Skip to main content

ओळख - काही उचलगिरी करणाऱ्यांची

मराठी सृष्टीवर ‘तुमच्या मनातल्या लेखकाला जागे करा” हे आव्हान स्वीकारून मी मराठी लेखन करायला सुरुवात केली. बहुतेक वेळा ‘मराठीसृष्टी’ किंवा; मी मराठी’ वर लेख टाकल्या नंतर आपल्या ब्लॉगवर टाकीत असे. कालांतरानंतर ‘मी मराठी’ वेबसाईट बंद पडली. ‘प्रेम म्हणजे काय’ हा लेख प्रथम मराठी सृष्टीवर (१३.७.२०१०) टाकला होता आणि नंतर आपल्या ब्लॉग वर.

ऐसीअक्षरे सुरवात म्हणून मला स्वत:ला आवडलेला हा लेख ऐसी अक्षरे वर ८.१२.२०१३ टाकला. श्री राजेश घासकडवी यांनी मला जाब विचारला आणि माझी दांडीच उडाली. मी कधीही आपल्या लेखांचे प्रिंट घेतले नव्हते. (कार्यालयात इंटरनेटवर बंदी असल्या मुळे). सुदैवाने मराठीसृष्टी सुरु होती. लेख सापडला. मूळ लेखकालाच आपण चोर नाही हे सिद्ध करण्याची पाळी आली. आता मी शहाणा झालो आहे. प्रत्येक लेख आधी आपल्या ब्लॉग वर आणि नंतर मिसळपाव आणि ऐसीअक्षरे वर टाकतो. (दोन तीन ठिकाणी लेख टाकल्यामुळे कुणी चोरी करणार नाही असे वाटले). तसे म्हणाल तर प्रेम म्हणजे काय हा कमीत कमी ७-८ लोकांनी आपल्या नावानी टाकला असेल. यातल्या ४ लोकांनी किमान खेद तरी व्यक्त केला. यात पुरोगामी विचारांचे एकमत नावाचे ई-वर्तमान पत्र यांनी नाव न देता प्रेम म्हणजे काय हा लेख ७.१.२०१५ छापला. यात विशेष म्हणजे अंतर्जालावर हा लेख शोधताना इतरांचीच नावे जास्त दिसतात.

अंतर्जालावर दुसर्यांचे लेखन आपल्या नावाने काही लोक बेहिचक जसेच्या तसे आपल्या नावाने खपवितात. यातले काही पकडल्या गेल्या वर किमान खेद तरी व्यक्त करतात किंवा पुढे असे करणार नाही याचे आश्वासन तरी देतात. पण काही त्यांना जाब विचारल्यावर त्याचे उत्तर ही देत नाहीत. मूळ लेखकाला कळले आहे तरी बेशर्मीने सारखे तोच कित्ता गिरवीत राहतात. माझा एक लेख तर ब्लॉग वर प्रकाशित केल्याचा अवघ्या २० मिनिटानंतरच एकाने आपल्या नावाने प्रकाशित केला. जाब विचारल्यावर त्याने त्या लेखात माझे नाव टाकले. म्हणून त्याचे नाव देत नाही आहे.

एकच उपाय सर्वांनी आपले लेख एकदा तरी तपासून बघितले पाहिजे. अश्यांची माहिती अंतर्जालावर लिहिणार्यांना कळली पाहिजे. कमीत कमी थोडी लाज वाटून ते असे करणे सोडण्याची शक्यता.

शिवाजीराव शिंदे : हे मराठी अड्डावर नियमित लिहित राहतात. बहुतेक पुण्यात राहतात यांनी केलेला पराक्रम

१.तपश्चर्येचे फळ (२.६.२०१५) शिवाजी राव शिंदे यांनी २३.६.२०१५ ला आपल्या नावानी http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1136352
२. मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही (१९.३.२०११) शिवाजीराव शिंदे यांनी २४.७.२०११ ला आपल्या नावानी http://marathiadda.com/profiles/blog/ 2437740:BlogPost :611726
३. वसंत पंचमी एक आनंदोत्सव(२५.१.२०१५): शिवाजीराव शिंदे यांनी २६ जनवरी २०१५ला http://marathiadda.com/m/blogpost?id=2437740%3ABlogPost%3A1122770
४ .रस्त्यावर वाहन चालविणारे (6.9.2014) शिवाजीराव शिंदे यांनी दुसर्याच दिवशी अर्थात ७.९.२०१४ http://marathiadda.com/profiles/blogs/ 2437740:BlogPost: 1097323?xg_source=activity
वरुण राजाला साकडं: (१.९.२०१४) शिवाजीराव शिंदे यांनी ३.९.२०१४http:// marathiadda.com/ profiles/ blogs/2437740:BlogPost:1096709
६. इमानदार माणूस आणि त्याचा झाडू (६.१०.२०१४) शिवाजीराव शिंदे यांनी त्याच दिवशी रात्री १०.३० वाजता http://marathiadda.com/profiles/blogs/2437740:BlogPost:1101051

किरण खंडागळे(मराठी कविता आणि बरच काही), हे ठाण्यात राहतात. बहुतेक यांनी नंतर लिखाण सोडलेले दिसते. यांच्या कडून ही काही उत्तर आले नाही.

१. पुन: एकलव्य : नियतीचा खेळ (१६.६.२०१३) किरण खंडागळे यांनी १०.८.२०१३ http://marathikavee.blogspot.in/ 2013/08/blog-post_9124.html
२. प्रेम आणि गालावरचे खड्डे (२८.७.२०१३) किरण खंडागळे यांनी http://marathikavee.blogspot.in/ 2013/08/blog-post_26.html
३. प्रेम म्हणजे काय: (१३.७.२०१०) किरण खंडागळे यांनी
http://marathikavee.blogspot.in/2013/02/blog-post_6744.html

तुझ माझ मराठी (रणजीत मांगे) यांनी तर कमाल केली.
१. रामायण कथा सीता: (६.४.२०१५) तुझ माझ मराठी (फेसबुक वर त्याच दिवशी अर्थात ६.४.२०१५)
२. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।: (७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर यांनी त्याच दिवशी ७.१२.२०१४ला.
३. म्हातारी ग मैना: (१.२.२०१५) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी.
४. बंदुकीची गोळी आणि ती: (२७.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी
५. झुंज - अंधाराच्या राक्षसांशी(६.१२.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी
६. बळी (२४.११.२०१४) तुझ माझ मराठी वर त्याच दिवशी
आणखीन प्रयत्न करणे सोडून दिले.

या शिवाय माझे इतर लेख उदा: एखाद दुसर्याने उचलगिरी केलेली आहे. एफ डी आई सुंदरी, भ्रष्टाचार / काचेचे घर, मराठी बाणा / मोडेन पण वाकणार नाही: समलैंगिकता - सृष्टीच्या विनाशाचा मार्ग. पण सध्या त्यांचे नाव देत नाही आहे. कदाचित हा लेख वाचून ते पुढे असे करणार नाही ही अपेक्षा.

Node read time
3 minutes

ललित लेखनाचा प्रकार

3 minutes

अरविंद कोल्हटकर Fri, 03/07/2015 - 20:18

भुसावळहून चालवल्या जाणार्‍या 'शिवकालीन महाराष्ट्र' ह्या आयडीच्या फेसबुक पानावर मी ऐसीमध्ये लिहिलेल्या कोल्हापूरचे छत्रपति राजाराम ह्यांचे फ्लॉरेन्स, इटली येथील स्मारक ह्या लेखाची उचलेगिरी, श्रेय न देता, केलेली आहे असे दिसते. हा लेख अन्य कोठूनतरी उचलला आहे अशी शंका उत्पन्न करू शकणारी पहिली काही प्रस्तावनेची वाक्ये वगळण्याची हुशारीहि दाखविली आहे.

अशा उचलेगिर्‍या सरसहा चालू असतात. मी मागे स्वत: सिद्ध केलेले एक उदाहरण देतो. ’छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट - महत्वाच्या घडामोडींचा आलेख’ ह्या ऐसीवरील जुन्या धाग्यावरील प्रतिसादांमध्ये ५ जानेवारी २०१२ च्या तारखेस माझा एक प्रतिसाद आहे. त्यामध्ये ’Shivaji's Coronation 1674' अशा शीर्षकाचा प्रा. कुडसे नावाच्या प्राध्यापकांचा तथाकथित ’रिसर्च पेपर’ हा जदुनाथ सरकारांच्या लिखाणाचे copy/paste कसे आहे हे दाखविले आहे. हे copy/paste आहे ही गोष्ट प्राध्यापकमहोदयांनी कशी लपविली आहे हेहि तेथे दाखविले आहे.

प्रकाश घाटपांडे Fri, 03/07/2015 - 20:32

मला ही माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी या पुस्तकाची चक्क उचलेगिरी माझ्याशी संपर्क न करता व संदर्भ न देता केलेली आढळली; हे पुस्तक मी उपक्रमवर लेखमाला स्वरुपात २००७ ला टाकले होते. http://mr.upakram.org/node/1065
ओंकार पुरंदरे नावाच्या माणसाचा पुरंदरचा वाघ सरदार अशा नावाचा ब्लॊग आहे
http://purandarchawaghsardar.blogspot.in/2010/07/blog-post_7882.html

बॅटमॅन Sat, 04/07/2015 - 02:35

मायबोलीवर अकिलीस नामक आयडीने माझ्या ट्रोजनविषयक लेखांची उचलेगिरी केली होती. येथील सदस्य अमृतवल्ली यांनी ही बाब ध्यानात आणून दिली त्याबद्दल त्यांचे आभार.

हे माबोवरचे लेख. त्यांपैकी पहिल्या लिंकवर माझा प्रतिसाद आहे तिथे अगोदरच्या लेखांच्या लिंका आहेत.

http://www.maayboli.com/node/49343

http://www.maayboli.com/node/49396

माहितगारमराठी Sat, 04/07/2015 - 08:21

अश्यांची माहिती अंतर्जालावर लिहिणार्यांना कळली पाहिजे. कमीत कमी थोडी लाज वाटून ते असे करणे सोडण्याची शक्यता.

हम्म.. अशा वर्तनास उचलेगिरी म्हणतात आणि ती नैतीकतेच्या आणि कायदेविषयक दृष्टीकोणातून योग्य नाही हे ज्यांना माहीत नाही/नव्हते पण ऑदरवाइज सहकार्यपूर्ण वर्तन असते अथवा व्यक्तीगत प्रतिष्ठा पणाला लागेल अशा अत्यल्पसंख्य व्यक्तींच्या वर्तनात फरक पडेल नाही असे नाही, पण जे आधी पासूनच उचलेगिरीत व्यस्त आहेत त्यांच्यात कितपत फरक पडेल हे काळच सांगेल.

या वरून मला कॉर्पोरेट मधील काही असे ट्रेनींग प्रोग्राम्स आठवले, की ते ज्यांच्या उद्बोधनाच्या उद्देशाने राबवले गेले त्यांच्या पर्यंत ते पोहोचलेच नाहीत. एखादा संदेश एखाद्या ठिकाणी पोहोचला तरी पालथ्या घड्यावर पाणी असा अनुभव येण्यास वेळ लागत नाही.

मराठी विकिपीडियावरचा माझा अनुभव अद्यापतरी खूप उत्साहवर्धक नाही. मी अत्यंत मेहनत करून संदर्भ नमुद करणे आवश्यक असलेल्या मजकुरास टिपणार्‍या आणि वेळेवर पुर्वसुचीत करण्याची क्षमता असलेल्या किमान डझनभर स्वयमेव संपादन गाळण्या स्थापीत केल्या आहेत. त्यातील दोनतीन कंपलसरी संपादन गाळण्या कंपलसरी आहेत म्हणून काही यश दिसते. ऑदरवाइज जाणत्या अनुभवी लेखकांच्याबाबतीतही परिस्थिती सध्यातरी खेदजनक अशा स्वरुपाची आहे. केवळ संदेश देणार्‍या गाळण्यांना पॉझिटीव्ह रिस्पॉन्स येत नसल्यामुळे अर्धा डझन संपादन गाळण्यांचे तरी संदेश मला म्युटकरून मला कर्तव्य चपखलपणे बजावणार्‍या संपादन गाळण्यांनाच मौन व्रतात पाठवावे लागले आहे. आपल्या सारख्या लेखामुळे जनजागृती होऊन मराठी विकिपीडिया वरचीही सद्य स्थिती पालटली गेल्यास फायदाच होइल. पण परिस्थितीत फरक पडण्यासाठी एवढाच एक प्रयत्नही पुरेसा ठरेल असे वाटत नाही.

आंतरजालीय आणि वृत्तपत्रीय मराठी लेखकांची एखादी स्वतंत्र कॉपीराइट फालोअप सोसायटीची आवश्यकता आहे जी जागरूकताही निर्माण करेल, लेखकांच्या कॉपीराईट बद्दल फालोअप घेऊन त्यांना उत्पन्नही मिळवून देईल आणि ज्यांना त्यांचा मजकुर मुक्त स्वरूपात उपलब्ध करावयाचा आहे त्यांनाही साहाय्य करेल.

अर्थात लेखकांनीसुद्धा प्रतीलेख दोन परिच्छेद अथवा ४००० बाइट या पैकी जे कमी असेल तो मजकुर मूळ लेख आणि लेखकाचा संदर्भ देऊन वापरू देण्याबद्दल विचार करावा असे वाटते. ज्यामूळे लेखकांचे लेखन अधीक लोकांपर्यंतही पोहोचेल आणि समाजपयोगीही होण्यास मदत होऊ शकेल.

विवेक पटाईत Sat, 04/07/2015 - 17:05

In reply to by माहितगारमराठी

काही लोक प्रकाशित करताना लेखकाचे नाव ही देतात. विकासपिडिया या साईट वर माझे नाव देऊन २-३ लेख प्रकाशित झाले आहे उदा: गणपती पूजेच्या मागची अवधारणा. किमान आपले नाव तरी जास्त लोकांपर्यंत पोहचते.

माहितगारमराठी Sat, 04/07/2015 - 09:46

In reply to by चिमणराव

कोणतीही व्यक्ती मूळातून भाषातज्ञ असल्या शिवाय अख्खा शब्दकोश बनवू शकणार नाही. खाप्रे डॉट ऑर्ग म्हणजे आताची ट्रांसलीटरल डॉट ऑर्ग वर शब्दार्थ मूळ शब्दार्थ कोशाच्या संदर्भा सहीत दिले आहेत आणि तशा पद्धतीने खांडबहालेंनी श्रेय ठळकपणे नमुद करणे केव्हाही श्रेयस्कर. त्यांच्या शब्दकोशातील मोठा भाग मोल्सवर्थातून येत असावा (चुभूदेघे).

एखाद्या शब्दाची व्याख्या नव्या पद्धतीने लिहिली गेल्यास त्या व्याख्येच्या शब्द रचनेस कॉपीराईट लागू होत असावा पण मूळ शब्दार्थांवर कॉपीराईट असू शकत नाही, डिक्शनरींच्या बाबत कॉपीराईट मुख्यत्वे डिक्शनरीच्या मांडणी आणि रचनेवर आणि काही नव्या व्याख्या दिल्या असल्यास त्यावर लागू होत असावा असे वाटते (चुभूदेघे)

उदय. Sun, 05/07/2015 - 22:14

आंतरजालावरील लिखाणाबाबत लोक इतके सेन्सिटीव्ह का असतात, ते मला कळलं नाहीये. त्यांचा उदरनिर्वाह त्या लिखाणावर/फोटोवर अवलंबून असेल तर एकवेळ मी समजू शकतो, पण केवळ हौस म्हणून केलेले लिखाण/फोटो कुणी वापरले तर ती मॉरली नक्कीच चुकीची गोष्ट आहे, पण त्यामुळे जगबुडी झाल्याचा जो काही आभास केला जातो, तो काही मला कळत नाही.

उभ्या आयुष्यात कोणी कधीच पायरेटेड सिनेमा बघितला नाही का? पुस्तक वाचले नाही का? तेव्हा जर आपल्या मनाला काही वाटत नसेल तर आपले लेखन कुणी चोरले तर दु:ख का व्हावे? आता कुणी म्हणेल की आम्ही पायरेटेड पुस्तक वाचतो, ते ठीक आहे कारण ते मी माझ्या स्वतःच्या नावावर खपवत नाहीये. पण मग अश्यावेळी मूळ लेखकाच्या/लेखिकेच्या हक्कांवर अतिक्रमण करतोय, हे लक्षात घेत नाही हा दुटप्पीपणा झाला ना.

आता समजू की ब्लॉगचा लेखक/लेखिका आदर्श व्यक्तिमत्व आहे आणि तो/ती कधीच इतरांचे लेख/फोटो चोरत नाही आणि वापरतही नाही. त्याला/तिला स्वतःचे लेखन मात्र जपायचे आहे. त्यासाठी ते कॉपीराइट करावे लागेल. जो सर्वप्रथम पब्लिश करेल त्याचा कॉपीराइट आहे, असे साधारणतः मानले तरी ते सिद्ध करायची जबाबदारी मूळ लेखकावर पडते. फोटो USPTO कडे नोंदणीकृत करता येतात, पण ते खर्चिक काम आहे. त्यानंतर सतत सतर्क रहावे लागेल की कुणी माझे लेख चोरले आहेत का? इतका वेळ व्यक्तिशः माझ्याकडे तरी नाही. तुमच्याकडे आहे का, याचा विचार करा. मी तर माझे लेखन वापरायला प्रोत्साहनच देईन, ज्यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत ते पोचेल. जर कोणी मोठा बकरा मिळाला (असोसिएटेड प्रेस, रिडर्स डायजेस्ट, मोठी मिडिया कंपनी) यांनी जर लेखन चोरले तर माझी लॉटरी लागायची शक्यता आहे, ५-५० फुटकळ भुरट्या चोरांच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे आणि तितका वेळ आहे का, खर्च करायची तयारी आहे का?

समजा मी पोट भरण्यासाठी लेखन/फोटोग्राफी करतोय तर मग मी माझे संक्षिप्त लेखन प्रसिद्ध करीन आणि लोकांना पुस्तक विकत घ्यायला सांगीन. फोटोग्राफर असेन तर पोर्टफोलिओत कमी रिझोल्यूशनचे फोटो दाखवीन आणि क्लायंटला स्वतंत्रपणे चांगले फोटो दाखवीन. माझ्यामते आंतरजालावरील सहज उपलब्ध होणारे लेखन हे चोरीपासून रोखता येणार नाही कधी. (पण अमक्यातमक्याने माझा लेख तमक्या ठिकाणी, तमक्या वेळी स्वतःच्या नावावर प्रसिध्द केला, मग मी त्याचा असा-तसा फॉलोअप केला, मग असेतसे झाले, या डिटेक्टिव्हगिरीच्या गोष्टी वाचायला मजा मात्र येते आणि छान मनोरंजनपण होते, जे कदाचित मूळ लेखनाने झाले नसते.)

माहितगारमराठी Mon, 06/07/2015 - 00:42

In reply to by उदय.

आंतरजालावरील लिखाणाबाबत लोक इतके सेन्सिटीव्ह का असतात, ते मला कळलं नाहीये. त्यांचा उदरनिर्वाह त्या लिखाणावर/फोटोवर अवलंबून असेल तर एकवेळ मी समजू शकतो, पण केवळ हौस म्हणून केलेले लिखाण/फोटो कुणी वापरले तर ती मॉरली नक्कीच चुकीची गोष्ट आहे, पण त्यामुळे जगबुडी झाल्याचा जो काही आभास केला जातो, तो काही मला कळत नाही.

याच अनुषंगाने मागे ऐसी आणि मिपा या संस्थळावरून कॉपीराईटचे अर्थकारण आणि माझी (स्वतःची) दुटप्पी भूमीका ! या शीर्षकाचा लेख लिहून मी सुद्धा बा.सी. मर्ढेकरांच्या कवितेतील गणपत वाण्याच्या स्वप्नरंजनाचे उदाहरण वापरून टिका केलेली आहे. आंतरजालावरील ललितेतर साहित्याच्या मराठी लेखकाने छापील क्षेत्रातून (आणि जालावरही) नेमके कोणत्या मजकुरावर उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे आणि कोणत्या लेखनावर उत्पन्न मिळण्याची शक्यता नाही याबद्दल स्वतःच्या विचारांना रिव्हिजीट करावयास हवे असे मलाही वाटते ते मी त्या लेखा धागातून सविस्तर मांडले आहे. तरीसुद्धा मी उदय यांच्या प्रतिसादातील भूमिकेशी पुरेसा सहमत होऊ शकत नाहीए.

आंतरजालावरील लिखाणाबाबत लोक इतके सेन्सिटीव्ह का असतात, ते मला कळलं नाहीये.

पहिली गोष्ट आज नाही कधी काळी आपल्या पुढच्या पिढीला किडूक मिडुक उत्पन्न का होईना मिळालेतर बहुतांश लोकांना हवे असते. कॉपीपेस्ट करणारी मंडळीत जेवढे 'ह्युमन बिईंगत्व' असते तेवढेच मूळ लेखकातही 'ह्युमन बिईंगत्व' असते :)

दुसरे आपल्या उपरोक्त प्रश्नाचे उत्तर विवेक पटाइतांच्या याच विषयावरील मिपा धाग्यात मधुरा देशपांडे यांच्या प्रतिसादातून "....पण या प्रत्येक लेखामागे त्या त्या लेखकांचे कौशल्य आहे, अनुभव आहेत, ते लेखस्वरुपात यावे म्हणुन त्यांनी वेळ दिला आहे, या मेहनतीचे काय. उदा. म्हणुन गुर्जींचा जो एक लेख चोरला गेला, त्यासाठी केवळ तेवढे दोन-चार तासांचे टंकनश्रम लागले नसतील, त्याआधीचा त्यांचा कित्त्येक वर्षांचा अभ्यास आणि अनुभव देखील होता. मग कुणी जेव्हा एका सेकंदात ते स्वतःचे म्हणुन दाखवतात, कौतुक करवुन घेतात तेव्हा राग येतो. शिवाय उद्या मुळ लेखकालाच तुम्ही चोरी केली असे म्हटले जाते ते वेगळेच, असे आरोप झाले तर त्रागा होणारच. ~मधुरा देशपांडे " असे आले आहे ते भावनीक आक्षेपाची बर्‍यापैकी मांडणी करते.

त्यांचा उदरनिर्वाह त्या लिखाणावर/फोटोवर अवलंबून असेल तर एकवेळ मी समजू शकतो, पण केवळ हौस म्हणून केलेले लिखाण/फोटो कुणी वापरले तर ती मॉरली नक्कीच चुकीची गोष्ट आहे, पण त्यामुळे जगबुडी झाल्याचा जो काही आभास केला जातो, तो काही मला कळत नाही.

पहिले मूळ कॉपीराइट धारकाची अनुमती न घेता वापरणे केवळ मॉरली नाहीतर लिगली सुद्धा चूक असण्याची शक्यता आहे, अन्यथा बौद्धीक संपदा कायद्यांचा उद्देशच मार खातो. अगदी तीन दिवसांपुर्वी दैनिक लोकसत्तात बौद्धीक संपदा कायद्याच्या विदुषी लेखिका प्रा. डॉ. मृदुला बेळे यांचा " कथा अकलेच्या कायद्याची: 'फक्त कलाकार म्हणा' हा वाचनीय लेख आला आहे. उदय हे कदाचित आमेरीकेत राहुन आमेरीकन कायद्यांचे संदर्भाने प्रतिसाद देत आहेत का कल्पना नाही पण आमेरीकन कॉपीराइट कायदा वि. भारतीय आणि युरोपीय कायदे यात अंतर आहे. प्रा. डॉ. मृदुला बेळे त्यांच्या लेखात म्हणतात तसे भारतीय आणि युरोपीय कायदे लेखकास त्याच्या लेखनाचा लेखक म्हणून ओळख जपली जाण्याचा आधिकार लेखनावरचा आर्थीक कॉपीराईट संपल्या नंतरही वेगळेपणाने मान्य करतात हे अधोरेखीत केले जाणे महत्वाचे आहे.

(काही लेखक स्वतः पायरेटेड साहित्य वापरतात) हे लक्षात घेत नाही हा दुटप्पीपणा झाला ना.

एकाचुकीने दुसर्‍या चुकीचे समर्थन होऊ शकत नाही आणि कायदाही प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे हाताळतो.

जर कोणी मोठा बकरा मिळाला (असोसिएटेड प्रेस, रिडर्स डायजेस्ट, मोठी मिडिया कंपनी) यांनी जर लेखन चोरले तर माझी लॉटरी लागायची शक्यता आहे, ५-५० फुटकळ भुरट्या चोरांच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे आणि तितका वेळ आहे का, खर्च करायची तयारी आहे का?

उपरोक्त तर्क काही महत्वपूर्ण वास्तवीकतांकडे पाठ वळवतो असे वाटते. जेव्हा केव्हा प्रताधिकार भंगाची केस सिद्ध होते आणि न्यायालय मूळ लेखकास नुकसान भरपाई देववू इच्छिते त्या वेळी प्रताधिकार उल्लंघन करणार्‍याने त्या उल्लंघनातून काय कमाई केली हे अभ्यासले जातेच पण नुकसान भरपाईच्या आर्थीक मोजणीचा दुसरा महत्वपूर्ण आधार मूळ लेखकास त्याच्या लेखनास सर्वसाधारण पणे काय उत्पन्न मिळते अथवा मिळत असे हा मुद्दा विचारात घेता येऊ शकत असावा. आणि भूरट्या उचलेगिरीकडे तुम्ही दुर्लक्षकेले तर तुम्ही प्रत्यक्षात उत्पन्नात इंटरेस्टेड नाही अथवा तुमच्या लेखनाची उत्पन्नक्षमता कमी आहे अशा प्रकारचा दावा प्रतीपक्ष करू शकेल ज्या मुळे आर्थीक उत्पन्नाची क्षमता कमी होत असेल दुसरे, अधिक महत्वाचे कायद्याच्या उल्लंघनाकडे तुम्ही जेवढा कानाडोळा करता तेवढे तुम्ही कायदा मोडणारी संस्कृती जपता. माणूस कायद्यासाठी असून नये कायदा माणसा साठी असावा हे मान्य पण जो कायदा आहे त्याचे सहसा पालन केले जावयास हवे. नियमास अपवाद असेल तर ठिक अपवादाने नियम सिद्ध होऊ नयेत. माठाला पाझर असेल तर माठातील पाणी थंड राहते पण त्याच मडक्याला भोक पडले की विपर्यास होतो.

माझ्यामते आंतरजालावरील सहज उपलब्ध होणारे लेखन हे चोरीपासून रोखता येणार नाही कधी.

indianakanoon.org कॉपीराइट कायद्याच्या बर्‍यापैकी केसेस वाचत असतो ज्या केसेस न्यायालयात जातात तेथे कॉपीराइट कायद्यांच्या उल्लंघनांना बर्‍यापैकी चाप बसतो असे दिसते. दुसरे कुठल्याही कायदा पालनाचे सामाजीकीकरण (लिगल सोशलायझेश- समाजाच्या अंगवळणीपडणे) हे संस्कृती सिद्ध असते. हि प्रयत्नांती सिद्ध होणारी प्रक्रीया आहे.

...पण ते खर्चिक काम आहे.... इतका वेळ व्यक्तिशः माझ्याकडे तरी नाही. तुमच्याकडे आहे का, याचा विचार करा.

एखादा भूरटा चोर तुमच्या डोळ्या देखत अगदी क्षुल्लकही गोष्ट घेऊन गेला तर चालण्यासारखे असते का ? दुख्ख म्हातारी मेल्याचे नाही काळ सोकावतो अशी एक मराठीत म्हण आहे. कायद्याच्या पालनात खर्चीकता असू शकते ती खर्चीकता टाळण्यासाठी मार्गसुद्धा असू शकतील आणि मार्ग नसतील तर ते बनवले पाहीजेत अन्यथा आमच्या पिढीची डोळे झाक पुढच्या पिढ्यांना मेहनतीने उभे केलेले कायद्याचे राज्य ह्या संकल्पनेपासून पहाता पहाता पारखे होण्यास कारणीभूत होऊ शकणार नाही ना अशी साशंकता वाटते.

फोटो USPTO कडे नोंदणीकृत करता येतात, पण ते खर्चिक काम आहे.

आपण आमेरीकन कॉपीराइट ऑफीसचा उल्लेख करत आहात का ? भारतीय कॉपीराइट ऑफीसमधील रजीस्ट्रेशन आमेरीकन ऑफीस एवढे खर्चीक नसावे असे वाटते. (चुभूदेघे)

मी तर माझे लेखन वापरायला प्रोत्साहनच देईन, ज्यामुळे अधिकाधिक वाचकांपर्यंत ते पोचेल. जर कोणी मोठा बकरा मिळाला (असोसिएटेड प्रेस, रिडर्स डायजेस्ट, मोठी मिडिया कंपनी) यांनी जर लेखन चोरले तर माझी लॉटरी लागायची शक्यता आहे,

या भूमिकेत काही वेगळा विरोधाभास जाणवतो का यास रिव्हिजीट करावे. क्रिएटीव्ह कॉमन्सचे परवाने वापरून किंवा तत्सम सुस्पष्ट उद्घोषणेने पद्धतशीरपणे लेखन प्रताधिकार मुक्त किंवा मर्यादीत अधिकारांनी वापरण्यास उपलब्ध करता येते (मुख्य म्हणजे मुक्त सांस्कृतीक काम या व्याख्येस आणि अधिकाधीक लोकांपर्यंत पोहोचण्याचा अधिकृत मार्ग ठरते).

कायद्याचे पालन करणार्‍यांसाठी पद्धतशीर मार्गाने लेखन उपलब्ध न करता कायद्याचे उल्लंघन करणार्‍यांना उल्लंघन करू द्यात, उल्लंघन करणार्‍या चिल्लर चाल्लर शेळ्या मेंढ्यांकडे मी बघणार नाही पण त्या जाळ्यात योगायोगाने अडकलेला एखादा बकरा मोठा निघाला की सोडणार नाही मी त्याला ! :) कदाचित तुम्हाला असे म्हणावयाचे नसावे, खरे तर मला तुमचा प्रतिसाद आवडला आणि म्हणून मी जरा जास्तच खीस पाडला असल्यास क्षमस्व. ह. घ्या. हि विनंती.

गवि Mon, 06/07/2015 - 11:24

In reply to by उदय.

@उदयजी.. अनेकांना अप्रिय वाटणारी गोष्ट वेगळीच असते. "क्ष" ने माझं लेखन चोरलं यापेक्षा मी "क्ष" चं लेखन चोरलं असं काही वाचकांना वाटू शकतं. किमान एवढ्या एका मुद्द्यापुरता हा विरोध रास्त असावा. आणि ही एक अत्यंत वैध शक्यता आहे.

प्रकाश घाटपांडे Mon, 06/07/2015 - 12:03

In reply to by उदय.

ओरिजिनल अस काही नसतंच इतपर्यंत लॉजक ताणता येते. तुम्ही केलेल्या कलकृतीची कॉपी इतरांनी स्वतःची निर्मिती वा तसा आभास निर्माण करुन जर खपवली व ते तुमच्या लक्षात आले तर तुम्हाला ती बाब खटकते एवढी साधी गोष्ट आहे. कायदेशीर नैतीक वगैरे शब्दफुफाट्यात जाउन सिद्ध करा या पातळीपर्यंतही जाणारे चोर असू शकतात. उल्टा चोर कोतवाल को डाँटे अशी काहीशी परिस्थिती पण उदभवतात. उद्या कदाचित एखादा चोर आपल्याला चोरी करु दिली नाही म्हणुन घरमालकावर फिर्याद करायला कमी करणार नाही.
आंतरजालावार बर्‍याचदा ढकलपत्रातून आलेल्या अनेक गोष्टी असतात. त्याचा उद्गाता नेमका कोण हे वाचणार्‍याला कळत नाही.उदगात्यालाही कधी कधी आपले जनकत्व सिद्ध करण्याची हौस वा गरज नसते. एखादी माहिती प्रदुषित होउन त्याची विकृती झाली व त्याचे एखादे मोठे प्रकरण झाले तर त्याचे जनकत्व घ्यायला कोणी पुढे येणार नाही. असो.
माझे लेखन चोरले हे तेव्हाच माझ्या लक्षात आले होते. पण विचार केला कि चला विचारांचा प्रसार तर होतोय ना? लेखनात चोरण्यासारखे काही मौल्यवान आहे असे त्याला वाटले असावे म्हणुन त्याने चोरले.

मिसळपाव Mon, 06/07/2015 - 01:31

अशी उचलेगिरी चूकच आहे पण त्याचबरोबर,

मी कधीही आपल्या लेखांचे प्रिंट घेतले नव्हते. (कार्यालयात इंटरनेटवर बंदी असल्या मुळे).

हे - कार्यालयात आपल्या खाजगी लेखनाचे प्रिंटआउटस घेणं - कीती बरोबर आहे?

विवेक पटाईत Mon, 06/07/2015 - 19:48

In reply to by मिसळपाव

घेणे बरोबर नाही. पण घरात ९०% लोकांकडे प्रिंटर नसतो. पण कथेंचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी प्रिंटर हा पाहिजेच. अधिकांश लोक कार्यालयातूनच प्रिंट काढतात (सरकारी असो व निजी). शिवाय वर्षाचे जास्तीसजास्त ५० एक पानाचे प्रिंट होणार. एवढा गैर वापर तर छोटी मोठी कंपनी ही खपवून घेते. जर कार्यालयात अंतर्जालाची सुविधा असती तर ९०% शक्यता प्रिंट घेण्याची नाकारता येत नाही. शिवाय आजकाल रेल्वे पासून ते विमानाचे टिकट इत्यादी छोट्या- छोट्या वस्तूंचे प्रिंट अंतर्जालावरूनच लोक घेतात. याला एक सामाजिक मान्यता मिळालेली आहे. त्यात कुणाला ही गैर वाटत नाही.

ज्या वेळी मला जाब विचारण्यात आला, अंतर्जालावर माझे सोडून इतरांचे दुवे जास्त दिसले. त्या वेळी मनाला त्रासतर झालाच होता. उचलगिरी करणारे ३ प्रकारचे लोक असतात. एक कतुहलवश, कुणाला एखादा लेख आवडला तरच, तिसरे आदतसे मजबूर. पहिल्या दोन प्रकारच्या लोकांच्या लक्ष्यात आणून दिल्यावर ते पुढे असा प्रकार करत नाही पण तिसरे मजबूर असतात, ते आपली सवय सोडायला तैयार नसतात. अश्याच लोकांचा उल्लेख मी केला आहे.

आदूबाळ Mon, 06/07/2015 - 20:06

In reply to by मिसळपाव

कार्यालयाचे इंटरनेट वापरून ऐसी वाचणं योग्य असेल तर प्रिंटर वापरण्यात गैर काय आहे?