न केलेले भाषण

न केलेले भाषण
- र. धों. कर्वे
नाशिक मराठी साहित्य संमेलनाच्या वेळी श्री. कृष्णराव मराठे यांनी ठेवलेल्या ठरावाच्या संदर्भातील भाषण :
"या ठरावातील एक भाग अश्लील मजकुरासंबंधी आहे. अश्लीलता ही काय भानगड आहे, याचा शोध मला अजून लागला नाही. मनुष्याचाच शरीराचे काही भाग अश्लील का समजावेत? घोडे रस्त्यात खुशाल नागवे हिंडत असतात, त्यांना कोणी प्रतिबंधही करीत नाही, आणि अश्लीलही म्हणत नाही. मनुष्य हा एकच प्राणी अश्लील आहे असे दिसते. विषयनियामक समितीत एका गृहस्थांनी सांगितले, की ईश्वराने आपल्याला अश्लीलता दिली आहे, आणि आम्ही तिचा उपभोग घेतो. जी गोष्ट ईश्वराने दिली, आणि जिचा आपण उपभोग घेतो, ती वाईट कशी असेल? पण कृष्णराव मराठे तिला अश्लील म्हणतात, मग ईश्वर काहीही म्हणो.
"या विशिष्ट भागांचा काहीही संबंध लिखाणात आला, की त्या मजकुराला ते अश्लील म्हणतात. ही अश्लीलता कशात असते? म्हणजे ती शब्दांत असते, की शब्दांच्या अर्थात असते? यासंबंधी हायकोर्टाने असा निर्णय दिलेला आहे, की अश्लीलता कधीही अर्थात नसते, कारण एकच अर्थ एका प्रकारच्या भाषेत मांडल्यास तो अश्लील होईल; पण तोच अर्थ सभ्य शब्दांत मांडल्यास अश्लील होणार नाही. यावरून अश्लीलता अर्थात नसते असे अधिकार्यांचे मत दिसते. आणि आपल्यालाही ते थोड्या विचाराने दिसेल. उदाहरणार्थ, 'मात्रागमनी' हा शब्द घेऊ. हा अत्यंत शिष्ट समजला जातो. त्याच अर्थाचा 'मादरचोद' हा शब्द जरी शिवी समजतात. तरी ती इतकी सौम्य की एखादा बापही आपल्या मुलासंबंधी 'मोठा मादरचोद आहे बरे का!' असे तिर्हाइताला कौतुकाने सांगू शकतो! याच शब्दाचा अर्थ स्पष्ट मराठीत सांगितला तर तो शिमगा होतो. म्ह्णजे फक्त शिमग्यात तो अश्लील होत नाही, इतर दिवशी अश्लील होतो. या तिन्ही शब्दांत कल्पना तीच आहे, पण त्यांतले पहिले दोन अश्लील मानले जात नाहीत. यावरून कल्पनेत अश्लीलता वास करीत नसते, असे सिद्ध होते.
पण शब्दांत तरी अश्लीलता असते काय? विचार केल्यास तसेही दिसत नाही. अर्थाकडे लक्ष न देता शब्दाला जर अश्लील म्ह्णायचे असेल, तर तो शब्दोच्चार कोणत्याही भाषेत अश्लीलच समजला पाहिजे, किंवा अनेकार्थी शब्द असल्यास कोणत्याही अर्थाने तो अश्लील समजला पाहिजे. पण तसे पाहू गेले तर शेंडीला जो गुजराथी शब्द आहे तो मराठीत अश्लील समजतात. तसेच लिंग हा शब्द व्याकरणात अश्लील नाही. फक्त शारीरिक अर्थाने तो अश्लील समजतात. असे का व्हावे? यावरून शब्द अश्लील असतो असे दिसत नाही.
तेव्हा अश्लीलता शब्दातही नाही आणि अर्थातही नाही. तर मग ती असते तरी कोठे? अर्थात अश्लीलता मानणार्यांच्या मनात ती असते. मग यात लेखकाचा काय दोष? वाचकांनी आपल्या मनातली अश्लीलता काढून टाकावी किंवा त्यांना ती काढायला नको असली, किंवा काढता येत नसली, तर त्यांनी निदान तीबद्दल लेखकाला दोष देऊ नये. भाषा सभ्य असावी की असभ्य, हा प्रश्न वेगळा आहे आणि ती सभ्य असावी असेच कोणीही म्हणेल. परंतु हा अभिरुचीचा प्रश्न आहे. तो समित्या नेमून सुटणारा नाही.
"अध्यक्षांनी काल विषयनियामक समितीत सांगितले, की 'माझ्या सर्व लिखाणांत स्तन हा शब्द आलेला नाही, आणि माडखोलकर नेहमी टचटचीत कुचाग्रांचे वर्णन करीत असतात.' हे खरे असले तरी शृंगार जर नवरसांत पहिला समजला जातो, तर शृंगारिक वर्णने का लिहू नयेत? वीररसात्मक उत्कट लिखाणाला जर कोणी हरकत घेत नाही, तर उत्तान शृंगारालादेखील हरकत असू नये. ज्याला कविकुलगुरु म्हणतात, त्या कालिदासाने अशी वर्णने लिहिली आहेत, आणि कृष्णराव मराठ्यांच्या अंगात जर थोडातरी प्रामाणिकपणा असेल, तर कालिदासाची पुस्तके युनिव्हर्सिटीने नेमू नये, अशी खटपट त्यांनी करावी. शेक्सपिअरचीही गोष्ट तशीच आहे. कदाचित कोणी म्हणेल, की कालिदासाने वर्णिलेला शृंगार अभिजात आहे, सदभिरुचीला धरून आहे. परंतु ज्यांच्या विद्वत्तेबद्दल शंका घेता येणार नाही असे ज्ञानकोशकार डॉ. केतकर एकदा कालिदासाचे कान उपटायला निघाले होते, हे लक्षात घेणे जरूर आहे.
"विषयनियामक समितीत काहींनी सांगितले, की झिरझिरीत पातळातून दिसणार्या देहाचे वर्णन करणॆ गैर आहे आणि खाका वर करून व छात्या पुढे काढून उभ्या राहिलेल्या तरुणींची चित्रे जाहिरातीत असू नयेत. ज्या गोष्टी नेहमी रस्त्यात दिसतात, इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष या सभागृहातदेखील दिसत आहेत, त्यांचे वर्णन मात्र करू नये किंवा चित्रे काढू नये म्हणून कोण ऐकेल?
"या ठरावातला आणखी एक मुद्दा म्हणजे वैयक्तिक टीकेचा. चालू असलेल्या वादात ज्यांचा बिलकूल संबंध नाही, अशा वैयक्तिक गोष्टींचा उल्लेख गैर आहे, याबद्दल मतभेद होणार नाही. पण कायद्यानेदेखील जो प्रश्न धडसा सुटत नाही, तो समित्यांनी कसा सुटणार?
"आणि कृष्णराव मराठ्यांना अनिष्ट वाटणारे हे लिखाण लहान मुलांच्या हातांत गेल्यास त्यांच्यावर वाईट परिणाम होतात, असा आणखी एक मुद्दा आहे. वैयक्तिक आणि असभ्य टीका, आणि त्यांना अश्लील वाटणार्या गोष्टी आणि कोट्या, लिखाणापेक्षा खाजगी संभाषणांतच फार मोठ्या प्रमाणावर होत असतात आणि हे सर्व प्रकार लहान मुलांच्या कानावर एकसारखे पडत असतात. म्हणजे ज्या मुलांना वाचनाची बिलकूल आवड नाही, अशा मुलांनाही अशा गोष्टी ऐकाव्या लागतात; तेव्हा लिखाणाविरुद्ध तेवढी तक्रार करण्यात काय अर्थ आहे?
एकंदरीत हा ठराव फोल तर आहेच, पण लेखनस्वातंत्र्याच्या दॄष्टीने हानिकारक आहे, हे कोणाही समंजस माणसाला सहज दिसण्यासारखे आहे. एकीकडे आपण स्वातंत्र्याची मागणी करतो; पण दुसरीकडे जर आपण अशा तर्हेने आपली गळचेपी करून घेऊ लागलो, तर आपल्या मागणीची किंमत काय राहील?"
(समाजस्वास्थ्य, डिसेंबर १९४२)
मजकुरासाठी आभार : 'रधों', खंड १-८, पद्मगंधा प्रकाशन, संपादक डॉ. अनंत देशमुख
भाषण फारच आवडले. काळाच्याही
भाषण फारच आवडले. काळाच्याही पुढे असलेली थोर माणसे!!!