Skip to main content

एव्हलिन विलो: करामतींची राणी

एव्हलिन विलो: करामतींची राणी

- श्रीजा कापशीकर

.
भा. रा. भागवत विशेषांकात आजच्या पिढीतील मुलांचाही सहभाग असावा असा विचार आम्ही केला. त्यासाठी काही मुलांकडून 'माझा आवडता सुपरहीरो / माझे आवडते पात्र' या विषयावर एक लहानसा परिच्छेद / लेखन मागितले होते. पैकी श्रीजा कापशीकर या १४ वर्षांच्या मुलीने तिच्या आवडत्या पात्राबद्दल हे स्फुट लिहिले आहे. हे पात्र म्हणजे 'हॅरी पॉटर'मधील एव्हलिन विलो. 'अशा नावाचे कोणते पात्र 'हॅरी पॉटर'मध्ये आहे बुवा?’ असा विचार करताना तुमच्या लक्षात एक गंमत आली असेल. ती म्हणजे, श्रीजाने वर्णन केलेले हे पात्र 'हॅरी पॉटर'मधील पात्र नसून, हॅरी पॉटरवर आधारित जी 'फॅनफिक्शन्स' आंतरजालावर लिहिली गेली आहेत, त्यांतील एक आहे, ज्याला श्रीजाने व तिच्या मैत्रिणीनेच जन्माला घातले आहे.

एव्हलिन भारांच्या विश्वातली नसली, तरीही आजच्या मुलांच्या जगात डोकावून घेतलेला हा किंचितसा कानोसा तुम्हांलाही आवडेल आणि 'ऐसी'च्या परिवारातल्या या नव्या नव्या लेखिकेला तुम्ही सांभाळून घ्याल, अशी आशा आहे. मूळ इंग्रजी लेखनाचा अनुवाद 'ऐसी'सदस्य ऋषिकेश याने केला आहे.

***

एव्हलिन विलो, करामतींची राणी ऊर्फ प्रँकिंग क्वीन! जगभरातील मुली तिला आदर्श मानतात. ती एक मैत्रीण, प्रेयसी, पत्नी, बहीण, मुलगी होतीच, शिवाय ती लढवय्यी होती. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ती एक राणी होती. तिने मला शिकवलं आहे, की माणूस असणं हे 'ओके' आहे, आणि आपल्या भावना दिसू देणंही 'ओके' आहे. ती एक लढवय्यी होती - एक निष्णात लढवय्यी! - एव्हलिन 'ऑरर्स' मधल्या सर्वांत धाडसी लढवय्यांपैकी एक.

सर्वात शक्तिशाली यक्षाच्या थोबाडावर ठोसा मारण्याची धमक तिच्यात वयाच्या सतराव्या वर्षीच आली होती. तिने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. तिने हेही दाखवून दिलं की स्त्रिया अजिबात कमकुवत नसतात. तिने लैंगिक भेदभावाची सगळी जुनी समीकरणं मोडून काढली आणि स्वतःही त्या प्रतिमेला जागली. ती हॉगवर्ड्समधली सर्वोत्तम करामतगार (प्रँकर) होती. सात वर्षं मुखवट्याआड राहून, तिने सर्व गोष्टी समर्थपणे घडवून आणल्या. तेव्हा ती फक्त सतरा वर्षांची होती. आजवर बघितलेल्या सर्वाधिक 'पोचलेल्या' चेटकिणींपैकी (witches) ती एक होती.

एव्हलिनला 'त्यागा'चे महत्त्व कळले होते. जग वाचवण्यासाठी तिने स्वत:चे आयुष्य अर्पण केले. ती आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राणीच राहिली. मृत्यूच्या क्षणाला ती अत्यंत अदबीने व तयारीने सामोरी गेली आणि जेव्हा मृत्यू तिच्याकडे रोखून बघत होता, तेव्हाही ती जराही विचलित झाली नाही. मरण्यापूर्वी तिने मृत्यूलादेखील तिचे राणीपद मान्य करायला भाग पाडले.
तिने अतिशय बारकाईने, बारीकसारीक तपशिलांसह आपल्या करामतींची योजना केलेली असे.

स्वत:ला जे योग्य वाटते त्यावर विश्वास ठेवावा आणि त्यासाठी ठामपणे उभे राहावे असे एव्हलिनने मला शिकवले. तिचे प्राधान्यक्रम ठरलेले असत. ती करामती करे, ती एक चांगली मैत्रीणही होती; पण त्याच वेळी तिच्या कामावरून तिचे लक्ष कधीही ढळत नसे. ती सोळाव्या वर्षीच 'लढाईची योजनाकर्ती' (बॅटल प्लॅनर) झाली होती.

आतापर्यंत मी वाचलेल्या आणि लिहिलेल्या पात्रांपैकी एव्हलिन हेच सर्वांत प्रेरणादायक पात्र आहे. एव्हलिन विलो ही मी आणि माझ्या मैत्रिणीने मिळून जन्माला घातलेली एक सर्वस्वी नवी व्यक्तिरेखा आहे.

तिचे मरण व्यर्थ गेलेले नाही. एव्हलिन विलो मरण पावली खरी, पण तिने मरणाला जिंकले होते!

करामतींच्या या राणीचा विजय असो!

***

१. हॅरी पॉटर या प्रकरणाशी फार परिचित नसणाऱ्या वाचकांच्या माहितीसाठी: 'ऑरर्स' हा 'हॅरी पॉटर'च्या पुस्तकातल्या 'मिनिस्ट्री ऑफ मॅजिक'मधील विशेष प्रशिक्षित लोकांचा एक चमू असतो. 'काळ्या विद्ये'शी संबंधित गुन्ह्यांचा तपास करणं आणि गरज पडल्यास, तिचा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगाराशी लढून त्याला पकडणं हे त्या चमूचं काम असतं.

***
चित्रः जालावरून साभार

***

ऋषिकेश Mon, 01/06/2015 - 14:05

In reply to by आदूबाळ

खोडीमध्ये मिश्कील भाव आहे. हे प्रँकर्स काही जादुई खोड्या करतात म्हणा, करामती करतात म्हणा, (किंबहुना असे काही बग्ज सिस्टिममध्ये सोडतात की ज्यातून त्यांच्या हाती इतरांना न साध्य होणारी माहिती लागते)

त्यांची खोडी काही वेळा वरवर मिश्कील वाटली तरी त्या मागे काही योजना असु शकेल.
---

अनुवाद करताना हाच नाही तर यातील अनेक शब्दांवर बराच खल करावा लागला - जे मला अनपेक्षित होते. :)

अवांतर: 'पोचलेली' चेटकीण हे मी Accomplished Witches चे भाषांतर केलेय. यासाठी 'कर्तबगार', 'परिपूर्ण' आणि 'पोचलेली' असे तीन समोर आले होते. प्रत्येकात accomplished ची एकेक छटा लोप पावत होती. शेवटी प्रकाशनाची वेळ साधायला त्यातील एक शब्द निवडला

काव्या Sun, 31/05/2015 - 06:17

श्रीजा, तुमचा (की तुझा म्हणू? :) ) हा उतारा विलक्षण आवडला :)

माणूस असणं हे 'ओके' आहे, आणि आपल्या भावना दिसू देणंही 'ओके' आहे.

वाह! बहोत खूब.
तू ऐसीवर अधिकाधिक लिहीशील किंवा अशी आशा करते.

ती करामती करे, ती एक चांगली मैत्रीणही होती; पण त्याच वेळी तिच्या कामावरून तिचे लक्ष कधीही ढळत नसे.

वा! खरच प्रेरणादायी.
.
खूपदा वाटतं - लहानपणाच्या भाबड्या पण मौल्यवान संस्कारांशी आपली नाळ तुटते आहे की काय. खरच बालसाहित्य वाचावयास पाहीजे. ऐसीवर जर तुझ्यासारखे टीनेजर्स लिहू लागले, आम्हाला त्यांच्या विश्वात डोकावू देऊ लागले तर केवढा फ्रेशनेस अनुभवता येइल. नाहीतर त्याच चर्चा अन तेच फिक्शन.

ऋषिकेश Mon, 01/06/2015 - 14:11

भा.रांंई आपल्या पिढीला फाफे दिला, काहिंना बिपीन दिला मात्र त्यानंतर बोक्या सातबंडे किंवा चिंटू वगळता एखादे नाव मुलांपर्यंत विशेष पोचले नाही. मग हल्लीच्या कुमारांना कोण अपील होतं तरी कोण? हे पहायचा उद्देश होता.

अशात मुलांचा फॅनफिकशी परिचयच नाही तर ही मुले स्वतः फॅनफिक लिहितात हे बघुन आमचा अंदाज फोल ठरल्याची खुणगाठ बांधलीच. वरील पात्र श्रीजाने आपल्या कॅनडातील एका 'ऑनलाईन-मैत्रिणी'च्या साथीने उभे केल्याचे तिने सांगितले. त्या दोघी मिळून एव्हलिनला केंद्रस्थानी ठेऊन ३-४ कथा लिहिल्या आहेत. तिच्याकडे गोष्टींचे दुवे मागितले आहेत मिळाले की देतो
===
पुढील लेखनासाठी, ऑल द बेस्ट श्रीजा

===

हल्लीची पिढी नक्की काय करतेय, तिची गरज, आवाका, रस कशात आहे हे लक्षात घेऊन मराठीत अशीच नवनिर्मिती सुरू झाली तर मुलांशी पुन्हा कनेक्ट होणे लेखकांना साध्य होईल असे वाटते. दुर्दैवाने सध्याच्या लेखकांपैकी या पिढीचा रस, भाषा आणि माध्यमे माहित असणारे मराठी बाल/किशोर कथालेखक माझ्या डोळ्यापुढे तरी येत नाहीत :(

मेघना भुस्कुटे Mon, 01/06/2015 - 15:50

In reply to by ऋषिकेश

दुर्दैवाने सध्याच्या लेखकांपैकी या पिढीचा रस, भाषा आणि माध्यमे माहित असणारे मराठी बाल/किशोर कथालेखक माझ्या डोळ्यापुढे तरी येत नाहीत

सहमत. फॅनफिक्शनबद्दलचे प्रेम दाखवण्याची ही जागा नव्हे खरी म्हणजे. पण जगभरातल्या किशोर आणि कुमारवयीन मुली (हे असं का आहे देव जाणे) मोठ्या प्रमाणावर लेखनाचे ताजे प्रयोग फॅनफिक्शनच्या माध्यमातून करताना दिसतात. तिथल्या घडामोडींचा मराठी साहित्यात काहीच कसा सुगावा लागलेला दिसत नाही, कुणास ठाऊक.