पाऊस - वेगवेगळे रंग
संध्याकाळी ऑफिस मधून बाहेर पडलो. राजीव चौक मेट्रो स्टेशनच्या दिशेने चालू लागलो. भुरका-भुरका पाऊस पडत होता. भुरक्या पाऊसाचे एक चांगले आहे, आपल्याला पाऊसात भिजण्याचा आनंदहि मिळतो आणि आपण जास्त ओले चिंबहि होत नाही. नजरे समोर एक अंधुक आकृती दिसू लागली. असेच एकदा तिच्या सोबत एका संध्याकाळी भुरका-भुरका पाऊसाचा आनंद घेत नेहरू पार्कच्या हिरवळीवर फिरत होतो.... पण तो पाऊस.... केंव्हाच हवेत विरून गेला.. किर्रर्र बाईक थांबण्याचा आवाज, मी हादरलोच.. अंकलजी कहाँ खोये हो, कम से कम रास्ता तो देख कर पार किया करो. सॉरी, मी पुटपुटलो. हायसं वाटल. पांढऱ्या डोक्यावरून हात फिरविला, एवढ्या वर्षानंतरहि तो ओलावा अजून हि जाणवत होता.
मेट्रोत भीड होती. उभा राहून खिडकीतून बाहेरचे दृश्य पाहत होतो. मेट्रोच्या वाढत्या वेगाप्रमाणे, पाऊसाचा जोरहि वाढला होता. एका गच्चीवर काही उघडबंब लहान मुले पाऊसात खिदळत होती. एकमेकांवर पाणी उडवीत होती. अचानक लहानपण आठवले. जुन्या दिल्लीच्या ज्या वाड्यात आम्ही भाड्यानी राहत होतो, त्या वाड्याच्या मध्यभागी मोठे आंगण होते. फरशीहि सिमेंटची होती. पाऊसात आम्ही लहान मूले असेच खेळायचो. भिजण्याचा आनंद घ्यायचो. चिंब भिजून घरी आल्यावर, आईच्या हातचा गरमागरम आले टाकून केलेला कडक चहा प्यायला मिळायचा. कधी कधी चहा सोबत कांद्याची भजीहि. अग, आले टाकून कडक चहा करते का? सोबत कांद्याची भजी हि, बोलता बोलता...मी जीभ चावली. काही नजऱ्या वळल्या , काहींच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. काही कटाक्ष - ऐसी बरसात में कड़क चाय और कांद्याची भजी खाने दिल तो करेगा ही. उम्र पचपन कि दिल बचपन का. काहीहि म्हणा बॉलीवूड मुळे मराठी भाषेतले अनेक शब्द सर्वश्रुत झालेले आहेत.
घरी पोहचल्या वर, चहा पिता पिता मला टीवी बघायची सवय आहे. आज पाऊसामुळे डिश टीवीचे सिग्नल येत नव्हते. टॅब उघडला, व्हाट्स अॅप जावई बापूनी काही फोटो पाठविले होते. हिमाचल येथील त्यांच्या गावाजवळ वादळ फाटले होते. अनेक लोक मृत्युमुखी पडले. घरदार नष्ट झाले, शेंकडो जनावरे पाण्यात वाहून गेली. विदारक दृश्य होते ते. धरणी मातेचे लचके तोडणारा... नराधम... पाऊस. कधी कधी रौद्र रूप घेऊन प्रलयंकारी तांडवनृत्यहि करतो हा पाऊस.
अखेर डिश टीवीवर सिग्नल यायला सुरु झाले. मराठी बातम्या पाहू लागलो. भयंकर दुष्काळ, आत्महत्या आणि खिरापत हि...... वरुणराजाची महाराष्ट्रावरच अवकृपा का? पण वरुणराजा तरी काय करणार तो तर देवराज इंद्राच्या हुकुमाचा ताबेदार. या इंद्राला धडा शिकविला पाहिजे. वृन्दावनातल्या माखनचोराची आठवण आली. इन्द्राएवजी त्याने गोवर्धनची पूजा मांडली. ब्रजमंडळात ९९ तीर्थांची (सरोवरांची) स्थापना केली. इंद्राचा पराभव झाला. लहरी वरुणराजाहि सुतासारखा सरळ झाला. मनात विचार आला, महाराष्ट्रातले कलयुगी कृष्ण काय करतात आहेत. त्यांनी तर तीर्थांसाठी ठेवलेला पैका, इंद्र दरबारात, सोमरस पीत अप्सरांवरच लुटविला...... वरुणराजाला दोष देण्यात काय अर्थ आहे.
विचार करता करता केंव्हा डोळा लागला कळलेच नाही, बाहेर मात्र पाऊसाची संतत धार सुरूच होती, एक माणूस काय विचार करतो आहे, हे त्याला तरी कुठे कळणार होते.
ललित लेखनाचा प्रकार
उत्तम लिखाण
पटाईतजी,
लेख आवडला अशी पोच देण्यापलीकडे काहीतरी लिहावेसे वाटले.
तुमचे गेल्या दीड-पावणेदोन वर्षांचे येथील लिखाण समोर आहे. तुम्ही मराठी असलात तरी पिढीजात उत्तर हिंदुस्तानातील त्यामुळे तुमच्या सुरुवातीच्या लिखाणात थोडा कृत्रिमपण, हिंदीची झाक जाणवत असे आणि त्यावर काही चर्चाहि झाली होती असे आठवते. पण आता तो परिणाम खूपच कमी झाला आहे आणि तुमचे लिखाण अधिक सफाईदार वाटत आहे हे मोकळेपणे नमूद करतो.
(एक सूचना हिंदीमध्ये 'मुझे भी' हे प्रमाणलेखन आहे (असे वाटते) पण मराठीची प्रकृति 'हि' हे शब्दयोगी अव्यय शब्दाला जोडून लिहायची आहे आणि मराठीत 'मलाहि' हे ठीक आहे, 'मला हि' नाही. वरच्या तुमच्या सर्व लेखनात 'हि' हे अव्यय तोडून लिहिले आहे असे दिसले. तुम्हाला बिनचूक मराठी लिहिण्याची मनापासून इच्छा आहे हे जाणवले असल्याने ही सूचना.)
शब्दयोगी अव्यय
हे विकीपान पहा. येथे अव्ययांचे चार प्रकार दिले आहेत आणि त्यापैकी शब्दयोगी अव्यय म्हणजे 'शब्दाला जोडून येणारे अव्यय' अशी त्याची व्याख्या दिली आहे. 'शब्दयोगी' ह्याचा अर्थच 'शब्दाला जोडलेले' असा आहे.
'हि', 'साठी', 'मुळे' अशी सर्व अव्यये 'शब्दयोगी' लिहिणे ही मराठीची प्रकृति आहे. म्हणजेच 'रूल'- पक्षी शास्त्र - आहे, केवळ 'कन्वेन्शन' -पक्षी 'रूढि'- नाही.
असाच एक भिजलेला मूड
आज आमच्या भागात अक्षरक्षः मुसळधार पाऊस पडला. सकाळी सकाळी लवकर ऑफीसात आले म्हणून पावसाच्या तडाख्यातून वाचले. खूप काळा-कुट्ट अंधार दाटून आला होता, आभाळ भरुन आले होते. नंतर मग जी संततधार लागली. ऑफिसमधले आम्ही सर्वचजण मोठ्या मोठ्या खिडक्यांपाशी जमून बाहेरची गंमत पहात होतो. वीजा चमकत ,पाऊस स्वतःच्या तालावरती धो धो कोसळत राहीला.
.
मला मुख्य सांगायचं आहे ते मूडबद्दल. जसं आभाळ भरत गेलं, तसा मूड उदास होऊ लागला. खरं तर उदास म्हणताच येणार नाही पण असं दाटून आलं, गलबलल्यासारखं झालं, खूप कासाविस झाले. ऑफिसात जे करता येणं शक्य होतं ते केलं, मूडबद्दलचं साग्रसंगीत वर्णन मैत्रिणीला लिहून पाठवलं आणि कानाला हेडफोन लावून संगीताच्या जीवघेण्या सुंदर विश्वात निघून गेले. अर्थात अशा वेळी ऐकावीत ती हृदयनाथांची गाणी - जैत रे जैत ची सर्व गाणी ऐकली - आम्ही ठाकरं ठाकरं, कोण्या राजानं राजानं, लिंगोबाचा डोंगुर, त्यानंतर कसा बेभान हा वारा, घन तमी शुक्र , मालवून टाक दीप, जाईन विचारीत रानफुला, कशी काळ नागीणी. प्रत्येक गाण्याच्या चालीने, संगीताने फक्त मनोमन शहारत गेले- कोणत्या मानसिक प्रतलावरती हृदयनाथांना संगीत सुचले होते? इतकं अनाम आर्त, हळवं संगीत कसे काय निर्माण करु जातात? केवळ दैवी देणगी.
ते झरे चंद्रसजणांचे ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया
दु:खाचे महाकवि ज्यांना म्हटले जाते, त्या ग्रेस यांच्या ओळी. असे कवि ज्यांचे शब्द कळू येतात पण अर्थ लागत नाही. छे छे अर्थ लागतो की पण तो असा इन्टेलेक्च्युअल, बौद्धिक पातळीवर कळत नाही.काहीतरी आवडतं, व्याकुळ करतं पण बोट ठेवता येत नाही.
.
एक बरच आहे की प्रत्येकाला, प्रत्येक गोष्ट हातात घेऊन त्याचे विच्छेदन करता येत नाही. काही गोष्टी फक्त मनाने, चेतनेने अनुभवाव्या लागतात. अन तरीही विच्छेदन करण्याची "कन्या जातकी" ओढ माझी सुटत नाही. मग मनाशीच खूणगाठ बांधली की आपला मूड टोटल नेप्च्युनिअन झाला आहे. पकडीत न येणारा, आर्त व पाण्यात प्रतिबिंब पडावे तसा वेडावाकडा, झिगझॅग. मग मनातील काहूर शमविण्याकरता, ज्योतिषाकडे वळले, नेपच्युन बद्दलच्या माहीतीच्या सर्व साईटस पालथ्या घातल्या. पंचेंद्रियांत न सामावणार्या अनुभूतींचा मालक वरुण = नेपच्युन. चॅनलिंग, मिडीअम्स, निर्मितीक्षमता, गूढ अनुभवांचा यांचा कारक पण त्याचबरोबर एस्केपिझम, मादक द्रवांचा (ड्रग्स), हॅल्युसिनेशनचा देखील. हे सर्व वाचता वाचता मूड अधिकाधिक डार्क झाला. मोठमोठ्ठे जलाशय यांचाही हा कारकच. ऑफिसच्या खिडकीतून विस्तीर्ण सुपिरीअर लेक दिसतो. निळा, आकाशाचे प्रतिबिंब दिसणारा. तो पहाता पहाता, वरुण गायत्री मंत्रही आठवला-
जलबिम्बाय विद्महे, नीलपुरुषाय धीमहि
तन्नो वरुण प्रचोदयात||
किंवा
जलबिम्बाय विद्महे, नीलपुरुषाय धीमहि
तन्नो अम्बु: प्रचोदयात||
पाण्यात बुडणे, अगतिकता, असहायता यांचाही मालक जलदेव वरुणच. हिंदी सिनेमात दाखवितात तसे "बचाओ बचाओ" असे ओरडत व्यक्ती कधीच बुडत नाही. हातपाय काम करेनासे होतात, नाका-तोंडात पाणी जाऊ लागते. व्यक्ती पार पार हतबल, अगतिक होते. हळूहळू पाण्यात धसू लागते, बुडू लागते. पाणी, पंचमहाभूतांपैकी, एक भूत गिळू लागते. एकदा तरी हा अनुभव घ्यावा किती सटली, वरवर काहीही न दिसता, दाखविता, पाणी व्यक्तीला गिळंकृत करतं ते कळून येईल. इतक्या नकळत काळमुखात व्यक्ती ओढली जाते की शेजारी पोहणार्या माणसालाही थांग लागत नाही त्या व्यक्तीच्या बुडण्याचा.
ते एक असोच.
.
१२ वाजता लंच टाईममध्ये, पोस्ट ऑफिससमोरच्या कारंज्यांपाशी जाऊन शांत बसले. ५-६ दुधाच्या रंगांची दाट फेसाळणारी कारंजी आणि पाऊस पडून गेल्याने न्हालेली झाडे व हिरवळ. अतिशय प्रसन्न व शांत वाटलं. अगदी मुसळधार पाऊस पडून गेल्यावर जसं उजाडतं तसं. कधीकधी विस्मय वाटतो की माणसाचं मन सृष्टीशी तिच्या बदलांशी किती अट्युनड (जोडलेले) असते.
_________
योगायोग आहे, पटाइतजींनी काल पावसाळी हवेची "मोंगलाई" अनुभवली अन आज तश्शीच मी अनुभवली.
पाउस हा माझाही विक पॉइंट! छान
पाउस हा माझाही विक पॉइंट!
छान धागा!
मलाही पावसाने लिहायला लावलंय.. त्यापैकीच 'छत्री दुरूस्तीला टाकली पाहिजे' हे एक
माळशेज घाटाला जातानाचा
माळशेज घाटाला जातानाचा पाऊस,...
.
लोणावळ्याला जातानाचा पाऊस, वाटेत घेतलेला गाडीवरचा तांबडा पण अतिशय चविष्ट चहा, पुढे माळशेज घाटात खाल्लेले ऑमलेट - पाव.
आय मिस यु तुषार-नीलीमा. दोज वेअर द डेज.
एखाद्या शनिवारी नवर्याला फोन यायचा - चल निकलनेका? नवर्याने मित्राला विचारले - तू बोल!! की ते शब्द ऐकताच मला आलेले आनंदाचे उधाण .... कारण त्याचा अर्थ असायचा डबल डेट, पावसात फिरणं, हुंदडणं. अर्थात मुलाबाळांसकट. मग टॉवेल, कपड्यांचा जोड घेऊन फक्त सुसाट निघायचं.
.
वाटेतील पोपटी झाडं, रिमझिम कधी धुंआंधार पाऊस, माळशेजला पाटी "येथे दरडी कोसळतात" पुढे रस्त्याला लागून लहानसं मारुती किंवा तत्सम देवतेचे देऊळ, त्याला मनोभावे जोडले गेलेले हात. माळशेजच्या धबधब्यात उभे राहणे ही. व नंतर कारमध्ये जाऊन बदललेले कपडे.
.
आय मिस ऑल धिस. एकदम नॉस्टॅल्जिक केलत पटाईतजी.
.
हाच्च अस्साच असतो पावसाळा.
हाच चेहरामोहरा असलेला.
... पाऊस माझ्या आठवणीत कोरलेला.
_____________
अजुन एक पावसाचा चेहरा - खूप गलबलून येणारा मूड! आणि अशा वेळी पं हृदयनाथांची गाणी. रडावसं वाटत असूनही रडता येत नाही. कळतच नाही. हा मूड कधीतरी शब्दात बांधायचा आहे.