दोन आज्या आणि मी

संकल्पनाविषयक

दोन आज्या आणि मी

लेखक - गौरी दाभोळकर

आम्हां तिघा भावंडामध्ये कित्येकदा एक वाद चाललेला असतो की कुणामध्ये 'ए-फॅक्टर' जास्त आणि कुणात 'के-फॅक्टर' जास्त. आमच्या भाषेत, ए-फॅक्टर म्हणजे आरसांकडचे, म्हणजे माझ्या आईच्या माहेरचे गुण (आणि दोष) आणि के-फॅक्टर म्हणजे बाबांकडचे, कामतांकडचे गुण (आणि दोष)! हा वाद सहजासहजी मिटत नाही कारण त्यातून आपली सगळीच अंडीपिल्ली निघायला लागतात अन् मूग गिळून गप्प बसलेलं श्रेयस्कर ठरतं. गंमत म्हणजे माझी एक आजी घाटावरची आणि दुसरी कोकणातली. त्या दोघी तशा समकालीन असल्या तरी त्यांची आयुष्यं अगदी वेगळी होती. आपल्या जनुकांचं सोप्पं गणित मांडलं तर असं कळतं की आपली एक-चतुर्थांश जनुकं (genes) आईच्या आईकडून आणि एक-चतुर्थांश जनुकं बाबांच्या आईकडून येतात. म्हणजे मी ५०% माझ्या दोन्हीकडच्या आज्यांवर गेली असली पाहिजे. स्वतःचा शोध घेताना दोन्ही आज्यांच्या आठवणी सतत येत असतात. बाल्कनीतली छोटेखानी शेती करताना एक आजी आठवते, तर 'कॉफी डे'मध्ये फेसाळलेली 'लाटे' घेताना दुसरी आजी आठवते.

सुदैवाने ह्या दोन्ही आज्या माझ्या तिशीपर्यंत हयात होत्या. जरी मी त्यांना शेवटच्या काही वर्षांत भेटू शकले नव्हते तरी त्या वेगवेगळ्या माध्यमांतून आणि नातेवाईकांच्या रूपांत भेटत राहिल्या. मला वाटतं त्या दोघी एकमेकींना आयुष्यात एकदाच भेटल्या असाव्यात; ते म्हणजे आई-बाबांच्या लग्नात! त्याकाळी आजच्यासारखे फोनसुद्धा नव्हते. आणि दोघी आमच्याकडे एकदम आल्याचे कधी आठवत नाही. कुमुदिनी आरस आजी म्हणजे आईची आई. तिच्याविषयी बोलताना तिला आम्ही 'जळगावची आजी' असंच (ज.आजी- जन्म १९१९- मृत्यू २००४) म्हणत असू. जळगावचे आजोबा वयाच्या नव्वदीपर्यंत होते. ते १९९९ ला गेल्यानंतर ती जळगावला एकटीच राहत असे. दोघांनी भारत पालथा घातला पण मुंबईला विशेष येत नसत. एकदा मी तिला विचारलं, “तुझी ४ मुलं मुंबईला आहेत तर तू तिथे का येत नाहीस?” यावर तिचं पटकन उत्तर आलं - “ज्याच्या माथी पाप त्याला मुंबई आपोआप!” तेव्हा मला मुंबई खूप आवडायची अन् मी तिच्याशी भांडायचे की मुंबई कशी मस्त असते. पण आता दर मुंबईभेटीत, विमानातून बाहेर पडताना गरम, उबट वास आला की आपण 'पाप'लोकात चाललोय हे मनापासून पटतं!

१९३५ साली लग्न झाल्यावर ती नागपूरहून तिच्या जळगावी सासरी आली. तिच्या वडलांचं कपड्याचं दुकान होतं व छान सुबत्ता होती. नंतर जेव्हा विदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकण्यात आला तेव्हा ते दुकान बंद पडलं व विपन्नावस्था आली. घरी सासू-सासरे, दीर, विधवा नणंद आणि तिचे दोन मुलगे असा मोठा परिवार होता. १९३७ ते १९४५ ह्या आठ वर्षांच्या कालावधीत तिला दोन मुलगे आणि चार मुली झाल्या. पहिला व शेवटचा मुलगा आणि मध्ये ओळीने चार मुली! माझी आई त्यातली चवथी मुलगी. तिच्या जन्मानंतर आजी जीवनाला कंटाळलीच होती. एक दिवशी वैतागून घराबाहेर बागेत जाऊन बसली होती. आजोबांनी समजूत काढून परत आणली.

जळगाव रेल्वे स्टेशनसमोर नव्या पेठेत पहिल्या मजल्यावरच्या भाड्याच्या घरात आजी-आजोबा राहात. गेल्या-गेल्या मोठा व्हरांडा, मग एक खोली, त्यानंतर देवघर, स्वयंपाकघर आणि मग न्हाणीघर-संडास. सगळ्या खोल्या एका मागोमाग एक - आगगाडीच्या डब्यांप्रमाणे. सहा-सात तास आगगाडीने मुंबईहून जळगावला गेल्यावर परत आपण गाडीतच आहोत की काय असे वाटे. समोर रेल्वेचे रूळ दिसायचे आणि कर्कश शिट्या, धडधड ऐकू यायची… कुठली पॅसेंजर वेळेवर आणि कुठली मेल लेट हे खाटेवर बसल्या जागी आजी-आजोबांना समजायचं! आजी मुंबईला विशेष येत नसे आणि आम्हीही जळगावला फार कमी वेळा गेलो असू. काही वर्षं एक मामा नव्या मुंबईला असताना तिथे ती आल्याचे आठवते. पण आजोबांची आणि क्वचित तिने लिहिलेली पत्रं यांतून ती बरेच काही संस्कार करत गेली. माझ्या आठवणीत ती शिक्षण खात्यात (स्कूल इन्स्पेक्शन विभाग) नोकरी करत होती. चापूनचोपून नेसलेलं नऊवारी पातळ, काळ्या, लांबसडक केसांचा अंबाडा, अफगाण-स्नो आणि पावडरीचा मेकप करून ती कामाला जायची. उन्हातून जाताना आठवणीने छत्रीपण घ्यायची. जेवणाच्या सुट्टीत घरी यायची आणि तासाभरात पुन्हा निघायची. आजीचं शाईचं पेन, मेकपच्या वस्तू, वासाचा साबण, तेव्हा नवीनच निघालेली लालचुटूक, पारदर्शक क्लोज-अप टूथपेस्ट या सगळ्यांबद्दल कुतूहल वाटायचं. तिच्याकडे साड्या मोजक्याच होत्या आणि ती त्या व्यवस्थित, जपून वापरायची. नीटनेटकं राहायला तिला आवडत असे.

सरकारी खात्यात एक नेक कर्मचारी म्हणून ज.आजीचा दबदबा होता. बदली होऊन ती काही काळ धुळ्याला एकटी आपलं बिऱ्हाड थाटून राहिली होती. तिचे दागिने घरच्या परिस्थितीमुळे विकावे लागले. ते तिने पुन्हा स्वकष्टाने मिळवले. ती दोन्ही मुलांना बडोद्याला हॉस्टेल खर्चासाठी दरमहा पैसे पाठवी. वयाच्या साठीत असताना ती योगासनं शिकली आणि आजूबाजूच्या स्त्रियांना मोफत शिकवत असे. नऊवारी पातळामध्ये पायाला पट्टी लावून शीर्षासन करण्याइतपत तिची प्रगती झाली होती! तिच्या एका जुन्या डायरीमध्ये सुंदर अक्षरात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भजने लिहिलेली होती. काही भजनं अगदी आधुनिक असायची. उदा. "अहो माझ्या दत्तात्रेयाची, देवाची बँक तुम्ही ऐका"! ह्या भजनात बँक व्यवहारातील शब्द वापरून रूपक केलेलं होतं. तिचं मृत्यूवरचं एक भजन होतं.

कुणी नाही कुणाचा सखा,
बाप आणि काका,
रडत बसतील की,
यमरायाचे दूत तुला बांधून नेतील की

ह्या गाण्यात एकेक नातेवाईक मर्तिकाला यायचे आणि लगेच आपल्या कामाला निघून जायचे असं वर्णन होतं. तेव्हा मी मुंबईला येऊन त्या गाण्याचे विडंबन करीत असे. ती हे गाणं, हातातली छोटी झांज वाजवून, छान, तल्लीन होऊन म्हणायची. मी तेव्हा तिसरी-चौथीत असेन. पण त्या नकळत्या वयात ऐकलेलं ते गाणं आजही कुणी गेलं की मला आठवतं.

सारस्वत असूनही तिने मांसाहार कधी केला नाही. तिचा आहार अगदी मोजका असायचा. माझे आजोबा जेवणखाण बनवण्यात पटाईतसराईत होते. त्यांना ती एक आवडच होती. म्हणूनच की काय नंतरच्या काळात आजी फक्त चपाती/भाकरी, भात करत असे आणि भाजी-आमटी आजोबा करत! स्वयंपाकखोलीत वेळ घालवण्याऐवजी परमार्थाकडे तिचे लक्ष होतं. परिस्थिती नसतानासुद्धा कुळधर्म, सणवार आणि ब्राह्मण-भोजनं नियमित होत असत. तिचं सोशल नेटवर्क उच्चवर्णीयांत असे. तिची स्वत:ची एक परिभाषा असायची. "आज काय खून-मारामाऱ्या केल्या?" म्हणजे “नॉन-व्हेज मेनू काय होता?”, "वाटाघाटी झाल्या का?" म्हणजे "कांदा-खोबरं वाटून केलेला नॉन-व्हेज स्वयंपाक झाला का?" फोनला ती म्हणायची "गाढवाचे कान" कारण ते लांब असतात अन कुठंही पोचतात. एस.टी.डी.च्या वाढत्या बिलाकडे पाहत त्रोटक बोलल्यामुळे गैरसमज होत. कामासाठी लांब राहाणारे मुलगे आणि सासरी गेलेल्या मुली तिला कधीमधी फोन करत पण भेटीसाठी जाणं त्यांना जमत नसे. फोनमुळे सोय होत असे पण त्यांच्या भेटीसाठी ती आसुसलेली असायची. धाकटा मामा वाशीला होता आणि मोठ्या मामाचं कुटुंब होतं दिल्लीला. वाशीचे नामकरण तिने केलं 'वॉशिंग्टन' आणि दिल्लीवाले 'राजधानी'त राहात. कौटुंबिक राजकारण आणि 'एम्प्टी नेस्ट सिंड्रोम'च्या उद्वेगातून ही परिभाषा तयार झाली होती की काय?

आजी-आजोबांनी आसेतुहिमाचल भारत दर्शन करून सगळी देवस्थानं पालथी घातलेली होती. त्यातील काही सहलींचा खर्च आजीच्या कमाईमुळेच शक्य झाला असावा. अतिशय काटकसरीने ती संसार चालवी. कित्येक दशकं, ती दररोज पहाटे चार वाजता उठून सात वेळा "ओम" म्हणत असे. त्यानंतर प्राणायाम, जप, भजनं झाल्यावरच जायफळ, साखर व भरपूर दूध घातलेली कॉफी घेई. तिला राजकारणात रस होता. समाजातल्या असमानतेबद्दल चीड होती. स्वतःसाठी बनवलेल्या दुधाळ कॉफीला ती 'भ्रष्टाचारी कॉफी' म्हणे. कुठेतरी, गरिबीतही आपण 'श्रीमंती' कॉफी पितोय याची जाण तिला होती. १९७२ साली आजी-आजोबा दिल्लीला गेले होते. तेव्हा त्यांनी तीन मूर्ती भवनबाहेर तासभर रांगेत उभे राहून इंदिराजींचं दर्शन घेतलं होतं. नंतर १९८४ साली इंदिराजींची हत्या झाली तेव्हा ती आपल्या घरातलं कुणीतरी गेल्यासारखी हळहळली होती.

तिच्या पत्रांत कोडी असायची. एक कोडं असं होतं… इंग्रजीतील पाचही स्वर फक्त एकदाच येतील असा शब्द कुठला? मी मराठी माध्यमातून शिकत असल्याने हे कोडं चटकन सुटलं नव्हतं . मी उत्तर पाठवेपर्यंत तिने "गौरी हरली" असे ठरवून अशा शब्दांची यादीच* पाठवली होती. आता आंतरजालामुळे हे सारं सोपं वाटतं. पण तेव्हा तिची कोडी म्हणजे एक संकटच वाटायचं. कारण कोडं सुटलं नाही की ती शाळेतल्या शिक्षणाची टर खेचायची. तरीही वार्षिक परीक्षा किंवा एखाद्या आंतरशालेय स्पर्धेतील यशानंतर आजी-आजोबा पत्रं आणि मनी-ऑर्डर पाठवत. माझ्या लग्नाला ते येऊ शकले नाहीत पण तीन वर्षांनी "फॉरीन-रिटर्न्ड" अशी मी नवऱ्याबरोबर त्यांना भेटायला गेले तेव्हा तिने नातजावयाचीसुद्धा तोंडी परीक्षा घेतली. तेव्हा मलाच भीती वाटली होती. सुदैवाने तो आजीच्या कसोटीत पास झाला!

बाबांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई कामत! सोयीसाठी तिला आपण अलिबागची आजी (अ.आजी- जन्म १९१२- मृत्यू १९९७) असे म्हणू. एकोणिसाव्या वर्षी आजीचं लग्न तिच्याच आत्याने दत्तक घेतलेल्या श्रीनिवास कामतांशी झालं. आत्याला मूल-बाळ नव्हतं. तिची आंबे-नारळांची वाडी होती. आजी इतकी भाग्यवान की तिला त्या आत्याने आपली वारस करून घेतली. आजोबा मुंबईत शिक्षक होते; ते अलिबागला महिना-पंधरा दिवसांनी फेरी मारत. आत्या आणि तिच्या यजमानांच्या मृत्यूनंतर जवळजवळ चार दशकं आजीने वाडी संभाळली. कामत चाळीतील दहा-बारा भाडेकरू, स्वत:ची नऊ मुलं (तीन मुलगे, सहा मुली) आणि वाडीत कामाला येणारे-जाणारे ह्या सर्वांसाठी आजी म्हणजे वाडीची अनभिषिक्त सम्राज्ञी होती.

भाडेकरूंकडून येणाऱ्या भाड्याचा हिशोब, वाडीतले आंबे-नारळ-फणस-जाम, झापांपासून बनवलेल्या वस्तू विकण्याचे काम ती चोख करत असे. यांतील बरेचसे व्यवहार वस्तुविनिमय पद्धतीने असत. कधी कधी एखाद्या मजुराला अॅडव्हान्स दिलेला असेल तर ती त्याच्याकडून गोडीगुलाबीत काम करून घ्यायची. किंवा त्याच्याकडून तांदूळ किंवा दूध घ्यायची. एकदा एक मजूर दिवसभर राबत होता. संध्याकाळी तिने फक्त दहा रुपये दिले. तो दमलेला, घामेजलेला, किडकिडीत माणूस नमस्कार करून निघून गेला. मला आश्चर्य वाटलं की त्याने अजून पैसे का नाही मागितले! तेव्हा आजी म्हणाली, "त्याच्या अंगावर बरेच पैसे आहेत." अशी मदत तिने बऱ्याच लोकांना केली असणार. कदाचित अशा लोकांनी पैसे बुडवलेसुद्धा असतील. पण तिने कधी त्याचा त्रागा केल्याचं आठवत नाही. ती शाळा जेमतेम मराठी चौथीपर्यंत शिकली असेल पण तिच्याकडे व्यवहारज्ञान होतं. अडगळीच्या अंधाऱ्या खोलीत, लोखंडाच्या, जुन्या पेटाऱ्यात तिची मालमत्ता असायची. कुडाच्या लाल भिंतीवर शिसपेन्सिलीने बारीक अक्षरांत लिहिलेला हिशेब असायचा. तो फक्त तिलाच वाचता यायचा. अधूनमधून ती पोस्टात पैसे साठवायला कुणाजवळ तरी द्यायची. आणि आलेली सर्टीफिकटं जपून ट्रंकेत ठेवत असे. तिची नेमकी आवकजावक तिच्या मुलांनासुद्धा माहीत नसेल.

माझ्या आठवणीत तिच्या अंगावर एक स्वच्छ धुतलेलं जुनेरंच असे आणि हातात काचेची एखादी लाल बांगडी असे. मी लहान असतांनाच तिचं सौभाग्यलेणं हरपलं. पण तिने विधवापणाचा बाऊ कधी केला नाही. कुंकू नसलेला गोरापान चेहरा, तरतरीत नाक, काळ्या-पांढऱ्या केसांचा बारीकसा घट्ट अंबाडा अशी ती सतत वाडीत कामे करताना दिसायची. तिने पायात चपला घातलेल्या मला आठवत नाहीत. कधीतरी एखाद्या लग्नसमारंभाला ठेवणीतलं लुगडं ट्रंकेतून बाहेर येई.

मी पाच वर्षांची असताना माझ्या बहिणीचा जन्म अलिबागेत झाला. त्या वेळी मला काही महिन्यांपुरतं घराजवळच्या एका बालवाडीत घातलं. आई इस्पितळात असताना आजी म्हणायची की, ती मला शाळेत पोचवेल. पण तिची जुनी साडी बघून मला लाज वाटायची. मी तिला म्हणायचे, "आजी, ट्रंकेतलं चांगलं पातळ नेस." तर ती हसायची आणि म्हणायची "अगं, पाच मिनिटांसाठी कुठे पातळ बदलू?" मीच तिला माझ्याबरोबर शाळेत येण्यास मनाई केली होती. मग फाटकावर उभी राहून ती माझ्याकडे बघत राही. वळणावर पोचल्यावर मागे वळून मी तिला आत जायची खूण करे. आता मला मीच किती दुष्ट होते, असं वाटतं. तिने मला सांगितलं होतं की "धीट व्हायचं; कुण्णाला घाबरायचं नाही!" रात्री भुताखेतांच्या गप्पा सांगून झाल्यावर म्हणायची की "राम राम" किंवा "भीमरुपी महारुद्रा" म्हटलं की भुतं घाबरतात. जरा मोठी झाल्यावर रात्री कुणाला परसाकडे जावं लागलं तर तिच्याऐवजी मीच कंदील घेऊन वाडीतून घेऊन जायचे. आजीमुळेच हे धारिष्ट्य अंगात आलं. अजूनही कुठे आकाशदर्शन किंवा ट्रेकिंगला डोंगरात गेल्यावर रात्री बाहेर पडताना भीती वाटत नाही. एकदा मी तिला विचारलं, "आजी, एवढ्या गोष्टी सांगतेस खरी पण काय गं, जर खरंच एखादी हडळ नाहीतर खवीस रात्रीचा आलाच तर काय करशील?" त्यावर तिचं झटकन उत्तर आलं , "त्यांत काय? मी त्याला पाटावर बसायला सांगेन आणि स्टोवरचा वाशेरा चहा आणि पोहे देईन!".

वाशेरा चहा म्हणजे पुन:पुन्हा उकळलेला रॉकेलचा वास मारणारा चहा. चहाच्या पितळी पातेलीत एक परमनंट, वाशेरा चहा सतत उकळत असे. भुकेला आजीने घरी केलेले जाड पोहे त्यांत घालून खायला मजा यायची. आजी दर आठ-पंधरा दिवसांनी मोठ्या बादलीत भातकण भिजवून पोहे कांडायला पाठवत असे. ती चव अजूनही जिभेवर आहे. आजही ती चव कुठे मिळेल का ह्या शोधात मी असते.

नवापैकी आठ मुलं मुंबईला आणि एक मुलगी लंडनला असूनही अ. आजीसुद्धा मुंबईला फार येत नसे. १९७७ साली पावसाळ्यात मला भाऊ झाला आणि नंतर त्याच सुमाराला एक आत्या कर्करोगाने ग्रस्त होऊन गेली, तेव्हा काही काळ ती बोरीवलीला होती. आत्याची, म्हणजे तिच्या मुलीची तिने सेवा केली. पण आत्या दोन-तीन महिन्यांत गेली. नंतर नव्वदच्या दशकात अर्धांगवायूने ग्रासल्यावर एका आत्याकडे काही वर्षं मुंबईला राहिली होती. पण अलिबाग हीच तिची कर्मभूमी होती. दर वर्षी मे महिन्यात आम्ही बारा-तेरा भावंडं अलिबागला जायचो. मोठे काका-काकी, नाहीतर माझे आई-बाबा किंवा एखादी आत्या मध्येच येऊन जायची. महिनाभर आम्हां सर्व नातवंडांना आजी एकटी व्यवस्थित सांभाळायची.

तिचं निसर्गाशी एक निराळंच नातं होतं. मे महिन्याच्या शेवटी येणारे किडे आणि आकाशाचा रंग पाहून ती पावसाचा अंदाज सांगायची, तो कित्येकदा बरोबर असायचा! तिच्या बोलण्यात वाडीतल्या झाडा-माडांना नावं दिलेली असायची. मी झाडाखाली पडलेला आंबा घेऊन तिच्याकडे गेले तर तो बघून कुठल्या झाडाचा ते ती बरोबर सांगे.

वर्षभर ती त्या मोठ्या घरात एकटीच वावरायची. नाही म्हणायला तिचा एक ब्रह्मचारी दीर तिथे असायचा, एक-दोन मानसपुत्र जेवायला असायचे. पण सत्ता मात्र तिचीच होती. पहाटे साडेचारला उठून ती वाडीत झाडलोट, पाणी देण्याची कामं करून यायची व मग स्टोवर चहा करायची. स्वयंपाकाची तिला विशेष हौस नव्हती. तिचं जेवण म्हणजे अळूची भाजी, वालाचं बिरडं, भात, भाताची पेज, बटाट्याच्या काचऱ्या असंच काहीतरी असे. मांसाहारी जेवण माझ्या काकी आणि आत्या आल्या तरच होई. आजी मासे, मटण खात नसे. पण चुलीवरच्या तिच्या साध्या जेवणालापण चव होती. ती जोपर्यंत कामं करत होती तोवर तिने गॅस घेतला नाही. चूल आणि स्टोवरच काम चालायचं. नगरपालिकेचा नळसुद्धा शेवटी केव्हातरी घेतला. तोपर्यंत दारातल्या विहिरीवरच कामं चालत. वाडीत पडलेल्या आंब्यांचा ती गुळांबा करायची आणि चिनी मातीच्या भल्यामोठ्या बरणीत अंदाजपंचे, पसाभर मसाले घालून लोणचं करायची. ते लोणचं कधी खराब झाल्याचं मला आठवत नाही. रेसिपीसाठी ओगलेबाईंचे 'रुचिरा' पाहण्याची तिला जरूर नसायची. वेगवेगळे पदार्थ करण्याची व खाण्याची चंगळ तिला जमत नसे. तिला आमच्याबरोबर समुद्रावर यायला वेळ नसायचा पण भरती-ओहोटीचं गणित ती छान समजावून द्यायची. तिला पावकी, निमकी आणि पाऊणकी पाठ असायची. त्यामुळे समुद्रातल्या कुलाबा किल्ल्यात कधी जायचं व परत कधी यायचं ते ती घरबसल्या अचूक सांगायची. तिच्या ह्या गणिताचा मला खगोलशास्त्रात खूप उपयोग झाला. संध्याकाळी सातच्या आत आम्ही परत यावं असा तिचा कटाक्ष असायचा. नातवंडांनी अभ्यासात नाव कमवलं की तिला आनंद होत असणार पण एखाद्याच्या मार्कांचं तिने भरमसाठ कौतुक केलेलं आठवत नाही.

जळगावची आजी सतत देवधर्म, नामस्मरण यांत दंग असायची. तिच्याकडे नेहमी देवकार्यं होत असत. सोवळं-ओवळं पाळलं जायचं. आम्ही चार-पाच मावसबहिणी एकदा आठवडाभर राहिलो होतो. त्या नंतर बाहेर पडतानाच घरभर गोमूत्र शिंपडलं गेलं. कारण इतक्या जणींत एक-दोघींना तिथे असताना पाळी आलेली होती. तिला मुली, नातींपेक्षा मुलगे आणि नातवांचे प्रेम जास्त होते. हे तिच्या वागण्यातून उघडपणे दिसे. कदाचित एका पाठोपाठच्या चार मुली आणि त्यांच्या लग्नांसाठी करावे लागलेले कष्ट, किंवा आपल्या समाजातील रूढींमुळे अशी धारणा झाली असेल.

याउलट अलिबागची आजी दुपारी वामकुक्षी झाल्यावर जेमतेम अर्धा तास शिवलीलामृत किंवा साईबाबांची पोथी वाचायची आणि जराशी जपमाळ ओढायची. तिला वाडीतल्या दगडांत-मातीतसुद्धा देव दिसत असावा. ज. आजीने निर्भीडपणे बोलणं आणि लिहिण्याची दीक्षा दिली, उत्तमोत्तम पुस्तकं पाठवली; तर अ.आजीकडे पाहून शेणामातीत काम करण्यात कमीपणा नसतो हे उमजत गेलं. कुणी लेक-जावई मुंबईहून येणार असा निरोप आला की ती स्वत: सारं घर शेणाने सारवून काढे. तिच्या बोटांची गोल-गोल नक्षी जमिनीवर पाहत राहावीशी वाटे. माहेरपणाला आलेल्या तिच्या मुली प्रेमाने तिच्या मांडीवर डोकं ठेवून गप्पा करत. नातींपैकी कुणाला पाळी असली तर त्याचा फारसा बोभाटा होत नसे. तिच्या मुली-नाती बाजूला बसलेल्या कधी पाहिल्या नाहीत. दूधवाली, भाजीवाली थेट घरात येत. गावात राहिलेली व फारसं पुस्तकी शिक्षण न घेतलेली ही आजी इतका आधुनिक विचार कशी करायची हे एक कोडं आहे. वाडीवर कामाला येणाऱ्या माणसांच्या बरोबरीने ती राबत असे. त्या आमराईत भरपूर आंबे असत आणि माडांना शहाळी लगडलेली असत. दोन्हीकडचे आजोबा शिक्षक होते आणि दोन्ही घरांत रोख पैसे कमीच असायचे. ऐन तारुण्यात आपले दागिने विकल्याचं दु:ख शेवटपर्यंत ज. आजीला होतं. शेवटीशेवटी भ्रमात ती पासबुक घेऊन हिशेब करत बसायची. शेवटी शेवटी तिच्या आजारपणात आई सोबतीला गेली असताना ज. आजी तिच्याशीच भांडायची.

अ. आजीला अर्धांगवायूचा झटका आल्यावर ती आठ-नऊ वर्षं अंथरूणावरच होती. त्याच वेळी वाडीचं काम बघायला कुणाला वेळ नसल्याने बऱ्याच विचारानंतर वाडी विकण्याचा निर्णय घेतला गेला. त्या मातीत उभा जन्म काढलेली आजी पिचत गेली. तिच्या नजरेसमोर झाडं तोडली गेली तेव्हा तिच्या मनात काय घालमेल झाली असेल याची कल्पना करणं कठीण आहे! ती फारशी बोलत सुद्धा नसे. ९६ साली मी तिला भेटले तेव्हा ती ओळख देत नव्हती. कदाचित अंथरुणावर पडलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी भेटायला येऊ नये असं वाटत असावं. त्याच्या नंतरच्या वर्षी ती गेली. दोघी जणी ८५ वर्षे जगल्या. त्यांच्या ऐन उमेदीच्या काळात नकळत माझ्यावर आपली छाप टाकणाऱ्या ह्या आज्या शेवटी फारशा भेटल्या नाहीत कारण तेव्हा मी माझ्या उद्योग-संसारात अडकले होते. मला आई-बाबांकडून त्यांची खबरबात कळायची. आपण म्हातारपणासाठी अन्‌ मुलांसाठी किती तरी योजना आखत असतो. ह्या आज्यांच्या जीवनांवरून असं वाटतं की त्यांनी जन्मभर केलेले कष्ट, त्याग, पुण्यकर्मं, जप-तप, आयुष्यातील तळतळाट-ताप आणि अंतःकालातील व्याधी व मनःस्थिती याचा फार काही संबंध नसतो. इंग्रजी शिकलेली आजी पितृसत्ताक पद्धतीला शरण गेली होती. तिच्या लेखी मुलाला महत्त्व होतं आणि मुली परक्याचं धन होत्या. इतकं की मुंबईला आली की जेवणाच्या ताटाखाली एक रुपया ठेवे. मुलीकडे जेवायचं नाही अशी भावना! अन्‌ कमी शिकलेली आजी एक स्वतंत्र मातृसत्ताक होऊन घर-वाडी, हिशेब सांभाळत होती. तिने मुलगा-मुलगी असा भेदभाव कधी केला नाही.

आईवडलांच्या संपत्तीची वाटणी मुलांच्यात सारखी करावी लागते पण अनुवांशिकतेचे गुण-दोष मात्र यादृच्छिक रीतीने (randomly) वाटले जातात. 'घाटी' आणि 'कोकणी' आज्यांमुळे मला महाराष्ट्राच्या दोन्ही बाजूंची चांगली ओळख झाली. एकीचं शेंगदाण्याचं कूट तर दुसरीचं ओलं खोबरं! एक "ज्वारीची भाकरी आणि भरीत", तर दुसरी "बिरड्याची आमटी आणि भात" करून वाढणारी! मला स्वयंपाकाची फारशी आवड नाही पण मी जरूर तेवढा करते. हे बहुतेक ह्या दोन्ही आज्यांकडून आलेलं असावं. लहानखुरी चण आणि साफसफाईची कामं करण्याची सवय अ.आजीकडून आली आहे. तर वेळेची शिस्त, सामाजिक असमानतेबद्दल चीड आणि अंगाचा लवचिकपणा ज.आजीकडून! दोघींपासून दूर, विभक्त कुटुंबात वाढूनसुद्धा ह्या दोघींचे संस्कार कळत-नकळत होत राहिले. माझ्या वागण्यात ह्या दोघींचं बेमालूम मिश्रण जाणवतं.

ए-फॅक्टर आणि के-फॅक्टरचं गणित काही केल्या सुटत नाही. आता तर मला जाणवतं की माझ्यात डी-फॅक्टर (दाभोळकर-फॅक्टर) जास्त होत चालला आहे! तसं पाह्यलं तर ह्या आज्यांमध्ये तरी ए-फॅक्टर/के-फॅक्टर मुळात कुठे होता? ही तर त्यांची सासरची आडनावं होती! त्या दोघींनी फक्त आपल्यातील 'स्वार्थी जनुकं' पुढे पाठवली. आता मीही तेच करतेय. शेवटी असं म्हणावंसं वाटतं की आपलं शरीर हे जनुकांची सरमिसळ, वाढ करून पुढच्या पिढीत गुण-दोष संक्रमित करणारं असं फक्त एक यंत्र आहे. आणि त्या यंत्रावर आपला काहीही ताबा नसतो!

* इंग्रजीतील पाचही स्वर फक्त एकदाच येतील असा शब्द कुठला?
उत्तर: favourite, education

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

खूप गोड स्मरणरंजन आहे. तुम्ही भाग्यवान आहात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय उत्तम ! आवडले !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुन्दर लेख. जुन्या कळातल्या माणसांच्या गोष्टी बरोबरच सोप्या भाषेत इतिहास सांगणारा लेख . महत्वाचे म्हणजे लेख stereotypes मोडून काढतो. आजी म्हणजे झी मराठीच्या मालिकांमधलीच असलीच पाहिजे -सपक , सुबक आणि मोदक, असा आग्रह सध्या सगळीकडे दिसतो . हा लेख वाचल्यावर छान वाटले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0