पदराआडचा वात्स्यायन

पदराआडचा वात्स्यायन
- रुची

ऐतिहासिक व्यक्तींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करायचे, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात अधिष्ठान द्यायचे, की त्यांच्याकडे संपूर्ण तटस्थतेने काळाच्या चश्म्यातून पाहायचे या निर्णयसंभ्रमातच अनेक फड रंगतात; त्यांतून त्या व्यक्तींच्या, घटनांच्या आणि संदर्भांच्या अनेक प्रती निघतात. अनेकदा अभ्यासकांच्या भूमिकांचेही इतके ध्रुवीकरण झालेले असते, की त्यातून एकसंध आणि संतुलित चित्र निर्माण होत नाही. मग हा निवाडा वैयक्तिक पातळीवर आपल्यालाच करावा लागतो.
वात्स्यायनाच्या कामसूत्राकडे आणि कामसूत्रातल्या वात्स्यायनाकडे पाहताना, हा निवाडा करणे मला कष्टाचे पडते. एकतर संस्कृतवर प्रभुत्व नसल्याने त्याच्या इंग्रजी भाषांतरांना शरण जावे लागते. त्यात ही भाषांतरे देशी व्यक्तीने केली आहेत की विदेशी, त्यांच्या राजकीय-सामाजिक भूमिका कोणत्या होत्या, हे भाषांतर कोणत्या काळात झाले, या सगळयांवरून अर्थनिष्पत्तीत मोठे फरक पडतात. स्वातंत्र्यपूर्व काळात रिचर्ड बर्टनसारख्या इंग्रजांच्या पुढाकाराने झालेले भाषांतर आणि त्यातून प्राचीन भारतातील तथाकथित लैंगिक मोकळेपणाचे गौरवीकरण; स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रवादी भारतीयांनी गेलेले भाषांतर आणि त्यातून झालेले वात्स्यायनाचे गौरवीकरण; त्यानंतरच्या काळातल्या अभ्यासकांनी आणि स्त्रीवाद्यांनी केलेले त्याचे खंडन आणि वर्ण-लिंग-जातभेद दृढ करणारा अजून एक ब्राम्हण्यवादी ग्रंथ अशी झालेली त्याची मांडणी; आणि आता अगदी अलीकडच्या काळात पुनश्च थोड्या सहानुभूतीने वात्स्यायनाच्या उदारमतवादाला जाणून घेणारी भूमिका, त्याला संदिग्धतेचा फायदा देणारी भाषा, अशा विविध अंगांनी त्याच्याकडे पाहूनही यांतला नक्की कोणता दृष्टिकोन आपल्या भूमिकेशी मिळताजुळता आहे याचा निवाडा मला करता आलेला नाही. अशा वेगवेगळ्या अंगांनी विचार केल्याने या ग्रंथाचे रसग्रहण मात्र कमालीचे सुरस झाले आहे हे नक्की.
कामसूत्राची आणि माझी पहिली ओळख साधारण २००० सालाच्या आसपास, रिचर्ड बर्टनने केलेल्या अनुवादाच्या रूपाने झाली. त्या काळात हा ग्रंथ वाचून मी चांगलीच बुचकळ्यात पडले होते. या ग्रंथाला समकालीन असलेल्या काळातले वर्ण-जात-लिंग भेदभाव, या भेदांच्या आधारे निर्माण केलेली हक्कांतली तीव्र असमानता आणि या पुस्तकांतून वर्णन केलेला लैंगिक मोकळेपणा यांचा मेळ काही बसत नव्हता. त्या काळाच्या तुलनेत आजच्या आधुनिक समाजात स्त्री-पुरुष समानता वाढलेली होती, वर्णव्यवस्थेचे महत्त्व तुलनेने घटलेले दिसत होतेआणि इतर क्षेत्रांत आधुनिकतेचा स्वीकार झालेला होता. पण त्याच वेळी लैंगिक व्यवहारांवरची बंधने तुलनेने वाढलेली दिसत होती, स्त्री-पुरुषांच्या कामप्रेरणांचे दमन होत होते आणि एकूणच शरीरसंबंधाविषयीचा अवघडलेला अपराधीपणाही दिसत होता. या दोहोंमधल्या विसंगतीचा अर्थ लावताना मला अडखळायला झाले.
कामक्रीडांच्या वर्णनांनी भरलेल्या या प्राचीन भारतीय ग्रंथात, वात्स्यायन कमालीच्या सहजतेने, उघडपणे आणि मोकळेपणाने मानवी लैंगिक व्यवहारांची वर्णने करतो; पॉर्न सिनेमातल्या नायक-नायिकांना क्लिष्ट वाटतील अशी आसने सांगतो; सर्व स्त्री-पुरुषांनी - अगदी कुमारिकांनीही - विवाहापूर्वी या ग्रंथाचे शिक्षण घ्यावे अशी शिफारस करतो. त्याच वेळी, आजच्या आधुनिक समाजात मात्र अविवाहित स्त्री-पुरुषांना लैंगिकतेचे शिक्षण देण्या़ची शिफारस करणे सोडाच, पण त्यांच्या हाती अपघातानेही अशी पुस्तके पडू नयेत यासाठी आटापिटा करण्यात येतो. या ग्रंथात वर्णन केलेले अनेक व्यवहार आजच्या समाजातही अनेकांना असभ्य किंवा अनैतिक वाटतात. पण ती वर्णने करणारा वात्स्यायन मात्र आपल्या थोर प्राचीन संस्कृतीचा शिलेदार असल्याने अपराधी ठरत नाही. तसेच ग्रंथातील वर्णने अगदी थेट आणि संदर्भासह असल्याने 'याचा मूळ अर्थ आध्यात्मिक होता' वगैरे नेहमीची सारवासारवी करणेही धर्ममार्तंडांना शक्य होत नाही. अशा सगळ्या उलटसुलट गमतीजमतींमुळे एकूणच भारतीयांसाठी प्राचीन खजुराहो मंदिरांप्रमाणेच वात्स्यायनाचे कामसूत्रही गैरसोयीचे आहेत हे मात्र माझ्या लक्ष्यात आले होते.
धक्का बसण्याचा हा सुरुवातीचा थोडा काळ उलटल्यावर मग कामसूत्र वाचताना मात्र कानशिले वेगळ्याच कारणाने गरम व्हायला लागली. वांग्याच्या भाजीची पाककृती देताना आपण ज्या सहजतेने - जांभळ्या रंगाची पाच-सहा कोवळी वांगी निवडावीत - वगैरे सूचनांनिशी सुरुवात करतो, त्या सहजतेने 'स्त्री कशी मिळवावी, तिला संभोगासाठी कशी तयार करावी, कोणत्या प्रकारच्या क्रिया कोणत्या प्रकारच्या स्त्रीबरोबर कराव्यात' वगैरे सांगताना स्त्री म्हणजे एक उपभोग्य वस्तू असल्याचे वात्स्यायन सहज गृहीत धरतो. उदाहरणार्थ हा परिच्छेद पाहा,
"प्रेमप्रकरण करण्यासाठी कोवळ्या युवती, विधवा आणि वेश्यांसारख्या स्त्रिया उपयुक्त असतात. भोगासाठी हव्या आहेत की मुलेबाळे जन्माला घालण्यासाठी यावरून स्त्रीचे दोन प्रकार ठरतात. आपल्या जातीची आणि वयाने लहान असलेली मुलगी ही सर्वांत चांगली निवड ठरते. आपल्यापेक्षा खालच्या जातीची - विशेषत: कौमार्य भंगलेली - युवती शक्यतो निवडू नये. आपल्याहून खालच्या जातीच्या मुलीचा कौमार्यभंग तुम्ही केलात, तर ती तुमच्या पत्नीचे स्थान मागू शकते. अशा प्रकरणांत स्त्रीच्या कौमार्याची खात्री अर्थातच करून घ्यावी लागते. अशा लहान वयाच्या युवतीच्या पाठोपाठ कौमार्यभंग झालेल्या विधवेचा क्रमांक येतो आणि त्याच्या पाठोपाठ वेश्येचा."
त्या काळच्या स्त्रीला होकार-नकाराचा अधिकार होता असे गृहीत धरूनही स्त्रीच्या उपभोग्यतेनुसार तिचे वर्गीकरण आणि वस्तूकरण करण्याच्या या शैलीमुळे माझ्या वैतागावर नियंत्रण ठेवणे मला कठीण व्हायला लागले. त्यातही उच्चवर्णीय, धनाढ्य व्यक्तीसाठी सेविका अथवा खालच्या वर्णातली कोणतीही स्त्री उपलब्ध असते हे गृहीतक, तशा धनिकाला असलेली गणिकांकडे जाण्याची असलेली मोकळीक, पुन्हा स्वतःची हक्काची बायको त्याला संभोगासाठी कायमच उपलब्ध असणे, विवाहित स्त्रीवर मात्र नैतिकतेची असंख्य बंधने असणे या सगळ्यांतून वर्णवर्चस्वाचा आणि पुरुषप्रधानतेचा दर्प येत होता. तो टाळून या ग्रंथाकडे पाहणे अशक्य होऊन बसले होते. दरम्यान काही स्त्रीवादी आणि डाव्या भारतीय अभ्यासकांनी लिहिलेले विश्लेषण वाचल्यावर तर हा कामक्रीडांवर लिहिलेला ग्रंथ असला, तरी त्यामागे एक सनातनी दृष्टिकोनच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. या पुस्तकातले नागरकाच्या दिनचर्येचे वर्णन पाहिले, तर हा ग्रंथ एका विलासी, उपजीविकेसाठी काहीही कामधंदा न करावा लागणाऱ्या उच्चवर्णीय पुरुषासाठीच लिहिला गेलेला आहे हे स्वच्छ दिसते. हा असा पुरुष सामाजिक उतरंडीत सगळ्यात वरच्या पायरीवर बसलेला असल्याने त्याच्या खालचे सगळे जीव त्याच्यासाठी या-ना-त्या पद्धतीने सेवादातेच ठरतात. त्यामुळे हा दृष्टिकोन त्याच्या लैंगिक व्यवहारांतूनही दिसणे स्वाभाविकच आहे. पण म्हणून आधुनिक समाजातल्या समानतेच्या तत्त्वांची सवय झालेल्या व्यक्तीला हे वाचताना त्याचा कमी त्रास होत नाही. त्या काळातल्या संदर्भचौकटींसह या पुस्तकाकडे पाहायला हवे हे खरे, पण ते प्रयत्नपूर्वक करावे लागते.
माझ्या बाबतीत हे झाले ते कालांतराने आणि थोडे अपघाताने. एकदा वात्स्यायनाने केलेली नागरकाच्या दिनचर्येची वर्णने वाचताना मला त्यात वुडहाउसच्या पुस्तकांतील 'बर्टी वूस्टर'ची झाक दिसली आणि तेव्हापासून या पुस्तकाचे मनोरंजक मूल्य समजायला लागले. तीच ती उच्चवर्गीय रिकामटेकड्या युवकाला परंपरेने लाभलेली समृद्धी आणि त्या समृद्धीचा आस्वाद घेताना समाजाने आखून दिलेल्या चाकोरीनुसार ठरलेली सुसंस्कृतपणाची दिनचर्या! असे असले तरी आपल्या कामसूत्राच्या नायकाचे कामजीवन, व्हिक्टोरियन बर्टीपेक्षा शतपटींनी अधिक यशस्वी आणि धडाडीचे असल्याने माझ्यासाठी कामसूत्राचे मनोरंजनमूल्य अजूनच वाढले. एकूणच या ग्रंथाचा काळ आणि याचा अपेक्षित वाचक कोण होता हे एकदा लक्ष्यात आल्यावर त्याच्या मर्यादा आणि त्याची उपयुक्तता याकडे थोड्या समजूतदारपणे पाहणे शक्य झाले.

हा जो धनिक नागर आहे, तोही बर्टी वूस्टरसारखाच रिकामटेकडा आणि आपल्या मित्रमंडळींसोबत विलासीपणा करणारा आहे. असे असले तरी त्याने आपल्या धनाचा आणि सुविधांचा सुसंस्कृतपणे उपभोग कसा घ्यावा याबद्दलचे संकेतही वात्स्यायनासाठी तितकेच महत्त्वाचे आहेत. कामसूत्रातून दिसणाऱ्या या नागरी समाजाबद्दल अरविंद कोल्हटकरांनी लिहिलेला सविस्तर लेख २०१५च्या 'ऐसी अक्षरे'च्या दिवाळी अंकात असल्याने त्याबद्दल अधिक लिहीत नाही; पण या आपल्या समृद्धीचा उपभोग घेण्यासाठी का होईना, कामसूत्राच्या नायकाला चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचे ज्ञान असणे गरजेचे असल्याचे दिसते. उपजीविकेसाठी नाही, तरी सुसंस्कृत म्हणवून घेण्यासाठी त्याला अगदी पुष्परचनांपासून ते काव्यशास्त्र आणि साहित्याच्या अभ्यासासारख्या अनेक गोष्टी शिकाव्या लागत असत असे दिसते.
हा नागरक उच्चवर्णीय - अर्थात ब्राह्मण - असावा असे अनुमान अनेकांनी काढले आहे, पण अनेक अभ्यासकांच्या मते हा पुरुष फक्त धनिक असणे अपेक्षित होते. वेंडी डॉनिजर यांचे अलीकडेच प्रकाशित झालेले 'रिडीमिंग द कामसूत्र' हे पुस्तक या संदर्भात वाचनात आले.
त्यात वात्स्यायनाकडे आणि कामसूत्राकडे पाहण्याचा अधिक रोचक आणि समजूतदार दृष्टिकोन दिसून येतो. या पुस्तकात लेखिका वात्स्यायनाचा उदारमतवाद ओळखते, त्याच्या चातुर्याचे कौतुक करते; पण त्याचे गौरवीकरण मात्र होऊ देत नाही. असा मध्यममार्ग स्वीकारणाऱ्या अभ्यासकांच्या भूमिकेतून विचार केल्यावर हा ग्रंथ प्रत्यक्ष कामक्रीडांच्या पलीकडेही अतिशय रोचक वाटायला लागतो.
या ग्रंथात स्त्रीपुरुष आणि समलैंगिक व्यक्ती यांच्या विविध कामक्रीडांची वर्णने असली तरी या ग्रंथाचा अपेक्षित मुख्य वाचक आणि नायक हा प्रामुख्याने भिन्नलिंगी लैंगिक संबंधांत रस असणारा उच्चवर्गीय, धनिक पुरुष आहे हे उघड आहे. संभोगाच्या प्रकारांचे जे मुख्य प्रकरण आहे, ते भेदनाच्या (penetration) वेगवेगळ्या रंगामध्येच घोळत राहते. या ग्रंथाचे ज्ञान सर्व स्त्री-पुरुषांसाठी आवश्यक आहे आणि अविवाहित स्त्रियांनीही याचे शिक्षण घ्यावे असे वात्स्यायनाने आवर्जून सांगितले आहे. तरीही हे लेखन पुरुषालाच केंद्रबिंदू मानून लिहिलेले आहे हे उघड आहे. वात्स्यायन म्हणतो, की सर्व स्त्रियांनी विवाहापूर्वी कामशास्त्राचे शिक्षण घ्यावे आणि विवाहानंतरही आपल्या पतीच्या अनुमतीनुसार ते चालू ठेवावे. तो असेही म्हणतो, की विद्वानांच्या मते स्त्रियांना (शिक्षणाच्या अभावी) ग्रंथांचे अवलोकन करणे शक्य नसल्याने ते शिकवण्याचा प्रयत्न निरुपयोगी आहे. पण वात्स्यायनाच्या मते स्त्रियांचा प्रात्यक्षिकात सहभाग असल्याने हे ज्ञान त्यांना देणे उपयुक्त आहे. तो म्हणतो, "ज्याप्रमाणे खगोलशास्त्र हे किचकट शास्त्र शिकण्याची सर्वांची वैचारिक कुवत नसली, तरी ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीवरून मुहूर्त शुभ आहे की नाही ते कोणीही ओळखू शकते; त्याचप्रमाणे कामशास्त्राचे शास्त्रशुद्ध अध्ययन स्त्रीसाठी शक्य नसले, तरी त्याच्या प्रात्यक्षिकाशी तिचा घनिष्ट संबंध येत असल्याने या शास्त्राची माहिती समजून घेणे तिला शक्य आहे." आपल्या स्त्रीला असे लैंगिक शिक्षण देणे पुरुषाच्या लैंगिक सुखासाठी उपयुक्त असल्याने अशा प्रकारचा मर्यादित उदारमतवाद पुरुषप्रधानतेलाच सोयीचा आहे हे स्वयंस्पष्ट आहे. पण त्यातली मेख अशी, की वात्स्यायनाचे हे मत त्या काळातील विद्वानांच्या मताविरुद्ध होते.
कामसूत्र हे एका अर्थाने त्याच्या आधीच्या काळातल्या, या विषयाशी संबंधित असलेल्या ग्रंथांतल्या कल्पनांचे संकलन आहे. कामसूत्रातील कल्पना, विचार हे त्या काळासाठी अभिनव होते याला पुरावा नाही. वात्स्यायनाच्या नंतरही 'रतिरहस्य', 'अनंगरंग' अशा ग्रंथांमधून संभोगाच्या अनेक आसनांची सविस्तर वर्णने आहेत. वात्स्यायनही अनेक ठिकाणी इतर ग्रंथांचे आणि त्यांच्या लेखकांचे दाखले देतो. हे दाखले कधी आपल्या मुद्द्यांना बळकटी देण्यासाठी असतात, तर कधी मुद्द्यांचा प्रतिवाद करण्यासाठी असतात. असे असताना मग वात्स्यायनाच्या कामसूत्राचे वेगळेपण कशात आहे? तर हे वेगळेपण संकल्पनांच्या मांडणीत आहे, ग्रंथाच्या उद्दिष्टांत आहे आणि त्याच्या काहीशा उदारमतवादात आहे.
पहिले महत्त्वाचे वेगळेपण असे, की वात्स्यायनाच्या मते कामक्रीडांचा मुख्य उद्देश भोगातून मिळणारी शुद्ध आनंदप्राप्ती हा आहे. अगदी सद्यकाळातल्या मुस्लीम, ज्यू, ख्रिश्चन इत्यादी बांधीव धर्मांच्या दृष्टिकोनातून पाहिले, तर 'शुद्ध आनंदप्राप्तीसाठी संभोग' हा प्राथमिक विचारच क्रांतिकारी ठरतो. अशा धर्मांच्या मते संभोगाचे मुख्य उद्दिष्ट पुनरुत्पादन हेच आहे आणि एरवी त्यातून मिळणारा आनंद ही काहीसा अपराधीपणा बाळगण्याची गोष्ट आहे. वात्स्यायन मात्र 'काम' हे 'धर्म' आणि 'अर्थ' यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे असे हिरिरीने मांडतो आणि त्यातून होणाऱ्या आनंदप्राप्तीवरच भर देतो.
दुसरे वेगळेपण असे, की आपल्या ग्रंथात ठिकठिकाणी वात्स्यायन मनूचे आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे दाखले देतो. पण इथे तो ज्या लैंगिक क्रियांना 'वाममार्ग' असे संबोधतो, त्यांबद्दल शिक्षेची तरतूद मात्र सांगत नाही. मनू आणि कौटिल्य मात्र अशा प्रकारच्या शिक्षांचे तपशील सांगायला चुकत नाहीत. लैंगिक व्यवहारांतले वैविध्य हे माणसागणिक, तसेच प्रादेशिक, सामाजिक संकेतांप्रमाणे बदलत असते; पण मनुष्याने सर्वसाधारणपणे धर्माचरण करावे असे वात्स्यायन मांडताना दिसतो. ही भूमिका आज्ञावजा धमकी नाही, तर सौम्य उपदेशात्मक आहे. अनेकदा त्याही पुढे जाऊन वात्स्यायन मोठ्या खुबीने नियमांतल्या पळवाटाही सुचवतो.
अशा वादग्रस्त मुद्द्यांबाबत वात्स्यायनाच्याच मांडणीत लक्षणीय विरोधाभासही दिसतो. मनूने रचलेले धर्मशास्त्र श्लोकांच्या रूपात (पद्यात) आहे, तर कौटिल्याच्या अर्थशास्त्राप्रमाणेच वात्स्यायनाचे कामसूत्र मुख्यत: गद्य आहे. अर्थशास्त्राप्रमाणेच कामसूत्राची बरीचशी मांडणी गद्य आहे, पण एखाद्या प्रकरणाच्या शेवटी असलेल्या श्लोकांपुरते पद्यही त्यात आहे. या गद्य प्रकरणांत अधार्मिक - आणि अनेकदा धर्मविरोधी - बाबींची चर्चा झाल्यावर शेवटच्या श्लोकात धर्माला अनुसरून घेतलेली भूमिका असा विरोधाभास साधलेला दिसतो. हा विरोधाभास सहेतुक तर आहेच, पण तो वात्स्यायनासारख्या लेखकांची धर्मासंबंधीची ढोंगी भूमिकाही स्पष्ट करतो.
एखाद्या प्रकरणात धर्मबाह्य लैंगिक क्रियांची सविस्तर आणि चविष्ट चर्चा करून झाल्यावर त्या प्रकरणाअखेरीस, असे व्यवहार वाममार्ग असल्याचे सांगणे असे वात्स्यायन अनेकदा करतो. अशा चतुर मांडणीमुळे धर्मपरंपरांना प्रत्यक्ष आव्हान न देताही त्यातला विरोधाभास वाचकांच्या लक्ष्यात आणून देऊन वात्स्यायनाने या कायदेशीर पळवाटा शोधल्या असतील काय, याकडे डॉनिजर आपले लक्ष वेधतात. धर्मपरंपरांना उघड विरोध करण्याऐवजी आधी सविस्तर, सखोल प्रक्षोभक मते मांडायची आणि मग त्यांचे अतिशय गुळमुळीत खंडन करायचे अशी रणनीती योजून वात्स्यायनाने आपला ग्रंथ धर्ममार्तंडांच्या कचाट्यातून वाचवला आहे की काय असे वाटते. या गोष्टी वात्स्यायनाने जाणीवपूर्वक केलेल्या आहेत हे अनेक उदाहरणांतून सिद्ध करता येते.
या संदर्भात 'औपरिष्टक' अर्थात मुखमैथुन हे वादग्रस्त प्रकरण उदाहरण म्हणून पाहणे गरजेचे वाटते. अशा प्रकारचा संभोग तत्कालीन धर्मपरंपरांनुसार अयोग्य आणि धर्माला धरून नसल्याने वात्स्यायन या प्रकरणात अनेक कोलांट्या मारताना दिसतो.
औपरिष्टक प्रकरणाची सुरवात 'तृतीयप्रकृती' या संज्ञेच्या स्पष्टीकरणापासून होते. स्त्री आणि पुरुष यांच्याबरोबरच वात्स्यायन एका तिसऱ्या प्रकारच्या लैंगिकतेचा उल्लेख करतो. तिला तो तृतीयप्रकृती असे संबोधतो. या तृतीयपंथामध्ये स्त्रीसारखा पोषाख करणारे पुरुष, पुरुषासारखाच पोशाख करणारे पण पुरुषाविषयी लैंगिक आकर्षण असणारे पुरुष; स्त्रैण पुरुष; नपुसंक पुरुष, पुरुषासारखा पोशाख करणाऱ्या आणि स्त्रीबद्दल लैंगिक आकर्षण असणाऱ्या स्त्रिया, अशा अनेकांचा तो उल्लेख करतो. रोचक भाग असा आहे, की यांपैकी कोणत्याही व्यवहारांना वात्स्यायन 'अनैसर्गिक' म्हणत नाही. उलट एका प्रकारच्या सहजतेने त्यांचे वर्णन करतो. अशा तृतीयपंथी व्यक्तींपैकी जे स्त्रीसारखा पोषाख करणारे पुरुष असतात (ट्रान्सव्हेन्टाइन्स), ते इतर पुरुषांबरोबर (सामान्य अर्थात स्ट्रेट) मुखमैथुनात सहभागी होतात आणि अशा प्रकारांतून उपजीविका करतात असे वात्स्यायन सांगतो. त्यानंतर वात्स्यायन पुरुषांसारखा वेष आणि आविर्भाव असलेल्या, पण पुरुषांविषयीच लैंगिक आकर्षण असणाऱ्या - पुरुषांविषयी लिहितो. असे पुरुष साधारणपणे अंगमालीश करून उपजीविका करतात आणि अनेकदा आपल्या ग्राहकांशी मुखमैथुनादी संबंध ठेवतात असेही वात्स्यायन सांगतो. वात्स्यायनाच्या शब्दांत या संबंधांचे वर्णन,
"अंगाला मालीश करताना तो आपल्या ग्राहकाच्या अंगावर ओणवा होऊन त्याच्या शरीराला स्पर्श करत ग्राहकाच्या मांडया आतल्या बाजूने रगडतो. मांड्यांना मालीश करताना तो आपला चेहरा ग्राहकाच्या मांड्यांच्या निकट आणतो. मालीश करण्याच्या आविर्भावात तो ग्राहकाच्या जांघांजवळ जात आणि लिंगाला टाळून त्याच्या वृषणाला स्पर्श करतो*. अशा स्पर्शाने ग्राहक उत्तेजित झाल्याने त्याचे लिंग ताठ झाल्यास नुसत्या मांड्या चोळल्याने असे झाल्याबद्दल थोडी थट्टा करत तो लिंग चोळायला सुरुवात करतो. लिंग ताठर होणे हे आमंत्रण समजून तो ग्राहकाच्या संमतीशिवाय मुखमैथुनास प्रारंभ करतो. ग्राहकने हे करण्यासाठी त्याला आमंत्रण दिल्यास तो सुरुवातीला याला थोडी हरकत घेतो आणि "मी असले प्रकार करत नाही" असे म्हणत एकदा हे काम स्त्रियांचे असल्याची समज देतो आणि नंतर थोड्याश्या अनिच्छेने आपली संमती देतो. त्यानंतर एकूण आठ प्रकारांनी हे मैथुन आचरले जाते. ओठांनी स्पर्श करणे (निमित), बाजूंनी हलके चावे घेणे (पार्ष्वतोदष्ट), बाह्यांगांने दाबणे (बहिःसंदंश), आतून दाबणे (अंत:संदंश), चुंबणे (चुम्बितक), चाटत घासणे (परिमृष्टक), आंब्यासारखे चोखणे (आम्रचूषितक), पूर्ण गिळणे (संगर). या क्रिया एकामागून एक अशा प्रकारे स्खलन होईपर्यंत केल्या जातात."
*हा स्पर्श अजाणतेपणी झाला असे दाखवणे यात अभिप्रेत असावे.
वात्स्यायन त्यानंतर या आठ क्रियांचे पूर्ण तपशिलासहित वर्णन करतो. त्यानंतर तो सांगतो की अशा प्रकारचे संभोग, कुल्टा, स्वैरिणी (लेस्बियन्स), सेविका, ओझे वाहून नेणाऱ्या स्त्रिया यांच्याबरोबरही करता येतात आणि मुखमैथुन ही केवळ तृतीयप्रकृतीच्या पुरुषांपुरतीच वापरली जाणारी संज्ञा नव्हे.
इतकी तपशीलवार वर्णने करून झाल्यावर वात्स्यायन म्हणतो की,
"धर्मग्रंथांत सांगितले गेले आहे की मुखाचा लिंगाशी स्पर्श होणे त्याज्य असल्यामुळे ब्राह्मणांसाठी हे त्याज्य आहे आणि त्यामुळे असे वर्तन असंस्कृत होते, म्हणून ते निषिद्ध आहे. वात्स्यायनाच्या मते वेश्यागमन करणाऱ्यासाठी हे वर्तन पाप नव्हे, पण ते इतरांबरोबर करणे टाळावे. मुखमैथुन वेश्येबरोबर केल्याने ते पाप होत नाही, आपल्या प्रांतातल्या सभ्यतेच्या संकेतात ते बसले नाही, तरी त्याला पाप म्हणता येत नाही. स्वत:च्या पत्नीबरोबर मात्र असे वर्तन पाप होते आणि आपल्या पूर्वजांचे पंधरा वर्षांचे पुण्य त्यामुळे वाया जाते, त्यामुळे असे असंस्कृत प्रकार टाळावेत. अर्थात स्त्रीच्या योनीशी मुखाचा स्पर्श जर एखाद्या स्थानिक परंपरेने वैध असेल, तर शास्त्राप्रमाणे ते निषिद्ध नाही."
त्यापुढे तो मुखमैथुनाविषयीच्या निरनिराळ्या प्रदेशांतल्या परंपरांचे वर्णन करतो. वात्स्यायनाच्या मते पाटलीपुत्र वगळता प्रचय, दक्षिण पांचाल, अयोध्या, सौरसेना वगैरे प्रांतात मुखमैथुन अधिक आढळते आणि ते त्यांना फारसे वावगे वाटत नाही. पाटलीपुत्रात हे प्रकार फक्त वेश्यांबरोबर केले जातात, पण स्त्रीयोनीशी मुखाचा स्पर्श करणे टाळले जाते. अशा वेगवेगळ्या टिप्पण्यांमधून या वादग्रस्त मुद्द्यासंदर्भात तत्कालीन समाजातही प्रादेशिक फरक होता असे जाणवते. त्याचबरोबर आपल्या समाजाबाहेरील लोकांकडे खालच्या नजरेने पाहण्याचा प्रादेशिक उच्च-नीच भावही होता असेही असू शकते.
यानंतर वात्स्यायन या मुद्द्यावर स्वत:चे मत व्यक्त करताना म्हणतो,
"नैतिकतेच्या मुद्द्यांचा विचार करताना केवळ शास्त्रात काय लिहिले आहे, याच्याबरोबरच स्थानिक परंपरा काय आहेत आणि इतर परिस्थितीनुरूप बाबी काय आहेत याचा विचार करणेही गरजेचे असते. पत्नीची मासिक पाळी चालू असेल, तर मुखमैथुन चालू शकते किंवा वेश्येशी संबंध ठेवायचे असतील, तर तिथेही मुखमैथुन वैध होते.* शास्त्रातल्या नियमांना चिकटून राहण्यापेक्षा स्थानिक परंपरांनुसार आणि आपल्या अंतर्मनाला जे बरोबर वाटते त्याप्रमाणे वागावे."
*पळवाटांचे आणि मध्यममार्गाचे उत्तम उदाहरण!
सर्वसाधारणपणे परंपरेनुसार वागणाऱ्यांनाही लैंगिक आचरणाच्या बाबतीत धर्माला चिकटून राहणे आवडत नाही आणि त्यांच्यासाठी हे असे मध्यममार्ग सोयीचे असतात हे वात्स्यायनाने चाणाक्षपणे ओळखलेले दिसते. त्याच्या या भूमिका म्हणजे बोटचेपेपणा होता असे कोणाला वाटेल; तरी ज्याप्रमाणे आणीबाणीच्या काळात सरकारला विरोध करण्यासाठी कायदेशीर पळवाटा किंवा उपरोध यांसारखी आयुधेच वापरावी लागत, त्याचप्रमाणे मनूच्या काळातल्या कायदाव्यवस्थेत असे मध्यममार्ग स्वीकारावे लागले असणे वात्स्यायनासाठी सहजशक्य आणि स्वाभाविक आहे.
स्त्रीसंबंधातल्या मुखमैथुनाबाबत मत व्यक्त केल्यानंतर याच प्रकरणात, तो पुन्हा पुरुषांच्यातल्या समलिंगी संबंधांकडे वळतो.
"घरात कामाला असलेली काही तरुण मुले जी आपल्या पेहेरावाविषयी अतिशय जागरुक असतात, ती अनेकदा पुरुषांशी संबंध ठेवतात. त्यांच्यापैकी काही जण कालांतराने अशा संबंधांना कंटाळून स्त्रियांकडे वळतात. काही समलिंगी पुरुष आपल्या जोडीदाराबरोबर अधिक गहिरे संबंध प्रस्थापित करतात आणि अनेकदा एकमेकांशी विवाहही करतात*. आपल्या जोडीदाराबरोबर प्रेमाचे आणि विश्वासाचे संबंध प्रस्थापित करून ते कायमस्वरूपी आणि मैत्रीपूर्ण बंधनात अडकतात. अशा प्रकारचे संबंध दोन स्त्रियांच्यातही दिसून येतात."
*तत्कालीन समाजातही समलिंगी विवाह होत असत याचा अतिशय रोचक संदर्भ.
इतके वाचल्यावर वात्स्यायनाच्या उदारमतवादाबद्दल कौतुक वाटत वाटू लागते. तोच वात्स्यायन त्याच्या खास शैलीनुसार प्रकरणाच्या अखेरीस, हे प्रकार अनुचित असल्याने ते टाळावेत असा पुनरुल्लेख करतो! पण अशा संबंधांना तो आजार किंवा वैगुण्य असेही संबोधत नाही. सामाजिक आणि प्रादेशिक संकेतांप्रमाणे उचित-अनुचित व्यवहारांच्या सीमा पुसट होतात; त्याचबरोबर नैसर्गिक ऊर्मी घेऊन जन्माला आलेल्या व्यक्तींचे लैंगिक व्यवहारही नैसर्गिकच असतात असा स्वीकार त्याच्या शैलीतून जाणवतो. वात्स्यायनाचा हा काहीसा उदारमतवाद त्याच्या काळातल्या धर्मशास्त्र आणि अर्थशास्त्र या ग्रंथांच्या तुलनेत अधिक ठळकपणे जाणवतो. वात्स्यायनाचा उदारमतवाद जाणवण्यासाठी त्या काळातल्या इतर ग्रंथांसह कामसूत्राचाही तौलनिक अभ्यास करणे गरजेचे ठरते. 'रिडीमिंग द कामसूत्र' या आपल्या पुस्तकात वेंडी डॉनिंजर नेमके हेच करतात. विविध मुद्द्यांच्या अनुषंगाने कामशास्त्राची धर्मशास्त्राशी आणि अर्थशास्त्राशी तुलना करून, हा काही वेळा उघड तर काही वेळा छुपा उदारमतवाद त्या तपासतात. या लेखातली अनेक उदाहरणे आणि संदर्भ वेंडीच्या पुस्तकात अधिक तपशिलात आलेले आहेत.

स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहतानाही वात्स्यायन बराच समजूतदार वाटतो. लग्नानंतर स्त्रीला शरीरसंबंधांची भीती वाटू नये म्हणून तिला हळूहळू प्रेमाने वश करावे असे सांगताना, तिला कोणत्या प्रकारच्या क्रिडांमुळे अधिक सुख मिळते हे सांगताना, किंवा संभोगापूर्वी आणि संभोगानंतर आपले वर्तन कसे असावे हे सांगताना तो बराच सहृदय वाटतो. विशेषतः संभोगापूर्वीचे खाणे-पिणे, कलास्वाद, लाडिक बोलणे, संभोगानंतर एकमेकांच्या सान्निध्यात गोड गोष्टी करणे, आकाशातले ग्रह-तारे-राशी एकत्र न्याहाळणे या प्रकारच्या वर्णनांतून वात्स्यायन काहीसा रोमँटिक आणि कलासक्तही वाटतो. सुख ओरबाडायचे नसते, तर प्रयत्नपूर्वक आणि सुसंस्कृतपणे त्याचा आस्वाद घ्यायचा असतो अशी त्याची भूमिका पटण्यासारखीच वाटते. स्त्रीच्या लैंगिक सुखाबद्दलही वात्स्यायन अधिक उदारतवादाने विचार करताना दिसतो. स्त्रीलाही पुरुषाप्रमाणेच लैंगिक भावनोत्कटतेचा अनुभव मिळावा असे सुचवताना तो अशा आनंदाच्या कळसबिंदूला पोहोचलेल्या स्त्रीचा आविर्भाव कसा असतो त्याचे वर्णनही करतो आणि स्त्रीला अशा आनंदापासून वंचित ठेवले, तर ती कंटाळून दुसऱ्या पुरुषाबरोबर रत होईल अशी भीतीही व्यक्त करतो. अशा उल्लेखांमधून वात्स्यायनाच्या दृष्टीने स्त्रीला स्वातंत्र्य असल्याचे जाणवते; जे त्या काळातल्या मनू किंवा कौटिल्याच्या तुलनेत अधिक उठून दिसते. रतिसुखाचा संबंध केवळ पुनरुत्पादनाशी आहे हे खोडून काढण्यासाठी तो दाखवून देतो, की मनुष्य स्त्रिया माजावर नसतानाही लैंगिक सबंध ठेवतात; जे इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहे. त्याची ही भूमिका इतर धर्मशास्त्रांच्या तुलनेत अतिशय वेगळी आणि म्हणून लक्षणीय आहे. विवाहबाह्य संबंधांच्या मुद्द्यांतही वात्स्यायन स्त्रीच्या मानसिकतेकडे अधिक समजूतदारपणे पाहतो. कोणत्या कारणांसाठी स्त्री आपल्या पुरुषाचा विश्वासघात करायला प्रवृत्त होते आणि कोणत्या कारणांसाठी ती असे करण्याचे टाळते याचा ऊहापोह करताना तो असे दर्शवितो, की स्त्री असे निर्णय घेताना आपल्या परिस्थितीचा, भल्याबुऱ्याचा आणि परिणामांचा विचार करण्यास सक्षम असते. अर्थात वात्स्यायनाच्या दृष्टीने सर्व स्त्रियांना सारखेच अधिकार आहेत असेही नव्हे. त्याच्या दृष्टीने राजाच्या पत्नी, वेश्या, गणिका वगैरे स्त्रियांना इतर विवाहित स्त्रियांपेक्षा अधिक स्वातंत्र्य होते असे दिसते. अशाच एका रोचक प्रकरणात गणिका आपल्या नकोश्या झालेल्या प्रेमिकाला चतुराईने कसे कटवतात याविषयी तो मार्गदर्शन करतो.
"त्याला जसे वागणे आवडते, त्याच्याविरुद्ध वर्तन त्या करतात आणि त्याला जे आवडत नाही असे वागणे त्या वारंवार करतात. त्याला ज्या गोष्टींची माहिती नाही अशा गोष्टींवर त्या अधिकाधिक चर्चा करतात. त्याला ज्या गोष्टींत रस आहे अशा बाबींत त्या अतिशय अनुत्साह किंवा वैताग दाखवितात. तो बोलत असताना त्या त्याच्याकडे दुर्लक्ष्य करून आपल्या नोकरगणांवर डाफरतात आणि त्याच्या बोलण्यात व्यत्यय आणल्यावर मग दुसऱ्याच विषयावर बोलत राहतात. लोकांसमोर त्या त्याचे दोष दाखवत राहतात, त्याच्या विनोदावर हसत नाहीत आणि त्याच्या विनोदी नसलेल्या वक्तव्यांवर हसतात. त्याच्यासारखे दोष असलेल्या पुरुषांवर त्या टीका करतात आणि एकांतात निरुत्साह दाखवितात. अशा प्रकारच्या वर्तनाने तो लवकरच कंटाळतो आणि सोडून जातो."
विवाहित स्त्रीसाठी मात्र नवऱ्याला कसे सोडून द्यावे यासाठी काही मार्गदर्शन नाही. उलट आपले वर्तन त्याच्या मर्जीत राहण्यासारखेच असावे असा सल्ला आहे!
स्त्रियांच्या दृष्टीने कामसूत्रातला अजून एक रोचक उल्लेख म्हणजे संभोगातल्या भूमिकांच्या अदलाबदलीचा. वात्स्यायन म्हणतो, की कधीकधी कामभावनेच्या आवेगात स्त्री अचानक आपली स्त्रीसुलभ नम्र भूमिका विसरून पुरुषासारखी आक्रमक बनते. अशा वेळी पुरुष नमते घेतो व आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध भूमिका स्वीकारतो. स्त्री आपल्या सुखासाठी, आपल्याला हवे ते करते, त्याला थपडाही मारते. अशा प्रकारे काही काळ रत झाल्यावर स्त्री-पुरुष पुन्हा आपल्या नैसर्गिक भूमिकांत परततात. इथे वात्स्यायन अनेक पारंपरिक मिथकांना छेद देतो आणि थपडा मारणे वगैरे वर्णनांतून बीडीएसएम प्रकारचे संबंधही ननैतिक भूमिकेतून पाहतो.
मनूने विवाहाचे जे वेगवेगळे कायदेशीर प्रकार सांगितले आहेत, त्यातल्या पहिल्या चार-पाच प्रकारच्या विवाहांत स्त्रीच्या पसंतीचा विचार केला जात नाही. त्यामानाने कामसूत्रात स्त्री-पुरुष यांच्या परस्पर निवडीने केल्या गेलेल्या प्रेमविवाहाला सर्वाधिक योग्य ठरविले गेलेले आहे. मनूच्या धर्मशास्त्राच्या आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्राच्या मानाने हे फारच वेगळे आहे. स्त्रीच्या नातेवाइकांची कत्तल करून तिला तिच्या मर्जीविरुद्ध पळवून नेण्याच्या अघोरी विवाहाला वात्स्यायन पूर्णपणे अनैतिक समजतो. त्यापेक्षा स्त्रीला दारू पाजून किंवा गुंगीचे औषध देऊन मग तिच्याशी बळजबरी करून तिला लग्नाला भाग पाडण्याचा प्रकार अनुचित असला, तरी वरच्या अघोरी विवाहापेक्षा तो बरा आहे असे नमूद करतो. यांतले काही उल्लेख आपल्या आजच्या समाजाच्या आणि कायद्यांच्या दृष्टीने गुन्हे ठरत असल्याने आपल्याला धक्कादायक वाटत असले, तरी त्यामुळेच त्या काळी वात्स्यायनाने परस्परसंमतीने केलेल्या विवाहाला पहिले स्थान देणे हे त्याचा उदारमतवादाचेच लक्षण होते हे अधिक प्रकर्षाने जाणवते. त्याच्या मते वैवाहिक आयुष्याचे यश परस्परांविषयीच्या प्रेमभावनेत असल्याने, एकमेकांच्या निवडीने आणि संंमतीनेच विवाह केला जाणे महत्त्वाचे होते.
पत्नीच्या कर्तव्यांच्या प्रकरणात वैवाहिक स्त्रीला वात्स्यायन परंपरागत भूमिकेतच पाहत असला, तरी "स्त्रिया मुळातच उधळपट्टी करणाऱ्या असल्याने त्यांना लगाम घालावा" वगैरे मनूसारखी टोकाची मुक्ताफळेही त्याने उधळलेली नाहीत. गृहकृत्यदक्ष स्त्रीने घर कसे चालवावे, पाककला, बागकाम, हस्तकौशल्ये, अर्थनियोजन कसे करावे वगैरेची वर्णने आजच्या काळातल्या 'गुड हाऊसकीपिंग' प्रकारच्या मासिकांतल्यासारखीच वाटतात आणि व्यावहारिकपणे, चातुर्याने, गोडीगुलाबीने नवऱ्याच्या आणि सासरच्या व्यक्तींच्या मर्जीत राहावे वगैरे वर्णने त्या काळासाठी अपेक्षितच वाटतात. एकुलत्या पत्नीचे वर्तन कसे असावे, मुख्य पत्नीने सवतींशी कसा व्यवहार करावा वगैरे प्रकरणेही त्या काळासाठी सुसंगतच आहेत. मग प्रश्न पडतो तो असा - आजच्या आधुनिक समाजासाठी - विशेषत: आजच्या स्त्रीसाठी - या ग्रंथाची नक्की उपयुक्तता काय?
असंख्य प्रकारच्या संभोगांची वर्णने असूनही स्त्रीला आनंद मिळणे म्हणजे फक्त पुरुषाचा कार्यभाग साधण्यासाठी असलेली सोय असे म्हणणारा आणि तिला इतर कर्मठ धर्मवाद्यांच्या तुलनेत थोडी अधिक स्वातंत्र्ये देणारा तत्कालीन उदारमतवाद आजच्या स्त्रीला का महत्त्वाचा वाटावा? योन्यांची आणि लिंगांची, त्यांच्या आकारांची विस्तारपूर्वक वर्णने करताना स्त्रीच्या गुप्तांगातला तिला लैंगिक सुख मिळण्यासाठी महत्त्वाचा असलेला मदनध्वजासारखा भाग या ग्रंथात गुप्तच राहतो, हे अज्ञान होते की हेतुपुरस्सर हेही तपासावेसे वाटते. हे अज्ञान म्हणावे तर स्त्रीच्या कामसुखाबद्दलचं भान आणि ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने हा उदारमतवाद निरुपयोगी ठरतो आणि हे हेतुपुरस्सर असल्यास मुळात उदारमतवादच ढोंगी ठरतो.
किन्सी किंवा 'मास्टर्स अँड जॉन्सन' यांच्या संशोधनापूर्वी स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल मिथकेच अधिक होती आणि प्रामु़ख्याने त्यांच्याच संशोधनामुळे आधुनिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला हेच सत्य इथे पुन्हा सिद्ध होते. कारण वात्स्यायन त्याच्या काळातल्या स्त्रीच्या लैंगिकतेबद्दल अधिक जागरूक असला, तरी स्त्रीला तृप्ती मुख्यत: भेदनातूनच मिळते या मिथकाला तोही शरण जातानाच दिसतो.
इतके सारे वळसे घेऊनही आजच्या समाजासाठी कामसूत्राचे महत्त्व बरेच आहे असे वाटते.
या उपरोल्लेखित संशोधकांच्या शास्त्रीय संशोधनाआधी, प्रगत समजल्या जाणाऱ्या देशांतही लैंगिकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय संकुचित आणि अपराधी असाच होता. तिथल्या धर्मांप्रमाणे पाहता शरीरसंबंध म्हणजे पुनरुत्पादनाकरता नाईलाजाने केली जाणारी, अपराधगंड बाळगण्याची गोष्ट असेच मानले जाई. रिचर्ड बर्टनसारख्या ब्रिटीश व्यक्तीला तत्कालीन व्हिक्टोरियन समाजातल्या अपराधगंड बाळगाणाऱ्या अशा रटाळ कामव्यवहारांच्या तुलनेत हा ग्रंथ क्रांतिकारी का वाटला असेल ते समजू शकते. त्याचबरोबर 'पूर्वेकडच्या अशक्य वाटणाऱ्या सुरस कामुक कथा' असे एक्झॉटिक पुस्तक म्हणून कामसूत्राची ख्याती का पसरली असेल तेही समजू शकते.
भारतात पूर्वी हा अवघडलेपणा नसावा. आधी मोगल आणि नंतर ब्रिटीश राजवटींच्या काळात लैंगिक दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला असावा. त्यामुळेच आजच्या भारतात अशीच अवघडलेली, अपराधी वृत्ती पसरली असावी. वेंडी डॉनिजरना वाटते, की या सर्व पार्श्वभूमीवर भारतात कामसूत्राचे पुनरुज्जीवन व्हावे, अशासारख्या ग्रंथांतला उदारमतवाद आजच्या भारतीयांनी ओळखावा आणि हीदेखील आपलीच समृद्ध संस्कृती आहे हे त्यांनी स्वीकारावे. 'आम्ही म्हणतो तीच हिंदू धर्माची आवृत्ती बरोबर' असे म्हणणाऱ्या सनातनी, कर्मठ धर्ममार्तंडांच्या आणि राष्ट्रवाद्यांच्या हातून आपल्या धर्मातल्या उदारमतवादी परंपरांची सुटका करावी.
हा ग्रंथ अशा प्रकारे भाषांतरातून वाचल्यावर, त्याबद्दलचा अवघडलेपणा बाळगणाऱ्या समाजात वाढल्यावर, त्यातली गुंतागुंत आणि विरोधाभास यथाशक्ती समजून घेतल्यावर आणि इतक्या साऱ्या अवगुंठनांच्या आड दडलेला वात्स्यायन थोडा थोडा दिसू लागल्यावर, मला काय वाटते?
मला असे वाटते, की आधुनिक भारतीयांनी कामसूत्राची लाज बाळगू नये किंवा त्याचे गौरवीकरणही करू नये; पण ज्या हिंदू धर्माला आपण सर्वसमावेशक धर्म समजतो, तो अशा विविधतांनी आणि अनेकदा विसंगतींनीही भरलेला आहे याची जाणीव ठेवावी. त्यातले उदारमतवादी विचार ओळखावेत, 'जाज्वल्य धर्माभिमानाच्या' लाटेतही तथाकथित धर्ममार्तंडांना गैरसोयीचा असलेला हा उदारमतवाद जिवंत ठेवावा.
कामसूत्राचे पुनरुज्जीवन करण्यामागचे अजून एक महत्त्वाचे कारण या राजकारणाच्या पलीकडचे आहे, ते म्हणजे या ग्रंथाचे मनोरंजनमूल्य. त्यातल्या आसनांची वर्णने वाचल्यावर वाटते, आपले पूर्वज एकतर महामानव तरी होते किंवा ऑलंपिक दर्जाचे कसरतपटू तरी होते! तथाकथित वाममार्गांच्या क्रियांचे वर्णन करतानाही वात्स्यायनाने शोधलेल्या पळवाटा वाचून हसू येते, त्याच्या चतुराईचे कौतुक वाटते.
सर्वात जमेची बाजू म्हणजे भिन्नलिंगी संबंधात रस असलेल्या स्त्री-पुरुषांचे किंवा इतर वेगळ्या प्रकारच्या लैंगिक प्रेरणा असलेल्या व्यक्तींचे कामजीवन हा साजरा करण्याचा, अभ्यास करण्याचा, उपभोग घेण्याचा आणि आनंद मिळविण्याचा विषय आहे असा स्वच्छ दृष्टिकोन या पुस्तकाच्या निमित्ताने मिळतो, त्यासाठी वात्स्यायन आजोबांचे कौतुक आणि अभिनंदन!
व्याप्तिनिर्देश, तळटीपा आणि संदर्भ :
१) संस्कृतचे ज्ञान नसल्याने इंग्रजी भाषांतरांवरून आणि इंग्रजी लेखांवरून अनुमान काढून लेख लिहिलेला आहे. त्यामुळे तपशिलाबद्दल आणि मजकुराबद्दल मतांतरे असू शकतील याची कल्पना आहे. पण त्यामुळेच वात्स्यायनाच्या कामसूत्राकडे भाषांतराच्या त्रुटींच्या पलीकडे जाऊन पाहण्याची गरज अधिरेखित होते. भाषांतर वाचताना एखाद्या संकल्पनेचे इंग्रजीकरण समजले नाही अथवा पटले नाही, तर तो शब्द मूळ संस्कृतात कसा वापरला आहे ते पाहिल्याने शंका दूर झाली असे अनेकदा अनुभवास आले. त्यावरून मराठीवरील संस्कृतचा प्रभावही उघड झाला आणि संस्कृतचे इंग्रजीपेक्षा प्रादेशिक भाषांतले अनुवाद भारतीयांसाठी अधिक मौल्यवान आहेत हेही जाणवले. मोक्ष, मुक्ती, गृहस्थाश्रम, पूर्वजांचे पुण्य अशा संकल्पना, वेश्या-गणिका यांसारख्या शब्दांतला सूक्ष्म फरक, 'सोड ना आता' वगैरे वाक्यांतला छुप्या संमतीचा अर्थ वगैरे गोष्टी भारतीयांना प्रादेशिक भाषेतूनच अधिक स्वच्छपणे समजतात. त्यामुळे संस्कृत-इंग्रजी- पुन्हा संस्कृत आणि नंतर शेवटी मराठी असा वेडावाकडा घास घेण्याऐवजी संस्कृत ते मराठी असा थेट प्रवास सोपा झाला असता असे फार प्रकर्षाने जाणवले.
२) वेंडी डॉनिजर हे शब्दांतले असे सूक्ष्म फरक तपासतात, भाषांतरांवरची इंग्रजी प्रभावाची पुटे दूर करतात आणि सोप्या पण नेमक्या भाषेत त्याबद्दल लिहितात. त्यामुळे त्यांच्या इंग्रजीतल्या लिखाणातूनही बरेच काही मिळते. प्रसंगी प्रस्थापित मतांशी फारकत घेतही त्या आपल्या विवेकबुद्धीच्या आणि व्यासंगाच्या कसोट्यांवर प्राचीन ग्रंथांकडे पाहतात. असे असताना त्यांच्यासारख्या अभ्यासकांच्या पुस्तकांवर भारतात बंदी आणले जाते हे फारच लाजिरवाणे आहे. त्याचे खापर समस्त भारतीयांवर न फोडता, हिंदू धर्म आपल्या कह्यात ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या सनातनी धर्ममार्तंडांवर डॉनिजर नेम धरतात; पण संस्कृतचे किंवा इंग्रजीचे ज्ञान नसणाऱ्या भारतीयांच्या लक्ष्यात ही बाब आणून देण्यासाठी अशा प्रकारचे स्वतंत्र लेखन प्रादेशिक भाषांतून होणे अधिक गरजेचे आहे.
३) संदर्भ:
सर रिचर्ड बर्टन यांचे कामसूत्राचे संस्कृत भाषांतर
आलॉं दानिएलू यांचे कामसूत्राचे आधुनिक भाषांतर
वेंडी डॉनिजर यांचे 'रिडीमिंग द कामसूत्र' हे निबंधपुस्तक
ज्योती पुरी यांचा 'कन्सर्निंग कामसूत्र - चेलेंजिंग नेरेटिव्हज ऑफ हिस्टरी अँड सेक्शुअलिटी' हा लेख
***
विशेषांक प्रकार
योन्यांची आणि लिंगांची,
योन्यांची आणि लिंगांची, त्यांच्या आकारांची विस्तारपूर्वक वर्णने करताना स्त्रीच्या गुप्तांगातला तिला लैंगिक सुख मिळण्यासाठी महत्त्वाचा असलेला मदनध्वजासारखा भाग या ग्रंथात गुप्तच राहतो, हे अज्ञान होते की हेतुपुरस्सर हेही तपासावेसे वाटते. हे अज्ञान म्हणावे तर स्त्रीच्या कामसुखाबद्दलचं भान आणि ज्ञान वाढविण्याच्या दृष्टीने हा उदारमतवाद निरुपयोगी ठरतो आणि हे हेतुपुरस्सर असल्यास मुळात उदारमतवादच ढोंगी ठरतो.
मासल्यादाखल हा श्लोक पहा. हा बहुधा कामसूत्रातला नसावा, पण तरीही...मुळात या विषयावर आपल्याकडे किमान ३०-४० ग्रंथकारांची नावे सापडतात. असो. श्लोक असा:
निवसति भगमध्ये नाडिका लिंगतुल्या
मदनगमनदोला द्व्यंगुलक्षोभिता सा
सृजति मदजलौघं सा च कामातपत्रम्
द्वयमिह युवतीनामिन्द्रियं दर्शयन्ति ||
अर्थात- "भगात म्ह. योनीत एक लिंगासारखी नाडिका असते. मदनाचा जणू झोपाळाच अशी असलेली ती दोन बोटांनी चाळवायची असते. (असे केल्यावर) तिच्यातून मदरूपी जलाचा ओघ स्रवतो. ही नाडिका आणि कामातपत्र म्ह. लेबिया ही युवतींची दोन (महत्त्वाची) इंद्रिये आहेत."
हा श्लोक बहुधा सुवर्णनाभ नामक ग्रंथकाराचा असावा. मला हा श्लोक आहिताग्नी राजवाडे यांच्या नासदीयसूक्तभाष्य खंड २ मध्ये सापडला.
रोचक
श्लोक रोचक आहे खरा, नासदीयसूक्तभाष्य वरून नेमका संदर्भ देता येईल का? तुम्हीच म्हटल्याप्रमाणे या कामशास्त्र या विषयावर प्राचीन भारतात भरपूर लेखन झालेले आहे त्याचे काही संदर्भ याच विशेषांकातल्या 'कामशिल्पे' लेखातही आलेले आहेत पण तरी त्याच्या कालखंडांची क्रमवारी लावणे आणि त्यावरून त्यावेळच्या प्रस्थापित ज्ञानाबद्दल आणि भूमिकांबद्दल ठाम मते व्यक्त करणे अभ्यासकांसाठीही आव्हानात्मक आहे. सुवर्णनाभ हा वात्स्यायनाचा समकालीन असल्याने असा श्लोक त्याच्या लेखनात सापडला असल्यास ते रोचक आहे पण नेमका संदर्भ हवा.
माझ्या लेखाचा व्याप्तीनिर्देश मी दिलेलाच आहे.
wonderful... 'सोड ना आता'
wonderful...
'सोड ना आता' वगैरे वाक्यांतला छुप्या संमतीचा अर्थ वगैरे गोष्टी भारतीयांना प्रादेशिक भाषेतूनच अधिक स्वच्छपणे समजतात....superb....
हिंदू धर्म आपल्या कह्यात ठेवण्यासाठी धडपडणार्या सनातनी धर्ममार्तंडांवर डॉनिजर नेम धरतात...this is a large subject...'war' is raging outside on this and authors like Doniger, Dalrymple, Sheldon Pollock should be read keeping their politics in mind
लेख आवडला.
लेख आवडला.
_________
आत्ता नीट वाचला खूपच सुंदर सर्वांगाने विचार करुन लिहीलेला अभ्यासपूर्ण लेख आहे. पण रुचि थोडी वर्णने टाकायची होतीस जेअसे तू उल्लेख केलेला आहे की परमोच्च बिंदूवरती असतेवेळी स्त्रीचे हावभाव, सवतींशी तिची आदर्श वागणूक - या सारखी काही वर्णने फार आवडली असती.
पदराआडचा
कशासाठीही शीर्षक सुचत नाही ही माझी नेहमीचीच अडचण आहे आणि हे शीर्षकही मेघनाने सुचवलेलं आहे पण ते मला समर्पक वाटलं. पूर्वग्रहांच्या, प्रस्थापित मतांच्या आणि भाषांतरच्या अडचणींच्या पदराआडचा खरा वात्स्यायन आणि त्याचा दृष्टीकोन शोधण्याविषयीचा हा लेख असल्याने ते बरोबर वाटलं. शिवाय प्रत्यक्ष लेखात काही 'पॉर्न' नसल्याने 'पदराआडचा' असं म्हटल्यामुळे जे द्वर्थी चावटपणा येतो त्याने ती पॉर्नची कमी थोडी भरून निघते हा अनपेक्षित बोनस!
Temporal
लेख अतिशय आवडला.
'अब न वो मैं हूँ, न वो तू है, न वो माज़ी है फ़राज़' हे बदलत्या काळाचे संदर्भ माणसांतल्या नात्यांप्रमाणेच; एका अर्थाने, मानवी संबंधांचंच प्रतिबिंब असणार्या लेखक-वाचक-पुस्तक संबंधांनाही लागू पडत असावेत. ते निरखून पाहून, इतक्या नेमकेपणे मांडणं मात्र सोपं नाही. त्या दृष्टीने, हा लेख महत्त्वाचा वाटतो.
अवांतरः
१. Temporal या शब्दाच्या अर्थाच्या, ज्या भिन्न छटा आहेत (काळाशी संबंधित, ऐहिक आणि अ-धार्मिक/सेक्युलर); त्या ही चर्चा वाचताना आठवत होत्या.
Orientalism
वेण्डी डॉनिजर, शेल्ड्न पोलॉक इत्यादि पाश्चात्य विद्वान - त्यांच्या खोल अभ्यासाबद्दल आणि विद्वत्तेबद्दल काहीच वाद नाही - हिंदु, हिंदु संस्कृति अशा विषयांबद्दल जे लिहितात त्याला Orientalism चा वास असतो असे भारतीय मुशीमध्ये वाढलेल्या पुष्कळ अभ्यासकांचे मत आहे हे येथे नोंदवावेसे वाटते. राजीव मलहोत्रा ह्यांचे The Battle for Sanskrit हे पुस्तक हा विचार आक्रमकतेने मांडते. (Orientalism हा शब्द एडवर्ड सैद ह्यांच्या त्याच नावाच्या पुस्तकावरून वापरात आला.)
एकुणातच पाश्चात्य विश्वामध्ये oriental आणि erotic ह्यांच्यामध्ये काही मूलभूत संबंध आहे असे मानण्याची पद्धत आहे. वात्स्यायन, खजुराहो, कोणार्क अशा विषयांमधला त्यांचा उत्साह पुष्कळसा ह्यातून निर्माण झाला आहे काय अशी शंका मला पुष्कळदा येते. खजुराहोची छायाचित्रे काढण्यात पाश्चात्य टूरिस्टांना वाटणारा उत्साह हा ह्याचेच द्योतक असावा.
हाच प्रकार सर्व पौर्वात्य संस्कृतींबद्दल आढळतो. मी काही वर्षांपूर्वी इस्तनबूलला गेलो होतो तेथील अनुभव लिहितो. तेथील 'टोपकापी' आणि 'दोल्माबाहचे' हे ऑटोमन सुलतानांचे दोन राजवाडे ही मोठी प्रवासी आकर्षणे आहेत आणि भरमसाठ तिकिटे लावून तुर्की सरकार त्यातून भरपूर पैसाहि कमावते. पळवून आणलेल्या किंवा बाजारात विकत घेतलेल्या सिर्कासिअन, हंगेरियन, पोलिश, रशियन, युक्रेनियन इत्यादि सुंदर तरुणी सुलतानाची इच्छा होईल तेव्हाच्या उपभोगासाठी ऑटोमन सुलतानांच्या जनानखान्यात आयुष्यभरासाठी आणून ठेवल्या जात. त्यांची एकमेकींमधील स्पर्धा आणि कटकारस्थाने, एखादीवर सुलतानाची कृपादृष्टि पडली आणि त्यातून तिला मुलगा झाला तर तिच्या अंतर्गत स्थानांमध्ये होणारा मोठा बदल, पळवून आणलेल्या आणि शस्त्रक्रियेने खोजा करण्यात आलेल्या खोजांचे जनानखान्यातील स्थान, संशय आलेल्या सुंदरीचे रातोरात पोत्यात बांधून राजवाडयाबाहेरच्या मार्मारा समुद्रामध्ये टाकले जाणे अशा बद्दलच्या कादंबर्यांनी विक्टोरियन लायब्रर्यांची फडताळे भरलेली असत.
ह्या दोन्ही राजवाडयांमध्ये जनानखान्याचे भाग आहेत. तेथे विशेष असे काही नाही, खोल्यांसारख्या खोल्या आहेत. पण त्या पाहण्याची सर्व गोर्या टूरिस्टांना फार इच्छा असते. त्यासाठी भरमसाठ आकाराचे खास तिकीट घेऊन टूरिस्ट आत जातात आणि काहीच विशेष 'गंमत' पाहायला न मिळाल्यामुळे निराश होऊन बाहेर येतात!
श्री कोल्हटकर व बॅटमॅन यांचे प्रतिसाद वाचल्यावर
वरील संपुर्ण लेख पुन्हा एकदा हा अँगल डोक्यात ठेउन वाचुन पाहीला. मात्र मला तरी या लेखात व या लेखात वेंन्डी यांचा जो काही संदर्भ येतो त्यात "ओरीएंटलीझम" चा वास आला नाही. अर्थात वेन्डी यांचे मुळ पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे अधिक सांगता येत नाही. मात्र रुची यांच्या लेखातुन तर जो "तटस्थतेचा" सुगंध दरवळतोय तो वर घाटपांडे म्हणतात तसा असुया जनकच आहे. त्या व वेन्डी "भान" राखुन विश्लेषण करताहेत वात्स्यायना च्या कामसुत्राने "भारावुन" वाहत गेल्या नाहीत हे मात्र खर.
प्रतिसादाबद्दल आभार
वेन्डीवर ओरिएन्टलिजमचा आक्षेप घेताना खुद्द वेंडीने या पुस्तकात रिचर्ड बर्टनच्या अनुवादाच्या ओघाने त्याच्यासारख्या काही अभारतीय अनुवादकांच्या ओरिएन्टलिजम वर सडकून टीका केली आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. वेन्डी स्वतः असं करत नाहीत असं माझं स्पष्ट मत या पुस्तकावरून झालेलं आहे. वेन्डीच्या पुस्तकांची मुखपृष्ठे, त्यावरचे वाद-विवाद आणि त्यांचे भारतीय नसणे यामुळे अनेकदा त्यांची पुस्तके वाचण्याआधी बरेच पूर्वग्रह तयार होत असावेत (जे काही अंशी माझ्याकडेही होते) पण या पुस्तकाच्या जवळजवळ सर्व प्रकरणांतून वेन्डींचे राजकारण अलिप्त आहे आणि त्यांच्यावरचे हे आरोप मला व्यक्तीश: बिनबुडाचे वाटलेले आहेत. त्या अनेकदा प्रस्थापितांपेक्षा निराळ्या भूमिका जरूर घेतात आणि अनेकदा संदर्भांमध्ये दडलेले अर्थ स्पष्ट करताना थोडी कल्पनाशक्तीही चालवतात खरी पण मी लेखात म्हटल्याप्रमाणेच हे करताना त्या आपला व्यासंग आणि विवेकबुद्धी हीच हत्यारे वापरतात. हे पुस्तक तुम्ही जरूर वाचावे अशी शिफारस करेन कारण त्याबद्दल काय वाटते ते तुमच्यासारख्या संस्कृतच्या अभ्यासकांनी उदाहरणांसह लिहिल्यास इतरांच्या अर्थनिष्पत्तीत फरक पडू शकतात.
लेख अतिशय आवडला. बरीच
लेख अतिशय आवडला. बरीच लोकोत्तर व्यक्तिमत्त्वं वा संकल्पना आपल्याकरता कागदी-सपाट होऊन उरलेल्या असतात. वात्स्यायन त्यांपैकी एक. वात्स्यायनाने कामसूत्र लिहिले-प्राचीन भारत कित्त्ती कित्त्त्ती थोर-'आपल्याकडे' सग़ळ्या गोष्टींची शास्त्रं होती...छाप एखाद्या समजुतीचा धनी होण्यापलीकडे बिचार्याला काही व्यक्तिमत्त्व म्हणून उरत नाही. पण रुचीसारखं कुणी इतक्या संयमानं, चिकाटीनं, भाषांतरांच्या-आंतरराष्ट्रीय राजकारणांच्या-सांस्कृतिक चश्म्यांच्या-तत्कालीन बंधनांच्या अवगुंठनांच्या आड दडलेला वात्स्यायन उलगडून पाहते; तेव्हा तो एकाएकी जिवंत - त्रिमित होतो. त्याच्या चलाख्या, मिश्किल्या, असहायता आणि चाकोरीबाह्य विचारशक्यता दिसायला लागतात.
त्याकरता आभार. तितकेच आभार वात्स्यायनावर स्त्रीनं - आधुनिक-विचारी-जाणत्या स्त्रीनं - लिहावं ही कल्पना सुचवणार्याच्या चाणाक्षपणाचेही.
<या गद्य प्रकरणांत अधार्मिक -
या गद्य प्रकरणांत अधार्मिक - आणि अनेकदा धर्मविरोधी - बाबींची चर्चा झाल्यावर शेवटच्या श्लोकात धर्माला अनुसरून घेतलेली भूमिका असा विरोधाभास साधलेला दिसतो.>
ह्या विधानाचे पुढील उदाहरण मनोरंजक आहे. इसवी सनाच्या तिसर्या-चौथ्या शतकामध्ये लैंगिक संबंधांच्या काय चालीरीति वात्स्यायनाच्या कानी आल्या होत्या हेहि त्यातून आपल्याला कळते.
'पारदारिक' (परस्त्रियांविषयी) अशा शीर्षकाच्या 'कामसूत्रा'च्या पाचव्या अधिकरणामध्ये 'ईश्वरकामितम्' (राजपुरुषांची क्रीडिते) ह्या प्रकरणामध्ये राजा, महामात्र अशा अधिकाराच्या स्थानांवरील व्यक्तींनी परस्त्रियांना वश करण्यासाठी अनेक युक्त्या-प्रयुक्त्या सांगितल्या आहेत. ते सांगून झाल्यावर वात्स्यायन पुढील माहिती देतो:
प्रत्ता जनपदकन्या दशमेऽहनि किंचिदौपायनिकमुपगृह्य प्रविशन्त्यन्तःपुरमुपभुक्ता एव विसृज्यन्त इत्यान्ध्राणाम् ॥३२|| महामात्रेष्वराणामन्तःपुराणि निशि सेवाऽर्थं राजानमुपगच्छन्ति वात्सगुल्मकानाम् ॥३३॥ रूपवतीर्जनपदयोषितः प्रीत्यपदेशेन मासं मासार्धं वा वासयन्त्यन्तःपुरिका वैदर्भाणाम् ॥३४॥ दर्शनीयाः स्वभार्याः प्रीतिदायामेव महामात्रराजभ्यो ददत्यपरान्तकानाम् ॥३५॥ राजक्रीडाऽर्थं नगरस्त्रियो जनपदस्त्रियश्च सङ्घ एकशश्च राजकुलं प्रविशन्ति सौराष्ट्रकाणामिति ॥३६॥
(विवाहित ग्रामीण स्त्रिया विवाहानंतर दहाव्या दिवशी भेट देण्यायोग्य असे काही घेऊन राजाच्या अन्तःपुरामध्ये येतात आणि त्यांचा भोग घेऊन झाला म्हणजे त्यांना सोडले जाते अशी आन्ध्रांची पद्धति आहे.* ३२. मन्त्र्यांच्या अधिकाराखालील सेवकांच्या स्त्रिया सेवेसाठी रात्री राजाकडे जातात अशी वत्सगुल्म प्रदेशाची (सध्याचे वाशीम) रीत आहे. ३३. रूपवती ग्रामीण स्त्रिया एक वा अर्धा महिना राजाच्या अन्तःपुरामध्ये वास करतात अशी विदर्भाची रीत आहे. ३४. स्वतःच्या सुंदर भार्या भेट म्हणून महामात्र आणि राजा ह्यांना द्यायची पाठवायची अपरान्ताची चाल आहे. ३५. राजक्रीडेसाठी नगरयुवती एकेकट्या अथवा गटाने राजगृहाकडे जातात अशी सौराष्ट्रामध्ये चाल आहे.)
नैतिकदृष्ट्या अयोग्य अशा वागणुकीचे हे वर्णन झाल्यावर वात्स्यायन आपल्या बाजूने सारवसारवी करतो ती अशी:
एते चान्ये च बहवः प्रयोगाः पारदारिकाः ।
देशे देशे प्रवर्तन्ते राजभिः संप्रवर्तिताः ॥३७॥
न त्वेवैतान्प्रयुञ्जीत राजा लोकहिते रतः ।
निगृहीतारिषड्वर्गस्तथा विजयते महीम् ॥३८॥
(राजांनी चालू केलेले हे आणि असे बरेचसे अन्य पारदारिक प्रयोग देशोदेशी आहेत. ३८. लोकहिताकडे ध्यान देणार्या राजाने ते आचरू नयेत. षड्रिपूंचे दमन करणारा राजा पृथ्वी जिंकतो. ३९.)
(* मध्ययुगातील युरोपामधील Droit du seigneur येथे आठवतो.)
वात्सायन किंवा कामसुत्र या
वात्सायन किंवा कामसुत्र या विषयावर लेख असेल हे अनेकांनी गेस केले असेल. पण तो या स्त्री भूमिकेतून विश्लेषण करत येईल अशी अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल.
या अंकातील एकापेक्षा एक असे लेख म्हणजे पर्वणीच आहे!
मस्त लेख.. आभार