‪निर्गुणी भजने‬ (भाग २.२) - सुनता है गुरु ग्यानी

----------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
----------------------------

सुनता है गुरु ग्यानी या भजनात अनेक रूपके आहेत. आणि प्रत्येक रूपक दुसऱ्याशी सुसंगत देखील नाही. म्हणून शोधलेल्या संदर्भातील वाचलेले अर्थ मनाचे समाधान करीत नव्हते. एक दिवस डॉ परळीकरांच्या आणि लिंडा हेस यांच्या पुस्तकातील भजनांचा क्रम बघत होतो. परळीकरांच्या पुस्तकात भजने कुठल्याही क्रमाने येतात तर हेस बाईंच्या पुस्तकात ती अक्षरमालेच्या अकारविल्हे क्रमाने येतात. आणि एकदम जाणवले दोन्ही लेखक कबीरांच्या मनस्थिती किंवा भावस्थिती ऐवजी शब्द आणि अक्षरप्रधान अर्थ देत आहेत. जिथे भजनाचा आत्मा निर्गुण आहे तिथे सगुण शब्द मुख्य मानून लावलेला अर्थ माझ्या मनाचे समाधान करणारा होत नव्हता. आणि एकाच भजनातील वेगवेगळी रूपके, लेखकाने दिलेला अर्थ वाचूनही परस्परविसंगत वाटत होती. हे जाणवल्यावर मी पुस्तकातील सगळी भजने कोणकोणत्या प्रकारात बसू शकतात त्याचे वर्गीकरण करण्याच्या मागे लागलो. त्यातून मला जाणवलेले निर्गुणी भजनांचे तीन प्रकार, मी दुसऱ्या लेखाच्या सुरवातीला मांडले आहेत. सुनता है गुरु ग्यानी हे भजन त्यातील पहिल्या प्रकारात (ज्यात साधनेचे वर्णन आहे आणि हठयोग साधनेच्या तंत्राचे निरुपण आहे) चपखल बसले, आणि मग ते भजन मला त्याचा थोडा वेगळा अर्थ सांगू लागले. आणि वेगवेगळ्या रुपकांची थोडी अधिक सुसंगती मला लागू लागली.

भजनाचा मला उमगलेला अर्थ सांगण्यापूर्वी एक गोष्ट नमूद करतो की यात वर्णन केलेल्या कुंडलिनी आणि तिच्या प्रवासावर माझा अजून तरी विश्वास बसलेला नाही. जे इंद्रियगम्य नाही त्यावर विश्वास ठेवायला माझी बुद्धी तयार होत नाही. पण जे इंद्रियगम्य नाही ते अस्तित्वातच नाही हे म्हणायला माझे मन तयार होत नाही. त्यामुळे माझी निर्गुणी भजनांची अर्थयात्रा श्रद्धायुक्त अंतःकरणाने नसून कुतूहलपूर्ण मनाने आहे.

मला वाटते या भजनात कबीर, काय करा ते सांगत नसून काय होते ते सांगत आहेत. संपूर्ण भजन सामान्य माणसांनी संसाराच्या तापत्रयांपासून मुक्ती साठी काय करावे त्याचे मार्गदर्शन करत नसून, कुंडलिनी जागृतीची साधना करणाऱ्याला काय काय अनुभव येतात, त्याला कुठल्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे त्याबद्दल मार्गदर्शन करते.

या भजनाचे धृवपदच बेभान करणारे आहे. विश्वरूप दर्शन घडवणारे आहे. तयारी न करता पाहिले तर भीतीने गाळण उडवणारे आहे आणि जाणीवपूर्वक पाहिले तर अनासक्त प्रेमाचा उद्भव करणारे आहे.

सुनता है गुरु ग्यानी ग्यानी ग्यानी
गगन में आवाज हो रही झीनी-झीनी झीनी-झीनी

कुंडलिनी साधनेच्या अंतिम टप्प्याला पोहोचलेल्या साधकाला कबीर ग्यानी गुरु म्हणतात. आणि हा ग्यानी गुरु एकाच वेळी स्थूलदेहात (दृष्य देहात) आणि सूक्ष्म देहात (चेतना देहात) स्वतःला अनुभवू शकतो. त्याच्या सूक्ष्म देहातील मस्तकाच्या भागाला (जिथे सहस्त्रार चक्र असते) कबीर "गगन" म्हणतात. आणि या गगनात अखंडितरित्या एक “शांत आवाज” होत असतो. त्या आवाजाचे वर्णन करण्यासाठी, कबीर झीनी झीनी असा शब्द वापरतात. हा कबीरांचा आवडता शब्द आहे. आणि त्याला ते अनेक संदर्भात वेगवेगळ्या भजनात वापरतात. कधी आवाजासाठी तर कधी चादरीसारख्या भासणाऱ्या जीवनाच्या वस्त्रासाठी. त्यातून त्यांना सांगायचे असते एक असलेपण आणि नसलेपण. कर्ता - कारणविरहीत अस्तित्व. सद्गुण - दुर्गुण विरहीत अस्तित्व. गुणातीत, निर्गुण अस्तित्व.

अत्यंत जवळून तेजः पुंज प्रकाश दिसावा पण त्याच्या उष्णतेची धग न लागावी. दिपून न जाता त्या प्रकाशाकडे, डोळे पूर्ण उघडे ठेवून पहाता यावे असा गुणातीत, निर्गुणी शांत प्रकाश. झीनी झीनी प्रकाश. आवाज तर आहे पण त्यामागे कुठलाही नाद, लय, आघात, ताण, सूर नाही. तो स्वयंभू आहे. त्याचा गोंगाट नाही, गोंधळ नाही, तीव्रता नाही, कोमलता नाही, चढ नाही, उतार नाही, मधुरता नाही. असा शांत आवाज. झीनी झीनी आवाज.

जिथे बाहेरील जगाचे सर्व आवाज थांबावेत आणि त्या शांततेत आपल्या अस्तित्वाचा आवाज ऐकू येऊ लागावा. आणि त्याची इतरांच्या अस्तित्वाशी असलेली सुसंगती लागून त्या सर्वांचा कोलाहल न होता शांतता जाणवावी. तो आवाज म्हणजे झीनी झीनी आवाज.

रोजच्या जीवनात आजू बाजूला असणाऱ्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूचा आवाज होत असतो किंवा ती आवाज करत असते. वाऱ्याची शीळ आणि त्याचे घोंगावणे. समुद्राच्या लाटांची कलकल आणि त्याच समुद्राची गाज. झाडाच्या पानांची सळसळ. वाटेत येईल ते गिळंकृत करत पुढे चाललेल्या वणव्याचा ल्हा ल्हा असा आवाज. झाडे उन्मळून पडताना किंवा वीज कोसळताना किंवा बर्फाचे किंवा दगडांचे कडे कोसळताना त्यांच्या कडाडण्याचा आवाज. मेघांच्या गरजण्याचा, पावसाच्या टपटपण्याचा आवाज. झऱ्यांच्या वाहण्याच्या खळखळीचा आवाज. वाळवंटातील वाळूचा सरकण्याचा आवाज. प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे चीत्कार, कूजन, डरकाळ्या, गुरकावणे, पाणी पिताना केलेला लप् लप् आवाज. दबा धरून बसलेल्या श्वापदाच्या श्वासांचा आवाज, भेदरून उधळलेल्या प्राण्यांच्या खुरांचा आवाज. शिकार करणाऱ्याच्या भुकेचा आवाज, शिकार होणाऱ्याच्या मृत्यूभयाच्या आकांताचा आवाज. शाकाहारी प्राण्यांनी चरताना झालेला हलका आवाज तर मांसाहारी प्राण्यांनी क्षुधा शांत करताना झालेला हाडे फोडण्याचा आवाज. माणसांचे हसणे, रडणे, चिडणे, प्रेम करणे, भांडणे, कण्हणे या साऱ्यांचा आवाज.

नियमबद्ध रीतीने एका रूपातून दुसऱ्या रुपात परिवर्तीत होणाऱ्या निर्जीव सृष्टीच्या परिवर्तनाचा आवाज आणि वेगवेगळ्या सजीवात वेगवेगळ्या गतीने होत असलेल्या हृदयाच्या धडधडीचा आवाज. एकाच वेळी तऱ्हे तऱ्हेच्या आवाजांचा सृष्टीतला कोलाहल. दुरून पहिला तर कुणाला भेसूर किंवा बीभत्स देखील वाटू शकेल. पण ज्ञानी साधकाला त्यातील एकरूपता जाणवते. अस्तित्वाचे नवीन रूप धारण करणे आणि जुने रूप सोडून देणे दिसते.

प्रसव वेदनेने तळमळणाऱ्या स्त्रीचे रडणे, तान्ह्या बाळाने जन्मतःच रडणे, जिवलग अकाली मृत्यू पावल्यावर त्याच्या आप्तेष्टांनी रडणे आणि सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून झालेल्या व्यक्तीच्या अंतानंतर त्याच्या आप्तेष्टांचे मूक रुदन यातील एकत्व त्याला जाणवते. अश्या या सर्वव्यापी आवाजाचे विश्वरूप दर्शन झाल्यावर ग्यानी साधक त्या अखंड आवाजाला ऐकत राहतो. या आवाजाला कबीर म्हणतात झीनी झीनी आवाज.

----------------------------
भाग १ | भाग २.१ | भाग २.३ | भाग २.४ | भाग २.५ | भाग २.६ | भाग २.७
----------------------------

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

बाप रे! वाचताना काटा आला अंगावर. काय शब्द सामर्थ्य आहे तुमचं. __/\__

प्रसव वेदनेने तळमळणाऱ्या स्त्रीचे रडणे, तान्ह्या बाळाने जन्मतःच रडणे, जिवलग अकाली मृत्यू पावल्यावर त्याच्या आप्तेष्टांनी रडणे आणि सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करून झालेल्या व्यक्तीच्या अंतानंतर त्याच्या आप्तेष्टांचे मूक रुदन यातील एकत्व त्याला जाणवते. अश्या या सर्वव्यापी आवाजाचे विश्वरूप दर्शन झाल्यावर ग्यानी साधक त्या अखंड आवाजाला ऐकत राहतो. या आवाजाला कबीर म्हणतात झीनी झीनी आवाज.

इथे तर मनातल्या मनात पार लोटांगणच घातलं गेलं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद... ते लिहिताना मला पण खूप आनंद झाला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो झीनी झीनी शब्दच एकदम खास आहे पण भजनात कुमार गंधर्वांनी स्पेशली तो शब्द काय गायला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'झीणी'चा मूळ अर्थ पातळ, बारीक, झिरझिरीत, विरविरीत असा आहे. उघडपणे 'जीर्ण' वरून तो आलेला आहे. चदरिया झीणी रे झीणी असे जेव्हा कबीर म्हणतात तेव्हा शरीराला चादरीची उपमा देऊन देहाची नश्वरता ते सूचित करतात. झीणी/झीणा हा शब्द बहुधा वस्त्र किंवा शरीरकाठीसाठी वापरला जातो. 'सुनता है' मध्ये हा शब्द नादाच्या तरलतेसाठी वापरला आहे. जशी भ्रमराची रुणझुण किंवा गुणगुण कानात सतत वाजू लागली की तंद्री लागते, गुंजनामागचे गूढ उलगडते तशी ही झीनी झीनी आवाज. बोरकरांचीसुद्धा झिणीझिणी बाजे बीन, सख्या रे अनुदिन चीज नवीन| अलख निरंजन वाजवणारा सहजपणात प्रवीण'| अशी सुंदर रचना आहे. इथे झिणी म्हणजे तलम, मंद गुंजारव. जो नाद नादावतो, तो नाद. कानात असा अविरत, अनाहत गुंजननाद ऐकू येणे ही साधनेतली एक पायरी आहे. 'रुणुझुणु रुणुझुणु ये भ्रमरा' हे गीत असेच गूढार्थाने भरलेले आहे. असो.
एक गंमतीशीर अवांतर : आपल्या सर्वांना महंमद अलि जीना हे नाव ठाऊक असतेच असते. या महंमद अलींचे पूर्वज उंच, सडपातळ, अगदी बारीक, कृश असे होते. त्यांच्या आजोबांना त्यांच्या अंगकाठीवरून लोक 'झीणा' म्हणून ओळखत. तेच नाव पुढे रूढ झाले कारण पुढची पिढीसुद्धा तशीच उंच आणि कृश निपजली. गुजरातीत झीणा म्हणजे पतला-सडपातळ. स्वतः महंमद अलींची शरीरयष्टीसुद्धा तशीच होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिरोचक. 'झीणाभाई' हे नावही त्यावरूनच आले असेल की काय मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

होय बहुधा.
आपल्याकडेही लठ्ठे, लहाने, काळे, गोरे, घारे, भुरे अशी शरीरवैशिष्ट्ये दाखवणारी नावे असतातच. शिवाय सुडक्या, लहान्या, बारक्या, छोटू, सावळ्या, ढवळ्या,पवळ्या अशी लाडकी नावेही असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोलाची भर घातलीत... धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डॉ. परळीकरांच्या पुस्तकाचे नाव कळू शकेल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सार्थ निर्गुणी भजने'.... आता बाहेर आहे. रात्री घरी गेल्यावर प्रकाशक व इतर माहिती देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

https://www.youtube.com/watch?v=06Ok6HINoEg
साधू! साधू! अपना देस निराला
सद्गुरु देस निराला
.
नही कोई ब्रह्मा नही कोई विष्णु,
नही कोई भोला
.
नही वहां चंदा न
ही कोई सूरज,
फिर भी रहत उजियारा|
.
सदा रहत आगम की धुनी,
गूंज रहा ॐकारा
.
बिना बजाए गूंज रहा सब
प्रणव नाद ॐकारा
.
हे भजन ऐकताना फार घालमेलयुक्त डिप्रेसिव्ह आणि विचीत्र वाटतं. हे सर्वांनाच होतं का? मोरे, हे भजन निर्गुण भजनच असावे असा कयास.
तो तांबेंचा साधू-साधू जो खर्जातील आवाज आहे तो चक्क त्रास देतो. विचित्र वाटतं सांगता येत नाही काय ते.
___________
https://www.youtube.com/watch?v=3HfkuIvS-pw

शिरडीवाले साई पिया, पत राखो रे पत राखो रे
.
ना मै जानू आरती ध्याना, ना पूजा की रीत
जानू मै तो जानू मै तो मेरे साई की प्रीत
.
मनमंदीरमे, साई तुमने, प्रेमकी ज्योत जलाई
बींच भँवरमे उलझी नैय्या, तुमने पार लगाइ
.
हे सुद्धा तसच.
__________________________

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या भजनाचा व्हीडीओ बघता आला नाही. व्हीडीओ उपलब्ध नाही असे यु ट्यूब सांगते. पण रचना मात्र निर्गुणी भजनांसारखीच आहे. कबीराचे देखील भजन आहे ते देतो खाली

सखिया, वा घर सबसे न्यारा,
जहां पूरन पुरुष हमारा |

जहां नहीं सुख दुख, साच झूट नहीं,
पाप न पुन्य पसारा |
नहीं दिन रैन, चांद नहीं सूरज,
बिन ज्योति उजियारा....सखिया |

नहीं तह ज्ञान ध्यान, नहीं जप तप,
वेद कित्तेब न बानी |
करनी धरनी रहनी गहनी,
ये सब जहां हिरानी....सखिया |

धर नहीं अधर, न बाहर भीतर,
पिंड ब्रम्हंड कछु नाही |
पांच तत्व गुन तीन नहीं तह,
साखी शब्द न ताहीं....सखिया |

मूल न फूल, बेली नहीं बीजा,
बिना ब्रच्छ फल सोहे |
ओहम् सोहम् अर्ध उर्ध नहीं,
स्वास लेख न कौ है....सखिया |

जहां पुरुष तहवा कछु नाहीं,
कहे कबीर हम जाना |
हमरे संग लाखे जो कोई,
पावे पाद निर्वाना...सखिया |

ही त्याची लिंक … https://youtu.be/Sho8H8HSEfg

माझी आई आणि बायको पण काही काही निर्गुणी भजनांना डिप्रेसीव्ह म्हणते … पण मला वाटते हा वैयक्तिक अनुभव असावा.

दुसरे भजन निर्गुणी वाटले तरी त्यात गुरु स्तुतीचा भाग जास्त आहे. त्यामुळे ते निर्गुणी आणि सगुण यांच्या सीमारेषेवर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

माझी आई आणि बायको पण काही काही निर्गुणी भजनांना डिप्रेसीव्ह म्हणते … पण मला वाटते हा वैयक्तिक अनुभव असावा.

बरं वाटलं कोणा अजुन व्यक्तीस हाच अनुभव आला आहे हा. मला सॅड गाणी , किंवा "या चिमण्यांनो परत फिरा" वगैरे सुद्धा अगदी डिप्रेसिव्ह वाटत नाही पण स्पेशली हे वरचं पहीलं बालाजी तांबे यांचे भजन अतोनात अस्वस्थ करते. हा अनुभव अनेकदा आला आहे त्याला अपवादच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद कसले, तुम्ही एकट्याच आहात या धाग्याला नियमित पणे वाचून आवर्जून प्रतिक्रिया देणाऱ्या.

कदाचित हे चुकीचे असेल. पण मला वाटते अशी भजने स्त्रियांना पुरुषांपेक्षा जास्त त्रास देतात.

बहुदा स्त्रियांना आयुष्यात अनेक बदलांना जावे लागते. सामाजिक दृष्ट्या लग्न संस्थेमुळे आणि नैसर्गिक दृष्ट्या तर वयाच्या वेग वेगळ्या टप्प्यावर त्या अनेक बदल सहन करतात. त्यामुळे बदल सहन करण्याची त्यांना सवय असते. आणि प्रत्येक बदलानंतर त्यांना मोडून पडण्याची भावना येत नाही. म्हणून संसार असार आहे ही भावना त्यांच्यात पुरुषांपेक्षा थोडी कमी प्रमाणात आढळते.

तुलनेने पुरुष अनुभवांचे फार मोठे सातत्य अनुभवतो. पण इतके असूनही आयुष्यात आपले स्वतःचे असे काही नाही, अगदी आपले मूल देखील आईलाच जास्त जवळ आहे आणि आपली संसारात गरज नैसर्गिक पेक्षा सामाजिक जास्त आहे हे त्याला कळल्यावर त्याचे अनुभवांचे सातत्य भंगते. आणि संसार असार आहे विचार त्याला जास्त जवळ वाटतात.

त्यातूनच कदाचित स्त्री पुरुषांत निर्गुणी भजनांची नावड - आवड तयार होत असावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही मोरे नावड नाही. जास्त डीप काहीतरी आहे. कदाचित विज्ञानाला कारण कधीतरी कळेलही. पण "दुं दुर्गायै नम:" किंवा ॐ गँ गणपतये नम: हा मंत्र मनात म्हटल्याने जितके चांगले किंवा न्युट्रल तरी वाटते तितकीच "श्रीराम जय राम जय जय राम" म्हटल्यावर बेचैनी अनुभवास येते. तो मंत्रही म्हणजे अक्षरक्षः सहन होत नाही. मैत्रिणीला विचारलं तुला असा काही अनुभव आहे का? ती म्हणाली तिने प्रयत्न्पूर्वक कधी केले नाही. पण ती म्हणाली की "रं" हे अग्नीबीज असल्याने त्रास होत असेल.तुम्हाला तर माहीतच आहे- मणिपूर हे अग्नी तत्वाचे चक्र आहे. रं हा त्याचा बीजमंत्र.
.
जोवर कारण कळत नाही तोवर काही ठामपणे म्हणू शकत नाही. अंधश्रद्धेच्या नावाखाली दडपता येत नाही कारण नेहमी तोच तोच सहन न होण्याचा अनुभव येतो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही एकट्याच आहात या धाग्याला नियमित पणे वाचून आवर्जून प्रतिक्रिया देणाऱ्या.

स्तोत्रं, भजनं, प्रेम आणि राशीभविष्य हे शुचिताईंचे जिव्हाळ्याचे विषय आहेत, त्यामुळे त्यांचे प्रतिसाद आले नाही तरच नवल. Smile

मात्र याचा अर्थ इतर लोक वाचतच नाहीत असं नाही. मोठ्या लेखमालेला बऱ्याच वेळा काही लेख वाचून झाल्यानंतर प्रतिसाद मिळायला लागतो. इथे तुम्ही एकेक कडव्यावर निरूपण करण्यासाठी एकेक लेख वाहिलेला आहे. तेव्हा अनेकांना पुढचं समजून घेतल्याशिवाय प्रतिसाद देणं कठीण जात असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघा "प्रेम" काय हो? ROFL ROFL
इतका स्पष्टवक्तेपणा कशाला? Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझं लेखन माझं प्रतिपादन नसून माझी शोधयात्रा आहे. मला जे सापडलं आहे तेच योग्य आहे माझा दावा नाही. किंबहुना हे लिखाण वाचून कुणी माझ्या आकलनात सुधारणा सुचवली तर मला हवीच आहे.

त्याशिवाय माझे लेखन "वेदात विमाने होती" अश्या छापाचे होऊ नये आणि त्याच बरोबर ते संत कबीरांचा अपमान करू नये याची काळजी घेण्याचा मी प्रयत्न करतोय. त्यात मी किती यशस्वी होतो आहे त्याबद्दल थोडा साशंक आहे. त्यामुळे वाचकसंख्या दिसून फारश्या कमेंट आल्या नाहीत याचा अर्थ मी बिनतोड लिहितोय असा सोयीस्कर काढताना, मी फारच टाकाऊ लिहितोय असाही होऊ शकतो याची मला कल्पना आहे.

हा विषय थोडा वेगळा आहे हे देखील मला माहित आहे. त्यामुळे नव्यानेच लिहू लागलेल्या लेखकाइतकी, प्रतिसादांची मला घाई नसली तरी उत्सुकता नक्कीच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही एकट्याच आहात या धाग्याला नियमित पणे वाचून आवर्जून प्रतिक्रिया देणाऱ्या.

अहो तुम्ही वाईट वाटुन घेऊ नका. माझी निर्गुणी भजनातील झेप म्हणजे "अवधुता कुदरत की गत न्यारी" इथ पर्यतच. ते सुद्धा का की "नशिब रावाला रंक करते आणि भिकार्‍याला राजा करते" ही प्रॅक्टीकल गोष्ट सांगीतलीय त्यात म्हणुन.

त्यामुळे जमेल तितके वाचते. शुचि सारखा प्रतिसाद देऊ शकत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते सुद्धा का की "नशिब रावाला रंक करते आणि भिकार्‍याला राजा करते" ही प्रॅक्टीकल गोष्ट सांगीतलीय त्यात म्हणुन.

व्यवहारी बँकर नाहीतर इकॉनॉमिस्ट नाहीतर वकील आहेस तू. Smile वकीलच जास्त करुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा …. त्यातलं शेवटचं वाक्य "कहे कबीरा रामु है राजा, जो कछू करें सो छाजै" ऐकताना, रामु शब्दामुळे वेगळा अर्थ लागून, बटाट्याच्या चाळीतील संगीतिके मधील "रामा तूच राखी मम लाज" आठवायचं.

पण तुम्ही हे लेखन वाचता हे कळून आनंद झाला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0