बहुजन तरुणांच्या खांद्यावरील हिंदुत्व

"संस्कृतीचा अभिमान, धर्माचा श्वास, हेच आमचे रक्त आणि हाच आमचा शूर इतिहास", अशी पोस्ट एका चौदा वर्षांच्या मुलाने समाजमाध्यमावर गळ्यात भगवा दुपट्टा टाकून आणि हातात भगवा झेंडा घेऊन केली होती. हा बहुजन समाजातून येणारा मुलगा महाराष्ट्रातील एका गावामध्ये दोन वर्षांपूर्वी नुकत्याच सुरू झालेल्या बाल कावड मंडळाचा संस्थापक आहे. महाराष्ट्रामध्ये कावडयात्रा ही पूर्वीपासून साजरी होणारी प्रथा नव्हती. गेल्या दशकभरात मात्र या यात्रेचे स्वरूप आणि प्रमाण बदललेले दिसते. सुरुवातीला एक-दोन शहरांपुरती मर्यादित असलेली यात्रा आता महाराष्ट्राच्या आणि त्यातही विदर्भ-मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये विस्तारली आहे. दहा वर्षांच्या मुलांपासून ते तिशीतील तरुणांपर्यंत अनेकजण या यात्रेत सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातील हा बदल केवळ एका धार्मिक उत्सवाच्या लोकप्रियतेत झालेली वाढ म्हणून समजून घेता येणार नाही. या बदलाच्या माध्यमातून ग्रामीण आणि निमशहरी भागांतील तरुणांच्या आकांक्षा, त्यांच्या सामाजिक अस्मितेची निर्मिती, पुरुषत्वाच्या कल्पना आणि हिंदुत्वाच्या जात-पितृसत्ताक राजकारणाचा विस्तार यांचा दैनंदिन पातळीवर जाऊन गांभीर्याने शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून समजून घ्यावे लागेल.
भक्तीतून मिळणारी सामाजिक प्रतिष्ठा
कावडयात्रेची सुरुवात कशी झाली? त्याचा इतिहास काय आहे हा स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण कावडयात्रा ही मूलतः शिवाला समर्पित असलेली धार्मिक तीर्थयात्रा मानली जाते. श्रावण महिन्यात भाविक 'पवित्र' मानल्या जाणाऱ्या नदीतून पाणी आणून शिवलिंगावर अर्पण करतात. मात्र, समकालीन भारतात या यात्रेने या धार्मिक विधीच्या पलीकडे जाऊन सामूहिक उत्सव, सार्वजनिक प्रदर्शन आणि द्वेषाच्या राजकारणावर उभ्या असलेल्या राजकीय अस्मितेचे स्वरूप धारण केले आहे. विशेषतः उत्तर भारतात कावडयात्रेचा झालेला विस्तार आणि गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील विविध भागांत, विशेषतः विदर्भात, वाढलेला सहभाग या प्रक्रियेचे उदाहरण म्हणून समोर येतो.

भारतातील केवळ काही राज्यांमधील काही भागांपुरता मर्यादित असलेला हा उत्सव १९९०नंतर भारतीय जनता पक्षाच्या राम जन्मभूमी रथयात्रेबरोबर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित होऊ लागला असे रुमा बोस यांसारख्या उत्तर भारतातील कावडयात्रेवर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी मांडलेले आहे. कालांतराने या यात्रेचे स्वरूप आणि त्यामध्ये सहभागी होणाऱ्यांची सामाजिक रचना यांमध्ये बदल झालेला आहे. आज मोठ्या प्रमाणावर दलित, भटके-विमुक्त, बहुजन तरुण कावडयात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहेत. कावडयात्रा ही हिंदुत्वाच्या राजकारणाला बहुजन तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठीची एक महत्त्वाची सांस्कृतिक जागा म्हणून पुढे आणली गेली. ब्रह्म प्रकाश यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या Spectacle State या पुस्तकामध्ये त्यांनी सप्रमाण असा युक्तिवाद केला आहे की हिंदुत्वाचे राजकारण हे प्रथम आकर्षण म्हणून तरुणांच्या मनात पुढे येते. कावडयात्रेच्या माध्यमातून हे आकर्षण अधिक प्रमाणात निर्माण होताना दिसते. सामूहिक उत्साह, गाणी, शारीरिक सामर्थ्य, प्रत्येक क्षणाला भक्कम पुरुषत्वाच्या भावनेने तरुणांना या यात्रेकडे आकर्षित केले जाते. एकसारखी वस्त्रे, भगवे ध्वज, धार्मिक घोषणा, सामूहिक मिरवणुका आणि सार्वजनिक अवकाशातील मोठ्या प्रमाणावरील उपस्थिती यांमधून व्यापक हिंदू अस्मितेची दृश्य प्रतिमा तयार होते. यातून यामध्ये सहभागी झालेल्या तरुणांना या समुदायाचा भाग असल्याची जाणीव होते. या तरुणांचा हा सहभाग त्यांच्यासाठी एका व्यापक हिंदू अस्मितेचा भाग बनण्याची संधी म्हणून पुढे येते. त्यांना त्यांचे हिंदू असणे सिद्ध करण्याची एक संधी निर्माण करून दिली जाते. परंतु त्याच वेळी मुस्लिमद्वेष आणि बहुसंख्याकवादी राष्ट्रवाद मानणारी हिंदुत्वाची कल्पना या तरुणांच्या मनावर गाणी, पोस्टर, घोषणा, आणि विशिष्ट हावभावांच्या आधारे घट्ट रुजवली जाते. या सर्व प्रक्रियेत बहुजन तरुणांना केवळ हिंदुत्वाच्या या जात-पितृसत्ताक राजकारणाचे बळी म्हणून न बघता, ते स्वतःची अस्मिता, सामाजिक प्रतिष्ठा आणि पुरुषत्व घडवण्याच्या प्रयत्नात या राजकारणाचे सक्रिय वाहक कसे बनतात याचा विचार करणे गरजेचे आहे. या प्रक्रियेचे आकलन होण्यासाठी कावडयात्रेकडे स्वतंत्र धार्मिक कार्यक्रम म्हणून न पाहता; धार्मिक संघटना, व्यापारी भांडवल, राज्यसंस्था, राजकीय शक्ती आणि समाजमाध्यमे यांना जोडणाऱ्या व्यापक हिंदुत्वाच्या परिसंस्थेचा भाग म्हणून पाहणे आवश्यक आहे.
कावडयात्रेच्या लोकप्रियतेचे स्पष्टीकरण हिंदुत्वाच्या राजकीय प्रसारामध्ये शोधताना उत्तरेतील बागेश्वर, प्रदीप मिश्रा यांसारख्या बाबांनी निर्माण केलेल्या धार्मिक श्रद्धांचे वलय, नवसपूर्ती तसेच ग्रामीण लोकांची शिवभक्ती, तरुणांची मित्रांसोबत प्रवास करण्याची इच्छा आणि सामूहिक उत्सवाचा अनुभव हीदेखील या यात्रेमध्ये वाढत्या सहभागाची महत्त्वाची कारणे आहेत हे लक्षात ठेवायला हवे. त्यामुळे या यात्रेत सहभागी होणारा प्रत्येक तरुण हा हिंदुत्ववादी राजकारणाचा उघडपणे झेंडा खांद्यावर घेऊन निघाला आहे असे म्हणण्यापेक्षा तो कट्टरतावादी बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे असे म्हणणे संयुक्तिक ठरेल. उत्तरेतून गेल्या दशकभरात अचानक प्रकाशझोतात आलेल्या बागेश्वर आणि प्रदीप मिश्रा यांसारख्या लोकांनी धार्मिक श्रद्धेच्या आधारे हिंदुत्वाच्या राजकीय अर्थांनी भरलेल्या कथा, प्रवचने सांगण्यास सुरुवात केली. याला अर्थातच भारतातील जातभांडवलाचे समर्थन असल्याने आस्था, संस्कृती दर्शन सारख्या टीव्ही चॅनेलनी त्यांना उचलून धरले. प्रत्येकाच्या घरात यांचे रेकॉर्डेड प्रवचन दिवसातून किमान चार ते पाच वेळा जाऊ लागले. त्याच बरोबर रिलायन्स जिओच्या न संपणाऱ्या इंटरनेटने ग्रामीण भागातील लोकांच्या मोबाइल फोनमध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्यानंतर वेगवेगळ्या समाजमाध्यमांमधून यांच्या अंधश्रद्धेचे व्हिडिओ क्लिप प्रचंड फिरायला सुरुवात झाली. या साऱ्यांतून एका विशिष्ट वयोगटामध्ये याला अधिमान्यता मिळाली. काहीच दिवसांत ग्रामीण भागांत आणि निमशहरी भागांत मोठ्या प्रमाणावर शिवलिंगे उभारण्यास सुरुवात झाली. अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांनी वर्गणी गोळा करून अशी शिवलिंगे उभी केली. त्यामुळे एरवी ज्या पालकांना आपल्या मुलांनी राजकारणात पडू नये असे वाटते त्यांना आपला मुलगा धार्मिक कार्यात गुंतला आहे भक्तिमार्गाला लागला म्हणून आनंदच झाला. या प्रक्रियेतून कावडयात्रा आणि त्यामध्ये समभागी होणाऱ्या कावडियांना सामाजिक मान्यता मिळण्यास सुरुवात झाली.
विकास सिंह यांनी आपल्या Uprising of the Fools: Pilgrimage as Moral Protest in Contemporary India या पुस्तकात कावडयात्रेचा अभ्यास करताना तीर्थयात्रेला सामाजिक मान्यता आणि नैतिक प्रतिष्ठा मिळवण्याच्या प्रक्रियेशी जोडले आहे. त्यांच्या मते, कावडयात्रा केवळ धार्मिक श्रद्धेची अभिव्यक्ती नसून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करण्याचा एक मार्गही आहे. जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेत ग्रामीण भागातील मुले काहीशी मागे पडतात. त्यांना शिक्षण, नियमित रोजगार आणि त्यांतून येणारे आर्थिक स्वावलंबन मिळवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत धार्मिक कार्यांत सहभागी होणे हे सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याचे एक साधन म्हणून पुढे येते. सार्वजनिक गणेशोत्सव, रामनवमी, कावडयात्रा यांसारखे सण या तरुणांना आपल्या पुरुषत्वाचे जाहीर प्रदर्शन करण्याची आणि सार्वजनिक अवकाशात स्वतःची दृश्यता निर्माण करण्याची संधी मिळवून देतात. यातून एक महत्त्वाचा मुद्दा असा समोर येतो की या तरुणांना कावडयात्रेकडे आकर्षित करणारे घटक केवळ धार्मिक किंवा वैचारिक नसतात. त्यामध्ये आनंद, साहस, एकमेकांशी मैत्री, सार्वजनिक प्रतिष्ठा आणि सामूहिक ओळख यांचाही समावेश असतो. हिंदुत्वाचे राजकारण या अनुभवांना व्यापक धार्मिक आणि राजकीय अर्थ देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असते.
बहुजन तरुण आणि पुरुषत्वाच्या वाटाघाटी
हिंदुत्वाची व्याप्ती कायम जात-पितृसत्ताक राजकारणाच्या चौकटीत राहिली आहे. हिंदुत्वाचे एक वैशिष्ट्य असेही आहे की ते कायम आकर्षित करणारे आणि त्याची भाषा ही सर्व जातींतील लोकांना आपलीशी वाटणारी आहे. त्यामुळे त्याचा वैचारिक पाया हा ब्राह्मणवादाने घडवलेला असूनही हिंदुत्वाच्या व्यापक हिंदू अस्मितेमध्ये विविध जातसमूहांना सामावून घेण्याची क्षमता आहे. या प्रक्रियेत जातीय भेदांवर तात्पुरता पडदा टाकला जाऊ शकतो; आणि म्हणून हिंदू ही सामूहिक ओळख ही केंद्रस्थानी आणली जाते. परंतु त्याचा व्यवहार मात्र जात-पितृसत्ताक चौकटीतच घडतो. धार्मिक अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम समुदाय, एका बाह्य समूहाच्या रूपात कल्पिला जातो. हिंदू असण्याच्या या सामूहिक ओळखीच्या विरोधात सगळ्यांचा एकच शत्रू म्हणून मुस्लीम समुदायाला उभे केले जाते. परिणामी, जातीय विषमतेच्या सामाजिक वास्तवावर मात करण्याऐवजी धार्मिक एकात्मतेच्या आधारे तिचे राजकीय व्यवस्थापन केले जाते. परंतु इथे खरा प्रश्न असा उभा राहतो की, जातीय विषमता कायम असतानाही बहुजन तरुण हिंदुत्वाच्या या सामूहिक अस्मितेकडे का आकर्षित होतात? हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. मात्र या प्रश्नाचे उत्तर शोधताना बहुजन तरुणांच्या सहभागाकडे हिंदुत्ववाद्यांकडून झालेली त्यांची केवळ वैचारिक फसवणूक म्हणून पाहणे पुरेसे ठरणार नाही. आधी म्हणल्याप्रमाणे हिंदुत्वाच्या या परिसंस्थेचा भाग होऊन त्यांना काय प्राप्त होते, ते कोणत्या प्रकारची प्रतिष्ठा मिळवतात आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील कोणत्या आकांक्षांना यामध्ये अभिव्यक्ती मिळते हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही.
धार्मिक उत्सवांमध्ये शारीरिक क्षमता दाखवणे आणि सामूहिक सहभागातून सामाजिक मान्यता मिळवणे या गोष्टी तरुणांच्या पुरुषत्वाच्या कल्पनांशी जोडल्या जातात. कावडयात्रा तरुण पुरुषांना शारीरिक सामर्थ्य, सहनशक्ती, आणि सामूहिक बांधिलकी प्रदर्शित करण्याची संधी देते. मोठ्या आवाजातील गाणी, आकर्षक सजावट, आक्रमक पोस्टर्स, भगवे ध्वज, मिरवणुका आणि मंडळांमधील स्पर्धा यांमधून पुरुषत्वाचे सार्वजनिक प्रदर्शन घडून येते. अशा प्रदर्शनातून तरुणांना केवळ धार्मिक भाविक म्हणून नव्हे, तर सामर्थ्यवान आणि प्रभावशाली पुरुष म्हणूनही स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. त्यामुळे शरीराने कमकुवत असलेले तरुण मुलगे अशा मिरवणुकींमध्ये स्वतःला सामर्थ्यवान समजायला लागतात. समाजमाध्यमांवर आणि वृत्तपत्रांमध्ये कावडयात्रेदरम्यान कुणाची दुकाने फोडल्याच्या, ट्राफिकमध्ये गाडीचा धक्का लागला म्हणून गाड्या फोडल्याच्या अनेक बातम्या आपण बघत असतो. ही सगळी उदाहरणे एरवी सामाजिक असुरक्षिततेने ग्रासलेल्या तरुणांचे पुरुषत्व सिद्ध करण्याची स्पर्धा दर्शवतात.
हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये अडकलेले तरुण आपली सामाजिक ओळख केवळ जन्माने मिळालेल्या जातीय स्थानावर किंवा आर्थिक स्थितीवर अवलंबून ठेवत नाहीत, ते विविध सामाजिक क्षेत्रांतून नवी प्रतिष्ठा मिळवण्याचा प्रयत्न करतात. कावडयात्रांसारखे उत्सव त्यांना अशी प्रतिष्ठा मिळवण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देतात. मात्र या प्रतिष्ठेची निर्मिती कोणत्या सामाजिक आणि राजकीय भाषेत होते हे त्या तरुणांना पुढे कुठे घेऊन जाईल यासाठी निर्णायक ठरते. जर सामर्थ्य, शौर्य आणि पुरुषत्व यांच्या कल्पना मुस्लीम समुदायाविषयी संशय, शत्रुत्व किंवा वर्चस्वाच्या भाषेशी जोडल्या गेल्या तर या तरुणांच्या अस्मितेची निर्मिती द्वेषाच्या राजकारणाशी घट्टपणे जोडली जाते. अशा वेळी या उत्सवांमध्ये सहभागी होऊन सामाजिक मान्यता मिळवण्याची इच्छा आणि त्यांचे पुरुषत्व सिद्ध करण्याची आकांक्षा या हिंदुत्वाच्या बहुसंख्याकवादी राजकारणाला बळ देणाऱ्या ठरतात. कावडयात्रेसारखे सामूहिक धार्मिक कार्यक्रम या प्रक्रियेसाठी महत्त्वाचे ठरतात. या संदर्भात द्वेषाचे राजकारण केवळ उघड मुस्लिमविरोधी घोषणांपुरते मर्यादित राहत नाही. धार्मिक समुदायांमधील फरक सतत अधोरेखित करणे; एखाद्या समुदायाला संभाव्य शत्रू म्हणून सादर करणे; आणि सार्वजनिक अवकाशावर बहुसंख्याकांचा विशेष अधिकार असल्याची भावना निर्माण करणे; या प्रक्रियादेखील त्याचा भाग असू शकतात. उदाहरणार्थ, हल्लीच 'दुर्गा दौड'च्या निमित्ताने अनेक शिवप्रतिष्ठानशी संबंधित अनेक तरुण-तरुणींनी हातात शस्त्रे आणि भगवे झेंडे घेऊन गावागावातून मिरवणुका काढल्या. समाजमाध्यमांवरील यांचे व्हिडिओ बघितले तर या तरुणांनी, सार्वजनिक ठिकाणी शिवाजी महाराज आणि मुघलांमधील लढाईचे पथनाटक सादर केले गेले. यामध्ये मुघल सैनिकांची भूमिका बजावणाऱ्या पात्रांना हिरवे कपडे, विशिष्ट पद्धतीची दाढी अशा रूपात स्त्रियांवर अत्याचार करताना दाखवले गेले. ही पात्रे सादर करणारे आणि या 'दौड'मध्ये सहभागी असलेले तरुण हे अगदी बालवयापासून ते तरुण मुलामुलींपर्यंत होते. अशा दौडींमधून एका पातळीवर सर्वशक्तिमान पुरुषत्वाची भावना निर्माण केली जाते, तर दुसऱ्या बाजूला एका समुदायाच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण केली जाते. अशा उत्सवांमध्ये तरुणांच्या मनात कट्टरतावादी विचार, द्वेषाची भाषा आणि प्रतीके बिंबवली जातात. हीच भाषा आणि भावना नंतर समाजमाध्यमांवर या तरुणांच्या संभाषणामध्ये, गाण्यांमध्ये आणि त्यांच्या सार्वजनिक वर्तनामध्ये परावर्तित होते.
व्यापारी भांडवल आणि राज्यसंस्थेची भूमिका
कावडयात्रेचा विस्तार समजून घेण्यासाठी राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाचा आणि व्यापारी भांडवलाच्या भूमिकेचाही विचार करणे आवश्यक आहे. धार्मिक उत्सव हा केवळ श्रद्धेचा अवकाश नसतो तो वस्तूंच्या उत्पादनाचा, विक्रीचा आणि उपभोगाचा बाजारही निर्माण करतो. वेगवेगळ्या मंडळांचे टीशर्ट, भगवे दुपट्टे, भगवे ध्वज, शिवाच्या प्रतिमा, सजावटीच्या कावडी, डीजे व्यवस्था, वाहनांची सजावट, खाद्यपदार्थ आणि इतर साहित्य यांतून धार्मिक सहभागाभोवती एक अर्थव्यवस्था उभी राहते. यामध्ये व्यापारी भांडवलदारांचे हितसंबंध गुंतलेले असतात. हल्ली डीजेची प्रथा सगळ्या उत्सवांमध्ये दिसून येत आहे. या डीजेचे संगीत धार्मिक भक्तीला मनोरंजन, विशिष्ट शारीरिक हालचाल, हावभाव, आणि पुरुषत्वाच्या सार्वजनिक प्रदर्शनाशी जोडते. एकीकडे विशिष्ट समुदायाला खलनायकाच्या भूमिकेत मनोरंजनाच्या माध्यमातून बघण्यास प्रवृत्त करणारी गाणी निर्माण करून तरुणांच्या मनात द्वेषाची बीजे रोवली जातात. तर दुसरीकडे अशा उत्सवांमधून उभ्या राहणाऱ्या अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात नफा मिळवला जातो. धार्मिक बाजारपेठ ही केवळ यात्रेमध्ये सहभागी असणाऱ्यांच्या गरजा पूर्ण करणारी व्यवस्था नसून, धार्मिक अस्मितेच्या सार्वजनिक प्रदर्शनाला आकार देणारी शक्तीही ठरू शकते. अशा धार्मिक उत्सवाच्या बाजारपेठेतून निर्माण होणारा नफा आणि हिंदुत्वाच्या राजकारणासाठी उपलब्ध होणारी साधने यांमधील संबंधही तपासणे गरजेचे आहे.
कावडयात्रेच्या विस्तारामध्ये राज्यसंस्थेची भूमिकाही महत्त्वाची आहे. रस्त्यांवरील वाहतूकव्यवस्था, सुरक्षितता, तात्पुरते निवास, वैद्यकीय सुविधा आणि प्रशासनाकडून मिळणारे सहकार्य यांमुळे मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे शक्य होते. मात्र, राज्यसंस्थेची भूमिका केवळ प्रशासकीय व्यवस्थापनापुरती मर्यादित आहे का, की काही परिस्थितींमध्ये ती हिंदुत्वावर उभ्या असलेल्या धार्मिक अस्मितेला सार्वजनिक मान्यता देण्याचे माध्यमही बनते, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. उदाहरणार्थ हिंगोली शहरामध्ये दरवर्षी स्थानिक आमदार स्वत: मोठ्या प्रमाणावर कावडयात्रेचे आयोजन करतात. समाजमाध्यमांवर आजही त्यांचे हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत. यामध्ये हजारो तरुण मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाची विशिष्ट सांस्कृतिक चिन्हे घेऊन आपल्या पुरुषत्वाचे प्रदर्शन करीत असतात. सार्वजनिक ठिकाणांहून जाहीररीत्या धार्मिक द्वेष पसरवणारी भाषणे दिली जातात. हे सर्व पोलिस यंत्रणेच्या सुरक्षाछत्राखाली होत असते. अशा प्रकारच्या उपक्रमांमधून तरुणांच्या या धार्मिक सहभागाला राजकीय प्रतिष्ठा प्राप्त होते. या तरुणांना राज्यसंस्थेची मान्यता, त्यांचा राजकीय नेत्यांकडून होणारा सत्कार आणि सार्वजनिक अवकाशातील विशेष व्यवस्था यांमधून त्यांच्या सामूहिक अस्मितेला बळ मिळते.
गेल्या दशकामध्ये समाजमाध्यमांनी धार्मिक उत्सवांच्या सार्वजनिक स्वरूपात महत्त्वाचे परिवर्तन घडवले आहे. पूर्वी धार्मिक सहभागाचा अनुभव मुख्यतः प्रत्यक्ष उपस्थिती, स्थानिक समुदाय आणि मौखिक संपर्कांमधून प्रसारित होत असे. आता व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि इतर डिजिटल माध्यमांमुळे धार्मिक कार्यक्रमांचे फोटो, व्हिडिओ, गाणी, घोषणा आणि संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होऊ शकतात. कावडयात्रेमध्ये सहभागी होणारे तरुण स्वतःचे व्हिडिओ आणि फोटो प्रसारित करून आपली उपस्थिती व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतात. या प्रक्रियेत धार्मिक सहभागाला डिजिटल दृश्यता आणि सामाजिक प्रतिष्ठेचे नवे परिमाण प्राप्त होते. याच डिजिटल अवकाशात धार्मिक भक्तीचे प्रदर्शन आणि राजकीय संदेश यांची सांगड घातली जाऊ शकते. जे आज वारकरी संप्रदायाचे असल्याचा दावा करत उघडपणे द्वेषावर आधारित हिंदुत्वाचे राजकारण पुढे नेत आहेत. विशिष्ट प्रकारची गाणी, संपादित व्हिडिओ, ऐतिहासिक दावे, धार्मिक प्रतीके आणि मुस्लीम समुदायाविषयीचे संदेश एकमेकांशी जोडले जातात. अशा सामग्रीचे वारंवार प्रसारण झाल्यास तरुणांच्या मनात एक भ्रामक सत्य उभे केले जाते. त्यांच्या प्रत्यक्ष आणि समाजमाध्यमातून अप्रत्यक्षपणे अशा उत्सवांमधील सहभागाला व्यापक राजकीय अर्थ प्राप्त होतो.
कावडयात्रांसारख्या उत्सवाचे वाढते प्रमाण बघता हिंदुत्वाचे राजकारण दैनंदिन पातळीवर तरुणांचे पुरुषत्व केंद्रस्थानी ठेवून द्वेषाच्या राजकारणाचे वाहक तयार करीत आहेत. कावडयात्रा फक्त एक उदाहरण म्हणून बघितले तर असे अनेक उत्सव हे हिंदुत्वाच्या व्यापक परिसंस्थेचा भाग आहेत. ही परिसंस्था अधिक स्पष्ट होण्यासाठी बनिया व्यापारी भांडवलदार, धार्मिक संघटना, राजकीय नेते, जात-पितृसत्ताक राजकारण पुढे घेऊन जाणारी राज्यसंस्था आणि समाजमाध्यमे यांच्यातील दैनंदिन पातळीवरील परस्परसंबंध स्पष्ट होते गरजेचे आहे, या परिसंस्थेमध्ये कोणत्याची एका घटकाला संपूर्ण नियंत्रण असल्याचे गृहीत धरता येत नाही. हे विविध घटक एकमेकांना संसाधने, दृश्यता, प्रतिष्ठा आणि हिंदुत्वाची वैचारिक चौकट पुरवीत असतात. हिंदुत्वाच्या राजकारणाचा बीमोड करण्यासाठी त्याच्या लोकांना काहीतरी देऊ करण्याच्या भूमिकेला छेद देणे आवश्यक आहे.