Skip to main content

ये 'रेषेवरची अक्षरे' क्या हय?

'रेषेवरची अक्षरे' हे नाव इंटरनेटवरच्या जुन्याजाणत्यांना तसं ओळखीचं आहे, ओळखीची सुरुवात अगदी नावागावापासून करायला नको आहे. पण झालं काय, की मधल्या काळात आम्ही घेतला होता थोडा ब्रेक. त्या दिवसांत अनेक नव्या वाचका-लेखकांची भर इथे पडली आहे. त्यांच्यासाठी हा कोराकरकरीत इंट्रो. :)

तर - इंटरनेटवर मराठीतून लिहिण्याची सोय होऊन, फ्याशन येऊन आणि त्याचा पायंडा पडूनही आता बर्‍यापैकी वर्षं लोटली. आधी ब्लॉग्स जोरात होते, मग मराठी संस्थळं येऊन स्थिरावली, लोक हळूहळू फेसबुकावर रमले आणि आता फेसबुकही स्थिरावून व्हॉट्सॅपकडे असूयेनं बघायला लागलंय. 'रेषेवरची अक्षरे' मात्र अगदी पहिल्या टप्प्यापासून मराठीतून लिहिणार्‍यांकडे लक्ष ठेवून होतं, आहे. आज पुस्तका-मासिकांतून भेटणारे काही लिहिते लोक 'रेषे'च्या जुन्या दोस्तांपैकी आहेत.

२००८ साली 'रेषे'चा पहिला अंक निघाला. २०१२ सालापर्यंत आम्ही सलग वार्षिक दिवाळी अंक काढत होतो. तेव्हा ब्लॉगविश्व बहरलेलं होतं. तिथे लिहिल्या जाणार्‍या लेखनापैकी निवडक ललित लेखन एका ठिकाणी संकलित असावं, नवख्या वाचकाला इथल्या चांगल्या लेखकांची ओळख व्हावी, आडवाटेचे नवीन ब्लॉग्स हुडकता यावेत; असे अनेक हेतू होते. मग मराठी संस्थळं आली आणि एक नवाच व्हर्च्युअल सामाजिक अवकाश मिळाल्यासारखा झाला. तिथले वाद, चर्चा, थट्टा-मस्कर्‍या यांच्यात लोक रमले. ब्लॉग्स काहीसे थंडावले. आम्हीही थोडे पोटापाण्याच्या उद्योगात रमलो, संस्थळांवर उंडारलो.

ब्लॉग्स आणि 'रेषेवरची अक्षरे' मागे पडली.

यंदा आमच्या व्हर्च्युअल साहित्यप्रेमानं (विशेषणाची जागा तशी जोखमीची निवडली आहे, मान्य आहे!) पुन्हा उचल खाल्ली. ब्लॉग्स अजूनही तसे थंडावलेलेच आहेत. मराठी लोकांना संस्थळांचं ऐसपैस वातावरण काहीसं मानवलेलं दिसतं आहे. तिथे जोमानं आणि नवनवीन प्रयोगांसह ललित लिहिलं जाताना दिसतं आहे. वाचकही त्या मजकुराच्या वाचनीयतेत भर घालत आहेत, असं एक मजेशीर आणि आशादायक चित्र आहे. या सगळ्या अवकाशातल्या - ब्लॉग्स आणि फोरम्सही - गेल्या तीन वर्षांतल्या लेखनाचा ढांढोळा घ्यायचं आम्ही यंदा ठरवलं आहे. काही नव्या दोस्तांची मदत मागितलीय, काही जुन्यांना थडग्यातून लाथा घालून बाहेर आणलं आहे आणि कामाला लावलं आहे. कामाचा एकूण आवाका पाहून दडपण येतं आहे खरं. पण ते हवंच!

या मंथनातून हाती लागलेले निवडक लेख 'रेषे'च्या यंदाच्या अंकात असतील. ब्लॉग आणि संस्थळं यांच्यावरच्या लेखनातली साम्यस्थळं आणि फरक (सोदाहरण!) तपासणारे काही लेख असतील. आणि खेरीज मराठी कवितेकडे काहीसा फेसबुकोत्तर नजरेतून टाकलेला एक दृष्टिक्षेप असेल. त्यात काही जाणते वितरक असतील, काही प्रकाशक, काही वाचक आणि अनेक कवी.

तर - यंदाचा 'रेषेवरची अक्षरे'चा भरगच्च अंक नक्की वाचा, अशी शिफारस.

भेटू - नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात, रेषेवरची अक्षरेच्या ब्लॉगवर (reshakshare.blogspot.in)!

***

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 26/10/2015 - 20:58

वेलकम (बॅक).

अवांतर - मध्यंतरी एका स्मरणरंजनी व्हॉट्सअॅपी समूहात, अनपेक्षितरित्या 'रेरे'च्या एका अंकाचा दुवा एकीकडून मिळाल्याचं कळवायचं राहिलं होतं. ते सांगण्यासाठी हे निमित्त चांगलं मिळालं.

रेषेवरची अक्षरे Mon, 26/10/2015 - 23:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आयला?! हो? ही स्तुती की टोमणा? बाईंच्या नेहमीच्या शैलीला अनुसरून आहे हो प्रतिसाद. ;-)

धन्स. :)

ऋषिकेश Wed, 28/10/2015 - 13:23

वाट पाहतोय.
तसंही ते (रटाळ) ब्लॉग्ज्स चाळण्यापेक्षा असं कोणी छान दर्जेदार गोष्टी निवडून आयत्या पुढ्यात आणून देत असेल तर कशाला ते ब्लॉग्ज धुंडाळायचे :प

रेषेवरची अक्षरे Wed, 04/11/2015 - 09:12

शुभ दीपावली.... :)

यंदाचा 'रेषेवरची अक्षरे'चा अंक प्रकाशित झाला आहे..

ब्लॉगवर डोकवा. सूचना द्या, अभिप्राय द्या, चुका दाखवा, पोस्ट्स शेअर करा, लाइक करा...

स्वागत आहे.

.शुचि. Thu, 12/11/2015 - 02:13

निरंजन नगरकर यांची "तोत्तोचान" कविता हृदयस्पर्शी आहे. रेखाचित्र अतिशय गोड आहे. पहीलं कडवं फार लोभस आहे.
____
एका कवितेची गोष्ट या सदरातील लेख प्रसिद्ध होण्याची वाट पहाते आहे.
____
विसुनाना यांची "सिद्धोबा" कविता पूर्वी वाचली होती. फारच आवडली होती/आहे.
____
http://3.bp.blogspot.com/-HdcA2VmS-GI/VjlU3i-V68I/AAAAAAAAbFI/p1NVCjbtF2Y/s1600-r/Rere%2BKavitechi%2BGoshta.gif
.
काय टवटवीत चित्र आहे. ज्यांनी कोणी रेखाटलं आहे त्यांना माझी सलाम.

रेषेवरची अक्षरे Thu, 05/11/2015 - 08:37

आभार मंडळी! आज ललित विभागातले इतर काही लेख आणि 'तुम्ही (नेटावर) काय लिहिता?' हा छोटेखानी विभाग प्रसिद्ध झाला आहे. ब्लॉग्स खरे की फोरम खरे? आणि काय बरे? का बरे?! नक्की वाचा...

अॅरागॉर्न Thu, 05/11/2015 - 10:03

कविता विभागाची वाट बघतो आहे. बाकी अंक सुरेखच.

रेषेवरची अक्षरे Fri, 06/11/2015 - 08:01

In reply to by अॅरागॉर्न

आजच 'कवितेची गोष्ट'च्या प्रकाशनाला सुरुवात केली. इतर काही ललित लेखही प्रकाशित केले आहेत. नक्की वाचा नि कळवा... :)

अॅरागॉर्न Fri, 06/11/2015 - 08:39

In reply to by रेषेवरची अक्षरे

'अ सेन मॅन'चा लेख आताच वाचला. फैजवर इतका सुरेख लेख वाचल्यावर विशेषण सुचत नाहिये. सविस्तर प्रतिक्रिया तिथे.

मेघना भुस्कुटे Fri, 06/11/2015 - 10:49

In reply to by अॅरागॉर्न

हॉय! आम्हाला अभिमान वाटला अशा लेखाला आपला थोड़ा का होईना, हातभार लागला याचा. केवळ हुच्च!