Skip to main content

तीनशेचौदा लग्नांची पकाऊ गोष्ट

"हा रंग चांगला दिसेल तुला." आईने तांबडा-हिरवा-निळा अशा तिन्ही मूलभूत रंगांबद्दल हेच विधान केलेलं बघून तिसऱ्या साडीला माझा धीर सुटला. गोरं म्हणजे सुंदर आणि गोऱ्या लोकांनी कोणतेही रंग ल्याले तरी ते छानच दिसतात अशी टिपिकल भारतीय सौंदर्यदृष्टी मी लहानपणापासून ऐकत आले होते.

"आई, आता प्लीज तुझं दृश्यकलाज्ञान मला देऊ नकोस. तुझ्या ब्लाऊजपैकी जो मला फार बोंगळ होणार नाही ती साडी मी नेसेन. आणि तू म्हणत्येस म्हणून निषेधाची काळी फीत बांधणार नाही. पण ही चर्चा थांबव आता." हिची 'चाय पे चर्चा' सुरू झाली की मला धडकी भरते. एक पंतप्रधान काय कमी आहेत का?

ती पण माझीच आई. "हे बघ, ती मुळात तुझीच मैत्रीण आहे." हे अर्धसत्य होतं. स्मिता आणि मी शाळेत तीन वर्षं एका बाकावर बसायचो. तेव्हा शाळूमैत्री होती. शाळा, तिकडची बाकडी, तिथल्या भिंतीवरचे सुविचार या सगळ्या गोष्टी मी कधीच सोडून दिलेल्या. पुढे उच्चशिक्षणाच्या नावाखाली घरातून बाहेर पडले त्याच सुमारास स्मिता आईच्या ऑफिसात चिकटली. तेव्हापासून त्या दोघींमध्ये नवं नातं प्रस्थापित झालंय.

स्मिता दिसायला बरी, आणि वागायला ग्लॅमरस. तिचं लग्न ही गोष्ट आईचे फोन आणि व्हॉट्सअॅपचा शाळेचा ग्रूप यांत चालणारी सास-बहू छाप मालिका बनली होती. मी मुलगी असल्यामुळे आईच्या तावडीतून सुटले. नाहीतर तिने मला स्मिताबरोबर डेटलाही पाठवलं असतं. गॉसिपची ऑर्डर दिली नसली तरीही यथावकाश ते माझ्यापर्यंत यायचं. त्या गॉसिपमुळे माझा जीव नको-नको व्हायचा. त्यामुळे तिच्या लग्नाची घाई तिला जेवढी झाली नसेल तेवढी मला झाली होती.

अचानक तिच्या लग्नाचं आमंत्रण इमेलमध्ये दिसलं. माझा आधुनिक जग आणि तंत्रज्ञानावर असणारा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला. खरंतर मी इमेलवर लगेचच तिचं अभिनंदन केलं होतं. लग्नाला कोण जाणार! आईने गोंधळ घातला. आम्ही दोघीही त्या लग्नाला येऊ असं कबूल केलं. स्मिताने वर "मावशी, पण मधुराला साडी नेसायला सांग हं, प्लीज." वगैरे म्हणून आणखी पाचर मारून ठेवली.

लहानपणी मला लग्नं आवडायची. मी हॉलभर निरागसपणे फिरून आजी-आजोबा वयाचे लोक हेरून ठेवायचे. लग्न लागायच्या आधी त्यांच्याशी जाऊन थोड्या गोड गप्पा मारल्या की त्यांचे आख्खे, निदान अर्धे पेढेतरी मला मिळायचे. आमच्या आजोबांच्या डायबिटीसचा हा एकमेव, शैक्षणिक फायदा. हल्ली कसलीच सोय राहिली नाहीये. लग्नाच्या हॉलमध्ये सांडलेला अक्षता-फुलांचा कचरा, कचकड्याच्या झुंबरांतून गळणारा भगभगीत उजेड, हॉलभर पळणारी पोरं, सोन्याच्या खाणीतून आणि जरदोस-जरीच्या कारखान्यातून नुकते बाहेर काढलेले स्त्री-पुरुष, बायकांच्या घरगुती, गॉसिपी आणि पुरुषांच्या राजकारणाच्या टिपिकल रिकाम्या गप्पा हे सगळं एकदा शैक्षणिक अनुभव म्हणून ठीक आहे. पुन्हा पुन्हा लग्नांना जाऊन तेच तेच काय बघायचं? प्रत्यक्ष लग्नसमारंभात असणारा कलकलाट, गोंगाट बघूनही लोकांना लग्न का करावं याबद्दल याबद्दल प्रश्न नाही का पडत? मी हा सगळा वैताग आईवर ओतला. "शाळेत एका वर्गाची परीक्षा पास झालं की पुढे ढकलतात. कौटुंबिक समारंभांमधून असं पास का होता येत नाही? तीनशे चौदा लग्नांना गेल्यानंतर आणखी एक कशाला?" काहीही न बोलता आईने चौथी साडी बॅगेतून काढायला घेतली तेव्हा मी हार मान्य केली. "आई, चहाबरोबर टोस्ट हवा का खारी?" गांधीगिरी अमर आहे.

लग्नाचा दिवस जवळ आल्यावर मला त्या विचारांनी आणखी धडकी भरली. मी समीरला विचारलं, "सम्या, प्लीज माझ्याबरोबर लग्नाला येशील का?" त्याने आधी बरीच कारणं काढली. पण मी साडी नेसणार म्हटल्यावर लगेच "तो कॉमेडी शो बघायला मी नक्की येईन," म्हणाला. मला काय, तिथे करमणूक झाल्याशी कारण. आई तिकडे जाऊन गृहिणीगिरी सुरू करेल आणि मी त्या भर लग्नात एकटी पकेन.

"याला साडी नेसणं म्हणतात?" माझ्या साडीचा बोंगा जेवढा मोठा झाला नसेल तेवढा आईचा आ वासला होता.
"आई, 'आमच्यांत' अशीच नेसतात साडी. उगाच राईचा पर्वत करू नकोस."
"मधुरा, काडेपेटीत मावणाऱ्या साडीचा तूच पर्वत बनवलायस. मी हे असे बोंगे खपवून घेणार नाही." पुन्हा एकदा ‘साडी छोडो साडी गुंडाळो’ कार्यक्रम पार पडला.

आज मला उशीर होण्याची काहीही फिकीर नव्हती. पोहोचलो तर अक्षता वाटप केंद्र उघडलेलं होतं. एकदाचं लग्न लागलं आणि आई लगबगीने स्टेजच्या दिशेला निघाली. "आत्ताच त्या दोघांना भेटून येऊ. नंतर खूप गर्दी होते." मला या प्रकारात काहीही रस नव्हता. "पुष्पगुच्छ आणि आहेर नको" म्हटल्यावर आईने ऑफिसच्या सेंडॉफच्या वेळेसच स्मिताला गिफ्ट दिलेलं होतं. मग तिकडे जाऊन "आम्ही इथे होतो" छाप आठवणींचे पुरावे कशासाठी कोरायचे? असले प्रकार गुन्हेगार आणि विद्यार्थी अनुक्रमे तुरुंगांच्या भिंतीवर आणि शाळेच्या बाकड्यांवरही करतातच. लग्नात काय पुन्हा तेच! वर त्यासाठी रांग लावायची. पण हे मातोश्रींना कोण समजावणार? हा संवाद ऐकून समीरपण तिथून फरार झाला.

आम्ही म्हणजे खरंतर आईच रांगेत जाऊन उभी राहिली. समोरच्या काकू काकांना म्हणत होत्या, "कॅटरर कोण असेल हो? जेवणाचा वास तर चांगला येतोय." मी हारून-अल-मधुरा बनून रांगेतले लोक काय बोलतायत याची हेरगिरी करायला लागले. “आजकाल काय हो, सगळेच जण जातात अमेरिकेला.” "ती जर्मनीला जाणारे म्हणतात," दोन मध्यमवयीन पुरुष; त्यांच्या बरोबरच्या स्त्रिया एकमेकींच्या पदरांना हात घालत होत्या. “चांगला भरपूर खर्च केलेला दिसतोय इनामदारांनी. रिसेप्शनपण कुठल्याशा लॉनवर आहे म्हणे.” “मी ऐकलंय की त्यांची वरकड कमाई भरपूर आहे.” दोन उतारवयीन स्त्रिया, यांच्या बरोबरचा एक पुरुष शिक्षा केल्यासारखा शेजारच्या भिंतीकडे बघत होता, दुसरा पलिकडच्या पदराची चाचपणी करणाऱ्या काकूंकडे. (लग्नसमारंभसंबंधित वैतागाच्या यादीत या फोटोंच्या रांगेची आणि गलिच्छ गावगप्पांचीही भर घातली पाहिजे. पुढच्या लग्नाला...)

आईचा नंबर जवळ आला तसं तिने हाकाट्या करून मला बोलावलं. आमच्या आईला चारचौघांत कसं वागायचं हे समजत नाही. तिच्या हाकाट्यांमुळे शाळेतल्या सगळ्या मैत्रिणी तिथे रांगेत घुसल्या. रांगेचा फायदा काहीकाहींनाच. या शाळूसोबत्यांपैकी काहीजणी मला शाळेनंतर आजच भेटत होत्या. चेतना ब्रह्मे! ही केवढीशी होती आणि आता केवढी झाल्ये! "काय गं, तो मगाशी तुझ्याबरोबर होता तो कोण होता? तुमचा बार कधी उडवणार?" तेवढ्यात आमचा नंबर लागला. 'मधुरा या लग्नाला साडी नेसून आली होती', याचा एक फोटोपुरावा बनला.

चेतनाच्या चौकशा संपल्या नव्हत्या. एक पोर बोटाला, एक खांद्यावर झुलवत तिने मला पुन्हा पकडलं. "तू का नाही गं लग्न करत. सगळं कसं वेळेत व्हायला पाहिजे. आता तुझं वय काय कमी आहे का?" जणू काही लग्न आणि पोरं झाली म्हणजे ही तरुणच होत होती. "लग्नाला किमान वयाचं बंधन आहे, कमाल नाही." हा संवाद ऐकताना आईच्या चेहेऱ्यावरचं डँबिस हसू मी बघितलंच. "आता तरी बदल मधुरा. काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या." चेतनाची जिद्द वाखाणण्यासारखी आहे, भलतीकडे वापरते ही बाब निराळी! मला कोकिळादिदीची आठवण झाली. अडचणीत सापडलेलं मांजर वाघासारखं हिंस्र बनू शकतं असं म्हणतात. मी गळेपडूपणे चेतनाच्या खांद्यावर हात ठेवला. तिच्या डोळ्यात डोळे घातले. बोलताना माझ्या तोंडची वाफ तिच्या चेहेऱ्यावर पसरेल याची काळजी घेत म्हटलं, "चेतू, मला नं बायकाच आवडतात. मला पुरुषांमध्ये काही रस नाही." मात्रा लागू पडली. चेतना पोरांसकट तिथून पळून गेली. चेतनाला ब्रह्मास्त्र फेकून मारताना मला शाळेपासूनचा बदला घेण्याचा आनंद झाला.

हे सगळं ऐकून सीमा म्हणाली, "मधुरा, तू उगाच कायतरी बोलू नकोस तिच्यासमोर. ती जगभर पचकली म्हणजे?" चेतनाची शाळेपासूनच ब्रह्मे बोंबाबोंब कॉर्पोरेशन, बीबीसी अशी ख्याती होती.
"ही ही ही, माझ्याकडे साक्षीदार आहेत की!"

ह्या लग्नातून तरी मी सहीसलामत सुटले.

Node read time
5 minutes

ललित लेखनाचा प्रकार

5 minutes

मेघना भुस्कुटे Mon, 14/09/2015 - 10:02

जबरी झालाय हा भाग! अथपासून इतिपर्यंत.
हाच भाग मी लिहिला असता, तर आईनं साडी नेसवताना होणार्‍या धुसफुसभर्‍या संवादाची एक भर पडली असती. साडीसोबत 'जाणारे' दागिने आणि त्यावर एक उपचर्चा. झालंच तर बसून जेवण्याची आणि उभ्याने जेवण्याची पद्धत आणि आग्रह नावाचा प्रकार. जेवणानंतर तिथेच थांबावं लागलं तर येणारी अ श क्य झोप आणि त्या प्लास्टिक खुर्च्यांवर बसून ती झोप वारताना ढुंगणाला येणारे कड. 'इकडे आलोच आहोत तर-'छापातले हॉलमधून विनाकारण घरी घरंगळणारे पाहुणे आणि घरच्या सोफ्यावर वा थंड फरशीवर तसंच्या तसं लवंडता यावं म्हणून ते जाण्याची पाहिलेली शरणागत, चिवट आणि अर्धोन्मीलित वाट.
बादवे, मी झालेय लग्नांमधून पास. त्यामुळे अधिकच यन्जॉय केला लेख. मस्त!

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/09/2015 - 22:38

In reply to by मेघना भुस्कुटे

हाच भाग मी लिहिला असता, तर ...

आणि तुला तर हजार शब्दांची मर्यादाही नाही. तेव्हा हे अमर्यादमानवोत्तमे, लिही बघू तू हे ऐसपैस.

पिवळा डांबिस Mon, 14/09/2015 - 10:06

गोऱ्या लोकांनी कोणतेही रंग ल्याले तरी ते छानच दिसतात

म्हणून तर त्यांना अमका रंग शोभतो आणि तमका शोभत नाही अशी चर्चाच करावी लागत नाही!!!!
आवडला पोशाख की घ्या विकत, रंग कोणता का असेना!!!
;)
(धागा शतकंप्रसिध्यर्थं मम द्विं पणिकां समर्पयेत्!!!)

चिमणराव Mon, 14/09/2015 - 19:09

तीनशेचौदा संख्येला काही विशेष स्थान आहे का एका मैलाच्या दगडाव्यतिरिक्त, सतराशे साठ, छप्पन वगैरे सारखं?
गोंधळ छान जमलाय.

बॅटमॅन Mon, 14/09/2015 - 19:17

In reply to by चिमणराव

येथील एका सदस्यनामाशी विशेष संबंध असेलसे वाटते, आकडा आणि शैली या दोन्ही निकषांप्रमाणे पाहता.

XYZ Thu, 17/09/2015 - 19:50

In reply to by बॅटमॅन

हाच प्रश्न मलाही पडलाय.
प्रस्तुत सदस्यगण स्व:त च्या नावाने हे लेख का प्रकाशित करत नाही.
उगाच आपलं काही रहस्यमय असल्यासारखं सगळ दडवुन ठेवलेलं.
विचित्र वाटला हा प्रकार.

.शुचि. Mon, 14/09/2015 - 19:56

लग्नसमारंभात त्या साड्या अन दागीन्यांचा (स्वतःला)अतीव, फार, भयंकर कंटाळा येतो पण अन्य बायका नटलेल्या आवडतात. अत्तरांचा, गजर्‍यांचा, फुले, अष्ट्गंध, होम. जेवण यांचा घमघमाट फार आवडतो. सनईचे सूर तर वेडे करतात इतकं मंगल वाटतं. त्यामुळे लग्नसमारंभ हा आवडतोच आवडतो. मंगलाष्टकांचा ध्वनी ऐकायला छान वाटतो. जेवणाचं तर विचारुच नका. एकंदर इतरांचा लग्नसमारंभ आपली पंचेंद्रिये सुखावणारा असतो.
.
स्वतःचा लग्नसमारंभ मात्र उकाडा व गर्दीने हैराण करणारा असतो. मामा देतो ती पिवळी साडी विशेषतः बुट्ट्याची झिरझिरीत हां आठवलं चंदेरी खूप भुरळ घालते. बाकी शालू बिलू ओके किंबहुना नाहीच आवडत . पण चंदेरी अन तीही पिवळी .... माझा वीक पॉइन्ट आहे. माझ्या लग्नात मामाकडून तीच घेतली होती. पिवळ्या रंगाच्या साडीत वधू अतिशय गोड दिसते असे माझे मत आहे. मंगळसूत्रही मला आधुनिक अज्जिबात आवडत नाही. एक/दोन वाटयांचं पण पारंपारीक आवडतं. अन्नपूर्णा अन लंगडा बाळकृष्ण वधूला माहेरकडून दिला जातो, चांदीच्या लहानशा सिंबॉलिक फणीने सासू केस वधूचे विंचरते , सप्तपदी हे सर्व विधी आवडतात. बाकी मेंदी, मेक-अप बद्दलकाही विशेष ममत्व नाही. अन ते जिज्जूंचे बूट लपवणे वगैरे आचरट पंजाबी प्रकार तर मूर्खासारखेच वाटतात. आहेर, मानापमान हं ओक्के, त्यातही रुचि नाही. मुलीच्या आईने वराचे पाय क्षाळणे हा नावडता प्रकार आहे. बाकी औक्षण, ताट, रांगोळी हे सर्व आवडते.
___
आता लेखाबद्दल - असाही अनुभव असू शकतो हे कळले. लेख ठीक ठाक आवडला. भावना/ अनुभव पोचल्या/ला.

.शुचि. Mon, 14/09/2015 - 20:21

In reply to by आदूबाळ

=)) चंदेरी प्रकार आहे साडीचा :)
___
अजुन एक - अक्षता टाकताना टणाटण समोरच्याच्या टाळक्यात हाणणे, मोठ्ठ्या हॉलमध्ये लपंडाव खेळणे - या लहानपणीच्या प्रिय आठवणी आहेत.
___
अक्षता समारंभानंतर ते पेढा व फुल येते ती एक मज्जा असते. व अत्तराच्या स्प्रिंकलर्स च्या पुढे पुढे करणे. अर्थात हे स्प्रिंकलर्स बर्‍यापैकी सुखवस्तू लोकांच्याच लग्नात पाहीले आहेत.
रिसेप्शनला रसमलाई असेल तर विचारुच नका. अशा एकेक धमाल आठवणी आहेत.
___
अजुन एक कोणी ना कोणी "सो कॉल्ड" हस्तविद्या पारंगत ज्योतिषी (लग्नाळू मुलगा) व त्याच्याभोवती हात दाखवो इच्छिणार्‍या सर्व मुलींचा (बायका नाही) गराडा हे दृष्यही सर्रास पाहीले आहे. अन लहानपणीही (८वी / ९ वी) मला त्या ज्योतिषाच्या ज्ञान तसेच हेतूबद्दल शंका आल्याने मी अशा कुडमुड्या ज्योतिषांकडे कधी फिरकलेच नाही हे आठवते. =))

विवेक पटाईत Wed, 16/09/2015 - 20:37

In reply to by .शुचि.

गेल्या आठवड्यात चंदेरीला गेलो होतो... किल्यावर मस्त लंच केला. साडी मात्र विकत घेतली नाही, रविवार होता, शिवाय रामा पीरची मिरवणूक होती. दुकाने हि बंद होती. (खिसा कापला गेला नाही).

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 14/09/2015 - 22:43

In reply to by .शुचि.

मेंदी हा प्रकार मला कधीही आवडतो, अर्थात समारंभाशिवाय.

(इतर काही विनोदांच्या जोडीने) हा परिच्छेद छापील माध्यमातल्या मर्यादेमुळे वगळावा लागला -

लग्नाच्या निमित्ताने मी मेंदीमात्र काढून घेतली. मेंदीचा वास, रंग, हातावर जाणवणारा ओला स्पर्श सगळंच मला आवडतं. हल्ली ते राजस्थानी किंवा दिल्लीकडचे मेंदीवाले फुटपाथवर बसायला लागल्यापासून मेंदीची सुंदर, पारंपरिक सोय झालेली आहे. हात पसरून बसलं की दहा मिनीटांत दोन्ही हातभर मेंदी काढून देतात. मला या लोकांशी कधीपासून गप्पा मारायच्या होत्या. "आमच्याकडे हे बायकी काम समजलं जातं, तुमच्याकडे असं मानत नाहीत का?" असं विचारलं. एकीकडे माझे हात नीट ओढून घेताना चेहेऱ्यावरूनमात्र सवयीची प्रतिक्रिया मिळाली; 'ही बाई एकटीच येऊन अशी परपुरुषांबरोबर काय गप्पा मारत्ये?'

चिमणराव Tue, 15/09/2015 - 05:51

मेंदीसाठी थ्री डी प्रिंटींग मशीनं आली की वरच्या स्क्रीनवर डिझाइनस पाहून एक निवडायचे,डावा/उजवा हात सांगायचे ,किती रुपये दिसले की एटीएम कार्ड ढकलायचे -पाच मिनिटांत मेंदी काढली जाईल.आवडते गाणे ही ऐकवले जाईल,मशीनशी गप्पा नाही मारता येणार.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 15/09/2015 - 08:17

In reply to by चिमणराव

सीएनसी मशीनं नाही का करू शकत? थ्रीडी प्रिंटर कशाला पाहिजे?

(पण ती चालवायला एखादा 'चांगला' आॅपरेटर पाहिजे ब्वाॅ! नाहीतर असले चाळे कशाला हव्येत!)

ऋषिकेश Tue, 15/09/2015 - 09:23

:)

त्या हजार शब्दांच्या मर्यादेच्या तर!

ऐसीसाठी गाळलेलेविचार वाढवून लिहिता येईल का?

Nile Tue, 15/09/2015 - 10:11

हा आणि पुढचा असे दोन्ही भाग एकत्र करून जास्त चांगले होतील असं वाटलं. :ड

अस्वल Wed, 16/09/2015 - 01:14

चांगलाय चांगलाय! :ड
निरीक्षणं आवडली एकदम.
आणि लग्नसमारंभ आणि त्या संबंधी त्रास - कुणीतरी ह्याला वाचा फोडायलाच हवी होती. अभिनंदन.

चिमणराव Thu, 17/09/2015 - 05:39

**चंदेरीला गेलो होतो**

साड्यांच्या गावांबद्दल ,पर्यटन आणि साड्यांची वैशिष्ट्ये यावर एक लेखमाला येऊ द्या या दिवाळी निमित्ताने.
चंदेरी,बनारसी,कांचिपुरम,पटोला वगैरे.

adam Mon, 29/05/2017 - 08:53

म‌जेशीर‌. काही लेख साव‌काश‌ वाचाय‌ला म्ह‌णुन‌ मुद्दाम वेग‌ळे ठेव‌ले होते. त्यात‌ले काही वाच‌न‌खुणेत‌ही होते. त्या वाच‌न‌खुणा तेव‌ढ्या प‌र‌त‌ आल्या त‌र‌ ब‌रं होइल राव‌.

भांबड Tue, 29/10/2019 - 00:28

लिंक लागेस्तोवर संपला. बाकी शुचीतै अ.का. सामोतैंच काम आवडलं. जुने चांगले/वाचनीय लेख बरोबर वरती काढतात म्हणून माझ्यासारख्या नूबांना सोयीच पडत