Skip to main content

आधुनिक कविता अवघड का असते?

कविता

आधुनिक कविता अवघड का असते?

लेखक - मिलिन्द

वेदना उमटते अचानक
माझ्या गाडीत पेट्रोल भरणाऱ्या तुर्काच्या चेहऱ्यावर.
विचारल्यावर कळते : इमिग्रेशनवाले पकडतील या भीतीने तो
हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही.
पांढऱ्या स्वच्छ टोयोटा चालवणाऱ्या चिनी
मुलामुलींस जर विचारले की बाबांनो या
गाड्या, हे रस्ते ग्रीक दंतकथांवर आधारित आहेत
हे तुम्हाला माहिती आहे का? तर ते म्हणतात
नाही नाही, गाडीचे हूड उघडले की सर्व कळते.
एकावेळी निदान चार काम-सोबती असतात
डेटिंगचे अॅप वापरणाऱ्या मुलामुलींचे.
ते काळजी घेतातच असे नाही सेक्स सेफ व्हावा म्हणून.
काळजी सर्व त्यांच्या आयांना असते.
चकचकीत टेबलाशी बसून हॅम्बर्गर खाणाऱ्या
भारतीयांना जर म्हटले की हात रांडेच्यो, तुम्हाला
एव्हढेच हवे होते होय? तर ते सांगतात की हो,
मी इकडे आलो तेव्हा आजी खूप रडली.
तयार कापून मिळणाऱ्या ब्रेडकडेच अखेर
सर्वांची धाव असते असे तुम्ही म्हणू शकत नाही.
अनेक आणि खडतर असतात मार्ग पावापर्यंत पोचायचे
आधुनिक कवितेच्या अर्थासारखे.

विशेषांक प्रकार

आदूबाळ Fri, 28/10/2016 - 07:55

जबरदस्त!

बेकायदा स्थलांतरितांची वेदना तुमच्या कवितेत नेहेमी उमटते.

.शुचि Mon, 31/10/2016 - 13:13

आधुनिक राहणीमानाचीही किंमत चुकवावी लागते असा आशय मला गवसला. जशी आधुनिक कविता मला काही समजेल तर त्याहूनही भिन्न अर्थाने अन्य कोणास समजेल. तद्वत आधुनिक रहाणीकडे जाण्याचे रस्ते हे भिन्न आणि काहींच्याकरता अवघड तर काहींच्याकरता शॉर्टकटही असू शकतात.

मिलिन्द Mon, 31/10/2016 - 22:49

आधुनिक राहणीमानाचीही किंमत चुकवावी लागते असा आशय: Yep!
तसेच नव्या काळातले जीवन (नको तितके ? ) व्यामिश्र झाले आहे, आणि त्याचे अनेक पदर अनेकदा अनाकलनीय असू शकतात !

.शुचि Mon, 31/10/2016 - 22:53

In reply to by मिलिन्द

तसेच नव्या काळातले जीवन (नको तितके ? ) व्यामिश्र झाले आहे,

याबद्दल मात्र असहमत. आपण पूर्वीचा काळ जो जगलोय तो एकतर लहानपणीचा "साधा-सरळ" किंवा मग पूर्वजांच्या तोंडून ऐकलेल्या स्मरणरंजनातून. पण तोही काळ त्यांना(पूर्वजांना) तितकाच व्यामिश्र वाटलेला असणार.
.

त्याचे अनेक पदर अनेकदा अनाकलनीय असू शकतात !

हे मस्तच. खरच आधुनिक कविता कळायला कधीकधी अवघड असतात. अनाकलनिय वाटतात.

साती Tue, 01/11/2016 - 20:00

पांढऱ्या स्वच्छ टोयोटा चालवणाऱ्या चिनी
मुलामुलींस जर विचारले की बाबांनो या
गाड्या, हे रस्ते ग्रीक दंतकथांवर आधारित आहेत
हे तुम्हाला माहिती आहे का? तर ते म्हणतात
नाही नाही, गाडीचे हूड उघडले की सर्व कळते

>>
म्हणजे?

मिलिन्द Tue, 01/11/2016 - 21:43

तुम्हाला बाहेरून कोणतीही संस्कृती ही "त्या" दिवसापुरती दिसत असते. तिचा प्रचंड इतिहास माहित असणारे बाहेरचे लोक थोडेच असतात. पण यामुळे त्या संस्कृतीबद्दल काहीतरी 'झटपट, अर्धवट (आणि बव्हंशी चुकीची, वरवरची) अनुमाने काढून लोक मोकळे होतात. ("अमेरिकेत माणुसकी नाही" या छापाची.)

गब्बर सिंग Wed, 02/11/2016 - 01:57

In reply to by मिलिन्द

अनुमाने काढून लोक मोकळे होतात. ("अमेरिकेत माणुसकी नाही" या छापाची.)

शॉल्लेट हां.

अमेरिकेत आपुलकी नाही, अमेरिकेतली माणसं भोगवादाच्या मागे लागलेली आहेत, पैश्याच्या मागे लागलेत अमेरिकेतले लोक, पैश्यापेक्षा माणूस श्रेष्ठ (म्हंजे भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ टाईप), we need to stop this worship of money, आपल्याला कशाप्रकारचा समाज निर्माण करायचा आहे याचा विचार करणं गरजेचं आहे - ही व अशी अनेक वाक्ये आहेत.

धनंजय Wed, 02/11/2016 - 00:12

कविता विचार प्रवर्तक आहे.

>>टोयोटा चालवणाऱ्या चिनी मुलामुलींस
हा प्रकार क्वचित दिसत असावा. चिनी आगंतुक सहसा जपानी कंपनीच्या गाड्या घेत नाहीत, असे एका चिनी मित्राने मला सांगितले. (नानजिंगचा बलात्कार, वगैरे, स्मरून...)
अर्थात काही अपवाद असणारच, परंतु कवितेतल्या क्षणचित्रात बहुसंख्य/टिपिकल रेखाटावे.