Skip to main content

विज्ञानकथांना हवे विवेकी विज्ञान

संकीर्ण

शीर्षकात विवेकासंबंधी शब्द दिसला की बऱ्याच जणांच्या कपाळावर आठी पडते. आता हा माणूस कथांनाही शिस्तीचे धडे देणार की काय, अशी भीती वाटणे अवाजवी नाही.

म्हणून मी काय म्हणणार नाही, ते आधीच सांगून टाकतो. विज्ञानकथा आशावादीच असली पाहिजे, तिने वाचकाला नीतीचे धडे दिले पाहिजेत, किंवा तिचे प्रत्येक वाक्य तांत्रिकदृष्ट्या चोख असले पाहिजे, असा माझा अजिबात आग्रह नाही. विज्ञानकथेला भोंदूबाबा लागतात, निर्दय शास्त्रज्ञ लागतात, अंगावर काटा आणणारी भविष्ये लागतात, आणि वरवर अविवेकी वाटतील अशा बऱ्याच गोष्टी लागतात. सगळेच जर सुतासारखे वागले आणि प्रत्येक व्यक्ती नैतिक सीमेतच वावरली, तर निम्म्या कथा सुरू होण्याआधीच गुंडाळाव्या लागतील.

भुते, देव, शाप यांना कल्पनारम्य साहित्यात जागा नाही, असेही माझे म्हणणे नाही. चांगल्या काल्पनिक कथेद्वारे लेखक वाचकाशी सरळ सौदा करतो. "एवढी एक अशक्य गोष्ट मान्य करा. त्यानंतर माझ्या जगात मी तुमच्याशी प्रामाणिक राहीन."

गडबड सुरू होते ती वेगळ्याच ठिकाणी. एखादी कथा विज्ञानाचा रुबाब उसना घेते, पण विज्ञानाची शिस्त मात्र धुडकावून लावते. अंधश्रद्धा, भोंदू उपचार, भौतिकशास्त्राचे सोंग चढवलेले फलज्योतिष, चमत्कारांचे दावे, बनावट पुरातत्त्व, 'आपल्याकडे हे सगळे आधीच होते' छापाचे प्राचीन तंत्रज्ञान, हे सगळे कल्पना, रूपक किंवा काल्पनिक म्हणून आले तर काहीच हरकत नाही. पण तेच जेव्हा तपासून सिद्ध झालेले ज्ञान म्हणून पुढे केले जाते, तेव्हा खरी अडचण उभी राहते.

विवेकवादाचे काम नेमके त्या फाट्यापाशी सुरू होते.

वाचकाशी सौदा

विवेकवाद आणि कल्पनाशक्ती यांचे वाकडे आहे, असा एक गैरसमज आहे. मला तर विवेकवाद कल्पनाशक्तीचा एक राखणदार वाटतो. तो सतत काही साधे प्रश्न विचारत असतो. हे आपल्याला कसे कळले? पुरावा काय? कोणती गोष्ट समोर आली तर आपण आपले मत बदलू? आपणच आपल्याला फसवत तर नाही ना? हा दावा नुसताच आकर्षक आहे, की त्यात तथ्य आहे?

ड्रॅगनचे वर्णन करताना कादंबरीकाराने त्रुटीमर्यादा (एरर बार) द्याव्यात, अशी कोणी अपेक्षा करत नाही. पण विज्ञानकथेचे शक्याशक्याशी एक खास नाते असते. जी भविष्ये, जी तंत्रज्ञाने, जे समाज अजून जन्मालाच आलेले नाहीत, त्यांची कल्पना करायला ती आपल्याला सांगते. म्हणून तर्कावर उभी असलेली कल्पना आणि सरळसरळ खोटेपणा यांच्यातली रेषा विज्ञानकथेने प्रामाणिकपणे पाळायला हवी.

हार्ड सायन्स फिक्शनचे मोल त्यातल्या विज्ञानात आहे. तिथली वैज्ञानिक कल्पना वरून भुरभुरलेल्या कोथिंबिरीसारखी नुसती चवीला नसते. ती नव्या वाटा उघडते, काही दारे कायमची बंद करते, आणि कथेला तिचे परिणाम भोगायला लावते.

विज्ञानकथेतून एखादे गृहीतक बदलू शकते. बऱ्याचदा तसे ते बदलायलाच हवे. पण आपण काय बदलतो आहोत याचे भान लेखकाला हवे. ‘समजा, ही अशक्य गोष्ट शक्य झाली, तर पुढे काय होईल?’ हा एक प्रश्न; आणि ‘खोटी ठरलेली ही गोष्ट भारदस्त वाटते, म्हणून ती गुपचूप खरीच आहे असे समजू’ हा दुसरा. पहिल्यात कल्पनेची भरारी आहे. दुसरा म्हणजे नवे कपडे घालून आलेला (किंवा कपडेच नसलेला) जुनाच गोंधळ.

ट्रूथ इज स्ट्रेंजर दॅन ...

विज्ञानकथा सायफाय

विज्ञानकथेला मसाला पुरवण्याच्या बाबतीत वास्तव आधीच दिलदार आहे. मी ज्या क्षेत्रांत काम करतो, तिथलीच काही उदाहरणे देतो.

टाइम-डोमेन खगोलशास्त्रात आकाश सतत बदलणारे असते. तिथे सतत काहीतरी घडत असते. तारे जरी प्रदीर्घजीवी असले तरी दुर्बिणींच्या वाढत्या आवाक्यामुळे हे बदल टिपता येतात.  ताऱ्यांचा स्फोट होतो. कृष्णविवरे आसपासच्या ताऱ्यांना गिळंकृत करतात. ग्रह आणि लघुग्रह आकाशात स्थिर भासणाऱ्या ताऱ्यांच्या मानाने कूर्मगतीने का होईना मार्ग क्रमताना दिसतात. सक्रिय दीर्घिकांच्या गाभ्यांचे तेज कमीजास्त होत राहते. दर रात्री दुर्बिणी आकाशभर होणारे बदल टिपत असतात. त्यातले काही खरे असतात, काही मात्र इलेक्ट्रॉनिक्सने निर्मिलेले आभास, आणि काही इतके विचित्र की पहिली प्रतिक्रिया असते, "उपकरणच बिघडलेले दिसते!" निरीक्षणांवर अशी शंका घेण्याच्या सवयीमुळे विज्ञान कितीतरी वेळा घाईघाईने प्रसारित केलेल्या बातमीपत्रकांच्या फजितीतून वाचले आहे. सुरुवातीच्या काळात रेडिओ दुर्बिणीने टिपलेले, 'फास्ट रेडिओ बर्स्ट'सारखे दिसणारे काही संकेत शेवटी वेधशाळेतल्याच मायक्रोवेव्ह ओव्हनमधून आल्याचे निष्पन्न झाले. कोणीतरी जेवण गरम करताना घाईने, मायक्रोवेव्हचा टायमर वाजायच्या आतच, ओव्हनचे दार उघडत होते आणि संवेदनशील रेडिओ दुुर्बीण तो सिग्नल टिपत होती.

खगोलशास्त्र आपल्याला वैश्विक उलथापालथ दाखवते, निरनिराळ्या जगांची नाजूक, मोहक, तर कधी कधी रौद्र रूपे दाखवते, आणि एक गोष्ट सारखी बजावत राहते: या विश्वातले जवळजवळ सगळे काही आपल्यापेक्षा मोठे आहे, जुने आहे, विचित्र आहे, आणि आपल्याला वाटते त्यापेक्षा विश्वाला आपल्यात फारच कमी रस आहे. प्रत्येक दुर्बीण हे एक कालयंत्रच आहे. आपण जितके दूर पाहतो, तितके भूतकाळात डोकावतो. ही तर अस्सल विज्ञानकथेतली कल्पना. फरक इतकाच की ती खरी आहे.

जीवशास्त्रात विस्मयाचा आणखी एक थर उलगडतो. कर्करोग हा काही साधासुधा शत्रू नाही. शरीराच्या आत चाललेली ती एक उत्क्रांतीच आहे. जनुकांचे उत्परिवर्तन (mutation), परिस्थितीशी जुळवून घेणे, औषधांना दाद न देणे, आणि काळीज कुरतडणारी अनिश्चितता. अशा वेळी मशीन लर्निंगचे मॉडेल ‘बहुधा’ कॅन्सर आहे असे म्हणते, कॅन्सरची शक्यता किती ते सांगते, पण माणसाच्या मनाला ते ‘नक्की’ असे ऐकू येते. तेव्हा काय होत असेल?

सूक्ष्मजीवही असेच दिलदार आहेत. बुरशी आणि जीवाणूंच्या सहवासात थोडा वेळ घालवला की कथांमधले बरेचसे परग्रहवासी अगदीच बापुडवाणे वाटू लागतात, कारण साधारणत: कथांमध्ये त्यांची निर्मिती बाह्य आक्रमणांद्वारे कब्जा करायला, किंवा अपघातातून एखाद्याच परग्रहवासीयाचे प्रगत किंवा खेळकर वगैरे रूप दाखवण्यासाठी असते. सूक्ष्मजीव एकमेकांना मदत करतात, एकमेकांशी झगडतात, वसाहती वसवतात, ज्या शरीरात राहतात त्यालाच आपल्या तालावर नाचवतात, आणि अख्ख्या पृथ्वीचा चेहरामोहरा बदलतात. परग्रहावरची बुद्धिमत्ता अंतराळयानातून उतरेल, अशी कल्पना करायला आपल्याला आवडते. पण आपली पृथ्वी आधीपासूनच, माणसाला कधी सुचल्याही नसत्या अशा जगण्याच्या युक्त्यांनी गजबजलेली आहे, हे लक्षात आले की जास्त अस्वस्थ व्हायला होते.

सत्य आधीच इतके थक्क करणारे आहे की त्याला खोट्या चमत्कारांचे दागिने घालायची गरजच नाही. अंधश्रद्धेची वकिली बहुधा विस्मयाच्या नावाने केली जाते. पण अंधश्रद्धा म्हणजे बहुतेक वेळा आळसावलेला विस्मय. मनाला बरे वाटणारे पहिलेच स्पष्टीकरण ती उचलते आणि तिथेच फतकल मारून बसते. विज्ञान त्याच विस्मयातून नवे शोध लावते. कारणमीमांसेमुळे विस्मयाचा अंत होत नाही. त्याला तथ्याचा कणा प्राप्त होतो.

नकली विज्ञानाशिवाय पुराणकथा

भारतात हा मुद्दा आणखी धारदार होतो. आपण अवकाशमोहिमा, आधुनिक वैद्यक आणि अभियांत्रिकी यांच्या सोबतीने जगतो. त्याच घरात चमत्कारी उपचार, 'ऑरा'चे दावे, नशिबाच्या नावाने विकले जाणारे फलज्योतिष आणि व्हॉट्सॲप विद्यापीठातले पुरातत्त्वही गुण्यागोविंदाने नांदतात. रस्ता शोधायला GPS उपग्रहांवर डोळे मिटून विसंबणारी व्यक्तीच कधी कधी 'ग्रहणकाळात अन्न विषारी होते' असा मेसेज दहा समूहांवर पुढे सरकवते. याला सरळ दांभिकपणा म्हणणेही बरोबर होणार नाही. माणसे गुंतागुंतीची असतात. पण कथालेखकासाठी ही एक मोठी संधी आहे.

भारतातली विज्ञानकथा रुक्ष, पुस्तकी न होता या ताणाला भिडू शकते. आजारपणातले उपचार, राजकारण, मुलांचे शिक्षण, घरातले मोठे निर्णय, या सगळ्यांवर खोट्या समजुतींचा पगडा असतो. पण चांगल्या कथेत फक्त चांगले आणि वाईट, काळे आणि पांढरे एवढेच रंग नसावेत. माणसे घाबरलेली असतात, मायाळू असतात, हुशार असतात, स्वतःवर खूश असतात, विनोदी असतात, विसंगत वागतात, आणि चुकतही असतात. कथेने त्यांना तसे असू द्यावे.

मी नास्तिक आहे; तरीही इथे पुराणकथांचा उपयोग आहे, असे मी म्हणेन. पुराणकथा शब्दशः खऱ्या आहेत असे मी मानत नाही. पण कथा सांगण्याचे काही फार ताकदवान साचे त्यांनी पिढ्यान्‌पिढ्या जपून ठेवले आहेत - वनवास आणि परतीचा प्रवास; निषिद्ध ज्ञान; ज्याची किंमत नंतर मोजावी लागते असे वरदान; प्रत्यक्षात आपल्याच कर्माचे फळ असलेले शाप; अश्वत्थाम्यासारखे ओझे बनलेले अमरत्व; आणि असे रूपांतर, ज्यातून 'मी नेमका कोण?' हा पेच उभा राहतो.

एखादी पुराणकथा भौतिकशास्त्राचा शोधनिबंध नसतानाही मानसिक पातळीवर, सामाजिक पातळीवर, कथा म्हणून आणि कला म्हणून खरी असू शकते. तिला ओढूनताणून नकली भौतिकशास्त्रात बसवले की मग मात्र ती खुजीच होते.

पुराणातला उडता रथ प्रतिमा म्हणून, रूपक म्हणून, गोष्ट म्हणून आधीच अद्भुत आहे. त्याला कोणी प्राचीन जेट विमानाच्या साच्यात कोंबले, वर वैदिक वायुगतिशास्त्राची जोड दिली, आणि बहुधा 'प्रायॉरिटी बोर्डिंग'चीही सोय केली, तरी तो काही खरा होत नाही.

ही भुरळ काही ओसरलेली नाही. तिने फक्त आपली परिभाषा अद्ययावत केली आहे. जुने पारलौकिक दावे आता मेंदूविज्ञान, माहितीशास्त्र आणि संगणन यांचे शब्द लेवून येतात. न समजता फॉरवर्ड केलेले व्हॉट्सॲपवरील दावेच नाही, तर धर्म किंवा राजकारणाशी संलग्न शासकीय देणग्याही याला हातभार लावतात. पुनर्जन्माचेच बघा. मेंदूतल्या चेतापेशींच्या जोडण्यांचे आकृतिबंध काहीसे जपून ठेवले जातात आणि पुढच्या जन्मी नव्या मेंदूत पुन्हा जोडले जातात, अशा थाटात त्याची चर्चा होते. शब्द बदलले, पण पुराव्याअभावी पडलेली दरी जशीच्या तशी आहे. कथेने अशी कल्पना जरूर वापरावी. पण कोणता सौदा झाला आहे, हे वाचकाला कळायला हवे. ही फँटसी आहे? उपहास आहे? समाजातली एक समजूत आहे? फसवणूक आहे? की एक तर्कशुद्ध कल्पित यंत्रणा आहे, जिच्या परिणामांचा कथा शेवटपर्यंत काटेकोरपणे पाठपुरावा करणार आहे? अशी चौकटच नसेल, तर वैज्ञानिक परिभाषा म्हणजे निव्वळ वातावरणनिर्मितीसाठी लावलेल्या उदबत्तीचा धूर ठरते. जादूगार आहे, टोपीही आहे. पण आत हात घातल्यावर अंडे बाहेर निघत नाही, आणि कबूतरही नाही. हाती लागते केवळ हवा.

उत्तम फँटसी हा सौदा स्वच्छपणे करते. फँटसी वाचून झाल्यावर असे वाटत नाही की ड्रॅगन खरोखर असतात, फक्त प्राणिशास्त्रातल्या त्या संशोधनाला अनुदान मिळाले नाही. आणि वाटलेच, तर निदान स्तानिस्लॉ लेम या पोलिश लेखकाच्या ‘द ड्रॅगन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी’च्या थाटात तरी वाटावे. त्या कथेत ट्रर्ल आणि क्लापाउशियस हे दोन यंत्रमानव-अभियंते ड्रॅगनचा अभ्यास संभाव्यताशास्त्राच्या काटेकोर भाषेत करतात पण विनोदी अंगाने करतात. तो विनोद जमून येतो, कारण आपण कोणत्या अशक्यतेशी खेळतो आहोत हे लेमला पक्के ठाऊक असते.

कथेला कारण हवे, सबब नको

कथेत अविवेक रंगवण्याचा लेखकाला पुरेपूर हक्क आहे. अंधश्रद्धा, प्रचार, छळवादी सत्ताधीश, अनैतिक कंपन्या, खोट्या समजुतींच्या पायावर उभे राहिलेले अख्खे समाज, हे सगळे कथेत यायलाच हवे. प्रश्न एवढाच, की आपण या सगळ्याचे काय करतो आहोत, याचे भान लेखकाला, आणि त्या अनुषंगाने, कथेला आहे का.

खोटा ठरलेला सिद्धांत विज्ञानकथेत जरूर येऊ शकतो. पण लेखकाच्या नकळत (लेखकावर असलेल्या विचारांच्या unconscious पगड्यामुळे, किंवा विचारदारिद्र्यामुळे), प्रयोगशाळेचा पांढरा कोट चढवून तो कथेत घुसता कामा नये. कदाचित एखादे पात्र भ्रमात असेल. कदाचित अख्खा समाज प्रचाराच्या जाळ्यात अडकला असेल. कदाचित ती खोटी समजूत कोणी सत्तेसाठी वापरत असेल. किंवा कदाचित कथाच हा प्रश्न विचारत असेल, की ज्या गोष्टी आपल्याला इजा करतात, त्यांच्यावरच माणसे विश्वास का ठेवतात?

असत्य आपली खुशामत करते, तेव्हा ते फार मोहक वाटते. ‘आपल्या पूर्वजांना सगळे ठाऊक होते’; ‘प्रत्येक आधुनिक शोध आपल्या संस्कृतीत आधीच लागला होता’; ‘आपले भविष्य आकाशातील गोलांमध्ये लिहिलेले आहे’; ‘मन शुद्ध असेल तर रोग बरे होतात’; असे दावे आयुष्यातला अवघडपणा कमी करतात. अनिश्चितता पुसून टाकतात. उत्तर आपल्या खिशात आधीच आहे, असा दिलासा देतात. इतक्या सहज हातात पडणाऱ्या उत्तरांकडे विज्ञानकथेने जरा संशयानेच पाहिले पाहिजे.

विज्ञान म्हणजे इतर अनेक गोष्टींबरोबरच निराशा पचवायचे शिक्षण. आपल्या लाडक्या कल्पनांना निसर्ग बहुतेक वेळा भीक घालत नाही. आपला अहंकार सांभाळायची कोणतीही जबाबदारी डेटाने घेतलेली नसते. एखादे गणिती मॉडेल वरकरणी आकर्षक असूनही चुकीचे निघू शकते. उराशी जपलेली समजूत धाडकन कोसळू शकते. हे क्लेशदायक असते, हे खरे. पण त्यात एक मोकळेपणाही आहे. त्यामुळेच तर आपल्याला स्वतःच्या पलीकडचे काहीतरी सापडू शकते.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे याच प्रश्नाचा आजचा अवतार. आळशी कथा म्हणते, AI म्हणजे जादू, किंवा AI म्हणजे सैतान. जरा धारदार कथा वेगळे प्रश्न विचारते. जगाविषयीची माहिती आपल्यापर्यंत एका सांख्यिकी यंत्रणेमार्फत पोहोचू लागली, तर त्याचा अर्थ काय? यंत्र चुकीच्या कारणाने बरोबर उत्तर देते, किंवा छाती ठोकून चुकीचे उत्तर देते, तेव्हा काय होते? उत्तर वैज्ञानिक भासते म्हणून माणसे त्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा काय होते?

अशा कथांमध्ये विवेक हेच तग धरून राहण्याचे साधन ठरते.

डोळे सताड उघडे

विवेकवादी विज्ञानकथालेखकाला काही फरक ओळखायला शिकावे लागते. अशक्य आणि अज्ञात यांतला फरक. असंभाव्य आणि खोटे ठरलेले यांतला फरक. अशक्य गोष्ट गृहीतक म्हणून चालून जाते. अज्ञात ही तर कसदार जमीन ज्यातून असंख्य गोष्टींचा जन्म होऊ शकतो. असंभाव्य गोष्ट जपून हाताळावी लागते. आणि खोटी ठरलेली गोष्ट कथेत आणायची, तर त्यासाठी सबळ कारण द्यावे लागते.

विज्ञानाने कथेत परिणाम घडवावेत, नुसती शोभा वाढवू नये. भावनिक सत्य मांडायचे म्हणून तथ्यांकडे दुर्लक्ष करायची गरज नसते. पुराणकथांना आपल्या कथनपरंपरेची स्मृती म्हणून वागवले, तर त्या विज्ञानकथेला नवे आयाम देतात. त्यांनाच प्रयोगशाळेतला बनावट डेटा म्हणून पुढे केले, तर विज्ञानकथा पोकळ होते.

विवेकाच्या वाटेवर नाट्याची कमतरता नाही. आपले मत बदलणे, खात्रीची वाटणारी गोष्ट  निसटून जाणे, एखादी सुंदर समजूत खोटी आहे हे उमगणे, दिलाशापेक्षा पुरावा निवडणे, अशा प्रत्येक क्षणात नाट्य दडलेले आहे. प्रयोगशाळा, दवाखाना, वेधशाळा आणि गावच्या पारावरच्या गप्पा, सगळीकडे ते ठासून भरलेले आहे.

विज्ञानकथेकडे भविष्यवाणी म्हणून पाहण्यापेक्षा रंगीत तालीम म्हणून पाहणे अधिक योग्य. भविष्य दारात येऊन उभे राहण्याआधीच त्याची तालीम करून घ्यायची संधी ती देते. जबाबदारीची, दुःखाची, विस्मयाची आणि बदलाची तालीम.

विवेक त्या तालमीला प्रामाणिकपणा देतो. परिणामांचे भान ठेवून स्वप्ने पाहायला तो लेखकाला सांगतो. अंधार, फँटसी, पुराणकथा किंवा अशक्य गृहीतके यांवर तो बंदी घालत नाही. तो एवढेच म्हणतो, कल्पनेला पुरावा समजू नका, रूपकाला वस्तुस्थिती समजू नका, आणि दिलाशाला सत्य समजू नका.

विज्ञान मॉडेल देते. पुराणकथा साचे जपतात. कथा त्यांच्यात प्राण फुंकते. या तिघांची बलस्थाने वेगवेगळी आहेत. त्यांची गल्लत करू नका, एवढेच विवेकवादाचे सांगणे आहे.

विज्ञानकथेसाठी हीच कदाचित सगळ्यात चांगली भूमिका असावी. एक पाय पुराव्यावर, दुसरा कल्पनेवर, आणि दोन्ही डोळे सताड उघडे.

(Indian Association for Science Fiction Studies (IASFS) २०२६च्या संमेलनात दिलेल्या इंग्रजी भाषणावर आधारीत)