चॉकलेट पान, स्पार्क नोट्स आणि पॉर्नोग्राफी संबंधातील काही 'अ'ठोस मुद्दे

चॉकलेट पान, स्पार्क नोट्स आणि पॉर्नोग्राफीसंबंधातील काही 'अ'ठोस मुद्दे
'अ'ठोस मुद्दा १) एखाद्या गोष्टीचे चॉकलेट पान होणे:
आपण पान का खात असू? मुखवास म्हणून; विड्याच्या पानाची एक विशिष्ट काहीशी कडवट, तिखट चव म्हणून? तजेला वाटावा म्हणून चुना; जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटावं म्हणून सुपारी; त्यात लवंग, कारण लवंगेचाही वास चांगला असतो. केशर, कात, किमाम... (खरंतर इथेच थांबायला हवं, पण आपण त्यात गुलकंद आणि चेरी लावेपर्यंतच त्याचा अर्धा केक बनवलेला असतो.) आणि त्यावर शिरपेच म्हणून चॉकलेटमध्ये बुडवून नंतर हाच 'आशय' खायचा. म्हणजे नक्की काय करत असतो आपण? आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा जर लसावि काढला; तर त्यात चॉकलेट येत असावं, आंबे येत असावेत आणि आईसक्रीम येत असावं. पण म्हणून आपण खूप आवडलेला चहा पिऊन, 'वा! अगदी आईसक्रीम खाल्ल्यासारखं वाटतंय' असं म्हणत नाही. हा अतार्किक एकसुरीपणा आपण चॉकलेट पानामार्फत जगत आहोत.
अजून आपण असंही म्हणतो- 'खूप चांगला सिनेमा होता, पण फार दुःखी होता.' हे म्हणताना आपल्याला काय हवं असतं नक्की? पानात जसा गुलकंद घालतो, तसं सिनेमात थोडा विनोद, थोडा रोमान्स, थोडी गाणी, थोडी ऍक्शन आणि सगळं शेवटी छान वाटावं म्हणून एन्ड टायटल्सच्या वेळी दाखवलेलं मेकिंग- किंवा प्रमोशन सॉन्ग. उद्या चांगला सिनेमा बघून कोणी 'मस्त फिल्म होती, अगदी चॉकलेट पान खाल्ल्यासारखी होती!' असं म्हटलं, तर तो काव्यात्मक विनोदही ठरणार नाही.
प्रत्येक कथनातून एकच सपाट, एकांगी, अतिठोसपणे केवळ उपभोग्य, तरतरी आणणारा अनुभव तयार करणे म्हणजे पॉर्न.
असा हा एकांगी आशय, आपण रोज सतत बघत असलेल्या किती गोष्टींमध्ये दिसतो? साधं बसस्टॉपवर उभं राहिलेलं असताना त्यावर दिसते डेरी मिल्क खाणारी मुलगी. ती कॅड्बरी अशी चाटत खात असते, जणू ती त्यात न्हाऊन निघतेय किंवा ती म्हणजेच एक कॅडबरी आहे, किंवा जणू (हे पॉर्न बघणाऱ्या माणसांना पटेल) ती ब्लोजॉब दिल्यानंतर वीर्य चाटतेय.

हे मी अती बोलतोय असं वाटत असेल, तर बिस्किटांच्या जाहिराती आठवा. सिनेमात सीड्यूस करत असताना पुरुष नट जो आवाज काढतात, त्याच आवाजातल्या बिस्किटांच्या जाहिराती आपण बघतो. "ह्या बिस्किटात क्रीम आहे, चॉकलेट आहे, काजू आहे, बदाम आहे..." असं म्हणणारा पुरुषी अर्धा-व्हिस्पर-अर्धा-बेस आवाज आठवला का? ऍडव्हर्टायजिंगच्या धंद्यामध्ये एखाद्या मॉडेलला, ती विकत असलेली गोष्ट कॅमेऱ्यासमोर नीट धरता येत नसेल, तर 'हॅव सेक्स विथ द डीओ / शॅम्पू / बाइक' असा तिला सुचवला जाणारा वाक्प्रचार अगदी प्रसिद्ध आहे.
'अ'ठोस मुद्दा २) चॉकलेटचा बंगला :
का कोण जाणे, मला इथे 'चॉकलेटचा बंगला' ही लहानपणी शिकवलेली कविता आठवतेय. चॉकलेटच्या बंगल्याला टॉफीचे दार. ही कुठल्याही लहान मुलाची अगदी अंतिम इच्छा असू शकते. पण असा जर तो खरंच राहू लागला, तर त्याचं काय होईल? त्या बंगल्यात राहणं ही गोष्ट त्याच्यासाठी अनबेअरेबल होईल. पॉर्न पहिल्यांदा बघतानाचा अनुभव हा अगदी असाच असतो. (प्रत्येक डिझायरच्या पूर्ततेच्या शेवटी हा अनबेअरेबिलिटीचा अनुभव येतच असावा.) डिझायर्स काय असाव्यात, त्या पूर्ण होण्यातून येणाऱ्या सुखवादी अनुभवाचा पोत नक्की काय आहे? सुख (pleasure) म्हणजे नक्की कसलं प्लेझर? ह्या प्रश्नांचा अतिशय ढोबळ, अकल्पक विचार केला जातो. कल्पित चित्र/ साहित्य आपल्यामध्ये डिझायर पेरतं, नैतिकता पेरतं. त्याचा दर्जा जर वरच्या कवितेइतकाच मर्यादित असेल, तर त्या मुलाला पॉर्नसारख्या गोष्टीतला लालसेने भरलेला एकांगी आनंद का घेता येऊ नये?
'अ'ठोस मुद्दा ३) पॉर्न म्हणजे पॉर्न म्हणजे पॉर्न असतं :
लैंगिकतेची पुरेशी ओळख झालेल्या कुठल्याही तरुण मुला-मुलीसाठी सर्वांत उच्च व महत्त्वाचे साध्य हे साधारणपणे 'सेक्स करणे' हेच असते. 'सेक्स' हा शब्द म्हणून त्या वयात इतका प्रचलित असतो, की "डोनट कसा वाटला?" ह्या प्रश्नाचे उत्तर 'सेक्स' असे कोणीही देईल.
''डोनट / बाईक / शॅम्पू हे चांगलं आहे.'' असं म्हणण्यासाठी आपल्याला जे विशेषण वापरावं लागत असतं, ते म्हणजेच पॉर्न नावाची गोष्ट असते. (म्हणजे पॉर्न हे स्वतःचंच उदाहरण असतं.)
पॉर्न म्हणजे पॉर्न म्हणजे पॉर्नच असतं. त्याला पॉर्न इंडस्ट्री 'म्हणजे', 'उदाहरणार्थ', असं म्हणून अर्थवाहीपणा देत नाही. मात्र जाहिरातीची इंडस्ट्री, जिला (पॉर्नच्या वरील व्याख्येत म्हटल्याप्रमाणे) तो पदार्थ विकण्याच्या दृष्टीने एकच, ठोस, सपाट आशय विकायचा असतो; त्यात बाकी सामाजिक प्रतीकं वापरून 'विमल पानमसाला खाणे' म्हणजे 'केशरी' संस्कृती जपणे असं विधान केलं जातं. त्या जाहिरातीत (यूट्यूब दुवा) अजय देवगण ज्या पद्धतीने त्या मुलीच्या गालांवर केशर चोळतो, नंतर ती त्याला जसं देवाप्रमाणे गंध लावते; त्या सगळ्याचा पानमसाला खाण्याशी संबंध जोडण्याची लबाडी पॉर्न करत नाही. पॉर्नच्या कथनातील लबाडी ही इतकी बालिश असते, की तिच्यात कुठल्याच प्रकारचे लपलेले अर्थ नसतात.
एखादी कला/ फिल्म / चित्र आणि पॉर्न यांच्यात अगदी तसूभर अंतर असतं. (दिलीप चित्रे आपल्या 'चाव्या' नावाच्या लेखसंग्रहात म्हणतात, त्याप्रमाणे- "गरिबीचे ढोबळ, आकर्षकपणे ओंगळवाणे, दर्शन करवून प्रेक्षकांना एक खोटा कॅथार्टिक अनुभव देणारे सिनेमे पॉर्नोग्राफिक आहेत. कारण ते त्या गरिबीविषयी लालसा उत्पन्न करून तिची खरी धग पोहोचवीत नाहीत.")२
ह्या लॉजिकने रजनीकांतच्या 'रोबो'मधला, साधारण मध्यात येणारा, ऍक्शन सिक्वेन्स आठवतोय का? एका हाउसिंग कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत अडकलेल्या लोकांना रोबो वाचवतो, पण (त्याला भावना नसतात) हे दाखवायला, ती आंघोळ करत असतानाच तिला आग लागायचं काय कारण होतं? तिनं तरुण असायचं काय कारण होतं? तिनं मुलगी असायचं काय कारण होतं? तो जेव्हा तिचं जळालेलं नग्न शरीर बाहेर उचलून आणतो, आणि तिचे स्तन आणि पार्श्वभाग जेव्हा पिक्सलेट केला जातो; तेव्हा कुठली भावना मनात तयार होणं दिग्दर्शकाला अभिप्रेत आहे? कोणीतरी त्या शवाला उद्देशून 'अर्ध्या जळलेल्या वांग्यासारखी ती मस्त बाहेर आणली जाते' असं म्हटलं; तर आश्चर्य वाटायचं काहीच कारण नाही. व्हिज्युअल्सची, भावनोत्कटतेची गर्दी करून; विचार करायला वेळच न देणारा असा सिनेमा बघण्याचा हा अनुभव पॉर्नोग्राफी बघण्यातून तयार झालेल्या अनुभवापेक्षा किती वेगळा आहे?
जो भडकपणा सिनेमात आला आहे, तशाच भडकपणे अश्या मोठ्या सिनेमांची जाहिरात केली जाते. नुसती जाहिरातच नाही, तर तो सिनेमा प्रदर्शित होण्याच्या वेळी बाकी काहीही प्रदर्शित करू द्यायचं नाही अशी दादागिरीही केली जाते. राजकीयदृष्ट्या अयोग्य असण्याचा आरोप पॉर्नवर केला जातो, पण पॉर्नबाह्य विश्वात आपण सर्रासपणे नीतिबाह्य राजकारण करत असतो आणि म्हणून पॉर्नला पॉर्न म्हणण्याऐवजी मी ह्या एकाधिकारशाहीच्या राजकारणाला पॉर्न म्हणेन.
ह्या प्रकारे तुम्ही पॉर्नला दूर ढकलायचा कितीही प्रयत्न करा, पॉर्ननी तुम्हांला अगोदरच गिळंकृत केलेलं आहे. आपण पॉर्नच्याच गर्भात राहून, पॉर्नवर बॅन आणतोय.
चांगली इरॉटिका किंवा चांगली रोमॅन्टिक फिल्म आपल्याला सेक्स नावाच्या गोष्टीचे विविध अनुभव, अर्थ दाखवते; तर अतिठोस कला किंवा अतिठोस इरॉटिका (म्हणजेच पॉर्न) आपल्याला सांगते की - आजूबाजूची, लैंगिकतेशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट ही अंतिम प्लेजर देणारी, सेक्स नावाची एक उपभोग्य गोष्टच आहे.
'अ'ठोस मुद्दा ४) बीइंग च्विन्गम :
बूमर, सेंटर फ्रेश, सेंटर शॉक (मी शाळेत असताना मिळायचं आणि ते खाल्ल्या खाल्ल्या अगदी टोकाचं आंबट लागायचं) ह्या सगळ्या च्विन्गम्सची चावून चोथा झाल्यावर एकच चव लागते. म्हणजे च्विन्गम खाण्याचा अनुभव जसा सरतेशेवटी एकच असल्याची जाणीव होते. असंच सलमानची प्रत्येक फिल्म बघून होतं. पण फक्त तेवढंच होत नाही. 'दारू पिऊन गाडी चालवणारा एक जण फुटपाथवर झोपलेल्या गरिबांना चिरडून टाकतो, कोर्टातून सुटतो, सपक समाजसुधारणेच्या फिल्म्स करतो, अनेक फिल्म्स प्रोड्यूस करतो, आपण त्याच्या फिल्म्स हिट करतो, त्याच्या वेडगळपणावर विनोद म्हणून हसतो, त्याला स्टार करतो - ह्या अख्ख्या कथानकाचंही 'बीइंग ह्यूमन' नावाचं च्विन्गम होतं. वरील सगळे प्रकार एक माणूस (ऍज - बीइंग अ ह्यूमन) करू शकत नाही का? तर उत्तर साहजिकच 'हो' असं आहे. हे सगळंच करूनही एक जस्टिफाईड आयुष्य जगायचं ह्याचाच अर्थ 'बीइंग ह्यूमन' असा होतो. 'बीइंग ह्यूमन' हे ह्या वरच्या मथितार्थाचं किती सोपं लॉजिक आहे! काहीही करून 'बीइंग ह्यूमन' असं म्हणून सुटता येऊ शकतं.
आता ह्या सगळ्याचा पॉर्नशी काय संबंध?
सगळ्या चित्रविचित्र अनुभवांचं 'अराउझल' नावाच्या एकाच सपाट अनुभवात रूपांतर करणं म्हणजे पॉर्न असतं. इथेही ह्या चित्रविचित्र शब्दाची व्याख्या खूप व्यापक आहे. त्यात बॉन्डेज पॉर्न येतं, फूड पॉर्न येतं, इन्सेस्ट येतं, स्कॅटोफिलिया (मलमूत्राचं आकर्षण) येतो. ह्या सगळ्या सुखवादी, भोगवादी इच्छा माणसाच्या असूच शकतात. (पॉर्न तयार करणारीही माणसंच असतात.) त्या सगळ्या इच्छांमधे 'इतकं भयानक काही नाही' असं पॉर्न दाखवून देतं. खरंतर त्यातली भयानकता झाकून ठेवून त्यातलं केवळ प्लेजर दाखवण्याचा प्रकार पॉर्न करतं. त्या अनुभवातली शारीर आणि मानसिक गुंतागुंत झाकली जाते. 'बीइंग ह्यूमन' ह्या वाक्प्रचाराचा अर्थ किती गंभीर आहे! पण आपण सलमानच्या नावाखाली त्याचं जे केलंय, त्यालाच पॉर्न म्हणतात. ('ऑल इंडिया बकचोद'चे विनोदवीर 'being गांडू' असे टीशर्ट्स् घालून त्याला तत्कालीन प्रत्युत्तर देतात, पण त्यातल्या आशयाचं सबवर्जन करण्यात त्यांना विशेष रस नाही.) टोल्याला तत्काळ प्रतिटोला देणारे खरंतर एकाच भूमिकेत असतात. एखादी गोष्ट बॅन केली, प्रोहिबिट केली; की तिच्याबद्दल आकर्षण वाढतं असंच इतिहास आपल्याला सांगतो. सिगारेटच्या पॅकेटमधला तो सापळा बाहेर येऊन 'Smoking is prohibited.' म्हणाला, तरी स्मोकर्सवर त्याचा परिणाम होत नाही; कारण ते १३० रुपये देऊन मृत्यूबद्दलचं अभयच विकत घेत असतात. सिगारेट ओढणं म्हणजे मृत्यू आसपासच असल्याची जाणीव स्वतःला करून देणं. ही जाणीव आपल्याला १३० रुपये देऊन विकत का घ्यावीशी वाटतेय? ती जाणीव आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नांमुळे का होत नाही? ह्याचं एक कारण असं असू शकतं, की आपल्याला आपल्याच एका एकाकी विश्वात कोंडून ठेवण्याचं काम डिजिटल मीडिया करतो - ज्याचाही एक भाग पॉर्नोग्राफी हा आहे. डिजिटल मीडियातून तयार होणाऱ्या व्यक्तिकेंद्रिततेला विरोध न करता, फक्त त्याचा एक भाग असलेल्या पॉर्नलाच विरोध करणे, ह्यातून एका गोष्टीचे अनेक आयाम झाकण्याचा प्रयत्न होतो. तो वर मांडलेल्या पॉर्नच्या व्याख्येतील एका लक्षणापेक्षा किती वेगळा आहे?
पॉर्नला एखादा गुप्तरोग असल्यासारखं घाबरून जे लोक त्याला विविध प्रकारे विरोध करत आहेत; त्यांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की - युद्धाचा अभ्यास करताना फ्रॉइड जेव्हा डेथ ड्राइव्हविषयी बोलतो, माणसाच्या मृत्यूविषयीच्या आकलनाबद्दल बोलतो; तेव्हा तो माणसाने माणसाला मारण्याचं समर्थन करत नसतो. तेव्हा फ्रॉइड हे सत्य समजून घेऊ इच्छित असतो, की माणूस हे कृत्य करू शकतो.
इथे कुणाला स्पार्क नोट्सची आठवण आली नाही, तर नवलच. परीक्षेच्या भयामुळे आर्ट्सचे विद्यार्थी संदर्भहीन फ्रॉइड वाचून रस्त्यावर (हिटलरच्या) स्वस्तिकाचे टी शर्ट्स घालून हिंडतातच. (त्यांना ते संदर्भहीन शिकवलं जातं हाही मुद्दा आहेच.) पण तेही वगळल्यास एखादी गोष्ट 'एकाच वाक्यात सांगा' किंवा 'एकाच परिच्छेदात सांगा' या नावाचा जो प्रकार असतो; त्यात गोष्टीचे अर्थ बदलतात, संकल्पनांचे सोप्पीकरण होते. त्याहीपेक्षा उत्तराची (संकल्पनांच्या स्पष्टीकरणाची) लांबी, गोष्टींचा सुबकपणा (म्हणजे मोजकेपणा-) आपल्याला जास्त महत्त्वाचा वाटतो. आता सामाजिक शास्त्राच्या 'नेट' (NET) परीक्षा ह्या 'मल्टिपल चॉईस' झाल्या आहेत, हे त्या सुबकपणाचं टोक आहे. ह्या व्यवस्थेतून आपण अशाच शिक्षकांना आणि अशाच सरकारी कर्मचाऱ्यांना घडवतो आहोत; जे एका प्रश्नाचे एकच, एकाच वाक्यातले, एकाच पद्धतीचे (होय किंवा नाही) उत्तर देऊ शकतात.
'अ'ठोस मुद्दा ५) पॉर्नच्या मानसिक आणि भौतिक अस्तित्वाचं करायचं काय?
प्लास्टिकचं विघटन होत नाही, म्हणून ते पर्यावरणासाठी वाईट असतं हे आपण जाणतो. पण असलेल्या वा साठलेल्या प्लास्टिकचं करायचं काय हा प्रश्न आहे. सयाका गॅन्झ् (Sayaka Ganz) ही जपानी मूर्तिकार प्लास्टिकच्या वाया गेलेल्या भागापासून मूर्ती तयार करून; वाया गेलेल्या, निसर्गापासून बनवलेल्या, पण निसर्गात विघटित न होऊ शकणाऱ्या, भागांचे आकार बदलून; त्यांना कलात्मक ऊर्जितावस्था देत आहे. कारण अस्तित्वात असलेल्या प्रत्येक निरुपयोगी कचऱ्यात लपलेली ऊर्जा आहे, जी कलाकाराने बाहेर आणली पाहिजे. जुन्या, मृत झालेल्या, रोजच्या वापरात नसलेल्या वस्तू वर्तमानात एका ऊर्जित अवस्थेत याव्यात असंही तिला वाटतं.३
ह्या पद्धतीने पॉर्नोग्राफिक साहित्याचा डिजिटल माध्यमामध्ये वापर करून त्यातून काही सौंदर्यशास्त्रीय विधान करता येईल. पॉर्नोग्राफीनी तयार केलेल्या इमेजेसचा वेगळ्या प्रकारे वापर करून त्यातून लैंगिकतेविषयी काही विधान करता येईल.४ एखादा काळ समजून घेण्यासाठी त्या काळातलं पॉर्न समजणं खूप महत्त्वाचं असतं. कारण पॉर्नच्या नॅरेटिव्हमध्ये समाजात होणारे सर्व क्लीशेज् वापरले जातात. रिव्हर्स रेसिझमपासून ते सेन्सॉर, भ्रष्टाचारी राजकारणी, यांत्रिकीकरणातून येणारे मानवी नात्यांमधले ताण, हे सगळं पॉर्नमध्ये आणलं जातं. त्याचं सर्वात सामान्य, ढोबळ आकलन दाखवलं जातं. पण त्यामुळे लोकसंस्कृतीत ('मास कल्चर'मध्ये) कुठले प्रवाह चालू आहेत हे समजतं. शिवाय पॉर्नचा संदर्भ हा सर्वांचा संदर्भ आहे. कारण पॉर्न सर्व स्तरातले लोक बघत असतात; त्यामुळे आजच्या विखंडित समाजामध्ये सर्वांना कळतील असे संदर्भ घेऊन बोलायचं झालं, तर पॉर्नोग्राफीमधले ट्रेंड्स माहीत असणं गरजेचं आहे. पॉर्न स्टार्सवर होणाऱ्या अश्लील विनोदांवरून एखाद्या समाजातील तत्कालीन प्रवाह समजणं सोपं जातं. उदाहरणार्थ, मिया खलिफा नावाच्या अमेरिकास्थित लेबनीज पॉर्न स्टारवरच्या मीम्समधून मध्यपूर्वेकडे अमेरिकन समाज कसा बघतो हे कळतं.५
६) 'अ'ठोस मुद्द्यांविषयीचा 'अ'ठोस मुद्दा :
नीना हार्टली नावाची पॉर्न स्टार तिने दिलेल्या एका लांबलचक मुलाखतीत६ म्हणते, "ज्या देशात पॉर्न बॅन्ड आहे, तिथे स्त्रीवादी साहित्यही बॅन्ड आहे." पॉर्नवर 'स्त्रीद्वेष्टं (mysogenic)' असण्याचा जो आरोप आहे, त्यावर नीना हार्टली म्हणते, "पॉर्न स्त्रीद्वेष्टं नसून मानवद्वेष्टंच (mysanthropic) आहे. पण फक्त स्त्रीवाद्यांनाच हे शब्द वापरायचा अधिकार कोणी दिला? अनेक रॅडिकल फेमिनिस्ट्स हे पुरुषांना कॅस्ट्रेट करण्याचा, त्यांचा खून करण्याचा विचार करतात, त्याविषयी लिहितात; ते साहित्य का बॅन्ड नाही? 'माईन काम्फ' का बॅन्ड नाही?" असे प्रश्न ती उभे करते.
पॉर्न कायदेशीर असणाऱ्या समाजात पॉर्न स्टार्सना त्यांच्या कामाविषयी मोकळेपणाने बोलता येतं. त्यांना त्यांचे हक्क मागता येतात, आणि टॅक्स भरून एक समाजमान्य आयडेंटिटी मिळवता येते. त्या जेव्हा बोलू लागतात, तेव्हा एक वेगळं सत्य समोर येतं. उदाहरणार्थ, ब्रॅन्डी लव्ह नावाच्या पॉर्न स्टारला संभोगाच्या सर्व शक्यता शोधायच्या असल्याने ती तिच्या तिशीत, सर्व भान जागेवर असताना ह्या व्यवसायात शिरली. अश्या अनेक पॉर्न स्टार्स आहेत. उदारमतवादाच्या ज्या कायद्यांमुळे स्त्रीवादाला फायदा झाला, त्याच कायद्याच्या चौकटीत पॉर्नोग्राफीला अभय मिळालं. असं असताना 'एखाद्या वर्गाला समाजकंटक म्हणण्याचा नैतिक अधिकार सांस्कृतिकदृष्ट्या वरच्या श्रेणीच्या एका नव्या सधन वर्गाला कुणी दिला,' असंही नीना हार्टली तिच्या मुलाखतीत म्हणते.
अश्या परस्परविरोधी, अंतर्विरोधी, द्वंद्वात्मक विधानांमुळे पॉर्नविषयीचे किंवा लैंगिकतेविषयीचे अनेक मुद्दे 'अ'ठोस आहेत, असं म्हणावं लागतं. ते ठोसपणे मांडायला गेलो, तर त्यांतले काही महत्त्वाचे मुद्दे दूर राहतात आणि म्हणून पॉर्न जे करत असतं, तेच आपणही करू लागतो.
***
१ https://www.youtube.com/watch?v=nTb4oGPG4p0
२ चाव्या, दिलीप चित्रे (ह्या लेखसंग्रहाच्या अनुपलब्धतेमुळे त्यातला उल्लेख हा जसाच्या तसा नाही. शब्दांत थोडी फेरफार झालेली आहे.)
३ http://sayakaganz.com/
४ https://www.pinterest.com/pin/135671007496717838/
किंवा http://www.materialsforthearts.org/wp-content/uploads/2014/01/mutu.jp
(वरील चित्र पॉर्नोग्राफीच्या इमेजेस्मधले काही भाग वापरून बनले आहे.)
५ https://memegenerator.net/instance/57733978
६ Lindsay Coleman & Jacob Held- Philosophy of Pornography
विशेषांक प्रकार
ह्या प्रकारे तुम्ही पॉर्नला
ह्या प्रकारे तुम्ही पॉर्नला दूर ढकलायचा कितीही प्रयत्न करा, पॉर्ननी तुम्हांला अगोदरच गिळंकृत केलेलं आहे. आपण पॉर्नच्याच गर्भात राहून, पॉर्नवर बॅन आणतोय.
लेख आवडला. वरचं वाक्य गाभ्याचं आहे. एका म्यूझियममध्ये व्हीडियो पाहिला होता. त्यात एका स्त्रीचे रंगवलेले भडक ओठ तुम्हाला बोलवून अत्यंत सेक्सी आवाजात अनेक वेगवेगळ्या गोष्टी विकत घेऊन त्यांचा उपभोग घेण्याविषयी आवाहन करतात, भूल पाडतात. हा व्हीडियो सतत चालू होता, आणि ते सातत्यही महत्त्वाचं होतं. अतिउपभोगाची संस्कृती आणि त्यातून येणारं मांद्य यावर उपाय म्हणजे तुमची भूक चेतवण्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं पॉर्न...
आवडला लेख.
लेख आवडलाच, शेवटी कोणत्याही समाजशास्त्रीय गोष्टी आंतर्विरोधाने भरलेल्या असल्याने त्याबद्दलचे 'अठोस' मुद्देच अधिक विचार करण्यासारखे असतात.
डिजिटल मीडियातून तयार होणाऱ्या व्यक्तिकेंद्रिततेला विरोध न करता, फक्त त्याचा एक भाग असलेल्या पॉर्नलाच विरोध करणे, ह्यातून एका गोष्टीचे अनेक आयाम झाकण्याचा प्रयत्न होतो.
हे भारीच आहे :) पण तरीही लेखक या माध्यमाकडे आणि त्यातला व्यक्तीकेंद्रिततेकडे नुसत्या उपहासाने न पहाता इथे काहीतरी महत्वाचं लिहून जातो आणि इथल्या वाचकांच्या प्रतिक्रियांना उत्तरेही देतो हे काहीसं आशावादी आहे.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=wiCvL3arnps
ही ad बघा. ही ad कश्याविषयीची आहे असे तुम्हाला वाटते?
चांगली इरॉटिका किंवा चांगली
चांगली इरॉटिका किंवा चांगली रोमॅन्टिक फिल्म आपल्याला सेक्स नावाच्या गोष्टीचे विविध अनुभव, अर्थ दाखवते; तर अतिठोस कला किंवा अतिठोस इरॉटिका (म्हणजेच पॉर्न) आपल्याला सांगते की - आजूबाजूची, लैंगिकतेशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट ही अंतिम प्लेजर देणारी, सेक्स नावाची एक उपभोग्य गोष्टच आहे.
एकदम मान्य आहे हा मुद्दा. नेटफ्लिक्स्वरुन मागवुन जपानी एरॉटिका पाहीलेली आहे. अप्रतिम अनुभव होता.
___
सयाका गॅन्झ यांच्या कलाकृती फार आवडल्या.
___
सर्वच मुद्दे इतके दमदार आहेत. पूर्वीच्या प्रतिसादाला बुच बसल्याने, परत एकदा लेख फार आवडला.
https://images.sobadsogood.co
https://images.sobadsogood.com/these-beautiful-and-vibrant-mosaics-are-…
हा एक जर्मन कलाकार आहे, सेन्सॉरशिप संदर्भात त्याचे हे काम. एखादी गोष्ट दाबल्याने/ झाकल्याने ती अधिक बघावीशी वाटते, किंवा कसे.
सिगारेट च्या पाकीटावरचा नवीन लोगो बघितला का? ज्यावरून सिगारेट कंपन्यांनी सध्या ban आणला होता. तो लोगो (photoshoped) तर आहेच, पण ती बिभत्सता भय नाही तर आकर्षण अधिक वाढवते. एखाद्या धंदेवाईक थरारपटासारखे.
विचारांना चालना देणारा हा लेख
विचारांना चालना देणारा हा लेख आवडला. विशेषतः हा आशय -
प्रत्येक कथनातून एकच सपाट, एकांगी, अतिठोसपणे केवळ उपभोग्य, तरतरी आणणारा अनुभव तयार करणे म्हणजे पॉर्न.
अतिठोस कला किंवा अतिठोस इरॉटिका (म्हणजेच पॉर्न) आपल्याला सांगते की - आजूबाजूची, लैंगिकतेशी निगडित असलेली प्रत्येक गोष्ट ही अंतिम प्लेजर देणारी, सेक्स नावाची एक उपभोग्य गोष्टच आहे.
सगळ्या चित्रविचित्र अनुभवांचं 'अराउझल' नावाच्या एकाच सपाट अनुभवात रूपांतर करणं म्हणजे पॉर्न असतं. ...खरंतर त्यातली भयानकता झाकून ठेवून त्यातलं केवळ प्लेजर दाखवण्याचा प्रकार पॉर्न करतं. त्या अनुभवातली शारीर आणि मानसिक गुंतागुंत झाकली जाते.
* या लेखात (आणि या अंकात आतापर्यंत प्रकाशित झालेल्या इतर लेखांत) पॉर्न या संकल्पनेचा 'कामुक चित्रपट/साहित्य' असा मर्यादित अर्थ न लावता जी विस्तृत व्याख्या केली आहे, ती अधिक अर्थवाही, योग्य, उपयुक्त वाटली. तरीही, हा लेख लिहिताना दृश्य माध्यमं/कलांवर जास्त भर दिला आहे असं वाटलं.
* या संदर्भात एक प्रश्नः शब्दप्रधान (लिखित/ श्राव्य) माध्यमांपेक्षा दृश्य माध्यमांना अलीकडच्या काळात मिळालेलं प्राधान्य याचा वर उल्लेखलेल्या पॉर्नीकरणात वाटा आहे असं तुम्हाला वाटतं का? (याचा अर्थ शब्दप्रधान माध्यमांत पॉर्न नसतं/ कमी असतं असा अजिबात नाही)
* उत्तरार्धात किंचित विस्कळित वाटलं लिखाण.
* स्पार्क नोट्सबद्दल अधिक लिहायला हवं होतं. किंवा त्याच्याऐवजी 'नवनीत' म्हटलं असतं तर ते जास्त पोचलं असतं.
* एकाधिकारशाहीच्या राजकारणाला पॉर्न म्हटलं आहे, त्याचं कारण फारसं पटलं नाही.
साहित्य वाचतानाचा अनुभव फिल्म
साहित्य वाचतानाचा अनुभव फिल्म बघातानाच्या अनुभवापेक्षा जास्त subjective असावा. कारण कल्पनाशक्ती जास्त लावली जाते. म्हणून दृष्य माध्यमांवर भर.
नवनीत- स्पार्क: potato-potata.
pornच्या रसग्रहणामध्ये कल्पनाशक्ती कमी असते. राजकारणात, एकाधिकारशाही मध्ये अनेक प्रवाहांना स्थान नसल्याने, वैविध्यता नाही, म्हणून कल्पना नाही. minority चं म्हणणं वेगळं असतं, जे समजून घ्यायला कल्पनाशक्ती वापरायला लागते. (मेजोरीटीला.)
लेख उत्तरार्धात विस्कळीत झालाय असं एक मित्रही म्हटला. हे मला फार काही कळलेलं नाही. कळवा!
बाकी-
बिनकामाचे संवाद नावाचे मी लिहिलेले नाटक आहे. ज्यांना ज्यांना यावसं वाटेल त्यांनी-
- ११ जून, रोजी संध्याकाळी साडेसातला, ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड, पुणे
(महाराष्ट्र-भारत-आशिया-पृथ्वी-आकाशगंगा)
येथे या.
द प्लेजर प्रिन्सिपल (Lustprinzip)
लेख अतिशय आवडला. चॉकलेट पानाच्या उदाहरणावरून 'साईनफेल्ड' मालिकेतला एक प्रसंग आठवला. आवडतं खाणं, सेक्स आणि टीव्ही यांच्यातून मिळणार्या आनंदांचा गुणाकार करण्याचा जॉर्ज कॉस्टॅन्झाचा विनोदी प्रयत्नः
हे मी अती बोलतोय असं वाटत असेल, तर बिस्किटांच्या जाहिराती आठवा.
-- नेमकं निरीक्षण. रवीकाका शास्त्री यांचा समालोचन करतेवेळीचा faux-कामुक आवाजही याचं एक उदाहरण होऊ शकेल :)
प्रत्येक कथनातून एकच सपाट, एकांगी, अतिठोसपणे केवळ उपभोग्य, तरतरी आणणारा अनुभव तयार करणे म्हणजे पॉर्न.
सगळ्या चित्रविचित्र अनुभवांचं 'अराउझल' नावाच्या एकाच सपाट अनुभवात रूपांतर करणं म्हणजे पॉर्न असतं.
--- काही जणांना कदाचित हे अस्थानी, विसंगत वाटू शकेल; पण या व्हिडिओ वृत्तासारख्या 'ह्युमन इंटरेस्ट' स्टोरीजही (रेल्वे रुळ ओलांडताना मुलाचे वाच(व)लेले प्राण) याच प्रकारात मोडाव्यात. व्हिडिओ न पाहता केवळ बातमी ऐकलीत तर; ज्या आक्रमकपणे, एक्सायटेड आणि थरारक पॅकेजिंगमध्ये हे विकलं जातंय त्यावरून 'अराउझल'चा उद्देश स्पष्ट होतो.
अवांतरः
लेखातल्या फ्रॉईडच्या उल्लेखावरून नोंदवावंसं वाटतं की; हा विषय कदाचित, एका मोठ्या चर्चेचा - 'सपाटीकरण झालेले, तरतरी आणणारे अनुभव घेण्याकडे असणारा माणसाचा कल का असतो? किंवा, वेगळ्या शब्दांत सांगायचं तर, इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनला आपण इतके सहज का बळी पडतो?' - एक भाग ठरू शकेल. थोडी अधिक माहिती येथे: https://en.wikipedia.org/wiki/Pleasure_principle_(psychology)
उत्तम लेख
उत्तम लेख.
बोर्नव्हिटापासून ते डायपरपर्यंतच्या सगळ्या जाहिरातीतल्या मम्मी इरॉटिक असतात असं एक निरीक्षण. फूड आणि पॉर्नचा तर घनिष्ठ संबंध आहे. पदार्थ पॉर्नसारखे पेश करणं वगैरे यात आलंच. पण फूड संबंधीच्या कार्यक्रमातले निवेदकही पोर्नोत असल्याप्रमाणे वागत-बोलताना दिसतात. अशी उदाहरणं बरीच आहेत.
कुडोज धर्मकीर्ती!
लेख
उत्कृष्ट लेख.
जी ए कुलकर्णी यांची मृतसमुद्राबद्दलची कथा आहे "अस्तिस्तोत्र". छोटीशी कथा. त्यात पात्र संवाद वगैरे काही नाहीत. मृतसमुद्राचं काव्यात्म वर्णन. त्याच्या शेवटचं वाक्य मला सदोदित लक्षांत आहे : "आता समुद्र केवळ आहे." म्हणजे जिथे काही पिकत नाही, काही जगत नाही, कुणी फिरकत नाही, असं एक अस्तित्व. त्याचं स्तोत्र ते अस्तिस्तोत्र.
पोर्न हे मृतसमुद्राच्या बरोबर उलटी अशी गोष्ट आहे. स्थिरचराला व्यापून राहिलेलं. जे पाणी प्याल जी हवा श्वासांतून आत घ्याल जे अन्न खाल जे डोळ्यांनी पहाल ज्याचा वास घयल स्पर्श अनुभवाल - तुमची सुटका ज्यातून होणार नाही असं.
काही प्रश्न :
आपले प्रतिसाद हे कडिशन्ड केले गेलेले असतात, पावलॉव्हच्या कुत्र्याप्रमाणे आपण जाहिरातींमधल्या गोष्टी विकत घेतो हे महायुद्धानंतर युरप अमेरिकेत आणि १९८० च्या दशकापासून भारतासारख्या ठिकाणी क्रमाक्रमाने एस्टॅब्लिश झालेलं आहे. मूलभूत मार्केटिंगच्या या सूत्राला पोर्नच्या काहीशा बटबटीत, काहीशा भडक , बर्यापैकी उथळ अशा रूपकाला भिडवण्याची प्रक्रिया कशी बनत गेली असावी ? त्याचा काहीएक विशिष्ट असा संदर्भबिंदू आहे का?
पोर्न हे रूपक प्रस्तुत लेखात ज्या विविध अंगांनी, कोनांनी , त्याचं स्लाईसींग-डायसिंग करून मांडलं गेलं आहे, त्याऐवजी "चंगळ" हे रूपक वापरता येणं शक्य आहे काय? चंगळ आणि पोर्न या दोन गोष्टी एकमेकींची जागा घेऊ शकतील अशा - म्युचुअली रीप्लेसिबल - मानता येऊ शकतील काय?
"पोर्न फॉर द अंडरप्रिव्हिलेज्ड क्लास" असा एक मुद्दा मला जाणवतो. पोर्नचा मुख्य ग्राहक हा शहरी, किमान रीसोर्सेस उपलब्ध असणारा कमीत कमी मध्यमवर्गीय आहे. (जास्तीत जास्त काय कितीही श्रीमंत. साक्षात मुकेश अंबानीची अँटिला ही राक्षसी अगडबंब इमारत ही आर्किटेक्चर पोर्न मानता येईल.) पोर्नच्या मुख्यप्रवाहामधे ज्यांची जिम्मा होत नाही अशा दारिद्र्यरेषेखालच्यांकरता किंवा अतिदुर्गम भागात राहाणार्यांकरता लोककलांमधला चावट शृंगार इतपत पोर्न मर्यादित आहे असं दिसतं. थोडक्यात सांगायचं तर जागतिकीकरण, खासगीकरण, उदारीकरण जिथे पोचलं नाही तिथलं पोर्नसुद्धा उत्क्रांत न होतां औधोगिकीकरणपूर्व कालाच्या अवस्थेत ज्या रूपात होतं तिथे थांबलं आहे असं म्हणाता येईल का?
मला असं वाटतं कलेमध्ये आणि
मला असं वाटतं कलेमध्ये आणि porn मध्ये फार कमी अंतर आहे. त्यामुळे कलेतले प्रवाह आणि porn चे प्रवाह समांतर जाताना दिसतात. आणि जाहिरातींबद्दलही हेच आहे. जुनी कला जाहिराती उचलतात- (मोझार्ट, मायकेलेन्जेलो.) भडक बिभत्सता कलाकार वापरतच असतात, ती जाहिरातीत येते त्यात नवल नाही.
porn चंगळीच्या नक्कीच पलीकडे गेलं आहे. तो व्यवसाय तर आहेच, पण ते एक सत्य, अस्त्तीत्त्वातील- सेक्स इतकीच टाळता न येण्याजोगी गोष्ट आहे. आणि चंगळ हा शब्दही चंगळ ह्या शब्दाच्या पलीकडे गेलाय. चंगळी ची व्याख्या रुंदावातेय. सगळ्याच गोष्टींचं चंगळीत रुपांतर करणे शक्यय.
बाकी-
बिनकामाचे संवाद नावाचे मी लिहिलेले नाटक आहे. ज्यांना ज्यांना यावसं वाटेल त्यांनी-
- ११ जून, रोजी संध्याकाळी साडेसातला, ज्योत्स्ना भोळे सभागृह, टिळक रोड, पुणे
(महाराष्ट्र-भारत-आशिया-पृथ्वी-आकाशगंगा)
येथे या.
शैली आवडली, पण...
लेखाची शैली व काही मुद्दे चांगले आहेत.
पण ह्या लेखातील १)प्रत्येक कथनातून एकच सपाट, एकांगी, अतिठोसपणे केवळ उपभोग्य, तरतरी आणणारा अनुभव तयार करणे म्हणजे पॉर्न.
२) सगळ्या चित्रविचित्र अनुभवांचं 'अराउझल' नावाच्या एकाच सपाट अनुभवात रूपांतर करणं म्हणजे पॉर्न असतं.>>> इत्यादीवरून मम्मट, विश्वनाथ वगैरे साहित्यशास्त्रकार काव्यानंद हा ब्रह्मानंदसहोदर असल्याचे सांगतात त्याची आठवण झाली! काव्यानंदाची अनुभूती आध्यात्मिक पातळीवर नेऊन पोहोचवणे त्यांच्या विवक्षित वैचारिक-तात्त्विक विश्वाशी सुसंगत आहे, त्यामुळे त्यांनी ह्यात अध्यात्म आणलं!!
कोणताही उत्कट आनंद (/दुःख) स्पिरिच्युअल/प्रतीतीपर पातळीवर नेणे योग्य असूही शकेल ! पण असा प्रतीतीपर अनुभव फ्रॉयडियन किंवा वेदांताच्या लेव्हलला नेणे नेहमीच औचित्यपूर्ण असेलसे वाटत नाही! किंबहुना पारिभाषिक नावे दिली किंवा एकच एक विवक्षित चौकटीत बसवले कि विचारव्यूहाची कक्षा वेदांत किंवा सेक्स वगैरे संबंधित प्रतलांमध्ये संकुचन पावत असल्यासारखे वाटते!
माझ्या डोक्यातल्या
माझ्या डोक्यातल्या संपादकीयाला बाहेर आणायसाठी ज्या लेखानं एक जोरदार धक्का दिला तो हा लेख. मी लेखकाची अर्थातच ऋणी आहे. पण हा लेख पुन्हा पुन्हा वाचताना माझ्या भावना काहीशा संमिश्र स्वरूपाच्या होत गेल्या.
लेखाची सुरुवात अतिशय टोकदार आहे. पॉर्न या संकल्पनेचं सर्वव्यापीपण पकडणारी ही सुरुवात केवळ साक्षात्कारी म्हणावी अशीच आहे. पण पुढे पुढे लेखक काहीसा भरकटत जातो की काय असं मला वाटलं. विशेष करून एकाधिकारशाहीच्या राजकारणाला लेखक जेव्हा पॉर्न म्हणतो, तेव्हा. भाषेत काही विशिष्ट संकल्पनांकरता विशिष्ट शब्द असतात. भ्रष्ट / अन्यायकारी राजकारणासाठी भ्रष्ट असं विशेषण तयार झालं आहे ते या विशिष्टीकरणाच्या गरजेतूनच. त्याला वाईट राजकारण असं सरधोपटपणे म्हणता येईलच. पण तसं न म्हणता भ्रष्ट हे विशेषण आपण वापरतो. अशी सगळी नकारात्मक विशेषणं काढून लेखकाला त्या जागी पॉर्नोग्राफिक असं विशेषण आणण्यातून काय साध्य करायचं आहे, ते मला नीटसं कळलं नाही. त्याचा निर्देश चिंगमत्वाकडे असेल का? मला माहीत नाही. मी लेख अजुनी पचवतेच आहे.
तसंच अखेरच्या अठोस मुद्द्याबद्दलही माझ्या आणि / किंवा लेखकाच्या डोक्यात गोंधळ असावा. त्या मुद्द्यात लेखक शरीरसंबंधांचं चित्रण अशा मर्यादित अर्थानं पॉर्न हा शब्द वापरतो आहे, असा माझा समज आहे. अशा वेळी शब्दनिवड अधिक काटेकोर हवी होती, जी न झाल्यामुळे मी गोंधळले. पुन्हा एकदा - हा दोष की लेखकानं उद्मेखून साधलेला परिणाम ते मला ठाऊक नाही. मी०ले०अ०प०आहे.
माझा एक अ-ठोस मुद्दा
पोर्नचा नक्की विरोधक कोण आहे ज्यासाठी हां सुंदर लेखन प्रपंच रचलाय.