Skip to main content

कुलुंगी कुत्र्याला मारहाण होते त्याची गोष्ट

कथा

कुलुंगी कुत्र्याला मारहाण होते त्याची गोष्ट

- आदूबाळ

एक

एस्टीतून उतरलो तेव्हाच तो कुलुंगी कुत्रा समोर आला. दुपार भळभळली होती, सदरा घामाने इथेतिथे चिकटला होता. पोटात भुकेने तुटायला लागलं होतं. बापूंकडे जेवायची सोय होणार की नाही कुणालठोक. पाठ कडकडावीत आळस दिला. लेंग्याच्या खिशात हात घालून लोला चाचपला. कुलुंगी कुत्रा पायात घोटाळायला लागला होता. मी वाकून त्याचा लोला पाहिला. तरणं जवान होतं फोकलीचं.

ये म्हणालो. आला.

मी पुढे तो मागे, पाय घासत. माझे दोन, त्याचे चार. रस्त्याचे दोन काटकोन, मग समोरच बापूंचं दुकान - हरिनाथ स्टोअर्स. बापू बसले होते ती बाजू तसबिरींनी बरबटलेली. बाकी फळ्या शेल्फं तशी उदासच. बापू स्वतः छातीशी पाय घेऊन पेपराआड.

मी पेपरावर टकटक केल्यावर त्यांनी पेपर बाजूला काढला.

"पापलशेट!" ते ओरडले. "आज काय अचानक म्हेरबानी?"
पापल म्हटलेलं मला आवडत नाही. बोबडेपणी मी चाळीतल्या बाबलला पापल म्हणायचो. तर चुत्त्यांनी माझंच नाव पापल केलं. पण आता न आवडून काय उप्योग? दुसरं नावपण उरलं नाही.

"तुमच्या डोळ्यांत चिपड आहे बापू", नशीब 'पापलशेट' तरी म्हणाला. नाहीतर नाकातली घाणपण दाखवली असती. च्यायला दाजी असेल तर शाट्यावर.
बापू हसला, आणि शांतपणे डोळ्यांतलं चिपड काढलं. मग त्याला कुलुंगी कुत्रा दिसला असावा.

"वा! साक्षात दत्तगुरुच!" त्याने हात जोडले.
मग दुकानात बसवणं, थंड देणं, पंखा वगैरे.
"त्याला पण द्या काहीतरी." मी फर्मान सोडलं. बापूने कुरकुरे पाकीट फोडून कुत्र्यासमोर टाकलं. कुत्रे कुरकुरे खातात का? खायला लागला.

"हिला सांगतो तुम्ही आल्याचं." बापूने घरी फोन लावला. घर म्हणजे मागेच. घरी ताई - म्हणजे या बाप्याची बायको, माझ्या वहिनीची सख्खी मोठी बहीण. "हॅलो, अगं पापल्शेट आलेत..."
"अगंबाईं ते खुळं कशाला आलंय?" बापूच्या कानाला होता तरी फोनमधून स्पष्टच ऐकू आलं. ताईंचा आवाज मोठा. सगळंच मोठं.
"हो हो, आत्ताच आलेत." चोरटेपणी माझ्याकडे बघत बापू म्हणाला. मी काही लक्ष दिलं नाही. कुरकुरे संपत आले होते. "जेवायलाच वाढ आता. येतो अर्ध्या तासात शटर ओढून."
बसलो तसाच. जेवायला अर्धा तास म्हणजे खूपच झाला.
बापू चुळबुळत बसला होता.
"कस्काय चल्लंय मग बाकी?" मी उगाचच विचारलं.
मला खरं तर वहिनीचं काम करायचं होतं. पण वहिनीने ताई असतानाच बोलायचं असं चारचारदा बजावून पाठवलं होतं.

बापू आणखी चुळबुळला. याच्या दुकानाचं काय आहे ते सगळं दिसत होतंच. आमच्या माहीमचे ठेलेही याहून जास्त भरलेले असतात. “ताईला पैसेवाल्याच्या घरात दिलीन आणि मला डोकंवाल्याच्या.”असं वहिनी नेहेमी म्हणत असते. “पैसेवाल्यास डोकं नाही आणि डोकंवाल्याकडे पैसे नाहीत.”
"पापलशेट, या दुकानात काय मजा नाय. गोळ्यान् बिस्किटं." शेवटी बापू म्हणाला. "गारवेसोबत सिमेंटची एजन्सी घ्यावी म्हंटोय. खर्च आहे..."
मी उठून कुलुंगी कुत्र्याला पाहून आलो. कुरकुरे संपवून व्हकनीचा उगाच इकडेतिकडे करत होता. याच्याही पोटाची सोय करायला हवी.
वळून पाहिलं तर बापू लोल्यात लाथ बसल्यागत उभारला होता. "काय शकुन वगैरे..." तो अस्पष्ट बोलला. मागून जेवण तयार असल्याची हाळी आली.
पदर सावरत ताई समोर आल्या. साडी थोडी वर खोचलेली. मी रीतसर पाया वगैरे पडलो. हळूच साडी उचलून आत बघावंसं वाटलं. चाळिशीतही बाई गच आहे.

"काय म्हणती माझी बहीण?" ताईंनी किंचित हसत विचारलं. मी नुसतीच मान हलवली. ताईंसमोर एकदम बोलायला सुचत नाही.
"बसा..." ताई म्हणाल्या. त्यांना माहीत आहे.
मी वरपायला लागलो. बाहेर कुलुंगी कुत्रा शेपटी हलवत असणार.
"वहिनींनी तुमचा शालू मागितलाय. डाळिंबी. रसिकाला कॉलेजात नेसायचाय." मी एका दमात सांगून टाकलं. याच कामासाठी वहिनीनी हिरवा गांधी हातात दिलावता. एरवी सालीकडून फद्या सुटत नाही.

मी जेवत बसलो. ताई गरम होऊन फडफडत बसल्या. बापू नेहेमीसारखा आकसून जेवत बसला. घराचा मालक असूनपण तसा तो कुलुंगीच.

पानात भरपूर टाकलं.

दोन

पुढे दुकान, मध्ये आडवं घर, मागे चौकोनी फरसबंद पटांगण. मधोमध एक पार. दुसर्‍या टोकाशी मोरी. मी पान घेऊन तिथपर्यंत गेलो. एका प्लॅस्टिक पिशवीत सगळं अन्न काढलं. कुलुंगी कुत्र्याला होईल.
ऊन तकाकत होतंच. परसदारातून बाहेर पडलो. गल्लीच्या टोकाशी कुलुंगी कुत्रा होता. मी पिशवी उघडून कडेला ठेवली. खा बाबा.
आत आलो आणि घरभिंतीला टेकून अंगणातच बसलो. कुलुंगी कुत्रा दिसेलसा.
आत ताई तडतडत होती, त्यात पडायचं मला कामच नव्हतं.

"...नलीचा हावरटपणा कद्धी जायचा नाही..."

कुलुंगी कुत्र्याने पिशवी हुंगली.

"...परवा काय अत्तरदाणी पाहिजे, घरी अण्णांचे मालक येणारेत. काल काय, समई पाहिजे, रसिकाच्या शाळेत नाच आहे. घ्याला पाहिजे दोहो हातांनी..."

कुलुंगी कुत्र्याने चटणी चिवडली.

"...माझ्या पैठण्या गेल्या अशाच चोरापोरी. तुमचं बेल्जमचं घड्याळ गेलं."

कुलुंगी कुत्र्याचं नाक कढीत लडबडलं.

ताई मग बरंच बडबडत बसल्या. जुनंपानं. खरंखोटं. भलंबुरं. मुख्य म्हणजे बुरं. वहिनीच्या हावरटपणाच्या गोष्टी. वहिनीच्या चिरकुटपणाच्या गोष्टी. वहिनीच्या सडक्या वागण्याच्या, वहिनीच्या बारबारक्या सुडांच्या गोष्टी.
"तुझीच बहीण ना. नाही पटत तर देत नाही सांग. माझ्या डोक्याला..." बापूचा डुरका आवाज आला.

कुलुंगी कुत्र्याने मसालेभातात तोंड घातलं.

"रसिकाकडे पाहून देत्ये. आईच्या स्वभावाचा त्रास तिला नको. अन् आपल्याला ना मूल ना..."

कुलुंगी कुत्र्याने कढी पिशवीबाहेर सांडली.

"पापलशेट स्वतः आलेत तर देऊन टाक तो शालू." बापू म्हणाला.
"तोंड बघा त्या खुळचटाचं." ताईचा आवाज चढला. कुलुंगी कुत्रा कावराबावरा झाला. "घरात असलं अर्धवट माणूस असतांना देऊ नका तिथं नलीला, म्हणत होत्ये. वकील जावयाचा मोह पडला, दुसरं काय. तरी बरं, वकिलांनी काय दिवे लावले कळलंच जगाला. छत्री लावून बसतात म्हणे कोर्टाबाहेर."

कुलुंगी कुत्र्याला आमटी तिखट लागली.

"हे बघ - तो गारवे म्हणत होता ते सिमेंटच्या एजन्सीचं - मी पापलशेटला शकुन विचारणाराय. असल्या माणसांकडे ती शक्ती असते म्हणतात..."
"अहो त्या पापल खुळचटाला आपला लेंगा स्वच्छ ठेवता येत नाही. एवढा घोडमा झाला तरी न सांडता जेवायची मेल्याला अक्कल नाही. पानाभोवती काय अन्न चिवडलंय बघतांय ना? हा शकुन कसला देणाराय बोडक्याचा?" ताईंचा आवाज मृदू झाला. "उगाच असलं काही करू नका. आहे ती इस्टेट सांभाळू, चार पिढ्या बसून खातील एवढं आहे. दिवसभर दुकानात बसा निवांत."
"गारवेच्या भावकीत कन्स्ट्रक्षन आहे. घरचीच एजन्सी असेल तर पैशाला क्षय नाही..."
"ऐका माझं, या भानगडीत पडू नका. तो गारवे मेला गावएडका. पैसे आपले, जागा आपली. गारवेला निम्मे कशासाठी?"
"तुला यातलं काही समजत नाही. तू गप र्‍हा." बापू वैतागला.
"अहो, बुडला उद्या धंदा तर गारवे हात वर करून निघून जाईल. पैसे आपले जातील. आधीच तुमची पत्रिका व्यवसायाची नाही असं..."
"तो ओकभटजी म्हणत होता ना? त्याज्यायची जय. त्याचा भाऊ घाटावर जायला लागला म्हणे. हा व्यवसाय बरा जमतोय."
"बारं... ओक नको तर दुसर्‍याला दाखवा पत्रिका. या खुळ्याच्या नादी लागू नका. ऐका माझं."
"अगं, आज पापलशेट आला तर मागोमाग एक कुत्रा. साक्षात दत्तगुरू आले दारी, आहेस कुठे! शकुन अशांकडूनच घ्याचा, तुला काय समजत नाही त्यातलं..."
"ते काही असो. माझा शालू द्यायची नाही. रसिकासाठीही नाही. आपल्या लग्नातला आहे."
"अगं काय सोनं चिकटलंय त्या शालूला. नवा घेऊ. आपण नाही म्हणायचो आणि पापलशेट बिथरायचं. त्याच कामासाठी आलाय ना पेणेहून."
"द्याची नाही!" ताई तापलेल्या आवाजात म्हणाल्या.

मला आता मजा यायला लागली होती. कुलुंगी कुत्र्याचं पोटही भरलं होतं. आता अन्न चिवडणं चालू होतं. उठून आत गेलो.
"कुत्र्यासाठी पेलाभर ताक देता का ताई? पुण्ण्याचं कामंय..."
बापू-ताईंमधलं बोलणं तिथंच खुंटलं.

तीन

दुपारी हे गाव निपचित पडलेलं असतं. मीही बाहेर शेडमध्ये पडून राहिलो. कुलुंगी कुत्रंही सावलीला पडून राहिलं.
नंतर दारात बुलेट वाजली. गारवे आला. जीनची पँट एवढी टाईट होती की बाहेरूनपण लोल्याचा आकार दिसावा. वरचा शर्ट हिरवट पिवळा चकमकीत, झगरीमगरी. आला तो थेट दुकानात घुसला. बापूचं त्याचं गॉटमेट. गारवे अधूनमधून चोरटी नजर आत टाकत राहिला. मध्येच माझ्याकडे.
मग बाहेरच आला. जाडग्या मिश्या, रुंद खांदे, चालीत माज. मागे हाडकुळा बापू.

"माऊली!" माझ्यासमोर हात जोडले. आंगठ्या एकमेकीवर आपटल्या. "शकुन द्या माऊली."

मी वैतागून कूस बदलली. च्यायचा त्रास.

मग तो बरंच काही सांगत राहिला. त्याचं घर. त्याची मोठी भावंडं. घरची इस्टेट. वेगवेगळे व्यवसाय. कन्स्ट्रक्षन. सिमेंट. दालमिया कंपनी.
मी पायही पोटाशी ओढून घेतले.
एजन्सी. गुंतवणूक. गोण्या. शेड. ग्रेड. ट्रान्स्पोर्ट. प्रॉफिट.
तोंड पोटाशी खुपसलं. झोपलो.

छातीशी हुळहुळलं म्हणून जाग आली. बघतो तर कुलुंगी कुत्रं कुशीत येऊन पडलं होतं. उठलो. मागे बघतो तर बापू आणि गारवे दोघंही जवळच बसले होते. त्यांनी डोळे घातले.

"चला, माऊली. गावात भटकून येऊ. बुलेटवर्नं नेतो तुम्हाला." गारवे उठला.
चला. कुलुंगी कुत्र्याला तिथेच सोडलं.

बुलेटवर कधी बसलो नव्हतो. मस्त लोल्यात थरथर येत होती. हातात धरून हलवायच्या ऐवजी मस्त बुलेटवरून हिंडावं. लोल्याला पन्हळ लावून ठेवावं.
गारवेने बुलेट गावाच्या कडेला घेतली. कोणतीशी छपराट नदी, त्यावरचा पूल. आजूबाजूच्या गावाला नेणार्‍या वडाप रिक्षा. पुलाच्या आधाराने उभं राहिलेला बाजार, हॉटेलं. तिथल्याच एका आंब्याखाली गारवेने मला बसवलं.
"माऊली, येतोच जरा स्टफ जमवून. बसा हितं. समोरून पाव पाठवून देतो."
समोरच्या हॉटेलातून पावाच्या लाद्या आल्या. मला भजी हवी होती, पण आला पाव. चावत बसलो.

गारवे कुठेकुठे जात होता, परतून आंब्याखाली येत होता. शेवगाठींच्या पुरचुंड्या, कुठल्याश्या कागदांनी भरलेलं बाड, चायनीज वास मारणार्‍या काळ्या पिशव्या, आणि शेवटी तीन बाटल्या. जुनी लेबलं पत्र्याने खरवडलेली. नवी बुचं लावलेली.
मग खुद्द गारवे आला, शेजारी टेकून बसला. दिवेलागण होत होती.
"बसणार ना माऊली आज? आमच्यासोबत?" तोंडात स्टार पुडी मोकळी करत विचारलं. "बाटलीय तुमच्या नावची. लोकल माल हां इथला. एकदम हार्बल. बुचात जाल हवेत."
"ताईंनी जेवायला केलं आसेल..."
"जेवाल हो निवांत. मस्त टाकायची, आणि बसायचं ताटावर. मग तुमची ताई यील वाढायला." गारवे पाय ताणत म्हणाला. "आंबटी वाढ म्हणायचं. ओणवी झाली की मस्त गोळे लोंबतात. गोळे बघायचे, आमटी प्यायची. गोळे बघायचे, आमटी प्यायची. गोळे - आमटी - गोळे - आमटी. बस्स निवांत..."
मला खदखदून हसू आलं. गारवे बरोबर बोलत होता - ताईचे गोळे बेकार लोंबतात. एरवी मारे अंगभर पदर घेते. वाढताना काय करता येतंय!
मला हसताना बघून गारवे पण खुश झाला. "मग! तुमच्या ताई काय सोपं कामंय व्हंय? बाप्या हांडग्याला शाटं झेपतीय. तिला..."
बोलता बोलता थांबला. मी वळून पाहिलं - तोही माझ्याकडेच बघत होता.
"लय चमडीहेस, खुळ्या. लय." एक बूच उघडून वास घेत म्हणाला. "एक लक्षात ठेवायचं, शेट. झेपेल तितकीच प्यायची. ओकाबिकायचं नाही. कळ्ळं का. लक्ष्यात ठेवा. ओकायचं नाही. बापूसोबत ठरलंय माझं. तुम्ही आज ओकायचं नाही. समजलं?"

प्यायची. ओकायचं नाही. समजलं.

बुलेट. लोल्यात थरथर. आम्ही घरी आलो.

"शेट, ओकायचं नाही आज कायपण झालं तरी. पाव खाल्लेत ना? हां. ओकायचं ना...ही."

दुकानाशी कुलुंगी कुत्रा वाट पहात होता. गारवेला सोडून त्याच्याकडे गेलो.

चार

अंगणात मस्त गार वारा होता. हायवेचे आवाज लांबून येत होते.

पद्धत वेगळीच होती. आपापली बाटली घेऊन बसायचं. टोपणात ओतून घ्यायची. मधल्या वाडग्यातलं काळं मीठ चिमूटभर. चट्कन कडुलिंबाची काडी चावायची आणि टोपणातलं घशात सोडून द्यायचं. कंठाळी कुणीतरी बुक्का घातल्यागत व्हायचं. बुक्का सरसरत वर यायचा, डोक्याच्या शेंड्यापर्यंत. मग दोन्ही कानांमध्ये जाऊन विरून जायचा. दुनिया हालायची.

मग कधी बॉईल्डेग, किंवा मग लॉलिपॉप. हाडं दिली भिरकावून रस्त्यावर. कुलुंगी कुत्र्याला होतील.

बापू आणि गारवे कायकाय बोलत होते. आपसांत. मधीच माझ्याकडं बघत होते. परत बोलत होते. सिमेंटचं. शेडचं. गारवे एखादा कागद दाखवत होता. बोलणं. माझ्यावर लक्ष ठेवणं.

कायकाय आठवलं. घाबरून गॅलरीत झोपायला जायचो नाही. खुळा खुळा म्हणून मागं लागायची चाळीतली पोरं. चिडून मी दगड मारायचो. श्यामकांत सुतारच्या छोट्या मेंदूत लागला होता दगड. मग दादा तिथं घेऊन गेला होता. मशीनची पॅड्स. वगैरे.

चिकन चिली. काळं मीठ, कडुलिंब. दोन टोपणं.

दीड खोल्यांचं घर. दादा-वहिनीचा संसार. स्वयंपाकखोलीत दार लावून जुगायचे. सगळ्या चाळीला ऐकू जात असेल. मग रसिकाचा जन्म. मग मी स्वयंपाकखोलीत. मग पुढे गॅलरीत. सुतारबितार लग्न होऊन स्वतः जुगायच्या कामी लागले होते. गॅलरीत बारकी पोरं आली होती.

नुसताच कांदा. काळं मीठ - कडुलिंब - टोपण.

पाराला टेकून लवंडलो.

"गेला काय रे तो?" बापू तरटले.
गारवेने खांदा धरून जोरात हिसडला. "पापलशेट, झोपू नका शेट. बसले रहा. ओकला नाय पायजे."
"ओकला तऽ गेला शकुन. ओकला तऽ गेला. नो एजन्सी." बापू ओरडले.
"बापू, कोण भडवीचा ओकतंय? हे पाऽ...." डोळ्यांवर टॉर्चचा प्रकाश आल्यावर मी उठून बसलो.

बापू हसले. गारवे सैलावला.

आता कागदबिगद बाजूला पडले होते. बाटल्या अर्ध्याच्यावर संपल्या होत्या. गावातल्या भानगडी बोलत होते. मला ना गाव माहीत ना भानगडी. मी अजून दोन टोपणं लावली. एकदोन लॉलीपॉप नेम धरून बाहेर टाकले.

गावठी कुत्रे बिचारे एकटेच राहतात. चार इतर कुत्र्यांच्या संगतीत मी कधी कुठलं कुत्रं पाहिलं नाही. हां, भादवा असेल तर ते निराळं. तेव्हा आपले वाकडे लोले घेऊन दोन कुत्रे एकाच कुत्रीवर चढायला बघतात. ते निराळं.

बाटली घेऊन तर कधीच बसत नाहीत.

असा कुत्र्यांचा विचार करत बरा वेळ गेला. बाटली संपत आली होती. कडुलिंब पडून गेला होता. काळं मीठ संपत आलं होतं. पण ओकलो नव्हतो. तसं काही वाटतही नव्हतं. बाप्या येडझव्याला शकुन हवा होता ना? घे रांड्या.

डोळे उघडून पाहिलं तर बापू लुडकला होता. त्याची लुकडी छाती हापापत होती. गारवे अंगणात कुठंच दिसत नव्हता.
भूक लागली होती. अंडी, चिकन टोपणातल्या आगीत वितळून गेलं असावं. जेवायला हवं म्हणून घराच्या दिशेला गेलो.

घर सुनसान. एका खोलीत पिवळट दिवा लकाकत होता. झोपल्या काय ताई? माझ्या जेवणाचं काय? डोकावलो.

ताई उताण्या पडल्या होत्या. गारवे वरती उकिडवा. उघडा.

झट्दिशी मागे फिरलो. भूक तर मेलीच. सरळ अंगणाचं दार उघडून बाहेर आलो. लगतच पायठणीशी कुलुंगी कुत्रा निजला होता. त्याच्याही छातीचा पिंजरा वरखाली. पलिकडे जाऊन टेकलो. आजूबाजूला अर्धवट चावलेले चिकन लॉलीपॉप. भडभडलं. ओकलो नाही पण.

किती वेळ असा बसलो होतो माहीत नाही.

दाराचा आवाज झाला म्हणून वर पाहिलं. गारवे लपलपत्या पायांनी बाहेर येत होता. काचकन त्याचा जाडजूड पाय कुलुंगी कुत्र्यावर पडला. फासळ्या कडकडल्या. गलिच्छ घाणेरडा चिरकता आवाज काढून कुलुंगी कुत्रा झडझडून उठला. गारवेच्या पायाशी झोंबला.
"तुझ्या तर आयचा..." गारवेच्या लाथेने कुलुंगी कुत्रा समोरच्या दुकानाच्या कट्ट्यावर जाऊन आपटला. परत चिरकला. चिरडीने गारवेशी झटायला आला.
गारवेच्या डोळ्यांत आता खून चढला होता. एका पायाने त्याने कुत्र्याला जमिनीवर दाबून ठेवलं, दुसर्‍या पायाने दोन जबरी लाथा घातल्या. चीऽऽ चीऽऽ आवाज काढत कुलुंगी कुत्र्याने मान टाकली. निपचित पडून राहिला.

गारवे बाजूला सरकला. गल्लीच्या टोकाला लावलेल्या बुलेटकडे निघाला. कुलुंगी कुत्र्याच्या फासळ्या अजूनही हलत होत्या, पण सगळी मस्ती झडून गेली होती. तोंडातून लालसर चिकट ओघळ येत होता.

मला कळमळून आलं. वाड्याच्या पायठणीशीच भडाभडा ओकलो. चिकन, चिली, अंडी, पाव सगळं दारूच्या थारोळ्याबरोबर बाहेर यायला लागलं.

हातागुडघ्यांवर ओणवा होऊन बसतो तोच माझे केस कोणीतरी ओढले.
"का रे ए झवन्या... तुलापण आताच ओकाय येतंय?"
परत फिरलेला गारवे आता माझ्यावर आला होता. मला धाड्कन बाजूला लोटलं. पायरीवर डोकं धरून बसलो.
तिकडे गारवेने रस्त्याकडेची माती आणून ओकारीवर लोटली. माझ्यासमोर पाण्याची बाटली धरली.
"शेट... एकदाच सांगणार, नीट ऐकायचं. तुम्ही ओकला नाहीत. कुणीच ओकलं नाही. समजलं?"

मी मान हलवली. सगळंच समजल्यासारखी. चुळीवाटे उरली ओकारी फेकून दिली.

"जा आता. आत जाऊन झोपा. अंगणातच झोपा, घरभर वास मारू नका. माणसं झोपलीत."
मला आत लोटून, अंगणाचं दार लावून गारवे गेला. एकदा कुलुंगी कुत्र्याचा चीत्कार आला. मग पावलं विरत गेली. बुलेटचा आवाज झाला. तोही विरत गेला. झोपलो.

पाच

सकाळी उन्हं डोळ्यांवर आली तेव्हा उठलो. अंगणातल्या पारावरच मुटकुळं टाकलं होतं रात्रभर. आजूबाजूला पडलेलं दारूकामाचं साहित्य कुणीसं आवरून ठेवलेलं होतं. माझ्या अंगावर लालसर गोधडी घातली होती. पायाशी पाण्याचा तांब्या. घटघट पाणी प्यालो, खळखळ चूळ भरली.

मागे बांगड्या किणकिणल्या. घराच्या परसदाराशी ताई उभ्या होत्या. किंचितशा हसत.
"आधण ठेवलांय, भाऊजी. या असे आत..."
आत बापू पूजा करत होते. हाडकुळ्या कमरेखाली सोवळ्याचा बोंगा झाला होता. पूजा होईपर्यंत थांबलो, आणि मग चहाचा कप तोंडाला लावला. बापू वळले, आणि माझ्या हातावर प्रसाद ठेवला.
"...सिमेंटची एजन्सी घ्यायची ठरवली, पापलशेट. घरी तुमच्या दादा-वहिनींना सांगा."

वहिनीचं नाव काढल्यावर मी मुळात इथे कशासाठी आलो होतो ते आठवलं. रसिका, शालू, डाळिंबी. मी ताईंकडे पाहिलं. त्यांनी पुढे होऊन एक पिशवी हातात ठेवली.

"हा तो शालू. नीट द्या नलीकडे. आणि रसिकाने नेसला की भाऊजींना म्हणाव फोटो काढा." ताईंचा आवाज निष्कपट होता.

घेतला. सुटल्यासारखं झालं. आता घरी वहिनींना डरत नाय. चहा घेऊन निघालोच. एस्टी चुकवायची नव्हती. बाहेर कुलुंगी कुत्रं विव्हळत पडलं होतं. मी ओळख दाखवली नाही.

सहा

एस्टीत गर्दी नव्हती. सहज पिशवी उघडली, शालू पाहिला. मस्तच होता. चमकदार अंजिरी. पदर पाहण्यासाठी घडी उलटली, आणि उभी सणसणीत चीर दिसली. फाटलेल्या भागाच्या दोन्ही कडांचे धागे लोंबत होते.

निघताना कुलुंगी कुत्र्याचा निरोप घ्यायला हवा होता.

विशेषांक प्रकार

.शुचि Mon, 24/10/2016 - 19:08

दमदार व्यक्तीचित्रण आहे. लाचार मनोवृत्ती, कोडगी मनोवृत्ती, बेरड मनोवृत्ती - कथा वेगळ्याच जगाचं दर्शन घडवते. कुलुंगी कुत्र्याचे काहीतरी रुपक दिसते आहे.कोणीतरी उलगडा करेल्च.
.
पात्रांची लैंगिकता गोष्टीत सतत कुठेतरी पार्श्वभूमीवरती जाणवत रहाते. मला वाटत होतं की पापल्या कधीतरी वहीनींना दाबणार. पण तसा अपेक्षित शेवट न झाल्याने कथा जास्त आवडली. मला जयवंत दळवी आणि जी ए दोन्ही लेखकांची आठवण येऊन गेली. कैच्या कै सुबक कथा आहे.

चिमणराव Mon, 24/10/2016 - 15:45

खय्रा घटना आठवल्या काही.समांतर कथानकं पुढे सरकवत जाण्याची लेखकाची हातोटी आहे. बाकी अशा वातावरणाची काहीच माहिती नसणाय्रांस शिसारी येण्याची शक्यता आहे.

अरविंद कोल्हटकर Mon, 24/10/2016 - 18:25

निष्क्रिय आणि लाचार तरुणाचे चित्रण करतांना ओघ चांगला जमला आहे. असे निष्क्रिय आणि लाचार लोक जीएंच्या कथानकांमध्यून भेटतात त्याची आठवण झाली.

अनंत ढवळे_ Tue, 25/10/2016 - 03:36

जबरी कथा..कॉम्प्लेक्स कॅरॅक्टर चांगले ठाशीवपणे उतरले आहे

XYZ Tue, 25/10/2016 - 18:23

___/\___

एक नंबर कथा!
साष्टांग!

काय खतरनाक कॅरॅक्टर आहे =))

तिरशिंगराव Wed, 26/10/2016 - 21:58

कथा एकदम समांतर जमली आहे. बारीकसारीक वर्णने: बापू बसले होते ती बाजू तसबिरींनी बरबटलेली. असल्या वाक्यांनी शब्दचित्र उभे रहाते. बॅटमन म्हणतो त्याप्रमाणे तुमच्यांत बरेच लेखक दडले आहेत.
मुजरा घ्यावा मालक.

राजन बापट Thu, 27/10/2016 - 01:20

शैली आणि आशय यांची एकात्मता हे या लिखाणाचं वैशिष्ट्य वाटलं. माणसांचे हेतू, त्यांच्या लकबी, सवयी, त्यांचे पवित्रे, त्यांचे भावविभाव हे शैलीतून प्रकटतात. अशी एकात्मता साधणं हे उच्च लेखनाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. वर कुठेतरी जीएंचा उल्लेख कुणी केला आहे. त्यांचा या संदर्भातला उल्लेख सार्थ आहे. कथेतल्या प्रमुख पात्राच्या दृष्टीकोनातून सर्व निवेदन आहे. कथालेखक कथा लिहिताना हा कळीचा मुद्दा विसरत नाही. मुख्य पात्राचा स्वभाव, एकंदर उतरंडीतलं त्याचं स्थान, आणि आजूबाजूच्या पात्रांची त्याने टिपलेली वैशिष्ट्यं हे सगळं रंगवताना कथालेखकाने "हे सगळं कोण सांगतं आहे" याचं भान सुटू दिलेलं नाही. कुठलीही घटना, अगदी सूक्ष्म हालचाल पापलच्या अपरोक्ष होत नाही.

ही कथा कुठल्याही आघाडीच्या प्रकाशनामधे मानाची ठरेल.

रुची Fri, 28/10/2016 - 00:32

अतिशय उत्तम कथा! कथेच्या माध्यमावरचं तुमचं प्रभुत्व खरोखरीच फार वाखाणण्यासारखं आहे. अनेकदा प्रथितयश लेखकांच्या कथा वाचतानाही त्यातली ओढूनताणून केलेली वर्णने कंटाळवाणी वाटतात आणि त्यातून पात्रांविषयी, त्यांच्या भोवतालाविषयी काहीच अधिक कळत नाही अथवा वातावरण निर्मितीला आधार मिळण्यासारखं काही वाटत नाही. इथेमात्र तुम्ही वापरलेला प्रत्येक बारकावा कथेला काहीतरी महत्वाचं देतो, फार ताकदीने वापरलेलं तंत्र. जलपर्णीच्या कथेचा लेखक आणि या कथेचा लेखक एकच आहेत हे खरोखरीच पटत नाही. ही कथा कुठल्याही आघाडीच्या प्रकाशनामधे मानाची ठरेल, या मुक्तसुनित यांच्या मताशी अतिशय सहमत आहे.

तुम्हाला पुढच्या प्रकल्पांसाठी मनापासून अनेकानेक शुभेच्छा.

अमुक Fri, 28/10/2016 - 14:36

या लेखनाकरता धन्यवाद आबाजी!

लोला, व्हकनी, घोडमा, वडाप, भादवा...
सूचक शब्द, चपखल शैली, कमी आणि जोरकस फटकार्‍यांतून दर्शवलेली वर्णनं, नाती, काळवेळा..

या कथेसाठी चित्रं नसावीत आणि असावीतही असं वाटून गेलं. नसावीत असं प्रथम वाटल्याने नंतर असावीत असं वाटलं; चित्रकारासाठी आव्हान म्हणून.

बाकीचं स्टफ जमवून नंतर बोलेन म्हणतो. :)

अभ्या.. Sat, 29/10/2016 - 11:51

In reply to by अमुक

या कथेसाठी चित्रं नसावीत आणि असावीतही असं वाटून गेलं. नसावीत असं प्रथम वाटल्याने नंतर असावीत असं वाटलं; चित्रकारासाठी आव्हान म्हणून.

मलाही कथा वाचावाचताच पहिल्यंदा डोळ्यासमोर चित्र आले. ते फक्त कागदावर उतरवायचे राह्यले.
अमुकराव टाकुयात काय दोघेही आपण एकेक चित्र?

अमुक Sat, 29/10/2016 - 12:42

In reply to by अभ्या..

अभ्याशेट, मी तरी नाही टाकू शकत.
चित्रकाराला जरी आव्हान म्हणून वाटलं तरी लेखकाला, संपादकांना प्रत्येक गोष्टीसाठी चित्र हवं असतंच असं नाही. इथे माझ्याकडून आबांनी रेखाटलेल्या शब्दचित्रांची अवज्ञा होईलसं वाटतं. तेवढी टाप नाय आपली. फारच वाटल्यास नि चितारणं जमल्यास प्रतिसादात टाकणे एकवेळ ठीक राहील असं माझं मत.

अंतराआनंद Sat, 29/10/2016 - 16:46

कसली अफाट रंगवलेली कथा आहे! चपखल शब्दयोजना, शेवटपर्यंत राखलेलं वातावरण, चटदिशी डोळ्यापुढे येणारी पात्रे आणि त्यांचं कथेच्या शेवटापर्यंत तसं असणं. निव्वळ अप्रतिम. मस्त लिहीता, लिहीत रहा.

ही कथा कुठल्याही आघाडीच्या प्रकाशनामधे मानाची ठरेल

असंच

बाजिंदा Wed, 02/11/2016 - 14:13

आदुबाळा म्या तुझ्या लिखाणाचा जबराट फ्यान हाय. तोडलसं लगा _/\_

रोचना Wed, 02/11/2016 - 18:06

वातावरण निर्मिती आणि पात्रांच्या रेखाटणीतून कथेला क्लायमॅक्सपर्यंत मस्त नेलंय. शेवटी मलाही मळमळायला लागलं. शब्दांच्या वापरात कमालीचा संयम पाळला आहे.
तुमचा कथासंग्रह कधी प्रसिद्ध होणार आहे?
फेलूदा आणि फास्टर फेणे फॅनफिक तर आवडले होतेच, पण ही कॅज्युअली अस्वस्थ करणारी शैली जास्त आवडली. असेच लिहीत रहा!