गोरख आया! (पुस्तकात नसलेली 'फाफे'कथा)
***
.
"ट्टॉक्!" बनेश ऊर्फ फास्टर फेणे उद्गारला.
"माझ्या चिठ्ठीत बघ काय आलंय?" बन्याने उलगडलेल्या चिठ्ठीत लिहिले होते : "हडपसरच्या वाटेवर डावीकडे शिंदोळीचे बन आहे. तिकडे तू जायचेस. तिथे एक सर्वांहून वेगळा असा अपूर्व वृक्ष आहे – गोरखचिंचेचे झाड. तुला हे झाड माहीत असेल. प्रचंड घेराचा वृक्ष. नसेल ठाऊक तर माहिती करून घे. त्या झाडाची पश्चिमेकडे लोंबणारी फांदी सर्वात लंबाडी आहे. तिला घेऊन वर जा. ढोली दिसेल. तीत उतर. तुझा खजिना तिथे ठेवलेला आहे, तो घे!"
"हडपसरचं शिंदीचं बन म्हणजे इंद्रू इनामदाराचं राज्य की!" सुभाष उद्गारला. "त्याला आवडणार नाही तू तिथे गेलेला."
"आवडो न आवडो. मी माझा खजिना लुटायला जाणार. इनामदाराचं राज्य म्हणे! इनामदार संपले सगळे. हे महाराष्ट्राचं लोकराज्य आहे." बन्याने ऐटीत सांगितले.
विद्याभवनमध्ये 'ट्रेझर हन्ट' किंवा खजिना-शोधाचा खेळ चालू होता. सर्व मुलांना आवडणारी स्पर्धा होती ती आणि तीत भाग घेत होती शाळेतली तीस-चाळीस मुले.
सुरुवातीला दहा बौद्धिक चढाओढी झाल्या. त्यात पहिला नंबर पटकावणारी दहा मुले आपापले बक्षीस न्यायला सज्ज झाली होती. पण त्यांना हे बक्षीस सहजासहजी मिळणार नव्हते. त्यासाठीच ही खजिना-शोधाची स्पर्धा आयोजित केलेली होती. सुर्वे सरांनी काही चिठ्ठ्या तयार करून एका हंड्यात टाकल्या होत्या. त्यातून या दहा जणांनी एकेक चिठ्ठी उचलायची आणि तीत लिहिलेल्या सूचना अमलात आणून आपला खजिना हुडकायचा.
आणि चिठ्ठ्या जेव्हा बाहेर निघाल्या तेव्हा त्यांतून फार गमतीजमतीचे संदेश बाहेर पडले. शरद शास्त्रीच्या चिठ्ठीत होते : "तू बागेतल्या विहिरीत उतर. तिथल्या खबदाडीत तुझा खजिना आहे." आता आमचा चष्मेवाला शास्त्री कितीही काटक असला तरी त्याचा जीव घोटाळत असे रसाळ पुस्तकात - खडकाळ खबदाडीत नाही. पण आता त्याच बिकट वाटेने जाणे त्याला भाग होते. त्याच्या चिठ्ठीतला मजकूर कळल्यावर चकोर देशमुखाने त्याला हिणवले." शास्त्रीबुवा, आडाचं पानी लई खोल हाये बरं! जपून उतरा. खेकडे आहेत खबदाडीत."
"खेकडेच काय? विरोळेपण आहेत. म्हणजे पाणसाप."
"अस्तु-अस्तु." चष्मा सारखा करीत शरद शास्त्री म्हणाला, "तुम्ही काळजी करू नका. मी बरोबर उतरेन – आणि काय रे चकोर, मला एवढा हिणवतो आहेस, पण तुला सासवडची वाट तरी माहीत आहे का?"
"हात्तिच्या! या सुभाषबरोबर मी चिकार वेळा गेलोय त्याच्या बंगल्यात. एकदा तर आम्ही पुरंदरला गेलो होतो – व्हाया सासवड."
"ते ठीक आहे. पण ही इलेक्ट्रिक सोंगट्यांची फॅक्टरी माहीत आहे का तुला? नाहीतर राहशील सासवड नि पुरंदर यांच्या दरम्यान घोटाळत. गड-सास्वडयोर्मध्ये चकोरो लुडबुडायते!"
"आम्हांलाही डोकं आहे म्हटलं. आम्ही काढू शोधीन ती सोंगट्यांची फॅक्टरी." चकोर म्हणाला. "सोंगट्या म्हणजे ती तारेच्या खांबावर पांढरी 'उदबत्तीची घरं' असतात ना, ती! त्यांचा एक कारखानाच आहे म्हणे.
एका मुलाला फारच मजेशीर संदेश मिळाला होता. त्याने दक्षिणेकडे तोंड करून कोलांटी उडी घ्यायची होती. उडी मारल्यावर त्याची डावी तंगडी ज्या बाजूला पडेल तिकडे शंभर यार्ड जायचे. त्या ठिकाणी मातीचा लहानसा ढीग दिसेल तो उकरायचा. आत सापडेल व्यवस्थित बांधलेले त्याचे बक्षीस.
"आपल्याला कोलांट्या मारायच्या नाहीत एवढं बरं आहे." फास्टर फेणे म्हणाला.
"हो ना! सायकलवर टांग मारली की निघालो आपण." चकोर म्हणाला. "फा.फे. मला तुझ्याच बाजूला यायचंय. वाटेत फुरसुंगीचा फाटा लागला की मी वळवीन माझं हँडल. काय मजा आहे, नाही?"
"कसली मजा?" फास्टर फेणेने आपल्या सायकलीकडे जाताना विचारले.
"नाही. म्हणजे एकेकाचं नशीब बघ कसं असतं! तू फुरसुंगीचा, तर तुला पिटाळलंय तुझ्या शत्रूच्या राज्यात – आय मीन – राज्यात नाही, परिसरात आणि मी खुद्द पुण्याच्या रास्ता पेठेतला, तर मला जावं लागणार सासवडला – जो आपल्या सुभाष देसाईचा गाव आहे."
"चांगलंच आहे." बन्या म्हणाला, "सुभाषला सोमवार पेठेतला वाडा मिळालाय."
"वाड्यातला एक कोनाडा."
"बरं, बरं गप्पा पुरेत. मार सायकलवर टांग."
चकोर नि बन्या आपापल्या सायकलीवर स्वार झाले अन् त्यांनी सोलापूर रोडवर स्वारी केली.
एका तासात आपली मोहीम उरकून परत आले पाहिजे अशी सरांची त्यांना आज्ञा होती.
फुरसुंगीच्या काठ्यावर चकोरला 'टा-टा' करून बन्या ऊर्फ फास्टर फेणेने सरळ पुढे सायकल हाणली. थोड्याच वेळात तो डावीकडच्या शिंदीबनात पोचला.

हे शिंदीबन फास्टर फेणेप्रमाणे तुमच्याही कदाचित ओळखीचे झाले असेल. आज तो इथे स्वतःचा हक्काचा खजिना शोधण्यासाठी आलेला असला, तरी पूर्वी एकदा इथेच त्याने तंट्या भिल्लाचा खजिना शोधून काढला होता आणि याच बनात इंद्रू इनामदारच्या गुंडांनी त्याला कैद करून ठेवले होते – सायकल शर्यतीत त्याला भाग घेता येऊ नये म्हणून. इंद्रूला फास्टर फेणेचा उत्कर्ष बघवत नसे. त्यामुळे तो नेहमीच त्याच्या वाटेत अडथळे आणण्याचा प्रयत्न करी. पण इंद्रू विद्याभवनचा विद्यार्थी नव्हता. तो शिकत असे टोळे हायस्कूलमध्ये. त्यामुळे आज तरी फा. फे. ला मोकळे रान मिळाले होते. त्याच्या नाकात काड्या घालायला आज इं. इ. नव्हता.
इंद्रूचे घर होते या शिंदीबनाला लागूनच. पण इंद्रू शाळेत अडकलेला असला तरी बन्याला आजची कामगिरी जरा अवघड वाटत होती. बनातून तो हिंडलेला असला तरी इथे कुठेही गोरखचिंचेचे झाड त्याने पाहिलेले नव्हते. खरे म्हणजे गोरखचिंचेचे झाड तसे विरळ आढळते. पण ते लपण्यासारखे मुळीच नाही. बन्याने तसले झाड एम्प्रेस गार्डनमध्ये पाहिलेले होते. त्याचे खोड चांगले गलेलठ्ठ असते. अन् पाने जरी शेवरीसारखी कत्री असली तरी त्याला फळे लागतात ती चांगली भोपळ्यासारखी ढेबरी. त्यांना चिंचा कशासाठी म्हणायचे हे बन्याला नेहमीच कोडे वाटे!
'मी ते झाड या बनात कसं पाह्यलं नाही – नवलच आहे हे एक. कारण इंद्रू त्या गोरखचिंचेबद्दल नेहमी बोलतो खरा. आमच्या घराशेजारी गोरखचिंच आहे. आमच्या बाबांचं ते लाडकं झाड आहे. त्यांचं पोट कधी साफ नसतं. ते सारखे आंबट ढेकरा देत असतात. गोरखचिंचेचा काढा प्याल्यावर त्यांना बरं वाटतं.'
शिंदीबन पूर्णपणे निर्जन होते. तिथल्या चिंचोळ्या वाटेने सायकल रेटीत असताना बन्याच्या मनात या आठवणी घोळत होत्या. पुढे वाट अगदीच अडचणीची झाली तेव्हा खाली उतरला आणि सायकल एका झाडाला टेकून ठेवून पायीच चालू लागला.
आज बराच शोध केल्यानंतर त्याला सापडला तो राक्षसी चिंचांचा वृक्ष. कालव्याच्या काठावर ते प्रचंड झाड उभे होते. फा. फे. त्या झाडाजवळ गेला तोच मुळी दक्षिण बाजूकडून. त्यामुळे त्याला समोरच ती लांबलचक फांदी दिसली. झाडावर लोंबणारी तपकिरी रंगाची ती ढेबरी फळे पाहून तर त्याला झाडाची पुरती ओळख पटली. लगेच ती फांदी पकडून बन्या वर वेंघला.

त्या भक्कम फांदीवर उभे राहून त्याने हातांनी वरची फांदी पकडली अन् तो चालत झाडाच्या मध्याकडे गेला. तिथे पाहतो तर खरोखरीच एक मोठी पोकळी होती. इतकी मोठी अन् खोल की त्याला आत सहज उतरता आले. तिथे वर्तमानपत्रात बांधलेले एक पार्सल त्याची वाटच पाहत होते. ते उचलून तो पुन्हा वर आला. आडव्या फांदीवर उभे राहून त्याने पुन्हा वरची फांदी पकडली.
आणि साहजिकच त्याची नजर त्या लठ्ठ गोरखफळांकडे गेली. त्यातल्या एका जाडजूड फळाने त्याचे लक्ष विशेष वेधून घेतले.
कारण त्या फळात खरोखरीच एक वैशिष्ट्य होते, जे आतापर्यंत त्याला दिसले नव्हते.
चिंचफळाच्या गरगरीत पोटाभोवती एक पिवळी रेघ होती. रेघ नव्हे – दोरा! त्याला एक दोरा गुंडाळलेला होता. प…* गोरखनाथजींचा करगोटा!
फास्टर फेणेचे कुतूहल चांगलेच जागृत झाले. तो आणखी जरा वर चढला अन् हात लांबवून त्याने ते फळ पकडले, ओढले अन तोडले.
मग ते पार्सल अन् तो भोपळा घेऊन स्वारी आता खाली उतरणार होती…
आपल्याला बक्षीस मिळालेल्या पार्सलबद्दल त्याला उत्सुकता होतीच. पण त्यात पुस्तके असणार हे त्याला माहीत होते. त्याहीपेक्षा त्याला घाई झाली होती तो भोपळा फोडण्याची!
पण भोपळा फोडावा लागलाच नाही. ढेरीभोवती गुंडाळलेला दोरा ओढताच त्याची दोन शकले झाली आणि आतून बाहेर पडले एक कागदाचे भेंडोळे.
कागद साधे नव्हते. फार भारी होते. चलनी नोटांची गुंडाळी होती ती. शंभर-शंभराच्या दोनशे नोटा त्यात होत्या.
"ट्टॉक्!" असे म्हणत बन्या ते भेंडोळे परत गोरखफळात ठेवतो आहे तोच खालून साद आली, "अलख निरंजन!"
अंगावर भस्माचे पट्टे नि लाल कुंकवाचे पट्टे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, डोळ्यात लालभडक नशा चढलेली, कंबरेला कटोरा नि हातात त्रिशूळ असा तो एक बैरागी होता.
"क्या हैं? कौन हो तुम?" फा. फे. गुरगुरला.
"जय मछिंद्रनाथजी की! जय गोरखनाथजी की! जय कानिफ…."
"पुरे हो ती यादी!" फा. फे. म्हणाला. "तुम्ही माझ्याकडे असे डोळे वटारून का बघताय ते सांगा."
हे बोलत असतानाच दोन्ही बोजे घेऊन त्याने खाली उडी टाकली आणि तो आपल्या सायकलीकडे पळणार होता. पण बैराग्याने त्याचा दंड पकडून त्याला उभा केला, अन् तो हळू आवाजात पण दरडावून म्हणाला, "कहाँ भागते हो? खडा हो जाव! चोर कहीं का!"
"मी चोर नाही." फा. फे. पण जोरात म्हणाला. "मी हे पोलीसला देणार आहे. सोडा मला!"
"पोलीस में क्यों देते हो, लौंडे?" बैरागीबुवांनी इकडे तिकडे चोरट्यासारखे पाहिले अन् खालावून ते म्हणाले, "आधा तुम लो – आधा हमको दो. मिट गया जंजाल! जया अलखनिरंजन!"

"एक कवडी मिळायची नाही तुला!" फास्टर फेणे ओरडला. "तू साधू आहेस की बदमाष भोंदू?"
"यह पैसा भगवान की माया हैं! भगवान को दे दो!" बैरागी दात विचकीत म्हणाला.
"कुछ नहीं मिलेगा!" फास्टर फेणेही दातओठ चावून म्हणाला आणि मग त्याने केले, "ओऽऽय!"
कारण साधूबुवांचा क्रोध आता अनावर झाला होता. बन्याच्या हातातले नोटांचे बंडल त्याने हिसकावून घेतले आणि हातातला त्रिशूळ त्याच्यावर उगारला. दुसऱ्याच क्षणी बन्याच्या छातीत किंवा पोटात तो भोसकून त्याला जबर जखमी करून तिथून पळण्याचा त्याचा इरादा होता. पण तेवढ्यात एक चमत्कार झाला –
त्रिशुळाचा दांडा मागच्या मागे कुणीतरी जोराने खेचला अन् दूर फेकून दिला.
"चकोर!" बन्याच्या तोंडून आश्चर्याने उद्गार निघाला. इकडे चकोरने उडी मारून त्याला हातांनी अन् पायांनी असे गच्च कवटाळाले, की बैरागीबुवांचा गळा घुसमटून त्यांना एका सेकंदात नऊ नाथ आठवले. अर्थात त्यांची खरी भक्ती कोणत्याच नाथावर नसल्यामुळे त्यांना कोणी तारू शकला नसता.
बैरागी आता हिरवानिळा पडला होता. फास्टर फेणेच्या दंडावरची त्याची पकड केव्हाच ढिली पडली होती. फास्टर फेणे मागे हटला, अन् हाताची मूठ वळून त्याने बैराग्याच्या नाकावर एक जोरदार ठोसा लगावला. मागूनपुढून दोन्हीकडून हल्ला होताच बैरागीबुवा नरम पडले. त्यांच्या हातातले बंडल बन्याने केव्हाच हिसकावून घेतले होते.
"त्याचा त्रिशूळ उचल. सोडू नकोस तसा." फास्टर फेणे म्हणाला.
खाली पडलेला त्रिशूळ चकोरने उचलला अन् त्याचे दोन-चार रट्टे बैराग्याच्या पोटरीवर हाणले. "ओऽय-ओऽय!" म्हणून ओरडत महाराज जमिनीवर आडवे झाले. त्यांच्या तंगड्या तात्पुरत्या तरी निकामी बनल्या होत्या.
"नाऊ लेट्स् हरी!" बन्या म्हणाला अन् सायकलकडे धावला.
"हरी तर कायमचाच पुजलेला आहेस तू, फास्टर फेण्या!" चकोरने त्याला दात दाखवीत उत्तर दिले आणि तो आपल्या सायकलीवर स्वार झाला तो त्रिशूलासकट!
"हा नोटांचा गड्डा कुठे मिळाला तुला?" पुण्याकडे परतीचा मोर्चा निघाल्यावर चकोरने विचारले. फास्टर फेणेने तो चित्तथरारक प्रसंग आमूलाग्र सांगितला आणि म्हटले, "बरं झालं, तू अगदी वेळेवर आलास. नाहीतर माझी अगदी चटणी उडवली असती त्या गोरखगुरुजीने!"
"गुरुजी कसला? सैतान साला!" चकोर म्हणाला, "आपले लोक मूर्ख म्हणून असल्या सोंगाढोंगांना भीक घालतात. पण काय रे बन्या, हे पैसे त्याचेच तर नसतील ना? म्हणजे त्याने कुणाचे तरी लुंगवलेले?"
"मला नाही तसं वाटत." फा. फे. म्हणाला. "कारण त्याने माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर नुसतं नवल दिसत होतं. त्याचं द्रव्य असतं तर तो रागावला असता. राग नंतर आला."
"म्हणजे दुसऱ्या कुणीतरी ही मोटली तिथे लटकवली होती."
"अर्थात बँकेचा सेफ डिपॉझिट व्हॉल्ट तळघरात असतो, याचा झाडाच्या फांदीवर होता. आपले शास्त्रीबुवा असते तर म्हणाले असते – भिन्न रुचिर्हि लोकः!"
"म्हणजे तुला डबल बक्षीस मिळालं की!" चकोर म्हणाला. "कितीचं घबाड आहे?"
"शंभराच्या दोनशे नोटा म्हणजे किती झाले?"
"वीस हजार! आयला!"
"पण ते आपले नाहीत, चकोर. आपण ते सरांजवळ देऊ. ते ठरवतील पुढे काय करायचं ते! पण ते राहू दे. तुला मिळालं तुझं बक्षीस?"
"ओ येस्! त्या फॅक्टरीच्या आवारात त्या पांढऱ्या सोंगट्यांची एक रास पडलेली होती. त्या राशीत लपवलेलं होतं माझं पुस्तकांचं पार्सल." चकोरने कॅरियरकडे बोट दाखवीत म्हटले. नाथमाधवांच्या स्वराज्याच्या कादंबऱ्यांचा सेट आहे."
"माझं बहुधा बाबासाहेब पुरंदऱ्यांचं 'राजा शिवछत्रपती' असावं." बन्या म्हणाला. मघाशी सायकलवर चढण्यापूर्वी मी पार्सलचा कोपरा फाडून पाहिला."
'ट्रेझर हंट'चा खेळ संपला. प्रत्येक जण आपापले बक्षीस घेऊन घरी गेला. पण – पण - त्या नोटांच्या बंडलाचे काय झाले? कुणाचे होते ते घबाड? ते घबाड एका लबाड माणसाचे होते. त्याचे नाव होते रंभाजीराव इनामदार!
हे सद्गृहस्थ नुकतेच जे अचानक बाहेरगावी गेले होते, ते उगाच नाही. त्यांनी पळ काढला होता, पळ.
कारण विचारता? कारण त्यांच्या घरावर अकस्मात पोलीसची धाड आली होती. त्यांनी दडवलेला काळा पैसा जप्त करण्यासाठी. पण समोर घर धुंडाळूनही पोलिसांना तो सापडला नाही. कारण –
आता हे तुम्हांला माहीत झाले आहेच की! त्याची मोटली बांधून त्यांनी शिंदीबनातल्या एका गोरखफळात ठेवली होती. सर्व सामसूम झाल्यावर परत येऊन ते हळूच ती मोटली काढून घेणार होते. केवढी अजब युक्ती ही! पण अशा कितीतरी अजब युक्त्या रंभाजीरावांजवळ असत. त्यांचे डोके म्हणजे अशा युक्त्या नित्य शिजवणारा एक प्रेशर कुकर होता! कधी कधी त्या कुकरमधले अन्न त्यांना पचे. पण तात्पुरते. अशा लांड्यालबाड्या, चोऱ्या कायम कधीच पचत नाहीत. केव्हा ना केव्हा हे पाप ओकावेच लागते.
याही खेपेस असेच झाले. रंभाजीरावांवर पोलिसांनी खटला भरला आणि त्यांच्यावरचा आरोप सिद्ध होऊन त्यांना खडी फोडायला जावे लागले.
पण तो काळ्या बाजारचा पांढरा लोण्याचा गोळा मधल्यामधे गट्ट करण्यासाठी जो बं-भोलानाथ 'गोरख-शिष्य' उपटला होता, त्याच्या तंगड्या फार लवकर बऱ्या झाल्या असाव्यात. कारण तो जो नाहीसा झाला तो अजून बेपत्ताच आहे. या प्रसंगाची आठवण म्हणून फा. फे. ने तो त्रिशूळ मात्र जपून ठेवला आहे.
दुसरीही एक गोष्ट त्याने जपून ठेवली आहे, ती म्हणजे पुण्याच्या पोलीस सुपरिंटेंडेंटनी शाळेच्या पत्त्यावर धाडलेले शाबासकीचे पत्र!
भा. रा. भागवत
***
पूर्वप्रकाशन: 'नवलाई' दिवाळी अंक १९८२, पृष्ठ क्र. ३८
रेखाटने आणि सुलेखन: मूळ प्रतीतून साभार; संस्करण : अमुक
*संपादकीय टिपण: मूळ प्रतीच्या छायाचित्राधारे या कथेचे टंकन केले आहे. छायाचित्रात हा शब्द स्पष्ट दिसत नाही. 'प'पासून सुरू होणारा शब्द असावा, इतकाच अंदाज करता येणे शक्य आहे.
विशेषांक प्रकार
गोष्ट आवडली. गोरखचिंचेच्या
गोष्ट आवडली. गोरखचिंचेच्या वैशिष्ट्यपूर्ण झाडाची ओळखही सुंदर प्रकारे गोष्टीत गुंफली आहे. गोरखचिंचेचं वर्णन अचूक आहे पण झाडाचं चित्र काढणार्याने ते झाड पाहिलेलं नाही.
अवांतरः पुणे विद्यापीठाच्या जुन्या मुख्य इमारती समोर एक गोरखचिचेचं झाड पडलेल्या अवस्थेत आहे. त्याला पालवीही फुटली आहे. झाड उन्मळून आले आहे तिथे एक छानच गुहेसारखी जागा तयार झाली आहे.
जबरी! पण ही कथा पुस्तकांत का
जबरी! पण ही कथा पुस्तकांत का नाही म्हणे? शेवटचं फाफे पुस्तक १९८७ साली प्रकाशित झालं ना?