आस्तिकता वि नास्तिकता
आस्तिक्य श्रेष्ठ की नास्तिक्य? या विषयाचा आवाका खूप मोठा आहे आणि प्रचंड सखोल चर्चा होऊ शकते. च-र्चा! वाद नाही. वादाकरीता तर मग धरणीचा कागद केला, समुद्राची शाई आणि प्रत्यक्ष सरस्वती लिहावयास बसली तरी ; )......... तुमच्या लक्षात आतापावेतो २ गोष्टी आल्याच असतील - (१) विषयाचा आवाका (२) सरस्वती चा आदरपूर्वक उल्लेख केला आहे म्हणजे मी आस्तिक आहे. मला आस्तिकतेची बाजू तर घ्यायची आहे परंतु आस्तिकतेच्या काही ढोबळ, अंगभूत मर्यादा स्वीकारुन हा डायलॉग पुढे न्यायचा आहे. तसेच फक्त थिअरी हून मला उदाहरणांची चर्चा आवडेल कारण तसाच माझा पिंड आहे. उदाहरण, दाखला दिला की लवकर समजते.
.
२०-२५ वर्षांपूर्वी एक सायकॉलॉजीचे पुस्तक वाचनात आले होते ज्यात आता लक्षात येते की किंचीत सरसकटीकरण होते. सरसकटीकरण असे की, लेखकाच्या मते जगात २ प्रकारची माणसे असतात - (१) असे लोक जे कोणत्या परिस्थितीस , बाह्य घटक जबाबदार आहेत असे मानतात (२) असे लोक ज्यांचा विश्वास असतो की परिस्थितीवर त्यांचा ताबा असतो. परिस्थितीत आपण सुधारणा करु शकतो किंवा आपणच ती अधिक बिघडवु शकतो असे मानणारे लोक.
.
पैकी कट्ट्रर नास्तिक् हे दुसर्या गटात मोडतात असा माझा कयास आहे. तर कट्टर आस्तिक हे पहील्या गटात मोडतात. आता हे मूळ पायाभूत गृहीतकच चूकीचे असू शकते आणि मग यापुढील बरीच किंवा सर्व मीमांसा (आर्ग्युमेंट?) फोल ठरुही शकते.पण मी निदान सुरुवात तरी या गृहीतकावर करणार आहे. पुढे ट्रेन ऑफ थॉट्स बघू कशी जाते.
.
तर नास्तिकांचा हा स्वतःवरचा वारेमाप विश्वास , आम्हा आस्तिकांना अहंकार व मुख्य म्हणजे उद्धटपणा वाटतो - हे सत्य आहे. अरे तुम्ही एकही अशी जागा मानत नाही जिथे तुम्ही नतमस्तक होता, झुकता. नास्तिक एकतर ते ढोंग तरी करत आहेत किंवा अतिउर्मट तरी आहेत असे वाटते. अगदी सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे की आमच्याकरता, नास्तिक कोडे असतात. याउलट नास्तिकांना, आम्ही अत्यंत लेमळे व बेजबाबदार, स्वतःच्या कृत्याची जबाबदारी न घेणारे वाटत असू असेही शक्य आहे. त्यातून कदाचित नास्तिक स्वतःला श्रेष्ठ समजत असावेत.
.
आता एक उदाहरण पाहू यात. उदाहरण - जवळच्या नातेवाईकांस "डिमेन्शिआ" झाला आहे. यावर कट्टर आस्तिक काय म्हणणार "अरेरे! पूर्वजन्मीचे पाप दुसरे काय?" तर नास्तिक म्हणणार " या व्यक्तीने ताज्या भाज्या-फळे खाल्ल्या का? जंकफूडमुळे फार खाल्ल्याने, व्यायामात हयगय केल्याने, अति अति चिंता केल्याने, कदाचित पुरेशी निद्रा न घेतल्याने, सातत्याने नवनवीन गोष्टी शिकत न राहील्याने दुष्परीणाम झाला असेल का?
म्हणजे नास्तिक व्यक्ती ही दोष बाह्य घटकांवर ढकलण्याहूनही जास्त भर तर्कशुद्ध विचार, विश्लेषण असा सुसंगत विचार करते आहे, आजाराची जबाबदारी उचलते आहे.
याउलट आस्तिक व्यक्तीने देवावर/कर्मांवर दोषटाकला व तिची जबाबदारी संपली. पण तसं नसतं आमच्याही डोक्यात अनेक विचार उमटत असतातच. देवाने फक्त त्या नातेवाईकासच असे का वागवावे? जर नातेवाईकाचा कर्मदोष होता म्हणावे तर असे कर्म करण्याची मूळात त्याला इच्छाच देवाने का द्यावी?
या उदाहरणात अर्थात कुल पॉइन्टस नास्तिकांनाच मिळत आहेत कारण त्यांनी तर्कशुद्ध, सुसंगत विचार केला म्हणून.
पण असा विचार करणं मे नॉट बी इक्विव्हॅलन्ट टू तसे वर्तन करणे. म्हणजे सर्वच नास्तिक लगोलाग ताज्या berries(मेंदूकरता सकस आहार), बदाम खाऊ लागतील, व्यायाम करु लागतात, पुरेशी निद्रा घेऊ लागतात असे काही होत नसावे. पण निदान वैचारीक पाठपुरावा करण्याच्या सवयीमुळे त्यांना अधिक अवेअरनेस (भान) आहे व पुढे त्या भानाचा उपयोग होइल असे म्हणावयास वाव आहे निदान तसे चान्सेस आहेत.
याउलट आस्तिक व्यक्तीने असा विचार न केल्याने पुढे ती व्यक्ती "प्रिव्हेन्टिव्ह मेजर्स" (डिमेन्शिआ टाळण्याची योग्य काळजी) घेइलच असे सांगता येत नाही.
.
पण आस्तिकतेचे काही फायदे आहेत. उदा रोज किंवा सठीसामाशी का होइना पण देवाजवळ स्वतःच्या मनातल्या मनात, मन मोकळं केलं (अर्चना, पादसेवन, कीर्तन वगैरे नवविधा भक्तींपैकी एक आत्मनिवेदन) किंवा ईश्वराची स्तुती केली, काही लडिवाळ म्हणा मंगल म्हणा स्तोत्रे म्हटली तर मूड एकदम चीअर अप होऊन जातो. मन खरच प्रसन्न होते, काहीतरी उत्तम मिळवले (अॅकम्प्लिश केले) असे काहीसे वाटते. ती घटीका क्षणभर का होइना समाधान वाटते, मनाला टॉनिक मिळते, समस्यांचा विसर पडतो, उभारी येते, कोणी त्राता आपल्या पाठीशी ऊभा आहे असा विश्वास मिळतो. हे त्रिवार सत्य आहे. मग असा चितांमणी, असा परीस नास्तिकांकडे असतो का? नाही खरच प्रश्न आहे. पुस्तक वाचून, निसर्गसान्निध्यात, स्वतःला एखाद्या कलेमध्ये बुडवुन कदाचित वरील शेडचे समाधान मिळतही असेल पण मग ते तर आस्तिकांना देखील शक्य आहे. म्हणजे हे तर मान्य आहे ना की आस्तिकांकडे समाधान मिळवण्याचे अधिक मार्ग (अॅव्हेन्युज) आहेत. इथे आस्तिकांना कुल पॉइन्ट मिळतो असे माझे मत आहे. मग भले प्लासिबो इफेक्ट असो पण काही सर्वेक्षणांमधुन हे सिद्धही झाले आहे की रक्तदाबविकार, स्ट्रेसने होण्यार्या व्याधींचे प्रमाण आस्तिकांत कमी असते. मग हा व्यावहारीक फायदा आहेच. अर्थात या फायद्याकरता जाणून बुजुन कोणी आस्तिक होत नाही. तो पिंडच असतो.
.
एक नक्की की एकमेकांना दोघेही बदलू शकत नाहीत. आणि तसा खटाटोप चूकीचा नाही पण निदान व्यर्थ तरी आहे. अजुन एक म्हणजे जर नात्यात एखादा मधुमेह, हृदरोग, कर्करोग असेल तर व्यक्ती आदिं सारख्या रोगांसाठी प्रि-डिस्पोझ्ड असू शकते म्हणजे त्या रोगांना अधिक ससेप्टिबल असू शकते तर मग कशावरुन आस्तिक/नास्तिकतेकरता देखील प्रि-डिस्पोझ्ड नसेल? किंबहुना एकदा कोणत्यातरी उत्तम दर्जाच्या मासिकात वाचलेलेच होते की आस्तिक-नास्तिकतेचेही गुणसूत्र असते म्हणून.
,
अजुन काही उदाहरणे वाचकांनी द्यावीत, जमेल तशी भर घालावी. सहभागी होऊन स्वतःचे व इतरांचे विचार अधिक स्पष्ट करावेत.
लहानपणी परी पुरते, मोठेपणी ईश्वर लागतो - दोन्ही खोटेच
लहानपणी भावनिक आधारासाठी एखादी परीदेखील पुरते. मोठे झाल्यावर अशी काही परी नसते हे स्पष्ट कळते. मात्र मग देव नावाच्या कल्पनेवर विश्वास बसतो. लहानपणी जी परी आहे ते खरे समजत होतो, ते खोटे आहे हे मोठेपणी कळल्यानंतरही पुन्हा कुठल्यातरी खोट्य ग्ृहितकांवर विश्वास ठेवावासा वाटतो. हे स्वत:ची बुद्धी गहाण टाकण्यासारखेच आहे. दुसरे काही नाही.
कोणाला कुठल्या गोष्टीतून
कोणाला कुठल्या गोष्टीतून आनंद/समाधान मिळेल हे सांगता येत नाही. तुम्ही आस्तिकांना आनंद देणार्या गोष्टी जास्त असतात असं मानून आनंद मिळवताय.. तेव्हा त्यात खूष रहा आणि काय म्हणणार.. उगाच अट्टाहासाने नास्तिकांचे आनंद मिळवण्याचे मार्ग जास्त हे सिद्ध करून काय मिळवणार .. शेवटी मार्ग कितीही असले तरी ते वापरून आनंद मिळवणे महत्वाचे.. :-)
सप्रेजी अगदी बरोबर हाच मुद्दा
सप्रेजी अगदी बरोबर हाच मुद्दा माझ्याही डोक्यात आलेला होता की भलेही एकाकडे सुखी होण्याचे १०० मार्ग आहेत व दुसर्याकडे १ पण जर पहील्याने ते मार्गच वापरले नाहीत तर त्याला काय उपयोग? याउलट दुसर्याने एकच मार्ग जरी नियमित वापरला तरी त्याचे कल्याण झाले.
.
पण मला हेच म्हणायचे आहे की सहसा आस्तिक लोक खरोखर आंतरीक ओढीने जप/कीर्तन्/स्वनिवेदन वगैरे "चित्त आत वळविण्याचे/ अंतर्मुख होण्याचे" मार्ग, स्ट्रेस-बस्टर्स नियमित चोखाळतात.
नास्तिकांचे समाजातील स्थान इ.
१.खूपदा नास्तिक म्हणजे भावनाशून्य, प्रेम न समजणारी माणसे असे समीकरण मांडले जाते. मला स्वतःला (नास्तिक असल्याने) गणपती,करवा चौथ, दसरा सणांच्या वेळी
इमारतीमधील कार्यक्रमात सहभागी होण्यात अजिबात रस नसतो. अशा वेळेस मला माणूसघाणी/antisocial असे लेबल लावले जाते.
२.जनगणनेमध्ये सुद्धा आपण निधर्मी लिहण्याची मुभा आतापर्यंत नव्हती. गेल्या वेळेला सरकारी शाळेतील एक शिक्षका रकाने भरायला आल्या होत्या. त्यांना मी पेपरातील कात्रण दाखवले की निधर्म लिहायला हरकत नाही. तरीही त्या म्हणत होत्या की नाव तर हिंदु आहे मग हिंदु लिहायला काय हरकत? ही जबरदस्ती झाली.
जसजशी नास्तिक लोकांची संख्या वाढेल तसतसा लोकांचा दृष्टीकोणसुद्धा बदलेल. दाभोळ्कर, पानसरे, कलबुर्गी सारख्या मंडळींना संरक्षण मिळू शकेल.
३. कित्येकदा एकीकडे स्वतःला नास्तिक म्हणवणारी माणसे पी.के. सारखा सिनेमा बघितल्यावर त्या मध्ये हिंदूची टर खेचली म्हणून चिडलेली बघितली की गंमत वाटते. धर्माची मुळे इतकी रुतलेली असतात की आस्तिक की नास्तिक हे नक्की ठरवायला हिंमत लागते.
बाकी सर्व मुद्दे बिनतोड,
बाकी सर्व मुद्दे बिनतोड, पणः
मला स्वतःला (नास्तिक असल्याने) गणपती,करवा चौथ, दसरा सणांच्या वेळी इमारतीमधील कार्यक्रमात सहभागी होण्यात अजिबात रस नसतो.
इमारतीमधील कार्यक्रमात सहभागी होण्यातला रस हा नेहमीच ईश्वर मानण्या / न मानण्याशी संबंधित नसतो. लग्न, समारंभ, पूजा वगैरे गोष्टी अनेकदा केवळ एकत्र येऊन मजा करण्यासाठीही असतात.
मी एकूणच ज्या चर्चा वाचतो त्यात हिंदू धार्मिक मनुष्य जे सण / व्रत / कर्मकांड करतो ते तो फार खोल निष्ठायुक्त श्रद्धेने करतो (आणि भाग्य, यश यासाठी त्यावर खूप खूप अवलंबून असतो) असं एक गृहीतक आहे. बहुसंख्यांच्या बाबतीत हे सर्व केवळ मनोरंजनाचं एक साधन असतं. चार दिवसात फटाफट अष्टविनायक "करणं", नवस बोलणं आणि फेडणं, दरवर्षी माताजी की चौकी बसवणं, गावच्या जत्रेला आपल्या घराण्याला जो काही "मान" दिला जातो त्यासहित रजा टाकून तिकडे जाऊन भाग घेणं अशा अनेक कृती लोक म्हटलं तर धार्मिक श्रद्धेने आणि म्हटलं तर मनोरंजन, विरंगुळा म्हणून करत असतात असं स्पष्ट दिसतं.
फ्रँक घातक अंधश्रद्धा म्हणजे ज्यातून स्वतःला आणि इतरांना तीव्र अपाय होईल अशा गोष्टींविरुद्धच कारवाई किंवा तत्सम काही व्हायला हवं. एरवी बहुतांश लोक बहुतांश गोष्टी कॅज्युअली, आनंदापुरत्या करत असतात.
आस्तिकांची श्रद्धा नास्तिकच फार जास्त सिरियसली घेतात असं दिसतं.
उगाच?
आस्तिकांची श्रद्धा नास्तिकच फार जास्त सिरियसली घेतात असं दिसतं
उगाच काहीतरी टाळ्याखाऊ वाक्य. उद्या म्हणाल अंधश्रद्धा, अवैज्ञानिक गोष्टी शास्त्रज्ञच फार सिरीयसली घेतात म्हणून. श्रद्धेतला गाढवपणा जाणवणं हा नास्तिकांचा स्वाभाविक गूण आहे, नाहीतर तेही आस्तिकच राहिले नसते का?
बाकी, आता आम्ही इथे प्रतिसाद दिला म्हणून लगेच, अतार्तिकता तार्किक लोकच जास्ती सिरीयसली घेतात असे म्हणू नका म्हणजे झालं!
श्रद्धेतला गाढवपणा जाणवणं हा
श्रद्धेतला गाढवपणा जाणवणं हा नास्तिकांचा स्वाभाविक गूण आहे
गाढवपणा? उद्या पारलौकिक शक्तीचे अस्तित्व सिद्ध झाले तर हेच वाक्य मागे घेणार का? आपल्याला माहीत नसलेल्या सर्व गोष्टींना गाढवपणा निदान वैज्ञानिक तरी म्हणत नाहीत. ते एवढेच म्हणतात की अजुन/अद्याप सिद्ध व्हायचे आहे पण तसे ते सिद्ध होणारच नाही अशी हमी देऊ शकत नाही.
.
तुमच्या विचारांची कवाडं बंद करुन स्वतःला कसे हो वैज्ञानिक म्हणवता? ;)
.
जसे देव आहे हे सिद्ध झालेले नाही तसाच तो नाही हेदेखील सिद्ध झालेले नाही.
____
ऊप्स!! पण हेसुद्धा तितकेच खरे आहे की उद्या अब्राकाडाब्रा असा एक डोळा हिरवा व एक डोळा लाल,एक शिंगी पक्ष्यावर जर मी म्हटलं की माझा विश्वास आहे तर तो जोपर्यंत नाही हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तो असू शकतो असे म्हणा - हे विधानही निरर्थक आहे :(
मूळात काय ही चर्चाच फोल आहे की काय? आपण आपल्या मार्गाने जावे. स्वभावधर्मानुसार वागावे हेच खरे :(
सिद्ध?
गाढवपणा? उद्या पारलौकिक शक्तीचे अस्तित्व सिद्ध झाले तर हेच वाक्य मागे घेणार का? आपल्याला माहीत नसलेल्या सर्व गोष्टींना गाढवपणा निदान वैज्ञानिक तरी म्हणत नाहीत
जे सिद्ध झालेले नाही त्यावर विश्वास ठेवणे ला गाढवपणाच म्हणतात. उद्या सिद्ध होईल या करता तुमच्याकडे काही विश्वासार्ह माहिती आहे का? नसेल तर असल्या गाढवपणावर विश्वास ठेवू नका.
उद्या पारलौकिक शक्तीचे
उद्या पारलौकिक शक्तीचे अस्तित्व सिद्ध झाले तर हेच वाक्य मागे घेणार का?
होय, तुमच्यात जर ती शक्ती असेल तर सिद्ध करा, घेऊ वाक्य मागे. पण तोवर नाही.
जसे देव आहे हे सिद्ध झालेले नाही तसाच तो नाही हेदेखील सिद्ध झालेले नाही.
एखादी गोष्ट नाही हे सिद्ध कसे करायचे ते दाखवा, अन्यथा हा युक्तिवाद निष्फळ आहे.
तुमच्या विचारांची कवाडं बंद करुन स्वतःला कसे हो वैज्ञानिक म्हणवता?
वैज्ञानिक विचारांची कवाडं बंद करत नाहीत, तो अधिकार तर खास आस्तिकांचा!
वैज्ञानिक फक्त जपजाप्य करणं आणि रम्मी खेळणं यात काही फरक नाही असं मानतात. दोन्ही स्वतःचा जीव रमवायच्या गोष्टी!!!
श्रद्धेतला गाढवपणा जाणवणं हा
श्रद्धेतला गाढवपणा जाणवणं हा नास्तिकांचा स्वाभाविक गूण आहे, नाहीतर तेही आस्तिकच राहिले नसते का?
नाही नाही. मला म्हणायचंय की बहुतांशांमधे ती कर्मकांडं , कृती = अडाणी भोळसट गाढवपणा वगैरे नसतोच मुळी. दे देमसेल्व्हज आर नॉट डूईंग इट अॅज सिरियसली अॅज यू थिंक ऑफ देम टु बी डूईंग.
त्या कर्मकांडातही फार खोल तत्वांनिशी कोणी काही करत नसतं. ते नुसतं करमणूक, एकत्र येण्याचं निमित्त इतकंच असतं.
अंगाराही लावू, गंडाही बांधू, परीक्षेत कॉपीही जमल्यास करु अन जमेल तसा अभ्यासही करुन पाहू,आणि गणपतीलाही डोकं टेकून येऊ.. अशा छापाचा कॅज्युअल दृष्टिकोनच असतो. फार सिरियसली नसतं ते सगळं केलेलं.
असा मुद्दा आहे.
हम्म
जे लोक हे मान्य करतात अशा लोकांना नास्तिकांनी कडाडून विरोध केल्याचे (म्हणजे सिरीयसली घेतात वगैरे म्हणताना) मी तरी पाहिलेले नाही. मी स्वत: सार्वजनिक गणपतीला जातो. सत्यनारायणाच्या पुजेत जेवायला बोलावले (अन जेवण चांगले मिळेल अशी खात्री असेल) तर जातो. त्यामुळे ज्या लोकांच्या श्रद्धाच तकलादू आहेत त्यांना फार विरोध करावाच लागत नाही. पण "कुणास ठावूक असेल ब्वॉ" असे म्हणून श्रद्धा सोडायला तयार नसलेल्यांना (उदा. शुचि काकू) दोन चार प्रतिसाद दिले, किंवा चर्चा केली म्हणजे तेच आमचे सिरीयस टारगेट आहे असे कोणी समजू नये इतकंच.
पूजाम हळदीकुंकू वा तत्सम
पूजाम हळदीकुंकू वा तत्सम समारंभ हे एकत्र येण्याचं निमित्य असतं हे समर्थन पुष्कळदा केलं जातं. पण अश्या ठिकाणीच श्रद्धेची पाळमुळं रुजतात. हीच श्रद्धा पुढे अंधश्रद्धेत परावर्तित होण्यास वेळ लागत नाही. जी माणसे स्वतःवर, प्रयत्नांवर विश्वास ठेवू शकतात ती तरतात. बाकीच्या आळशी वा कल्पनातीत कठीण परिस्थितीला तोंड देणारे त्या श्रद्धेच्या सागरात अखंड बुडतात आणि दुसर्^यांनाही ओढू बघतात.
आस्तिकता स्वतःपूरती असायला हरकत नाही पण त्याचा असा बाजार सुरू केला की परिस्थिती कठीण होते.
मी नास्तिक नाही. मात्र
मी नास्तिक नाही. मात्र आस्तिकही नाही.
बहुतेकदा हिंदू जीवनपद्धती आचरणारा नि एक देव आहे की नाही यावर विचारही करू न इच्छिणारा (त्यात माझ्या आयुष्याचा वेळ घालवू न इच्छिणारा) आणि विचार आणि वैयक्तीक आयुष्यात ढिगभर विसंगती बाळगत जगणारा एक दांभिक जीव आहे. मला केवळ माझा फायदा कळतो.
आस्तिक व नास्तिक या दोघांच्याही ठामपणाबद्द्ल माझी तुफान करमणूक होते
किंचित भर + डी. ओ. ओ. >>असे
किंचित भर + डी. ओ. ओ.
>>असे लोक ज्यांचा विश्वास असतो की परिस्थितीवर त्यांचा ताबा असतो. परिस्थितीत आपण सुधारणा करु शकतो किंवा आपणच ती अधिक बिघडवु शकतो असे मानणारे लोक.>>
नास्तिक लोक (फक्त) स्वतःच्या(च) कर्तबगारीवर विश्वास ठेवतात हे तितके खरे नाही. मी स्वत: नास्तिक आहे असे मी समजतो. परंतु एखाद्या यशासाठी किंवा अपयशासाठी कोणी पूर्णपणे स्वतःच जबाबदार आहे असे मात्र मानत नाही. उलट यशापयशात अनेक सामाजिक/कौटुंबिक वास्तवांचा वाटा असतो असे मी मानतो. [गब्बर सिंग यांच्याशी अनेक खरडसंवाद याबाबत झाले आहेत]. श्रेय/जबाबदारी देवाला देत नाही याचा अर्थ स्वतःला घेतो असे नाही. किंवा परिस्थिती बदलू शकतोच असे मानत नाही.
नास्तिकपणा ची व्याख्या "निसर्गनियमांना वाकवू शकणारी कोणतीही शक्ती अस्तित्वात नाही असे मानणे" ही करता येईल का?
स्वतंत्र मांडणीबद्दल अभिनंदन
या अशा मांडणीमध्ये मला अडचण अशी जाणवते की आस्तिक किंवा नास्तिक हे (आणि असे बरेच करता येतील) गट असले तरीही त्यात स्वतंत्र व्यक्ती असतात. त्यांचे आपापले स्वतंत्र विचार असतात, विशेषतः देव न मानणाऱ्यांचे. उदाहरणार्थ Nile नास्तिक आहे आणि मी पण. आमचे, या संदर्भातले सगळे विचार जुळतात अशातली गत नाही. तरीही आम्ही दोन मराठी, उदारमतवादी, पुरोगामी, मूर्तीभंजक, भडक माथ्याचे लोक. मग जगात कितीतरी निरनिराळ्या पार्श्वभूमीतून आलेले, वेगवेगळ्या स्वभावांचे नास्तिक आहेत त्यांना एकाच बॉक्सात टाकणं अडचणीचं आहे.
दोन दिवसांपूर्वी एका मैत्रिणीशी गप्पा मारत होते. ती म्हणाली की ती ९०% पेक्षा अधिक नास्तिक आहे, पण १००% नाही. मला तेही काहीसं पटलं. "मला कोणत्यातरी आधाराची गरज आहे म्हणून मी कोणत्यातरी अज्ञात शक्तीवर भरवसा ठेवते. पण देवाधर्मावर, कर्मकांडांवर माझा विश्वास नाही", असं तिचं म्हणणं. कोणतीतरी शक्ती आहे म्हणून आपण हातावर हात धरून बसावं असंही तिला वाटत नाही. कोणीतरी आपल्या आधाराला आहे, या विचाराच्या आधारावर ती कृती करते. वर्तन पूर्णतः नास्तिक पण विचार नास्तिक नाहीत.
हे खरे आहे. आस्तिकतेच्याही
हे खरे आहे. आस्तिकतेच्याही छटा असतात. व्यक्तीच्यापिंडानुरुप ती बदलत असते. उदा -
(१) माझे आजोबा रोज २१ वेळा रामरक्षा म्हणत.
(२) मी मूडनुसार देवाची स्तोत्रे म्हणते. शिवाय असेही लहात आले आहे की पाळीच्या आधी - पाळीमध्ये ही स्तोत्रे म्हणण्याची प्रचंड हुक्की येत. हे नीरीक्षण आहे. आणि यामागचा कार्यकारणभाव हा १००% मूडशीच संबंधित आहे. अन्य वेळी एकदम मॅनिअॅक नाही अगदी पण अतिप्रसन्न असलेला मूड त्या काळात प्रचंड मेलो बनतो, हळूवार बनतो - परत हार्मोन्स रिलेटेड. आणि पाळीच्या काळात स्तोत्रे म्हणायला अज्जिबात लाज्/संकोच वाटत नाही.
(३) आम्ही बाहेर निघताना कार सुरु केली की "निर्विघ्नं कुरु मे देव..." वाला श्लोक म्हणत असू म्हणजे ही अॅनॉइंग सवय मीच लावली होती की बाबा त्यामुळे का होइन एक श्लोक का होइना मुलीने शिकावा. पण झालं उलटच, तो श्लोक म्हटला नाही तर मुलीला/नवर्याला बेचैन वाटू लागले. हे प्रकरण कंपल्सिव्ह होतय हे लक्षात येताच मी ते हाणून पाडलं.
(४) बाबा नास्तिक होते पण गणपती त्यांचा वीक पॉइन्ट होता/आहे. अगदी हेच, असेच पूर्वी अस्वल यांनीही उल्लेखिले आहे की ते स्वतः नास्तिक आहेत पण गणपती त्यांचा वीक पॉइन्ट आहे.
___
अरेच्च्या होकी हे वरवरचे फरक झाले खरं तर गुणात्मकदृष्ट्या देखील काही फरक असावेत.
उदा - मी प्रचंड पापभीरु आहे. म्हणजे जरा कुणी दुखावलं/ हिंसा वगैरे झाली की मला वाटतं शाप मिळाला. आणि मनोधैर्य खच्ची होतं. हे असं सर्व आस्तिकांचे नसावे. जिहादवाले आस्तिक तर माहीतच आहेत आपल्याला. अनेकांचे बळी घेऊन अल्लाला प्यारे होऊ इच्छिणारे.
लंगडं
पण आस्तिकतेचे काही फायदे आहेत. उदा रोज किंवा सठीसामाशी का होइना पण देवाजवळ स्वतःच्या मनातल्या मनात, मन मोकळं केलं (अर्चना, पादसेवन, कीर्तन वगैरे नवविधा भक्तींपैकी एक आत्मनिवेदन) किंवा ईश्वराची स्तुती केली, काही लडिवाळ म्हणा मंगल म्हणा स्तोत्रे म्हटली तर मूड एकदम चीअर अप होऊन जातो. मन खरच प्रसन्न होते, काहीतरी उत्तम मिळवले (अॅकम्प्लिश केले) असे काहीसे वाटते. ती घटीका क्षणभर का होइना समाधान वाटते, मनाला टॉनिक मिळते, समस्यांचा विसर पडतो, उभारी येते, कोणी त्राता आपल्या पाठीशी ऊभा आहे असा विश्वास मिळतो. हे त्रिवार सत्य आहे. मग असा चितांमणी, असा परीस नास्तिकांकडे असतो का? नाही खरच प्रश्न आहे. पुस्तक वाचून, निसर्गसान्निध्यात, स्वतःला एखाद्या कलेमध्ये बुडवुन कदाचित वरील शेडचे समाधान मिळतही असेल पण मग ते तर आस्तिकांना देखील शक्य आहे. म्हणजे हे तर मान्य आहे ना की आस्तिकांकडे समाधान मिळवण्याचे अधिक मार्ग (अॅव्हेन्युज) आहेत. इथे आस्तिकांना कुल पॉइन्ट मिळतो असे माझे मत आहे. मग भले प्लासिबो इफेक्ट असो पण काही सर्वेक्षणांमधुन हे सिद्धही झाले आहे की रक्तदाबविकार, स्ट्रेसने होण्यार्या व्याधींचे प्रमाण आस्तिकांत कमी असते. मग हा व्यावहारीक फायदा आहेच. अर्थात या फायद्याकरता जाणून बुजुन कोणी आस्तिक होत नाही. तो पिंडच असतो.
देव वगैरे भाकड गोष्टींवर विश्वास ठेवण्याकरता तुम्हाला असल्या लंगड्या समर्थनाची मदत घ्यावी लागते यातच सगळं आलं. अधिक काय लिहणे?
मुहूर्तही चांगला निघाला आजचा.
मुहूर्तही चांगला निघाला आजचा. हे बघा -
Pope Francis recognises second Mother Teresa 'miracle'
बघा बघा पोपसारखे गोरे त्यात
बघा बघा पोपसारखे गोरे त्यात प्रथितयश लोकही ....
हा खरंतर तपकिरी कातडीच्या लोकांचा डाव आहे. ब्राऊन कातडीच्या लोकांच्या देशात काम केलेल्या मदर तेरेसांना संत बनवलं नाही तर रेसिझमचा आरोप गोऱ्या लोकांवर करता येईल; संत बनवलं तर अंधश्रद्धेचा आरोप. बिच्चारे गोरे धार्मिक लोक!
ह्म्म्म
एकेकाळी मला ह्या प्रश्नात खूप रस होता. की माझे मित्र आस्तिक आहेत की नास्तिक? देव मानतात का? का मानतात? असलं सगळं.
मग मी उदय चोप्राचे चित्रपट एकामागे एक पाहिले. सलग ३ दिवस. (मोहोब्बते-नील अँड निक्की-धूम२). हा माणूस चित्रपटांत कामं करतो. लोक ते बघतात.
ह्या असल्या (आणि आणखी भयानक) गोष्टी ऑलरेडी अस्तित्त्वात आहेत. तेव्हा देव असलाच तर कुचकामी, नसलाच तर प्रश्नच मिटला.
मला आता देव असल्याने किंवा नसल्याने काहीच फरक पडत नाही.
.
पण तरीही कधीतरी टाईमपास म्हणून चर्चा करायला आस्तिक/नास्तिक हा टॉपिक मी ठेवलेला आहे.
आत्ताच असं ऐकलं की धूम-४ येतोय. काही कळत नाही जगात काय चालतं.
.
Ephesians 1:9
=))
मग मी उदय चोप्राचे चित्रपट एकामागे एक पाहिले. सलग ३ दिवस. (मोहोब्बते-नील अँड निक्की-धूम२). हा माणूस चित्रपटांत कामं करतो. लोक ते बघतात.
ह्या असल्या (आणि आणखी भयानक) गोष्टी ऑलरेडी अस्तित्त्वात आहेत. तेव्हा देव असलाच तर कुचकामी, नसलाच तर प्रश्नच मिटला.
तुमची श्रद्धा कमी पडतेय, अस्वलभौ. उदय चोप्राच्या अस्तित्वामागे फारएन्डरावांच्या प्रतिभेला कच्चा माल मिळावा हाच हेतू असावा. देवाची करणी वर्क्स इन मिस्टरीयस वेज्!
लेख आवडला. मी आस्तिक आहे पण
लेख आवडला. मी आस्तिक आहे पण अंधविश्वासी नाही. देवावर श्रद्धा ठेवणारा कधीच अंधविश्वासी होऊ शकत नाही. महर्षी रामदेव म्हणतात 'निराश आणि पौरुषहीन हीन व्यक्ती' अंधविश्वासाच्या जाळ्यात अडकतात.
बाह्य घटनांचा प्रभाव हि आपल्या कर्तृत्ववावर पडतोच. आस्तिक व्यक्ती निराश न होता 'भगवंताची इच्छा' समजून पुन्हा जोमाने कामाला सुरुवात करतो. पण नास्तिक व्यक्ती अश्या वेळी निराश होऊन अंध विश्वास (जोतिष, टोने-टोटके, इत्यादी) च्या अडकण्याची शक्यता जास्ती.
माझेच उदाहरण २००७ मध्ये ७ महिने बिछान्यावर होतो, त्या नंतर दिल्लीतल्या २००८ ते २०१४ दिल्लीतल्या, माता चान्नन देवी, RML, सफदरजंग, FORTIS इत्यादी हॉस्पिटलांचे दर्शन घेतले. भगवंतावर विश्वास असल्यामुळे निराशाची भावना कधीच मनात आली नाही. आज हि सकाळी ७.१५ला घर सोडतो आणि ९च्या आधी कार्यालयात हजर राहतो. पूर्ण श्रद्धेने कार्य करतो.
अजुन एक, बरेचदा आम्ही आस्तिक,
अजुन एक, बरेचदा आम्ही आस्तिक, स्वतःची ब्लेसिंग्स (वरदान) मोजतो व देवाला धन्यवाद देतो. जसे मला नाकीडोळी नीट ठेवलेस, मला एक उत्तम कुटुंब दिलेस, आर्थिक सुरक्षितता दिलीस, .... यंव न ट्यंव त्याबदाल मी तुझी आभारी आहे.
.
नास्तिक नक्की कोणाचे आभार मानतात? जसी नाकी डोळी नीट असणे हे काही स्वतःचे कर्तुत्व नाही आणि तरीही ती एक उल्लेखनिय, समाधानाची बाब आहे. मग अशी कृतज्ञतेची भावना ते कुठे उपस्थित करतात?
नाकीडोळी धड असण्याबद्दल मला
नाकीडोळी धड असण्याबद्दल मला फार घेणंदेणं नाही (सौंदर्य या दृष्टिकोनातून). हातीपायी धड असण्याबद्दल आईवडील, उत्क्रांती आणि नशीब. नशीब कारण बरोबर तेच ठराविक बीजांडं आणि तोच ठराविक शुक्रजंतू ही कोणाचीही निवड नसते.
शिक्षण, नोकरी, समानता, संधी या बाबतीत समाजसुधारक आणि घरातले, आजूबाजूचे सगळे संवेदनशील लोक.
लोकांना अपंग, पोलियो,
लोकांना अपंग, पोलियो, कुष्ठरोग वगैरेसहित जन्म देण्याबद्दल काय करता हो तुम्ही तुमच्या त्या देवाचं?
मला यापलिकडचा प्रश्न पडतो. एके काळी देवी, पोलियो वगैरे होण्याबद्दल देवाला दोष देत असणारे लोक किमान देवाची तसं घडवून आणण्याची शक्ती मानत होते. आता या रोगांवर लशी निघाल्यापासून देवाची ती शक्ती कमी झाली आहे असं लोक मानतात का? की देवाने विसाव्या शतकात अचानक करुणा दाखवून मानवाला हे ज्ञान दिलं? हाच प्रश्न दुष्काळात अन्नान्न होऊन तडफडून मरणारे लोक, इन्फ्लुएंझाच्या साथीत कोट्यवधीने दगावणारे लोक यांबद्दलही विचारता येईल.
प्रयत्नवाद आणि भाग्यस्विकृती
माझ्यापुरता बोलायच झालं तर आस्तिकतेकडून अज्ञेयवादाकडे आणि आता नास्तिकतेकडे प्रवास होतोय. (विश्वाच्या निर्मितीपूर्वी) "काय" आणि "का" या प्रश्नांची उत्तर शोधणंच मूळी मला आता निरर्थक वाटू लागले आहे. एखाद्या संख्येला शून्याने भागायचा प्रयत्न केल्यासारखे. जे काही झालंय, घडतंय त्यात उत्क्रांतीवाद उघड उघड दिसतो. त्यामुळे अगदीच सुपरपावर असण्याची खरंच गरज वाटत नाही. श्रद्धा आहे पण ती या उत्क्रांतीवादावर. विश्वाचं जाऊद्या, साधा सेलफोन घेतला तर, सिंबियॉन पासून अॅन्ड्रॉईड पर्यंत टप्याटप्यानेच प्रगती झाली. एका फटक्यात सुपरपावरने "म्हाळसाचा टॅब" निर्माण नाही केला. काही गोष्टी खरचं आपल्या नियंत्रणाबाहेर असतात त्या मी भाग्यस्विकृती म्हणून स्विकारतो.
तरीही व्यक्तिगत जीवनात माणूस कुठल्याशा ध्येयाने/कुठल्यातरी आशेने (इन्सेंटीव्ह्ज)/ईच्छेने प्रेरीत असतो. त्या ईच्छा कुठून आणि का जन्माला येतात याही प्रश्नाचे उत्तर मला तितकेसे महत्वाचे वाटत नाही. असेलही कदाचित विश्व आणि माणसामध्ये अद्वैत. पण त्या इच्छा असतात हे खरं आणि त्या इच्छापूर्तीसाठी माणसं कर्म करतात हेही खरं. "उत्क्रांतीवादाच्या पायार्यांचा आपण एक छोटासा दगड आहोत, त्यामुळे हाती घेतलेलं काम अधिक चांगल्या पद्धतीने करून इच्छापूर्तीच्या दिशेने पाउल टाकणं" हा विचार माझी अध्यात्माची भूक भागवतो.
तरीही प्रयत्नवादाचे घोडे भाग्यस्विकृतीच्या इलाक्यात आपण कितपर्यंत दामटवू शकतो? वा प्रयत्नवाद आणि भाग्यस्विकृती यातली फुसट रेषा कशी ओळखावी या प्रश्नांची उत्तरं अनुत्तरीतच आहेत. ती कालओघात मिळतील ही आशा आहे.
काय मग शेवटी आपल्याला कोण
काय मग शेवटी आपल्याला कोण व्हायचयं? अस्तिक नास्तिक की अज्ञेयवादी?
डोंट वरी आपल्याला गरजे प्रमाणे या गटातून त्या गटात जायची मुभा आहे. आता पक्ष बदलला तर तुम्हाला त्या त्या गटातील बुजुर्ग गद्दार म्हण्णार नाहीत पण 'कच्च मडकं' म्हणतील.
या चर्चेतील सर्वांनी एक पुस्त्क जरुर वाचावे
विवेकवाद विज्ञान आणि श्रद्धा- मे.पुं.रेगे
प्रकाशक-लोकवाङ्मय गृह
विशेषतः त्या पुस्तकातील विभाग तिसरा
मी अस्तिक का आहे?
परंपरागत श्राद्ध
देवाशी भांडण
धार्मिक श्रद्धा आणि ईश्वराचे अस्तित्व
आस्तिक राहणं हे मनाच्या
आस्तिक राहणं हे मनाच्या उभारीसाठी काही लोकांना गरजेचं वाटतं. हत्तीचं तोंड असणारा माणूस खराखुरा अस्तित्वात असू शकत नाही (आजच्या काळात असा कोणी दिसलाच तर आपण त्याला बर्थ-डिफेक्ट म्हणू. ) ध्रूव बाळ खरोखर ध्रूव तार्याच्या ठिकाणी बसलेला नाही हे त्यांच्या मेंदूला पटत असतं पण तरीही बर्याच लोकांना कुबड्यांशिवाय चालता येत नाही... किंवा चालता येऊ शकेल असा विश्वास वाट॑त नाही. जगात बहुसंख्य लोकं अशीच असल्यामुळे देव ही 'कल्पना' अजून टिकून आहे. जसा जसा समाज प्रगत होत जाईल तशी तशी देवाची गरज कमी कमी होत जाईल, मग आस्तिक / नास्तिक हा प्रश्नच उरणार नाही (आशावाद).
नास्तिकतेच्या ढोबळ व्याख्या
फक्त देवपूजा न करणं किंवा मंदिरात न जाणं या नास्तिकतेच्या खूपच ढोबळ व्याख्या झाल्या. मीही ते करत नाही, पण तरी मी स्वतःला नास्तिक समजत नाही. आणि मी पूर्णपणे अस्तिक नाही हे ही मला मान्य आहे. मला वाटत पूर्णपणे नास्तिक किंवा आस्तिक समजणे या दोन्ही खूप टोकाच्या भूमिका झाल्या. आणि त्या सिद्ध करायलाही तशाच टोकाच्या परिस्थितीमधून जावे लागेल. समजा, बोटीतून प्रवास करताना तुम्ही समुद्रात पडलात (किंवा कुणी ढकललं ;)) आणि बोट तुम्हाला सोडून निघून गेली, आणि तरीही तुम्ही देवाचा किंवा कुठल्याही अज्ञात शक्तीचा धावा केला नाहीत, किंवा एखाद्या चमत्काराची वाट पहिली नाहीत, तर कदाचित तुम्ही पूर्णपणे नास्तिक आहात हे सिद्ध होईल. पण ते किती नास्तिक म्हणवून घेणाऱ्या लोकांना शक्य होईल? अशा कठीण प्रसंगात जर तुमचे नास्तिकतेचे आवरण गळून पडणार असेल तर आधी तुम्ही खरेच नास्तिक होतात का?
फक्त या आणि याच कारणासाठी मी स्वतःला नास्तिक समजत नाही. अशावेळी मला स्वतःला तरी एखादा चमत्कार झालेला आवडेल. :)
तुम्ही काय करता
बोटीतून प्रवास करताना तुम्ही समुद्रात पडलात (किंवा कुणी ढकललं (डोळा मारत)) आणि बोट तुम्हाला सोडून निघून गेली, आणि तरीही तुम्ही देवाचा किंवा कुठल्याही अज्ञात शक्तीचा धावा केला नाहीत, किंवा एखाद्या चमत्काराची वाट पहिली नाहीत, तर कदाचित तुम्ही पूर्णपणे नास्तिक आहात हे सिद्ध होईल
पाण्यात चुकून पडल्यावर तुम्ही काय तरंगायचा प्रयत्न करायचं सोडून हात जोडून प्रार्थना करता का हो?
अधले-मधले व्यक्तिमत्त्व
आस्तिक म्हणजे एकदम ठामपणे देवावर विश्वास ठेवणारे आणि नास्तिक म्हणजे तितक्याच ठामपणे हा सगळा भंपकपणा आहे, असे म्हणणारे मानले; तरी या दोघांच्या मधे असणारे पण आहेत ना? Agnostic म्हणतात की देव आहे की नाही, हे मला नक्की माहित नाही आणि कदाचित कुणाला कधी माहीतही होणार नाही (unknown and perhaps unknowable).
पण या व्यतिरिक्त माझ्यासारखेपण काही असतील जे Apatheism च्या विचाराचे असतील. व्यक्तिशः मला देव आहे की नाही हा विचारच निरर्थक वाटतो. (apathy, disregard, or lack of interest). अशी शक्ती असेल किंवा नसेल, तरी मला काही फरक पडत नाही आणि त्यामुळे माझे काही अडतही नाही. माझ्या आयुष्यात देव या संकल्पनेची गरज अनावश्यक आणि निरर्थक आहे. उद्या कधी देव आहे अथवा नाही, हे जरी सिद्ध झाले तरी माझ्या आयुष्यात काहीही फरक पडणार नाही.
माझे बहुतेक विचार हे पुढील (७ व्या मिनिटानंतरच्या) विडिओप्रमाणे आहेत.
(संपादनः विडिओ एम्बेड करता येत नाहीये म्हणून नुसती लिंक दिली आहे.)
विचार करता करता अजुन एक गोष्ट
विचार करता करता अजुन एक गोष्ट लक्षात आली ती ही की, कदाचित संस्कार किंवा ब्रेन वॉशिंगमुळे काही का असेना पण आस्तिकांचे काल्पनिक का होईना, ईश्वराबरोबर एक नाते तयार झालेले असते. इतर नात्यांप्रमाणेच ,प्रत्येकाच्या नात्याचा रंग ज्याच्यात्याच्या प्रकृतीवरती अवलंबून असतो. आणि हे नाते एकदम तोडणे कठीण असते खरं तर दु:खदच असते. मग त्याला कोणी मंत्रचळ, सवय, परावलंबनही म्हणू शकतो.
___
नास्तिकांविषयी मला कुतूहल आहे - त्यांचे नाते कधी तयारच होत नाही का? लहानपणापासून ते प्रश्नातच किंवा देवाच्या डिनायलमध्येच जगतात का? जर एखाद्या काळी त्यांचे काल्पनिक का होईना ईश्वराशी नाते जोडले गेलेले असेल तर ते कसे तुटते? आणि ते तसे तुटतेवेळी त्यांना त्रास होतो का?
मी नास्तिक आहे म्हणून उत्तराचा प्रयत्न
>>नास्तिकांविषयी मला कुतूहल आहे - त्यांचे नाते कधी तयारच होत नाही का? लहानपणापासून ते प्रश्नातच किंवा देवाच्या डिनायलमध्येच जगतात का? जर एखाद्या काळी त्यांचे काल्पनिक का होईना ईश्वराशी नाते जोडले गेलेले असेल तर ते कसे तुटते? आणि ते तसे तुटतेवेळी त्यांना त्रास होतो का?
मी लहानपणी चाळीत रहात असे त्या चाळीला लागून दत्ताचे देऊळ होते. त्या देवळात मी ऑलमोस्ट रोज सकाळ संध्याकाळ आरतीला जात असे. मी त्या वेळी चार-पाच वर्षांचा असेन. परंतु त्या जाण्यात कुठल्याही प्रकारची भक्ती असेलसे वाटत नाही. त्यानंतरही दर शनिवारी मारुतीला जात असे. त्यातही मारुतीशी नाते वगैरे असल्याचे स्दत्तमरत नाही. रूढीप्रमाणे निदान शाळेत असेपर्यंत संध्याकाळी शुभं करोति अथर्वशीर्ष रामरक्षा म्हणत असे. एक रुटीन इतकाच भाग होता.
आणखी एक भाग म्हणजे मधून मधून घरातल्या देवांची पूजा सुद्धा करावी लागे/करत असे.
काही काही रिच्युअल्स उदा. दत्तजयंती (त्या दिवशी ठाण्यातल्या दत्ताच्या पाच देवळांत जाणे) आणि अक्षय्य तृतीयेला परशुराम पूजा आमच्या घरी होत असे. तसेच चतुर्थीला गणपतीच्या देवळात जाणे होई. त्या पूजेशी पूजा करणार्या वडिलांचीसुद्धा कितपत अॅटॅचमेंट होती याविषयी साशंकच आहे. (परंतु या दृष्टीने वडिलांची पारख त्यावेळी केलेली नाही. म्हणून नक्की ठाऊक नाही).
वरील वर्णन वाचल्यावर मी ठार आस्तिक असणार असा लोकांनी कयास करायला हरकत नाही. पण तसा मी नाही. आणि त्यावेळी सुद्धा नव्हतोच. आज देवळात आरतीला गेलो नाही म्हणून हुरहुर लागली नाही. की हा देव आपले भले करणार आहे (बुद्धी देणार आहे) वगैरे आशा वाटली नाही.
या सगळ्या रिच्युअलमध्ये माझे ब्रेनवॉशिंग झाले नसावे म्हणून माझे देवाशी नाते जुळले नाही. तुटण्याचा प्रश्न आलाच नाही.
नंतरच्या आयुष्यात नास्तिक्याविषयीचे साहित्य वाचले (उदा. दाभोळकर, अब्राहम कोवूर, शरद बेडेकर, मे पुं रेगे*). पण मी त्या वाङमयामुळे नास्तिक झालेलो नाही.
*अलिकडेच प्रकाश घाटपांडे यांनी इतरत्र संदर्भ दिलेले रेग्यांचे पुस्तक शेवटाला आस्तिक्याचे समर्थन करते.
-------------------------
अवांतर : एकाच एका देवाविष्यी रिच्युअल न ठेवता अनेक देवांशी (दत्त, गणपती, मारुती) संपर्क आल्याने कुणा एकाशी नाते जुळले नसेल का?
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद थत्तेजी. प्रतिसाद खूप आवडला.
अवांतर : एकाच एका देवाविषयी रिच्युअल न ठेवता अनेक देवांशी (दत्त, गणपती, मारुती) संपर्क आल्याने कुणा एकाशी नाते जुळले नसेल का?
मी सुद्धा मूडप्रमाणेच करते. कधी देवी तर कधी गणपती, कधी कार्तिकस्वामी तर कधी शंकर किंवा विष्णु. पण प्रत्येक देवाचा एक वेगळा स्वभाव वाटतो (कल्पनेमुळेच का असेना) किंवा त्या त्या आरती/स्तोत्रात निवडलेल्या शब्दांमुळे का असेना. उदा - राम म्हणजे कुटुंबवत्सल, कार्तिकस्वामी शौर्य + मूर्तिमंत देखणेपणा कारण तो देवसेनापती आहेच परत सर्वात सुस्वरुप देव म्हणून मानला जातो, देवी म्हणजे मातृत्व , विष्णु म्हणजे कृपा व वैभव असे काहीसे मनात विचारांचे तरंग उमटतात. त्या त्या गुणाशी तादात्म्यता येते. एक सर्वेसर्वा ईश्वर कसा असेल याची मात्र कल्पना करता येत नाही.
मी एकेकाळी आस्तिक म्हणता
मी एकेकाळी आस्तिक म्हणता येण्याइतपत देभ होते. आई-वडील आस्तिक असले तरी देव-देव करणारे नव्हते, दोघांचाही भर सवडीशास्त्रावर होता. अवैज्ञानिक प्रथा-परंपरा दोघांनीही पाळल्या नाहीत. उदा: पाळीच्या वेळेस देवपूजा न करणे, संकटाच्या वेळेस देवासमोर न बसणे इ. आईने दोन-चारदा भावाला आणि मला सांगून पाहिलं, त्यातल्यात्यात मला जास्त कारण तेव्हा मी जास्त ऐकण्यातली होते. (आता मी त्याचा बदला घेते.) "आईवडलांच्या रोज पाया पडलं की बुद्धी वाढते." यावर मी "बरोबर" म्हटलं आणि बस्स तेवढंच. त्यावरून घरात कसलेही मनतरंग उमटले नाहीत.
हळूहळू स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय आई-वडलांनी लावली. त्यात जे स्वातंत्र्य मिळालं, जबाबदारीची जाणीव झाली त्यातून देव ही कल्पना डोक्यातून आपोआप, हळूहळू गळत गेली. घरातलं माणूस अचानक गेलं की ती पोकळी भरून निघायला वेळ लागतो. पण हळूहळू होणाऱ्या बदलामुळे अशी काही पोकळी जाणवलीच नाही. "माझा देवावर विश्वास नाही" असं स्वतःला आणि वडलांना सांगितलं त्यानंतर पूर्णतः नास्तिक व्हायला - कसलाही चमत्कार, कधीही होणार नाही हे पूर्णतया पटायला - बरीच वर्षं लागली. पण आता मी शुद्ध, १००% तुपातली नास्तिक आहे. आपण बूड हलवलं नाही तर संकटं येतील किंवा टळणार नाहीत हे मला उमगलेलं आहे.
अजुन एक पैलू मला peculiar
अजुन एक पैलू मला peculiar वाटतो आणि तो म्हणजे अचानक दु:खाचा घाव पडून एखादी आस्तिक व्यक्ती पराकोटीच्या रागाने नास्तिक होणे. किंवा मरता मरता वाचून एखादी नास्तिक व्यक्ती एकदम आस्तिक्यत्वाकडे झुकणे. यापैकी कोणीच माझ्या माहीतीत नाही परंतु श्रद्धे-अश्रद्धेतील हा आमूलाग्र बदल हे ट्रान्फॉर्मेशन फार कुतूहलजनक वाटतं.
.
विवेकानंद कट्टर नास्तिक होते परंतु रामकृष्ण परमहंसांनी डोक्यावर हात ठेवल्याने त्यांना एकदम काही एक ऊर्जा-आवर्त-कल्लोळ जाणवला व ते आस्तिकत्वाकडे झुकले असे कोठेतरी ऐकून आहे.
नास्तिक हे अस्तिकांच्या
नास्तिक हे अस्तिकांच्या विरोधात असतात असं का वाटतं तुम्हाला ?
जसा काहींचा देवावर विश्वास आहे तसा काहींचा नाही .. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती किंवा प्रकृती असणारच ना?
एकीकडे तुम्ही म्हणता की नास्तिक सुसंगत आणि समतोल विचार करू शकतात पण आस्तिक देवावर भार टाकून मोकळे होतात.
आणि मग म्हणता कि नास्तिक स्वकेंद्रीत असतात. हे जरा विसंगत वाटते. कारण समतोल विचार करू शकणारा कधीच बेताल होऊ शकत नाही.
काही नास्तिक देवावर नाही तरी इतर कुणावर आपल्या परिस्थितीची जबाबदारी ढकलु शकतात तर काही अस्तिक हे आपल्या परीने सर्व उपाययोजना करून झाल्यावर देवाचे स्मरण करतात. त्यामुळे नास्तिक अथवा अस्तिक या दोहोंना कुठलेही विशिष्ट गुण अथवा अवगुण जोडणे योग्य होणार नाही.
जशी तुम्हाला स्तोत्रे म्हणुन अथवा देवाची पुजाअर्चा उपासना करून मनःशांती मिळते तशी काहींना संगीत, ज्ञानार्जन अथवा कलोपासनेत मिळत असेल. प्रत्येकाचा मार्ग फक्तं वेगळा. आणि त्यावरून कुणीच कुणाला कमी अथवा तुच्छ लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
तसेच नास्तिकांची कशावरच श्रद्धा नसते हे काही पटत नाही. देवावर श्रद्धा नाही याचा अर्थ तो अहंकारी आणि आत्मप्रौढीने भारलेला असणार असे नसते. श्रद्धा कर्तव्यावर, कर्मावर, माणुसकीवर असु शकते.. आणि ती जास्त फलदायी असते.
अस्तिक असणे हा गुन्हा नाही तसेच नास्तिक असणे हा अपराध होऊ शकत नाही.
तो फक्तं जीवनपद्धती, आणि विचारपद्धती यात असलेला फरक आहे.
दुरितांचे तिमिर जावो - विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |
जो जे वांछिल ते तो लाहो - प्राणिजात ||
यातील स्वधर्म हा ईश्वर, आणि देव यांनाच फक्त उद्देशुन असेल असं नाही वाटत.
आस्तिकपणा असणे हे
आस्तिकपणा असणे हे संधिसाधुपणाचं लक्षण आहे.तर नास्तिक लोकांना तसं काही एकतर करता येत नाही अथवा त्याविषयी बेफिकिर असतात.
मृत्यु आणि समाजातील असमानता याला कोणाकडेच उत्तर नाही .हे कबूल करून नास्तिकवादी लगेचच माघार घेतात परंतू आस्तिकवादी एक देव कल्पना निर्माण करून संधिचा फायदा उठवतात.अमुक एक मनुष्य राजा का झाला? त्यालाही आपल्यासारखेच हात पाय डोके आहे मग मी का नाही? कारण त्याच्यात देवाचा अंश आहे हे उत्तर.अमक्याला मृत्यु का आला ? तर ते सर्व देवाच्या हातात आहे आणि त्याला खुश ठेवलं तर थोडाफार मृत्यु टळतो.
जपानी लोक रोबोट क्रिएट करतात म्हणतात.या "क्रिएशनला" क्रिस्टिअन्स विरोध करतात.हे त्यांच्या देवाने केलं,असं क्रिएशन सर्वजण करू लागले तर चर्च आस्थापनाच बंद पडेल ना.थोडक्यात "देव" नावाची कल्पना निर्माण करून बरेच फायदे मिळवता येतात.