Skip to main content

दाक्षिणात्य चित्रपटांचं 'सौंदर्यशास्त्र'

मुखपृष्ठाविषयी.

दाक्षिणात्य चित्रपटांचं 'सौंदर्यशास्त्र'

- विषारी वडापाव उर्फ अमोल उद्गीरकर

स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास पाहिला तर सामाजिक-राजकीय आणि इतरही बहुतेक साऱ्या क्षेत्रांत दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय असे दोन वर्चस्व असलेले प्रवाह आढळतात. आपलं अस्तित्व उर्वरित भारतापासून किंवा उत्तर भारतापासून वेगळं ठेवण्याच्या दाक्षिणात्य राज्यांच्या आग्रहात या वेगळ्या प्रवाहांची बीजं आढळतात. मग हिंदीपासून फटकून राहण्याची भूमिका असो, सोशल इंजिनिअरिंग असो वा तामिळ वाघांसारखे आंतरराष्ट्रीय मुद्दे असोत; दाक्षिणात्य राज्यांनी कायम आपली वेगळी भूमिका बजावली आहे. चित्रपटक्षेत्र हे त्याला अपवाद नाही. शुजीत सरकार दिग्दर्शित राजीव गांधी हत्येवर आधारित चित्रपट 'मद्रास कॅफे'च्या प्रदर्शनाला तामीळनाडू राज्यात जोरदार विरोध झाला होता. कारण तामिळी प्रेक्षकांच्या मते त्यामध्ये प्रभाकरन या, 'तामीळ ईलम'साठी लढा देणाऱ्या, नेत्याचं चित्रण खलनायकी स्वरूपात केलं होतं आणि त्यांना ते अन्यायकारक वाटत होतं. राजीव गांधी यांची निर्घृण हत्या घडवून आणणाऱ्या प्रभाकरनबद्दल देशात संतापाची भावना असली, तरी तामीळनाडूमध्ये त्याला मानणारा एक मोठा वर्ग आहे, हे एक उघड गुपित आहे. अगदी करुणानिधी यांचा द्रमुक हा पक्षसुद्धा 'प्रभाकरनधार्जिणा' होता. मागच्याच वर्षी श्रीलंकेच्या लष्कराने निर्घृणपणे ज्याची हत्या केली होती, त्या प्रभाकरनच्या लहान मुलावर तामीळनाडूमध्ये चित्रपट आला होता. दाक्षिणात्य चित्रपटांचा बारकाईने अभ्यास केला, तर अशी आणखीही काही तथ्यं समोर येतात.

जेव्हा आपण दाक्षिणात्य (तेलुगू, मल्याळम, तामीळ) सॉफ्ट पॉर्न अथवा सेमी पॉर्न चित्रपटांचा विचार करतो, तेव्हा हे सगळे वर उल्लेख केलेले घटक विचारात घ्यावे लागतात.

नित्यनियमाने पॉर्न बघणारे पुरुष (आणि काही स्त्रियाही ) सहसा आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा स्मार्टफोनमध्ये पॉर्नचा साठा करतात. त्यामध्ये दाक्षिणात्य पॉर्नला अनेकदा विशेष स्थान असतं. पॉर्न कंटेंटच नव्हे, तर दाक्षिणात्य मुख्य धारेमधल्या चित्रपटांमधली गाणीसुद्धा पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहेत. के. राघवेंद्र रावसारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी गाण्यांच्या चित्रीकरणाच्या तंत्रात क्रांतीच केली. त्यांच्या चित्रपटात गाणी अतिशय शृंगारिक पद्धतीने चित्रित केलेली असत. प्रत्यक्षात फारसं काही न दाखवता 'सूचक' पद्धतीने ही गाणी चित्रित केलेली असत. त्यात प्रतीकांचा मोठ्या प्रमाणावर वापर असे. म्हणजे लैंगिक क्रियेतले वेगवेगळे प्रकार दाखवताना फळं, दूध, मध यांचा जो प्रतीकात्मक वापर दाखवतात; तो काही लोकांना बराच वेगळा वाटणारा आणि उद्दीपित करणारा असू शकतो. 'मल्ला' (विकिपिडियाचा दुवा, यूट्यूबचा दुवा) हा कन्नड चित्रपट या बाबतीत एक मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटाची गाणी यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर बघितली जातात. मर्यादेत राहून प्रेक्षकांना उत्तेजित कसं करावं याचा ही गाणी म्हणजे वस्तुपाठ आहेत. या गाण्यांना किमान सोळा ते सतरा लाख 'हिट्स' मिळाल्या आहेत. या गाण्यांत मोरपीस, जरबेराची फुलं, बांगड्या यांचा दिग्दर्शकाने जो 'सूचक' वापर केला आहे तो बघण्यासारखा आहे. या गाण्यातली अभिनेत्री प्रियांका त्रिवेदी हिला तिच्या चित्रपटामधील कारकिर्दीमुळे जेवढी प्रसिद्धी मिळाली नाही, तेवढी या गाण्यांमुळे मिळाली आहे. 'कादलन' या चित्रपटात तर प्रभुदेवा नायिकेच्या - नग़माच्या - पोटावर अंडं फोडून ऑमलेट (दृश्याचा यूट्यूब दुवा) तयार करतो. तेलुगू आणि तामीळ चित्रपटामध्ये पिटातल्या प्रेक्षकांना रुचेल अशा पद्धतीने दिग्दर्शक नायिकेला 'पेश' करतात. प्रेक्षकांना खूश करण्याच्या नादात ते स्त्रियांचं 'वस्तुकरण' करतात असा आक्षेप अनेकदा घेतला जातो. पण कुठल्याही नफाप्रिय धंद्यांमध्ये अशा नैतिक तत्त्वांना जशी जागा नसते, तशी ती इथेपण नाहीच. काही अपवाद वगळता बहुतेक 'इरॉटिक कंटेंट' हा पुरुष प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवूनच बनवला जातो. दाक्षिणात्य चित्रपटपण याला अपवाद नाहीत. पुरुष प्रेक्षक उद्दीपित होईल अशा पद्धतीनेच नायिकेला पडद्यावर सादर केलं जातं.

दाक्षिणात्य प्रेक्षकांना भरीव, मांसल स्त्रिया आवडतात. त्यामुळे तशाच नायिका निवडल्या जातात. कालानुरूप हा कल बदलतो आहे. पाश्चिमात्य प्रभावाखालील नवीन पिढीला बॉलीवूडच्या आणि हॉलीवूडच्या 'स्किनी' नट्यांबद्दल आकर्षण आहे; त्यामुळे काही 'बांधेसूद' नट्या दाक्षिणात्य सिनेमात दिसू लागल्या आहेत, तरी अजूनही 'झिरो फिगर' नायिका हा प्रकार तिकडे दिसत नाही. एके काळी देशभरात 'झिरो फिगर'ला जोरदार लोकप्रियता मिळत असतानाही दक्षिणेत मात्र हा प्रकार फारसा रुजू शकला नव्हता, याचं कारण दाक्षिणात्य प्रेक्षकांच्या आवडीनिवडीमध्ये आहे. गेल्या पन्नास वर्षांतल्या नट्यांच्या मांदियाळीकडे बघितलं, तरी याची चुणूक मिळते. खुशबू, जयाप्रदा, रम्या, अनुष्का, नमिता या नट्या त्यांच्या शरीरसौष्ठवामुळेच गाजल्या.

अनुष्का शेट्टी

नमिता

अनुष्का शेट्टी नमिता

एका मराठी नायिकेला यासंदर्भात एक मजेशीर अनुभव आला होता. चित्रीकरण चालू असताना निर्माते तिला आग्रह करून डोसे, सांबार इत्यादी दाक्षिणात्य पदार्थ खाऊ घालत होते. ती मराठी अभिनेत्री आदरातिथ्याने भारावून गेली. पण नंतर तिला या आदरातिथ्यामागची 'अंदर की बात' कळली. निर्माता आणि दिग्दर्शकाला आपली अभिनेत्री थोडी 'बारीक' वाटत होती. आपल्या प्रेक्षकांना अशी बारीक अभिनेत्री आवडणार नाही अश्या साधार भीतीमुळे तिला थोडी 'भरीव' बनवण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू होता! तर असे हे दाक्षिणात्य निर्माते - दिग्दर्शक आणि तिथले प्रेक्षक.

या सगळ्या प्रकाराला एक पुरुषी वर्चस्ववादाची बाजू आहेच. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत सध्या उत्तर भारतीय आणि पंजाबी नायिकांचा बोलबाला आहे. राकुलप्रीत सिंग, तमन्ना, हंसिका मोटवानी, काजल अगरवाल या नट्या दक्षिणेत सध्या खूप लोकप्रिय आहेत.

हंसिका मोटवानी

हंसिका मोटवानी

राकट रावडी दाक्षिणात्य नायक जेव्हा हाय क्लास, इंग्रजी झाडणाऱ्या नायिकेला धडा शिकवून तिला त्याच्या प्रेमात पडायला मजबूर करतो, तेव्हा प्रादेशिक राष्ट्रवादाच्या पुरुषी 'अहम्‌'ला सुखावण्याचाच तो प्रकार असतो.

दाक्षिणात्य सॉफ्टपॉर्न किंवा सेमीपॉर्न चित्रपट हे आपल्या उत्तर भारतीय जातभाईपेक्षा अधिक धीट, अधिक बोल्ड असतात. त्यांच्यातल्या या बोल्ड कंटेटमुळे भाषेच्या मर्यादा ओलांडून ते देशभरात बघितले जातात. रेशमा, शकीला, देवी ही नावं आयुष्याच्या कुठल्यातरी एका टप्प्यावर पॉर्न पाहणाऱ्या बहुतेक भारतीय पुरुषांना माहीत असतातच.

शकीला

रेश्मा

शकीला

रेश्मा

मुख्य म्हणजे हे चित्रपट डबिंग करून नेपाळ, चीन, श्रीलंका यांसारख्या देशातही प्रदर्शित होतात. यावरून या चित्रपटांचा आवाका किती मोठा आहे, त्यांची लोकप्रियता किती सर्वदूर पसरलेली आहे याची कल्पना येऊ शकते. या सेमीपॉर्न चित्रपटसृष्टीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा चेहरा स्त्रियांचा आहे. भारतात बहुतेकदा चित्रपटसृष्टीचा चेहरा हा नायकप्रधान संस्कृतीमुळे पुरुषी असतो, आहे. म्हणजे माधुरी दीक्षित, श्रीदेवी, हेमामालिनी या नट्यांनी स्वतःच्या बळावर चित्रपट हिट केले आहेतच; पण त्यांनासुद्धा आपल्या कारकिर्दीत बहुतेक वेळा अमिताभ बच्चन, खान मंडळी, धर्मेंद्र या नटांवर अवलंबून राहावं लागल्याचं दिसतं. मात्र दाक्षिणात्य सॉफ्टपॉर्न किंवा सेमीपॉर्न चित्रपटसृष्टी याला जोरदार अपवाद आहेत. या चित्रपटसृष्टीच्या सुरुवातीपासून ते पडत्या काळापर्यंत नट्यांनीच ही सिनेमासृष्टी गाजवली. रेश्मा, शकीला, मारिया, बाबिलोना यांसारख्या नट्यांच्या बळावर प्रेक्षक चित्रपटगृहांत गर्दी करतील हा विश्वास अशा सिनेमाच्या निर्मात्यांना होता. ही एक दुर्मीळ गोष्ट आहे. या चित्रपटांत काम करणार्‍या एकाही नायकाचं नाव कुणालाही माहीत नाही. चित्रपटांची प्रसिद्धीदेखील नायिकांच्या नावावरच होते. प्रेक्षक चित्रपटगृहात जातो, तोही नायिकांना बघण्यासाठीच. यांतल्या शकीलासारख्या काही नायिकांनी मेनस्ट्रीम सिनेमातसुद्धा प्रवेश मिळवला आणि आपल्या मर्यादित कुवतीनुसार त्यात यश मिळवलं.

शकीलाने जेव्हा चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा तिची तुलना तत्कालीन सॉफ्टपॉर्न चित्रपटांची राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्क स्मिताशी होऊ लागली. सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित आणि विद्या बालन अभिनित 'द डर्टी पिक्चर' कुणी पाहिला असेल; तर त्यातपण शकीलाचा एक संदर्भ असलेला आठवेल. शकीलानेही अनेक वर्षं या इंडस्ट्रीवर राज्य केलं. नुकतंच मल्याळी भाषेतलं तिचं आत्मचरित्र - शकीला : आत्मकथा - बाजारात आलं. त्याच्या मुखपृष्ठावर ती म्हणते, “I am not guilty but I am sad.” या आत्मचरित्रात शकीलाचं लहानपणीच कसं लैंगिक शोषण झालं, तिच्या आईनेच तिला कसं या व्यवसायात ढकललं, सेक्स सीन चित्रित होत असताना मध्येच अतिथकव्यामुळे ती झोपत कशी असे, वगैरे बाबींचे खळबळजनक आणि मनोरंजक उल्लेख आहेत. शकीला सुदैवी होती. तिला एका विशिष्ट टप्प्यावर समाजानं स्वीकारलं. पण सगळ्याच जणी तेवढ्या सुदैवी नव्हत्या. रेश्मा ही त्यांच्यापैकीच एक. रेश्मा ही सर्व नायिकांमध्ये सगळ्यात सुंदर. तितकीच पडद्यावर बिनधास्त. या चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली आणि रेश्माही इतर बर्‍याच नायिकांप्रमाणे उत्पन्नाच्या दुसऱ्या स्रोताकडे वळली. वेश्याव्यवसायाकडे. मध्यंतरी एका पोलीसधाडीमध्ये ती रंगेहाथ पकडली गेली. धाड टाकणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने मोबाईलवर तिचं चित्रीकरण केलं. तिला अतिशय घाणेरडे प्रश्न विचारले. ती चित्रफीत आंतरजालावर आली. कोर्टाने जामिनावर तिची सुटका केली. ती चित्रफीत बघताना भेदरलेल्या रेश्माची जितकी दया येते, तितकाच राग त्या उद्दाम पोलीस अधिकार्‍याचा येतो. या भयंकर अनुभवानंतर रेश्मा गायबच झाली. कुणी म्हणतं, तिने आत्महत्या केली. या नट्यांची पडद्याबाहेरची आयुष्यं आणि त्यांच्या शोकांतिका हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे.

दाक्षिणात्य सेमी पॉर्न किंवा एकूणच पॉर्न इंडस्ट्रीचं अर्थकारण हा पैलू बराच रोचक आहे. या इंडस्ट्रीमधले व्यवसायिक चढउतार त्यातून कळतात. शिवाय एक देश म्हणून आपण कसकसे बदलत गेलो आहोत याचं प्रतिबिंब त्या प्रवासात पडलं आहे. ज्याला भारतातल्या सामाजिक बदलांचा अभ्यास करायचा आहे, त्याने याचाही अभ्यास करणं आवश्यक आहे. सुरुवातीच्या काळात हे सेमीपॉर्न चित्रपट सिंगल स्क्रीन चित्रपटगृहांमध्ये लागायचे. प्रेक्षकांसाठी चित्रपटगृह हा एकमेव पर्याय होता. नंतर ९०च्या दशकात काही घरांमध्ये व्हीसीआर आले आणि लोकांना व्हिडिओ कॅसेटचा पर्याय उपलब्ध झाला. आता तिशीमध्ये असणाऱ्या अनेक लोकांचा पॉर्न नॉस्टॅल्जिया हा या व्हिडिओ कॅसेट्सशी निगडीत आहे. एखाद्या मित्राच्या घरातले लोक बाहेरगावी गेल्यावर त्याच्या घरी भाड्याने व्हीसीआर आणून 'तसल्या' फिल्म्स बघणे हा अनेकांच्या आयुष्यातला थरारक भाग होता. मात्र जागतिकीकरण आपल्या दारी आलं आणि जग कायमचंच बदलून गेलं. राजीव गांधींनी भारतात आणलेल्या संगणकाचा नव्वदच्या दशकात जोरदार प्रसार झाला. जग जवळ आलं. मग अशा चित्रपटांच्या निर्मात्यांनी बाजारात सीडीज्‌ आणल्या. या सीडीज्‌ दुकानात, आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या विक्रेत्यांकडेही, मिळायच्या. हा या इंडस्ट्रीचा सुवर्णकाळ होता असं म्हटलं तरी हरकत नाही. पण तोपर्यंत बाटलीबंद असणारा इंटरनेट नावाचा राक्षस बाटलीमधून बाहेर पडत होता. कुणीही कितीही प्रयत्न केले, तरी त्याला थोपवणं शक्य नव्हतं. या इंटरनेटनेच या इंडस्ट्रीचं कंबरडं मोडलं. आता एखादा माणूस सीडी विकत घेऊन त्यांतली दृश्यं इंटरनेटवरून मित्रांना पाठवू शकत होता. अर्थातच त्याचा परिणाम सीडीज्‌च्या खपावर होऊ लागला. इंटरनेटवर अनेक मोफत साईट्सदेखील सुरू झाल्या. लॉग इन केल्यावर समोर 'फ्री पॉर्न'चा खजिनाच उपलब्ध होऊ लागला. सेमी पॉर्न चित्रपटांच्या महसुलाचा मोठा हिस्सा बुडाला. नंतर स्मार्टफोन युग सुरू झालं. बहुतेक लोकांच्या हाती मोबाईल खेळू लागले. त्यामध्ये इंटरनेटची सोय होती. याचाही जीवघेणा फटका सेमीपॉर्न फिल्म इंडस्ट्रीला बसला. यापूर्वी असे चित्रपट किंवा त्यातले विशिष्ट प्रसंग बघायला लोकांना थिएटरमध्ये किंवा एखाद्या व्हिडिओ पार्लरमध्ये जावं लागत असे. आता हे सगळं मोबाईलवर उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बी ग्रेड चित्रपट बघणार्‍या प्रेक्षकांचा ओघ आटू लागला आहे. गावागावांत अजूनही तग धरून असलेली सिंगल स्क्रीन चित्रपटगृहं हा उत्पन्नाचा एकच स्रोत उरला. पण तिथेसुद्धा वितरण नावाचा ब्रम्हराक्षस होताच.

सध्या ही इंडस्ट्री संपण्याच्या मार्गावर आहे. भारतीय पुरुष गोऱ्या आणि स्लिम 'फॉरेनर' बायकांना बघण्यात जास्त रस घेत आहेत. लठ्ठ, सावळ्या दक्षिण भारतीय नायिकांना पाहण्यात त्याला आता रस नाही. मल्टीप्लेक्समध्ये या 'डाऊन मार्केट' चित्रपटांना स्थान नाही. यूट्यूब, एक्सव्हिडिओज वगैरे साइट्सनी यांचं मार्केट संपवलं आहे. हा चित्रपट बनवणारे तंत्रज्ञ इकडे तिकडे विखुरले गेले आहेत. अनेक नायिका वेश्याव्यवसायाकडे वळल्या आहेत. नायक बहुतेक मॉब सीनमध्ये वगैरे दिसतात. कुठल्याही इंडस्ट्रीची इतकी सर्वांगीण धूळधाण झाल्याचं हे असं उदाहरण विरळाच. अजूनही काही सेमी पॉर्न चित्रपट बनत आहेत, पण या इंडस्ट्रीचा सुवर्णकाळ मागे पडला आहे आणि न संपणारा निर्विवाद उतार चालू झाला आहे हेच सत्य आहे .

सेमीपॉर्न चित्रपटाचा इतिहास हा एकप्रकारे भारतीय सामाजिक वास्तवाचाच इतिहास आहे. अनेक पिढयांचं रंजन करण्याचंच नव्हे, तर सिनेसाक्षरता जोपासण्याचंही काम या चित्रपटांनी केलं. या सिनेमानं 'ए ग्रेड' आणि 'बी ग्रेड' यांमधली दरी मिटवून आजही हा सिनेप्रकार जिवंत ठेवलाय. शकीला, रेशमा, तुलसीदास आणि पडद्याआड काम करणारे अनाम तंत्रज्ञ यांनी खरंतर वंचितांचा समांतर सिनेमाच घडवला. त्याचं सौंदर्यशास्त्र लिहिलं जाण्याची नितांत गरज आहे. हा वंचित सिनेमा आणि त्याचं महत्त्व अभिजन प्रेक्षकालापण कळावं, यासाठी हा लेखन प्रपंच.

चित्रस्रोत : आंतरजालावरून साभार.

विशेषांक प्रकार

.शुचि. Wed, 01/06/2016 - 19:11

लेखातील मुद्दे वेगळेच वाटले. कधीच लक्षात आलेले नव्हते.

आदूबाळ Wed, 01/06/2016 - 19:58

वा वा! क्या बात! नेहेमीप्रमाणेच भारी.

अर्थकारणाच्या चर्चेवरून डबनर-लेविटच्या फ्रीकॉनॉमिक्स (की सुपरफ्रीकॉनॉमिक्स) पुस्तकातल्या एका किश्श्याची आठवण झाली. एका शहरात मुखमैथुन उपलब्ध करून देणारं एकच वेश्यागृह होतं. मुखमैथुनाला समाजमान्यताही नव्हती. हळुहळू ती समाजमान्यता मिळाली. मुखमैथुन घरच्या घरी मिळवण्याची सोय झाली. त्या वेश्यागृहाचा धंदा बसला.

रेड बुल Thu, 02/06/2016 - 10:43

रेशमा बद्दल वाचुन किंचित सुन्नता आलीय ही ती बदन वालीच रेशमा ना ? :(

बाकी अनुष्का शेट्टी अत्यंत आवडते फोटो बघून मन स्थिर झालं ;) एकुणच सुरेख मागोवा घेतला आहे

रेड बुल Fri, 03/06/2016 - 13:15

In reply to by विषारी वडापाव

नुकतीच खाली दाढी यायला सुरुवात झालेल्या वयात या चित्रप्टाचे तिचे केश्रीगाउन मधील पोष्टर बघायला मिळावे म्हणून मी शाळेपासून फार लांब मुतायला जात असे. अन हिरोने तिच्या स्तानांवर टेकवलेली हनुवटी व त्याच स्थितीत तिचे हात आपल्या हातानेतिच्या पाठीस न्हेउन तिला त्याने मारलेली मीठी मी मनसोक्त पहात असे, व खालची टेग लाइन ती त्याच्या दुप्पट वयाची आहे सारेच विस्मयजनक. नंतर एक दोन वर्षानी 18 पेक्षा कमी वय असणारा थेटरात सापडला तर त्याला विजेचा करंट सोडलेल्या बादलीत लघवी करायची शिक्षा दिली जाते या भितिवर दुर्लक्ष करून हां चित्रपट पाहिला होता... यातूनच त्यावेळी मला किती मोहिनी पडली होती याचा अंदाज येतो.

काय सुंदर दिवस होते ते :( परमेश्वरा तिच्या नशिबी आत्महत्या , उपासमार नको. यासाठी मी माझे उर्वरित आयुष्य एक वर्षाने कमी करायला तयार आहे , प्लीज.

चिन्मय पाटणकर Thu, 02/06/2016 - 14:19

उत्तम मांडणी... दाक्षिणात्य चित्रपटांप्रमाणेच हिंदी बी ग्रेड चित्रपटसृष्टीचाही विचार व्हावा. याच विषयावर असीम अहलुवालियाचा मिस लव्हली हा चित्रपट दोन-तीन वर्षांपूर्वी बऱ्याच महोत्सवांमध्ये गाजला होता.

विषारी वडापाव Thu, 02/06/2016 - 18:18

In reply to by चिन्मय पाटणकर

@चिन्मय , या विषयावर यापुर्वी मी एक आर्टिकल लिहल आहे . लिंक देत आहे http://divyamarathi.bhaskar.com/news-np/MAG-article-by-amol-udgirkar-ab…

तिरशिंगराव Thu, 02/06/2016 - 14:53

दाक्षिणात्य बी ग्रेडचा आढावा व्यवस्थित घेतलाय.

पोटावर ऑम्लेट करण्यापेक्षाही पोटावर भोवरा फिरवणे आणि त्यावेळचे नटीच्या चेहेर्‍यावरचे हावभाव(एक दुजे के लिये) जास्त सूचक वाटतात.

Anand More Fri, 03/06/2016 - 12:03

या लेखाची वाचकसंख्या बघून ऐसीच्या सभासदांचा ओढा,

टाळ मृदुंग दक्षिणेकडे
आम्ही जातो 'दक्षिणेकडे'

असाच आहे... असं दिसतंय किंवा ऐसीच्या वाचकांची सौंदर्यदृष्टी शकीला रेश्मा आणि बॅबिलोनाने समृध्द केलेली दिसते आहे.... एकूणच शरीराचा आणि देशाचा दक्षिण भाग उर्वरित शरीरावर आणि देशावर राज्य करतो... असेही दिसते

मेघना भुस्कुटे Mon, 13/06/2016 - 21:15

हा लेख जिथे संपतो, तिथे तो खरंतर सुरू होतो ही माझी या लेखाबद्दल तक्रार आहे. कधी न नोंदले गेलेले मुद्दे प्रथमच इथे नोंदले गेले असले आणि त्यांच्याशी अनेक सूर्यवाहिनीप्रेक्षक शतप्रतिशत सहमत असले, तरीही.

या विषयावर अधिक लिहिण्यासाठी धनुष यांना आमंत्रण. ते आले तर या धाग्याला खर्‍या अर्थानं चौसष्ट चाँद लागतील.