भाडेकरू व नैतिकता
भाडेकरू व नैतिकता
.
.
भाडेकरू व घरमालक यांचे संबंध हा या पोस्टचा विषय नाही. तसेच 'घरमालक व नैतिकता' हाही या पोस्टचा विषय नाही.
घरमालक व भाडेकरू यांच्या संबंधातला कायदा हा भाडेकरूच्या बाजुने झुकणारा आहे असे आपण ऐकतो. घर भाड्याने देताना लिव्ह&लायसन्सच्या तत्वावरच द्यावे, अन्यथा भाडेकरू घरावर हक्क सांगू शकतो व घराचा ताबा देण्यात अडथळा आणू शकतो ही शंका मनात आसते. दुसरीकडे ‘तू निश्चिंतपणे रहा, फक्त मला गरज पडेल त्यावेळी घर रिकामे करून दे’, अशा तोंडी व्यवहारावर, म्हणजे कोणतीही चिठ्ठी-चपाटी न करता केवळ विश्वासावर आपला बंगला दुस-याच्या हवाली करणारे मित्रही माझ्या पाहण्यात आहेत. उद्या या मित्राच्या वा त्याच्या बायकोच्या डोक्याचे ग्रह फिरले तर काय होईल, असा विचार हे घरमालक-मित्र करताना दिसत नाहीत. हे दुसरे टोक.
काही कायद्यांमुळे जुने भाडेकरू हे जवळजवळ जागामालक झालेले दिसतात. शिवाय खूप जुने भाडेकरू असल्यामुळे भाडेही नाममात्र. त्यातून मालकाला फायदा तर सोडाच, पण घराची डागडुजी करणेही शक्य होऊ नये अशी परिस्थिती. मुंबईसह अनेक ठिकाणी इमारत केव्हा पडते आणि या भाडेकरूंचा जागेवरचा हक्क केव्हा संपतो, याची वाट पाहणारे घरमालक दिसतात. तर इमारत मोडकळीला आली व जीव धोक्यात आला तरी केवळ ताबा जाऊ नये म्हणून तेथेच राहणारे भाडेकरू हे वास्तवही. तर घरमालकाचीच असलेली जागा रिकामी करून देण्याच्या बदल्यात घरमालकाकडून घसघशीत रक्कम वसूल करणारेही दिसतात.
जागा आपली नाही, आपण पैसे देऊन का होईना पण येथे भाडेतत्वावर रहात आहोत याची जाणीव व कृतज्ञता जाऊन तो घरमालक भाडेकरूच्या दृष्टीने खलनायक केव्हा होतो आणि मग आपल्यावर त्याच्याकडून कसा अन्याय होत आहे, याचे आपल्या मनचेच पुरावे तयार करत राहण्यात तो मश्गुल होतो. हे मानसिक स्थित्यंतर फार गंमतीशीर असावे. आपण आपल्यासाठी जागा भाड्याने घेतलेली असताना स्वत:चे घर/सदनिका घेण्यासाठी प्रयत्न करणे, कमीत कमी आपल्या मुलांनी तरी राहण्याची वेगळी सोय करण्याची अपेक्षा ठेवणे, या गोष्टी सोयीस्करपणे विसरल्या जातात. आपली जागेची ‘गरज’ अजूनही संपलेली नाही अशी सोयीस्कर समजूत आपणच करून घ्यायची. मग ती तशी कधीच संपत नसते.
ग्रामीण भागात जसे कायद्याचा आधार घेऊन शेतजमीनी बळकावण्याचे प्रकार चालतात, त्याची ही शहरी आवृत्ती. ग्रामीण भागात तरी यातल्या नैतिकतेबद्दल कोण कधी बोलते? प्रत्येकाला आपला हक्क गजवायचा असतो.
तेव्हा माणूस सामान्य असो किंवा पैसेवाला, याबाबतीत नैतिकता पाळणारा आहे का, हेही आपल्याला पडताळून पाहता येण्यासारखे आहे. या बाबतीत कोणी कायद्याचा दाखला देत असेल तर त्याला कमीत कमी वास्तवाची व याबाबतीतल्या नैतिकतेची जाणीव करून देण्याची तसदी आपण घेतो का?
आता मुद्द्याकडे.
वर्षानुवर्षे घरमालकाच्या जागेत राहत असताना त्याच्याशी वेळोवेळी विविध मुद्द्यांवरून कितीही वाद झाले, तरी आपली जागेची गरज संपली की दुसरीकडे आपल्या राहण्याची सोय करून घरमालकाला जागा रिकामी करून देणारे सज्जनही मी पाहिलेले आहेत - शिवाय त्याबदल्यात कोणतीही रक्कम स्विकारता. हे आणखी विशेष. त्यातले काही जण प्रतिष्ठित म्हणून आपल्या प्रतिष्ठेला बाधा येऊ नये म्हणून तसे वागले असे म्हणावे, तर काही जण अगदी सामान्यही आहेत. तेव्हा नैतिकता ही केवळ प्रतिष्ठेशी संबंधित बाब नाही, हे स्पष्ट व्हावे. अशा परिस्थितीत आपल्या भाडेकरूकडून रिकामे झालेले घर स्विकारताना फुटलेले हुंदके - कधी गालावरून ओघळणारे तर कधी मनातल्या मनात - देणारे घरमालक पाहिलेले आहेत मी. असे काही भाडेकरू माझ्या प्रत्यक्ष परिचयातले आहेत.
मुळात जागा सोडायची गरज नव्हती, सोडलीच तर पैसे तरी मागायचे होते, त्यात वावगे वाटण्याचे कारण काय, ती तर जगरहाटीच आहे असे सल्ले त्यांना नक्कीच मिळाले असतील. तरीही त्या प्रलोभनाला बळी न पडणे हे नक्कीच विशेष.
ही पोस्ट एकेकाळी भाडेकरू असणा-या अशा सज्जनांना सलाम करण्यासाठी आहे.
ता.क.:
१) कोणाला यात एखाद्या चित्रपटाच बीज दिसते का? अपेक्षा एवढीच की शेवटचा अतिमेलोड्रामा न करता आतल्या आत दिलेले हुंदके दाखवावेत.
२) मी घरमालकांचा एजंट म्हणून ही पोस्ट लिहिलेली नाही.
नैतिकता?
तेव्हा माणूस सामान्य असो किंवा पैसेवाला, याबाबतीत नैतिकता पाळणारा आहे का, हेही आपल्याला पडताळून पाहता येण्यासारखे आहे. या बाबतीत कोणी कायद्याचा दाखला देत असेल तर त्याला कमीत कमी वास्तवाची व याबाबतीतल्या नैतिकतेची जाणीव करून देण्याची तसदी आपण घेतो का?
या सर्व प्रकारात निव्वळ साधी अपेक्षा आहे: मालकाला वेळेवर घरभाडे मिळावे, मर्जीप्रमाणे भाडे कमी-जास्त करता यावे, घरमालकाला जागा परत हवी असेल तर कराराच्या अटी पूर्ण करून विनासायास (माझ्या दृष्टीने, जास्तीत जास्त एक महिन्यात) जागा परत मिळायची सोय हवी. त्याबदल्यात भाडेकरूला जागा वापरता यावी.
साधी गोष्ट आहे, घरमालकाने स्वतःची जागा बाजारात मांडली आहे. भाडेकरूने करारानुसार ती भाड्याने घेतली आहे. यात नैतिकतेचा प्रश्न कुठून आला? कायदा भाडेकरूच्या बाजूने झुकणारा असेल (उदा. रेंट कंट्रोल) किंवा त्याची अंमलबजावणी झटपट होणारी नसेल (उदा. भाडेकरूला एक महिन्याच्या आत हुसकावून लावता येत नसेल), यापैकी कुठलीही गोष्ट होत असेल तर घरमालक होण्याचा प्रयत्न करू नये. उलट स्वतःच भाडेकरू बनावे. प्लेन अॅण्ड सिम्पल.
(भाडेकरूंचा घरमालक)
साधी गोष्ट आहे, घरमालकाने
साधी गोष्ट आहे, घरमालकाने स्वतःची जागा बाजारात मांडली आहे. भाडेकरूने करारानुसार ती भाड्याने घेतली आहे. यात नैतिकतेचा प्रश्न कुठून आला? कायदा भाडेकरूच्या बाजूने झुकणारा असेल (उदा. रेंट कंट्रोल) किंवा त्याची अंमलबजावणी झटपट होणारी नसेल (उदा. भाडेकरूला एक महिन्याच्या आत हुसकावून लावता येत नसेल), यापैकी कुठलीही गोष्ट होत असेल तर घरमालक होण्याचा प्रयत्न करू नये. उलट स्वतःच भाडेकरू बनावे. प्लेन अॅण्ड सिम्पल.
नेमके हेच होते. भाड्याच्या घरांचा पुरवठा कमी होतो. मागणी तीच असते. परिणामतः जी काही भाड्याने उपलब्ध असलेली घरं असतात त्यांचं भाडं वाढतं. भाडेकरूंच्या समस्या वाढतात. व परिणामतः अशा प्रकारच्या भाडेकरूधार्जिण्या कायद्यांची मागणी मूळ धरते व/वा वाढीस लागते.
मी घरमालकांचा एजंट म्हणून ही
मला नेमका याबद्दलच हुंदका दाटतो. सिरियसली.
प्रॉपर्टी ओनर हा आपली व्यक्तीगत गरज (कन्झम्प्शन) पोस्टपोन करून प्रॉपर्टी भाड्याने देतो. भाडेकरूची गरज जास्त असते. घरमालकापेक्षा. पण सरकार व भाडेकरू केवळ संख्याबलाच्या जोरावर त्याच्यावर दादागिरी करतात. रेंट कन्ट्रोल, एव्हिक्शन रिस्ट्रिक्शन्स वगैरे लावली जातात. याचा कडेलोट इथे. ( म्हणूनच मी असे म्हणतो की घरमालकाने भाडेकरूवर उगीचच अन्य्याय करायला हवा. उगीचच जाताजाता भाडेकरू च्या कानाखाली आवाज काढायला हवा. व हे बरोबरच आहे. )