Skip to main content

आदिमपूर्व

जीवो जीवस्य जीवनम्
हे काही आदिम सत्य नव्हे
भक्ष्य आणि भक्षक यांपूर्वी होतं
एक विश्व - शांततेचं, अहिंसेचं

रेलचेल होती पोषक तत्त्वांची
तेव्हाच्या आदिमपूर्व सागरात
अन् त्यांचं निरिच्छेने ग्रहण करत
तत्कालीन जीव -
तबकड्यांसारखे
नेच्याच्या पानांसारखे
ठिगळांच्या गोधडीसारखे

त्यांना नव्हती महत्वाकांक्षा
नव्हती कसली भीती
अन् नव्हत्या विवंचना

अथांग काळाच्या पडद्याआड
ते नाहीसे झाले

आणि आपण —
त्यांचे वारस असल्याचा दावाही करू शकत नाही

तेवढे स्थितप्रज्ञ आपण नाही
आणि होऊही शकत नाही

पण —

त्यांना उमजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो
आठव ठेवू शकतो -
एडियाकारन बायोटाचा