मेंदू आणि पॉर्न

मेंदू पॉर्न लेख

मेंदू आणि पॉर्न

- सुबोध जावडेकर

विज्ञानकथा ह्या साहित्यप्रकाराचा अनभिषिक्त सम्राट आर्थर सी. क्लार्क यानं १९६० मध्ये 'आय रिमेम्बर बाबीलॉन' नावाची एक विज्ञानकथा लिहिली होती. त्यात त्यानं अशी कल्पना केली होती, की पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर्स उंचीवर एक कृत्रिम उपग्रह फिरता ठेवून त्यायोगे टीव्हीचे कार्यक्रम जगभर प्रक्षेपित करायचा बेत चीन आखतो. हे कार्यक्रम अमेरिकेत व युरोपमध्ये देशांत दिसू शकतील आणि त्या देशांतल्या कुणालाही स्वतःच्या घरात बसून आरामात बघता येतील, अशी योजना असते. हे कार्यक्रम कोण बघत आहे, हे इतर कुणाला कळणार नाही. त्यावर सेन्सॉरशिप लादता येणार नाही. असं असल्यामुळे चीन काय वाट्टेल ते दाखवू शकणार असतो. त्यांत पोर्नोग्राफिक फिल्म्स असतील, दुसऱ्या महायुद्धात ज्यूंवर झालेल्या अनन्वित अत्याचारांचं अंगावर शहारे आणणारं चित्रण असेल आणि अर्थातच कम्युनिस्ट प्रोपगंडाही असेल; असा चीनचा डाव असतो. थोडक्यात, पॉर्नचं आमिष दाखवून साम्यवादाचा प्रचार करायचा आणि पाश्चात्य देशांतील जनतेचा बुद्धिभेद करायचा अशी ही पाताळयंत्री योजना असते. कथा म्हणून फारशी थोर नसली, तरी भविष्यकाळात सेन्सॉरशिप ही कल्पनाच रद्दबातल ठरेल, ही त्या कथेतली कल्पना मात्र चमकदार होती.

आंतरजालाच्या उदयानंतर क्लार्कची ही कल्पना (अगदी जशीच्या तशी नसली तरी) प्रत्यक्षात आली आहे. आता जगाच्या कानाकोपऱ्यातील कुठलीही व्यक्ती आपल्या शयनगृहात बसून, कुठल्याही बंधनाशिवाय, कुठल्याही सेन्सॉरशिपशिवाय, कुणालाही कळू न देता, कितीही वेळ पॉर्न बघू शकते. आज अमेरिकेत ६६% पुरुष आणि ४१% स्त्रिया आंतरजालावर नियमितपणे पॉर्न पाहत असतात. पुढारलेल्या इतर देशांमध्येही परिस्थिती फारशी वेगळी नसावी. आंतरजालावर पाहिल्या जाणाऱ्या एकूण कार्यक्रमांपैकी निम्म्यापेक्षा जास्त कार्यक्रम पॉर्नशी संबंधित असतात. अमर्याद पॉर्न पाहण्याच्या या सवयीचे दुष्परिणाम मानवी नातेसंबंधांवर होत असणार हे उघड आहे. सामाजिक, कौटुंबिक, वैवाहिक संबंध तर त्यामुळे धोक्यात येत आहेतच; पण आपल्या मानसिक आरोग्यावरही या सवयीचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे, असं आज काही संशोधनांतून समोर आलं आहे.

आंतरजालावर पॉर्न पाहणे हा प्रकार सुरुवातीला फारसा गंभीरपणे घेतला गेला नाही. त्यात विशेष काळजी करण्यासारखं काय आहे? शृंगारिक पुस्तकं वाचायला, चावट विनोद ऐकायला, लैंगिक चित्रं पाहायला माणसाला आवडतातच. ती माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, असं लोकांना वाटे. नैतिकतावादी मंडळी या प्रकाराचा विनाकारण बाऊ करतात, असा सार्वत्रिक समज होता. किंबहुना पॉर्न पाहायला विरोध करणं हे हस्तमैथुनाला विरोध करण्यासारखंच एक खूळ आहे, अशी अनेकांची धारणा होती. आपल्याकडे नाही का पूर्वी 'ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू' असा संदेश देणाऱ्या भंपक पुस्तकांची चलती होती? त्यातलाच हा प्रकार असावा असं लोकांना वाटत होतं.

अनिर्बंध पॉर्न पाहण्यात काहीही गैर नाही अशी समजूत या विषयातील तज्ज्ञांचीही होती. त्यांमध्ये विल्यम मास्टर्स आणि व्हर्जिनिया जॉन्सन (William Masters and Virginia Johnson) यांचाही समावेश होतो. १९५७ पासून १९९० पर्यंत माणसाच्या लैंगिक प्रेरणा आणि शारीरिक असमर्थता व त्यावरचे उपाय, या विषयाचा सखोल अभ्यास त्यांनी केला होता. या दोघांनी लिहिलेली 'Human Sexual Response' (1966) आणि 'Human Sexual Inadequacy' (1970) ही पुस्तके अजूनही प्रचंड लोकप्रिय आहेत. जगातल्या तीस भाषांत ती भाषांतरित झाली आहेत. त्यांच्या पुस्तकांमुळे लैंगिक विषयासंबंधातले अनेक गैरसमज दूर झाले आहेत. मात्र त्यांनी मांडलेले 'पॉर्नचं व्यसन लागतं हा पॉर्नविरोधकांचा आवडता गैरसमज आहे. व्यसन या शब्दाचाच तो गैरवापर आहे' हे मत मात्र आज शिरोधार्य मानलं जात नाही. 'व्यसन म्हटलं की आपल्यासमोर दारू, गर्दचं व्यसन लागून आयुष्य उद्ध्वस्त झालेले लोक येतात. तसे पॉर्नच्या आहारी गेलेले किती लोक आपल्याला माहीत असतात?' हा त्यांनी विचारलेला प्रश्न आंतरजालाच्या उदयापूर्वी विचारलेला आहे, हे लक्षात घ्यायला हवं. आज पॉर्न पाहण्याची संख्या भयावह प्रमाणात वाढली आहे. पॉर्न पाहायच्या सवयीनं आज जे अक्राकराळ-विक्राकराळ रूप धारण केलं आहे ते १९९० साली त्यांच्या डोळ्यासमोर नव्हतं.

१९९० नंतर आंतरजालाचा प्रसार फार झपाट्यानं झाला. प्रक्षेपणाचा वेग प्रचंड वाढला. मोबाईल फोनवर आंतरजाल उपलब्ध झाल्यावर तर त्याच्या वापराला काही धरबंधच उरला नाही. त्यामुळे परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच बदलली आहे. लोकांची पॉर्न पाहण्याची प्रवृत्ती गेल्या दहा-पंधरा वर्षांत शतपटीनं वाढली आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी भारतातल्या तरुणांची मजल रंभा, अप्सरा, कामदेवी यांसारखी चावट मासिकं वाचणं; पिवळ्या कव्हरची कामुक पुस्तकं चाळणं आणि कधीमधी चोरून व्हिडिओवर ब्लू फिल्म बघणं इथपर्यंत जात असे. त्या वेळी त्यांना उपलब्ध असलेली मर्यादित संधी आणि आजकालच्या तरुणांना उपलब्ध असलेली, अहोरात्र पॉर्न पाहण्याची संधी यांत जमीन-अस्मानाचा फरक आहे.

***

जुलै २०१४ मध्ये Journal of the American Medical Association, 'JAMA Psychiatry' या प्रतिष्ठित नियतकालिकात Dr Simone Kühn आणि Dr Jürgen Gallinat यांनी लिहिलेला एक वैज्ञानिक लेख प्रकाशित झाला. Max Planck Institute for Human Development, Berlin आणि University Clinic for Psychiatry and Psychotherapy, Hamburg येथे झालेल्या संशोधनावर तो लेख आधारलेला होता. पॉर्न पाहणाऱ्या लोकांचा असा शास्त्रीय अभ्यास पहिल्यांदाच होत होता. या लेखामुळे जगभर एकच खळबळ माजली. कारण त्यात म्हटलं होतं, की पॉर्न पाहिल्यामुळे मेंदूत काही बदल घडतात. आणि हे बदल आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक असतात.

६४ लोकांच्या मेंदूचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला होता. ते सगळे निरोगी लोक होते. प्रयोगाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांना कुठलीही मानसिक विकृती किंवा व्याधी नाही याची खातरजमा करून घेण्यात आली होती. हे सर्व लोक नियमित पॉर्न बघत असत. कुणी कमी, कुणी जास्त. पण आठवड्याला सरासरीनं चार तास. प्रयोगात दिसून आलं की जास्त वेळ पॉर्न पाहणाऱ्या लोकांच्या मेंदूतल्या स्ट्राएटम नावाच्या भागाचा आकार, कमी वेळ पॉर्न पाहणाऱ्या लोकांपेक्षा तुलनेनं लहान होता. आठवड्यात किती तास ते पॉर्न पाहत, त्यावर तो अवलंबून होता. जितके जास्त तास ते पॉर्न पाहण्यात घालवत, तितकं त्यांच्या स्ट्राएटमचं आकारमान कमी. यातून एक अर्थ असा निघत होता, की पॉर्न पाहिल्यामुळे स्ट्राएटम आक्रसतो. सतत पॉर्न पाहिल्यामुळे मेंदूच्या त्या विशिष्ट भागावर ताण आल्यामुळे असं घडत असेल असा अंदाज त्या लेखात मांडला होता. स्ट्राएटम हा भाग आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी प्रेरित करणाऱ्या मेंदूतल्या यंत्रणेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचा आकार कमी झाल्यानं मेंदूतली ही यंत्रणा योग्य प्रकारे काम करत नाही. याशिवाय अशा लोकांमध्ये त्या भागाला मेंदूतल्या निर्णय घेणाऱ्या भागांशी जोडणारे दुवे कमजोर होतात, असंही संशोधनात दिसून आलं होतं. त्यामुळे अचूक निर्णय घेणं दुरापास्त होऊ शकतं.

कुठल्याही चांगल्या वैज्ञानिक लेखात त्या संशोधनाच्या मर्यादा स्पष्टपणे नोंदवलेल्या असतात. या लेखातही दोन-तीन गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. एक म्हणजे प्रयोगात भाग घेणारे सगळे निरोगी लोक होते. त्यांच्या मेंदूत जो बदल झाला होता, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर काही दृश्य परिणाम तरी झाला नव्हता. त्यांची वर्तणूक आणि दिनक्रम नॉर्मल होता. दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्राएटम हा भाग आक्रसणं आणि मेंदूतल्या निर्णय घेणाऱ्या भागाशी असलेल्या त्याच्या जोडण्या कमजोर होणं हे काही फक्त पॉर्न पाहिल्यामुळेच होतं असं नाही. अतिरिक्त मद्यपान, अमली द्रव्यांचं सेवन, धूम्रपान यांमुळेही असं होतं, हे शास्त्रज्ञांना माहीत होतं. खरं म्हणजे कुठलीही गोष्ट अती प्रमाणात केली; मग ते वेगानं गाडी चालवणं असो की दिवसरात्र संगीत ऐकणं असो, त्याचा मेंदूवर असाच परिणाम होतो.

तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रयोगात भाग घेणाऱ्या लोकांचा अनेक वर्षं अभ्यास करून मग हा निष्कर्ष काढण्यात आला नव्हता. तो एक 'snapshot' होता. म्हणजे असं की, 'अनेक महिने पॉर्न पाहणाऱ्या लोकांच्या मेंदूतला स्ट्राएटम हा भाग हळूहळू आक्रसत जातो' अशा स्वरूपाचं हे निरीक्षण नव्हतं. तर मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहणाऱ्या लोकांच्या मेंदूतला स्ट्राएटम हा भाग लहान आणि कमी प्रमाणात पॉर्न पाहणाऱ्या लोकांचा स्ट्राएटम तुलनेनं मोठा, एवढंच त्यांना आढळलं होतं. साहजिकच पॉर्न पाहिल्यामुळे स्ट्राएटम लहान होतो, की ज्या लोकांच्या मेंदूतला स्ट्राएटम मुळातच आकारानं लहान असतो ते लोक जास्त प्रमाणात पॉर्न पाहतात, हे त्या प्रयोगातून स्पष्ट होत नव्हतं. 'कोंबडी आधी की अंडं आधी?' अशा स्वरूपाच्या या प्रश्नाचं उत्तर त्या संशोधनातून मिळत नव्हतं.

पॉर्न पाहिल्यामुळे खरोखरच जर स्ट्राएटम आक्रसत असला तर ते मात्र काळजी करण्यासारखं होतं. वर्तमानपत्रांनी ही माहिती 'पॉर्न पाहिल्यामुळे मेंदू आक्रसतो', 'पॉर्नमुळे मेंदूला इजा होते', 'पॉर्न पाहणाऱ्यांची बुद्धिमत्ता कमी होते', या सारखी भडक शीर्षकं देऊन छापली. लोकांच्या छातीत धडकी भरेल असे लेख आले. खरं तर पॉर्न पाहणाऱ्यांचा सगळा मेंदू आक्रसतो असं मूळ लेखात अजिबात म्हटलं नव्हतं. मेंदूतल्या एका छोट्या भागातलं करड्या रंगाचं द्रव्य कमी होत असण्याची दाट शक्यता आहे, एवढंच लेखात म्हटलं होतं. तेही खूप मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहिलं तर. पण बातमी सनसनाटी करून छापणं हा वृत्तपत्रांचा जन्मसिद्ध हक्क आहे ना!

पॉर्न पाहिलं तर मेंदूत नक्की काय होतं? पॉर्न पाहिल्यामुळे मेंदूत डोपामाइन नावाचं द्रव्य मोठ्या प्रमाणावर स्रवतं. यामुळे आपल्याला एक सुखकर संवेदना होते. खरं म्हणजे कुठलीही आवडणारी गोष्ट केली की मेंदूत हे द्रव्य स्रवतं. आपल्याला ती गोष्ट पुन्हा-पुन्हा करायची प्रेरणा त्यातून मिळते. पॉर्न पाहून डोपामाइन स्रवलं की आणखी पॉर्न पाहायची इच्छा निर्माण होते. पण त्यातून होतं असं, की तुम्ही जितकं जास्त पॉर्न पाहाल तितकी या द्रव्याला प्रतिसाद द्यायची तुमच्या मेंदूची क्षमता कमी होते. साहजिकच सुखाची तीच पातळी अनुभवायला जास्त डोपामाइनची गरज पडते. म्हणजे तेवढंच सुख मिळवायला जास्त पॉर्न पाहणं आलं. असा तिढा आहे. हे एक दुष्टचक्रच आहे. दारूच्या किंवा कोकेनसारख्या अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्या माणसाच्या मेंदूत नेमकं हेच घडतं. म्हणून तर सुरुवातीला दोन पेगमध्ये 'किक' मिळणाऱ्याला नंतर 'हाय' होण्याकरता तीन पेग, पुढं चार पेग, असं करत करत शेवटी पाच-सहा पेग घ्यावे लागतात.

यालाच एखाद्या गोष्टीची चटक लागते असं म्हणतात. तशी पॉर्नचीही लागते. पण त्याला पॉर्नचं व्यसन लागतं म्हणता येईल का? त्याची परिणती लैंगिक विकृतीत (compulsive sexual behaviour) होईल का? हा खरा कळीचा मुद्दा आहे.

केम्ब्रिज युनिव्हर्सिटीत २०१४ साली झालेल्या संशोधनातही मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहणाऱ्या लोकांच्या मेंदूत काही बदल होतो असं आढळून आलं आहे. मात्र केवळ तेवढ्यावरून त्यांना पॉर्नचं व्यसन लागतं असं म्हणता येणार नाही, असं ते संशोधन करणाऱ्या व्हॅलरी वून (Valerie Voon) यांनी स्वतःच म्हटलं आहे. Compulsive sexual behaviour ही विकृती शंभरात चार जणांना असते. या विकृतीनं ग्रस्त असणाऱ्यांना आपले विचार, भावना किंवा आचार यावर नियंत्रण ठेवणं अशक्य होतं. मग त्यातून कधीकधी अनवस्था ओढवणारे प्रसंग उद्भवू शकतात. ही विकृती होण्याची अनेक कारणं आहेत. मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहणं हे त्यांतलं एक कारण असू शकतं.

व्हॅलरी वून यांनी compulsive sexual behaviour असलेल्या एकोणीस लोकांच्या मेंदूंची निरोगी लोकांच्या मेंदूंशी तुलना करून पहिली. त्यांच्या मेंदूतले काही भाग अमली पदार्थ घेणाऱ्या लोकांच्या मेंदूसारखे झाले होते, असं त्यांना दिसून आलं. मग या एकोणीस जणांना आळीपाळीनं ब्लू फिल्म्स आणि खेळाच्या चित्रफिती दाखवण्यात आल्या. त्याच वेळी त्यांच्या मेंदूचं fMRI या यंत्रानं स्कॅनिंग करण्यात येत होतं. त्यात दिसलं की ब्लू फिल्म्स पाहताना त्यांच्या मेंदूतले ventral striatum, dorsal anterior cingulate, and amygdala हे तीन भाग उत्तेजित होतात. अमली पदार्थांचं व्यसन लागलेल्या लोकांना जेव्हा अमली पदार्थांची चित्रं दाखवली तेव्हा त्यांचे नेमके हेच भाग उत्तेजित होतात. यातला पहिला भाग, म्हणजे स्ट्राएटम, मेंदूची बक्षीस देणारी आणि एखादी गोष्ट करायची प्रेरणा देणारी यंत्रणा आहे तर दुसरा भाग जेव्हा सुख मिळायची शक्यता निर्माण होते, तेव्हा उत्तेजित होतो. (म्हणून तर अमली पदार्थापासून आनंद मिळतो). आणि अमेग्डाला हा भाग आपल्या भावनांशी संबंधित असतो. या तीन भागांच्या सहभागानं पॉर्न पहायची आणि ते पाहत बसायची अनिवार ओढ मनात उत्पन्न होते.

गंमत म्हणजे व्यसनी लोक अमली पदार्थांचे सेवन करतात याचं कारण त्यांना त्यापासून सुख मिळतं हे नाही; तर त्यांना ते पदार्थ तीव्रतेनं हवे असतात, त्याच्याशिवाय त्यांना राहवत नाही, म्हणून ते लोक ते घेतात. अगदी असंच पॉर्नच्या बाबतीतही होतं. वून यांच्या प्रयोगात भाग घेणाऱ्या लोकांनी आपल्याला आणखी आणखी ब्लू फिल्म्स पहाव्याशा वाटतात असं सांगितलं, पण त्या बघून आनंद मिळतो असं सांगितलं नाही! कुठल्यातरी अगम्य ओढीनं ते त्या फिल्म्स बघत राहतात, इतकंच.

यालाच त्यांना पॉर्नची चटक लागते, असं आपण म्हणूया. पण त्याचा अर्थ त्यांना पॉर्न पाहण्याचं व्यसन लागतं, असं म्हणावं का?

सवय आणि व्यसन यात काय फरक आहे ते जाणून घेण्यासाठी प्रथम व्यसन म्हणजे नेमकं काय ते बघायला हवं. डिक्शनरी डॉट कॉमच्या व्याख्येप्रमाणे (http://www.dictionary.com/ ) व्यसन म्हणजे सवयच, पण अशी सवय की जी मोडणं महाकर्म कठीण. ती थांबवणं जवळजवळ अशक्यच. व्यसनाचा आणखी एक विशेष म्हणजे ज्याचं व्यसन लागलं आहे ते मिळालं नाही तर त्याची परिणती प्रचंड मानसिक दुरवस्थेत (trauma) होते. या दृष्टीनं पाहता पॉर्नची चटक ही सवय आणि व्यसन याच्या दरम्यान कुठंतरी येते, सवयीपेक्षा जास्त गंभीर पण व्यसनाइतकी वाईट नाही, असं म्हणता येईल.

इथं पॉर्नची चटक आणि Compulsive Sexual Behaviour (CSB) यातला फरकही स्पष्ट करायला हवा. CSB ची लक्षणे एखाद्या लैंगिक गोष्टीची तीव्र आच लागणं, सतत लैंगिक विचार मनात येणं, मनावर ताबा न राहणं, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात वावरताना गोंधळ-गडबड उडणं (impairment) ही आहेत. पॉर्नची चटक लागली तर त्याचं पर्यवसान CSBत होऊ शकतं. अमेरिकन सायकायट्रीस्ट असोसिएशन मानसिक आजारांचे वर्गीकरण करून ते 'The Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders' या नावाने वेळोवेळी प्रसिद्ध करत असते. त्याची सर्वात अलीकडची आवृत्ती (DSM-5) २०१३ मध्ये प्रकाशित झाली आहे. त्यात CSBचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. म्हणजे CSB ला मानसिक आजार म्हणता येणार नाही. तेव्हा पॉर्नची चटक लागण्याला मानसिक आजार म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ज्याला अतिलैंगिकता (hypersexuality) किंवा कामक्रीडेचं व्यसन (sexual addiction) म्हणतात त्याला तरी मानसिक आजार म्हणता येईल की नाही, याबद्दलही तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. DSM-5 मध्ये अतिलैंगिकता किंवा कामक्रीडेचं व्यसन याचा अंतर्भाव नाही. त्यामुळे विकृती, आजार, व्यसन, सवय, अनिवार ओढ वगैरे शब्दच्छल न करता (या लेखापुरतं तरी) पॉर्नची चटक लागते असं आपण म्हणूया. सतत डोपामाइन स्रवल्यामुळे ही अवस्था येत असावी असा निष्कर्ष काढण्याइतपत प्राथमिक पुरावा आहे, एवढं आपल्यासाठी पुरेसं आहे.

खूप पॉर्न पाहिलं की मेंदूतली बक्षीस आणि प्रेरणा देणारी यंत्रणा बिघडू शकते. पण त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात काय होतं? पॉर्न पाहून-पाहून त्याची सवय होते. त्याचं फार काही विशेष वाटेनासं होतं. 'हे तर काय, नेहमीचंच आहे', असं वाटायला लागतं. ते मिळमिळीत वाटू लागतं. मग जास्त-जास्त 'कडक', जास्त मसालेदार पॉर्न हवंसं वाटतं. सर्वसाधारण पॉर्ननं, म्हणजे स्त्री-पुरुषांच्या कामक्रीडा पाहून त्यांचं समाधान होत नाही. काहीतरी 'हटके' हवंसं वाटतं. एका सर्वेक्षणात ६४% लोकांनी बराच काळ सातत्यानं पॉर्न पाहिल्यावर आमची रुची बदलली, आम्ही हळूहळू जास्त विचित्र, जास्त बीभत्स, ज्याला विकृत म्हटलं जातं अशा पॉर्नकडे वळलो असं सांगितलं. पूर्वी त्यांना जे धक्कादायक, किळसवाणं वाटत होतं, ते आता वाटेनासं झालं होतं.

आणखीही एक होऊ शकतं. अतिरिक्त प्रमाणात पॉर्न बघणाऱ्या लोकांचा जोडीदारातला रस कमी होतो. प्रख्यात मानसोपचारतज्ञ आणि 'ब्रेन दॅट चेंजेस इटसेल्फ' या अतिशय लोकप्रिय पुस्तकाचे लेखक Norman Doidge म्हणतात, "माझ्याकडे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांपैकी जे मोठ्या प्रमाणात पॉर्न बघतात ते 'जोडीदाराशी सेक्स करण्यात आम्हाला आता गंमत वाटेनाशी झाली आहे' अशी तक्रार करतात. पुरुषाला नावीन्याची ओढ असते, त्यामुळे असं होत असावं," असं त्यांना वाटतं. पण स्त्रियांचं काय? त्यांचा जोडीदारातला रस कमी का व्हावा? पॉर्न फिल्म्समधले पुरुष वास्तवातल्या पुरुषांपेक्षा जास्त तगडे दाखवलेले असतात. त्यांची कामक्रीडाही नेहमीपेक्षा जास्त वेळ चाललेली दाखवलेली असते. त्याचा हा परिणाम असावा.

ख्रिस्टीअन लेयर (Christian Laier) या जर्मन संशोधकानं २०१२ साली केलेल्या प्रयोगात असं दिसून आलं की लैंगिकदृष्ट्या उत्तेजित झालेल्या पुरुषांची वर्किंग मेमरी कमी होते. (३) (वर्किंग मेमरी म्हणजे थोड्या काळासाठी, तात्पुरती उपयोगात आणली जाणारी स्मरणशक्ती. उदाहरणार्थ, तोंडी हिशेब करताना आपण अनेकदा 'हातचा आलेला' आकडा मनात ठेवतो आणि मग थोड्या वेळानं वापरतो. ती वर्किंग मेमरी). लेयरनं २८ तरुण पुरुषांना त्यांनी काही चित्रं दाखवली आणि मग त्यातली कुठली त्यांच्या लक्षात राहतात, कुठली रहात नाहीत ते बघितलं. त्यात काही साधीसुधी चित्रं होती तर काही पॉर्न स्वरूपाची होती. आधी पाहिलेल्या साध्यासुध्या चित्रांतली ८०% चित्रं त्यांनी बरोबर ओळखली तर पॉर्नपैकी फक्त ६७% चित्रंच आपण आधी पहिली आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं. खूप पॉर्न पाहण्याची परिणती रोजच्या आयुष्यात लहानसहान गोष्टी विसरण्यामध्ये का होते, या प्रश्नाचं उत्तर लेयर यांच्या अभ्यासातून मिळालं.

पॉर्न पहायची चटक लागली की माणूस संधी मिळाली की तेच पाहत बसतो, त्याच्या वर्तणुकीत फरक पडतो, त्याला त्याच्या जोडीदारात रस राहत नाही, परिणामी त्याचं लग्न (किंवा रिलेशनशिप) धोक्यात येते असं पॉर्नचे विरोधक म्हणतात. या उलट पॉर्न पाहिल्यामुळे सेक्स जास्त रंगतदार होतो, एकेकट्या स्त्रीपुरुषांना मनात उसळणाऱ्या लैंगिक भावनांचं शमन करण्यासाठी एक सुरक्षित मार्ग मिळतो, त्यांच्या अनिवार उर्मींचा निचरा होतो आणि मानसिक कोंडमारा टळल्यामुळे त्यातून उद्भवू शकणाऱ्या अनेक दुष्परिणामांची शक्यता नाहीशी होते, असं पॉर्नचे समर्थक सांगतात.

मग नक्की खरं काय? पॉर्न चांगलं की वाईट?

विज्ञानात कुठलाच शब्द 'अखेरचा' समजला जात नाही. (तो मक्ता निरनिराळ्या बाबांनी आणि आध्यात्मिक गुरुंनी स्वतःकडे राखून ठेवला आहे!) विज्ञानात नवीन नवीन विषयांवर तर संशोधन होतच असतं; पण जुन्या विषयांच्या संदर्भातही पुन्हा प्रयोग करून, पूर्वीचे निष्कर्ष पुन्हा तपासून पहिले जातात. बहुतेक वेळा त्यामुळे त्यांचे नवे पैलू प्रकाशात येतात, तर कधी त्या निष्कर्षांच्या मर्यादाही लक्षात येतात.

पॉर्नच्या बाबतीतही सांगायचं झालं तर शास्त्रज्ञांचे दोन तट पडलेले आहेत. काहीजण पॉर्न मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे असं म्हणतात; तर काही, त्यानं काही बिघडत नाही असं ठासून सांगतात. अगदी अलीकडे, मार्च २०१६ मध्ये आलेले काही लेख ४,५ या दोन्ही बाजू तितक्याच जोरकसपणे मांडतात. आंतरजालावर 'युअर ब्रेन ऑन पॉर्न' नावाचं (http://yourbrainonporn.com/) एक संकेतस्थळ आहे. त्यावर पॉर्न मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं घातक आ,हे असं मत मांडणारे पुष्कळ लेख आहेत. पण त्या लेखांचा प्रतिवाद करणारे बरेच लेखही आंतरजालावर इतरत्र उपलब्ध आहेत. त्या लेखांचा मुख्य आक्षेप पॉर्नसंबंधात झालेलं बहुतेक संशोधन अजून पूर्णत्वाला गेलेलं नाही, हा आहे. आणि तो बरोबर आहे.

या विषयातलं सर्वात मान्यताप्राप्त संशोधन करणारे Dr Simone Kühn आणि Dr Jürgen Gallinat यांनी पॉर्न आणि मानसिक अनारोग्य यामध्ये संबंध असतो, हे संख्याशास्त्राद्वारे दाखवून दिलं आहे. असं असलं तरी हा प्रयोग फक्त ६४ लोकांवर करून हा निष्कर्ष काढलेला असल्यामुळे, तो शंभर टक्के विश्वासार्ह म्हणता येणार नाही. आज पॉर्न पाहणाऱ्यांची संख्या कित्येक कोटींच्या घरात असताना ६४ हा आकडा फारच लहान वाटतो. केम्ब्रिजच्या संशोधिका डॉ वून या तर 'या विषयावर आणखी बरंच संशोधन होण्याची आवश्यकता आहे' असं स्पष्टच म्हणतात. त्यामुळे सध्या उपलब्ध असणाऱ्या पुराव्याच्या आधारे पॉर्न वाईटच असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही; तरी ते हानिकारक असण्याची दाट शक्यता आहे, असं मात्र म्हणता येईल.

"मला पॉर्नचं व्यसन लागलंय आणि त्यामुळे माझं आयुष्य बरबाद झालंय," असं सांगणाऱ्या शेकडो लोकांच्या हकिगती आंतरजालावर आहेत. पण अशा स्वरूपाचे वैयक्तिक अनुभव विज्ञानात वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून स्वीकारले जात नाहीत. शिवाय अनेकदा मुळात पॉर्न ही समस्या नसतेच. आपण खूप पॉर्न पाहतो, आपल्याला पॉर्नचं व्यसन लागलंय, अशी समजूत त्यानं (किंवा तिनं) करून घेतलेली असते. आपलं हे वागणं अनैतिक आहे, ही एक विकृती आहे; असं मानल्यामुळे त्याचं मोठं ओझं त्यांच्या मनावर असतं. त्याचा विलक्षण ताण येतो. प्रत्यक्ष पॉर्नमुळे जेवढं नुकसान होणार नाही त्यापेक्षा जास्त नुकसान अशा मानसिक ताणातून होतं.

आंतरजालावर पॉर्न मोफत आणि सहज उपलब्ध असल्यामुळे जगभरात तेरा ते एकोणीस वर्षांची टीनएजर मुलं-मुली भरपूर पॉर्न पाहतात. भारतातही पौगंडावस्थेत असलेली मुलं-मुली मोठ्या प्रमाणावर पॉर्न पाहतात, असं 'इंडिअन मार्केट रिसर्च ब्युरो'च्या काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अभ्यासात दिसून आलं. त्यात मुलींची संख्या थोडीथोडकी नाही तर तीस टक्के होती. मानवी मेंदू हा वयाच्या पंचवीस वर्षांपर्यंत विकसित होत असतो. विशेष करून मेंदूतला प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स हा भाग तोपर्यंत पूर्णपणे विकसित झालेला नसतो. हा मेंदूतला 'विवेकी' भाग आहे. आपल्या आचार-विचारांवर नियंत्रण ठेवायचं काम हा भाग करतो. त्यामुळे पौगंडावस्थेत असताना मुलं अविवेकी गोष्टी करण्याची जास्त शक्यता असते. म्हणून त्यांच्या बाबतीत विशेष सावधगिरी बाळगणं जास्तच गरजेचं आहे.

या मुलांना पॉर्न पाहण्यापासून दूर ठेवणं अशक्य आहे. त्यामुळे पालकांनी त्यांना धाकात ठेऊन, पॉर्न पहायची मनाई करण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून आंतरजालावर पाहायला मिळणारं पॉर्न ही एक प्रकारची फसवणूक असते, हे त्यांना समजावून सांगायला पाहिजे. कांतीला उजळपणा देणाऱ्या मलमांच्या जाहिराती आणि व्यायाम न करता वजन कमी करणाऱ्या औषधांच्या जाहिराती जशी खोटी आश्वासनं देत असतात त्यातलाच हा प्रकार आहे, हे त्यांच्या मनावर ठसवायला हवं. आंतरजालावर दिसणाऱ्या पॉर्नस्टार्सचं सौष्ठव बऱ्याचदा प्लास्टिक सर्जरीची किमया असते, त्यांची बराच वेळ चालणारी कामक्रीडा ही कॅमेऱ्याची बनवाबनवी असते, हे त्यांना पटवून द्यायला हवं. नाहीतर पॉर्नच्या इतर संभाव्य दुष्परिणामांबरोबरच त्यांच्या मनात स्वतःच्या शरीराबद्दल कॉम्प्लेक्स निर्माण होण्याचीही शक्यता आहे.

या विषयावर आंतरजालावर उपलब्ध असलेल्या अनेक लेखांचा नीट अभ्यास केल्यावर आपण खालील निष्कर्षांवर पोचतो.

०. या विषयावर आणखी बरंच संशोधन होण्याची गरज आहे.
०. पॉर्नमुळे मानसिक आरोग्याला धोका पोचतो असं छातीठोकपणे जरी म्हणता येत नसलं, तरी त्याची दाट शक्यता आहे.
०. कधीमधी पॉर्न पाहिलं तर विशेष काही बिघडत नाही, पण ते पाहायची चटक लागली तर कौटुंबिक, सामाजिक आणि वैवाहिक आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
०. तेरा ते वीस वर्षांची मुलं-मुली पॉर्न पाहणारच. त्यांना त्यापासून दूर ठेवणं अशक्य आहे. पालकांनी त्यांच्याशी बोलून त्यातले धोके त्यांना समजावून सांगायला हवेत.

***

संदर्भ :
http://archpsyc.jamanetwork.com/article.aspx?articleid=1874574
http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0102419
http://www.livescience.com/25543-online-porn-affects-memory.html
http://www.yourbrainonporn.com/porn-good-us-or-bad-us-philip-zimbardo-phd
https://www.psychologytoday.com/blog/women-who-stray/201603/we-must-rely...
http://www.bustle.com/articles/142479-5-weird-things-that-happen-to-your...

***

लेखकाचा इ-पत्ता इथे

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

लेख आवडला. लक्ष्मण रेखा प्रत्येक बाबतीच आहेच. अभिव्यक्ती स्वतंत्रेच्या पुकारा करण्यावाल्यांना हे कळले पाहिजे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लक्ष्मण रेखा प्रत्येक बाबतीच आहेच.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. कंची बी गोष्ट लिमिटमदी करा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

जावडेकरांच्या लेखातील संशोधनाचे संदर्भ आजगावकरांच्या तुलनेने लेटेस्ट व दर्जाने उजवे प्रथमदर्शनी तरी दिसतात. जावडेकरांच्या लौकिकाप्रमाणे आजगावकरांपेक्षा त्यांचा लेख अधिक संतुलित आहे असे जाणवते. आजगावकरांचा लेख इंटीमिडेटींग आहे. काहीसा कार्यकर्त्याप्रमाणे आहे किंवा कदाचित कॉज चे गांभीर्य कळावे म्हणुन आक्रमक आहे.
जावडेकरांचा वास्तवाच्या अधिक जवळ जाणारा वाटतो. जावडेकर शिक्का मारण्यास उतावीळ दिसत नाहीत.
आजगावकरांचा लेखही उत्कृष्ठ आहे मात्र काहीसा एकांगी वाटतो. मात्र दोन्हींचा मेळ घातल्यास अनेक मुद्दे एकमताने मान्य होतात. कोणीही तटस्थ वाचक कॉमन अ‍ॅग्रेमेंट होत असलेल्या अनेक महत्वाच्या मुलभुत मुद्द्यांवर सहज पोहोचु शकतो.
दोघांतुन मेळ केल्यावर त्याला स्वानुभवाची जोड देऊन पॉर्न चा विवेकी उपयोग करण सहज शक्य आहे.
दोन्ही लेख अत्यंत या विशेषांकाला अत्यंत संपन्न बनवतात. दोघांचे कॉमन मुद्दे निर्वीवाद असे काढुन ९ वीतल्या मुलामुलींना अभ्यासक्रमात लावायला हवेत या दोन्ही लेखांच्या प्रिंट्स सर्क्युलेट करायला हव्यात.
अत्यंत महत्वाच्या लेखांसाठी संपादक व लेखकांचे शतशः आभार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जावडेकरांच्या लेखातील संशोधनाचे संदर्भ आजगावकरांच्या
तुलनेने अपूर्ण व दर्जाने समान प्रथमदर्शनी तरी भासतात. जावडेकरान्नी विज्ञानात कोणताच शब्द शेवटचा नाही वगैरे लेख संतुलित करणारी वाकये भलेही पेरली असतील तरीही त्यानी आजगाकरान्च्या तुलनेत मेंदुच्या प्रक्रियेचे समग्र विवेचन केले नाही हे खेदाने मान्य करावेच लागेल तरीही त्यांनी अभ्यास वाढवून यापुढे जास्त इन डेप्थ माहिती वाचकांसमोर आणावी ही नम्र विनंती आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

सन्दर्भ क्रमांक २ ही हायपरलिंक स्वरुपात आलेली नाही. ती अशी हवी: http://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0102419

दुरुस्ती झाली असल्याने ही comment कृपया काढून टाकावी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. तो संतुलित आहे असे मुद्दाम भासवण्याचा प्रयत्न कुठेही जाणवत नाही, तर ते लेखकाचे खरोखरचे न्यूट्रल मत आहे हे जाणवते. ज्यांना आयुष्यांत कधीच सेक्स अनुभवायला मिळाले नाही आणि जे सेक्सशुअली संतुष्ट आहेत, अशा दोन्ही प्रकारच्या गटाने पॉर्न पाहिले असता, त्यांच्या मेंदूत होणारे बदल, हेही वेगवेगळे असण्याची शक्यता आहे, असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपली मतं बाजूला ठेवून खरोखरच सिद्धता काय सांगते आणि काय सांगत नाही, याबद्दल विवेचन करणारा लेख. खर्‍या अर्थानं जमिनीवरचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लेख आवडला. पॉर्नचं व्यसन लागू शकतं का, किंवा अतिरेकी पॉर्न पाहाणं हा मानसिक विकार आहे का याचं स्पष्ट उत्तर नाही हे अधोरेखित केलं आहे. त्याचबरोबर इतर कुठच्याही गोष्टीप्रमाणे पॉर्नचा अतिरेक केला तर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात हेही सांगितलेलं आहे. मेघना म्हणते त्याप्रमाणे खऱ्या अर्थाने जमिनीवरचा लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"मेन्दू आणि त्याचे कार्य" हे सुबोध सरान्चे फोर्टे आहेच.
उत्तम "नॉन जज्मेन्टल" लेख

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्क्रुष्ट लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

''मी तंबाखु खाणारच''

इतर प्राण्यांपेक्षा मनुष्यप्राणी वेगळा कसा तर हा एक मुद्दा आहे. इतर जोडप्यांच्या लैंगिक क्रिया पाहायला आवडणे. आता तो छंद किती करायचा हा दुसरा मुद्दा आहे.
माशीने श्रीखंडाच्या पातेल्याच्या कडेवर बसून श्रीखंड खात राहणे ठीक आहे. परंतू फार पुढे सरकली अथवा नेहमीच्या सवयीने पायांनी पंख साफ करायला सुरुवात केली की काय होते ते आपण पाहतोच. किती टक्के माशा असं श्रीखंड खातात, कितीजणी पंख साफ करतात,किती लडबडून गेल्या याची आकडेवारी उपलब्ध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0