ज्ञानावर निर्बंध

र धों कर्वे

ज्ञानावर निर्बंध

- र. धों. कर्वे

मुलांनी अमुक वाचता नये, मुलींनी अमुक वाचता नये, तरुणांनी अमुक वाचता नये, स्त्रियांनी अमुक वाचता नये, प्रजेने अमुक वाचता नये, अशा प्रकारचे निर्बंध आईबाप, वृद्ध, पुरुष व राजेराण्या घालीत असतात व या बाबतीत स्वत:लाच जास्त कळते, अशी त्यांची कल्पना असते. परंतु यात वस्तुत: कोणाचा कोणत्याही प्रकारचा फायदा नसतो, असे आमचे मत आहे. हे डॉ. लेल्यांसारख्या अनेक लोकांना चमत्कारिक वाटते, व आमच्या मासिकापासून मुलांचे नुकसान होते व ती 'बारगळतात' इतकेही आम्हाला कळू नये याबद्दल त्यांना आश्चर्य वाटते. याकरता येथे काही इतर लोकांची मते देतो. अर्थात ज्याला त्याला आपले मत बनवण्याचा अधिकार आहेच. पण हा शिक्षणतज्ज्ञांचा विषय आहे, तेव्हा यात सर्वांच्याच मताला किंमत सारखी नाही हे लक्षात ठेवावे. डॉ. हॅवलॉक एलिस आपल्या लिंगशिक्षणावरील ग्रंथात म्हणतात-

'मुलगे व मुली वयात येण्याच्या सुमाराला त्यांना समागमासंबंधी माहिती देण्याचे जे प्रकार काही प्राथमिक लोकांत सापडतात, ते आपल्या दृष्टीने कितीही अश्लील असले, तरी त्यांनी शिक्षणाचे काम नि:संशय होते. अश्लीलतेच्या कल्पनेने हे प्रकार आपण काढून टाकले; पण त्यामुळे शिक्षणही बंद झाले. या शिक्षणाचे शारीरिक व बौद्धिक असे दोन भाग केले, तर त्यांपैकी बौद्धिक भाग हल्ली ब‍र्‍याच अंशी वाचनानेच होतो आणि केवळ लिंगशिक्षणाकरता लिहिलेल्या पुस्तकांपेक्षा तो इतर वाङ्‌मयानेच जास्त प्रमाणात होतो. वाङ्‌मयाच्या बर्‍याच भागांत कामवासना प्रच्छन्न स्वरूपात असते आणि कल्पित वाङ्‌मय तर कामप्रवृत्तीवरच आधारलेले असते. प्रत्यक्ष समागमापूर्वी तरुणांना कल्पनेनेच त्याचा अनुभव येतो. यासंबंधी मेच्निकॉफने म्हटले आहे, की काव्याचा व कामवासनेचा निकट संबंध आहे आणि कलेच्या मुळाशीही कामवासना आहे, हे अनेकांनी कबूल केलेले आहे. यामुळे एकंदर वाङ्‌मय म्हणजे लिंगशिक्षणाचे एक साधनच आहे. सर्व उच्च प्रकारच्या वाङ्‌मयात कामवासनेतील मुख्य गोष्टींचा संबंध असतो आणि हल्लीच्या फाजील सोवळ्या जगात ही एक समाधानाची गोष्ट आहे, की हे उच्च वाङ्‌मय तरुणांपासून लपवून ठेवता येत नाही. उदाहरणार्थ, बायबल व शेक्स्पिअर यांचे वाङ्‌मयातील स्थान अढळ आहे आणि अनेक मुलामुलींना कामविषयक कल्पना प्रथम बायबलवरून समजतात. बायबलांत स्वसंभोग, समसंभोग, पशुसंभोग, व्यभिचार, बापाचा व मुलीचा समागम इत्यादी अनेक गोष्टी आहेत आणि हे धार्मिक पुस्तक अत्यंत पवित्र समजतात. एका टीकाकाराने मला असे लिहिले आहे, की पंधरा वर्षे वयाचा एक मुलगा व मुलगी बायबलातील कामविषयक गोष्टी शोधून काढून, त्यांवर खूणा करून नंतर दर रविवारी चर्चमध्ये भेटून पुस्तकांची अदलाबदल करीत असत. तसेच शेक्स्पिअरची एक 'व्हीनस अँड अ‍ॅडोनिस' नावाची कामुक कविता आहे असे ऐकून एका तरूणीने ते पुस्तक मागून आणून तेवढीच कविता वाचली. बायबल हे लिंगशिक्षणाकरता उत्तम पुस्तक आहे, असे मी म्हणत नाही; पण त्यात अनेक बायका करण्याची व रखेल्या ठेवण्याची चाल दाखविल्यामुळे मुलामुलींना निदान इतके कळते, की चालू समाजनीती ही सार्वत्रिक नाही. हे मोठेच शिक्षण आहे आणि शिवाय त्यातील अश्लील गोष्टी अत्यंत सरळ भाषेत सांगितलेल्या असल्यामुळे हल्लीच्या ढोंगीपणावर ते उत्तम औषध आहे.

काही लोकांचे असे म्हणणे आहे, की वाङ्‌मयातील अश्लीलतेचा परिणाम तरुणांवर वाईट होतो. परंतु याचे कारण हेच, की हल्ली कामविषयक गोष्टी त्यांचेपासून काळजीपूर्वक लपवून ठेवतात, आणि हे अनैसर्गिक आहे. सरळ अश्लीलतेचा परिणाम मुलांवर वाईट होत नाही आणि अश्लील शब्द बिलकूल न वापरता केलेल्या उत्तेजक वर्णनांचा परिणाम अधिक वाईट होतो. मॅजिस्ट्रेटांचे मत याचे उलट दिसते; परंतु याचे कारण त्यांचे अज्ञान. १९०७ साली जर्मनीत गुप्तरोग निवारणासंबंधी एक डाक्तरांची परिषद भरली होती त्यात या मुद्द्यावर भर दिला होता, की लोकगीतांतील अश्लील भाग काढून टाकून त्यांची मुलांकरता आवृत्ती काढणे गैर आहे, कारण त्यांना कामविषयक ज्ञान मिळायचे ते मिळत नाही. दोन डाक्तरांनी तेथे असे सांगितले, की कामुक गीतांतील वर्णनाप्रमाणे वागण्याचे जोपर्यंत मुलांचे वय नाही, तोपर्यंत ते वाचण्यात नुकसान नाही, आणि तसे वय असल्यास त्यापासून इजा होत नाही. कोत्या मनाच्या शिक्षकांना पुस्तकातील जे भाग पसंत नसतील, ते काढून टाकल्याने मुलांचे नुकसान होते. 'एलन् की' या प्रसिद्ध लेखिकेने लिहिले आहे, की वयात आलेल्या कोणत्याही मुलाला किंवा मुलीला कोणत्याही उत्तम विस्तृत ग्रंथसंग्रहालयातून पाहिजे ते पुस्तक घेण्याची मुभा असावी. (उत्तम संग्रहालयांत अश्लील पुस्तके नसतात अशी कोणाची कल्पना असल्यास ती चुकीची आहे. उदाहरणार्थ, ब्रिटिश म्यूझिअमचे पुस्तकालयात इंग्रजीतील प्रत्येक पुस्तकाची प्रत असते. सं.) अमुक वाचा, किंवा अमुक वाचू नका, असे त्यांना सांगावेच लागत नाही. न समजणार्‍या गोष्टी ती कधीही वाचीत नाहीत. त्या म्हणतात की, मुलांकरता सोवळ्या आवृत्ती काढणे हल्लीच्या शिक्षणपद्धतीतील मोठी चूक आहे. मुलांच्या मनाची व शरीराची वाढ ज्या मानाने झाली असेल, त्याला साजेशीच पुस्तके ती वाचतात. कामुक वर्णने मोठ्या माणसांना आवडतात आणि त्यांनी त्यांचे उत्तेजन होते व म्हणून त्यांची त्यांना लाज वाटते. मुलांना या वर्णनात काहीच वाटत नाही. 'रस्किन'ने आपल्या 'सिसेम् अँड लिलिज्'मध्ये म्हटले आहे, की मुलींना पुस्तकालयांतून पाहिजे ते वाचता आले पहिजे.


जे वाङ्‌मयाविषयी सांगितले तेच कलेलाही लागू आहे. कलेचे द्वारा अप्रत्यक्ष रीतीने कामशिक्षण होते. आधुनिक कला या बाबतीत विशेष उपयोगी नाही, परंतु प्राचीन काळातील नग्न पुतळ्यांची आणि जुन्या इटॅलियन नग्न चित्रांची मुलांना जितकी ओळख होईल तितकी चांगली. अशा नग्नतेची सवय झाल्यास निसर्गात काही अश्लील नाही, अशी भावना त्यांच्या मनात उत्पन्न होईल. याकरता शाळांतून कलेचे नमुने म्हणून अशी चित्रे, प्रत्यक्ष वस्तुपाठ म्हणून नव्हे, तर सौंदर्याची सवय व्हावी म्हणून, सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवावी. इटलीत तर शिक्षक मुलांना बरोबर घेऊन संग्रहालयात अशी चित्रे पाहायला जातात आणि हेच योग्य आहे. इंग्लंडात व अमेरिकेत नग्न चित्रांविरुद्ध जी नेहमी ओरड ऐकू येते, त्याचे कारण अशा शिक्षणाचा अभाव होय आणि सर्वत्र तसे असल्यामुळे या अज्ञानाचा पुष्कळ वेळा विजय होतो. रेव्ह. नॉर्थकोट् यांनी लिहिले आहे, की नग्नता नेहमीच कामुक नसते आणि उत्तम चित्र कामुक असले, तरीही त्याचा वाईट परिणाम होत नाही. कामुकता वर्ज्य समजल्यास बायबलातील गोष्टींचीदेखील चित्रे काढता येणार नाहीत.

"परंतु केवळ चित्रांनीही पुरेसे शिक्षण होत नाही. त्याशिवाय जिवंत, देखण्या माणसांचे नग्न फोटोही दाखवले पाहिजेत. पूर्वी पुस्तकात अशी चित्रे नसत, परंतु डॉ. ष्ट्रात्झ यांनी मुलांकरता अशा प्रकारची पुस्तके जर्मनमध्ये काढली आहेत. यांत मुलांचे व मोठ्या माणसांचे नग्न फोटो आहेत. ग्रीक व रोमन लोकांच्या वेळच्या चित्रांत निसर्गदृष्ट्या काही चुका असतात, त्या फोटो पाहिल्याने दुरुस्त होतात. उदाहरणार्थ, त्यात गुह्य भागांवरील केस दाखवलेले नसतात. अर्थात त्या लोकांत ते काढण्याची चाल असल्यामुळे त्यांनी साहजिकपणे चित्रांतही तसेच दाखवले; पण त्याने निसर्गाचे ज्ञान मिळत नाही. 'फ्रेडरिक हॅरिसन'सारख्या लेखकाने असे लिहिले आहे, की 'हे केस न दाखवणे हा चित्रकलेचा नियम इतका जुना, इतका आवश्यक आणि सार्वत्रिक आहे की एखादा चित्रकार हा नियम विसरल्यास असे चित्र किंवा पुतळा पाहून पुरुष संतापतील आणि स्त्रिया लाजून पळून जातील.' परंतु आईच्या मांडीवर बसून जर स्त्रीपुरुषांचे नैसर्गिक नग्न फोटो पाहण्याची मुलास सवय होईल, तर वरीलप्रमाणे लिहिण्याचा मूर्खपणा ती करणार नाहीत."

किर्लोस्करी मासिके दोन राणीसाहेबांनी बंद केली आहेत असे समजते. यांपैकी एक राणीसाहेबा निदान कालेजात होत्या, हे आम्हास माहीत आहे. कालिदास, शेक्सपिअर वगैरेंसारख्या अश्लील लेखकांचा अभ्यास कालेजात करावा लागतो आणि ही पुस्तके अत्यंत पारंपारिक लोकांनीच नेमलेली असतात. फडक्यांच्या कादंब‍र्‍या कालिदासापेक्षा अश्लील असतात काय? की अश्लीलता संस्कृतात किंवा इंग्रजीत असलेली चालते व मराठीत चालत नाही? की फडक्यांची मते त्यांना पसंत नाहीत म्हणून ही बंदी आहे? स्वत:ला पसंत नसलेली मते लोकांना वाचू न देणे ही अरेरावी आहे; पण अर्थात ती त्यांच्या अधिकारातली गोष्ट आहे.

आमचे मासिकाला डॉ. लेले व इतर काही लोक नावे ठेवतात आणि त्याने मुले बिघडतात, असे म्हणतात. हे त्यांचे म्हणणे कितपत खरे आहे, याचा वाचकांनीच विचार करावा. अनेक विद्वान विचारवंतांचे म्हणणे आम्ही वर दिले आहे व यापेक्षा जास्त लिहिण्याची जरूर दिसत नाही. आमचे कित्येक वर्गणीदार 'आता आमची मुले मोठी झाली, त्यांनी हे वाचू नये (निदान आमचे देखत) अशी आमची इच्छा आहे', म्हणून मासिक बंद करतात. परंतु हेच सोवळे पालक मुलांना घेऊन सौभद्रसारख्या अश्लील व कामुक नाटकाला किंवा त्याही पलीकडच्या सिनेमाला बिनदिक्कत जातात. या सर्व लोकांना विचार करता येतो, असे म्हणता येईल काय? या लोकांची नीती किंवा विनय म्हणजे लोक करतील तसे करायचे, त्याचा परिणाम काहीही होओ. स्वतंत्र विचार त्यांना करता येत नाही. यांपैकी काही लोक एखाद्या विशिष्ट बाबीपुरते विचार करणारे असतात; पण त्यांच्या डोक्यातला तेवढाच कप्पा विचाराला मोकळा असतो व बाकीचे मोहोरबंद असतात. कामविषयक बाबींत विचार करणारे लोक फारच विरळा, कारण या बाबतीत सोवळेपणा लहानपणापासून हाडीमासी खिळलेला असतो आणि त्या सोवळेपणाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याचा प्रयत्न करणे यालाच काही लोक स्वतंत्र विचार समजतात. परंतु यात त्यांची स्वत:ची व लोकांची फसवणूक मात्र होते. वस्तुत: ते गतानुगतिकच असतात.

(समाजस्वास्थ्य, जानेवारी १९३७)

मजकुरासाठी आभार : 'रधों', खंड १-८, पद्मगंधा प्रकाशन, लेखक डॉ. अनंत देशमुख

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सरळ अश्लीलतेचा परिणाम मुलांवर वाईट होत नाही आणि अश्लील शब्द बिलकूल न वापरता केलेल्या उत्तेजक वर्णनांचा परिणाम अधिक वाईट होतो

.
रोचक विचार. याला काही आधार असावासे वाटत नाही.

प्राचीन काळातील नग्न पुतळ्यांची आणि जुन्या इटॅलियन नग्न चित्रांची मुलांना जितकी ओळख होईल तितकी चांगली. अशा नग्नतेची सवय झाल्यास निसर्गात काही अश्लील नाही, अशी भावना त्यांच्या मनात उत्पन्न होईल. याकरता शाळांतून कलेचे नमुने म्हणून अशी चित्रे, प्रत्यक्ष वस्तुपाठ म्हणून नव्हे, तर सौंदर्याची सवय व्हावी म्हणून, सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवावी.

चांगली सुचवणी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख आवडला.

कामविषयक बाबींत विचार करणारे लोक फारच विरळा, कारण या बाबतीत सोवळेपणा लहानपणापासून हाडीमासी खिळलेला असतो आणि त्या सोवळेपणाला शास्त्रीय आधार शोधून काढण्याचा प्रयत्न करणे यालाच काही लोक स्वतंत्र विचार समजतात.

अजूनही हे निरीक्षण लागू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. आत्तादेखील खूप प्रमाणात लागू होतो असं वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !