडेतोड आणि उद्धट यातली सीमारेषा धूसर असते.
मग सांगलीत अजितदादा म्हणाले, "राजू शेट्टींना का निवडून दिले? या पुढे असं चालणार नाही.'
एका कार्यक्रमात अजितदादांच्या स्वागताला लोकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत. तेही त्यांना खटकलं. ''सभेला आलेले लोक झोपले असल्यानं टाळ्या वाजल्या नाहीत,'' असं ते बोलले.
एका सभेत अजितदादांनी लोकांना सुनावलं, "तुम्ही आम्हाला मतं द्या. विकासकामं भरभरून करतो. फुकटात वाटायला आम्ही साधू-संत नाही.''
एका स्थानिक बंधाऱ्यावरचा रस्ता दोन वाहनं जातील इतपत रुंद करावा, अशी लोकांनी मागणी केली. त्यावर अजितदादा म्हणाले, "आम्हाला मतं दिली तर एका वेळी दोन कंटेनर जातील, अशी व्यवस्था करू. आमच्याशी दगाबाजी केली तर सायकलसुद्धा जाणार नाही, याची व्यवस्था करू.''
'सत्ताधारी म्हणजे जनतेचा मालक नाही,' याचा विसर अजितदादांना पडण्याचा हा काळ. याच काळात सर्वसामान्य कार्यकर्ते आणि सामान्य जनता यापासून अजितदादा दुरावत असल्याची खंत पक्षातील काही ज्येष्ठ याच काळात दबक्या आवाजात व्यक्त करू लागले. तुमची आर्थिक पत किती मोठी, यावरून अजितदादा तुम्हाला किती जवळ करणार हे ठरतं, हे 'राष्ट्रवादी'चेच कार्यकर्ते खाजगीत सांगू लागले. कंत्राटदार, ठेकेदार, जमिनींचे व्यवहार करणारे, बांधकाम व्यावसायिक, धनिक अशांच्या गराड्यात अजितदादा दिसू लागले. येणाऱ्या फाईलींमधल्या आकड्यांमध्ये त्यांना जास्त रस वाटू लागला. मग सामान्य कार्यकर्त्यांशी हिडिसफिडीस, कार्यकर्त्यांना झटकणं, सर्वसामान्य लोकांकडं दुर्लक्ष हे वारंवार घडू लागलं. पण सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, म्हणून दुभत्या गायीच्या लाथा लोक गोड मानून घेऊ लागले. अजितदादा या भ्रमात राहिले, की 'आपली स्टाईल लोकांना आवडते.'
अजितदादांच्या बेताल वक्तव्यांचा कडेलोट कुप्रसिद्ध 'धरण' विधानानं झाला.
मग त्यांचा तो कराडच्या प्रीतीसंगमावरचा आत्मक्लेश.
पण वळणाचं पाणी वळणाला गेलंच. अजितदादा फार लवकर पूर्वपदावर आले.
इतके, की थेट मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर फाईल भिरकावून देत त्यांनी ती न वाचताच 'सही करा,' अशी अपेक्षा धरू लागले.
प्रशासनावर पकड, अधिकाऱ्यांवर वचक वगैरे ज्यांचे गुण सांगितले जातात, त्याच अजितदादांच्या कार्यकाळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचं मातेरं झालं. महाराष्ट्राच्या सहकारी बँकिंग क्षेत्राचा कणा असणारी ही शिखर बँक सलग पंधरा वर्षं अजितदादांच्या हुकूमावर डुलत होती. तरी एका मागून एक बीड, नांदेड, धुळे, नंदुरबार, नाशिक, बुलढाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, नागपूर या जिल्हा सहकारी बॅंका बरखास्त होत गेल्या. शेवटी रिझर्व्ह बँकेनं दणका दिला. गंमत म्हणजे त्या वेळी काका दिल्लीत होते. नुसते होते असं नव्हे तर त्यांच्या शब्दाला वजन होतं. तरी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बरखास्तीची कुऱ्हाड कोसळली. तेव्हा अजितदादा राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसमधले क्रमांक दोनचे नेते...तरी त्यांच्या अधिपत्याखालील बँक बरखास्त होते? अजितदादांच्या अंगाचा तिळपापड झाला. पण चरफडण्याशिवाय ते काहीही करू शकले नाहीत. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रिझर्व्ह बँकेच्या कारवाईत हस्तक्षेप केला नाही. कारण या बँकेत सरळ काही घडतच नव्हतं. अजितदादांचेच चेले बँकेचे अध्यक्ष होते. या महाशयांनी स्वतःची पत्नी आणि मुलीच्या नावावर असणाऱ्या कंपनीला कोट्यवधींची कर्जं दिली. मुलाच्या घरासाठी लाखो रुपये दिले. दहा साखर कारखान्यांकडून राज्य बँकेला साडेपाचशे कोटी रुपये येणं होतं. पत नसल्यानं कारखान्यांच्या लिलावाचा निर्णय झाला. यंत्रसामग्री आणि स्थावर मालमत्तेसह कवडीमोल दराने कारखाने विकले गेले. घेणारे आणि विकणारे यांच्यात साटंलोटं असल्याचं लोक म्हणू लागले. पण सिद्ध काहीच झालं नाही. कारण सगळा व्यवहार नियमात बसवून झाला. राज्य बँकेला खड्डा पडला पण तोही कायद्याच्या कचाट्यात कोणी येणार नाही, याची काळजी घेऊन. अजितदादांची 'धडाकेबाज कार्यक्षमता' दिसली ती अशी.
१९९९ ते २०१४ या सत्ताकाळात विजयसिंह मोहिते-पाटील, छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांच्यानंतर अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी काकांनी दिली. तीही सहज नाही. त्यासाठी मंत्रीमंडळातून राजीनामा देण्याची खेळी अजितदादांना करावी लागली. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांनी राजीनामा दिला आणि उपमुख्यमंत्री म्हणूनच कमबॅक केलं. हे पदासाठी ते आग्रही राहिले नसते तर ते उपमुख्यमंत्री बनले नसते. सत्तेच्या पंधरा वर्षांमध्ये अजितदादांनी सहकारी साखर कारखानदारी आणि ग्रामीण अर्थकारणावर मजबूत पकड निर्माण केली होती. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा पाया विस्तारला तो अजितदादांच्या मेहनतीमुळं.
सलग पंधरा वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमधील सर्वात बलशाली मंत्री अजितदादा होते. राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरचे क्रमांक एकचे नेते ते बनले याच काळात. या पंधरा वर्षात समोरून विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण असे ज्येष्ठ मुख्यमंत्री होते गेले, पण या मुख्यमंत्र्यांइतकीच शक्ती अजितदादा राखून होते. साहजिकच राष्ट्रवादीची स्थिती ‘दादा बोले, पक्ष हाले,’ अशी झाली. एक शरद पवार सोडले तर अजितदादांपुढं कोणाचीच टाप नव्हती. आर. आर. पाटील एकदा हसत-हसत आम्हाला म्हणाले, "सांगलीला जायाचं झालं तर आम्ही बायपासनं पुण्याला टाळून जातो. पुण्यात यायचं असेल तर अजितदादांची परवानगी घेऊनच येतो." अजितदादांशी गप्पा मारत असताना सोलापूर जिल्ह्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याचा विषय निघाला. वयानं ते अजितदादांना सिनिअर. पण त्यांचा एकेरीत उल्लेख करत अजितदादा आम्हा पत्रकारांना म्हणाले, "xxxयाला असा उभा कापला ना, तरी त्याच्यातून अजित पवार बाहेर पडेल." त्यावेळचा अजितदादांचा तोरा पाहण्यासारखाच होता. असेच एक वयानं सिनिअर मंत्री पुण्यातल्या कौन्सिल हॉलमधली बैठक संपल्यानंतर, त्यांच्या वयाला न शोभणाऱ्या वेगानं धावत, अजितदादांकडं गेले. अजिजीनं त्यांच्या पुढ्यात उभं राहून सोबत भोजन करण्यासंदर्भात विनवू लागले. वेगानं गाडीत बसता-बसताच अजितदादांनी ज्या पद्धतीनं त्यांना झापलं, ते पाहून, "कुठून अवदसा सुचली आणि अजितदादांना भोजनाचं निमंत्रण द्यायला गेलो," असं त्या मंत्रीमहोदयांना वाटलं. असे पुष्कळ प्रसंग आठवतात. या पंधरा वर्षांच्या काळात अजितदादांना त्यांचे कार्यकर्ते, नेते वचकून असायचे, ते चारचौघांत त्यांच्याकडून आपला पाणउतारा होऊ नये म्हणून.
अजितदादांचं हे वागणं काकांना पसंत होतं का? माहीत नाही.
पण त्यांनी हे सगळं चालवून घेतलं, चालू दिलं हे खरं.
कारण पुतण्या जबरदस्त रिझल्ट्स मिळवून देत होता.
बारामतीची काळजीच करण्याचं कारण अजितदादांनी शिल्लक ठेवलं नव्हतं.
बारामतीचा विकास कधी नव्हे इतक्या वेगानं त्यांनी करून दाखवला होता. बारामतीकरांची कोणतीही कामं त्यांनी अडू दिली नव्हती. कशालाच निधी कमी पडत नव्हता. पुणे जिल्ह्यात रामकृष्ण मोरे या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याची सद्दी अजितदादांनी संपवली. पुणे जिल्हा बँक, जिल्हा परिषद, पुणे शिक्षण मंडळ, दूध संघ अशा प्रत्येक संस्थांमध्ये अजितदादांनी मांड ठोकली. पिंपरी-चिंचवड महापालिका अजितदादांनी पंखाखाली घेतली. 'पुणे पॅटर्न'च्या माध्यमातून पुणे महापालिकेतून काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्तेला हादरा दिला तो अजितदादांनीच. जिल्ह्यातले सर्वाधिक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचेच. इतकं चौफेर यश तर शरद पवार यांनाही स्वतःला कधी पुणे जिल्ह्यात मिळवता आलं नव्हतं. अजितदादांनी हे सगळं संघर्षातून, अथक मेहनतीतून मिळवून दाखवलं आणि टिकवलंही. गाव, जिल्हा, पश्चिम महाराष्ट्र हे सगळं अजितदादा ज्या समर्थपणे हाताळत होते, त्यामुळं काकांना दिल्लीत बिनघोर राष्ट्रीय राजकारण खेळण्याची संधी मिळाली होती. १९९१ पासून अजितदादांनी ज्या वेगानं राजकारणात मुसंडी मारली, त्याचा भक्कम आधार काकांना निर्विवादपणे मिळत होता. शरद पवारांचा हात पाठीवर होता, म्हणून अजित पवार यशस्वी होऊ शकले, हे अर्धसत्य. अजितदादांच्यात धमक होती, कर्तबगारी होती. म्हणून तर मिळालेल्या संधीचं त्यांनी सोनं करून दाखवलं.
*******
२०१४-२०२६....
२०१४ मध्ये आधी केंद्रात अन् मग राज्यात ऐतिहासिक सत्तापालट झाला.
त्यानंतर कमालीचे शक्तिमान भासणाऱ्या अजितदादांचा आलेख वेगानं घसरला.
अजितदादांचा बहुचर्चित दरारा, धाक, आब हा फक्त सत्तेतून निर्माण झाला, असं वाटण्याइतपत ते सामान्य नेते भासू लागले.
राजकीय सत्ता नसताना नेत्याचं मोठेपण खऱ्या अर्थानं लक्षात येतं.
सन २०१४ नंतर ‘अजित पवार’ या नावातली जादू जणू आटली.
पुणे जिल्ह्यातले ‘राष्ट्रवादी’चे मातब्बर आमदार, नगरसेवक यांच्यासह अनेक ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी अजितदादांची साथ सोडून सत्ताधारी भाजपाशी घरोबा केला. "उभा कापला तर त्याच्यातून अजित पवार बाहेर निघेल," अशी दर्पोक्ती ज्याच्याबद्दल अजितदादांनी केली होती, तो ज्येष्ठ मंत्रीसुद्धा भाजपाच्या दारात जाऊन उभारला होता. अजितदादांचं नाव घेऊन त्यांच्यावर बेलाशक टीका करणारी मंडळी पूर्वी फक्त शेतकरी संघटनेत सापडायची. आता अजितदादांचे माजी सहकारीसुद्धा हे धाडस खुलेआम दाखवू लागले. २०१४ च्या अभूतपूर्व मोदी लाटेनंतर ‘राष्ट्रवादी’ला महाराष्ट्रातल्या अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारसुद्धा मिळू शकले नाहीत. सन २०१४ नंतर अजितदादांना न जुमानणाऱ्यांची संख्या वेगानं वाढली. पंढरपुरातून प्रशांत परिचारक यांनी विधानपरिषद निवडणुकीत अजितदादांच्या उमेदवाराला चारलेली धूळ असेल किंवा सातारा-सांगलीतून विधानपरिषदेवर मोहनराव कदम यांनी मिळवलेलं यश असेल, हे दोन्ही विजय अजितदादांना झोंबणारे ठरले. बालेकिल्ला असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातच ‘राष्ट्रवादी’चा पाया खचत चालल्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसले. याची थेट जबाबदारी पक्षाचे कर्ते-धर्ते असणाऱ्या अजितदादांवरच जात होती.
सत्तेत नसणारे अजितदादांनी स्वतःमध्ये बदल घडवले. ते कार्यकर्त्यांचं ऐकू लागले. भाषा मवाळ झाली. सत्ताधाऱ्यांशी जुळवून घेऊ लागले. १९९१ पासूनच्या कारकिर्दीत १९९५-९९ आणि २०१४-१९ हा काळ विरोधी बाकांवर बसण्याचा. पण या दुसऱ्या टप्प्यात सत्तेत जाण्यासाठीचं संधान त्यांनी साधलं. "राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्या सोयरिकीला काकांचा नेहमीच पाठिंबा होता. त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही भाजपाशी वाटाघाटी करत होतो," हे त्यांनी नंतर स्पष्ट केलं. त्याच घालमेलीतून सकाळच्या शपथविधीचं नाट्य घडून गेलं. काका-पुतण्यातला तीव्र विसंवाद पहिल्यांदाच चव्हाट्यावर आला. त्यानंतरचा इतिहास ताजा आहे. अजितदादांनी २०१९ नंतर स्वतःच्या क्षमतांवर विसंबून राजकीय निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं. ढासळत्या वयातल्या काकांनी पक्षाची सूत्रं पूर्णतः ताब्यात द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. ते होत नाही म्हटल्यावर वेगळी चूल मांडली. लोकसभेला दणका मिळाला पण विधानसभेला विजय चाखता आला.
या राजकीय घडामोडींमध्ये सर्वसामान्यांसाठी अजितदादा हे लाडकं व्यक्तिमत्त्व बनत गेलं, ते त्यांच्या नर्मविनोदी भाषणांमुळं. हजरजबाबी मिश्कील उत्तरांमुळं. शेवटच्या कालखंडातले अजितदादा लोकांमध्ये सहज मिसळणारे. संवदेनशीलतेनं लोकांचं म्हणणं ऐकून घेणारे. अर्ज-कागद घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला वेळ देणारे. होणारं काम झटकन मार्गी लावणारे. 'कामाचा माणूस', 'सहज उपलब्ध होणारा माणूस' म्हणजे अजितदादा हे समीकरण लोकांमध्ये रुळलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या तगड्या नेत्यांच्या स्पर्धेत आपण कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी अजितदादा घेत होते. आजची तरुण पिढी जाहीर सभांमधून, सार्वजनिक ठिकाणी अजितदादांना थेट भेटून काहीही विचारण्याचं धाडस दाखवू लागली. अजितदादाही प्रत्येकाला उत्तर देऊ लागले. शेवटी असं आहे, की पूर्वी अजितदादा कसे होते, यापेक्षा आज ते कसे वागतात, हे महत्त्वाचं. बिनचेहऱ्याच्या गर्दीच्या गराड्यातील अजितदादा, हे चित्र नियमित दिसू लागलं होतं. त्यामुळं माणसाळलेले, लोकाभिमुख अजितदादा हे रूप अधिक लोभस होतं. पण मधूनच पुण्यातल्या वतनाच्या जागेच्या बेकायदा खरेदी व्यवहारासारखी एखादी बातमी पुढं यायची अन् चिंता वाटायची. डागाळलेल्या मंत्र्यांविरोधात तातडीनं कारवाई अपेक्षित असताना अजितदादांची नेहमीची कडक शिस्त नरम पडलेली दिसायची अन् शंका निर्माण व्हायची.
सत्तरीकडं चाललेल्या अजितदादानं सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुलाबी जाकिटानं आत्मविश्वास वाढवला होता. विधानसभेचं यशसुद्धा एकदम गुलाबी होतं. मुख्यमंत्रीपदासाठी झुरत बसण्याऐवजी मिळालेल्या संधीचं सोनं करण्याच्या इराद्यानं अजितदादा झपाट्यानं कामाला भिडल्याचं दिसत होतं. पहिल्या खासदारकीच्या आणि त्यानंतर विधानसभेच्या सलग आठ निवडणुकांमध्ये अपराजित राहिलेल्या अजितदादांबद्दल आदर होता. करून दाखवणारे कर्तबगार नेते आधीच अतिदुर्मीळ. अजितदादा त्या जातकुळीतले म्हणूनही त्यांच्याबद्दल आदर होता. कार्यमग्न नेता अकाली गेल्यानं खऱ्या अर्थानं पोकळी निर्माण होते. हा धक्का केवळ बारामती आणि पवार कुटुंबियांपुरता मर्यादित नाही. ही पोकळी नव्या समीकरणांना जन्म देणार आहे. महाराष्ट्राला अजितदादांची उणीव दीर्घकाळ भासेल.
(सुकृत करंदीकर पत्रकार आणि लेखक आहेत. केसरी, लोकसत्ता, लोकमत, दिव्य मराठी व सकाळ या वृत्तपत्रांसाठी त्यांनी काम केले आहे.)
छान सर्वान्गीण लेख
छान सर्वान्गीण लेख