Skip to main content

उत्सवांच्या गर्दीत झाकोळलेले सण

संकल्पना

वाचा आणि भाषा हे माणसाला इतर प्राणिमात्रांपासून वेगळं ठरवत असतील तर उत्सव या कॅटेगरीलापण माणसाच्या वेगळेपणाशी जोडलं पाहिजे. अर्थात माकड, हत्तींसारखे माणसाचे अनेक सहचर प्राणी एकमेकांशी संवाद नक्कीच साधतात. काही विशेष घडल्यास एकत्र येऊन आरोळी ठोकतात, छाती बडवतात, वगैरे. अन्न मिळालं, टोळीतल्या किंवा झुंडीतल्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला, पाऊस आला, दुसऱ्या टोळीबरोबर किंवा प्राण्यांच्या झुंडीबरोबरची लढाई जिंकली, वगैरे प्रसंग त्यांना एकत्र येण्यासाठी प्रेरित करतात. आपला आनंद किंवा दुःख, आपल्या विजयावर किंवा पराभवावर शिक्कामोर्तब करताना हे प्राणी एकत्र येतात पण माणसांसारखे अतर्क्य आणि अनावश्यक उत्सव माणसांनाच माहीत. आर्यांच्या पूर्वी भारतात अस्तित्वात असलेल्या मोहेंजोदरो, हराप्पा, राखीगढी वगैरे ठिकाणी सापडलेल्या सिंधुसंस्कृतीत मोठी देवळंच मिळाली नाहीत म्हणे. ते मातृदेवतेला पूजत, निसर्गाची पूजा करत. तिथल्या सार्वजनिक स्नानगृहांमध्ये काही विधी होत असतील कदाचित पण एकूणच उत्सवांचा गजबजाट नव्हता त्या काळी. सगळे आयुष्य माणसाच्या सोयी-सुविधांशी निगडित होते. हे उत्सव, सण, तिथी, वार आणि त्या त्या दिवशी करायचे विधी ही पद्धत सुरू झाली ती आर्यांची संस्कृती रुजल्यानंतर. ही हजारो वर्षांची परंपरा आता इतकी खोलवर रुतली आहे. आज समाजातला एक वर्ग उत्सव साजरा करतो आणि दुसरा वर्ग ते संपण्याची वाट बघतो.

 

उत्सवांचा बकालपणा किमान काही अंशी सौंदर्याच्या ध्यासापायी, ग्रँजरच्या (grandeur) हौसेपायी आला आहे हे नक्की. हाच यातला विरोधाभास आहे. उत्तमोत्तम गोष्टींच्या नादापायी उत्तम गोष्टीच दिसेनाश्या झाल्या आहेत. जास्तीत जास्त सजावट हवी, जास्तीत जास्त उंचीची मूर्ती हवी, मोठ्यांत मोठा स्टार यायला हवा आरतीला, सगळ्यांत उंच दहीहंडी हवी, जास्तीत जास्त रकमेचं बक्षीस हवं, मोठ्यात मोठा डीजे हवा… ही जास्तीत जास्त आणि मोठ्यांत मोठ्याची हौस काही फिटत नाही. ज्यांच्या खिशात पैसे खुळखुळतात त्यांच्या घरी ते ही हौस करतात आणि ज्यांच्या खिशात खुळखुळ कमी ते ही भव्यता सार्वजनिक स्तरावर किंवा सोशल मिडियावर अनुभवतात. उत्सव रस्त्या-रस्त्यांवरच साजरे होत नाही आहेत, ते समाजमाध्यमांच्या आभासी जगातही आहेतच. 

 

बाणगंगेत मेलेले मासे
बाणगंगेत मेलेले मासे

पितृपक्ष संपल्यावर नेहमी वर्तमानपत्रांत एक बातमी येते – बाणगंगा तलावातले शेकडो मासे मेले. अर्थात ही बातमी लोकांना फार बोचू नये म्हणून – मासे 'मृत्युमुखी' असे म्हटले जाते. थोडक्यात माणसाच्या मेलेल्या पूर्वजांना शांतता लाभावी म्हणून माणूस जी फुलं, कणीक, हळद, कुंकू वगैरे किलोकिलोनं तलावात ढकलतो त्यामुळे पितरं आनंदी होतात की नाही माहीत नाही; पण मासे मरतात हे स्पष्ट आहे. काही वर्षांपूर्वी क्रोएशिया देशात जगातली सगळ्यांत छोटी नदी बघितली. तिचा उगम समुद्रापासून अवघ्या काही मीटरवर होतो, आणि ती लगेच समुद्राला मिळते. त्या दृश्यात फार काही भावणारं असं वेगळं नव्हतं. जाणवली ती आजूबाजूची असंख्य अंजीराची झाडं. तेवढ्यात तहान लागली आणि एका माणसाला पाणी कुठं मिळेल असं विचारलं. तो जोरात हसला आणि त्यानं त्या नदीतले पाणी ओंजळीत घेऊन पिऊन दाखवलं. ही नदी शहरात होती, वस्तीच्या आसपास होती, तरी पाणी निर्मळ होतं. आपल्या देशात असं नाही. नदी आपली पापं धुऊन काढते किंवा पितरांना शांती देते असल्या कोणत्याही विचारांनी तिथली माणसं दूषित झालेली नसल्यामुळे तिची बाणगंगा झाली नव्हती. 

 

आपण असेच आहोत. सणा-वारांबद्दल बोलताना त्यांचा कसा निसर्गाशी संबंध आहे; आपले पूर्वज शास्त्रीयदृष्ट्या किती सजग होते, वगैरे गप्पा मारताना पुढे; पण ते साजरे करताना मात्र आजूबाजूच्या निसर्गाला, वस्तीला, प्राण्यांना न जुमानणारे. आता तर सगळे सण साजरे करण्याची स्पर्धा आहे. घरगुती सण कुठले आणि सार्वजनिक कुठले असे वाटावे इतकी गडबड सणवाराच्या काळात, विशेषतः श्रावण आणि त्यानंतरच्या तीन-चार महिन्यांत असते. या काळात बाजारात भाजी घ्यायला जाणंसुद्धा त्रासदायक असतं इतकी गर्दी असते. गेल्या काही वर्षांत तर ही सामूहिक बेजबाबदारी एवढी वाढली आहे की सणवार सर्वार्थांनी दमवतात. या गर्दीचं समर्थन करताना सणांशी संबंधित असलेली अर्थव्यवस्था विचारात घ्यायला हवी असा युक्तिवाद केला जातो. त्याला विरोध करता येणे शक्य नाही, कारण भरल्यापोटी या दुकानाची काय गरज किंवा त्या विक्रेत्यांची काय गरज असं मी म्हणू शकते, त्यांची पोटं भरण्याची व्यवस्था करू शकत नाही.

 

धर्म माणसाच्या आयुष्यात सर्वोच्च स्थानी आहे असं जगभरात मानतात. आपणही काही वेगळे मानत नाही. भारतात हिंदू बहुसंख्य तरी हिंदू धर्म हा वेगवेगळ्या विचारप्रणाली एकत्र करतो. अगदी नास्तिकही हिंदू असतात; हे अभिमानानं सांगणारे आपण गेल्या काही वर्षांपासून एकाच प्रकारच्या धर्माला धर्म म्हणून सामाजिक मान्यता देत आहोत. हा नवा हिंदू धर्म उत्सवांचा आवाज सर्वदूर पोचला पाहिजे अशी मागणी करतो; इतर धर्मीय आपल्या धर्माच्या रिती पाळू शकत नाहीत असे फतवे काढतो; शाकाहाराचं उदात्तीकरण करतो. खरं तर फार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात हिंदू ही जगण्याची पद्धती आहे असे म्हटल्या गेले. यात या धर्माची सर्वदूर व्याप्ती अधोरेखित झाली. माझ्यासारखे, धार्मिक विधीतून समाज समजून घ्यायचा प्रयत्न करणारे पण देवाची आराधना न करणारेसुद्धा, या व्याख्येत सहभागी झाले. माझ्या आजूबाजूचे बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम आणि इतर धर्मीय या व्याख्येत कुठे तरी बसत होते. आजही ते या व्याख्येत आहेतच. सण-उत्सव साजरे होण्यासाठी बाजारात जी उलाढाल होते त्यात हिंदूंबरोबरच इतर धर्मीय मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. तरी ते 'आपल्यांतले' नाहीत हा समज आहेच.

 

या व्याख्येत सहभागी असलेल्या पण आपले वेगळे अस्तित्व राखणाऱ्या जैन धर्मीयांनी गेल्या दोन दशकांत स्वतःला धार्मिक उतरंडीत सर्वांत वरचे स्थान दिले आहे. जैन आणि हिंदू यांच्या अनेक गोष्टी समान आहेत. आपल्या वेगळ्या धार्मिक चालीरीतींबरोबरच जैनधर्मीय हिंदू सण-उत्सवही साजरे करतात. अनेक अर्थांनी हे दोन्ही धर्म एकजिनसी आहेत. फरक हा आहे की आपल्या आहाराबद्दल जैन धर्मीयांचा आग्रह त्यांच्यापुरताच राहिला नाही. आपल्या आसपास आपल्या धार्मिक भावनांना छेद देणारा आहार घेणारे लोक त्यांना मान्य नाहीत. त्यांच्याकडे आर्थिक सत्ता नेहमीच कमी-जास्त प्रमाणात होती पण गेल्या दोन दशकांत सामाजिक आणि राजकीय सत्तासुद्धा हातात आल्यामुळे समाजाचे शाकाहारी आणि मांसाहारी असे विभाजन झाले आहे.

 

या सगळ्या बदलांत भारतातला मोठा समाज उत्सवांच्या कर्कश आवाजात रममाण झाला आहे. हा समाज मोठा आहे की उत्सवी आवाज मोठा आहे हे कळणं कठीण आहे. उत्सव सार्वजनिक व्हायला राजकीय कारणं आहेतच. ते सार्वजनिक झाल्यामुळे झालेलं प्रबोधन आणि राजकीय मंथन वादातीत आहे. प्रश्न हा त्यांच्या आजच्या काळातल्या रेलव्हन्सचा आहे. या बेभान उत्सवांना समाजातून विरोधही होत आहे. हा विरोध परिणामकारक नाही कारण उत्सवांना लागणारी रसद त्यांना राजकीय नेत्यांकडून मिळते. कोणत्या प्रकारच्या व्यावसायिकानं उत्सवांना मदत द्यावी याबद्दल फारसे नियम नाहीत. मंडळांना मिळणारी वर्गणी, कपडे, रोषणाई, आवाजाची साधनं, फटाके आणि यावर्षी बातम्यांमुळे चर्चेत आलेली नशेची साधनं ह्या सगळ्या गोष्टी उत्सव काळातल्या अर्थकारणाचा अविभाज्य भाग आहेत. उत्सव सार्वजनिक हवे असल्यास ते समाजासाठी काय उद्देश साध्य करतात हा प्रश्न आता उत्सवांमुळे वैतागलेली सर्वपक्षीय जनता करत आहे. पण हा प्रश्न विचारताना आपण ज्या राजकीय पक्षांना पाठिंबा देतो ते उघडपणे उत्सवांच्या दणदणाटाचा विरोध करत आहेत का हे बघणंही महत्त्वाचं आहे. हा आवाज वाढायला सण-उत्सवांच्या फुक्या मोठेपणात जनतेला गुंतवून ठेवून स्वतःची पोळी भाजणाऱ्या उजव्या शक्ती कारणीभूत आहेत का? हा प्रश्नही विचारला गेला पाहिजे. 

गणपती विसर्जनाची गर्दी

विद्यानंद बापट नावाच्या माणसानं कित्येक वर्षं गणेशोत्सव काळात होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाबद्दल आवाज उठवला होता; तो आवाज यंदा सोशल मीडियावर व्हायरल झाला. अत्यंत शांतपणे माध्यमांशी बोलणारे बापट त्यांच्या विशिष्ट व्यक्तिमत्वामुळे रातोरात लोकप्रिय झाले. ध्वनिप्रदूषणाबरोबरच त्यांनी व्यक्त केलेली धर्माबद्दलची मतं समाजातल्या एका मोठ्या वर्गाला न पटणारी होती. असं असलं तरी आवाजांना कंटाळलेल्या लोकांनी बापटांना पाठिंबा दिला. पुण्यात मोर्चे निघाले, काही ऐनवेळी रद्द झाले. काही जणांच्या मते २०२६चा गणेशोत्सव बऱ्यापैकी शांत होता, डीजेमुक्त होता. पण नारायण पेठेत बापटांच्या घरासमोर मिरवणुकीत नाचणाऱ्यांनी अत्यंत अभद्रपणे बापटांच्या विरोधात नाच केला. एक गोष्ट नक्की होती की धर्म आमचा सर्वांचा आहे; देवाला आम्ही सगळे मानतो; पण देवाधर्माच्या नावाखाली चाललेल्या सगळ्या गोष्टी मानणार नाही असं यावर्षी महाराष्ट्रातल्या एका वर्गानं ठणकावून सांगितलं. फक्त हा आवाज सध्याच्या राजकीय प्रबळ शक्तींपुढे पुरता फिका पडला आहे. बिहार आणि उत्तरप्रदेशात ज्या प्रकारे कामुक हावभाव करणाऱ्या मुलींना धार्मिक आणि राजकीय उत्सवात आणले जाते, तो प्रकार या वर्षीपासून महाराष्ट्रात सुरू झाला आहे. या स्त्रीद्वेष्ट्या आणि प्रतिगामी गोष्टींच्या समावेशाचा परिणाम येणाऱ्या पिढ्यांवर गंभीरपणे होऊ शकतो; इतकंच नाही तर महाराष्ट्राला लाभलेल्या प्रबोधनाचा ठसा मिटवू शकतो. 

 

आर्यांच्या सणांचा इतिहास'आर्यांच्या सणांचा इतिहास' हे पुस्तक १९१६ साली प्रकाशित झालं. यात ऋग्वेदींनी अतिशय काटेकोरपणे हिंदू  सणांचे वर्गीकरण केलं आहे.१ 

१. ऋतूंवरून प्रचारात आलेले सण – अक्षयतृतीया, नवरात्र, विजयादशमी, दीपावली, मकरसंक्रांत, होळी, शिमगा, वगैरे.

२. अवतारासंबंधी सण – श्रीरामनवमी, परशुरामजयंती, कृष्णजन्माष्टमी, दत्तजयंती, हनुमानजयंती, वगैरे (यात आता आपण महापुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या वाढवू.) 

३. कौटुंबिक – वटसावित्री, मंगळागौर, पिठोरी अमावस्या, हरितालिका, ऋषिपंचमी

४. शैव – त्रिपुरी पौर्णिमा, महाशिवरात्री

५. वैष्णव – महाएकादशी, वैकुंठचतुर्दशी, दोलोत्सव

६. देवीचे सण – गौर्युत्सव, ज्येष्ठगौरी, ललितपंचमी, सरस्वतीपूजन, देवीनवरात्र

७. सौर – रथसप्तमी

८. गाणपत्य – गणेशचतुर्थी 

९. व्रतांचे आणि पर्वणीचे दिवस – श्रावणी सोमवार, कपिलाषष्ठी, वगैरे 

 

एकूणच भारतातला बहुसंख्य समाज सणांना महत्त्व देतो. वर्षभरातल्या प्रत्येक ऋतूत ते साजरे करतो. या सणवारांत अनेक व्रतं आहेत. अमुकतमुक केलं तर पुण्य लाभेल हा समज आहे. सण साजरा केला तर घरात आनंद उत्साह नांदेल; लहानांना पद्धती कळतील; त्यांच्याकडे परंपरा सोपवता येईल हा विचार आहेच. जो धर्म वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्यात पाया निर्माण करतो, त्याच्या बळकटीसाठी असेल किंवा फक्त बरं वाटावे म्हणून असेल… सण साजरे होणारच. 

 

पण जगण्यातल्या सगळ्या गोष्टी सार्वजनिक नसतात. काही रितीभाती असतात, काही सोहळे असतात, काही पद्धती असतात. त्या घरी, शेतात, जंगलात साजऱ्या करायच्या असतात. त्यात आनंद असतो पण त्याची जाणीव त्या व्यक्तीला, कुटुंबाला होत असते. सार्वजनिक किंवा मोठ्या प्रमाणात साजरे न होणाऱ्या कोणत्या गोष्टी अशा आहेत ज्या जगणं सेलिब्रेट करतात हा विचार करत असताना वाचलेले, ऐकलेले, अनुभवलेले अनेक सोहळे आठवले. 

 

असे सोहळे, लग्न, जन्म, मृत्यू वगैरे आदिवासी साजरे करताना आजही जंगलाशी नाळ धरून आहेत. त्यात त्यांच्याबरोबर जंगलातील झाडं, फुलं सामील होतात. बरोबर रामायणातल्या, पानाफुलांच्या गोष्टी असतात, गाणी असतात. उदाहरण द्यायचं झालं तर डोहाळ्याच्या सोहळ्याचंही गाणे आहे. नवरा बायकोची इच्छा कशी पूर्ण करतो, हे कवठाच्या गाण्यात आहे. 

 

तिची सखी म्हणते – 

पहिल्यांने गरभार, आवड झाली कवठाई, 

तुझ्या पिरतीचा शाई (नवरा), 

शोधलो आंबराई…२

आता सागाची लागवड वाढली, तेंदूची लागवड वाढली, आदिवासींचा जंगलाशी असलेला संबंध कमी झाला; मुलं शिकायला, नोकरीला बाहेर पडली तरी या पद्धतींतून, गाण्यांतून तो टिकून आहे आणि शहरी सणासमारंभांच्या तुलनेत हे सारं काही साधं आहे. हे साधेपण समाजातल्या इतर वर्गातही, विशेषतः शेती करणाऱ्या वर्गात काही अंशी दिसतं. ते तसंच राहिलं तर बरं. नाही तर प्रत्येक सण साजरा करण्याच्या नादात आहे तो साधेपणा आणि साधेपणातले सौंदर्य संपेल.

 

सण साजरे करायचे म्हणजे त्यात विधी, रीतभात हवी. यातल्या बहुतेक सणांच्या रितींत आजूबाजूची परसबाग, जंगल, शेत या परिसरांचा समावेश आहे. देवाची पूजा करताना ज्या वस्तू लागतात, त्या आणि माणूस एकसंध असावेत एवढ्या त्या माणसाच्या जगण्याचा भाग होत्या. उदाहरण घ्यायचं झालं तर मंगळागौरीला आणि गणपतीला प्रिय असलेल्या पत्रीत शमी, जाई, मालती, देवदार, मरू, पिंपळ, केवडा, हादगा, धोत्रा, दुर्वा, बेल, आघाडा, जास्वंद, माका, बोर, मंदार, डोरली, तुळस, कण्हेर, डाळिंब, विष्णुक्रांता वगैरेंचा समावेश आहे३. यांतला देवदार सोडला तर सगळ्या गोष्टी आजही आसपास दिसतात म्हणजे महाराष्ट्रात सहज रुजू शकतात पण आज त्या घरी रुजवणं जमत नाही. कोकणात साजऱ्या होणाऱ्या सणांत त्या घरातल्या बागेत मिळतही असतील पण इतर ठिकाणी बाजारात विकतच मिळतात. रितीचं इतकं महत्त्व आहे, त्यामुळे पत्री हवी पण ही झाडं आसपास असावीत याचा प्रयत्न समाज म्हणून आपण करत नाही. झाडांचं फुलांचं सणावाराशी असलेलं नातं इतकं विकृत झालं आहे की जास्वंद, झेंडू आपल्याला प्लास्टिकचे चालतात. ही झाडं-फुलं प्रतीकापुरती उरली आहेत. प्लास्टिकचे देखावे, फुलं, चंदेरी सोनेरी झिरमिळ्या, वर्तमानपत्रे आणि स्थानिक नगरसेवकांच्या कृपेनं मिळणारी आरतीची पुस्तकं यात सण झोकात साजरे होतात.

 

काही सण, काही पद्धती कालबाह्य होतात. ते योग्य आणि प्रगतीशील असतं. पण त्याची नोंद झाली तर त्या काळातल्या सामाजिक रितींबद्दल कळतं. लग्न-समारंभाच घ्या – देव-ब्राम्हणाला नवऱ्यामुलीला नाहू घालायची पद्धत होती म्हणे. लग्नकार्याच्या आधी मुहूर्त काढला जायचा. पाच बायका नवऱ्यामुलीला मध्ये बसवून जातं दळायच्या – 

पाची पानाचा गं विडा वर चिकण सुपारी 

आधी नेमिला राजस बाई नेमिला राजस…

जात्यावर विडा-सुपारी ठेवायची. बायकांनी नवऱ्याचं नाव घ्यायचं, एक पान उचलायचं. नवरीनं जात्याला हात लावायचा. लग्नातल्या व्याही भोजनातही गाण्यांची फर्माईश झाली की मुलीची आई गायची –

 

ओटीत घातली मुलगी विहिणबाई, सांभाळ करावा हीच विनवणी बाई,

किंवा 

फुलात फुलं हुंगावं जाईचं बाई सुख घ्यावं आईचं… फुलं हुंगावं चाफ्याचं सुख घ्यावं बापाचं…

मराठवाड्यात आहेर फारसा नसे. मुलाची आई, बहीण, चुलती सोडले तर फार कुणाला साड्या आहेर द्यायची पद्धत नव्हती; मात्र लग्न झाल्यावर नवरी गावी नातेवाइकांना भेटी द्यायला जायची. तिच्या बरोबर घरी काम करणारी किंवा कुणी तरी एक बाई असे. तिच्या डोक्यावर टोपलं असे आणि त्यात पान सुपारी, खण, येसर, मेतकूट, लाडू, चिवडा, वगैरे असे. ही नवरी प्रत्येक घरी ही भेट नेऊन देई. मग तिची नव्या नातेवाइकांशी ओळख होई. आताच्या वातावरणात हे सगळं गमतीशीर वाटेल. नवरीमुलगी अशी घरोघरी जाणे ठीक; पण तिला ओळख करून घ्यायला अशा रितीभातींची गरज निश्चितच नाही.

 

जे सण आजही आपल्या मूळ स्वरूपाशी इमान राखून टिकले आहेत, त्याच्या मुळाशी तिथला समाज आहे. या समाजानं कसोशीनं ते राखलं आहे. उद्या जर तिथल्या स्थानिक नगरसेवकाला किंवा मोठ्या विक्रेत्याला यात कमर्शियल अँगल दिसला तर काही खरं नाही. 

 

दिवाळीत केले जाणारे पाच प्रकारचे फोव (पोहे) गोव्याचं वैशिष्ट्य. रोसातले फोव, ताकातले फोव, दह्यात कालवलेले, दुधातले फोव, पाकातले फोव, फोवा खीर, फोवा चिवडो, बटाटा फोव, तिखशे फोव असे वेगवेगळे प्रकार घरोघरी होतात. यातले किमान पाच प्रकारचे फोव घराघरांत नरकचतुर्दशीला बनवले जातात. शेतात आलेला नवा तांदूळ घरी आल्यावर त्याचे पोहे बनवायचे आणि त्यामुळे दिवाळीत हे पोहे खाण्याची पद्धत सुरू झाली असावी. आता तांदळापासून पोहे घरी बनवत नसले तरी फोडणीचे पोहे केले जातातच. गोव्याची दिवाळी त्या मानानं अजूनही साधी आहे आणि आपलं वेगळेपण टिकवणारी आहे.

 

खानदेशाचं घ्या – खानदेशात दिवाळी बेसनाच्या लाडवांबरोबर दराब्याचे (गहू, सुकामेवा घालून) लाडू केले जातात. तर कानुबाई उत्सवाला रोट (खानदेशी पुरणपोळी) केले जातात. कुळाचाराच्या स्वयंपाकात चिवळाच्या भाजीचे फुनके आणि कढी असते. खानदेशात अक्षयतृतीयेला आखाजी म्हणतात. या दिवशी आंबा खायला सुरुवात करतात. त्यातल्या त्यात नववधूसाठी हा सण खास. भाऊ बहिणीला घ्यायला येतो. मैत्रिणी गाणी गातात –

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं, 

कैरी तुटनी, खडक फुटना झुयझुय पानी व्हाय वं

झुयझुय पानी व्हाय तठे, टिपऱ्यास्ना बजार वं

माय माले टिपऱ्या ली ठेवजो, ली ठेवजो

बंधू ना हाते दी धाडजो४

विदर्भात जन्माष्टमीला प्रसादाला वाफोळी असते. बरोबर गुळाच्या पाकात केलेली कणकेची गोड शेव आणि आणि मिश्र डाळींचे वडे.

 

मराठवाड्यातल्या काही भागात शेतकरी समाजात साजरा होणारा येळा (वेळा) अमावस्या (येळमास) हा सण म्हणजे शेतजमिनीचं कौतुक करण्याचा दिवस. हा साजरा होतो तेव्हा थंडी असते. घरातले सगळेजण शेतात जमतात, शेजारीपाजारीपण येतात. शेतात पाच पांडव आणि कुंती मांडले जातात. भज्जी (एक प्रकारची पालेभाजी), बाजरीचे उंडे, गूळ घालून केलेली गव्हाची खीर आणि ज्वारीचं आंबील हे पदार्थ शेतातच रांधले जातात. एकत्र शेतीभोजन करत साजरा होणारा हा सण धाराशिव, लातूर वगैरे भागांसारखाच हा कर्नाटकातही साजरा होतो. 

 

आवळीभोजन आजही अनेक ठिकाणी साजरे होते. आज आवळ्याच्या झाडाची पूजा नक्की होते; पण पूर्वी तो साजरा करण्याची पद्धत जरा इलॅबोरेट होती. कार्तिक महिन्यात घरच्या देवघरात काकड आरती होत असे.  देवाला उठवायचं, सकाळी दुधाचा नैवेद्य द्यायचा – 

उठी उठी रे राधारमणा उषःकाल झाला, 

तोंडावरती काढी शेला, पाही दास आपुला, 

दूध पिणारा कृष्ण आजचा नाही का उठला… 

ही गाणी एकेकाळी देवाला गात असत. किशोरवयीन मुली परडीमध्ये फुलं, वाती, हळदकुंकू, माळावस्त्र वगैरे घेऊन आवळ्याच्या झाडाखाली झाडून घेत आणि आपापली रांगोळी काढत. एकेका झाडाखाली दहा-पंधरा रांगोळ्या असत. मग आवळ्याच्या झाडाखाली प्रसाद खायचा. यात दही-पोह्यापासून लाडूपर्यंत घरी सहज केलेले पदार्थ असत आणि शिवाय आवळ्याच्या झाडाखाली जेवणाचा बेत. हे झाड सगळीकडे असतंच असं नाही त्यामुळे ज्या घरी झाड त्या घरी मुलींची गर्दी. एकूण सणांच्या काळात मुलींचं कौतुक जास्त.

 

यातला धुंदुरमास किंवा धनुर्मास आता कमबॅक करण्याच्या मार्गावर आहे. पहाटे पहाटे साग्रसंगीत जेवायचं हेच याचं वैशिष्ट्य. पहाटे सहाच्या आत सूर्य उगवायच्या आधी खिचडी, बाजरीची भाकरी लोणी, भाजी, कढी किंवा ताक, चटणी… गोड वाटलं तर करा, नाही वाटलं नका करू, हा मेनू. बायकांनी सकाळी रांधून ठेवायचं, मुलाबाळांनी मदत करायची. बाप्यांनी निदान वेळेवर उठून आंघोळीपांघोळी उरकून घ्यायच्या आणि कुडकुड थंडीत शेजारीपाजारी आले की त्यांचं स्वागत करायचं. ब्राह्मणानं पूजा घातली की सगळ्या जणांनी जेवायचं. हाच हा सण. बाजरीची भाकरी मस्ट. आता म्हणे एका उपाहारगृहात हा मेनू ठेवला आहे. हे पुण्यात असेल तर त्याला प्रतिसादही चांगला मिळेल. पण हे जेवण बाहेर थंडी असताना घरच्या उबेत छान वाटेल मला.

 

अनेक पद्धती महाराष्ट्रात सार्वत्रिक आहेत आणि त्या-त्या दिवसाचं महत्त्व म्हणून आवर्जून केल्या जातात. उदाहरणार्थ, आषाढाच्या शेवटच्या दिवशी येणारी दिव्याची आवस. दिव्याच्या अमावस्याला कणकेचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे करून त्याचा नैवेद्य दाखवून तेच खायची पद्धत आहे. यात फार काही पैसे खर्च होत नाहीत किंवा फार काही सेलिब्रेशन नसतं. पण तरीही ती खास आहे. बाजरीच्या पिठात दूध-गूळ मिसळून त्याचे दिवे बनवून वाफवून गट्टम् करण्याची पद्धत खासच आहे.

 

एखादी पद्धत रीतभात उत्सव बनल्यावर बऱ्याचदा तिच्या मूळ स्वरूपाशी प्रतारणा करते. भारतीय माणूस धर्माकडेच वेगवेगळ्या नजरेतून बघतो. त्याच्या दृष्टीनं, ऐपतीनं त्या उत्सवाचं स्वरूप बदललं तर नवल नाही. आपण जास्त उत्सवी होत आहोत का? तर अर्थात. एक तर या उत्सवांवर पोसली जाणारी अर्थव्यवस्था अनेकांचं पोट भरते. कंटाळलेले लोक उत्सवांमध्ये आनंद शोधत आहेत. राजकारणी यात कार्यकर्ते-ट्रेनिंग-प्रोग्राम चालवत आहेत. अशा अनेक स्तरांवर हे उत्सव सुरू आहेत. त्यामुळे जे सण बाजारात विकले जाऊ शकत नाहीत ते प्रचलित राहतील याची शक्यता नाही. तो आपला पिंड नाही. नेदरलंड्समध्ये रोज संध्याकाळी एक उत्सव साजरा होतो म्हणे. त्याला डस्किंग म्हणतात. हा उत्सवही लोक विसरले होते. कारण तो साजरा करायचा म्हणजे घरातल्या सगळ्यांनी गप्प बसून कातरवेळ अनुभवायची. दिवसाची रात्र कशी होते हे रोज बघायचं. यापेक्षा साधा उत्सव असू शकत नाही. आपल्या भवतालची जाणीव करून देणारे असे अनेक क्षण अनुभवले जाऊ शकतात, जरी ते इतरांच्या नजरेत झाकोळलेले असले तरी.

 

संदर्भ :

१. आर्यांच्या सणांचा इतिहास, लेखक - श्री ऋग्वेदी प्रथम आवृत्ती १९१६

२. गोईण – लेखिका डॉक्टर राणी बंग 

३. सण-वार व संस्कार – लेखिका डॉ. सौ. अंजली श्री. जोगळेकर

४. सागर माळी यांची मुंबई स्वयंपाकघर या फेसबुकवरील ग्रूपमधील पोस्ट