‎निर्गुणी भजने‬ (भाग २.१) - सुनता है गुरु ग्यानी

-------------------------
भाग १ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
-------------------------

निर्गुणी भजनांची रचना जास्त करून कबीरजींच्या आणि गोरक्षनाथांच्या नावावर आहे. सर्व भजने गुरु शिष्य परंपरेचे गुणगान करणारी आहेत आणि नाथपंथीय भाषेचा, शैव संप्रदायाचा या भजनांवरचा प्रभाव पाहता, कबीरजींचा ओढा इस्लामपेक्षा नाथपंथाच्या तंत्र मार्गाकडे आणि कुंडलिनी जागृतीच्या हठयोगी मार्गाकडे होता असे वाटते.

सगुण साकाराचे गुणगान न करता निर्गुण निराकाराचे आणि त्याच्याशी असलेल्या सर्वांच्या ऐक्याची ग्वाही देतात म्हणून या भजनांना निर्गुणी भजने म्हणतात. बहुतेक निर्गुणी भजने, देवाप्रतीच्या भक्तीचे आणि देवाच्या शक्तीचे, कृपेचे किंवा प्रेमाचे वर्णन करण्याऐवजी स्वतःला ओळखण्यासाठी दिलेली साद आहेत. ज्ञानेंद्रियांतून होणाऱ्या जगाच्या जाणीवेतून आणि मनाच्या अवस्थांतून उद्भवणाऱ्या काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर रूपी भावनांच्या कल्लोळातून स्वतःला कसे सावरावे आणि आपल्या मूळ स्वरूपाकडे कसे पोहोचावे याबद्दल मार्गदर्शन करतात.

मला निर्गुणी भजनांचे तीन प्रकार दिसतात.

  1. ज्यात साधनेचे वर्णन आहे आणि हठयोग साधनेच्या तंत्राचे निरुपण आहे.
  2. ज्यात भावनांच्या कल्लोळात सापडलेल्या मनाला अंतिम सत्याची करून दिलेली आठवण आहे.
  3. ज्यात आपल्या गुरुची किंवा परमेश्वराची करुणा भाकली आहे.

मी पहिल्या प्रकारात मोडणाऱ्या भजनांबद्दल प्रथम लिहीतो. माझा आणि योगाचा संबंध, 'घोरत केलेले शवासन कितीही वेळ करू शकणे', इतकाच आहे आणि हठयोगाशी तर दुरूनही नाही, त्यामुळे माझे संपूर्ण लिखाण हे प्रचीती नसलेल्या आणि साधनेची सुरवात देखील न केलेल्या अतिसामान्याचा कल्पनाविलास आहे, हे नमूद करून पहिले भजन तेच घेतो जे बाबांना यु ट्यूब वर ऐकवले होते.

भजन असे आहे,

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

पहिले आए, नाद बिंदु से पीछे जमया पानी पानी हो जी |
सब घट पूरण पूर रह्या है, अलख पुरुष निर्बानी हो जी ll 1 ll

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

वहां से आया पटा लिखाया, तृष्णा तो उने बुझाई बुझाई |
अमृत छोड़सो विषय को धावे, उलटी फाँस फंसानी हो जी ll 2 ll

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

गगन मंडल में गौ बियानी, भोई पे दई जमाया जमाया |
माखन माखन संतों ने खाया, छाछ जगत बपरानी हो जी ll 3 ll

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

बिन धरती एक मंडल दीसे, बिन सरोवर जूँ पानी रे
गगन मंडलू में होए उजियाला, बोले गुरु-मुख बाणी हो जी ll 4 ll

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

ओऽहं सोऽहं बाजा बाजे, त्रिकुटी धाम सुहानी रे |
इडा पिंगला सुखमन नारी, सुन धजा फहरानी हो जी ll 5 ll

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

कहत कबीरा सुनो भई साधो, जाय अगम की बानी रे..
दिन भर रे जो नज़र भर देखे, अजर अमर वो निशानी हो जी … ll 6 ll

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

या भजनातले किंचित ओळखीचे शब्द होते इडा पिंगला नारी. कबीरजी बोलीभाषेचा वापर करतात. त्यामुळे नारी म्हणजे नाडी असणार हे समजून मी इडा पिंगला या सुखमन ( सुख देणाऱ्या) नाडी आहेत असा अर्थ लावला होता. पण ते तितकेच.

काही वर्षापूर्वी बायकोच्या आग्रहाखातर अल्पावधीसाठी योगासनांच्या वर्गाला गेलो होतो. तिथल्या योगाचार्यांच्या बोलण्यात आले की आपल्या शरीरात ७२,००० नाडी असतात (याचे नाड्या असे अनेकवचन अर्थाला मारक ठरते असे मला वाटते). त्यातल्या तीन प्रमुख नाडी म्हणजे इडा पिंगला आणि सुषुम्ना नाडी. मग एकाएकी जाणवले की सुनता है गुरु ग्यानी मध्ये पण कुमारजींच्या तोंडून कबीरजी 'सुखमन' म्हणत असले तरी त्या बोलीभाषेतल्या सुखमनचा अर्थ सुषुमन किंवा सुषुम्ना आहे. इथपर्यंत येऊन माझी गाडी अडकली. माझी योगासनांमधली प्रगती पाहून माझे शिक्षक लवकर विरक्तीच्या मार्गावर जाणार असे दिसू लागले म्हणून मी तिथे जाणे सोडले. पण ती ७२,००० नाडीची गोष्ट डोक्यात बसली होती. मग मी प्राणायामातले नाडीशोधन नाही जमले तरी, निराळ्या अर्थाने नाडीशोधनाच्या मागे लागलो.

मग हे कळले की या इडा आणि पिंगला नाडी म्हणजे प्राणशक्तीच्या संचाराचे घाटरस्ते आहेत तर सुषुम्ना नाडी म्हणजे सरळसोट एक्स्प्रेस हाय वे आहे. या प्राणशक्तीला कुंडलिनी असे म्हणतात. आणि ती जागृत झाली की साधकाला अवर्णनीय आनंदाचा प्रत्यय येतो. मग, दीक्षा देताना ओशो शिष्याच्या भुवयांच्या मध्ये आपली दोन बोटे टेकवत आहेत असे छायाचित्र पाहिलेले आठवले. त्याचे वर्णन 'शक्तिपात' असे वाचलेले आठवले. आणि साधनेशिवाय, तात्पुरत्या कालावधीसाठी कुंडलिनी जागृत करण्याचा तो एक बाह्य मार्ग आहे हे कळले. त्याशिवाय कायम स्वरूपी कुंडलिनी जागृत करण्यासाठी हठयोगातील खेचरी मुद्रेचा अभ्यास किंवा प्राणायामातील मूल बंध, उड्डीयान बंध, जालंधर बंध आणि कुंभक यांचा नियमित सराव करावा लागतो. त्याशिवाय सद्गुरुचे मार्गदर्शन असावे लागते, अशी माहिती मिळाली.

कुंडलिनीचे कोडे शब्दबद्ध वर्णनाने सुटते आहे असे वाटत होते. पण अजून मनाचे पूर्ण समाधान होत नव्हते. वेळ मिळेल तसा आणि जे मिळेल ते वाचत होतो. त्यातून हे कळले की, त्या ७२,००० नाडीमध्ये म्हणजे डॉक्टर जी नाडी मोजतात ती येत नाही. तर या ७२,०००० नाडी आपल्या सूक्ष्मदेहात असतात. आणि कुंडलिनी शक्ती देखील सूक्ष्मदेहात असते. तिचे स्थान आणि तिचा प्रवास आपल्या शरीराच्या दृश्य अवयवांच्या नावांचा संदर्भ देऊन सांगितला तरी तो चालू असतो सुक्ष्म देहात.

मग हे सूक्ष्म देह किंवा चेतना देह प्रकरण काय आहे ते शोधायच्या मागे लागलो. जसे आपल्या दृष्य देहात चयापचयाचे अंतर्गत अवयव, ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये, सूत्रसंचालन करण्यासाठी मेंदू, रक्तवाहिन्यांचे आणि चेतापेशींचे जाळे असते; तसेच या सूक्ष्म देहात प्राणशक्तीच्या संचारासाठी ७२,००० नाडींचे जाळे असते. नाडी म्हणजे रस्ते हे विसरायचे नाही. दृष्य शरीरातील विविध बिंदुंजवळ या नाडी एकमेकांना विळखे घालतात. त्याला चक्र असे म्हणतात. त्यामुळे शरीरात अनेक चक्र असतात. पण त्यातील सात चक्र महत्वाची मानली जातात. सुषुम्ना नाडी आपल्या पाठीच्या मणक्याच्या खालच्या टोकापासून ते डोक्यावरील टाळूपर्यंत सरळ जाते तर इडा आणि पिंगला तिला नागमोडी विळखे घालत शरीराच्या अधोभागातून ऊर्ध्व भागाकडे जातात. या उर्ध्वगामी प्रवासात या तीनही नाडी एकमेकांना सात ठिकाणी विळखे घालतात. तीच ही सप्त चक्रे. त्यांची स्थाने सांगताना शरीराच्या समोरच्या बाजूच्या अवयवांचा उल्लेख केला असला तरी ती ही सर्व चक्र सूक्ष्मदेहात, पाठीच्या मणक्याच्या जवळ असतात हे लक्षात ठेवायचे.

सर्वात खाली माकडहाडाजवळ मूलाधार चक्र (इथे कुंडलिनी साडेतीन विळखे घालून वसते), त्याच्यावर जननेंद्रियाजवळ स्वाधिष्ठान चक्र, नाभीजवळ मणिपूर चक्र, हृदयाजवळ अनाहत चक्र, कंठाजवळ विशुध्द चक्र, दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि सर्वात वर डोक्याच्या टाळू जवळ जिथे सुषुम्ना नाडी संपते तिथे सहस्रार चक्र आहे असे हठयोग सांगतो. हे सगळे मला किती पटले तो भाग सोडला तरी याचा सांधा, 'सुनता है गुरु ग्यानी' शी जुळवायला मदत झाली ती सुखटणकरांच्या पुस्तकाची.

पण त्यातही पहिल्या कडव्यातले नाद बिंदू चे कोडे काही सुटत नव्हते. मग एकदा वाचनात आले की, सहस्रार चक्राच्या खाली आणि आज्ञा चक्राच्या वर, डोक्यावर जिथे शेंडी ठेवली जाते त्या स्थानाला बिंदू असे म्हणतात. तिथून बिंदू विसर्ग होत असतो, म्हणजे जीवन रस पाझरत असतो. कंठाजवळ असलेल्या विशुद्ध चक्राला वापरून त्याचे अमृतात रुपांतर करता येते. हे अमृत, तोंडातील टाळू जवळ ललना चक्र नावाचे एक दुय्यम चक्र असते, तिथे साठवून ठेवता येते आणि मनुष्य मृत्यू लांबवू शकतो. हे वाचताना मला ज्ञानोबा माउलींच्या चरित्रातील १४०० वर्षे जगलेले हठयोगी चांगदेव आठवले. सामान्यांना विशुध्द चक्र वापरून बिंदू विसर्गाचे अमृत कसे करावे ते कळत नाही म्हणून त्यांच्या बाबतीत हा बिंदू विसर्ग नाभीजवळ मणिपूर चक्रात जातो आणि शारीरिक वृद्धत्व येते.

इथ पर्यंत तुम्ही पोहोचला असाल तर, 'सुनता है गुरु ग्यानी' च्या अस्पष्ट रित्या प्रकट होणाऱ्या अर्थाने गोंधळ उडवला असून देखील कुमारजींच्या विलक्षण स्वराने मला जसे या भजनाशी बांधून ठेवले तसेच तुम्हालाही बांधले आहे हे स्पष्ट आहे. आणि मला सख्य करण्यासाठी, प्रकट झालेल्या शब्दामागील मूळ विचार, भावना आणि अनुभूती शोधण्याचे समान व्यसन असलेले मित्र मिळालेत याचा आनंद आहे. पण मला वाटते, ज्यांचे कुठलेही प्रमाण देणे मला शक्य नाही अश्या अमूर्त संकल्पना असलेला हा भाग खूप लांबला आहे, म्हणून इथेच थांबतो आणि पुढील भागात या भजनाचा मला लागलेला अर्थ लिहितो. मी गाण्याची लिंक देतो आहे. माझा पुढचा भाग लिहून होईपर्यंत या उत्कट शब्दसुरांचा आनंद तुम्ही पण घ्या. कदाचित, मूळ अर्थाकडे माझ्यापेक्षा अधिक जवळ जाणारा अर्थ तुम्हाला जाणवेल.

-------------------------
भाग १ | भाग २.२ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
-------------------------

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

नाडी असतात (याचे नाड्या असे अनेकवचन अर्थाला मारक ठरते असे मला वाटते)

बरोबर ईकारान्त शब्द

माझी योगासनांमधली प्रगती पाहून माझे शिक्षक लवकर विरक्तीच्या मार्गावर जाणार असे दिसू लागले

तुमची हीच खुसखुशीत स्टाइल फार आवडते.
___
मोरे , आपल्याला https://www.scribd.com/publisher/635222/Vishwas-Bhide - हे आवडेल.
विशेषतः - https://www.scribd.com/doc/47888997/%E0%A4%B7%E0%A4%9F-%E0%A4%9A%E0%A4%9...
यात षटचक्र आदि संकल्पना आहेत.
___
अर्थ आवडला पण माझा विश्वासच उडत चाललाय या सर्व थिअरीज वरचा. अर्थ मात्र चांगला उलगडून दाखविला आहे तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लिंक बद्दल धन्यवाद…. Biggrin माझापण विश्वास अजून बसायचा आहे चक्र, नाडी आणि कुंडलिनी वर… जे इंद्रियगम्य नाही ते मान्य करायला अजून बुध्दी तयार होत नाही… पण जे कळत नाही ते ठामपणे चूक म्हणायला मन तयार होत नाही … त्यामुळे मी श्रध्दायुक्त अंत:करणाने नसेल तरी कुतूहलपूर्ण दृष्टीने वाचतो आणि ऐकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यात कल्याणी विशेषांक आहेत ते रोचक आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसे पहिले तर मला संगीतातले काही एक कळात. पण जेंव्हा हि कधी रात्रीच्या वेळी प. कुमारजींचे भजन ऐकतो त्या वेळी एक वेगळीच अनुभूती होते. का, कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

का, कळत नाही.

संगीताने मूडवरती १००% परिणाम होतो त्यात नीरव वेळी तर क्या केहेने.
अर्थात आपण "का कळत नाही" हा वाक्प्रचार वांड्मयीन अर्थाने वापरला असणार. नसेल तर त्यात विशेष रहस्यमय काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निर्गुणी भजने ही संज्ञा पहिल्यांदाच ऐकली. भजने, शास्त्रीय संगीत, योग, कुंडलिनी यापैकी कुठल्याच विषयात फारसा रस आणि गम्य नसूनही तुमच्या प्रासादिक शैलीमुळे दोन्ही लेख शेवटपर्यंत आवडीने वाचले. धन्यवाद! पुढच्या भागाची वाट पाहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<<भजने, शास्त्रीय संगीत, योग, कुंडलिनी यापैकी कुठल्याच विषयात फारसा रस आणि गम्य नसूनही>>> मग आपण दोघे एकाच माळेचे मणी आहोत… फक्त मला बाबांमुळे ही भजने ऐकायला मिळाली आणि त्यानंतर या भजनांच्या बाबतीत, फार थोडा प्रवास मी एकट्याने केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता प्रास्ताविक आणि हा भाग वाचला. वेगळंच काही वाचल्याचा अनुभव आला. पण अर्थात चान्गलाच आहे हा अनुभव!
फारशी कोणतीही भजने कधी ऐकली नाहीत. पण हे मात्र खूप आवडले.
मध्यंतरी रवीन्द्र पिंगे यान्चे 'शतपावली' हे पुस्तक वाचले. त्यात पहिलेच प्रकरण कुमारजींवर आहे. देवासला राहुन तिथे मारलेल्य मन्मोकळ्या गप्पा पिन्गेंच्या खुस्खुशीत शैलीत वाचायला मस्त वाटते.
दुर्गा भागवत, वि. स. खान्डेकर, कुसुमाग्रज अशा अनेक दिग्गजाविषयी लेख आहेत. मिळाल्यास जरुर वाचा. छानच आहे ते पुस्तक.
उर्वरित भाग नन्तर वाचते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उल्का

माझा विचार आहे की माझ्या कडे असलेल्या भजनांपैकी ज्यांचे गान स्वरूप यु ट्यूब वर उपलब्ध आहे त्या सर्वांबद्दल लिहावे… जसे जमेल तसे करीन. … शतपावली बद्दल धन्यवाद. शोधतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0