निळ्या सिनेमाची उत्क्रांती

मुखपृष्ठाविषयी.

निळ्या सिनेमाची उत्क्रांती

- लक्ष्मीकांत बोंगाळे

पॉर्नोग्राफी आणि त्या सिनेप्रकाराची उत्क्रांती दुसऱ्या कुठल्याही सिनेप्रकारापेक्षा खूप खूप वेगळी आहे. सिनेमा म्हणून पॉर्नकडे बघताना त्याच्या भौतिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक इतिहासाकडे बघणं हा अतिशय रंजक अनुभव आहे. मुळातच हा विषय तसा 'बांधीव-भरीव' असा आहे. त्याला एकसुरी असण्याची मर्यादा असतानाही, पॉर्नोग्राफीनं आपलं असं जे साम्राज्य उभं केलंय, ते अत्यंत आकर्षक आणि भव्य आहे.

एक कहाणी म्हणून पाहायला गेलं, तर सुरवातीपासून शेवटपर्यंत, घटनांचा क्रम जैव-वैज्ञानिकदृष्ट्या बदलत नसल्यानं चित्रपट म्हणून पॉर्नचा कथाक्रम कधीच बदलत नाही. एकरेषीयता (लिनियारिटी) हे पॉर्नचं एक अंगभूत गुण-लक्षण आहे. इथल्या चित्रपटाच्या कथानकाच्या मूळ साच्यात बदल करता येत नाहीत. परमोच्च बिंदू (कल्मिनेशन पॉईंट) हा एकाच पद्धतीचा असल्यानं पॉर्न अनेक वर्षं बाळबोध राहिलं. अनेकरेषीय (नॉन-लिनीयर) कथानक (नॅरेटिव) / संकलन (एडिटिंग) म्हणजे कथा कालक्रमानुसार न सांगता; घटनांचा क्रम बदलून; भूत, भविष्य आणि वर्तमानातल्या घटनांची उलटसुलट मांडणी करणे, उदाहरणार्थ इर्रिवर्सिबल (Irreversible), मोमेंटो (Memento) हे सिनेमे. अनेकरेषीय कथानकात इतर अनेक क्लृप्त्या (डिव्हाइसेस्‍) वापरल्या जातात, उदाहरणार्थ फ्लॅशबॅक्स. म्हणजे कथानकाचा चालू वर्तमानकाळ सोडून गोष्ट सांगताना भूतकाळात जाणे. फ्लॅश-फॉर्वर्ड म्हणजे कथानकाच्या भविष्यकाळात जाणे. मोंताजेस्‌ म्हणजे एकापाठोपाठ येणार्‍या किंवा समोरासमोर दिसणार्‍या दृश्यांचा वापर रूपक, उपमा किंवा यमक यांसारख्या भाषिक अलंकारांप्रमाणे करणे. असं काहीही पॉर्नमध्ये करता येत नाही. कथेच्या टप्प्यांचा क्रम बदलता येणं ही मूलभूत गरज पॉर्न पूर्ण करू शकत नाही, कारण पॉर्न ही एक जैविक कथा आहे. ती सनातन आणि एकरेषीय आहे. पुढे काय घडणार हे प्रेक्षकांना माहीत आहे आणि तरीही, 'ते कसं घडणार?' हाच एक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असणार आहे. बदलतात काय?, तर त्यातली पात्रं आणि वातावरणनिर्मिती (सेटिंग).

पॉर्नोग्राफी हा सिनेप्रकारच मुळात साधनांवर अवलंबून होता. साधनं म्हणजे फिल्म् साठवण्याची किंवा प्रसृत करण्याची साधनं. महागडी रिळं, दुर्मीळ नट्या आणि नट, मैथुन या विषयाबद्दलचा समाजात असणारा दाट कुचमलेपणा यांनी या प्रकारच्या चित्रपटाला अनेक वर्षं लुळं करून ठेवलेलं होतं. म्हणूनच चित्रपटनिर्मितीबरोबरच जन्माला येऊनसुद्धा पॉर्नोग्राफी हा सिनेप्रकार उघडपणे उपलब्ध व्हायला अनेक दशकं लोटली. मानवी समाजमन दोन महायुद्धांमधून आणि इतर अनेक सामाजिक मंथनांमधून बदलत गेलं. पहिला चित्रपट १९०५ साली प्रदर्शित झाला, पण ऍंडी वॉरहॉलच्या 'ब्लू मूव्ही'चं प्रदर्शन व्हायला १९६९ साल उजाडावं लागलं.

फिल्म हे माध्यम तांत्रिकदृष्ट्या विकसित होत गेलं, तसतशी वापराला सोपी असणारी चित्रपट पाहण्याची साधनं (पोर्टेबल फिल्म प्लेयर्स) जनतेकडे येत गेली आणि पॉर्न फिल्म्स्‌च्या उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा टप्पा बनली. खासगीत का होईना, पण पॉर्न फिल्म्स्‌ना एक मोठा प्रेक्षकवर्ग मिळण्याची शक्यता निर्माण झाली. मोठमोठ्या चित्रपटांमधल्या प्रेमप्रसंगांमधून आणि हलक्या-फुलक्या चावट दृश्यांमधून (सॉफ्ट पॉर्न) डोकं वर काढणारं पॉर्न आता सार्वजनिक प्रसारण (पब्लिक स्क्रीनिंग) नाही म्हणुन थांबणार नव्हतं. एक खासगी प्रेक्षक वर्ग जेव्हा निर्माण झाला, तेव्हा पॉर्नला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. सार्वजनिक प्रसारणाचा आश्रय नाही त्यामुळे पॉर्न सतत दुसऱ्या प्रसार-माध्यमांवर अवलंबून असे. त्यामुळे प्रेक्षक मिळवण्यासाठी पॉर्नला खूप झगडावं लागलं. टीव्ही आल्यानंतर खरंतर मैथुन विकण्याची अजून एक जागा निर्माण झाली असती; पण तसं झालं नाही. पॉर्नची धास्ती घेऊन ते नियंत्रित करण्याचा किंवा दूर ठेवण्याचा पवित्रा समाजानं सतत घेतलेला होता आणि आजही त्यात फारसा बदल झालेला नाही. त्या मानानं लैंगिक आकर्षण या विषयाचा उपयोग पॉर्नपेक्षा जाहिरातींनीच जास्त करून घेतलेला आहे. आजही काही ठरावीकच वेळा किंवा काही खास वाहिन्या पॉर्नसाठी उपलब्ध असतात. यात सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत पॉर्नच्या प्रसाराला मदत झाली, ती खासगी वापराला सोप्या असलेल्या चित्रपट साधनांची. पोर्टेबल फिल्म प्लेयर्स, पोर्टेबल व्हीडिओ प्लेयर्स, सीडी-डीव्हीडी प्लेयर्स आणि आता इंटरनेट उर्फ महाजाल - हे पॉर्न चित्रपटांच्या प्रसारातले मैलाचे दगड आहेत.

'मुघल-ए-आझम'च्या जमान्यात, म्हणजे जेव्हा डिजिटल चित्रपट स्वप्नातही नव्हते - त्या काळी, कॅमेरे अवजड असायचे आणि त्यांची हलवाहलवी अत्यंत महागडी असायची. त्यामुळे पॉर्नचं चित्रांकन (सिनेमॅटोग्राफी) ब्लॉक लेन्स, झूम-इन, झूम-आऊट यांच्यापलीकडे गेलेलं नव्हतं. पण कॅमेरे आणि फिल्म हाताळणं सोपं झालं आणि सगळं बदललं. कॅमेरे छोटे झाले आणि चित्रीकरणही सोपं झालं. तेव्हापासून ते थेट आजपर्यंत चित्रपटनिर्मितीचा वेग वाढतोच आहे. मुळातच इथे अर्थकारण आणि सौंदर्यशास्त्र यांचा थेट संबंध येतो. जितकं अर्थबळ चांगलं असेल, तितकी चांगली अभियांत्रिकी आणि तितके चांगले तंत्रज्ञ उपलब्ध होऊ शकतील. याचाच अर्थ - उत्तम दर्जाची चित्रपटनिर्मिती होईल. चित्रपटनिर्मितीमधलं हे समीकरण पॉर्नलासुद्धा तितकंच लागू पडतं. बाजार आणि पॉर्न यांचे संबंध जसजसे सुधारले, तसतशी पॉर्न फिल्म्सची निर्मितिमूल्यं आणि दर्जा सुधारत गेलेले दिसतात.

साधारण सत्तरच्या दशकातल्या पॉर्न फिल्म्समध्ये - ज्यांना आता 'विंटेज पॉर्न' म्हणतात - आधी पात्रं दिसतात. त्यांना नमनापुरतं काहीतरी नाटकी दृश्य दिलेलं असतं. मग कॅमेर्‍याची थोडीफार हालचाल होते आणि पॉर्नला सुरवात होते. या प्रकारच्या पॉर्नमध्ये फक्त अवयवांचं मीलन दिसायचं. त्या काळी पॉर्नचं चित्र होतं ते असं - लिंग दाखवायचं आहे? फक्त लिंगच दाखवा. स्तन दाखवायचे आहेत? फक्त स्तनच दाखवा. क्वचित कधीतरी, कुठेतरी एखाद वेळी दुर्मीळ असा चेहरा दिसतोय, असं काहीतरी चित्र होतं. दूरदृश्यं (वाईड अँगल्स्‍) आणि समीपदृश्यं (क्लोजप्स्‌) सोडल्यास पडद्यावर काही घडायचंच नाही. कारण सगळं लक्ष मैथुनप्रक्रियेवर. त्या प्रक्रियेतलं माणूसपण दडपून टाकायचा तो काळ. याउलट ऐंशी-नव्वदच्या दशकातलं पॉर्न हे खाजगी प्रेक्षकवर्गासाठी टीव्हीवर बघण्याच्याच उद्देशानं बनवलेलं होतं. त्याचं सगळं चित्रीकरण चौकोनात असायचं. अ‍ॅस्पेक्ट रेशोच मुळी चौकोनी होता, सिनेमास्कोपसारखा आडवा - आयताकृती नाही. त्यामुळे पडदा भरून पूर्ण शरीर दिसण्यासाठी संपूर्ण झूम-आऊट करावं लागत असे. अर्थात मग चित्रचौकटीत दिसणारे शरीरांचे आकार छोटे असायचे. कॅमेरा जवळ नेला की फक्त सुटे अवयव दिसायचे. तरी नंतर-नंतर त्यात बदल घडत गेले. झूमसारख्या तंत्रसाधनाचा आणि हातात धरून चित्रीकरण करणार्‍या साधनांचा (हॅंडहेल्ड डिवाइसेस्‌) पॉर्नोग्राफर्सनी चांगला वापर करून घेतला. एरव्ही दिग्दर्शक प्रमुख नंतर चित्रलेखक, संकलक, ध्वनि निर्देशक असे विभाग प्रमुख दुसऱ्या फळीत असतात. पॉर्न फ़िल्म्सच्या बाबतीत चित्रलेखक (सिनेमॅटॉग्राफ़र) हा दिग्दर्शकापेक्षा कणभर जास्त महत्वाचा ठरतो.

खऱ्या घटना आणि त्यांचं चित्रीकरण हे वेगवेगळं असतं, हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण खरोखरचं मैथुन आणि कॅमेऱ्यात दिसणारं मैथुन, या दोन्हींमध्ये हे वेगळेपणाचं प्रमाण नाजूक आहे. खऱ्या आयुष्यात मैथुन करताना असणारं पायांतलं अंतर चित्रीकरण करताना फारसं बदलत नाही; पण मग अवयवांवर पुरेसा उजेड पडत नाही. तो तर चित्रीकरणासाठी आवश्यक असतो. मग काय केल्यानं अवयवांवर उजेड चांगला पडेल, हे आणि तत्सम बारकावे पॉर्नसाठी महत्त्वाचे ठरतात. काळानुरूप चित्रलेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ अशा अनेकांनी, अनेक तर्‍हांनी ह्या तंत्रज्ञानात आपापल्या सौंदर्यमूल्यांची भर घातली आहे. आज त पॉर्न फिल्म्स्‌चं चित्रांकन (फोटोशूट) हे सुद्धा आज मॉडेलिंग फोटोग्राफीच्या बरोबरीनं होतं.

एके काळी पॉर्न हे काल्पनिक कथेत गुंफलेलं (फिक्शन-बेस्ड) असायचं, पण आज त्याला माहितीपटाच्या (डॉक्युमेंटरी) अंगानं हाताळलं जातं. म्हणूनच आजच्या धंदेवाईक आणि हौशी, या दोन्ही प्रकारांच्या पॉर्न फिल्म्समध्ये हातात धरून वापरण्याचा कॅमेरा (हॅंडहेल्ड कॅमेरा) हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सतत हलणारी चपळ शरीरं आणि ती टिपणारा तसाच चंचल-चपळ कॅमेरा, असं त्या चित्रीकरणाचं स्वरूप आहे. काही 'बॉन्डेज' आणि 'सॅडिस्ट' पॉर्न फिल्म्स्‍ हे या सर्वसाधारण नियमाला असलेले नगण्य अपवाद. कारण, पॉर्न हे 'जिवंत' असलं पाहिजे, अशी आज अपेक्षा असते. ती पूर्ण व्हावी, म्हणून बरेच चांगले स्टुडिओज्‌ पॉर्नपटांच्या मागे-पुढे जोडण्यासाठी त्यात काम करणार्‍या कलाकारांच्या मुलाखती घेतात. ही अतिरंजित सुंदर दिसणारी आणि मैथुनात तास-तासभर दम टिकवणारी माणसं काय बोलतात, त्यांच्या आयुष्यात काय घडत असतं, हे जाणून घेण्यात प्रेक्षकांना रस असतो. पॉर्न तारकांना आता थोडं फिल्मी स्टारडमही आलेलं आहे. बघणाऱ्यांना जाच नको म्हणून पूर्वी आवाज नाहीसे करत असत. एखादं चक्री कृत्रिम संगीत (Music in loop) जोडून शरीरांची दृश्यं दाखवत असत. ते हळूहळू बदलत जाऊन, अत्यंत स्वच्छ चित्रभाषेसकट आणि आवाजांसह, मैथुनाची प्रक्रिया जिवंत करणारे पॉर्नपट आता निर्माण केले जातात.

पॉर्न हे एका प्रकारचं दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) असलं, तरी तो सिनेमासुद्धा आहे. त्यात नाट्य आहे, अतिशयोक्ती आहे, सौंदर्याच्या अतिरंजित कल्पना आहेत, पौरुष आणि स्त्रीत्वाच्या टोकाच्या कल्पना आहेत.

प्रेक्षकांच्या दृष्टीने बघता डिजिटल क्रांतीतून पहिल्यांदा आल्या त्या व्ही. सी. आर. टेप्स, मग व्ही. एच. एस. त्यानंतर अनेक वर्षांच्या थांब्यांनंतर आल्या सीडीज् आणि डीव्हीडीज् या प्रत्येक टप्प्यागणिक पॉर्न बघणं अधिकाधिक सोपं होत गेलं. एकान्ताचा आणि पॉर्नचा संबंध अतूट असल्यामुळं जितकी अधिकाधिक वैयक्तिक आणि प्रगत तंत्रसाधनं उपलब्ध होत गेली, तितकी पॉर्नची मागणी वाढत गेली. सीडीजचा जमाना १९९४ सालानंतरचा. त्या तिसर्‍या जगातल्या विकसनशील देशांतल्या लोकांपर्यंत नुकत्या कुठे पोचत होत्या, तितक्यातच इंटरनेट आलं. नवीन सहस्रकाच्या पहिल्या पाच वर्षांतच जगात पॉर्नचं जंगल माजलं. हजारो वेबसाईट्स आल्या-गेल्या; व्हिडिओज् फोटो, कथा असं सगळं एकदम सामोरं आलं. चॅटरूम्स आल्या. माणसं स्वत:ला नि:संकोचपणे आणि वरचेवर कॅमेऱ्यातून दाखवायला लागली.

इंटरनेटनं जन्माला घातलेला एक महत्त्वाचा पॉर्नप्रकार म्हणजे हौशी (अॅमॅच्युअर किंवा पर्सनल) पॉर्न. तेच आज इंटरनेटवर सगळ्यात जास्त प्रमाणात उपलब्ध आहे. आज जगभरातले अनेक लोक स्वतःचं लैंगिक दस्तावेजीकरण करायला तयार आहेत - किंबहुना उत्सुक आहेत. आता कॅरिअर्स आहेत, बघणारी माणसं आहेत आणि यातूनच हा एक संपूर्ण उद्योग जगभर प्रसृत झालेला आहे.

पॉर्न इंडस्ट्री आज चित्रपटउद्योगाचं एक वेगळं अंग बनून उभी आहे. पॉर्ननं आपलं असं स्वतंत्र विश्व निर्माण केलंय. आज हजारो प्रकारचं पॉर्न बघायला मिळतं. त्यात व्यक्तिगत-हौशी पॉर्नपासून सार्वजनिक पॉर्नपर्यंत नाना प्रकार पाहायला मिळतात. आज वेगवेगळ्या लैंगिकतांसाठी असलेलं (ओरिएंटेशन्स) पॉर्न आहे. गे-लेस्बियन, शी-मेल, वेगवेगळ्या प्रकारच्या आणि वयोगटांतल्या नटनट्या, चोर-पोलीस, टीचर-स्टुडंट यांसारखे निरनिराळे रोल-प्लेज्‌ आहेत. लेदर, साखळदंड यांनी बांधून घालून मैथुन करणे यांसारख्या नि आणिही नाना प्रकारच्या किंक्स इथे दिसतात. 'एव्हीएन'सारखे (AVN) मोठमोठे पॉर्न पुरस्कार आणि 'मेक्सिको सेक्स एक्स्पो'सारख्या जत्रा, हे सगळं काही आज पॉर्न या नावाखाली धगधगतंय.

मेक्सिको

(मेक्सिकोमधलं सेक्स-एक्स्पो)

आधुनिक जगात व्यक्तिस्वातंत्र्याला जे राजकीय महत्त्व आलंय, त्याचा फायदा पॉर्नला झालेलाच आहे. ही देवाणघेवाण सुरू आहे, वाढते आहे. पॉर्नमधून मिळणारे दृश्यसंस्कारही ह्या पिढीसाठी महत्त्वाचे ठरलेत. आजच्या तरुणाईला पॉर्नचं आकर्षण आहे. त्यातून मिळणाऱ्या दृश्यसंस्कारांमुळे तरुणाईचा ओढा पीळदार शरीरं, सुडौल अंगं यांच्याकडे जाताना दिसतो आहे. एकूणच मैथुन ही काहीतरी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा पूर्वापार असलेला न्यूनगंड पुसून काढण्यात पॉर्नचा खूप मोठ्ठा वाटा आहे. आज लैंगिक शिक्षण मिळवण्याचं पॉर्न हे महत्त्वाचं साधन आहे. केवळ मैथुनाची जैविक प्रक्रियाच नव्हे, तर त्याच्या सगळ्या सामाजिक प्रतिबिंबांना, मानसशास्त्रीय परिणामांना, लैंगिकतेला आणि वंश-वर्ण व संबंधित संज्ञांना समजून घेण्याचं पॉर्न हे अतिशय ताकदीचं माध्यम असू शकतं. मैथुनाकडे, लैंगिकतेकडे आणि स्वत:कडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन पॉर्नमुळे मिळालाय, एवढं मान्य करायला हवं आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम डोळसपणे अभ्यासायला हवेत.

(छायाचित्रे आंतरजालावरून साभार.)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

जबर . विषयाचा एका वेगळ्या अंगाने घेतलेला आढावा . अमेरिकेला जागतीक पॉर्न उद्योगाची राजधानी म्हणुन ओळखलं जात . याची सुरुवात कशी झाली याची कहाणी मोठी रोचक आहे . दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्याने युध्द चित्रीत करण्यासाठी गरज म्हणून आपल्या अनेक सैनिकांना फिल्म मेकिंगचं शास्त्रोक्त प्रशिक्षण दिल होत . युद्ध संपल्यावर बेरोजगार झालेल्या या सैनिकांनी आपल्या कौशल्याचा वापर करून स्वस्तात पॉर्ननिर्मिती केली . तेंव्हापासून अमेरिका पॉर्ननिर्मितीमध्ये आघाडीवर राहिली आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम

अत्यंत माहितीपूर्ण लेखन. छान

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

छान अभ्यासू लेख आहे,पॉर्नचे इव्हॉल्युशन अगदी नीट मांडले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

चांगली तांत्रिक माहिती/विश्लेषण : आस्पेक्ट रेशो, म्यूझिक लूप, प्रकाशयोजना वगैरे.

प्रकाशयोजनेबाबत आणखी एक मुद्दा :
बिगर-पॉर्न चित्रपटांतील मैथुन-चित्रीकरणांतल्या (आणि पॉर्नमध्ये पूर्वी) प्रकाशयोजनेत लाल किंवा निळी रंगीत झाक असायची. नंतर भगभगीत समतोलरंगीत पांढर्‍या दिव्यांची प्रकाशयोजना दिसू लागली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकूणच मैथुन ही काहीतरी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा पूर्वापार असलेला न्यूनगंड पुसून काढण्यात पॉर्नचा खूप मोठ्ठा वाटा आहे.

हे विधान अमान्य नाही, पण अपूर्ण वाटतं. मैथुन ही जशी लाजिरवाणी गोष्ट तशीच पॉर्न वाचणं हीही होती. मला वाटतं न्यूनगंड पुसून काढण्यात किंवा कमी करण्यात पॉर्नपेक्षा पॉर्नची राजरोस आणि सहज उपलब्धता याचा अधिक मोठा वाटा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पॉर्नोग्राफिक चित्रोद्योग म्हणजे केवळ सवंग धंदेवाईकपणा असा एक घट्ट समज डोक्यात होता. तो तपासून पाहण्याचं कधी चुकूनही सुचलं नसतं. पण या लेखानं ते काम केलं. त्यांचं स्वतःचं असं विकसित होत गेलेलं सौंदर्यशास्त्र, तंत्र आणि त्यातलं लोकशिक्षणाचं अंग - या मुद्द्यांनी मला धक्का दिला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन