धार्मिक ओळख, बहुसंख्याकवाद आणि विवेकाच्या शोधात अडकलेला भारतीय मुसलमान

ज़ाहिद-ए-तंग-नज़र ने मुझे काफ़िर जाना,
और काफ़िर ये समझता है मुसलमान हूँ मैं!
हा शेर लिहिणारा शायर अज्ञात आहे. पण दोनच सारगर्भ ओळींत संपूर्ण भूमंडळाचे मर्म कवटाळण्याच्या उर्दू शायरीच्या अद्भुत सामर्थ्याचा प्रत्यय त्यातदेखील आहे. पुढे माझ्या भूमिकेबद्दल किंवा अनुभवांबद्दल जे काही लिहिलंय ते खरं तर या दोन ओळींतूनच सांगून झालं आहे तरी ‘सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी’ करत दिवाळी अंकाच्या प्रथेप्रमाणे पुढे सविस्तर लिहिणे जरूर.
मागच्या आठवड्यात एका फेसबुक मित्राशी मजेशीर संवाद घडला; त्यानं मला विचारलं होतं, "मला असं कधी कधी वाटून जातं की इस्लामी समाज शाळेसाठी, स्वच्छतेसाठी, पगारासाठी आंदोलन करेल का ? जर केलं तर त्याच्या आडून किंवा मागून धर्म येणार नाही याची काय शाश्वती?" त्यावर मी त्यांना म्हणालो, "मुस्लिम नागरिकांना समान हक्क मागण्यासाठी धर्मापासून स्वतःला वेगळं सिद्ध करण्याची अट आपण आणि इतर लोक का घालता? हिंदूंना ती अट का नाही? इस्लामी समाज शाळा, स्वच्छता आणि पगारासाठी आंदोलन करेल का, हा प्रश्न विचारण्याआधी अशा मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मुस्लिमांना आपण किती वेळा धर्माच्या पलीकडे जाऊन नागरिक म्हणून पाहिलं आहे, हा प्रश्नही स्वतःला विचारा. There is a problem."
समोरची व्यक्ती मुस्लिम असल्यास तिच्या वैचारिक भूमिकेपेक्षा, तिच्या धार्मिक आणि जातीय ओळखीला दिलं जाणारं अवास्तव महत्त्व फार पूर्वीपासून भारतीय विचारपरंपरेत दिसतं. एखादा मुसलमान उदारमतवादी असू शकतो, धर्मनिरपेक्ष असू शकतो, स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कर्ता असू शकतो, LGBTQ लोकांच्या हक्कांप्रती संवेदनशील असू शकतो, धार्मिक सुधारणांचा समर्थक असू शकतो किंवा डाव्या-उजव्या अशा कोणत्याही राजकीय विचारसरणीचा चिकित्सक अभ्यास करू शकतो, भारतीय संत आणि भक्तिपरंपरेचाही अभ्यासक असू शकतो हे कदाचित सशाच्या शिंगासारखं लोकांना दुर्मीळ वाटतं. आजच्या ध्रुवीकरणाच्या वातावरणात तर एका मुस्लिमाचं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व अनेकदा दुय्यम ठरतं. त्याची पहिली ओळख मुसलमान हीच मानली जाते आणि त्याच्या विचारांचं मूल्यमापनही त्याच चष्म्यातून केलं जातं. माझा तरी असाच अनुभव आहे. लोकांना उत्तम मराठी बोलणाऱ्या मुसलमानांचं देखील आश्चर्य वाटतं. मराठी - त्यातून जन्माला आलेली दखनी मराठी, त्यातून हिंदवी (उर्दू) अशी भाषा परंपरा त्यांच्या गावीही नसते. हे अज्ञानच नाही का?
"केवळ इतरांसारखं सामान्य दिसण्यासाठीसुद्धा काही जणांना आपली सगळी ऊर्जा पणाला लावावी लागते. आणि हे त्या इतरांच्या गावीही नसतं."
काम्यू हे म्हणाला होता. भारतातले मुसलमान हे वाक्य आज जगत आहेत.
त्यात मुस्लिम समाजाच्या प्रत्येक समस्येचं खापर फक्त मुस्लिम समाजावरच फोडणं हा बौद्धिक आळस भल्याभल्या भारतीय विचारवंतांनी दाखवला आहे. हे विचारवंत त्यांना भारतीय समाजाचा भाग मानत नाहीत, हेच त्यातून ध्वनित होतं. हे अगदी पूर्वापार होत आलं आहे.
कुणी मला आगाऊ म्हणतील कदाचित पण मुस्लिम समाजात हिंदू समाजाप्रमाणे व्यापक प्रबोधन चळवळी उभ्या राहिल्या नाहीत, हे मुस्लिमांना सतत कंठाळी आवाजात सांगत असताना आपण मात्र त्यांना कायमच कोरड्या तटस्थपणे किंवा द्वेषातून परकं वागवत राहिलो आहोत हे इथल्या बहुसंख्य समाजाचंही मोठं अपयश आहे; आणि ते त्यांच्या गावीही नसते.
त्यात बरेचदा बहुसंख्याकांतले द्वेषी लोक, पूर्वीच्या हिंदू प्रागतिक आणि उदारमतवादी लोकांनी केलेल्या कार्याचं श्रेय घेत आणि साक्ष काढत, आजच्या मुस्लिमांना तुम्ही कसे मागास राहिलात; असा टोमणा मारत असतात, ते तर कायच्याकाय विसंगत असते - पण त्यांचा उद्देशच हेटाळणीचा असतो ते एक समजून घेऊ. मुस्लिम उद्या प्रगत झाले तर ते त्या प्रगतीवरही प्रश्नचिन्ह उभे करतील. UPSC जिहादवालं प्रकरण आठवतं? (बातमीचा दुवा)
अलीकडचे (म्हणजे झालीत त्यालाही ६ वर्षं) उदाहरण. ठसठशीत ठळक आहे म्हणून तेच घेतो. मुस्लिम समाज आणि तरुण मुलं CAA, NRC विरोधी आंदोलनांत हिरिरीनं पुढे आली होती. उमर खालिद, शहला रशीद, शर्जील इमाम हे त्या आंदोलकांमधील सर्वांत प्रखर, प्रभावी वक्ते. ही चांगली सुशिक्षित मुलं. पण बहुदा त्यांच्या या उत्स्फूर्त सहभागाने असा संदेश समाजात जात होता की मुस्लिमांच्या नागरी जाणिवाही इतर लोकांइतक्याच प्रखर आहेत. त्यासाठी ते आंदोलन करतात, मुस्लिमांनाही नागरी आणि राजकीय अधिकार आहेत. ते सामाजिक आणि राजकीय चळवळींचं नेतृत्व करू शकतात जसे ते स्वातंत्र्यलढ्यात करत होते. ते लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊ शकतात, जनमताच्या कोलाहलात ठळक मत मांडू शकतात. बास! हीच बाब त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त धोक्याची ठरली. मुस्लिम असणं! हाच त्यांचा गुन्हा ठरला. त्यांना भयंकर त्रास दिला गेला आणि आताही दिला जातोच आहे. ६ वर्षं खटला सुरूही न होता तुरुंगात अडकवून ठेवण्यात आलं आहे.

उमर खालिदला वाटलं की महात्मा गांधींप्रमाणे अहिंसक आंदोलनं करत चळवळ उभारू, संविधानाचा हवाला देत समान हक्कांची मागणी करू, अशा आंदोलनामध्ये जी संप आणि रास्ता रोकोची, असहकाराची आवाहनं केली जातात ती करू. आंदोलनं अशीच तर केली जातात. एरवी मुस्लिम ओळख नसणाऱ्या लोकांनी अशी आंदोलनं केली असती, तर ती सामान्यच गणली गेली असती. आपणही इतरांसारखेच समान आहोत हा भ्रम उमर खालिद आणि इतरांना झाला. भारतीय नागरिक म्हणून सन्मानाने कुठल्याही भेदभावाशिवाय जगायला मिळणे, शिक्षण-नोकरी-रोजगार मिळणे, मुस्लिम म्हणून घर, जागा, संधी नाकारली न जाणे यासाठी आपणही पात्र आहोत असे उमरला वाटलं. पण त्याला इथे अशी शिक्षा दिली जातेय की पुन्हा मुस्लिमांमधून असं नेतृत्व करण्याची हिंमतच कुणी करू नये.
भारतातल्या हिंदू-मुस्लिम समाजांमध्ये ऐतिहासिक काळापासून सांस्कृतिक आदानप्रदान झालं. मुस्लिम समाजाला भारतीय संस्कृतीचा स्पर्श झाला आणि भारतीय समाजालाही मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव लाभला. हे सांस्कृतिक आदानप्रदान भारताच्या सामाजिक वास्तवाचा भाग आहे. भारतातले मुसलमान केवळ एका धार्मिक समुदायापुरते मर्यादित नाहीत; ते या देशाचे नागरिक आहेत. त्यांचा इतिहास, भाषा, कला, संगीत, स्थापत्य, खाद्यसंस्कृती आणि सामाजिक योगदान हे भारताच्या संस्कृतीच्या बाहेरचे घटक नसून भारतीय सांस्कृतिक जडणघडणीचे अविभाज्य भाग आहेत. पण हे सगळे कुणी लक्षातच घेत नाही.
एखाद्या समाजातल्या सनातनीपणाची चिकित्सा करणं आणि त्या समाजाचं ऐतिहासिक योगदान, सांस्कृतिक अस्तित्व आणि समान नागरिकत्वाचा अधिकार नाकारणं या दोन पूर्णपणे निराळ्या गोष्टी आहेत. फाळणी झाली, हजारो ठिकाणी दंगली उसळल्या, किती तरी नुकसान झालं तरी या गोष्टी भारतातल्या हिंदू लोकांच्या लक्षात येत नाही. गोल्डा मायरचं एक प्रसिद्ध उद्धृत आहे त्यात बदल करून म्हणावंसं वाटतं – In India, true Progress will come when the Hindus will love their children more than they hate Muslims.
आजच्या भारतात एक विचित्र आणि अस्वस्थ करणारी राजकीय-सामाजिक परिस्थिती निर्माण झाली आहे. उजव्या विचारसरणीचा वाढता प्रभाव, धार्मिक राष्ट्रवादाचा विस्तार आणि सार्वजनिक चर्चेतली वाढती ध्रुवीकरणाची प्रवृत्ती, आणि यांची चढती भाजणी त्यामुळे प्रत्येक मुसलमानाची सामाजिक आणि राजकीय ओळख कसून पुन्हा-पुन्हा तपासली जात आहे. ही प्रचंड अस्वस्थ करणारी आणि घुसमट करणारी अवस्था आहे.
हा प्रश्न केवळ मुसलमानांच्या राजकीय अस्तित्वाचा नाही. तो कायम तसाच राजकीय दृष्टीनेच पाहिला जातो, पण मुसलमानांसाठी तो त्यांच्या वैचारिक स्वातंत्र्याचा, रोजच्या जगण्यातील आत्मसन्मानाचा आणि स्वतंत्र नागरिक म्हणून जगण्याच्या अधिकाराचा आहे.
आजचा मुसलमान एका दुहेरी कोंडीत सापडलेला दिसतो. एका बाजूला बहुसंख्याकवादी राजकारण त्याला त्याच्या कडेकोट धार्मिक ओळखीत बंदिस्त करू पाहतं. त्याच्या देशनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं, त्याच्या प्रत्येक सामाजिक-राजकीय भूमिकेचा अर्थ त्याच्या धर्माच्या संदर्भात लावला जातो. दुसऱ्या बाजूला स्वतःच्या समाजातली धार्मिक कट्टरता, कर्मठपणा, धर्माच्या नावानं घातले जाणारे अनावश्यक सामाजिक निर्बंध आणि चिकित्सक विचारांविषयीची असहिष्णुता यांच्याशीही त्याला संघर्ष करावा लागतो.
बहुसंख्याकवादी राजकारणाला विरोध केला तर तो एका विशिष्ट राजकीय छावणीचा समर्थक ठरतो आणि स्वतःच्या समाजातील धार्मिक रूढींवर प्रश्न उपस्थित केले तर तो धर्मविरोधी किंवा समाजद्रोही ठरवला जाण्याची शक्यता असते. त्याला स्वतंत्रपणे विचार करण्याची, स्वतःची भूमिका ठरवण्याची आणि दोन्ही बाजूंच्या चुकांवर बोट ठेवण्याची मोकळीक कितपत उरते? तसा अवकाश निदान उपलब्ध तरी आहे का?
याचा परिणाम मुस्लिम समाजाच्या अंतर्गत मानसिकतेवर होतो. जेव्हा एखाद्या समुदायाला सतत बाहेरून एकाच ओळखीत करकच्चून बांधलं जातं, तेव्हा त्या समुदायातील व्यक्तीही कधी-कधी त्याच ओळखीभोवती स्वतःचं संपूर्ण अस्तित्व उभं करू लागतात. बाहेरून होणाऱ्या नकाराला उत्तर म्हणून आतून अधिक घट्ट, कट्टर मुस्लिम ओळखीला चिकटून राहणारी भूमिका तयार होते. अशा वेळी धर्म हा आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांचा स्रोत न राहता सरसकट राजकीय बचावाचं कवच बनतो.
आज असदुद्दीन ओवैसी वगळता राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असलेली पटकन सांगता येतील, अशा पाच मुस्लिम नेत्यांची नावं आठवून पाहा. डोक्याला बराच ताण द्यावा लागेल. गेल्या शतकभरात हिंदुत्ववादी विचारसरणीनं साध्य केलेली गोष्ट म्हणजे मुस्लिम हे समान दर्जाचे भारतीय नागरिक नाहीत; त्यांना कनिष्ठ, दुय्यम स्थान आहे; त्यांनी मान खाली घालून जगावं; फारसं नजरेत येऊ नये; क्षुल्लक कारणावरूनही आपण ठेचून, लिंचिंग होऊन मारले जात नाही किंवा तुरुंगात अडकून पडत नाही यासाठी कृतज्ञ राहावं; या जाणिवा समाजात खोलवर रुजवल्या आहेत. त्यांचे सामान्यीकरण करून टाकले आहे.
या सगळ्या अन्यायी व्यवस्थेवर, हिंदुत्ववादी विचारसरणीवर, हिंदू धर्मातील वर्णाश्रम, जातिव्यवस्था आणि असमानतेवर एका मुसलमानाने टीका केली, तर "आधी तुमच्या धर्मावर टीका करून दाखवा" असं निक्षून सांगितलं जातं. जे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय सत्तेच्या उच्च स्थानी आहेत, ते कायमच स्वतःचा पक्षपात लपवण्यासाठी अशी नैतिकतेची ढाल पुढे करतात. बलात्काराच्या प्रकरणात ‘पीडितेच्या तोकड्या कपड्यांमुळे’ गुन्हा घडला असा युक्तिवाद करण्यासारखं आहे - victim blaming, ज्यात दोष अन्याय करणाऱ्याऐवजी पीडितावरच टाकला जातो.
जे समाजघटक आधीच वंचित आणि पीडित आहेत, त्यांना त्यांच्या इतिहासातल्या किंवा धर्मातल्या चुका मोजायला लावून सध्याच्या अन्यायाकडून लक्ष विचलित करणं सोपं जातं. वर्तमानातल्या भेदभावाचं समर्थन करण्यासाठी याचा फार चलाखपणे वापर केला जातो.
“First reform yourself, then we will treat you as equal” (आधी स्वतःमध्ये सुधारणा करा, मगच आम्ही तुम्हाला समान मानू) अशा पवित्र्यात स्वतःला समतावादी म्हणवणारे बरेच लोक दिसतात. मुसलमानांनी आधी सामाजिक-धार्मिक सुधारणा कराव्यात मगच त्यांना समानता मिळेल, हा अतिशय विचित्र युक्तिवाद आहे. समानता हे जीवनमूल्य मानणारे लोक त्याचा असा चलनी नाण्यासारखा सौदा करत नाहीत.
वास्तविक, ज्या समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व, सुरक्षितता आणि समान संधी मिळतात; त्या समाजात अंतर्गत सुधारणांसाठी पोषक वातावरण निर्माण होतं. सामाजिक बदलासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास आणि वैचारिक अवकाशही त्यातून विस्तारतो. पण जर त्यांच्या वाट्याला सतत संशय, अपमान, दूषणं आणि बहिष्काराचं शस्त्र येत असेल; अन् एकही दिवस उसंत न घेता द्वेष पसरवला जात असेल, तर मुसलमान समाज बचावात्मक पवित्र्यातच जाणार.
'सुधारणा व्हावी' हा शुद्ध हेतू असा आग्रह धरणाऱ्यांच्या मनात नसतोच. उलट, मुसलमानांना दुय्यम नागरिक ठरवण्यासाठी, त्यांच्यावर 'कट्टर' आणि 'मागास' शिक्के मारण्यासाठी आणि मुख्य प्रवाहातील भेदभावाची स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठीच या युक्तिवादाचं शस्त्र उगारलं जातं. असो.
हल्लीच सौदी अरेबियात मशिदीत लैंगिक संबंध ठेवल्यामुळे एका बांग्लादेशी जोडप्याला मृत्युदंड देण्यात आला. तो प्रकार अमानुष आणि निषेधार्हच. पण त्या वेळी भारतीय मुसलमान एकत्र समर्थन करत सुटलेले किंवा स्पष्टीकरण देत बसलेले पाहून मनात आलं की जागतिक पातळीवरच्या इस्लामशी राजकीय आणि भावनिक नातं कसं ठेवायचं याचं उत्तर भारतीय मुस्लिमांनी अजूनही शोधलेलं नाही. इस्लाम आणि अरब संस्कृती या एकच गोष्टी नाहीत. इस्लामचा उगम अरबी भूमीत झाला, कुराण अरबी भाषेत अवतरलं; परंतु याचा अर्थ इस्लामची एकच सांस्कृतिक प्रतिमा असली पाहिजे असा होत नाही.
भारतीय, तुर्की, इंडोनेशियन, आफ्रिकी, पर्शियन आणि युरोपीय मुसलमानांची भाषा, पोशाख, खाद्यसंस्कृती, वास्तुकला आणि सामाजिक परंपरा वेगवेगळ्या आहेत. त्यांपैकी कोणाचीही धार्मिक ओळख दुसऱ्यांपेक्षा कमअस्सल नाही. नमाज पढण्यासाठी मशिदीला विशिष्ट अरब किंवा तुर्की वास्तुशैली असण्याची आवश्यकता नाही. मुसलमान असण्यासाठी विशिष्ट पोशाख, विशिष्ट भाषा किंवा विशिष्ट सांस्कृतिक आविष्कार स्वीकारण्याचीही आवश्यकता नाही.
दुर्दैवानं, काही मुस्लिम समाजांमध्ये धार्मिकतेची मोजपट्टी बाह्यस्वरूपावर आधारलेली दिसते. विशिष्ट पोशाख, विशिष्ट धार्मिक भाषा, विशिष्ट जीवनशैली यांना अधिक धार्मिक किंवा अधिक अस्सल समजण्याची प्रवृत्ती वाढते. परिणामी, धर्माच्या नैतिक आणि आध्यात्मिक आशयापेक्षा त्याच्या बाह्यप्रतिमेला अधिक महत्त्व प्राप्त होतं. धर्म माणसाला अधिक संवेदनशील, न्यायप्रिय, सहिष्णू आणि प्रामाणिक बनवतो का, हा खरा प्रश्न असायला हवा. तो कसा दिसतो, कोणते कपडे घालतो किंवा कोणत्या सांस्कृतिक परंपरा पाळतो, हा नव्हे.
या सगळ्या चर्चेत केवळ बहुसंख्याकवादी राजकारणावर टीका करून चालणार नाही. मुस्लिम समाजालाही स्वतःकडे प्रामाणिकपणे पाहावं लागेल.
धर्माच्या नावानं प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करणं, धार्मिक नेतृत्वाच्या प्रत्येक भूमिकेला अंतिम सत्य मानणं, स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी अनास्था किंवा अस्वस्थता बाळगणं, आधुनिक ज्ञान-विज्ञानाकडे संशयानं पाहणं, आणि धार्मिक परंपरांच्या चिकित्सक अभ्यासाला धर्मद्रोह समजणं, या प्रवृत्तींना सामोरं जाण्याची गरज आहे. समाजसुधारणेची मागणी करणाऱ्या व्यक्तीला समाजाचा शत्रू समजण्याची चूकही टाळली पाहिजे.
लहानपणी तर्क करत खूप प्रश्न विचारू लागलो की थकून शेवटी मौलवी म्हणायचे "ज्यादा सोचना ममनू है". त्याआधी त्यांच्या परीने उदाहरणं दाखले देत ते भरपूर युक्तिवाद करत, पण आम्ही इरेस पेटलो आणि बालसुलभ हट्टानं तर्क लढवतच राहिलो की त्यांचा निरुपाय होई. पण मला वाटतं ते स्वतःचंदेखील समाधान करत असावेत. खूप विचार केला तर श्रद्धा डळमळीत होऊन जाईल अशी भीती ही श्रद्धावंताला वाटते. त्यातून एक तर ते दुर्लक्ष करून मोकळे होतात किंवा आक्रमक होतात. जास्त विचार मग 'ममनू' म्हणजे मनाई असलेला निषिद्ध ठरतो.
श्रद्धा आणि विवेक परस्परविरोधी असायलाच हवेत असं नाही. एखादी व्यक्ती धार्मिक आणि उदारमतवादी असू शकते. ती इस्लामवर श्रद्धा ठेवूनही धार्मिक संस्थांवर टीका करू शकते. ती धार्मिक परंपरांचा आदर राखूनही त्यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक संदर्भांचा अभ्यास करू शकते. श्रद्धा असणं म्हणजे प्रश्न विचारण्याची क्षमता गमावणं नव्हे. अशी शिकवण आज हवी आहे.
मुस्लिम बौद्धिक परंपरेतील बऱ्याच पूर्वसुरींनी विवेक, स्वातंत्र्य, सहिष्णुता आणि आधुनिकतेशी असलेल्या नात्याचा शोध घेतला आहे. त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा आशय असा आहे की मुस्लिम समाजाला केवळ बाह्य विरोधाचा सामना करण्याची नव्हे, तर स्वतःच्या बौद्धिक परंपरेतील बंदिस्तपणाचंही पुनराकलन करण्याची गरज आहे.
प्रत्येक वेळी आपल्या समुदायाचा बचाव करायचा, की त्या समुदायातील चुकीच्या गोष्टींवरही तितक्याच स्पष्टपणे बोलायचं?
खरं तर या दोन गोष्टी परस्परविरोधी नाहीत. मुसलमानांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाला विरोध करणं आणि मुस्लिम समाजातील अन्यायकारक प्रथांवर टीका करणं, या दोन्ही भूमिका एकाच व्यक्तीला घेता येतात. त्यासाठी वैचारिक प्रामाणिकपणा आणि नैतिक धैर्य आवश्यक आहे. राजकीय ध्रुवीकरणाला अशी स्वतंत्र भूमिका मान्य नसते. त्याला स्पष्ट शत्रू आणि स्पष्ट मित्र हवे असतात. प्रत्येकानं एका बाजूला उभं राहावं, प्रत्येकानं एका विशिष्ट भाषेत बोलावं आणि प्रत्येकानं आपल्या समुदायाच्या अपेक्षांनुसारच प्रतिक्रिया द्यावी, अशी त्याची अपेक्षा असते.
मुसलमानांनी केवळ स्वतःच्या धार्मिक ओळखीचं प्रतिनिधित्व करण्यापुरतं मर्यादित राहू नये. त्यांनी शिक्षण, विज्ञान, साहित्य, कला, मानसशास्त्र, तंत्रज्ञान, उद्योग, संशोधन, क्रीडा आणि सार्वजनिक धोरण अशा प्रत्येक क्षेत्रात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी. मुस्लिम समाजातल्या नव्या पिढीला अशी मोकळीक मिळायला हवी की त्यांनी आपल्या श्रद्धेचा अर्थ स्वतःच्या विवेकानं शोधावा. त्यांना प्रश्न विचारण्याची, मतभेद व्यक्त करण्याची, नव्या कल्पना मांडण्याची आणि आपल्या परंपरांचा नव्यानं अर्थ लावण्याची संधी मिळाली पाहिजे.
आजच्या उजव्या विचारांच्या लाटेत माझ्यासारख्या मुसलमानांचं काय होतंय? त्यांच्यासमोरचा संघर्ष अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. त्यांना बाहेरच्या पूर्वग्रहांशी लढावं लागतंय आणि स्वतःच्या समाजातल्या वैचारिक बंदिस्तपणालाही आव्हान द्यावं लागत आहे. त्यांना स्वतःच्या समुदायाच्या अस्मितेचं रक्षण करायचं आहे, पण त्यासाठी स्वतःचा विवेक गहाण ठेवायचा नाही. फार तारेवरची कसरत. कारण मुसलमान म्हणून जन्मलो, त्या वातावरणात वाढलो, तो धर्म पाळत असलेली माझी मायेची माणसं आयुष्यभर माणुसकीनं जगताना दिसली, त्यांच्याबद्दल मला आपुलकी ही आहेच.
मला वाटतं, बहुसंख्याकवादाच्या दबावाखाली माझी मुसलमान ही ओळख मी पुसून टाकण्याची गरज नाही; पण त्या ओळखीच्या पिंजऱ्यात स्वतःच्या विचारांना कैद करण्याचीही गरज नाही. मला माझ्या धर्मावर श्रद्धा ठेवता आली पाहिजे त्याचवेळी स्वतःच्या समाजाशी असहमती व्यक्त करता आली पाहिजे, बहुसंख्याकवादी राजकारणाला निर्भयपणे प्रश्न विचारता आले पाहिजेत आणि कोणत्याही राजकीय छावणीचा बौद्धिक बंदिवान न होता जगता आले पाहिजे. कारण शेवटी, माझी सर्वात मोठी ओळख मी कोणत्या धर्माचा आहे ही नसून, मी किती स्वतंत्रपणे विचार करू शकतो, अन्यायाविरुद्ध किती ठामपणे उभा राहू शकतो आणि माणूस म्हणून किती प्रामाणिकपणे जगू शकतो ही असली पाहिजे अशा मतापर्यंत मी आलो आहे.