माळीणबाईंचे प्रेमगीत
माळीणबाईंचे प्रेमगीत
- रुची
माळीबुवांच्या मुठीत,
नाना तऱ्हेच्या बिया.
माळीबुवांच्या मिशीत,
पाईनच्या सुया.
माळीबुवांच्या नखांत,
बागेचे सत्त्व.
माळीबुवांच्या ह्रदयात,
'सेंद्रिय' तत्त्व.
माळीबुवांच्या मुखी,
सूर्यनामाचा जप.
बगलेत खुरपे,
हरितक्रांतीचे तप!
माळीबुवांच्या नजरेस,
खुनशी धार.
कडुनिंबाचा स्प्रे,
किडे-मुंग्या ठार.
दक्षिणेकडून वारा,
माळीबुवा आश्वस्त.
माळीबुवांच्या नसांत,
बागेचेच रक्त.
माळीबुवांच्या श्वासांत,
फुललेला चाफा.
माळीबुवांच्या मिठीत
बहरलेला वाफा!
(शीर्षक श्रेयअव्हेरः पिवळा डांबिस)
विशेषांक प्रकार
कविता आवडली. मर्ढेकरांच्या
कविता आवडली. मर्ढेकरांच्या कवितेची आठवण आली. -
"बोंड कपाशीचे फुटे,
उले वेचतांना ऊर;
आज होईल का गोड
माझ्या हाताची भाकर!
भरे भुइमूग-दाणा,
उपटतां स्तन हाले;
आज येतील का मोड
माझ्या वालांना चांगले!
वांगी झाली काळी-निळी,
काटा बोचे काढताना;
आज होतील का खुशी
माणसं गं जेवताना!"
मर्ढेकरांची ही कविता अत्यंत शृंगारिक भावनांनी भरलेली आहे. ती इतक्या तरल रूपकांमधून मांडलेली आहे की त्यातल्या या भावना अगदी कळत न कळत पृष्ठभागावर येतात. या पोस्टमधल्या कवितेतूनही अशाच भावना जाणवल्या. एरवी कवितेतून काहीसं गमतीदार माळीबुवांचं चित्र हलक्याफुलक्या शब्दांत उभं राहातं. फक्त माळीबुवांच्या टोचणाऱ्या मिशा आणि मिठीतला तृप्त वाफा यातून शृंगाराच्या हिंट्स आलेल्या आहेत. मर्ढेकरांच्या कवितेत एक हुरहूर आहे, तर वरच्या कवितेत एक तृप्ती आहे.
छानच आहे...
फक्त माळीबुवांच्या टोचणाऱ्या मिशा आणि मिठीतला तृप्त वाफा यातून शृंगाराच्या हिंट्स आलेल्या आहेत. मर्ढेकरांच्या कवितेत एक हुरहूर आहे, तर वरच्या कवितेत एक तृप्ती आहे.
कविता छानच आहे, पण राघांशी किंचित असहमती व्यक्त करतो. एकतर मिशांमध्ये पाईनच्या सुया आहेत. Pining म्हणजे झुरणे, तेव्हा भाव तृप्तीचा नसून कशाचीतरी बोच लागल्याचा आहे. पण ते एक असो. वाफा पुल्लिंगी असल्यामुळे हा शृंगार समलिंगी आहे ही गोष्ट विशेष आवडली.
+
मर्ढेकरांची ही कविता अत्यंत शृंगारिक भावनांनी भरलेली आहे. ती इतक्या तरल रूपकांमधून मांडलेली आहे की त्यातल्या या भावना अगदी कळत न कळत पृष्ठभागावर येतात.
हो ना, अगदी! बोंड काय, स्तन काय नि बोचे काय.
बादवे, त्या वालांना 'मोड येणे' नि ती वांगी 'काळी निळी होणे' यांत ते वाल नि ती वांगी ही नेमकी कशाची रूपके/प्रतीके असावीत बरे?
(अतिअवांतर: वांगी बोले तो ती इतालियन काय हो? लांबुडकी? की मग भरताची? मोठी नि जाडजूड?)
आज होतील का खुशी
माणसं गं जेवताना!
येथे मुद्रणदोष जाणवतो. मात्र तो (१) सूचकता आणि (२) अश्लीलतानिवारण कायद्यास बगल असे दोन पक्षी एकाच दगडात मारण्याच्या सद्हेतूने जाणूनबुजून इंट्रोड्यूस करण्यात आला असावा, किंवा कसे, हे कळत नाही. असो.
शिशिरऋतूच्या
शिशिरऋतूच्या पुनरागमनी
जुनेच किस्से पुन्हा निघाले
जुनीच खुरपी बाग जुनेरी
नवा अर्थ सापडवणे आले.
जाता जाता : 'बगलेत खुरपे'मुळे 'बगलमें छुर्री' किंवा त्याहीपेक्षा 'बगलमें नथुराम' ह्या अधिक प्रसिद्ध वाक्याची आठवण झाली. शेवटची दोन कडवी सोडली तर हिंस्र वातावरण छान जमले आहे.
आणखीन जाता जाता : विक्षिप्तिका आवडली होती.
मागे येऊन : 'शिशिरऋतु' हा शब्द 'महर्षि' प्रमाणे डोक्यावर रफार देऊन कसा टंकावा?
(मागे येऊन) पण का?
इन्स्क्रिप्टमध्ये लिहिण्याबाबत राजेश घासकडवींनी दाखवलेलेच आहे.
परंतु "शिशिरर्तु (किंवा शिशिरर्तू)" हे प्रमाणलेखन ठीकच आहे ना? (तुम्ही लिहिलेले "शिशिरऋतु" सुद्धा एक नवीन जोड-शब्द म्हणून चालून जावा.) पण "शिशिर्ऋतु" हे सध्याचे प्रमाण मानले तर चूक आहेच, नवीन समासाचे लेखन म्हटले तरी ठीक नाही. (नाहीतर "वसंतृतु" असे लिहिले असते. "शरद्" हे संस्कृतात हलन्त आहे, म्हणून तत्सम "शरदृतु" मराठीत येऊ शक्ते, पण नवा समास म्हणून मराठीत "शरदऋतु" असे बरे.)
"नैर्ऋत्य"च्या प्रमाणलेखनात ऋकारावर रफार देण्याची वेळ येते, ते "गमभन" पद्धतीत जमणे कठिण. या एका शब्दावेगळे उदाहरण मला आठवत नाही.
शृंगारिक
(गैरसमज टाळण्याकरिता खुलासा) कविता मिष्किल आहे, आवडली.
---
शृंगारिक आहे, खरी. पण पॉर्न नाही.
जाता जाता :
> हातात कडुनिंबाचा स्प्रे,
ही ओळ वाचताना मला अडखळायला होते आहे.
हीच धांदल
> माळीबुवांच्या नसांत खेळते,
ओळीबाबतही होते, पण तिथे आशयाकरिता अशी शब्दरचना मुद्दामून केली असेल, असे पटवून घेता येते. "हातात कडुनिंबाचा स्प्रे" मध्ये मला अडखळायला लावून काही सौंदर्य किंवा आशयघनता साधते, हे अजून पटलेले नाही.
थँक्यू
तुमची दोन्ही निरिक्षणे अगदी मान्य आहेत आणि दाताखाली येणारे खडे दाखवल्याबद्दल थँक्यू!:-)
'हातात कडुनिंबाचा स्प्रे' ऐवजी 'कडुनिंबाचा स्प्रे' आणि 'माळीबुवांच्या नसांत खेळते' ऐवजी 'माळीबुवांच्या नसांत' असे बदल केले तर वाचताना अडखळायला होणार नाही, लिहिताना आणि इथे टंकताना इतका विचार केला नव्हता पण आता लक्षात आल्यावर फार खटकतंय.
संपादक लोकहो, हे बदल करता येतील का प्लीज?
पूर्वीही आवडली होतीच. पण या
पूर्वीही आवडली होतीच. पण या अंकात मला ती अतिशय चपखलपणे शोभून दिसणारी वाटते. धनंजयने वर नोंदल्याप्रमाणे ती शृंगारिकच आहे, पॉर्नोग्राफिक नव्हे. शृंगारही कसा, हलकेच सुचवून वाचकावर अलगद सोडून दिलेला. व्हरांड्यात बसून कवयित्री माळीबुवांना प्रेमभराने न्याहाळते आणि माळीबुवांची नजर वळली की झटकन न नजर करडी-कोरी करत हातातल्या पुस्तकाकडे वळते आहे, असा भास चमकून जातो. तो कळला की कविता एकदम सघन होते, माझ्यासाठी झाली. पॉर्नोग्राफी असा निसटता सौंदर्यानुभव कधीही देत नाही. त्यात कल्पनेला जागा नसते, हेच मुळी तिचं मुख्य लक्षण. हा विरोधाभास अधोरेखित करणारी कविता मला या अंकात हवीच हवीच हवीच होती!
मस्त आहे!
मस्त आहे!