Skip to main content

फुसके बार (२० नोव्हेंबर २०१५ पासून पुढे.... संकलित)

फुसके बार – २० नोव्हेंबर २०१५

१) सुब्रमण्यम स्वामी नेहमीच राहूल आणि सोनिया गांधींवर बेछूट आरोप करतात. त्यातलाच अगदी ताजा म्हणजे या दोघाकंडे अडीच लाख कोटी (अडीच लाख की कोटी नव्हे) आहेत. याआधीही १) सोनिया त्यांचे जे शिक्षण झाल्याचे सांगतात ते कसे तद्दन खोटे आहे, २) राहुलच्या कोलंबियन गर्लफ्रेडचे वडील कसे ड्रग्जच्या व्यापारात आहेत व त्यांचे केजीबीशी असे संबंध आहेत, ३) याच ड्रग्जच्या व्यवहारातील लाखो डॉलर्ससह राहूलला अमेरिकेच्या विमानतळावर कसे पकडले होते व वाजपेयी पंतप्रधान असताना त्यांनी त्याला कसे वाचवले, ४) सोनियांनी भारतातून स्मगल केलेल्या वस्तु त्यांची इटलीतील बहिण तिच्या छोट्याशा दुकानात विकते, असे नेक आरोप ते नेहमी करत असतात. आता गंमत अशी आहे की अशा आरोपांबद्दल राहूल वा सोनिया हे कधीही स्वामींवर बदनामीबद्दल किंवा तत्सम काहीही कारवाई करत नाहीत, ना स्वत: स्वामी या आरोपांची आणखी शहानिशा करून या जोडगोळीला गजाआड पाठवायचे मनावर घेत नाहीत. याचे गौडबंगाल काय असावे?

२) कास्ट अवे या सिनेमात विमानअपघातानंतर एका निर्जन बेटावर पोहोचलेल्या टॉम हॅंक्सची कथा किती कौशल्याने फुलवलेली आहे. एखादी कथा सिनेमाच्या अंगाने कशी फुलवायची याबाबतच्या केस-स्टडी असलेली पुस्तके आहेत का?
टॉम हॅंक्स कधी भेटला तर त्याला त्या बेटावरचे अनुभव विचारावेसे वाटेल, त्याने चेकमध्ये हेराफेरी करणा-या लिओनार्दोला कसे पकडले त्याची कथा ऐकाविशी वाटेल. खरोखरच भूमिका जगलेले आहेत असे वाटावे असे लोक आहेत हे.

३) एका राजीवने (साने) दुस-या राजीवच्या (दीक्षित) दुष्प्रचाराचा भेद करणे ही बाब लक्षणीय. उठसुट विज्ञानाचे नाव घेत पाश्चिमात्यांवर टीका करणे आणि आपल्या दैदीप्यमान संस्कृतीचे (यात पुराणातली विमानेही आलीच) दळण दळत बसणे, हाच राजीव दीक्षित यांचा निरंतर उद्योग होता. गंमत म्हणून ऐकावे म्हटले तरी वीट येतो थोड्या वेळाने. अनेक वेळा तर ते तद्दन खोटे बोलून लोकांची दिशाभूल करतात. राजीव दीक्षितांच्या या दुष्प्रचाराचा त्यावेळीच कोणी प्रभावीपणे प्रतिवाद न केल्यामुळे खूप लोक त्यांच्या या प्रचाराला बळी पडले. हे आपलेच अपयश मानले पाहिजे.

४) कोणास ठाऊक, थ्री इडियट्स सारखे काही संदेश देऊ पाहणारे, पण सवंगपणा न करणारे सिनेमेही लोकप्रिय होऊ शकतात, तर परिवर्तनवादी कविताही बटबटीत न राहता चांगल्या होऊ शकतील. तेव्हा परिवर्तनवादी कविता जर बटबटीत वाटत असतील, तर आम्ही इतकी शतके काय भोगले आहे हे तुम्हाला कसे कळणार, असे न म्हणता तो त्या कवीचा दोष समजला पाहिजे. किंबहुना दोष म्हणण्यापेक्षा त्याच्या मर्यादा समजल्या पाहिजेत. अनेकदा अशा कविता प्रचारात्मकही असतात. तेही त्यांच्या रूक्षपणाचे कारण असावे.

५) सार्वजनिक स्वच्छतेच्या नावाने सेवा करात केंद्र सरकारने ०.५ टक्क्याची वाढ केलेली अहे. कर लावूनही प्रत्यक्ष काही फरक पडत नाही, या अनुभवामुळे अशा करवाढीला विरोध होतो. मागे रेल्वेतील सुरक्षाव्यवस्था देण्यासाठी व सुधारण्यासाठी काहीवेळा दरवाढ केली. पण रेल्वेप्रवासाच्या बाबतीत काहीही सुधारणा झालेली दिसत नाही. याव्यतिरिक्त कितीतरी क्षेत्रांमध्ये अशी बेशिस्त दिसत आहे. वाहतुक व्यवस्था हे एक असे उदाहरण. स्वच्छता ठेवणे - कमीत कमी अस्वच्छता न करणे, वाहतुक नियमांचे पालन या गोष्टी तुम्ही-आम्ही करतोच. पण या नियमांची पर्वा न करणा-यांना, जे आज बहुसंख्येने आहेत, गुलाबाचे फूल देऊन सुधारण्याची अपेक्षा ठेवण्याचे दिवस गेले. नियम न पाळणा-यांच्यावर कारवाई करण्याची कोणतेच सरकार हिंमत करत नाही. कारण मग लोकप्रियता घसरण्याची धास्ती. त्यामुळे नवे कर लावूनही प्रत्यक्षात काही फरक पडत नाही.

६) आपल्याकडील एकूणच घोळ लक्षात घेता सीएफएल बल्बसारखे तंत्रज्ञान आपल्याकडे का येऊ दिले हे कोडेच आहे. वीजबचत होते हे मान्य असले तरी त्यात असलेल्या पा-यामुळे पर्यावरणावर त्याचा किती वाईट परिणाम होतो हे कोणाच्या लक्षात येत कसे नाही? आपल्याकडे निकामी झालेले असे दिवे व्यवस्थित गोळा करण्याची वेगळी यंत्रणा नसल्याने त्यातील पारा कोठे पोहोचत असेल याची काही माहिती आहे का कोणाकडे? देशाचे पर्यावरण खाते व राज्याचे प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना याबाबतीत काही माहिती आहे काय? आता १०० रूपयांना एलइडी बल्ब देत आहेत खरे, पण ही सबसिडाइझ्ड किंमत आहे. सगळीकडे या कमी किंमतीने एलइडी बल्ब विकणे शक्य नाही. त्यामुळे एलइडी दिव्यांची किंमत तातडीने सीएफएल दिव्याच्या बरोबरीने आणणे हाच त्यावरचा उपाय दिसतो.

(व्यवस्थापकः व्यवस्थापकीय सोयीसाठी सर्व धागे या एका धाग्यात हलवले आहेत. यापुढील 'फुसके बार' प्रकारचे लेखन या धाग्यावर करावे ही विनंती)

अस्वल Mon, 23/11/2015 - 00:03

In reply to by नितिन थत्ते

त्या त्या दिवशीच्या ठळक बातम्यांवरच्या टिप्पण्या?
ऐसा लग रहा है. पण "फुसके बार" असल्यामुळे त्यांना शिरेसली घ्यायचं की नाही ते आपण ठरवू शकतो बहुतेक.

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 11:54

फुसके बार – २१ नोव्हेंबर २०१५
.
१) सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तींचा लहरीपणा

चेह-याला लावण्याच्या क्रीममुळे गोरेपणा येत नाही, तेव्हा असे दावे करणा-या कंपन्यांवर कारवाई करावी अशा स्वरूपाच्या याचिकेची सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश दत्तू यांनी नकार दिला. एवढेच नव्हे तर अशा दाव्यासाठी ग्राहक न्यायालयाकडे जावे असा सल्ला त्यांनी दिला. माझ्या मते मुख्य न्यायमुर्तींचे हे विधान अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. ग्राहक न्यायालय फार तर एखाद्याने विकत घेतलेल्या अशा क्रिमची किंमत परत करण्यास सांगू शकते, फार तर फार असे खोटे दावे केल्याबद्दल काही दंडही करू शकते. परंतु लोकांची फसवणूक करण्याच्या गुन्ह्याखाली अशा कंपन्या बंद करणे अशा प्रकारची कारवाई फक्त सर्वोच्च न्यायालयच करू शकते. तेव्हा या प्रकरणात याचिकाकर्त्यांना वाटेला लावून सर्वोच्च न्यायालयाने फार मोठी चूक केलेली आहे.

२) डाळीपाठोपाठ आता तांदूळ महाग होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. डाळीच्या प्रकरणामुळे दिवाळीच्या तोंडावर आरडाओरडा झाला तरी खास दिवाळीत तुरडाळीची कोठे गरज पदते असे मुद्द्याचे प्रश्न न विचारता माध्यमांनी केवळ आपली जागा व वेळ देऊन लोकांना मूर्ख बनवायचे उद्योग केले. दिवाळी संपली तरी डाळ उतरलेली नाहीच. उलट शंभर रूपयाने विकली जाणारी अयात केलेली डाळ खरोखरच शिजत नाही असा अनुभव सांगितला जातोय. आता तांदूळही महागणार असे म्हणतात. याचा अर्थ हळुहळु सा-याच धान्यांच्या किंमती वर नेऊन ठेवल्या जातील व आपल्याला त्याची नाइलाजाने सवय करून घ्यावी लागेल.

३) चित्रपटगृहांमधला उपद्रव:

पुणे-मुंबई-पुणे सिनेमा मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात पाहताना काही मुलांच्या टारगट कमेंट्स ऐकून त्या मुलांना उद्देशून काही म्हटले तर थॅंक्यु आंटी असे म्हणून तो टारगटपणा पुढे चालूच राहिला, तेव्हा आणखी वाद कोठे घालायचा म्हणून एक दांपत्य अखेर सिनेमा सोडून परतले, असा अनुभव वाचण्यात आला. खूप वर्षांपूर्वी मुंबईत रोजा हा सिनेमा पाहताना असाच आचरटपणा करणा-या काही महाविद्यालयीन मुलांच्या गटाला इतरांनी चोप देऊन बाहेर काढले होते. पूर्वी कमी दराच्या चित्रपटगृहातला क्राउड असा असतो, म्हणून तिकिट अधिक दराचे असले तरी लोक मल्टिप्लेक्समध्ये जात असत. आता हा अनुभव सार्वत्रिक झाला आहे. अनेकदा पडद्यावर बाई दिसली की हे लोक चेकाळताना दिसतात. बाकी सिनेमा चालू असताना खाद्यपदार्थांवरून होणारा शेजारच्यांचा त्रास वगैरे गोष्टींवरूनही कोणाला काही बोलण्याची प्राज्ञा नाही. या व अशा उपद्रवांना विरोध दर्शवला, तर बाकीचेही तुम्हाला साथ देतील याची शाश्वती नसते. सिनेमागृहाचे चालकही याबाबतीत काही उपाययोजना करताना दिसत नाहीत. तेव्हा सिनेमा पाहण्यातला आनंद राहिला आहे काय? चित्रपटनिर्मात्यांनी लोकांना हे चित्रपट उपग्रहाद्वारे घरच्याघरी उपलब्ध करून द्यावेत, ज्यायोगे लोकांना खरोखर त्यांचा आनंद घेता येईल. ज्युरॅसिक पार्कसारख्या सिनेमामधील डायनोसॉर टीव्हीच्या पडद्यावर कुत्र्यासारखे दिसतील अशी स्थिती बहुतेक सिनेमांची नसते. तेव्हा बहुतेक सिनेमा घरच्या घरी पाहिले तरी काही बिघडणार नसते. शिवाय चित्रपटगृहापर्यंत येण्याजाण्याचा खर्च व वेळ या गोष्टीही वाचतील. या अवांतर फायद्याबरोबरच जे चित्रपट लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यांनाही त्याचा फायदा होईल.

४) नितीशकुमार यांच्या विजयापेक्षाही मोदींच्या भाजपचा पराभव झाला यात आनंद झालेल्यांना आज परमानंद झाला असेल. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर दिल्लीत सत्तेवर अालेले केजरीवाल म्हणतात की लालूचा वनवास संपला. लालूचे दोन पुत्र मंत्रीमंडळात आलेले पाहिले. धाकट्या दिवट्याला थेत उपमुख्यमंत्री केले गेले. थोरल्या दिवट्याला शपथ नीट वाचता न आल्याने राज्यपालांनी त्याला पुन्हा शपथ वाचायला लावली. न्यायालयाच्या निर्णयामुळे स्वत:ची खुर्ची सोडायची वेळ आली, तेव्हा आपल्या पत्नीला मुख्यमंत्री करणा-या दरिंद्या लालूचीही आठवण आली असेल. महाराष्ट्रात बहुमताला थोड्या जागा कमी पडल्या तेव्हा बहुमत प्रस्तावाच्यावेळी भ्रष्टगुंडवादीची मदत घेतल्याबद्दल आपल्याकडच्या भाजपद्वेष्ट्यांनी भाजपवर किती कोरडे ओढले होते ते आठवत असेल. त्यांना आज नितिशकुमारांच्या राज्याभिषेकाच्यावेळी हे दोन दिवटे मंत्रीमंडळात गेल्याबद्दल बराच आनंद झाला असेल. केवळ भ्रष्ट बापामुळे उपमुख्यमंत्री झालेला दिवटा या युगातही नववी नापास आहे. निवडणुकीचा अर्ज भरताना त्याने चूक केल्यामुळे तो त्याच्या थोरल्या भावाचा थोरला भाऊ झाला होता. यापेक्षा अधिक न शिकण्यास त्याच्या बापाची गरीबी कारणीभूत नाही. याशिवाय त्याला राजकारणाचा कोणताही अनुभव नाही. आता शाळेच्या शिकण्याचा व आयुष्यात यशस्वी होण्याचा काय संबंध किंवा आपले वसंतदादा केवळ चौथी पास होते असा प्रतिवाद कृपया करू नये.

या निमित्ताने अर्णवने २०१३मधली एक आठवण सांगितली. त्यावर्षी लालूच्या या दोन दिवट्यांनी राजकारणात प्रवेश केला, तेव्हा नितीशकुमार पूर्णपणे लालूच्या विरोधात होते. तेव्हा नितीशकुमार म्हणाले होते की लालूच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात S1 व S2 (एक मेहुणा साधु यादव व दुसरा कोण ते आठवत नाही) नंगा नाच घालत होते, आता लालूच्या वतीने T1 व T2 (तेजस्वी व तेजप्रताप) ते काम करतील. तेव्हा आता हाच T2 आता नितीशच्या वळचणीला बांधला जात असल्याचे पाहून नितीशसह सारेच धन्य झाले असतील.

तेव्हा नितीशकुमारांची वैयक्तिक राजकीय महत्त्वाकांक्षा आड आली नसती तर आजही नितीशकुमारांसह सुशील मोदी उपमुख्यमंत्री झालेले दिसले असते. आजच्या चित्रापेक्षा हे चित्र अधिक चांगले दिसले नसते का? अर्थात या जरतरचा तसा उपयोग नाही.

५) रत्नागिरीचे नाव असे कसे प्रचलित झाले, रत्नगिरी का नाही?

६) चित्रपटसमीक्षक अशोक राणे झी २४तासवर सांगत आहेत की देवदास या सिनेमाच्यावेळी संजय लीला भन्साळी यांना कोणी सांगितले की पारो आणि चंद्रमुखी यांना एकत्र नाचवणे चुकीचे आहे. तर भन्साळीचे त्यावर म्हणणे काय तर माझ्याकडे ऐश्वर्या व माधुरी आहेत. मी त्यांना एकत्र नाचवले नाही तर माझा धंदा कसा होणार? त्यामुळे मूळ गोष्टीत काय होते याच्याशी मला देणेघेणे नाही. ते असेही म्हणतात, की साडी नेसण्याची पद्धतही पूर्णपणे चुकीची आहे. शिवाय हे गाणे मंगळागौरीच्यावेळी पिंगाचे नाचासह जे गाणे म्हटले जाते, या धर्तीवरही नाही. केवळ पिंगा हा शब्द त्या गाण्यात वापरलेला आहे. देवदास हा सिनेमा जरी काल्पनिक कथेवर आधारित असला तरी त्या सिनेमाला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. तेव्हा एक ‘खानदानी’ स्त्री ही एका ‘वादग्रस्त’ स्त्रीच्या बरोबरीने नाचते हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. तेव्हा सिनेमॅटिक लिबर्टी ही फार निसरडी गोष्ट आहे असे ते म्हणाले.

असा धंद्याचा दृष्टीकोन असणा-या व्यक्तीची सिनेमॅटिक लिबर्टी म्हणावी कशी? ही धंदेवाईक लिबर्टी नव्हे का? मग त्याला विरोध का करू नये?

निरगुडकरांनी आणखी एक गंमत केली. त्यांनी पिंगाचा नाच हा देवदासमधल्या डोला रे डोला रे या गाण्याच्या पार्श्वभुमीवर दाखवला आणि जवळजवळ सा-याच स्टेप्स जुळताना दिसत होत्या.

या चर्चेत फुलवा खामकर व नितीन देसाई हे दोघे चित्रपटसृष्टीतील कलाकार होते. कदाचित त्यांच्या करिअरचा प्रश्न असल्याने त्यांनी अपेक्षेप्रमाणेच भन्साळीविरूद्ध न बोलता नाच म्हणून ते गाणे छान आहे, त्याच्याकडून अशी मोठी चूक होणे शक्य नाही, वगैरे टेप लावली होती.

या सर्व गदारोळात अजूनही कोणी भन्साळीना याबद्दल काही विचारण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत का? हे मुद्दाम ठरवून होते आहे का?

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 11:55

फुसके बार – २२ नोव्हेंबर २०१५
.
१) . काही वर्षांपूर्वी बहारिन व कतार या देशामध्ये काही बेटांवरून असलेला वाद संपून त्याबाबत एक करार करण्यात आला. त्यासंदर्भात त्यावेळी काही विनोद ऐकू येत. या दोन्ही देशांचे स्वत:चे असे सैन्य नाही. इतर देशांमधून भाड्याने घेतलेले सैनिक त्यांच्याकडे असतात. वदंता अशी होती की हे सैनिक समोरच्या देशाच्या सैनिकांकडे आपला बायोडेटा देऊन ‘बघ तुमच्याकडे माझ्या नोकरीसाठी काही करता येतंय का ते’ असे म्हणत. हा प्रकार वाढू लागल्याने अखेर दोन्ही सरकारांनी हा वादच मिटवायचे ठरवले.

२) महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा पुणे महापालिकेतर्फे सत्कार करण्याचा ठराव दफ्तरी दाखल करण्याचे महापालिकेतील कॉंग्रेस व राष्ट्रवादीतर्फे ठरवण्यात आले. याच नगरसेवकांनी यापूर्वी पुरुषोत्तम खेडेकर या महामानवाचा महापालिकेतर्फे सत्कार करण्याचे ठरवले होते. त्याला विरोध झाल्यानंतर तो ठरावही असाच दफ्तरी दाखल केला गेला होता. बाबासाहेबांचा सत्कर करण्याचे रद्द करून या लोकांनी त्याची फिट्टंफाट केलेली दिसते. वर कारण काय सांगत आहेत, की त्यांना ७८साली ानपत्र देण्यात आले होते. एकाच व्यक्तील दोन वेळा मानपत्र देण्याची पद्धत नाही. कितीही झाले तरी हा खेडेकर हा महामानव महाराष्ट्रभूषण होण्याच्या लायकीचा नाही, तेव्हा बाबासाहेबांच्या बाबतीत तरी असे करायला नको हे समजण्याची या नतद्रष्टांच्या लायकी नाही. शिवाय यांचे जे मोठे नेते आहेत, त्यांनी आधी बाबासाहेबांबद्दलचे जहर समाजात मुक्तपणे पसरू दिले आणि पुरस्कारसोहळ्याच्या थोडेच आधी मवाळ भूमिका घेतल्याचा आभास निर्माण केला होता. आता हा ठराव रद्द करण्यात या नेत्यांचा हात नसेलच असे समजण्याचे कारण नाही.

जाऊ द्या, या म्हाता-याचा सत्कार नाही केला, तरी त्या म्हाता-यासह कोणाला काय फरक पडणार आहे?

३) द फिफ्थ इस्टेट या ज्युलियान असांजवरील सिनेमातले असांजच्या तोंडचे वाक्य:
If whistle-blower’s identity is kept secret, then he has nothing to fear. As Oscar Wilde said, “Give a man a mask, and he will tell you the truth.”
याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला सत्य काय आहे हे ऐकण्यात रस नसतो, ते सत्य कोण सांगतो आहे यावरून आपण आपली प्रतिक्रिया ठरवणार असतो.
बाकी या सिनेमामधला एक भाग लक्षात आला नाही. असांजने कोणत्याही परकीय वकिलातीत वा देशात आश्रय घेतलेला नसतानाही अमेरिकेचे लोक तो त्यांची गुपिते फोडत असतानाही त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला जेरबंद करू शकत नाहीत. हे थोडे विचित्र वाटते. शिवाय या सर्व काळात तो अनेकदा सार्वजनिक ठिकाणीही दिसत असतो. असो. पण तो सिनेमा जबरदस्त आहे. मुळात पाचवा स्तंभ ही या सिनेमाच्या नावामागची संकल्पनाच भन्नाट आहे.

४) विविध रेसिपींचे फोटो टाकले जातात. सहसा त्यात सामीष पदार्थांच्या रेसिपी दिसत नाहीत. मात्र तशी ती कोणी टाकलीच, तर आमच्या भावना दुखावल्या असा आरोप आजवर कोणी केलेला दिसत नाही. पहा, अजुनही किती सहिष्णुता शिल्लक आहे समाजात.

५) पुन्हा इंद्राणी मुखर्जी - शिना बोरा हत्येवरून सगळ्या वाहिन्यांचे वेळ खाणे चालू. आपली मराठी चॅनल्सही अचानक आपण प्रादेशिक वाहिनी असल्याचे विसरतात आणि तेच चर्वित-चर्वण चालू करतात, त्यामुळे मग पाहण्यासारखे काही रहात नाही.

६) वाईटातही चांगले शोधावे म्हणतात. मस्तानी व काशीबाई यांचे एकत्र नृत्य दाखवून घोळ घातलाच आहे, तरी एक डायलॉग ऐकू येतो आहे की हम ने मोहब्बत की है, ऐय्याशी नहीं. क्या बात है। शिवाय बाजीराव म्हणून भन्साळीने त्याचा आवडता हिरो सलमानखानला आपल्यावर लादले असते तर आपण काय करणार होतो? तेव्हा भन्साळीचे आभार.

७) अर्णब गोस्वामीचे नवे हत्यार – उघडू का टेलिफोन लाईन्स?
लालूच्या मुलाचे काहीही कर्तृत्व नसताना त्याला थेट उपमुख्यमंत्री केल्यामुळे काल अर्णब फार पेटला होता. अमेरिकेतून शिकून आलेला नितीशकुमारांच्या पक्षाचा जनार्दन तिवारी व लालूच्या पक्षाचा कोणी सिन्हा हे त्यांची बाजू मांडणारे तसे नवखेच होते. जनार्दन तिवारी बोलण्यात – वागण्यात सभ्य वाटत होता पण त्याच्यावर लालूच्या दिवट्याचे समर्थन करण्याची वेळ आल्याने तो ते काम नाइलाजाने करत होता.

एखाद्याला धमकी द्यायची असेल तर जसे कोणी म्हणेल की माझ्याकडचे कुत्रे तुझ्या अंगावर सोडीन बरं का, सोडू का? तसे अर्णब या दोघांना वारंवार धमकी देत होता की टेलिफोन लाइन्स चालू करू का? होते काय, कि अनेकदा हे प्रेक्षक फोनवर बोलताना खूप तावातावाने बोलतात व आरोप करतात. त्यामुळे पक्षप्रवक्त्याची पंचाईत होते. एकवेळ ते अर्णबचा मारा थोपवून ठेवू शकतात, तेही अवघडच, पण या प्रेक्षकांवर ओरडणारा पक्षप्रवक्ता मी तरी अजून पाहिलेला नाही. त्यामुळे कितीही तीव्र आरोप असले तरी शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करणे किंवा चक्क शांत बसणे हे दोनच पर्याय त्याच्यापुढे उपलब्ध असतात.

डोळ्यासमोर आणून पहा, अर्णब त्या पक्षप्रवक्त्याला वारंवार धमकावतोय, उघडू का टेलिफोन लाइन आणि तो पक्षप्रवक्ता गयावया करतोय, नको रे, तू परवडलास, पण प्रेक्षक नकोत.

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 11:53

फुसके बार – २३ नोव्हेंबर २०१५
.

१) परवा कट्यारच्या मूळ नाटकातील खॉंसाहेबांच्या दोन शिष्यांची पात्रे ज्या पद्धतीने रंगवली आहेत, त्याबद्दल कोणीतरी लिहिलेले वाचले. मागे नाटक पाहताना मलाही त्या दोघांचे सुरूवातीचे विदुषकी व नंतरचे खुनशी चाळे खटकले होते. ही दोन्ही पात्रे दुर्लक्ष न करता यावीत, इतकी इरिटेटिंग आहेत. दारव्हेकरांनी ही इतकी सैल जागा नाटकात का सोडली असावी? शिवाय माझ्या मते खॉंसाहेबांचे पात्रही योग्य पायावर उभे राहिलेले दिसत नाही. संगीतनाटकात संवाद केवळ कथा पुढे नेण्यासाठीच असावेत हे मान्य, पण येथे तो भाग फारच ढिसाळपणे येतो. एकंदरीत या नाटकाची कथा न पाहता ते नाटक केवळ गाण्यांसाठी पहावे की ऐकावे असे होते. तर मग दारव्हेकरांचे नाटककार म्हणून एवढे कौतुक का केले जाते? की हा सांभाळून घेण्याचा प्रकार आहे? समिक्षकांनी गाण्यांव्यतिरिक्त या नाटकाची काही शक्तिस्थळे आहेत का हे सांगितल्यास हा मुद्दा स्पष्ट होऊ शकेल.

२) केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका/नगरपालिका यांच्या निवडप्रक्रियेत शैक्षणिक वा तर पात्रतेत काय फरक असतो का? तीच गोष्ट शाळा-कॉलेजांची, पण तो मुद्दा नाही. सरकारी भरतीमध्ये जर शैक्षणिक पात्रतेप्रमाणे फरक असतो, तर वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना त्यात काही फरक असतो का? केंद्र व राज्य पातळीवर दोन्ही सरकारांचा बराचसा खर्च कर्मचा-यांच्या पगारावरच होतो, तर मग शेतक-यांचे हित कसे जपले जाईल असे प्रश्न विचारले जात आहेत म्हणून विचारतो. या कर्मचा-यांच्या वेतनश्रेण्या वेगळ्या असतील, पण सर्वांना तेवढीच (टक्केवारीप्रमाणे) वेतनवाढ लागू होते का? त्यानंतर हेच लोण अगदी खासगी शाळा/कॉलेजांमधील शिक्षकांपर्यंत कसे पोहोचते?

३) पेशव्यांच्या आयांची व बायकांची कटकारस्थाने या विषयावर काही पुस्तक किंवा संशोधनग्रंथ आहे काय? सोयराबाईंनी संभाजीचा छळ करून किंवा अन्य कारणांनी शिवाजीराजांना मनस्ताप दिला यावरून परस्परविरोधी मते आहेत. आता मस्तानीच्या निमित्ताने शनिवारवाड्यातल्या बायकांकडून महापराक्रमी बाजीरावाचाही मानसिक छळ झाला याबद्दल बोलले जात आहे. त्याव्यतिरिक्त केवळ धमानंदीबाईंबद्दलच ऐकले जाते. या पार्श्वभूमीवर अशा संशोधनाची आवश्यकता आहे. अर्थात हे संशोधन अगदी बाळाजी विश्वनाथापासून ते पेशवाई बुडेपर्यंतच्या काळासाठी असावे.

४) फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद हे आपल्या २६ जानेवारीच्या कार्यक्रमाचे पाहुणे म्हणून येणार आहेत असे कळले. आता त्यावरून इसिसचे लक्ष भारताकडे जाईल या शक्यतेवरून वाद निर्माण करून मोदींना दोष दिला जाईल. म्हणजे वाद निर्माण करण्याचा हेतु हा. थोडी वाट पहा.

५) परवा एके ठिकाणी ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ हे वचन पाहण्यात आले. सामान्यपणे ज्ञानेश्वरांचे कार्य तुकारामांच्या काही शतके आधीचे असल्यामुळे तसे म्हटले जात असावे. पण सध्याच्या असहिष्णुतेच्या काळात हे वचन भविष्यात झाकून ठेवावे लागते की काय असे वाटते. कळसापेक्षा पाया मोठा व महत्त्वाचा मानतात, मग म्हणजे तुम्ही तुकारामांना ज्ञानेश्वरांना कमी लेखता? असे नाहक वाद निर्माण करणारे हे पाहणार नाहीत की कळस म्हणणे हे काम पूर्णत्वाला नेण्याचे प्रतिक, त्यामुळे त्यात लहानमोठे असा भेद करण्याचे कारण नाही.

तेव्हा वैचारिक दारूगोळा तयार ठेवा. शिव्या वगैरे न देता.

६) मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ गांडीची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

आजच्या काळात डोक्यात काठी घालणे तसेही बेकायदेशीर आहे. शिवाय कितीही दानशूर असले, मदत करण्याची इच्छा असली तरी स्वतःची लंगोटी काढून देणे हा अतिरेक. दुसऱ्याने तरी ती लंगोटी का व कशी घ्यावी?

शिवाय हा व्यवहारीपणा संत लक्षणांमध्ये मोडतो का? मुळात हे असे म्हणणे तुकारामांच्या एकंदर प्रकृतीत बसते का? की ते कोणीतरी घुसडले असावे?

तुकाराम तर हे सांगून गेले. पण आजकाल विविध चर्चांमधून दिसणारी आधुनिक विष्णुदासांकडून दिली जाणारी ही धमकी झाली आहे. अगदी काही जातीयवादी व शिवसेनेचे गुंडही त्याचा स्वत:च्या सोयीप्रमाणे सर्रास वापर करताना दिसतात. वर म्हणायला मोकळे, की आम्ही म्हणत नाही, तुकारामच सांगून गेले आहेत. तर मग त्या काळातील पद्धतीप्रमाणे यांना हत्तीच्या पायाखाली दएणे, कडेलोट करणे, शिरच्छेद करणे अशा शिक्षा द्यायला हव्यात.

अर्थात, कोणा संतांनी काही सांगितले तरी त्यातले निवडक काही आपल्या सोयीपुरते उचलणे व वापरणे हे अगदी नाठाळाचेच लक्षण. आता तुकारामांनी नाठाळ कोणाला म्हणावे हे न सांगून आपली पंचाईत केलेली आहे.

७) कलर्स वाहिनीवर राम कदम यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम दाखवत आहेत. भयानक. कार्यक्रमातील प्रसंगांचे संवाद लिहिणारी धन्य व्यक्ती कोण आणि गाण्यावरील नृत्यांच्या स्टेप्स बसवणारी व्यक्ती कोण याचा शोध घेऊन त्यांचे राम कदमांवरील कार्यक्रमाची पुरेपूर वाट लावल्याबद्दल अभिनंदन करायला हवे.

८) इन्व्हर्टर सायनुसॉयडल वेव्हचा नसेल, स्क्वेअर वेव्हचा असेल, तर त्या इन्वर्टरवर चालणारा पंखा आवाज का करतो?

आता थोडी जरी 'लिहिण्याची' कुवत असती, तर हाच मुद्दा पुढील संवादांने मांडता आला नसता का?

“काय पांडबा कसला इचार करतुयास?”
“आरं, इंटर कुटला घ्याचा इचार करतुया शिवा.”
“अरं त्यात कशापाइ इचार कराचा, त्या आप्पानं लावलाय की येक इंटर. सस्त न मस्त. तवा कशापायी इचार करतुया?”
“आरं, त्ये आप्पाकडचं बेनं लाईटी नसल्या की पंक्याचा गुरू-गुरू असा आवाज करतंय. त्येची म्हातारी लय घाबरतीया तसल्या आवाजानं. त्या आप्पाला येडं बनवलया इंटर इकणा-यानी."
"आता हिबी भानगड हाय व्हय, ते बग ते इंजिनियर साहेब चालल्याती. त्यांस्नी इचारू."

दहा सेकंदांनी......

“काय पांडबा, काय शिवा, काय चाललंय?”
“इंजिनियरसाहेब, ह्यो पांडबा इंटर घ्याचा म्हंतोय. पण त्या आप्पाकडच्या इंटरवर लाईटी नसली की त्येचा पंका लई आवाज करतुया म्हनं.”
“हा हा. अरे शिवा, इंटर नव्हे इन्व्हर्टर. आणि तो जर स्क्वेअर वेव्हचा असेल तर मग वीज नसेल तर पंखा आवाज करतो. पण त्याने जर सायनुसॉयडल आउटपुटचा इन्व्हर्टर लावला असता तर मग तसा आवाज येत नाही.
“आस्स व्हय, त्ये कायबी आपल्याला कळ्ळं न्हाय, पर त्यो दुस-या परकारचा इंटर असला की पंका आवाज कसा काय करत नाय?”
“अं, अं, तेच तर येथे विचारलय की. कोणी सांगितलं की मग तुला सांगतो पांडबा.”

चिमणराव Mon, 23/11/2015 - 05:56

In reply to by राजेश कुलकर्णी

८) चौकोनी वेवफार्ममध्ये सेकंदाला पंचवीसवेळा वीज चालू बंद होत असते ते जरा पंख्याला पचवायला जड जातं आणि पोटातून गुरूगुरू आवाज येतो.-पटलं तर घ्या.

नितिन थत्ते Fri, 27/11/2015 - 14:57

In reply to by चिमणराव

१. इंडक्शन मोटर साइन वेव्हवर चालणे अपेक्षित असते.
२. जरी साईन वेव्ह सप्लाय दिला तरी जुन्या प्रकारच्या रेग्युलेटर नसेल (इलेक्ट्रॉनिक रेग्युलेटर असेल) तर कमी स्पीडला आवाज येतो.

ऋषिकेश Mon, 23/11/2015 - 09:35

In reply to by राजेश कुलकर्णी

ऐसी अक्षरेवर मनातील अशा लहानमोठ्या विचारांसाठी प्रश्नांसाठी खास धाग्यांची सोय आहे. तेव्हा इतके प्रश्न मना॑त येईपर्यंट न थांबता प्रश्न पडल्या पडल्या तिथे टाकता येतील.

तेव्हा रोज नवा धागा टाकण्यापेक्षा त्या धाग्यांचा वापर करावा ही विनंती!

राजेश कुलकर्णी Mon, 23/11/2015 - 10:11

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद. या सदरामध्ये सा-याचे बुलेट्स पडलेले प्रश्न, वगैरे प्रकारचे नसतात.विविध प्रकारच्या बुलेट्स असतात.
त्यामुळे संपादकांना विचारूनच मौजमजा या प्रकाराची निवड केलेली आहे. अशा प्रकारच्या स्फुटमालिकांसाठी वेगळी कॅटेगरी केली तर अधिक योग्य होईल. तुर्त असे.

राजेश घासकडवी Mon, 23/11/2015 - 15:17

In reply to by राजेश कुलकर्णी

जे वाचलं होतं त्यात प्रश्नांपेक्षा मौजमजा अधिक होती, म्हणून तो विभाग सुचवला होता. पण आता बऱ्याच बाबतीत रॅंडम प्रश्न दिसताहेत फक्त.

या प्रकारचं लेखन दररोज एकदा येणं वाचकांना कंटाळवाणं वाटेल. यातलं वेचक आणि वेधक निवडून आठवड्यातून एकदा किंवा फारतर दोनदा प्रसिद्ध केलंत तर ते अधिक वाचनीयही होईल, आणि रतीब टाकल्यासारखं वाटणार नाही.

राजेश कुलकर्णी Mon, 23/11/2015 - 19:09

In reply to by राजेश घासकडवी

सुचनेबद्दल धन्यवाद. मी मुद्दामच ते एकसुरी होणार नाही असे पाहतो. रतीब म्हणजे उगाच काहीतरी व कसेतरी जमवून मी ते एकत्र करत नाही. मला जे सुचते व त्याबद्दल लिहावेसे वाटते त्याबद्दलच मी लिहितो. शिवाय कोणाला काय आवडेल याचा नेम नसतो. त्यामुळे मला तसे निवडता येणार नाही. खरे तर मौजमजा हे सदरही त्यासाठी चपखल नाहीच. कारण अनेकदा त्यात गंभीर मुद्देही असतात. तेव्हा स्फुट असा सदराचा प्रकार त्यासाठी अधिक योग्य ठरेल. असो. मी थांबतो.
इथले वातावरण खूप चांगले ठेवले आहे तुम्ही. बरे वाटले. अभिनंदन.

राजेश घासकडवी Tue, 24/11/2015 - 00:15

In reply to by राजेश कुलकर्णी

रतीब म्हणजे उगाच काहीतरी व कसेतरी जमवून मी ते एकत्र करत नाही. मला जे सुचते व त्याबद्दल लिहावेसे वाटते त्याबद्दलच मी लिहितो.

रतीब म्हणजे रोजच्या रोज काहीतरी येत राहिलं आलंच पाहिजे ही भावना. ती वाचकांना जाणवते. तसं त्यांना वाटू नये याची काळजी घेतलेली बरी. वरच्या लिखाणात सकाळी वर्तमानपत्र उघडलं आणि काही बातम्यांविषयी चाराठ वाक्यं लिहिली असं तंत्र वापरल्यासारखं दिसतं. हे तंत्र रतिबी वाटण्याची शक्यता खूपच आहे.

शिवाय कोणाला काय आवडेल याचा नेम नसतो. त्यामुळे मला तसे निवडता येणार नाही.

आपण लिहिलेलं सगळं छानच आहे बहुतेकांनाच वाटतं. पण कुठचं खरंच चांगलं आहे आणि बहुतांशांना आवडेल हे स्वतःला ओळखता येण्यानेच लेखकाची वाढ होते.

असो. सल्ले स्वीकारायचे की नाही तुमच्याच हाती आहे.

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 11:08

In reply to by राजेश घासकडवी

तुमचे म्हणणे माझ्या लक्षात आले. मी थांबतो म्हणण्याचे कारण असे की म्हटले तसे स्फुट ता सदराखाली मोडेल किंवा अनेक संस्थळांमध्ये काही जणांना आपली सदरे नियमितपणे चालवू देण्याची सोय असते, तसे येथे नसल्याने (याचा तुम्हाला दोष देत नाही किंवा ही इथली त्रुटी आहे असे म्हणत नाही) माझ्या भाराभार पोस्ट पडताहेत असे होऊन किंवा वाटून कोणाची गैरसोय होत अाहे असे होऊ नये.
बाकी मी म्हटले तसे अशा स्फुटांमध्ये चांगले-वाईट असे काही नसते हे म्हणण्याचे कारण असे की वाचकांच्या द्ृष्टीने आवडीचे विषय खूप वेगळे असतात.
माझ्या अनुभवावरून ज्या वाचकांना स्फुटांचा हा फॉर्मॅट वेगळा वाटतो पण यात रस आहे, ते हळुहळु त्याला रूळतील. समजा आठ बुलेट्स आहेत, तर आठही मुद्द्यावर कमेंट करण्याची आवश्यकता नाही. त्यांना ज्या मुद्द्यात रस आहे त्यावर ते प्रतिक्रिया देऊ शकतात. इतर ठिकाणी तसे होताना पहात आहे.

ऋषिकेश Tue, 24/11/2015 - 11:16

In reply to by राजेश कुलकर्णी

फुसके बार म्हणून एक धागा काढता येईल. त्यात प्रतिसादरुपाने तुम्हाला रोजचे स्फुट लिहिता येईल. प्रतिसाद दिलात की तो धागा आपोआप वरही येईल व दररोज नवा धागा आल्यासारखेही नाही वाटणार.

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 16:39

In reply to by ऋषिकेश

पुढील प्रतिक्रिया आधीच वर टाकली होती. ती पुन्हा खाली देत आहे. धन्यवाद.
कोणी तरी अशा पद्धतीने सा-या पोस्ट एकत्र क्लब करण्याबद्दल सुचवले होते. तसे करू नका अशी विनंती करेपर्यंत तसे झालेलेही दिसते.
आता दिसणा-या चार-पाच पोस्ट व त्यावरील इतरांच्या कमेंट्स पाहता ही पद्धत वाचण्यासाठी, कमेंट करण्यासाठी व जुन्या पोस्टवर कोणी नवीन कमेंट केली तर ती पाहण्यासाठी सुटसुटीत राहणार नाही. आता कोठे वाचकांचा प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली होती,तो वाढत गेल्यास हे आणखी क्लिष्ट होईल.
त्यामुळे मी हा प्रकार बंद करतो. हे काढून टाकले तरी हरकत नाही.
धन्यवाद व येथल्या फॉर्मॅटमध्ये हा प्रकार योग्यप्रकारे फिट न झाल्याबद्दल क्षमस्व.

सर्व_संचारी Mon, 23/11/2015 - 18:35

In reply to by राजेश कुलकर्णी

मस्त चाललंय !! हां आता संगीत नाटकांचं म्ह्णाल तर सौभद्र ची सर कुणालाच नाही, बाकी बहुतेक संगीत नाटके जास्तकरुन ऐकण्यासाठीच !!

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 11:56

फुसके बार – २४ नोव्हेंबर २०१५
.

१) मादागास्करसारख्या सिनेमांमध्ये जंगलातील विविध प्राण्यांमधल्या सुसंवादाचे किती छान चित्रण करतात. कथादेखील फार छान गुफलेली असते. शत्रुत्व असले तरी केवळ ते मिटवण्याच्या दृष्टीने दाखवले जाते. फक्त एक गोष्ट विचारायची नाही. ती म्हणजे यातले मांसाहारी प्राणी खातात काय?

२) घार किंवा गरूडाला आकाशातूनच जमिनीवरचे साप वा उंदीर असे सावज दिसू शकते. इतकी जबरदस्त क्षमता पाहता प्रश्न पडतो की तिच्या डोळ्यातल्या लेन्सचे ऑप्टिकल रिझोल्युशन किती असेल? कोणी या दृष्टीने कॅमे-याच्या लेन्सचा अभ्यास केला असेल काय?

३) वि.हिं.प.चे नेते अशोक सिंघल यांच्या शोकसभेच्या निमित्ताने असेल कदाचित, पण सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येच रामंदिर बनवण्यासाठी प्रयत्न करणे व ते उभारणे हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे जे विधान केले, त्यावरून फार वाद झाला नाही. अन्यथा भागवत बोलणार व तेही राममंदिराच्या विषयावर, सगळ्यांनी आपली हत्यारे नक्कीच परजली असती. मोठी संधी गेली. अर्थात आता इतक्यात कोणती निवडणूकही नाही. त्यामुळेही कोणाला फार रस नसेल.

४) केजरीवालांनी लालूंना मिठी मारण्याबद्दल जे स्पष्टीकरण दिले ते खरेतर अर्धसत्यच आहे. लालूंनी केजरीवालांना ओढून मिठी मारली – अर्धसत्य. मग केजरीवालांचा हात लालूंच्या पाठीवर कसा दिसला असता? लालूंनी केजरीवालांचा हात ओढून उंचावला. – सत्य. कारण केजरीवालांचा दुसरा हात त्यांनी स्वत: उंचावला नव्हता. नंतर केजरीवाल म्हणालेही, की त्यांनी लालूंच्या भ्रष्ट राजकारणाचा नेहमीच विरोध केलेला आहे. आता पत्रकारांनी लालूंना त्यावरून छेडायला हवे.

५) एरवी गोड वाटणारी एअरटेलची ४जी मुलगी आता आगावपणा करू लागली आहे बरे का. इंटरनेटच्या रात्री केलेल्या वापराच्याबदल्यात दिवसा काही रक्कम परत अशी काहीशी योजना आहे. ती योजना या मुलीने रात्री झोपलेल्या मुलींना समजावून सांगितल्या-सांगितल्या त्या मुली चेकाळून इंटरनेट वापरायला लागतात, असे त्या जाहिरातीत दाखवलेले आहे. बाई, नव्हे, मुली, आजकाल झोपच तर तेवढी हक्काची राहिलेली आहे, अशा योजनांचे आमीष दाखवून तीदेखील हिरावून घेऊ नकोस गं.

६) चीनमधील सांस्कृतिक क्रांतीमुळे असंख्य कुटुंबे देशोधडीला लागली. आता ही सांस्कृतिक क्रांती म्हटली तरी प्रचंड हिंसाचार झाला. अगदी हिटलरलाही आपल्या तोडीचा कोणीतरी आहे बरे का, असे समाधान देईल किंवा त्यालाही लाजवेल अशा तोडीचा हिंसाचार तेथे झाला. तरी हिटलर सा-या जगाचा दुश्मन, तर माओ अजुनही हिरो. कमीत कमी त्यालाजगाने अजून खलनायक बनवलेले नाही. या क्रांतीचा धसका आजही कित्येकांनी घेतलेला आहे. चेयरमन माओबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला की बरोबरचे सगळे चिनी लोक स्तब्ध होतात. चर्चा वेगळ्या विषयाकडे नेतात. मी एका तरूण चिनी मुलाला मोठ्या मुश्किलीने व तेही आमच्याशिवाय तेथे कोणीही नसताना, त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित त्याचा स्वभाव असेल म्हणून म्हणा, या विषयावर बोलायला तयार व्हायलाच त्याने तब्बल एक तास घेतला होता. त्या काळात तर तो जन्मलेलाही नव्हता. एकूण थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती आहे. त्या काळाबद्दल कोणीच बोलू इच्छित नाही. इतकी दहशत अजुनही आहे.

मरणाच्या भितीने कित्येक कुटुंबे अन्नाला पारखी झाली. घरदार सोडून दूरवर पळून गेल्यामुळे कित्येक दिवस पोटात अन्नाचा कण जात नसे. त्यानंतर आता इतकी दशके उलटून गेली, बरीच सुबत्ता आली असली, तरी आजही दोन वयस्कर चिनी भेटले की नाश्ता झाला आहे का, असे एकमेकांना आवर्जून विचारतात.

७) त्यावरून सुचले, जसे युद्धामुळे नवनीन शोध लागतात, तसे दुष्काळामुळे गरज म्हणून नवीन खाद्यपदार्थांचा शोध लागतो काय? भलेही ते पदार्थ करताना बरीच तडजोड करावी लागली असेल, पण त्यातूनही काही नवीन पदार्थ तयार होत असतील.

राजेश कुलकर्णी Tue, 24/11/2015 - 16:37

In reply to by राजेश कुलकर्णी

कोणी तरी अशा पद्धतीने सा-या पोस्ट एकत्र क्लब करण्याबद्दल सुचवले होते. तसे करू नका अशी विनंती करेपर्यंत तसे झालेलेही दिसते.
आता दिसणा-या चार-पाच पोस्ट व त्यावरील इतरांच्या कमेंट्स पाहता ही पद्धत वाचण्यासाठी, कमेंट करण्यासाठी व जुन्या पोस्टवर कोणी नवीन कमेंट केली तर ती पाहण्यासाठी सुटसुटीत राहणार नाही. आता कोठे वाचकांचा प्रतिसाद मिळायला सुरूवात झाली होती,तो वाढत गेल्यास हे आणखी क्लिष्ट होईल.
त्यामुळे मी हा प्रकार बंद करतो. हे काढून टाकले तरी हरकत नाही.
धन्यवाद व येथल्या फॉर्मॅटमध्ये हा प्रकार योग्यप्रकारे फिट न झाल्याबद्दल क्षमस्व.

.शुचि. Tue, 24/11/2015 - 21:21

In reply to by राजेश कुलकर्णी

७ वा मुद्दा आवडला.

आता इतकी दशके उलटून गेली, बरीच सुबत्ता आली असली, तरी आजही दोन वयस्कर चिनी भेटले की नाश्ता झाला आहे का, असे एकमेकांना आवर्जून विचारतात.

:( दारिद्र्यासारखे दु:ख/दुर्दैव नाही असे म्हणतात.

राजेश कुलकर्णी Mon, 28/12/2015 - 08:59

फुसके बार - २५ डिसेंबर २०१५
.

१) रशियामध्ये गार्ड ऑफ ऑनरच्यावेळी अनपेक्षितपणे बॅंडवर राष्ट्रगीत चालू झाले त्यावेळी मोदींचा गोंधळ झाला. त्यांना आधी सांगितले गेले त्याप्रमाणे ते चालू लागले होते. पण तेवढ्यात राष्ट्रगीत चालू झालेले पाहिल्यावर रशियन अधिकार्‍याने त्यांना परत मागे बोलावले.

अशा प्रसंगांवरून कधीकधी रूसवेफुगवेही होतात. अमेरिकेचे एक मोठे अधिकारी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जॉंग उन यांना भेटायला गेले होते. या अधिकार्‍याने त्याचा शर्टही चुकून पॅंटच्या आत न खोचता अंडरवेअरच्या आत खोचला होता. अध्यक्षांना भेटण्यासाठी उभे असताना त्यांच्या हातात काही होते खाली पडले. ते उचलण्यासाठी तो खाली वाकला, तेवढयात त्याची अंडरवेअर अध्यक्षांना दिसली. त्या अंडरवेअरचा रंग नेमका लाल होता. लाल रंगाची अंडरवेअर म्हणजे कम्युनिस्ट उत्तर कोरियाचा अपमान करण्यासाठीचा डाव असल्याचे समजून अध्यक्षांनी या अधिकार्‍यास भेटण्यास नकार दिला होता.

२) दिल चाहता है या सुंदर सिनेमातले संवाद फारच चुरचुरीत आहेत. अरेंज्ड मॅरेजच्या निमित्ताने दोघेजण प्रथमच भेटतात. ती याच्या खोलीतील त्याच्या मित्रांचा अगदी आनंदी भावमुद्रेतला फोटो पाहते आणि म्हणते की तुम्हा सर्वांची फारच गहिरी मैत्री दिसते. हा उत्तरतो, की हो एकतर तो फोटो ३डी आहे किंवा मैत्री खरोखरच गहिरी आहे.

जियो फरहान.

३) इनव्हिक्टस या नावाचा सुंदर सिनेमा द. आफ्रिकेचे दिवंगत अध्यक्ष नेल्सन मंडेला यांच्या कारकिर्दीतल्या एका छोट्या कालखंडावर प्रकाश टाकतो.
मंडेलांची भूमिका करायला मॉर्गन फ्रीमन यांना स्पर्धाच नसावी. शिवाय जोडीला माझा आवडता सदाबहार मॅट डॅमन.

मंडेला प्रथम पंतप्रधान झाल्यावर गोरे व काळे यांच्याबरोबरच झुलु व इतर आदिवासीगटांना बरोबर घेऊन जाण्याचे मोठेच आव्हान त्यांच्यापुढे होते. १९९५सालची रग्बी विश्वचषक स्पर्धा आफ्रिकेत घ्यायची ठरल्यावर अध्यक्ष मंडेला या संधीचा उपयोग देशातील विविध गटांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी कसा करून घेतात याची फार सुंदर कथा या चित्रपटात गुंफली आहे.

इतकी वर्षे आपण म्हणजे गोर्या राज्यकर्त्यांनी याला तुरूंगात खितपत ठेवले, तरीही या माणसाच्या मनात आपल्याबद्दल द्वेषाचा लवलेशही कसा दिसत नाही, असा प्रश्न आफ्रिकी संघाच्या गोर्‍या कप्तानाला पडतो.

हा रग्बी विश्वचषक जिंकायचाच असे जेव्हा मंडेला आग्रहाने सांगतात, तेव्हा आफ्रिकेच्या संघाची पात्रता उपान्त्यपूर्व फेरीपर्यंतच पोहोचण्याची असते. तेव्हा पूर्वी तुरूंगात त्यांच्याबरोबर असलेला त्यांचा सहकारी जेव्हा त्यांना ही स्पर्धा जिंकणे अशक्य आहे असे सांगतो, तेव्हा मंडेला त्याला म्हणतात, की अशक्य या शब्दावर विश्वास ठेवला असता तर आपण आजही तुरूंगात असतो.

क्लिंट इस्टवूडच्या अभिनयाच्या कारकीर्दीपेक्षा दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी फारच प्रभावी होत आहे.

सुंदर चित्रपट आहे. जरूर पहा.

४) ख्रिसमसच्या निमित्ताने सांताक्लॉज घरी येतो अशी कल्पना म्हणजे अंधश्रद्धाच आहे, त्याबद्दल काहीच का बोलले जात नाही असे काहीजण विचारत आहेत. कदाचित मदर तेरेसांना संतपद देण्यामागे जे चमत्कारांचे थोतांड माजवले गेले त्यावर आधीच चर्चा झाल्यामुळे तसे झाले असावे.

शिवाय त्या निमित्ताने एकमेकांना भेटवस्तु देण्याचे व त्यासाठी बाजारातून खरेदी करण्याचे एवढे अवडंबर माजवले गेलेले आहे की या सणाचे १००% बाजारीकरण झालेले आहे. हा मुद्दा वेगळाच.

५) खासदार / मंत्री यांच्यासाठी विमानाला उशीर करण्याचे प्रकार व त्यावरून निर्माण होणारे वाद आपण पाहतोच. मात्र केरळमध्ये तेथील राज्यपाल विमानतळावर उशीर पोहोचले तरी त्यांना विमानकंपनीने बोर्डिंग पास दिला. मात्र वैमानिकानेच विमानाचे दरवाजे बंद करावयास सांगून त्यांना प्रवेश नाकारला. हे राज्यपाल मवाळ स्वभावाचे असल्यामुळे की काय कोणास ठाऊक, याचा फार बभ्रा झाला नाही. अन्यथा अशा प्रकरणांमध्ये आपली चूक असली तरी दुसर्यांना दोष देत आकांडतांडव करणारेच फार दिसतात.

६) तिकडे तेलंगणात स्वत: मुख्यमंत्री प्रचंड मोठा यज्ञ घडवून आणत आहेत. सरकारी पातळीवर हे सारे केले जात आहे. तरी तेथील सगळेच विरोधक गप्प बसले आहेत. यावरून मूर्खपणा किती खोलवर पोहोचला आहे याची कल्पना यावी.

७) विद्याधर टिळक या माजी बॅंक अधिकार्‍याला सोलापुरात बेवारशी मृत्यु आला. आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून त्यांना तुरूंगवास झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी असलेले सगळे संबंध तोडलेले होते.

त्यांना तुरूंगवास झाला तरी यांचे कुटुंबिय रहात असलेली मालमत्ता ही सामान्यपणे स्वत: टिळक यांचीच असणार. तरीही त्यांना त्यापासून वंचित ठेवत त्यांना बेवारशी मरण येण्याबद्दल आणि एकूणच त्यांच्या तब्येतीची हेळसांड केल्याबद्दल त्यांच्या कुटुंबियांवर काही कारवाई व्हावी का आणि तशी ती करता येते का?

अर्थात त्यांचे कुटुंबीय वा त्यांच्या मालमत्तेबद्दल काहीच तपशील सदर बातमीत दिलेले नाहीत.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 23:42

In reply to by राजेश कुलकर्णी

फुसके बार - २६ डिसेंबर २०१५
.
१) काल दत्तजयंतीच्या निमित्ताने गाय व कुत्री यांच्यासाठी अन्नछत्र चालवले गेले. भटक्या गायी आणि कुत्र्यांना लाडवांसह इतर पक्वान्ने खाऊ घातली गेली. गावाचे नाव विसरलो. अंधश्रद्धा कुठपर्यंत पोहोचतील याचा आपल्याकडे काही नेम नाही.

२) पावसाळ्यामध्ये दर वर्षी ड्रेनेजच्या उघड्या ठेवलेल्या चेंबरमध्ये पडून लोकांचे जीव गेल्याच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो. या चेंबरना आतल्या बाजूने लोखंडी जाळी बसवल्यास त्यात पडून माणसे वाहून जाणे बंद होईल व काही जीव वाचू शकतील काय? अर्थात आपल्याकडे विजेच्या फिडरबॉक्सचे दरवाजे चोरून नेले जातात व नागरिकांना त्यांचा शॉक बसण्याची खुली संधी दिली जाते, तेथे या जाळ्या जागेवर राहतील याची काय शाश्वती?

३) अरूण जेटली ही व्यक्ती मला कधीच फार पटली नव्हती. ते नेहमीच वकीली पद्धतीने हातचे राखून अर्धसत्य सांगतात; किंबहुना पूर्ण सत्य सांगत नाहीत असे मला वाटत आलेले आहे. पंतप्रधानपदाच्या दावेदारीत सुषमा स्वराजांच्या बरोबरीने त्यांचे नाव घेतले जाई, तेव्हा खरे तर मला काळजी वाटे.

आता दिल्ली क्रिकेट संघटनेतील भ्रष्टाचाराच्या निमित्ताने मी संघटनेकडून एकही पैसा घेतला नाही असे ते सांगत आहेत. मात्र ते या संघटनेचे अध्यक्ष असताना जे गैरव्यवहार झाले असतील त्याची थोडीही जबाबदारी यांची कशी ठरत नाही?

आता तर सगळे करून नामानिराळे राहण्यात हातखंडा असलेल्या भ्रष्टाचार्य पवारसाहेबांनीच जेटलींची जाहीर पाठराखण करण्यावरून उलट जेटलींच्या या प्रकरणातील जबाबदारीची जणू खात्रीच पटली आहे.

४) सॅव्हेज हारवेस्ट या सिनेमामध्ये दुष्काळामुळे मानवी वस्तीपर्यंत आलेल्या सिंहांचे फार सुंदर चित्रण आहे. त्यातला एक शिकारी अगदी रूबाबात बसलेल्या एका सिंहावर बंदुकीचा नेम धरतो आणि काही विचार करून गोळी न झाडता बंदुक बाजुला करतो.

काही डासदेखील कधीकधी विमानासारखी फार छान आकर्षक भरारी घेताना दिसले की हातातल्या जाळीच्या बॅटने त्यांना मारणे जीवावर येते.

५) नवीन वर्षाच्या निमित्ताने काही संकल्प करण्याची काही जणांची पद्धत असते.

माझ्या मते एखादा संकल्प तडीला जाण्यासाठी ती वेळच यावी लागते. तसे न होता केलेले संकल्प म्हणजे ‘आज कर उद्या विसर’ असेच राहतात. अर्थात प्रत्येक वेळी अशी वेळ जीवावर बेतल्यावरच यायला नको.

६) आज संध्याकाळी लॉ कॉलेज रोडवरून जाताना सिग्नल बंद होण्याच्या थोडेच आधी पुढे गेलो, तेही गाडीचा वेग न वाढवता. पुढे उभे असलेल्या वाहतुक पोलिसाने थांबण्यास सांगितले. तो बरोबर सिग्नलपाशी उभा नव्हता. काही पोलिसांची लोकांना थांबवण्याची पद्धतही असुरक्षित असते. सरळ गाडीच्या समोर येऊन उभे राहतात. न जाणो ड्रायव्हरचा पाय गडबडीत ब्रेकएवजी अॅक्सिलरेटरवर पडला तर....

मी थांबल्यावर मला लायसंस मागितले. मला म्हणाला मी का थांबवले त्याचे कारण विचारू नका. मीच म्हटले, की सिग्नल मोडला असे तुम्हाला वाटले म्हणून ना? हो असे म्हणाला.

त्याला म्हटले, मी मला असलेल्या सिग्नलच्या वेळेतच सिग्नल ओलांडला. दुस-या बाजुचे वाहनचालक त्यांचा सिग्नल चालू होण्यापूर्वीच पुढे येतात म्हणून तुम्हाला मीच सिग्नल तोडल्यासारखे वाटले असेल.

दाखवण्यासाठी लायसंस काढत होतो, तेवढ्यात मला म्हणाला की मलाही तसेच वाटले होते, की तुमची चूक नव्हती, पण शंका वाटली म्हणून थांबवले. आता फक्त लायसंस दाखवा आणि पुढे जा.

असेही आश्चर्याचे सुखद धक्के बसतात. आपली चूक नसली तरी.

७) अफगाणिस्तानहून भारतात परतण्यापूर्वी पंतप्रधान मोदी लाहोरमध्ये उतरले व पकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना भेटले. यावरून मोदींचे विरोधक त्यांच्यावर भलभलते आरोप करत आहेतच.

मात्र अशी भेट अचानक ठरवणे हे आपल्या पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य आहे का? किंबहुना हा मुद्दा लक्षात घेतला, तर ही भेट केवळ आपल्या दृष्टीने आश्चर्यात पाडणारी म्हणावी लागेल. सरकारी पातळीवर पाकिस्तान सरकारला याची पुरेशी पूर्वसूचना दिली गेलेली असणार.

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 23:42

In reply to by राजेश कुलकर्णी

फुसके बार - २७ डिसेंबर २०१५
.
१) कचरा गोळा करणा-याचा नवा चष्मा

घंटागाडीवर कचरा गोळा करायला येणारा मुलगा आज पैसे मागायला महिना संपायच्या आधीच आला. म्हणाला की सण आहे, खर्चायला पैसे हवेत. म्हणून या महिन्याचे पैसे आधीच द्या. त्याला पैसे दिले. तरी जाईना. म्हणाला आता जवळचा आणि दूरचा असा दोन्हीचाही चष्मा लागलाय. आता कचरा वेगळा करायला त्रास होतो. लोकपण काहीपण टाकतात कच-यात एकत्र करून. तेव्हा लक्षात आले, की त्याचा बोलायचा मूड आहे आज. मग दोन मिनिटे बोललो त्याच्याशी.

मागे कोणीतरी फुटलेल्या काचेचे तुकडे कच-यात टाकले होते. तो कचरा हाताळताना त्याच्या बोटाला चांगलेच कापले होते. पूर्ण गल्ली फिरून आला तरी रक्त थांबत नव्हते. त्याला बोट धुवायला पाणी व नंतर बोटाला लावायला अॅटिसेप्टिक क्रिम दिले होते. तेव्हा म्हणाला होता, केर द्यायला आले तेव्हा सगळ्यांना माझ्या बोटातून रक्त येत असल्याचे दिसले होते. पण सगळ्यांनी केर देऊन दार बंद केले. एवढीसुद्धा माणुसकी नाही लोकांमध्ये.

खरे तर माणुसकी हा खूप मोठा शब्द झाला. एवढीतेवढी मदत करण्याला माणुसकी म्हणायचे तर मग झालेच की.

२) माझ्या बहिणीची नाशिकची एक मैत्रिण अतिशय जिद्दीची आहे. तिच्या नव-याचा स्वत:चा व्यवसाय आहे. त्या नादात त्यांचा आधीचा एक व्यवसाय मागे पडला. त्याने सहज हिला म्हटले की तुला त्या व्यवसायाकडे लक्ष देता येते का पहा.

करावे म्हटले तरी तो व्यवसाय पडला मेटॅलर्जीतला. विविध उपयोगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे स्टील व इतर अॅलॉयीज वापरली जातात त्यांचे परीक्षण करून ती त्या उपयोगाची आहेत की नाहीत याचा अहवाल देण्याचे काम. म्हटले तर त्यावर थातुरमातुर उपाय करत ती या कामाला सुरूवात करू शकली असती.

या पठ्ठीने काम तर सुरू केलेच, जोडीला ए. एम. आय. इ. चा मेटॅकर्जीकल इंजिनीअरींगचा अभ्यासक्रमही पूर्ण केला.

कमाल असते लोकांची. व त्यांच्या जिद्दीची. निश्चय केला की वयाची भानगड कधीच मध्ये येत नाही.

३) शेतक-यांचा खरा कळवळा असलेले दिवंगत नेते शरद जोशी यांनी त्यांच्या खात्यात असलेल्या लाखो रूपयांच्या रक्कमेचा विनियोग त्यांचे सहकारी व शेतक-यांच्या उपयोगासाठी करण्याचे त्यांच्या इच्छापत्रात नमुद केलेले आहे.

माणूस एखाद्या ध्येयाला अंतर्बाह्य कसा वाहून घेऊ शकतो याचे यापेक्षा कोणते चांगले उदाहरण सापडेल?

४) ए-एक्स-एन च् एच.डी. वाहीनीवर आधुनिक शेरलॉक होम्सचे तीनही सिझन्स दाखवत आहेत. बेनेडिक्ट कंबरबॅचच्या चाहत्यांसाठी विशेषत: ही पर्वणीच चालू आहे.

या शेरलॉकने रॉबर्ट डाउनी ज्युनियरच्या शेरलॉकला जवळजवळ विस्मृतीत पाठवलेले आहे.

५) अफगाणिस्तानच्या दौ-यावरून परतताना पंतप्रधान मोदी अनपेक्षितपणे लाहोरमध्ये उतरले. यावर त्यांच्यावर टीकाही झाली. मात्र दोघांच्या प्रतिक्रिया सारख्या होत्या. मोदी पाकिस्तानातून दाऊद इब्राहिमला आणणार असतील तर त्यांच्या पाकिस्तान भेटीचे स्वागत आहे अशी ती प्रतिक्रिया होती. एक बरळु राउत यांची तर दुसरी आझम खान यांची. आणखी काही बोलण्याची गरज आहे?

६) पुण्यातील सीओइपी या प्रसिद्ध अभियांत्रिकी कॉलेजकडे स्वत:चा खासगी बोटक्लब आहे. अशी कॉलेजेस विरळाच. मात्र रोईंग, कयाकिंग जेथे करायचे ते पाणी अतिशय प्रदुषित, म्हणजे अगदी किळस येईल इतके घाण.

एकदा मुले रोईंगचा सराव करत होती तर वल्ह्याला काहीतरी अडले, वल्हे नीट फिरले नाही तर बोटीचा तोलही जातो. वल्हे कशाला अडले हे मुलांनी पाहिले तर एक प्रेत तरंगत वर आले. मुले अतिशय हादरली. पण पटकन पळून जावे तरी कोठे जावे? कारण बोट त्या अतिशय घाण पाण्यात आणि पाण्यामध्येही ही अशी भयंकर कंपनी.

मुलांनी प्रसंगावधानाने बोट किना-याला आणली. नंतर रीतसर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. ही गोष्ट सुमारे पंचवीस वर्षांपूर्वीची.

अजुनही परिस्थितीत काहीही बदल झालेला नाही. तेच घाणेरडे पाणी. डेंगी किंवा कमीत कमी मलेरियाची खात्री देणारे प्रचंड संख्येने असलेले डास अशा अतिशय सुंदर वातावरणात मुले आपला छंद जोपासतात.

७) थंडी पडली तर ज्वारीवर चिकटा पडतो. पण तीच थंडी गव्हाला पोषक ठरते.

आणि आभाळ आले तर ज्वारीच्या कणसात दाणा भरतो, तर गव्हावर तांबोरा पडतो.

या दरम्यान पाऊस पडला तर सगळेच कल्याण.

यातून जे हाताला लागेल ते लागेल, असे चाललेले असते.

एकाला जे भावू शकते तो दुस-याला शाप.

हीच जगरहाटी म्हणायची का?

राजेश कुलकर्णी Sun, 27/12/2015 - 23:43

In reply to by राजेश कुलकर्णी

फुसके बार - २८ डिसेंबर २०१५
.
१) हौशी रिक्षावाले व चित्रपटगृहमालक

काही रिक्षावाले हौशी असतात. गि-हाइकांकडून मिळणा-या पैशामधूनच काही रक्कम ते रिक्षा सजवण्यासाठी व ती सजलेली राहण्यासाठी खर्च करतात.

अलिबागमध्ये एका चित्रपटगृहात सध्या बाजीराव-मस्तानी हा सिनेमा दाखवला जात आहे. तेथील मालकांनी या निमित्ताने बाजीरावाचे पूर्ण आयुष्यच उलगडेल असे देखावे तेथे उभारले आहेत. ते सारे पाहण्यासाठी सिनेमा सुरू होण्याच्या आधी खास थोडा वेळ काढून या असे आवाहन ते करत आहेत. चित्रपटातून मिळणा-या उत्पन्नातूनच ते हे करत असावेत. ते केले नसते तरी ज्यांना सिनेमा पहायचा आहे ते प्रेक्षक तेथे आलेच असते.

तरी हा अवांतर खर्च करण्यामागे कोणती अंतर्प्रेरणा असावी?

२) जेटलींना क्लीनचिट

केजरीवाल सरकारने दिल्ली क्रिकेट संघटनेच्या व्यवहारांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या त्रिसदस्यीय आयोगाने आपला आहवाल दिलाही. त्यात अरूण जेटलींना क्लीनचिट देण्यात आलेली आहे. अर्थात हा जेटलींवर बेछूट आरोप करणा-या केजरीवालांना मोठा धक्का मानला जात आहे.

आता कोठे हा आयोग नेमला होता आणि त्यांनी २३७ पानांचा अहवाल दिला देखील? कमालीची कार्यक्षमता म्हणायला हवी.

याच त्रिसदस्यीय आयोगाला महाराष्ट्रातील जलसंपदा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमले पाहिजे.

३) पुन्हा शनिशिंगणापूर

सामाजिक कार्यकर्त्या वर्षा देशपांडे यांनी शनिशिंगणापूरच्या चौथ-यावर जाऊन दर्शन घेतल्यावर सगळ्या महिला आनंदित होतील व त्यांना पाठिंबा देतील असे वाटले होते. पण झाले वेगळेच.

त्याची प्रतिक्रिया उमटली साता-याजवळच्या एका गावात. तेथील महिलांनी देशपांडे यांना नास्तिक ठरवत त्यांनी या धर्माच्या बाबतीत ढवळाढवळ करू नये असा ठराव मंजूर केला आहे.

४) मूर्ख चंद्रशेखर राव, त्याचा यज्ञ आणि अपशकून

तेलंगणाचा मूर्ख मुख्यमंत्री चंद्रशेखर राव २००० ब्राह्मणांनिशी सर्वत्र शांती व सदाचार प्रस्थापित होण्यासाठी यज्ञ करत आहे. याच मुर्खाने तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी हिंसक आंदोलन केले होते आणि आता वेगळे राज्य मिळाल्यावे हा यज्ञ करत आहे. हा किती मागासलेल्या मनाचा आहे याची कल्पना यावरून यावी. यज्ञानेच सगळे मिळणार असते तर त्याला तेलंगणाचा विकासही वेगळे न होता केवळ यज्ञ करूनच करून घेता आला असता की.

तर या यज्ञातल्या एका मंडपाला नुकतीच आग लागली. अर्थात चालू असलेला मूर्खपणा मुख्यमंत्र्यांचा असल्यामुळे ती लगेच विझवली गेली. पण आता हा अपशकून समजून त्याने आणखी मूर्खपणा करू नये म्हणजे मिळवली. नाहीतर त्या २००० ब्राह्मणांची काही खैर नाही.

५) स्वीडनमध्ये केवळ सहा तासांचा कामाचा दिवस करण्याचे सार्वत्रिक धोरण ठरत आहे. लोकांना दिवसातले आठ तास कामावर लक्ष केंद्रित करता येत नसल्याचे कारण यासाठी दिले जात आहे.

काही वर्षांपूर्वी फ्रान्समधील कामगार संघटनांनी असाच बदल तेथेही व्हावा यासाठी आंदोलन केल्याचे आठवते.

आपल्याकडेही कधी ना कधी याचे लोण येणारच आहे.

६) मागे आम्ही पॅरीसमध्ये असताना त्या दिवशी फारच ढगाळ वातावरन होते व तुफान पाऊस पडत होता. आयफेल टॉवरजवळ असताना त्याच वेळेस आपल्याकडच्या केसरी ट्रॅव्हल्सचा ग्रुप तेथे आला. त्या वातावरणात टॉवर कसा ठीक दिसणार? तरी ठरल्याप्रमाणे तेथे तासभर घालवून ग्रुप पुढच्या दिवशी दुसरा देश पाहण्यास पुढे गेलादेखील.

सात दिवसात सात देश अशी मौजेची जाहिरात या कंपन्या करतात व लोक त्याला बळी पडतातही.

मागे नायगारा धबधब्यापाशी पोहोचले असता चालूही न शकणा-या एक आजी बसमध्येच बसून राहिल्या होत्या. त्यांना नायगारा पाहता न आल्याचे दु:ख अजिबात नव्हते. उलट त्या खुश होत्या तेथेही कंपनीने जेवणासाठी पुरणपोळीची सोय केली होती.

धन्य असे पर्यटक.

७) माझ्या परिचयातील एकजण योरपमध्ये हॉलंडमध्ये काम करतो. तेथून भारतात येताना तो एकही बॅग चेक-इन करत नाही व त्याच्या हातातही लॅपटॉपच्या बॅगेशिवाय काहीही नसते.

यावरून तेथून निघताना तेथील इमिग्रेशनमध्ये त्याची हटकून चौकशी होते. की तू एवढ्या मोठ्या विमानप्रवासाला निघाला आहेस, तर तुझ्याजवळ अजिबातच काही सामान कसे काय नाही? त्या अधिका-यांना शंका की याचा दहशतवादी लोकांशी संबंध आहे की काय? प्रत्येक वेळी त्याला असे अडवून त्याची चौकशी केली जाते. तर हा पठ्ठ्या उलट त्यांनाच विचारतो, असे सामान बरोबर असणे कंपल्सरी आहे काय?

अखेर तो ज्या कंपनीसाठी तेथे काम करतो ते पाहून त्याला सोडून देतात. हा काही दाखवण्यासाठी का होईना, पण एक बॅग म्हणून जवळ ठेवत नाही.

राजेश कुलकर्णी Tue, 29/12/2015 - 04:02

फुसके बार - २९ डिसेंबर २०१५
हुरडा स्पेशल
.
१) हुरड्याबरोबर उसाचा रस हे कॉंबिनेशन फार छान असते. उसाच्या रसामध्ये लिंबाचा रस पिळणे जसे सामान्य समजले जाते, तसे आंबटपणाकडे झुकणारे दही घालून रस पिणे यातदेखील मजा असते.

तसा दही घातलेला उसाचा रस कोणी ऑफर केला तर त्याची चव घेण्याची भल्याभल्यांची हिंमत होत नाही. पण हे अतिशय सुरेख कॉंबिनेशन आहे.

२) मागे परळी वैजनाथला असताना गव्हाचा हुरडा खाल्ला होता. त्याला कोणास ठाऊक का पण ज्वारीच्या हुरड्याची सर येत नाही.

ज्वारीच्या हुरड्यासाठी सुरती, गुळभेंडी अशा काही खास जाती विकसित केलेल्या आहेत हे त्यामागचे कारण असावे.

३) पोटभर हुरडा खाऊन झाल्यावर पुन्हा जेवायला भूक कशी राहील अशे अनेकांना वाटते. मात्र हुरडा खाऊन झाल्यावर थोडीशी विश्रांती घेऊन शेतामध्ये थोडा फेरफटका मारला की आपोआपच भूक लागते.

शिवाय एरवी नाजूक आहार असलेल्यांनाही शेतातील वातावरणामध्ये पोटावरचा हा थोडा अत्याचार बादत नाही असा अनुभव आहे.

४) हुरड्याबरोबर चवीला म्हणून भाजलेले खारे दाणे, शेंगदाण्याची चटणी, त्याच भट्टीत उकडलेली कोवळी वांगी, थोडासा गुळ असे पदार्थ वापरण्याची प्रथा आहे.

पण त्याबरोबर फरसाणासारखा पदार्थ ऑड मॅन आउटसारखा ठरतो. थोडक्यात, हुरड्याबरोबर चवीसाठी केवळ शेतातून मिळालेले पदार्थच वापरले जावेत असा संकेत आहे.

५) काही वेळा हुरडा भट्टीतून (आगटीतून) काढून चोळून देणारे खाणा-यांची गंमत करायची म्हणून त्यांच्या हातावर गरमागरम हुरडा ठेवून तो हात मुद्दाम दाबतात. तो माफक चटका बसला तरी तो मनुष्य आपल्यासाठी थेट आगटीतून काढलेले कणीस हातावर चोळून हुरडा काढण्यासाठी किती कष्ट घेत आहे याची आपल्याला जाणीव होते. ही अर्थात गंमत असते.

भाजलेल्या ज्वारीच्या कणसातून हुरडा काढण्याच्या या पद्धतीचेही यांत्रिकीकरण जरूर करता येईल, मात्र त्यामुळे यातला मानवी स्पर्श कमी होईल किंवा नाहीसा होईल.

६) हुरड्याच्या वेळी चोळून झालेल्या कणसांमध्येही ज्वारीचे अनेक दाणे राहिलेले असतात. ही कणसे वाळवून बडवली की हे दाणे सुटे होतात. अशा वाळलेल्या हुरड्याचे दाणे दळून त्याचे पीठ म्हणजे हुरड्याची भाजणी केली की मग तिचा आस्वाद वर्षभर घेता येतो.

या भाजणीच्या पिठापासून केलेल्या थालपिटाच्या चवीला अप्रतिम याखेरीज दुसरा शब्द नसतो.

७) हुरड्यासाठी काढलेली कणसे जर कोवळी असतील तर त्यातून दाणे सुटे होऊन पडत नाहीत. तर तेच ज्वारीचा दाणा थोडा तरी जून झाला असेल तर तो आगटीत भाजला तरी कोवळा वाटत नाही.

त्यामुळे हुरड्यासाठी बरोबर वेळ साधावी लागते.

अमुकअमुक कोणासाठी थांबत नाही हे सांगणारी अनेक वाक्ये आहेत. हुरड्याची अचूक वेळही कोणासाठी थांबत नाही, हे त्यात घालायला हवे.

८) हुरड्याचा खरा अनुभव हा प्रत्यक्ष शेतातल्या वातावरणामध्येच घ्यायला हवा.

तसे न करता शहरांमध्ये आजकाल मिळणा-या पाकिटातला हुरडा खाणे म्हणजे स्टुडिओमध्ये सादर केलेल्या भांगड्याची वाहवा करण्यासारखे व त्यावरच समाधान मानण्यासारखे आहे.

राजेश कुलकर्णी Wed, 30/12/2015 - 09:07

फुसके बार - ३० डिसेंबर २०१५
.
१) शेतात पाणी इकडून तिकडे वाहवण्यासाठी पाट काढले जात. मोट वापरून विहिरीतून काढून या पाटांमध्ये सोडले जाई. आता बहुतेक ठिकाणी त्यांची जागा पंप व पीव्हीसी पाइप्सनी घेतली आहे.

शहरात राहणा-या माझ्या काही बहिणी एकदा शेतावर आल्या होत्या. पाटातल्या पाण्यात मनसोक्त डुंबणे हा प्रकार त्यांच्यासाठी अगदी अनोखा होता. भरपूर मजा करून तो कार्यक्रम संपला.

हद्द तेव्हा झाली जेव्हा पुण्याला परत आल्यावर त्या त्यांच्या मैत्रिणींना सांगत सुटल्या की त्यांनी गटारामध्ये मस्त आंघोळ केली.

२) असाच प्रकार मी मुंबईत असताना झाला होता. माटुंग्याच्या ब्राह्मणवाडी या चाळीमध्ये पेईंग गेस्ट म्हणून रहात असताना तेथे आखरी दॉंव या टीव्ही मालिकेचे शुटिंग झाले होते. फारूख शेख, दीप्ति नवल यांच्या भूमिका त्यात होत्या. आमची खोली उत्साही मालकीणबाईंनी दीप्ति नवलच्या मेकपसाठी दिल्याने दिवसातील काही वेळ आमची तेथून हकालपट्टी होत असे व त्याकाळात तेथे फिरकण्यास मनाई असे.

तर या मालिकेचे शुटिंग संपल्यावर एकदा दीप्ति नवलची मुलाखत वाचली होती. तिने सरळ असे विधान केले होते की माटुंग्याच्या एका झोपडपट्टीत या मालिकेचे शुटिंग झाले होते. बाईंच्या दृष्टीने झोपडपट्टी व चालांमध्ये काहीच फरक नव्हता तर.आमच्या मालकीणबाईंसह आमचे सर्वांचे विमान एकदम खाली आले. समस्त ब्राह्मणवाडीकरांनी अशा असंवेदनशील विधानांबद्दल तेथील फलकापुरता तिचा ‘जाहीर’ निषेध केला होता.

३) वर उल्लेख केलेल्या प्रसंगातील आमच्या मालकीणबाईंचे नाव होते यशोदाबाई परांजपे. त्यांना आक्का म्हणत. ऐंशीपेक्षा अधिक वय असावे. पण अतिशय बेरकी. म्हणजे पक्क्या.

वरच्या मजल्यावर एक जोशी म्हणून गृहस्थ रहात. का कोणास ठाऊक, ते फोन करण्यासाठी नेहमी आक्कांकडे येत. काळ्या तबकडीचा फोन होता तो. एस.टी.डी. फोन करून आक्कांना लोकल फोनचे पैसे देत. त्याबाबतीत माझ्यासारख्या तेथे पेईंगगेस्ट म्हणून राहणा-यांशी त्याबाबातीत संधान बांधायचा प्रयत्न करत. पण आक्का त्यांना ओळखून होत्या. ते किती नंबर डायल करतात याकडे त्यांचे लक्ष असे. स्थानिक नंबरपेक्षा अधिक नंबर डायल करूनही जोशी स्थानिक कॉलचे पैसे देऊ लागले की त्यांना बरोबर पकडत. जोशी ओशाळल्यासारखे करत आणि जास्तीचे पैसे देत. जोशींना आमच्यापैकी कोणी कधी म्हटले की या म्हाता-या बाईला असे फसवून तुम्हाला काय मिळते, की तुम्ही आज आला आहात, तुम्हाला ही बाई काय आहे हे माहित नाही असे नेहमी म्हणायचे. पण म्हणजे काय आणि काहीही असले तरी त्यांना फसवण्याचे समर्थन कसे होऊ शकते हे काही सांगायचे नाहीत.

४) ससा म्हटले की डोळ्यांसमोर कसे गोजिरे चित्र उभे राहते. पण एका शेतामध्ये सशांनी रात्रीतून हरभ-याच्या पिकाचा फडशा पाडल्याचे पाहिले. तेव्हा शेतक-यासाठी ससा हा कौतुकाचा विषय नसतो. काही शेतकरी ससे पकडण्याचे प्रशिक्षण दिलेली कुत्री पाळतात. ती लहान असतानाच त्यांना सशाच्या रक्ताचा वास दिला जातो. तो वास त्या कुत्र्याच्या लक्षात आयुष्यभर राहतो. त्यामुळे कुत्रे लहान असताना ते भलेही सशाला पकडू शकत नाही, पण त्या वासावरून सशाचा माग काढून जरूर देऊ शकते.

५) शेतीमध्ये एवढे सगळे प्रश्न असताना तुम्ही शेतीच्या मागे का लागता? एका शेतक-याला एका शहरी माणसाने गंभीरपणे विचारलेला प्रश्न.

शेतक-याचे उत्तर.

तुम्हाला भारताचा क्रिकेटचा संघ माहित आहे ना. तो कधी वाईट फलंदाजीमुळे हरतो, कधी वाईट गोलंदाजीमुळे हरतो, तर कधी वाईट क्षेत्ररक्षणामुळे. याशिवाय कधी टॉस जिंकण्यामुळे किंवा हरण्यामुळे तर कधी वाईट पंचगिरीमुळे. तरी भारताचा संघ कधीतरी जिंकेल या अपेक्षेने खेळत राहतोच ना?

त्याचप्रमाणे शेतकरीदेखील कधी अतिवृष्टीमुळे, कधी दुष्काळामुळे, कधी चांगला भाव न मिळाल्यामुळे, कधी बियाणे चांगले न मिळाल्यामुळे अशा कितीतरी कारणांमुळे नुकसानीत जातो. तोच शेतकरी हे सगळे नीट होईल आणि कधीतरी चांगला भाव मिळेल या आशेने शेती करतच राहतो.

पटते का?

६) हिमालयातील ट्रेकींगनंतर मुले पुण्यात परत आलेली.

त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या सॅक्स पाहता अपेक्षेप्रमाणे रिक्षावाल्यांनी वाटेल ते दर सांगायला सुरूवात केली. पुणे रेल्वे स्टेशनपासून कॅपमध्ये त्याच्या घरी जाण्यासाठी २०० रूपये मागितले. या मुलाने खास पुणेरी उत्तर दिले. की मी पुण्यातलाच आहे. की लगेच दोनशेचे शंभर झाले. मुलगा पुढे म्हणतो की तरीदेखील मी पुण्यातलाच आहे. की रिक्षावाला थेट पन्नासवर आला.

७) पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीच्या दिवसात देखावे पाहताना एकाचे वॉलेट चोरीला गेले. तीनशे रूपये गेले. देवदर्शनासाठी गेलेले असताना असे झाल्यामुळे त्याचा देवावरचा विश्वास उडाला.

त्यावरून त्याने एक गोष्ट लिहिली. त्या कथेला बक्षिस मिळाले. अडीचशे रूपयाचे.

त्याचा मित्र म्हणाला, बघ, तीनशे रूपये गेले त्याच्या बदल्यात अडीचशे मिळाले की नाही? म्हणजे देव आहे की नाही?

आता बोला.

अतिशहाणा Tue, 29/12/2015 - 22:40

In reply to by राजेश कुलकर्णी

७) पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. गणपतीच्या दिवसात देखावे पाहताना एकाचे वॉलेट चोरीला गेले. तीनशे रूपये गेले. देवदर्शनासाठी गेलेले असताना असे झाल्यामुळे त्याचा देवावरचा विश्वास उडाला.

त्यावरून त्याने एक गोष्ट लिहिली. त्या कथेला बक्षिस मिळाले. अडीचशे रूपयाचे.

त्याचा मित्र म्हणाला, बघ, तीनशे रूपये गेले त्याच्या बदल्यात अडीचशे मिळाले की नाही? म्हणजे देव आहे की नाही?

हे आवडले.

नितिन थत्ते Wed, 30/12/2015 - 07:06

In reply to by राजेश कुलकर्णी

>>तुम्हाला भारताचा क्रिकेटचा संघ माहित आहे ना. तो कधी वाईट फलंदाजीमुळे हरतो, कधी वाईट गोलंदाजीमुळे हरतो, तर कधी वाईट क्षेत्ररक्षणामुळे. याशिवाय कधी टॉस जिंकण्यामुळे किंवा हरण्यामुळे तर कधी वाईट पंचगिरीमुळे. तरी भारताचा संघ कधीतरी जिंकेल या अपेक्षेने खेळत राहतोच ना?

नै पण क्रिकेट संघाला हरल्यावरही पैसे मिळतातच. तसे शेतकर्‍याला पण मिळतातच का?

>>त्यांच्याकडे असलेल्या मोठ्या सॅक्स पाहता अपेक्षेप्रमाणे रिक्षावाल्यांनी वाटेल ते दर सांगायला सुरूवात केली. पुणे रेल्वे स्टेशनपासून कॅपमध्ये त्याच्या घरी जाण्यासाठी २०० रूपये मागितले. या मुलाने खास पुणेरी उत्तर दिले. की मी पुण्यातलाच आहे. की लगेच दोनशेचे शंभर झाले. मुलगा पुढे म्हणतो की तरीदेखील मी पुण्यातलाच आहे. की रिक्षावाला थेट पन्नासवर आला.

पण पण...... एवढं हिमालयात ट्रेकिंग करून आल्यावर पुणे ष्टेशनातून क्यांपात रिक्षाने?

'न'वी बाजू Fri, 01/01/2016 - 15:40

In reply to by राजेश कुलकर्णी

तर या मालिकेचे शुटिंग संपल्यावर एकदा दीप्ति नवलची मुलाखत वाचली होती. तिने सरळ असे विधान केले होते की माटुंग्याच्या एका झोपडपट्टीत या मालिकेचे शुटिंग झाले होते. बाईंच्या दृष्टीने झोपडपट्टी व चालांमध्ये काहीच फरक नव्हता तर.

बाईंचे नेमके काय चुकले, ते कळू शकेल काय?

नाही म्हणजे, चाळ आणि झोपडपट्टी यांच्यात नक्की काय फरक आहे, ते तपशीलवार विशद करू शकाल काय, कृपया?

किंबहुना, 'पांढरपेशा (आणि बहुतकरून - पण नॉट नेसेसरिली - निम्नमध्यम-ते-मध्यम-वर्गीय) सवर्णांची त्यातल्या त्यात पक्क्या बांधणीची झोपडपट्टी' अशी चाळीची व्याख्या का करता येऊ नये?

....................

आमचे हिशेबी 'वर्ग' हे सांपत्तिक स्थितीचे नसून मानसिकतेचे द्योतक आहे, याची कृपया नोंद घ्यावी.

नितिन थत्ते Fri, 01/01/2016 - 16:18

In reply to by 'न'वी बाजू

झोपडपट्टी म्हणजे राहण्याचा हक्क नसताना तेथे राहणार्‍यांची वस्ती असा अर्थ अभिप्रेत असावा. चाळीत अधिकृतपणे भाड्याने घर घेऊन लोक रहात असतात.

'न'वी बाजू Sat, 02/01/2016 - 14:06

In reply to by नितिन थत्ते

...'पांढरपेशा (आणि बहुतकरून - पण नॉट नेसेसरिली - निम्नमध्यम-ते-मध्यम-वर्गीय) सवर्णांची त्यातल्या त्यात पक्क्या बांधणीची अशी अधिकृत झोपडपट्टी' असे म्हटले तर?

राजेश कुलकर्णी Thu, 31/12/2015 - 09:39

फुसके बार - ३१ डिसेंबर २०१५
.
१) पाडगावकर गेले.

निखळ आनंदच स्वत: आज आपल्या आनंदयात्रेला निघून गेला. त्यांच्यासाठी तर शोकही करता येत नाही.

२) शेतक-यांकडून कळलेल्या काही गोष्टी

एक सत्य

जिरायती शेती करा – आहात त्यापेक्षा गरीब व्हा.

बागायती शेती करा – आहात त्यापेक्षा अधिक कर्जबाजारी व्हा.

आणि नुकतीच कळलेली म्हण.

माजला मराठा, धाडा राजकारणात
माजला बामण, धाडा शेती करायला

३) नाही म्हणायला महाराष्ट्रातले शेतकरी एका गोष्टीत तरी विक्रम करत आहेत.

पंढरपूर भागात पाण्यासाठी ३०० फूट, सोलापूर भागात ४०० फूट तर नळदुर्ग-उमरगा भागात ५५०-६०० फूट खाली जावे लागत आहे.

कोणास ठाऊक, या ड्रिलिंग कंपन्यांना एके दिवशी आणखी खोल जाता जाता तेलदेखील मिळेल.

फक्त सरकारने पाण्याच्या अनियंत्रित उपशाच्या नावाखाली या उद्योगावर बंदी आणू नये म्हणजे मिळवली.

४) आताच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत प्रचंड गैरव्यवहार झाल्याच्या बातम्या आहेत. विजयी होण्याकरता उमेदवारांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारांमध्ये वारेमाप पैशाचे वाटप केल्याच्या बातम्या आहेत.

ही विधानपरिषदेची भानगडच बंद केली तर? कितीतरी राज्यांमध्ये विधानपरिषदच नाही. त्यामुळे त्यांचे काही अडताना दिसते का?

नसेल, तर लोकशाहीवरची ही बांडगुळे का सांभाळावीत आपण?

५) कोलावरी डी या गाण्यानंतर आता शांताबाई हे सर्वाधिक निरर्थक गाजलेले गाणे आहे.

६) ३१ डिसेंबरला वर्षाच्या शेवटी दारूऐवजी दूध प्या वगैरे आवाहन केले जाताना दिसते. तसा या आवाहनाचा काही उपयोग नसतो. एरवी ‘छान’ वाटणारे अभय बंग दारूबंदीबद्दल सांगताना ऐकणे नकोसे वाटतात अनेकांना.

असो. वर्षभरात काहीही भरीव केलेले नसतानाही केवळ आपल्या जन्मदिवसाची तारीख आली या केवळ एका कारणाने अनेक लोक बरेच पेग आपल्या व इतरांच्या घशाखाली उतरवतात.

त्यामानाने एक वर्ष संपले यात तर आपले काहीही योगदान नाही. तरी आपल्याला दारूचे काहीतरी निमित्त हवे असल्याने ते साधता येते एवढेच.

७) ‘आभाळ पाठीवर घेऊन फिरणा-या हत्तींना विचारून पहा. तेही सांगतील, कोणीही कोणाचं नसतं’ अशा शब्दबंबाळ संवादांचे नाना पाटेकरांच्या नटसम्राटमध्ये काय होते ते पहायचे.

८) Gerard Depardieu (जेरार्द द्युपार्दू) हा प्रसिद्ध फ्रेंच अभिनेता फ्रान्समध्ये असलेल्या करविषयक कायद्यांना कंटाळून रशियात गेला व तेथील नागरिकत्व घेतले. मागे तो लाइफ ऑफ पाय या सुंदर सिनेमात अगदी छोट्या भुमिकेत दिसला होता.

परंतु आता तो स्टॅलिनवरील सिनेमामध्ये त्याची भूमिका करणार आहे. स्टॅलिनहा हिटलर, माओ व पॉल पॉट अशा क्रूरकर्म्यांच्या रांगेत बसणारा खलनायक होता. सदर सिनेमाचा विषय नक्की काय आहे ते कळलेले नाही.

गंमत म्हणजे त्यानेच यापूर्वी झारच्या काळातील रासपुटीनचीही भुमिका केली होती.

राजेश कुलकर्णी Thu, 31/12/2015 - 23:13

फुसके बार – ०१ जानेवारी २०१५

१) आपल्याला कविता करता येत नाही याचे कधीकधी फार वैषम्य वाटते. हेच पहाना, नववर्षदिन हा कोणीतरी ठरवलेल्या कालगणनेच्या पद्धतीतील एक दिवस आहे. त्यात विशेष ते काय? आपल्याला साजरे करायला कसले तरी निमित्त लागते. अर्थात कसे साजरे करतो हा मुद्दा वेगळाच.

आयुष्यातला प्रत्येक दिवस बोनस मिळाल्यासारखा साजरा करण्याच्याबाबतीत मात्र आपण इतके उदासिन असतो, की आयुष्य हे अतिशय बोअरिंग आहे यावर आपलाच विश्वास बसावा. मला वाटते, हेही एखादी गोष्ट कशी साजरी करायची याबद्दलच्या प्रत्येकाच्या मतावर अवलंबून असते. आणि त्याचे प्रतिबिंब सगळीकडे दिसते.

करायला काय, एखादा क्षणदेखील साजरा करता येतो.

२) दुस-यांचा द्वेष करून स्वत:ची झोळी भरणा-या या कर्मदरिद्र्यांबद्दल काय म्हणावे? अशा दिवट्यांचीच आज चलती आहे हे डॉ. आंबेडकरांचेच नाही तर आपलेही दुर्दैव म्हणायला हवे.

“गांधी सावरकर, टिळक आगरकर
आले गेले किती शंभर
सुटाबुटात शोभून दिसतोय सा-यात भीमराव एक नंबर”

ही त्या धन्य गाण्याची सुरूवात व त्याचे धृपद.

आनंद शिंदे यांच्या मर्यादा एव्हाना स्पष्ट झालेल्या आहेत. ते पोपट किंवा कोंबडी यांच्याबाहेर फार येऊ शकत नाहीत, किंबहुना त्यांचीच इच्छा नसावी. आता त्यांनी डॉ. आंबेडकरांना दावणीला बांधलेले आहे. आताचे हे गाणे म्हणजे त्यांच्या बेजबाबदारपणाचे निदर्शक आहे. आंबेडकरांचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी इतरांना खुजे दाखवण्याची आवश्यकता त्यांनाच माहित.

३) संस्कार म्हणजे अनेकदा देवादिकांच्या गोष्टी सांगितल्या जातात. क्वचित बोधकथांच्या माध्यमातूनही हे काम केले जाते. लहान मुलांना जवळ बसवून अशा कथा सांगणा-या आया आता जवळजवळ नाहीतच. त्याऐवजी खाली लिहिल्याप्रमाणे मुलांच्या हातात मोबाइल देणे सोपे झाले आहे.

मुलांमध्ये लहानपणापासूनच अंधश्रद्धांविरूद्ध जागरूकता निर्माण व्हावी म्हणून कोणी लेखक काही लिहित असल्याचे पाहण्यात आहे काय?

संस्कारांमध्ये अंधश्रद्धांना काही स्थान असू शकते काय?

४) इतर काही नाही तरी लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये ही गोष्ट त्यांच्या पालकांच्या हातात आहे. त्यावर सतत खेळत राहण्यामुळे डोळे लवकर खराब होतात यावर दुमत होताना दिसत नाही. मुलांना चांगले आयुष्य देण्यासाठी आपण त्यांना जन्माला घातले आहे, तेव्हा त्यांना मोबाइल फोनवर ‘अडकवून’ ठेवून आपली सोय साधण्याने आपण चांगले पालक नसल्याचेच सिद्ध होते.

आमचा बाळू किंवा बाळी एवढी लहान असूनही मोबाइल किती लीलया हाताळतो/ते, यात भूषण वाटण्यासारखे काही नाही. पुढे आयुष्यभर त्याला/तिला तेच करायचे आहे, हेच आपण विसरतो, आणि अशा गोष्टीतही आपण आपली सोय पाहतो.

५) छत्तीसगढमध्ये मागच्या सप्टेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपचे मुख्यमंत्री रमणसिंग व तेथील कॉंग्रेसचे मुख्य नेता अजित जोगी या दोघांमधील फोनवरील संभाषण प्रसिद्ध झालेले आहे. त्यात रमणसिंग यांचा मुलगा जोगींच्या मुलाला पैशांच्या बदल्यात कॉंग्रेसच्या उमेदवाराला माघार घेण्याबद्दल सांगत आहे.

प्रत्यक्षात कॉंग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली होती म्हणे. कॉंग्रेसच्या लाचखाऊ राजकारणाबद्दल काही बोलण्याची गरज नाही, पण चांगल्या प्रतिमेच्या रमणसिंग यांच्यासाठी व एकूणच भाजपसाठी ही अजिबात चांगली बातमी नाही.

६) कर्करोगापाठोपाठ अता मुत्रपिंडावरील उपचारांसाठी लागणा-या जनरिक औषधांवरील कर राज्य सरकारने माफ केलेला आहे. अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी याबाबतची घोषणा केली.

अशा चांगल्या बातम्यांची बातमी होत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

७) सोलापूरमधील बाळीवेसजवळील अंगराज या शाकाहारी रेस्टॉरंटमध्ये जेवण्याचा योग आला. ज्वारीच्या भाकरी एवढ्या पातळ की सिंहगडावरच्या रेस्टॉरंटवाल्यांनाही हेवा वाटावा. थापण्याऐवजी थोडी कणीक मिसळून लाटतात की काय असे वाटावे. त्याचबरोबर हवी असल्यास खाक-यासारखी वाळवलेली भाकरीही मिळते.

थाळीबरोबर ताक मिळत नाही. परंतु वेगळे हवे असल्यास एक लिटरची पाण्याची बाटली भरून ताक. छान कोथिंबीर व धण्या-जि-याचा स्वाद असलेले. तेथेच प्या किंवा बरोबर घेऊन जा.

दाण्याची चटणी ज्यांना आवडते यांच्यासाठी येथली थाळी ही मोठी पर्वणी आहे. येथे चटणी चमच्याने नाही तर डावाने वाढतात.

शहराला दर चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना पाण्याची गरज हे रेस्टॉरंटवाले कशी भागवत असतील कोणास ठाऊक.

+++++++++++++

फुसके बार ही मालिका मी पोस्ट केलेल्या ठिकाणाहून हलवू नये अशी विनंती मी संपादकांना अनेकदा केलेली आहे. तरीही ते या पोस्ट्स हलवून फुसके बारच्या इतर पोस्टबरोबर एकाखाली एक अशा पद्धतीने जोडत आहेत. ज्यांची इच्छा आहे त्या वाचकांनाही या पोस्ट वाचण्यात रस राहणार नाही हेदेखील मी त्यांना कळवलेले आहे. शिवाय ही एक प्रकारची सेंसॉरशिप असल्याचेही मी त्यांना कळवले आहे. एकीकडे ते सांगतात की पोस्ट्सची प्रतवारी ते करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र असा प्रकार चालू आहे.

परंतु संपादकांच्या द्ृष्टीने या पोस्ट्स म्हणजे निव्वळ खरडणे असल्यामुळे त्यांना वाचनव्हॅल्यु नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र हलवून एकत्र करण्याशिवाय पर्याय नाही. आता पुन्हा या पोस्ट्स स्वतंत्रपणे पोस्टकेल्यास त्या अप्रकाशित करू असे त्यांनी सांगितले आहे.

या सर्व बाबतींमध्ये त्यांचा हक्क असल्यामुळे त्याबाबतीत मी काही करू शकत नाही. त्यामुळे या पोस्ट्स यापुढे आपल्यासमोर येऊ शकतील की नाही किंवा नक्की काय होईल, हे सांगता येत नाही.

ऋषिकेश Thu, 31/12/2015 - 23:17

In reply to by राजेश कुलकर्णी

खिक!
म्हणून एक तारखेचा फुसका बार ३१लाच फोडलात! =))

==

असो. तुमचे लेखन उडवले जाणार नाहीये, ती सुचना नीट वाचा. लेखन या धाग्यावर हलवून नंतर मुळ धागा अप्रकाशित होईल. लेखन जस्सेच्या तस्से इथे सुरक्षित असेल.
जर ते वाचकांना आवडले तर ते इथे टाकले किंवा कुठेही टाकले- तरीही वाचले जाईल आणि त्यावर व्यवस्थित चर्चा होईल इतका माझा तरी ऐसीकरांवर विश्वास आहे!

बाकी चालु द्या! सुचना देऊनही नवे धागे काढलेत तर ते इथे हलवणे चालुच ठेवावे लागेल.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 01/01/2016 - 04:31

In reply to by राजेश कुलकर्णी

'ऐसी'वर धाग्यांची प्रतवारी होते; भरपूर सदस्यांना तो अधिकार आहे. त्यातून वाचनीय धागे वेगळे काढायची, आर्काईव्ह लरायची सोय आपसूक होते. बाकी वाचक लेखनाची स्तुती/निंदा प्रतिसादांत करतात ते निराळं.

अभ्या.. Fri, 01/01/2016 - 23:48

In reply to by राजेश कुलकर्णी

त्याचबरोबर हवी असल्यास खाक-यासारखी वाळवलेली भाकरीही मिळते.

वाळवलेली नसते कै. पातळ लाटून निखार्‍यावर भाजतात.

येथे चटणी चमच्याने नाही तर डावाने वाढतात.

चटणी एकदाच वाढली जाईल, नंतर चार्ज आकारला जाईल हा बोर्ड पाहिला नाही दिसतय.

शहराला दर चार दिवसांनी पाणीपुरवठा होत असताना पाण्याची गरज हे रेस्टॉरंटवाले कशी भागवत असतील कोणास ठाऊक.

त्यांची बोअरवेल आहे. बाकी शहराला दर दहा दिवसानी पाणीपुरवठा होईल अशी नोटीस आलीय सध्या.

आदूबाळ Fri, 01/01/2016 - 03:35

लहान मुलांच्या मोबाईल हाताळण्याबद्दल - मागच्या महिन्यातली एक घटना.

माझा आतेभाऊ आणि त्याचा चार वर्षांचा मुलगा दुचाकीवरून जात होते. सांडलेल्या ऑइलवरून गाडी घसरली, आणि आतेभावाचं डोकं आपटून तो बेशुद्ध पडला. मुलगाही पडला, पण त्याला फारसं काही लागलं नाही. पण बाबा पडलाय, रक्त वाहतंय आणि एकंदरीत घटनेमुळे तो जबरदस्त घाबरला होता.

मदतीला लोक धावले. त्यातल्या एकाला आतेभावाचा मोबाईल सापडला. त्याने तो मुलाला दिला, आणि मुलाने झटक्यात लॉक उघडून आईचा नंबर (फोटोवरून) शोधून तिला फोन लावला. पुढची सूत्रं अर्थातच भराभर हलली.

मोबाईलवरच्या "रागावलेल्या पक्ष्या"ने आतेभावाला वेळीच हात दिला!

नितिन थत्ते Fri, 01/01/2016 - 08:58

>>आंबेडकरांचे श्रेष्ठत्व दाखवण्यासाठी इतरांना खुजे दाखवण्याची आवश्यकता त्यांनाच माहित.

मला तर वाटलं या ओळीत आंबेडकरांना खुजे दाखवले आहे.

राजेश कुलकर्णी Sun, 03/01/2016 - 17:06

फुसके बार – ०३ जानेवारी २०१६

१) अमेरिकेतल्या साहिलचे आई-वडील तेथे स्वतंत्र व्यवसाय करतात व ब-याचदा घरून काम करतात. साहिलच्या घरात चित्रकला, स्थापत्य, मूर्तिकलेचे अनेक चित्रग्रंथ आहेत. त्यात मोने, वॉन गॉग, रोंदॉ असे प्रतिभावंत आहेत. लॉरा ही साहिलची बेबीसिटर. तिने दोन वर्षांच्या साहिलला एकेका चित्रावर बोट ठेवून मोने, रॉकवेल असे म्हणायला शिकवले आहे. त्याचे डॅडी त्याला चित्रे दाखवून रमवतात. एखादे चित्र आवडले की का सुरात दाद देतात, “ओहो, वॉव”. वसंत ऋतुतील एका दिवशी सारेजण नदीकाठच्या इटालियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. काचेच्या विस्तृत तावदानातून पलीकडच्या विलामेट नदीचे विस्तृत पात्र दिसत होते. पांढ-या शिडांच्या नावा तरंगत होत्या. नदीत आकाशातल्या ढगांचे प्रतिबिंब पडले होते. थोड्या वेळाने आकाशातले रंग बदलले, हलत्या पाण्यावर हलु मोडु जुळु लागले. उंच खुर्चीत बसलेला साहिल पुढ्यातले खाणे सोडून मोने मोने म्हणू लागला. आरंभी मोठ्यांच्या लक्षात आले नाही. घरी आल्यावर साहिलने चित्रांचा अल्बम उघडला आणि विशिष्ठ चित्रावर बोट ठेवले. चित्रात अगदी तसाच देखावा होता. कागदाच्या झेंड्यासकट. वा-यामुळे विस्कटलेला.

पद्मजा फाटक यांनी गर्भश्रीमंतीच्या झाडापाठोपाठ रत्नाचे झाड आपल्याला दिलेले आहे.

ज्या मुलांचे लहानपण अशा वातावरणात जाते ती किती नशीबवान?

अन्यथा आजचे बहुतेक आई-बाप मुलांना बिझी ठेवण्यासाठी त्यांच्या हाती व्हिडियो लावून मोबाइल फोन देतात.

आधुनिक आई-बाप. पण त्यांना आई-बापाची मूलभूत कर्तव्ये तरी समजतात असे वाटते का?

याच पुस्तकात सहज अंमलात आणता येतील अशी भरपूर आणखी उदाहरणे आहेत. अगदी भारतातलीदेखील.

वाचा जरूर.

२) पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावरील हल्ल्यामुळे पाकिस्तानला म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नवाझ शरीफ यांना अचानक भेटणारे आपले पंतप्रधान मोदी तोंडघशी पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. राजकारण्यांनी मधूनमधून कितीही चर्चेची नाटके केली तरी पाकिस्तान सरकारच्या नाकातली खरी वेसण ही तिथल्या लष्कराच्या ताब्यात आहे हे पुन:पुन्हा स्पष्ट होत आहे.

यावरचा उपाय म्हणजे यापुढे राजकारण्यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांच्या लष्करप्रमुखांनाही सामील करावे. त्यानंतरही भारतात दहशतवादी कारवाया झाल्याच तर पाकिस्तानातल्या परिस्थितीवर तेथील लष्कराचेही नियंत्रण नाही हे दाखवणेही पाकिस्तानच्या लष्करशहांना अवघड वाटणारे व लाजीरवाणे ठरेल.

अर्थात हाही उपाय बहुतेक फसेल. मात्र एक फायदा होईल, राजकारण्यांच्या भेटी तरी बंद होतील. कारण आता देशवासियांना द्यायला त्यांच्याकडे चर्चा, संबंध सुधारणे वगैरे पोकळ दावे नसतील. त्यामुळे सध्या चालू असलेली नाटके थांबून काही नवीन तरी निष्पन्न होऊ शकेल.

३) थंडीचे दिवस आले आणि स्टॅटिक चार्जमुळे शॉक बसण्याचे प्रकार सुरू झाले. त्यामुळे गाडीच्या दरवाजाचे धातुचे हॅंडल असो, धातुचे दरवाजे असोत किंवा पाण्याचा नळ असो, हात लावला की शॉक बसायचे प्रकार सुरू. रात्रीच्या वेळी हा शॉक बसतानाची वीज अगदी स्पष्ट दिसते. त्यामुळे असा हात लावायचा तर शॉक बसण्याची भीती. त्यामुळे भलेभलेही या प्रकारामुळे कॉन्शस झालेले दिसतात. कशाला हात लावण्यास टाळाटाळ होताना दिसली की समजायचे याला स्टॅटिक चार्जच्या शॉकची भीती वाटते आहे.

यावरचा सोपा उपाय म्हणजे ज्यांना हा त्रास होतो त्यांनी धातुच्या वस्तुंना बोटाना स्पर्श करण्याऐवजी हाताच्या तळव्याने स्पर्श करणे.

४) चने के पेड पर चढाना या अर्थाची म्हण मराठीतही आहे. या म्हणीचे मूळ भारतीयच आहे की भारताबाहेरचे?

५) कट्यार, दिलवाले, बाजीराव मस्तानी व आता नटसम्राट यांच्याकडून काहीही अपेक्षा नसताना आवर्जून पहावा असा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे.

आधुनिक शेरलॉक होम्सच्या चौथ्या सिझनचा पहिला भाग उपलब्ध झाला आहे.

६) आज शनिवार असूनही रेस्टॉरंटसमोरील गर्दी कमी होती. थंडीचा परिणाम म्हणावा की ३१ डिसेंबर नुकताच साजरा झालेला असल्यामुळे पुणेकरांनी चक्क ब्रेक घेतला?

अन्यथा शनिवार-रविवारी घरी जेवणे म्हणजे पाप समजणारे पुणेकर रेस्टॉरंटच्या रांगेत तास न तास घालवतील, पण घरी जेवणार नाहीत. असे बरेचसे पुणेकर चक्क घरात?

७) नियोजित साहित्यसंमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले खरे, आता त्याची प्रतिक्रियाही तशीच टोकाची होऊ लागली आहे.

साहित्य संमेलन उधळून लावण्यापासून स्वत: सबनीस यांना धमक्या येऊ लागल्या आहेत.

एकाचा निषेध करण्याचे धड समाधानही हे दुस-या बाजूचे लोक मिळू देत नाहीत. तर मग आपण तरी का कशाबद्दल वाईट मानून घ्यायचे?

+++++++++++++

फुसके बार ही मालिका मी पोस्ट केलेल्या ठिकाणाहून हलवू नये अशी विनंती मी संपादकांना अनेकदा केलेली आहे. तरीही ते या पोस्ट्स हलवून फुसके बारच्या इतर पोस्टबरोबर एकाखाली एक अशा पद्धतीने जोडत आहेत. ज्यांची इच्छा आहे त्या वाचकांनाही या पोस्ट वाचण्यात रस राहणार नाही हेदेखील मी त्यांना कळवलेले आहे. शिवाय ही एक प्रकारची सेंसॉरशिप असल्याचेही मी त्यांना कळवले आहे. एकीकडे ते सांगतात की पोस्ट्सची प्रतवारी ते करत नाहीत आणि दुसरीकडे मात्र असा प्रकार चालू आहे.
हा एक नवीन प्रकार आहे. येथे अशा प्रकारचे लेखन माझ्यातरी पाहण्यात नाही. तेव्हा या प्रत्येक पोस्टचे वेगळे अस्तित्व असू द्यावे अशी माझी विनंती होती.
परंतु संपादकांच्या द्ृष्टीने या पोस्ट्स म्हणजे निव्वळ खरडणे असल्यामुळे त्यांना वाचनव्हॅल्यु नाही. त्यामुळे त्यांना इतरत्र हलवून एकत्र करण्याशिवाय पर्याय नाही. आता पुन्हा या पोस्ट्स स्वतंत्रपणे पोस्टकेल्यास त्या अप्रकाशित करू असे त्यांनी सांगितले आहे.
या सर्व बाबतींमध्ये त्यांचा हक्क असल्यामुळे त्याबाबतीत मी काही करू शकत नाही. त्यामुळे या पोस्ट्स यापुढे आपल्यासमोर येऊ शकतील की नाही किंवा नक्की काय होईल, हे सांगता येत नाही.
त्याचप्रमाणे या हलवाहलवीला माझा विरोध असल्यामुळे (जरी त्याने काही फरक पडत नसला तरी) मी येथील कमेंट्सवर काही प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. तेव्हा वाचकांनी काही प्रतिक्रिया न देता हा मजकूर निव्वळ वाचला तरी ते माझ्या द्ृष्टीने पुरेसे आहे. पोस्ट्स वेगळ्या राहिल्या तर किती जणांनी वाचल्या एवढे तरी कळेल. त्या एकत्र केल्या तर तेही कळणार नाही. असो.

तसेही अशा पद्धतीने अडगळीत टाकल्या गेलेल्या खरडलेल्या मजकुराकडेही वाचकांचे लक्ष जातेच याची संपादकांना खात्री आहे - आवडते की नाही हा मुद्दा भलताच.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 03/01/2016 - 19:12

In reply to by राजेश कुलकर्णी

काल शनिवार असूनही संध्याकाळी पाचच्या सुमारास आमच्या आॅस्टिनमधल्या शेकडो न्हावी दुकानांपैकी घराजवळच्या दुकानात गर्दी कमी होती. मला पंधरा मिनिटंच वाट बघावी लागली. कसं ना!

आणि हो, मी काल केस कापले. ते सांगायचंच राहिलं.

'न'वी बाजू Sun, 03/01/2016 - 22:51

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्य तुम्ही, धन्य तुमचा/ची तो/ती न्हावी(ण) आणि धन्य तुमचे ते केस.

.शुचि. Mon, 04/01/2016 - 20:50

In reply to by राजेश कुलकर्णी

तसेही अशा पद्धतीने अडगळीत टाकल्या गेलेल्या खरडलेल्या मजकुराकडेही वाचकांचे लक्ष जातेच याची संपादकांना खात्री आहे

लक्ष जाते. "फुसके बार" मी नियमित वाचते

ऋषिकेश Tue, 05/01/2016 - 09:03

In reply to by राजेश कुलकर्णी

स्क्रोल करायची गरज नाही. मुख्य ट्रॅकरवर १ नवीन, २ नवीन, 'क्ष' नवीन इत्यादी असे जे लिहिलेले असते. तिथे क्लिक केल्यावर थेट नव्या प्रतिसादाकडे वाचक जाऊ शकतात. शिवाय नव्या प्रतिसादांपुढे 'नवीन' असे लिहिलेले येते. शिवाय प्रतिसाद दिल्यावर धागा ट्रॅकरच्या वर येतो.
त्यामुळे जरी धागा तोच नसला तरी वाचक तुमचे नवे लेखन व तुम्ही त्यांचे नवे प्रतिसाद तितक्याच सहज शोधु शकता (जितके नव्या धाग्यावर)

राजेश कुलकर्णी Mon, 04/01/2016 - 11:18

फुसके बार – ०४ जानेवारी २०१६

१) राज्यात अनेकांना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मद्याची गरज पडणार आहे. अण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे आधीच्या सरकारने एका वेळी जवळ बाळगायची मद्याची मर्याचा दोन युनिट्सवर आणली होती. ही मर्यादा आताच्या सरकारने बारावर नेली आहे. त्यासाठीची अट मात्र अशी आहे की त्या व्यक्तीला तिच्या आरोग्यासाठी देशी/विदेशी मद्य बाळगण्याची गरज आहे असे प्रमाणपत्र डॉक्टरांकडून मिळवावे लागणार आहे. केवढी अवघड अट आहे ना?

आपले हसतमुख मुख्यमंत्री फडणवीस याचे समर्थन कसे करतात पहावे लागेल. खडसेंकडून कसलीच अपेक्षा नाही.

त्या अण्णा हजारे व अभय बंग यांनी डोक्यावर हात मारून घेतला असेल. याचसाठी केला होता का हा अट्टाहास?

२) परस्युट ऑफ हॅपीनेस या सिनेमात विल स्मिथच्या मागे दारिद्र्याचे दशावतार लागलेले असतात. तो या दारिद्र्यातून येणा-या हतबलतेचा हिंमतीने मुकाबला करत असतो आणि तो ज्या कंपनीत हंगामी स्वरूपात काम करत असतो तेथेच त्याला नोकरीचा देकार मिळतो.

इतकी वर्षे दारिद्र्य सोसलेले आणि आता ही नोकरीची ऑफर त्याचे भविष्य कायमचे बदलणार असते. पण हे त्याला कंपनीकडून इतके अनपेक्षितपणे कळवले जाते की त्याला आनंदही व्यक्त करता येत नाही. शिवाय तो आनंद व्यक्त करण्याकरता त्याच्याजवळ त्याच्या छोट्या मुलाशिवाय कोणीच नसते. तो ऑफिसमधून बाहेर पडल्यावर त्याचा आनंद कसा व्यक्त करतो हे पाहण्यासाठी हा सिनेमा पाहणे आले.

एरवीही हा चित्रपट अतिशय सुंदर आहे. प्रामाणिक व धडपड्या माणूस.

३) दापोलीजवळ एका जोडप्याने पॅरासेलिंग करत हवेत असताना एकमेकांना अंगठ्या घातल्याची बातमी वाचली. माझ्या एका मित्राच्या अनुभवाची आठवण आली. हा अनुभव मात्र एकदम विपरित.
तो फुकेतमध्ये असताना तेथील समुद्रात पत्नीसह पॅरासेलिंग करायला गेला होता. समुद्रातील तरंगणा-या प्लॅटफोर्मवर उभे राहून आपल्या कमरेला बांधलेला दोर एका मोटरबोटीतून ओढतात. त्यामुळे आपणही त्या प्लॅटफॉर्मवरून पुढे ओढले जातो. प्लॅटफॉर्म सोडेपर्यंत पुरेसा वेग गाठलेला असल्यामुळे पॅराशूट आपल्याला हवेत नेते.

या दोघांच्या बाबतीत काय झाले कोणास ठाऊक, कदाचित दोघांचे मिळून वजन अधिक झाले असेल, पण प्लॅटफॉर्म सोडल्यावर त्यांचे पॅराशूट हवेत जाण्याऐवजी त्याच्यासह हे दोघेही पाण्यात म्हणजे समुद्रातच पडले. बायकोला पोहोता येत नव्हते, शिवाय पॅराशूटच्या दो-यांमध्ये हात पाय अडकल्याने याच्या हालचालीवर मर्यादा आल्या. त्यात बायकोने याला घट्ट पकडून ठेवले. बाका प्रसंग आला होता.

काय झाले ते कळल्यावर किना-यावरून दोन पाण्यातल्या स्कुटर्स लगेचच यांना वाचवण्यासाठी निघाल्या. पण हिने त्याला धरून ठेवलेले व आता आपल्या मुलांचे कसे होणार हाच कायम धोशा लावलेला. ते कोस्टगार्डस तिला काही सांगत होते, पण ही ऐकण्याच्या स्थितीत होती कोठे? अखेर एकाने तिच्या कानफाडीत एक जोरात मारली. तेव्हा कोठे ती भानावर आली. आधी तिला घेऊन ते किना-यावर गेले. नंतर यालाही नेले.

या अनुभवानंतर ती त्याला समुद्राच्या पाण्याजवळही जाऊ देत नाही. आणि अर्थातच स्वत:ही जात नाही.

४) मागे अबुधाबीमध्ये असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळाची सत्यनारायणाची पूजा सांगणा-याने म्हणजे या किश्श्याच्या नायकाने अचानक असहकार पुकारला. त्याचे कारण काय, तर मंडळाच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्याचा कार्यक्रम होता. व आपल्या नायकाच्या पत्नीला त्या नृत्यात भाग घ्यायचा होता. पण नृत्यदिग्दर्शकाने सांगितले की तुम्हाला त्या नृत्यातल्या स्टेप्स जमणार नाहीत, त्यामुळे तुम्हाला त्या कार्यक्रमात घेऊ शकणार नाही.

झाले. नायकाची पत्नी आधी नृत्यदिग्दर्शकावर रूसली. म्हणाली, हरकत नाही, मग मी नृत्यादरम्यान तशीच स्टेजवर उभी राहिन. दिग्दर्शकाने तेही साफ नाकारले. असे कसे नुसतेच स्टेजवर उभे राहणार? मग ती तिच्या नव-यावर म्हणजे नायकावर रूसली. मग नायकाने त्याच्याकडचा हुकुमाचा एक्का बाहेर काढला. दुस-या दिवशी पूजा होती. ह्याने अल्टिमॅटम दिला की माझ्या बायकोला नृत्यामध्ये घ्या, नाहीतर मी पूजा सांगणार नाही. तरीही नृत्यदिग्दर्शक बधेना.

मग ऐनवेळी दुसरे कोण पूजा सांगू शकेल याचा शोध सुरू झाला. मला विचारले. मी म्हटले की मी याआधी कधी केलेले नाही.पण पोथी असेल तर मी वाचून दाखवू शकेन. मला पोथी दिली. ती नेमकी संस्कृतमध्ये. ऐनवेळी पूजा सांगताना काही संस्कृत शब्द माहित नसतील तर पंचाईत नको, म्हणून आदल्या दिवशी रंगीत तालीम केली.

आपल्या नायकाची कल्पना अशी की त्याने अचानक नाही म्हटले म्हणून मंडळ नमेल. पण मी पूजा वाचून दाखवली. त्यामुळे नृत्याचा कार्यक्रमही अडथळ्यावाचून पार पडला.

काही दिवसांनी नायक मला भेटला व विचारले की मी यातले काही शिक्षण घेतले आहे का? त्याला म्हटले काळजी करू नकोस. फक्त पुढच्या वर्षी रूसून बसू नकोस, पोथी सांगण्याचा हक्क तुझा तुला परत मिळेल.

राजेश कुलकर्णी Tue, 05/01/2016 - 03:13

फुसके बार – ०५ जानेवारी २०१६

१) सुब्रमण्यम स्वामींच्या आवडत्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे कोणतीही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण न होता, खरे तर नापास होऊनदेखील, नेहरूंना पंडित असे म्हटले जाते. मात्र डॉ. आंबेडकर स्वत:च्या हिंमतीवर शिकून, अनेक अडचणींना तोंड देत एवढे शिकले, त्यांचा तशा आदराच्या उपाधीने उल्लेख मात्र कॉंग्रेस विशेषत्वाने करत नाही. शिवाय कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचाच प्रयत्न केला होता.

या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांना पंडित आंबेडकर म्हणायला सुरूवात केली तर किती भिंतींना तडे जातील? त्यांनी त्यांचे पांडित्य सिद्ध केलेले नाही असे म्हणायची कोणाची प्राज्ञा आहे काय?

२) फेसबुक आणखी लोकप्रिय करायचे असेल तर लोकांना मिळणा-या लाईक्सच्या संख्येप्रमाणे त्यांचे पृथक्करण करण्याची पद्धत फेसबुकने सुरूवात करावी. काही लोक एकवेळ नोक-या सोडून देतील व लाइक्सच्या मागे लागतील अशी परिस्थिती उद्भवेल.

एलआयसी एजंट्सना जसे करोडपती वगैरे म्हणून संबोधले जाते तसे फेबुकरांना संबोधण्याची पद्धत सुरू होईल. हो, तो ना, लखलाइकी आहे, वगैरे.

३) मागे मी उल्लेख केला होता की रातोरात श्रीमंत व्यायचे असेल तर पाण्यापासून हायड्रोजन निर्माण करण्याची अभिनव व फायदेशीर पद्धत शोधून काढणे (हे जगभरासाठी) अथवा महिलांची मासिक पाळी तपासण्याचे स्कॅनिंग मशिन शोधणे (हे कदाचित भारतापुरते) हे उपाय होऊ शकतील.

या शोधांच्या जोडीलाच अंधश्रद्धामीटर नावाचे यंत्र किंवा तंत्र; जे माणसाला पाहिल्या-पाहिल्या किंवा हे अगदीच अशक्य असेल तर रक्त तपासून म्हणा किंवा इतर कोणत्या पद्धतीने तो किती अंधश्रद्ध आहे व त्याच्यात कोणकोणत्या अंधश्रद्धा ठासून भरलेल्या आहेत, कोणत्या अंधश्रद्धांच्या बाबतीत तो काठावर आहे याचा रिपोर्ट देईल; शोधायला भरपूर वाव आहे.

त्यावरून त्या व्यक्तीचा अंधश्रद्धा कोशंट (superstition index or superstition quotient) काढून पुढे त्याचे काय करायचे कि्वा अगदीच गॉन केस आहे का ते ठरवता येईल.

याचेच पुढील स्वरूप म्हणजे पुरोगामीमीटर हे यंत्रही शोधता येईल. यातली गोची एवढीच की कोणतेही असे यंत्र शोधताना त्याचे कशाबरोबर तरी कॅलिब्रेशन करावे लागते. आज पुरोगामी या शब्दाचे इतके वेगवेगळे अर्थ सांगितले जातात की त्यामुळे एक तर या यंत्राचा काटा फारच हेलकावे खाईल व यंत्र पहिल्या तपासणीतच निकामी होऊन जाईल किंवा अगदी चुकीचे रिडिंग दाखवेल. त्यामुळे हा शोध लावण्यापूर्वी आधी या शब्दाचा खरा अर्थ शोधायला हवा.

बघा बसल्याबसल्या तुम्हाला करोडपतीच काय, एकावरची शुन्येही मोजता येणार नाहीत एवढ्या संपत्तीचा धनी होण्यासाठीच्या संधी, आयडिया देत आहे. आता तरी लागा कामाला.

मागे मी ओबेसिटी टॅक्स लावण्याची सूचनाही केली होती. अजूनही ती कल्पना अंमलात आलेली नाही. आगामी बजेटच्या आधी ती आपल्या अर्थमंत्र्यांकडे पोहोचवायला हवी.

४) माझ्या मावशीचे यजमान एकदम जॉली होते. मागे त्यांची एक आठवण सांगितली होती. एखादा स्वयंपाकातला पदार्थ अगदी चांगला झाला तर ते गंमतीने म्हणायचे, की आज आमची ही घाईत असल्याने तिला तो बिघडवायला सवडच झाली नाही.

मुंबईत ते रहात असलेल्या इमारतीतल्या माने नावाच्या एका गृहस्थांनी त्यांच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट विकून त्याच इमारतीत तळमजल्यावरील फ्लॅट घेतला. त्यांना ते म्हणत, अहो माने हे काय केलेत तुम्ही? कोणी तुमच्या फ्लॅटचा पत्ता विचारला तर पूर्वी मी अभिमानाने मान वर करून सांगू शकायचो. आता मला तुमच्यामुळे मान खाली घालावी लागते.

५) काल पुण्याजवळ पार पडलेल्या संघाच्या शिवशक्तीसंगम या मेळाव्याबद्दल एक वेगळी पोस्ट टाकतच आहे. मात्र या मेळाव्याला लाखापेक्षा अधिक स्वयंसेवक व नागरिक आल्याचे सांगितले जाते.

गर्दीकडे नजर टाकून किती लोक आहेत याचा अंदाज सांगणा-या लोकांचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.

आमची तीन-चारशे लोकांच्या समुहाचा अंदाज सांगण्याचीही मारामार, हे लोक मात्र खात्रीपूर्वक सांगतात दहा हजाराच्या खाली काही मरण नाही. हे साठेक हजार असणार बघ. केवढा हा आत्मविश्वास! कधीकधी वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे अंदाज ऐकले की बिरबल व झाडावरील कावळ्यांच्या गोष्टीची आठवण हमखास येते.

६) साहित्यसंमेलनाध्यक्ष होण्याकरता आगामी संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी कोणकोणत्या हिकमती केल्या याची जंत्रीच चपराक या साप्ताहिकाचे संपादक घनश्याम पाटील यांनी दिली आहे.

हे लेखन काही दैनिकांमध्येही प्रसिद्ध झाल्याचे कळते. तेव्हा त्याच्या सत्यतेविषयी शंका नसावी. त्यातील तपशील पाहता हिकमती हा शब्दही अपुरा पडावा, असे तुम्हालाही वाटेल.

'कुत्र्याला खीर पचली नाही' अशा या लेखाच्या शीर्षकावर जाऊ नका. लेख वाचा.

http://dakhalpatra.blogspot.in/2016/01/blog-post.html

अस्वल Tue, 05/01/2016 - 02:59

In reply to by राजेश कुलकर्णी

६. शेवटली ब्लॉगची लिंक बघून मला वाटलं तुम्ही नवीन ब्लॉग चालू केलात.
घोर आणि थोर निराशा except -

पुण्यात सबनीसांना गाडीवर घेऊन भेटीगाठीसाठी फिरायचो. (त्यातही त्यांच्या पत्नी सौभाग्यवती ललिताताई त्यांना कधी एकटे सोडत नाहीत आणि सबनीसांना मी दुचाकीवरून कुठे नेले तर ते ‘साडी नेसलेल्या’ बायकांप्रमाणे एका बाजूने बसतात; हे फार अवघड असते.)

हे रत्न ब्लॉगमधे सापडलं.

१. असू शकेल.
२. बरं.
३. मीही हे मागेच वाचलं होतं.
४. ओके. माझ्या मावशीचे यजमान पकाव आहेत त्यामानाने.
५. चालेल.

.शुचि. Tue, 05/01/2016 - 19:57

In reply to by राजेश कुलकर्णी

पण जर संपादक मंडळी "फुसके बार" हा धागा वेळोवेळी एकाच धाग्यावरती हलवत असतील तर राकु, तुम्ही नवा नवा धागा काढताच कशाला? तुम्हीच तो मेन धागा "अपेन्ड" करा ना. मला समजतच नाही तुमचा हट्ट का?
____

गर्दीकडे नजर टाकून किती लोक आहेत याचा अंदाज सांगणा-या लोकांचे मला नेहमीच कौतुक वाटत आलेले आहे.

:D

नितिन थत्ते Tue, 05/01/2016 - 13:47

In reply to by राजेश कुलकर्णी

>>कोणतीही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण न होता, खरे तर नापास होऊनदेखील, नेहरूंना पंडित असे म्हटले जाते.

पंडित म्हणण्याविषयी काही मत नाही. पण कोणतीच परीक्षा उत्तीर्ण न होता आणि नापास होऊनदेखील याबाबत शंका आहे. आझाद हिंद सेनेच्या जवानांवर राजद्रोहाचे खटले भरले गेले तेव्हा भुलाभाई देसाई आणि तेजबहादूर सप्रू यांच्याबरोबर जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकिलपत्र घेतले होते. त्यावेळी भारतात इंग्रजांचे राज्य होते हे लक्षात घेता इंग्रज सरकारने वकीलीची परीक्षा पास झालेले नसताना त्यांना वकील म्हणून उभे राहू दिले असते हे संभवत नाही.

बाकी सुब्रह्मण्यम स्वामींचे आरोप बेफाम असतात हे सर्वच जाणतात.

'न'वी बाजू Tue, 05/01/2016 - 18:59

In reply to by राजेश कुलकर्णी

१) सुब्रमण्यम स्वामींच्या आवडत्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे कोणतीही महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण न होता, खरे तर नापास होऊनदेखील, नेहरूंना पंडित असे म्हटले जाते. मात्र डॉ. आंबेडकर स्वत:च्या हिंमतीवर शिकून, अनेक अडचणींना तोंड देत एवढे शिकले, त्यांचा तशा आदराच्या उपाधीने उल्लेख मात्र कॉंग्रेस विशेषत्वाने करत नाही. शिवाय कॉंग्रेसने जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्यांना राजकीयदृष्ट्या नामोहरम करण्याचाच प्रयत्न केला होता.

नेहरूंना (ज.ला. काय किंवा त्यांचे ती. मो.ला. काय) पं. जे म्हणतात, ते त्यांना ती पदवी (एखाद्या विषयातील प्रावीण्याप्रीत्यर्थ) कोणी बहाल केली, म्हणून नव्हे, तर हे दोन्ही सद्गृहस्थ जातीने कश्मीरी ब्रा. होते, नि त्या जातीतील पुरुषांस पं. असे संबोधण्याची प्रथा आहे, एतदर्थ.

एखादा शीख पुरुष सैन्यदळातील एखाद्या तुकडीचा प्रमुख नसला, भले सैन्यातही नसला, ट्याक्सीचालक जरी असला, तरी (१) तो शीख आहे, आणि (२) तो पुरुष आहे, एवढ्याच बाबींच्या आधारावर त्यास सरदारजी असे संबोधले जावे, अशी प्रथा एवं संकेत आहे, तद्वत.

या परिस्थितीत डॉ. आंबेडकरांना पंडित आंबेडकर म्हणायला सुरूवात केली तर किती भिंतींना तडे जातील? त्यांनी त्यांचे पांडित्य सिद्ध केलेले नाही असे म्हणायची कोणाची प्राज्ञा आहे काय?

डॉ. आंबेडकरांचे पांडित्य वादातीत आहे. या कारणास्तव त्यांस पंडित अशी पदवी बहाल केली गेल्यास त्यात काहीच गैर नसावे.

मात्र, आजतागायत कोणत्याही विद्यापीठाने अथवा त्यांच्याइतक्याच तोलामोलाच्या कोणत्याही व्यक्तीने (रवींद्रनाथ आणि गांधीजी यांनी एकमेकांस महात्मा आणि गुरुदेव अशा पदव्या बहाल केल्या होत्या, तद्वत) त्यांना ही पदवी बहाल केलेली नसल्याने (तुम्ही किंवा मी देऊन काय उपयोग? तितकी आपली काय औकात?) त्यांना अधिकृतरीत्या तसे संबोधता येत नाही, इतकेच.

त्याऐवजी तूर्तास तरी ब्या. किंवा डॉ. या त्यांच्या अधिकृत पदव्यांनी त्यांस संबोधू. कसे?

राजेश कुलकर्णी Tue, 05/01/2016 - 20:45

In reply to by राजेश कुलकर्णी

How to become a billionaire
.

मागे मी उल्लेख केला होता की रातोरात श्रीमंत व्यायचे असेल तर पाण्यापासून हायड्रोजन निर्माण करण्याची अभिनव व फायदेशीर पद्धत शोधून काढणे (हे जगभरासाठी) अथवा महिलांची मासिक पाळी तपासण्याचे स्कॅनिंग मशिन शोधणे (हे कदाचित भारतातल्या मंदिरांपुरते) हे उपाय होऊ शकतील.

या शोधांच्या जोडीलाच अंधश्रद्धामीटर नावाचे यंत्र किंवा तंत्र; जे माणसाला पाहिल्या-पाहिल्या किंवा हे अगदीच अशक्य असेल तर रक्त तपासून म्हणा किंवा इतर कोणत्या पद्धतीने तो किती अंधश्रद्ध आहे व त्याच्यात कोणकोणत्या अंधश्रद्धा ठासून भरलेल्या आहेत, कोणत्या अंधश्रद्धांच्या बाबतीत तो काठावर आहे याचा रिपोर्ट देईल; शोधायला भरपूर वाव आहे.

त्यावरून त्या व्यक्तीचा अंधश्रद्धा कोशंट (superstition index or superstition quotient) काढून पुढे त्याचे काय करायचे किंवा अगदीच गॉन केस आहे का ते ठरवता येईल.

याचेच पुढील स्वरूप म्हणजे पुरोगामीमीटर हे यंत्रही शोधता येईल. यातली गोची एवढीच की कोणतेही असे यंत्र शोधताना त्याचे कशाबरोबर तरी कॅलिब्रेशन करावे लागते. आज पुरोगामी या शब्दाचे इतके वेगवेगळे अर्थ सांगितले जातात की त्यामुळे एक तर या यंत्राचा काटा फारच हेलकावे खाईल व यंत्र पहिल्या तपासणीतच निकामी होऊन जाईल किंवा अगदी चुकीचे रिडिंग दाखवेल. त्यामुळे हा शोध लावण्यापूर्वी आधी या शब्दाचा खरा अर्थ शोधायला हवा.

बघा बसल्याबसल्या तुम्हाला करोडपतीच काय, एकावरची शुन्येही मोजता येणार नाहीत एवढ्या संपत्तीचा धनी होण्यासाठीच्या संधी, आयडिया देत आहे. आता तरी लागा कामाला.

मागे मी ओबेसिटी टॅक्स लावण्याची सूचनाही केली होती. अजूनही ती कल्पना अंमलात आलेली नाही. आगामी बजेटच्या आधी ती आपल्या अर्थमंत्र्यांकडे पोहोचवायला हवी.

.शुचि. Tue, 05/01/2016 - 19:48

In reply to by राजेश कुलकर्णी

मागे मी ओबेसिटी टॅक्स लावण्याची सूचनाही केली होती.

याचं कारण कळेल का? का ओबीस लोक जास्त जागा व्यापतात, अडवतात म्हणून?

राजेश कुलकर्णी Tue, 05/01/2016 - 20:19

In reply to by अतिशहाणा

काही जणांच्या जीन्समध्येच जाडपणा असतो. तो काही केल्या कमी होत नाही. मात्र इतरांमध्ये तुम्ही म्हणता तसे विविध व्याधी जडतात, त्याचा त्रास स्वत:ला, कुटुंबाला, सरकारला, वगैरे. अर्थात कोणी म्हणेल आमचा पैसा, आमचे आरोग्य, वगैरे. जसे हेल्मेटच्या बाबतीत पुणेकर म्हणतात, डोके आमचे, तुम्हाला काय?
स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्याच्या बाबतीतल्या निष्काळजीपणामुळे. शिवाय ही बाब अशी की कुपोषितांमध्ये (गरीबांमध्ये) हे बहुधा दिसणार नाही, त्यामुळे त्या द्ृष्टीने कोणाचा आक्षेप येणार नाही.

राजेश घासकडवी Tue, 05/01/2016 - 20:18

In reply to by राजेश कुलकर्णी

इथे आधीच प्रसिद्ध केलेल्या लिखाणाचा एकच तुकडा तोडून पुन्हा तो नवीन धागा म्हणून टाकण्याचं कारण कळलं नाही. नक्की काय चाललंय तुमचं?

राजेश घासकडवी Wed, 06/01/2016 - 00:07

In reply to by राजेश कुलकर्णी

ऐसी अक्षरेवर अशा लहानसहान पोस्ट्ससाठी खास जागा केलेली आहे - मनात येणारे लहानमोठे प्रश्न व विचार. कृपया तिथे असे प्रश्न पोस्ट करावेत. त्यावर चांगली चर्चा होत आहे असं दिसलं की संपादक त्याचा स्वतंत्र धागा बनवतात.

आदूबाळ Tue, 05/01/2016 - 20:27

In reply to by राजेश कुलकर्णी

ओबेसिटी टॅक्स?

त्याची अंमलबजावणी कशी करणार?

सेल्फ असेसमेंट शक्य नाही - कारण कोणता ढब्ब्या आपण ढब्बे आहोत हे आपल्याच तोंडाने मान्य करेल?
स्क्रुटिनी असेसमेंट शक्य नाही - कारण त्यासाठी वेगळी यंत्रणा निर्माण करावी लागेल. त्या यंत्रणेची किंमत ओबेसिटी टॅक्सपेक्षा कैक पटींनी जास्त असेल.
सोर्स रिव्हर्स टॅक्सेशन** शक्य नाही - कारण त्यासाठी जाडी वाढवणार्‍या वस्तूंवर टॅक्स लावावा लागेल (उदा० तूप). पण त्या वस्तू ओबेस नसलेले लोकसुद्धा खातात. मग सुक्याबरोबर ओलं जळेल. सोर्स रिव्हर्स टॅक्सेशनची एक आयड्या अशी आहे की अडतीस इंचांपुढची कंबर असलेल्या विजारीवर काही-शे टक्के अबकारी कर लावायचा. पण त्यामुळे ढब्बे लोक रेडिमेड प्यांटीं न घेता प्यांटी शिवून घेतील, आणि शिंप्यांना रेग्युलेट करणं शक्य नसल्याने ही आयड्याही बोंबलेल.

(**दारू किंवा सिगरेटवरच्या अबकारी करासारखं)

एनी आयड्या, राकु?

कुंदा गजानन फु… Wed, 06/01/2016 - 00:51

In reply to by आदूबाळ

माझ्या एका मित्राच्या आजोबांना या प्रॉब्लेमची जाणिव खूप काळापूर्वीच झाली होती. ते पूर्वीच्या मद्रास प्रांतात जिथे जिल्हाधिकारी होते तिथे त्यांनी जाड्या पँटांवर जादा कर लावला होता. पण तेव्हा लोकांनी त्यांना परप्रांतीय म्हणून हिणवत फार त्रास दिला होता. सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी धोतरं, लुंग्या आणि साड्या नेसायला सुरूवात करुन त्यांच्या स्कीमचा फज्जा उडवला होता. आजोबांचा पाश्चात्यांचं अनुकरण करणारे म्हणूनही हिणवलं जात असे.

राजेश कुलकर्णी Wed, 06/01/2016 - 01:03

फुसके बार – ०६ जानेवारी २०१६

१) जुन्नरजवळील आंबेगावच्या ८६ वर्षाच्या आजींनी गेल्या ६० वर्षांपासून वर्तमानपत्रातली कात्रणे वह्यांमध्ये चिकटवून त्यांचा संग्रह केलेला आहे. विशेष म्हणजे विविध विषयांवरच्या या कात्रणांमध्ये त्यांनी अंधश्रद्धा हा विषयही ठेवला आहे. अशा कात्रणांच्या एक हजारहून अधिक वह्या त्यांनी जपून ठेवल्या आहेत. काय कमालीचा छंद म्हणायचा हा आणि त्याचबरोबर त्यांची चिकाटी विशेष वाखाणण्यासारखी.

२) काशीकापडी जमातीमध्ये पतीचे निधन झाल्यावर पत्नीला तेलाने आंघोळ घालून तीन दिवस अंधा-या खोलीत ठेवतात. या प्रथेविरूद्ध एका मुलीने तिच्या वडलांच्या मृत्युनंतर तिच्या आईवर ही वेळ येऊ नये म्हणून लढा उभारला व जमातीच्या जातपंचायतीच्या पंचांविरूद्ध पुणे पोलिसांमध्ये तक्रार केली. याशिवाय आंतरजातीय विवाहांना विरोध करणे असे आरोपही या पंचांविरूद्ध आहेत. अशा आठ पंचांना पुण्यात खडक पोलिसांनी अटक केली आहे.

३) स्पिलबर्गच्या सिनेमातील लियाम नीसनचा शिंडलर्स लिस्ट आठवतो? जर्मन व्यावसायिक असलेल्या ऑस्कर शिंडलरने सुरूवातीला त्याचा धंदा चालावा म्हणून आणि नंतर ज्युंबद्दल खरोखर कणव निर्माण होऊन जितक्यांना हत्याकांडापासून वाचवणे शक्य झाले तितक्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

अगदी तसा नाही तरी त्या धर्तीवरचा हॉटेल रूवांडा हा सिनेमा. आपण त्यांना विसरलो असलो तरी रूवांडा देशात (काय म्हणता, रुवांडा कोठे आहे?) हुतू ट्राइबच्या लोकांनी टुत्सी ट्राइबच्या लोकांची कत्तल नव्वदीच्या दशकात केली. तेथे ऑइल, सोने, हिरे वगैरे पाश्चिमात्य देशांना लागणारा काहीच माल नसल्यामुळे जवळजवळ दहा लाख टुत्सी लोकांची कत्तल झाली.

मुळचे हे हुतू व टुत्सी एकच होते म्हणे. पण तेथे राज्य केलेल्या बेल्जियन सत्तेने अक्षरश: उंचीच्या व नाकाच्या लांबीच्या आधारावर त्यांची अशी विभागणी केली.

त्यामुळे टुत्सींचा वंशविच्छेद करताना Cut the tall trees ही आज्ञा सगळ्यांना समजायला फार सोपी. टुत्सींना शोधून शोधून मारणारे हुतू त्यांचा उल्लेख कॉक्रोचेस म्हणजे झुरळे असा सर्रास करत.

या सर्व भीषण व मानवी प्रकारात हुतू असलेला एका फोर स्टार बेल्जियन हॉटेलचा मॅनेजर पॉल रूसेसाबागिना. त्याची बायको टुत्सी. तो त्याच्याकडे कोणतेही शस्त्र नसताना एक हजारापेक्षा अधिक टुत्सींना कसे वाचवतो याची चित्तथरारक कथा.

काहीही संबंध नसताना तिथल्या टुत्सी अनाथ मुलांना वाचवण्यासाठी जीव पणाला लावणारी रेडक्रॉसची गोरी बाई. इतक्या प्रचंड प्रमाणावर नरसंहार चालू असताना पूर्ण रूवांडा देशासाठी केवळ चारशे पीसकीपर्स नेमून काही तरी केले आहे यात खोटे समाधान मानणारे युनायटेड नेशन्स, व इच्छा असूनही या टुत्सींपैकी कोणालाही मदत करू शकत नाही या हतबलतेपोटी निराश होणारे युएनचे अधिकारी, पैशांसाठी टुत्सींना काही काळासाठी जीवदान देणारे हुतू आर्मीचे अधिकारी, परदेशी म्हणजे गो-या लोकांना देशाबाहेर जाता येईल म्हणून अनेक टुत्सींनाही आपल्याबरोबर नेता येईल अशा समजुतीने आलेले; पण मग सगळ्या काळ्यांना नाइलाजाने मागे ठेवून जाणारे गोरे फादर, अशा मानवतेला कलंक असलेल्या जनावरांचा आणि या हैवानांच्याच वातावरणात माणुसकीचा झरा दाखवणा-या सज्जनांचा हा पट. मृत्यु किती स्वस्त असू शकतो हे दाखवणारा पट.

ती रेडक्रॉसची बाई प्रथम दहा टुत्सी अनाथ लहान मुलांना जॉनच्या हवाली करते. राहिलेल्या दहांना आणायला परत जाते, तर ती मुले आधीच हुतू नराधमांच्या हाती लागलेली असतात. त्यांचे गळे चिरून त्यांना मारतात. हिला ते सारे पहायला लावतात. त्यातली एक लहान मुलगी तिचाही गळा चिरणार, त्याआधी जीवाच्या आकांताने ओरडते, मला मारू नका, मी पुन्हा टुत्सी नाही होणार. सगळेच नि:शब्द करणारे.

शिंडलर्स लिस्टमध्ये तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही हे ज्युंना सांगितले गेलेले दिसले, येथे टुत्सींना. बंदुका व तलवारी चालवणारे हात वेगळे एवढेच.

निक नोल्टे व डॉन चिडल ही त्यातल्या त्यात माहित असलेली नावे. पण अंगावर काटा आणणारा अनुभव देतात.

याआधी पाहिला नसेल तर जरूर पहा..... हॉटेल रूवांडा. हे हत्याकांड (जेनोसाइड) झाले ते नव्वदीत. विश्वास बसतो?

४) काल मी अंधश्रद्धामीटरची कल्पना मांडली होती. मोठ्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांसाठी होणा-या नेमणुकांसाठी असा प्रकारची चाचणी केली जाते. की न जाणो याच्या अंधश्रद्धांशी संबंधित समजुतींमुळे कंपनीच्या व्यवसायावर प्रतिकुल परिणाम झाला तर काय घ्या.

अशा चाचणीचे तपशील कोणी सांगू शकेल काय?

५) काल आयबीएन लोकमतवर गुंठामंत्री या नावाखाली एक कार्यक्रम सादर झाला. पुण्यामध्ये जमिनीच्या वाढत्या किंमती पाहता शेतक-यांवर धाकदपटशाचा वापर करून त्यांच्याकडून जमिनी बळकावण्याचा प्रकार झाला. त्यात अनेक खूनही झाले.

या प्रकारात आजवर पुण्यात अनेक खून पडले आहेत हे सांगितले जात होते, तेव्हा लक्षात आले की यातले लोक राष्ट्रवादी कॉंग्रेसशी संबंधित होते. काहीतर त्यांचे पदाधिकारी होते.

यातल्या एका गुंडाचा, ज्याचा नंतर खून झाला, त्याचा तडिपारीचा आदेश तर राष्ट्रवादी सरकारात असताना त्यांच्याच गृहखात्याने घेतलेला होता हेदेखील यावेळी लक्षात आले.

आणि आपण मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचा केवळ जलसंपदा खात्याशी संबधित भ्रष्टाचारापुरता संबंध जोडतो.

काल संघाचा मेळावा झाल्याच्या ठिकाणावरून एक जोक फिरत आहे. या मेळाव्यासाठी सलग चारशे-साडेचारशे एकर जमीन मोकळी कशी याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा यांना आश्चर्य वाटले असे त्यात म्हटले होते.

६) सत्यम शिवम सुंदरम हा सिनेमा आजच्या काळात प्रदर्शित होता, तर त्यातील गाण्याच्या वेळी झिन्नीबेबीची महादेवाच्या पिंडीजवळची वळवळ पाहून अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असत्या. अर्थात ती वळवळ पाहिल्यावर.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 06/01/2016 - 01:42

१. बरं.
२. बातमीची लिंक?
३. होय.
४. नाही.
५. वा वा. चान चान.
६. आम्हाला पण दाखवा की.

अस्वलाचे आभार.

राजेश कुलकर्णी Thu, 07/01/2016 - 00:37

फुसके बार – ०७ जानेवारी २०१६

१) दिल्लीतील प्रदुषण कमी करण्यासाठी केजरीवाल सरकारने अंमलात आणलेल्या ऑड-इव्हन योजनेला चक्क सर्वोच्च न्यायालयाच्या दोघा न्यायमूर्तींनी कार पूल करत सहकार्य केले. हे अगदी स्वागतार्ह आहे.

एक राज्य सरकार अशी अभिनव योजना सादर करत आहे. समोर असलेला प्रश्न भीषण म्हणण्याच्याही पलीकडे गेलेला आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ देण्याचे सोडून जगभरात असे प्रयत्न सफल झालेले नाहीत अशी पाय ओढणारी विधाने करत भाजपच्या नेत्यांनी बेजबाबदारपणाचेच दर्शन घडवले.

२) Cheque signing syndrome

चेकवर सही करायची म्हणजे आपल्याकडचे पैसे दुस-याला द्यायचे. या कल्पनेने अस्वस्थ झालेल्या व्यक्तीच्या हातून चेकवरची सही हमखास चुकत असणार. या पद्धतीच्या वागण्याला वर दिलेले नाव द्यायला हरकत नाही.

३) टीआरएआयने आदेश देऊनही फेसबुकवर फ्रीबेसिक्सचे समर्थन करणारे संदेश अजून येतच आहेत. त्यांच्या वर्तमानपत्रांमधील पानभर जाहिरातीही अजून चालूच आहेत.

टीआरएआयला दात किंवा किमान नखे तरी आहेत का सर्वांना एकदा कळायला हवे.

४) लग्नामध्ये कशावरून वाद निर्माण होईल याचा नेम नसतो. अजुनही लग्नाचा खर्च दोन्ही बाजुंनी समसमान करावा ही कल्पना अनेकांच्या पचनी पडलेली दिसत नाही. काही ठिकाणी मात्र आमच्याकडच्यांचा खर्च आम्ही करू, आमच्यांना तुम्ही तुमच्या खर्चाने खायला घालायची गरज नाही असे म्हणत जेथून प्लेट उचलतात तेथे दोन्ही बाजुंचे प्रतिनिधी उभे असतात हेही दिसते. याचा दुसरा फायदा असा की दोन्हीकडचेही नसलेले फुकटे जेवून जाण्याची शक्यता रहात नाही.

परवा एक वाद पाहिला. लग्नाचा सगळा खर्च वधुपक्ष करत होता. म्हणजे हे त्या प्रसंगावरूनच कळले. फोटोग्राफरची व्यवस्था वधुकडून झालेली. त्याला जवळजवळ जखडून ठेवले होते ते मात्र वरपक्षाकडच्यांनी त्यातही पैठणीटोळीने. त्यांनी स्वत:चा वेगळा फोटोग्राफर आणण्याचीही तसदी घेतली नव्हती. हे लक्षात आले मात्र, वधुपक्षापैकी कोणीतरी फोटोग्राफरला तिकडे बोलावून घेतले.

झाले. रूसवेफुगवे सुरू. वधुकडच्यांचे म्हणणे आम्ही खर्च करणार आहोत. आम्ही तुमच्याकडच्यांच्या उगाचच काढलेल्या फोटोंचे पैसे देणार नाही.

५) आज आणखी एक आठवण आणखी एका लग्नाचीच. वरपक्षाकडून गेलो होतो. पण माज म्हणजे कसा आणि कुठल्या थराला जाऊ शकतो, हे पहायला मिळाले.

वाढपी वाढण्यासाठी आले असता वरपक्षाची अपेक्षा अशी त्यांनी नको म्हटल्याशिवाय वाढप्याने न वाढता पुढे जायचे नाही. एखादा खाण्यामध्ये तगडा असेल तर ठीक आहे हो, अन्यथा ताटात शिग लागायची वेगवेगळ्या पदार्थांची.

लहान मुलाच्या बाबतीतही तोच प्रकार. ‘वाढू का’ हा प्रश्न वाढप्यावे त्या मुलाला विचारणे हा त्या मुलाचा अपमान, मुलाच्या वडलांचा म्हणजे खानदानाचा अपमान आणि अर्थातच वराचा अपमान. त्यामुळे मुले पानातले न खाता टाकून ऊठतील अशी शंकाही घ्यायची नाही. कारण त्याला साधे उत्तर, की आम्ही वरपक्षाकडचे आहोत, तुमचे फक्त वाढायचे काम, विचारायचे नाही.

फार नाही, पाचएक वर्षे झाली असतील.

६) डॉक्टरकडे तपासणीसाठी गेलो असता तपासणी चालू असताना त्याला कोणाचा फोन आला व तो जर त्याने घेतला व आपल्याकडे लक्ष न देता फोनवर बोलत राहिला, तर समजावे की डॉक्टर बदलायची वेळ आली.

माझ्या परिचयातल्या एका डॉक्टरांकडे शेअर बाजाराच्या व्यवहारांच्या वेळेत जाणे म्हणजे संकट असे. पेशंट समोर बसलेला आणि यांच्या हा घे व तो विक या सूचना चालू. पलीकडचा ब्रोकर आणि यांच्यात एखाद्या स्टॉकच्या खरेदीविक्रीवरून मतभेद झाले तर मग त्यावरची चर्चा कधी संपणार याची वाट पहात बसणे हे पेशंटचे काम.

मग तपासणी झाल्यावर हे संभाषण सुरू झाले असेल तर डॉक्टरसाहेबांच्या फोनवरील संभाषणामुळे झालेल्या किंवा बदललेल्या मुडप्रमाणे ते औषध कोणते लिहून देणार यावर पेशंटचे भवितव्य. मग औषध विकत घ्यायला केमिस्टकडे गेल्यावर हे औषध कशावरचे आहे हे विचारून घेणे व ते आपल्या आजारावरचेच आहे ना याची खात्री करून घेणे हेही जणू पेशंटचेच कर्तव्य.

#फुसके_बार

#Phusake_bar

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 07/01/2016 - 00:43

In reply to by राजेश कुलकर्णी

१. बरं.
२. रक्तदानाच्या वेळेस जे काही होईल त्याला थरथराट म्हणूया.
३. बरोबर.
४. किती हो रोचक माहिती मिळते तुम्हाला!
५. तुम्हाला लग्नसमारंभबद्दल विशेष आकर्षण (फेटिश) आहे का?
६. बरं. मग?

राजेश कुलकर्णी Fri, 08/01/2016 - 08:40

फुसके बार – ०८ जानेवारी २०१६

१) पुण्यातल्या सह्याद्री हॉस्पिटलने एका पेशंटला त्या हॉस्पिटलमधूनच औषधे विकत घेण्याची सक्ती केल्याचे प्रकरण पेशंटच्या नातेवाईकांनी उघड केले. हॉस्पिटलमध्ये सुमारे लाखभरात मिळणारी औषधे बाहेरच्या फार्मसीमध्ये अर्ध्या किंमतीमध्ये मिळत होती. पेशंटच्या नातेवाईकांनी तसे करतो असे म्हटल्यावर डॉक्टरांनी बाहेरची औषधे चालणार नाहीत, कारण ती चांगली नसतात असे सांगितले. त्यावर या नातेवाईकांसह अनेकांनी आरडाओरडा केल्यावर मात्र बाहेरून आणलेली औषधे स्विकारली गेली.

हा शुद्ध बदमाशपणा आहे.

याच हॉस्पिटलमध्ये तपासणी व उपचारांसाठी चेन मार्केटिंगचे तत्व अवलंबले जाते. या सर्व प्रकारांमध्ये मूळ तपासणी व उपचाराचे दर एवढे वाढवलेले असतात की ते तथाकथित डिस्काउंट मिळाल्यानंतर स्वस्त वाटावेत. अन्यथा या कमी केलेल्या दरामंध्ये विविध तपासण्या करणे शक्य असताना ते दर का फुगवलेले असतात?

या लोकांनी वैद्यकीय व्यवसायाचा धंदा केलेला आहे.

२) बालाजी तांबे यांच्या गर्भसंस्काराच्या थोतांडाबद्दल मी आधीही लिहिले होते. डॉ. अरूण गद्रे यांनीही त्याबाबत लोकसत्तामध्ये अगदी पोटतिडिकेने लिहिले होते. तेव्हा आयुर्वेदाच्या अनेक स्वयंघोषित रक्षकांनी त्याविरूद्ध गदारोळ माजवला होता.

आता तांबे यांच्याविरूद्ध गर्भ लिंगनिदान निवडीबाबतच्या ‘पीसीपीएनडीटी’ कायद्यान्वये ही कारवाई होणार आहे असे कळते. मात्र लोकसत्ताचे वाचक श्रीकांत पटवर्धन यांनी याबाबतीत अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यान्वयेही कारवाई करावी अशी सूचना केलेली आहे. कारण त्याद्वारे होऊ शकणारी शिक्षा ही अधिक प्रभावी असेल असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय या काद्याखली येणारे गुन्ह्यात जामीन मिळू शकत नाही याकडेही ते लक्ष वेधतात.

अशा जागरूक वाचकांचे कौतुक.

३) अखेर गजेन्द्र चौहान यांनी पुण्यात फिल्म व टेलिव्हिजन इन्स्टिट्युटच्या अध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यानी केलेले आंदोलन बहुधा आता त्यांच्याविरूद्धचे शेवटचे ठरावे.

मला वाटते की गुणवत्तेच्या कोणत्याही निकषात न बसणारी चौहान यांची निवड अतिशय अयोग्य आहे. भाजपला त्यांच्या मर्जीतील दुसरा कोणी लायक उमेदवार त्यासाठी मिळू नये हे दुर्दैव. मात्र फिल्म इन्स्टिट्युटच्या विद्यार्थ्यांचा बेशिस्तीचा गतेतिहास त्यांच्यासाठी पुरेशी सहानुभूती मिळवू शकला नाही व त्यामुळे केन्द्र सरकारला त्यांच्या निर्णायावर ठाम राहता आले.

आता त्यांचे अधिकारही कमी करण्यात आलेले आहेत व त्यामुळे ते नाममात्र अध्यक्ष राहतील की काय अशी स्थिती आहे.

४) जम्मू आणि काश्मीरचे मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनामुळे एक अतिशय बिनकामाचा काश्मिरी राजकारणी देशाने गमावलेला आहे. एरवी एखाद्या नेत्याच्या निधनाने राजकारणात ‘पोकळी’ वगैरे निर्माण झाल्याचे म्हतले जाते. पण या good for nothing राजकारण्यामुळे देशाचे नुकसानच झाले.

काश्मीरमधील राजकारणी हे नेहमीच देशहिताच्या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका घेत तळ्यात-मळ्यात खेळताना दिसतात. तेही यास अपवाद नव्हते.

त्यांची मुलगी मेहबुबा मुफ्ती आता मुख्यमंत्री होतील. या त्यांच्यापेक्षा अधिक उपद्रवकारक समजल्या जातात. तेव्हा सरकारात सहभागी असलेल्या भाजपसमोरची आव्हाने वाढणार आहेत.

५) विमानतळांच्या नावावरून होणारे वाद टाळण्याकरिता यापुढे विमानतळाला केवळ त्या शहराचेच नावे द्यावे अशी नियमावली करण्यात येणार आहे असे समजते. हा शहाणपणाचा निर्णय वाटत असला, तरी तो केवळ हे सरकार सत्तेत असेपर्यंतच टिकेल अशी लक्षण दिसते. पुढचे सरकार वेगळे असेल तर ते हवे तसे निर्णय घेईलच.

६) राज ठकवणारे यांना ते हिंदू असल्याचा साक्षात्कार आता झालेला दिसतो. मुंबईतील आझाद मैदानात होणा-या मोर्चाच्यावेळी झालेल्या हिंसाचाराविरूद्ध त्यांनी आवाज उठवला होता हे त्यांना आज अचानक आठवले व मनसेच्या ध्वजातील हिरवा रंग हा फक्त देशभक्त मुस्लिमांसाठीच आहे, तो भिवंडी-बेहरामपाड्यातल्या मुस्लिमांसाठी नाही असे ते म्हणाले.

यांच्या ध्वजातला भगवा रंग त्यांच्या टोळीतल्या गुंड हिंदूंसाठी आहे का हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही.

यांच्या व यांचे दुसरे ठकवणारे बंधू यांच्यातील भूमिका बदलण्याच्या स्पर्धेमुळे रंग बदलणारे सरडेही लाजेने काळेठिक्कर झाले आहेत.व

७) अलीकडे टीव्ही चॅनलवरील कार्यक्रमांच्याबाबतीत काही तक्रार असेल तर अमुकअमुकला कळवा अशी सूचना असलेली पट्टी पडद्याच्या खालच्या भागात मधूनमधून फिरवली जाते.

ते पाहून टायटॅनिक सिनेमा पाहताना ती बोट बुडाल्याने दु:खी झालेला शेजारचा पिट्टू म्हणाला की आपण ती बोट बुडवल्याबद्ल तक्रार करू.

त्याचे लॉजिक चालते, तर जान्हवीची डिलिव्हरी प्रेक्षकांनीच करवली असती की.

नितिन थत्ते Fri, 08/01/2016 - 09:44

In reply to by राजेश कुलकर्णी

>>काश्मीरमधील राजकारणी हे नेहमीच देशहिताच्या मुद्द्यावर संदिग्ध भूमिका घेत तळ्यात-मळ्यात खेळताना दिसतात. तेही यास अपवाद नव्हते.

वरील वाक्यातील देशहित या शब्दाचा अर्थ (उर्वरित वाक्याच्या संदर्भात) कळला नाही

राजेश कुलकर्णी Fri, 08/01/2016 - 10:16

In reply to by नितिन थत्ते

त्यांना स्वतंत्र व्हायचे आहे, पाकिस्तानबरोबर संसार थाटायचा आहे की काही कलमांसंबंधीच्या अटी सोडल्या तर त्याखेरीज भारताबरोबरच रहायचे आहे याबाबतीत त्यांच्याकडून ठोस व कंसिस्टंट भूमिका दिसत नाही. कधी दहशतवाद्यांना, हुरियतला सोयीचे विधाने केली जातात.

नितिन थत्ते Fri, 08/01/2016 - 10:21

In reply to by राजेश कुलकर्णी

आपल्या स्वातंत्र्यलढ्यातील नेते ब्रिटिशांबरोबर असेच वर्तन करत असत असे वाटते. कधी पूर्ण स्वातंत्र्य, कधी वसाहतींअंतर्गत स्वायत्तता वगैरे बदलत्या भूमिका घेत असत. अहिंसेचा निषेध करत असत त्याचवेळी आझाद हिंद फौजेच्या सैनिकांची वकीलपत्रेही घेत असत.

राजेश कुलकर्णी Fri, 08/01/2016 - 10:38

In reply to by नितिन थत्ते

त्यात काही इनकंसिस्टंसी होती असे वाटत नाही. पूर्ण स्वराज्याची मागणी ही हळुहळु आकारास अाली. त्यानंतर मागे फिरून पाहणे नव्हते. शिवाय स्वातंत्र्यचळवळीच्यावेळी परकी शक्ति, आताच्या स्वरूपातले दहशतवादी हा प्रकार नव्हता.
शिवाय काश्मीर भारतात आहे वास्तव आहे. तेव्हा नॅशनल कॉन्फरंस असो किंवा हे, त्याबाबतीत संदिग्ध भूमिका घेऊन काहीही साध्य होत नाही. उलट इतक्या दशकांनंतरही काश्मीरला मुख्या धारेत सामावून घेतले जात नाही अशी उलटी बोब मारायलाही हे मोकळे.

अस्वल Sat, 09/01/2016 - 00:30

१. आमच्या फ्रीजमधे काल एक मेलेली कोंबडी सापडली. खूप आतमधे होती. पण आसपासच्या रश्श्यात एकदम सामावून गेली होती. कोंबडयांना जर आत्मा असेल तर चिकन करीत आपलं शरीर बघून त्याला काय वाटेल?
मागेच मी ह्यावर एक ऑनलाईन परिसंवाद आयोजित केला होता.

२. ही-मॅनची मला कमाल वाटते. असं का? स्केलेटॉर दर वेळी त्याच्याकडून मात खातो. तरीही "प्रयत्न करत रहावे" ह्या उक्तीनुसार पुन्हा पुन्हा अटॅक करतो. एवढा ताकदवान असूनही त्याला कोणीच सिरीअसली घेत नाहीत. असं का होत असेल?
खरं तर आपण स्केलेटॉरला प्रेरणास्थान मानायला पाहिजे. मला तर वाटतं की बीस्टमॅन, मरमॅन (मरमेड वाला मर. जा, मर मेल्या मधला मर नव्हे.) आणि ती एविलॅन ही बया- स्केलेटॉरने त्यांना कामावरून काढून टाकायला पाहिजे.
नाही का?

३. चेंगट ह्या शब्दाचा उगम कुठून झाला असावा? चिकट हा शब्द बराच जवळचा वाटतो. आमच्या एका काकांच्या घरी येणारा एक पाहुणा असाच चेंगट होता. लोकांच्या घरी रात्री जाऊन जेवून खाऊन झालं तरी गप्पा हाणायचा. पण निघतच नसे.
शेवटी जांभयांवर जांभया देऊन त्याला सिग्नल द्यावे लागत.

४. ३डी आणि virtual realityचा जमाना आहे. गूगल आणि लेनोवो एक नवा प्रोजेक्ट टँगो तयार करतायेत, त्यातही म्हणे आसपासच्या गोष्टींना ३डी मधे बघायची सोय उपलब्ध होणारे. शिवाय ऑक्युलस रिफ्ट बाजारात येतंय ते वेगळंच.
मला तर वाटतं की थोड्या वर्षांनी आपण आपल्या आजूबाजूला खर्‍या गोष्टींएवजी virtual realityच बघू. म्हणजे ते मॅट्रीक्समधे दाखवलेलं होतं तसं काहीतरी. ही आयडीया मी आता तुम्हाला दिलीये- बघा काही सुचतंय का पुढे.

५. प्रणव धनावडेने उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद घेतला. जाऊ दे, ही गोष्ट खरं तर लिहायच्या लायकीची पण नाही. असो. पुरे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 09/01/2016 - 00:38

In reply to by राजेश घासकडवी

संपादकांच्या ह्या कृतीचा निषेध. त्यामुळे अस्वलाच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा येत आहे. अडगळीच्या धाग्यात हा प्रतिसाद हलवल्यामुळे त्याला पुरेसा आड्यंस मिळणार नाही.

-- (सामान्य, संतप्त सदस्या) अदिती

राजेश घासकडवी Sat, 09/01/2016 - 00:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे पाहा तैै, हे प्रैव्हेट संस्थळ आहे. अस्वलरावांची खाजगी भिंत नव्हे. तेव्हा त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा कसली आलीये? उलट त्यांचं लिखाण पब्लिश करून आम्ही त्यांच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याला औटलेट दिलेलं आहे. आता कोणाला आमच्या विमानाचं फुकट तिकीट दिल्यावर ते बसले फस्क्लासमध्ये, आणि आम्ही म्हटलं, माफ करा, जरा इकॉनॉमी क्लासमध्ये बसा. तर त्यांनी खवळून जाऊन आमच्यावर ओरडावं का? आता कोणी प्रशस्त व्यक्तीमत्त्व असतं तर त्यांना लागते जास्त जागा, मग देतो त्यांना फस्क्लास. किंवा गेला बाजार एखादी बारीक पण रेखीव कोणी असेल तरीपण देतो. नाहीतरी कोणी बंदुकीचा धूर काढत आलं असेल तर त्यांनासुद्धा देतो फस्क्लासात. पण जनरल पॅसेंजरना इकॉनॉमीत आयली करून दिलेल्या आहेत.

आणि अडगळीचा धागा? अडगळ? या फुसक्या बारांच्या शेजारचं मानाचं स्थान दिलंय. यवढं पण कळत नाही. आता देवळाच्या गाभाऱ्यात नेऊन मूर्ती ठेवली तर तिला तुम्ही अडगळीत ठेवली म्हणाल का?