Skip to main content

आगामी कार्यक्रम - राष्ट्रगीताचं सहस्रावर्तन

राष्ट्रप्रेमाच्या प्रदर्शनासाठी विचारजंतांच्या नाकावर टिच्चून राष्ट्रगीताच्या सहस्त्रावर्तनाचा सोहोळा आयोजित करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे ठिकाण आणि वेळ लवकरच जाहीर करण्यात येईल. सहस्रावर्तन करून आमच्या काही मागण्या पूर्ण होण्यासाठी राष्ट्राकडे साकडे मागण्यात येईल -

१. कोणतंही लोकमाध्यम - फेसबुक, मराठी संस्थळं, व्हॉट्सॅप - उघडल्यावर सर्व प्रकारच्या फोन आणि संगणकांवर ताबडतोब राष्ट्रगीत वाजलंच पाहिजे. ही मागणी पूर्ण न झाल्यास ह्या सर्वांच्या सर्व्हरवर एकगठ्ठा बंदी आणावी.
१अ. स्पॉटिफायमध्ये जसं पैसे न देता गाणी ऐकत असाल तर जाहिरातींच्या वेळेस फोन म्यूट होत नाही, तशी संरचना राष्ट्रगीताच्या बाबतीतही असावी.
१आ. संगणकावर प्रायव्हेट ब्राऊजिंग करून लोकमाध्यमं वापरणाऱ्या लोकांना राष्ट्रगीत दोनदा ऐकवलं जावं.

२. कोणतंही वर्तमानपत्र फोन किंवा संगणकावरून उघडल्यास, त्यावर लगेचच राष्ट्रगीत वाजलं पाहिजे. अॅडब्लॉक, जावास्क्रिप्ट-ब्लॉक वगैरे वापरून राष्ट्रगीत न ऐकणं हा फौजदारी गुन्हा समजला जावा. असा गुन्हा एकापेक्षा जास्त वेळा केल्यास तो राष्ट्रद्रोह समजला जावा.
२अ. सर्व पुस्तकं उघडल्यावर आपसूक राष्ट्रगीत वाजलं पाहिजे. या तंत्रज्ञानासाठी हॉलमार्क या ग्रीटींग कार्ड कंपनीच्या तंत्राचा आणि शेजारच्या देशातल्या स्वस्त उत्पादनांचा वापर करता येईल. असं न करणाऱ्या पुस्तक लेखक आणि प्रकाशकांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मात्र छापील वर्तमानपत्रांचा उपयोग कसा होतो याचा विचार करता, त्यांना यातून सूट द्यावी. मात्र प्रत्येक वृत्तपत्राने आपल्या रंगीत पुरवणीवर राष्ट्रगीत छापावे.

३. भारतीय भाषेतल्या कोणत्याही टीव्ही मालिकांच्या सुरुवातीला राष्ट्रगीत दाखवण्याची सक्ती करण्यात यावी. जर या नियमातून सूट हवी असेल तर प्रत्येक एपिसोडमध्ये 'टिढीश-टिढीश-टिढीश'ऐवजी 'जय हिंद, जय हिंद, जय हिंद' असं पार्श्वसंगीत वाजवावं लागेल. तेव्हा स्क्रीनवर दिसणारी सर्व पात्रं आणि सेटवर उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनी हात छातीला आड‌वा लावून, देशाला सलाम करावा.
३अ. मालिकांनी आपलं शीर्षकगीत म्हणून राष्ट्रगीत वाजवल्यास त्यांना या नियमातून सूट देण्यात यावी.

४. कोणत्याही भाषेतल्या रियालिटी शोमध्ये राष्ट्रगीत म्हटलं जाणार नसल्यास, त्याच्या सुरुवातीला राष्ट्रगीत वाजवलं जावं. राष्ट्रगीतावर नृत्य करण्याची परवानगी असावी, पण राष्ट्रगीत सुरू असताना उभे नसणाऱ्या प्रत्येकाला त्यानंतर एकेकटं उभं करून राष्ट्रगीताचं सहस्रावर्तन करायला सांगावं. जेणेकरून राष्ट्रद्रोही लोक राष्ट्रगीतावर नृत्य करण्याचं पाप करून राष्ट्रगीत आणि राष्ट्र मलीन करण्यास धजावणार नाहीत.

५. राष्ट्रगीत ही पवित्र रचना आहे. इतर सामान्य संगीताशी त्या रचनेची तुलना करून, आपापल्या पद्धतीने राष्ट्रगीत सादर करणाऱ्या सगळ्या तथाकथित कलाकारांनाही एकेकटं उभं करून राष्ट्रगीताचं सहस्रावर्तन करायला लावणं आवश्यक आहे. ह्या सगळ्यांनी राष्ट्रगीताला आपापल्या चाली लावून मोठा राष्ट्रद्रोह आधीच केला आहे. हे लोक प्रसिद्ध, लोकप्रिय आणि बुद्धीमान संगीतकार असल्यामुळे त्यांची हयगय होऊ नये.
५अ. या अशा देशद्रोही राष्ट्रगीताच्या फीती यूट्यूबवरून पाहणाऱ्यांच्या फोन आणि संगणकांमध्ये शिस्तीचं सॉफ्टवेअर सक्तीने बसवावं. त्यांनी कोणताही नवा प्रोग्रॅम चालवला की आपोआप राष्ट्रप्रेमी आणि अधिकृत राष्ट्रगीत फोनवर वाजलं पाहिजे.

६. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दोन्ही दिवशी सर्व शाळा, महाविद्यालयं, सरकारी, निमसरकारी आणि खाजगी आस्थापनांमध्ये राष्ट्रगीताचं सहस्रावर्तन भरवावं. भारतातले बहुसंख्य लोक असंघटित क्षेत्रातून रोजगार मिळवतात. ह्या सगळ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी आणि त्यांनाही दर १५ ऑगस्ट आणि २५ जानेवारीला राष्ट्रभक्तीचं प्रदर्शन करता यावं यासाठी, त्यांना संघटित करावं.
६अ. भीक मागताना 'भगवान के नाम पे' भीक मागण्यावर ताबडतोब बंदी घालावी आणि त्याऐवजी ताठ उभं राहून राष्ट्रगीत म्हणणं सक्तीचं करावं.

७. बँकांमध्ये नोटा बदलायला आलेल्या लोकांशी, त्यांनी राष्ट्रगीत म्हटल्याशिवाय, कोणताही व्यवहार करू देऊ नये.
७अ. एटीममध्ये फक्त श्रीमंत लोकच पैसे काढायला जातात. त्यांना दोन वेळा राष्ट्रगीत म्हणायला लावावं. श्रीमंत लोकांमध्ये राष्ट्रभक्ती कमी असते.
७आ. पेटीएम, इंटरनेट बँकींग वापरणाऱ्या लोकांनाही, प्रत्येक व्यवहार पूर्ण होण्याआधी, एकदा राष्ट्रगीत ऐकायला लावावं.

८. चैनीच्या वस्तू, उदाहरणार्थ, टीव्ही, संगणक, मोबाईल फोन, स्पोर्टशूज, इन्सुलिनची इंजेक्शनं, इत्यादी वारंवार खरेदी करणाऱ्या लोकांच्या कानांत सक्तीने हिअरींग एड बसवावं. आणि त्यांना दिवसातले २३ तास सतत, बारीक आवाजात राष्ट्रगीत ऐकवत राहावं. मात्र हे हिअरिंग एड स्मार्ट बनवावं. बाथरूमच्या जवळ जाताच हिअरिंग एड आपसूक बंद झालं पाहिजे; नाहीतर राष्ट्राचा अपमान होईल.

---

सर्वांच्या मनात राष्ट्रभक्ती वगळता इतर कोणत्याही वस्तू, विचारधारा, व्यक्ती यांसाठी प्रेम, आदर, भक्ती असू नये अशी आमची इच्छा आहे. कृपया प्रतिसादांमधून आणखी उपाय आणि मागण्या सुचवा.

---

प्रखर राष्ट्रभक्त सातीताई सुचवतात -

जे लोक राष्ट्रगीत चालू असताना ताठ उभे रहाणार नाहीत त्यांना बाकीच्या राष्ट्रप्रेमींनी हाणा मारा झोडा करून शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने असावी. फार काय गोरक्षक किंवा मुतव्वीच्या धर्तीवर राष्ट्ररक्षकवीर पथक नेमले जावे आणि त्यांचे काम सगळे ताठ आणि उभे आहेत ना हे बघण्याचे असावे. ते करताना त्यांनी ताठ किंवा उभे किंवा दोन्ही नसले तरी चालेल.
जे लोक हे पाळत नसतील त्यांना तिथल्या तिथे हा/मा/झो करायचा अधिकार या रारवीप मधल्या लोकांना असावा.

बॅटमॅन Wed, 30/11/2016 - 23:07

समजा एखादा बीग्रेडी सिनेमा असेल तर त्याच्याअगोदर राष्ट्रगीत म्हटल्याने गीताचा सन्मान वगैरे होतो हे अतिशयच रोचक वगैरे आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/11/2016 - 23:27

In reply to by बॅटमॅन

अनेक भव्यदिव्यपट छपराट का छान, हे व्यक्तिनिष्ठ मत ठरेल. पण उदाहरणार्थ, 'आंखो देखी' हा चित्रपट मला खूप आवडला; अनेकांना तो अजिबात आवडला नसेल. ज्यांना तो आवडला किंवा समजला नसेल ते लोक चित्रपटाला बीग्रेडी समजतील. ज्यांना समजला त्यांच्यासाठी, त्या चित्रपटाआधी राष्ट्रगीत सक्तीने किंवा सक्तीशिवायही वाजवणं, ही राष्ट्रगीताची सौम्य टिंगल ठरेल. अशा चित्रपटांचं, अशा अभिव्यक्तीचं काय करायचं?

साती Wed, 30/11/2016 - 23:23

ष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. मात्र छापील वर्तमानपत्रांचा उपयोग कसा होतो याचा विचार करता, त्यांना यातून सूट द्यावी. मात्र प्रत्येक वृत्तपत्राने आपल्या रंगीत पुरवणीवर राष्ट्रगीत छापावे>>

जरा कठिणच आहे हो हे.
नाही म्हणजे आम्ही करायची ती अमंगळ कामे करण्यासाठी काळा पांढरा मुख्य पेपर की रंगीत गुळगुळीत पुरवणी असा भेदाभेद करत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 30/11/2016 - 23:28

In reply to by साती

तुम्हाला मुद्दा समजलेला नाही सातीताई. रंगीत, गुळगुळीत पुरवणी ही चैन आणि थिल्लरपणा आहे. असल्या पुरवण्या वाचणाऱ्या चैनबाज, थिल्लर लोकांना राष्ट्रभक्ती शिकवलीच पाहिजे.

साती Wed, 30/11/2016 - 23:31

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे बरिक खरं आहे.
रोजचा तीन वाला रविवारी पाचला मिळतो- रंगीत पुरवणीसह.

बरोबर आहे, ईट डिझर्व्ज अ राष्ट्रगीत.

संस्पबद्दल धन्यवाद!

साती Wed, 30/11/2016 - 23:38

जे लोक राष्ट्रगीत चालू असताना ताठ उभे रहाणार नाहीत त्यांना बाकीच्या राष्ट्रप्रेमींनी हाणा मारा झोडा करून शिक्षा करण्याची तरतूद कायद्याने असावी.
फार काय गोरक्षक किंवा मुतव्वीच्या धर्तीवर राष्ट्ररक्षकवीर पथक नेमले जावे आणि त्यांचे काम सगळे ताठ आणि उभे आहेत ना हे बघण्याचे असावे.
ते करताना त्यांनी ताठ किंवा उभे किंवा दोन्ही नसले तरी चालेल.

जे लोक हे पाळत नसतील त्यांना तिथल्या तिथे हा/मा/झो करायचा अधिकार या रारवीप मधल्या लोकांना असावा.

अजून सुचविनच!
राष्ट्रप्रेमी - साती!

मारवा Thu, 01/12/2016 - 04:56

In reply to by साती

काहींना पाठीचा विकार असल्यास
काहींच्या पाठीत बाक असल्यास
त्यांना वरील कायद्यातुन सुट द्यावी.
काहींना गुडघ्याची समस्या असल्यास इ. सुट द्यावी
अर्थात त्यासाठी राष्ट्रप्रेमी डॉक्टरांकडुन तसे प्रमाणपत्र देण्याची सोय करावी.
तपासणी करुन डॉक्टर मग " राप्रेमी मात्र व्यक्त करण्यास असमर्थ " असे प्रमाणपत्र देतील. ते लॅमीनेट करुन ड्रायव्हींग लायसन्स सारखे जवळ बाळगावे.
आणि इतर उभे असतांना बसल्या बसल्या गात हात उंचावुन कार्ड दाखवावे.

अमित.कुलकर्णी Thu, 01/12/2016 - 10:03

सध्याचे राष्ट्रगीत हे खरे राष्ट्रगीतच नाही असे आम्हाला शिकविले आहे. त्याचे काय ?
(पाचशे-हजारच्या नोटांसारखे रातोरात तेही बदलले गेले तरच आम्ही मान्य करू)

अंतराआनंद Thu, 01/12/2016 - 12:08

चालताना रस्त्यावरल्या खड्ड्यात पाय गेल्यास "आई गं!मेले" "देवा रे" असे उद्गार बाहेर न पडता ’जय हिंद’च उच्चारले गेले पाहिजे. याचे पालन होतेय की नाही बघण्यासाठी रारवीप आहेतच. त्यांच्यामुळे सुरूवातीला सवय नसली तरी हळू हळू कुठेही पडलं झडलं वा वाहनाचा धक्का लागला तरी प्रतिक्षिप्त क्रियेने हेच उद्गार येतील. अर्थातच असा बेदरकार वाहनचालक पकडला गेल्यास त्याने वाहन सुरू करण्याआधी उभे राहून राष्ट्रगीत म्हटले असल्याचा सेल्फी सादर केला तर त्याची शिक्षा सौम्य व्हावी.

चोर-दरोडेखोर पकडले गेल्यास त्यांनी चोरी/दरोड्याच्या आधी राष्ट्रगीत म्हटल्याचा त्या तारखेचा सेल्फी न्यायालयात सादर केल्यास शिक्षेत सूट मिळावी.

उद्धट कलाकार मंडळी मैफिल सुरू करण्याआधी तबल्याची ठोकठोक, तंबोर्‍याची टणट्ण ऐकवतात त्याआधी उभं राहून राष्ट्रगीत झाले पायजेल.

चित्रकाराने कॅन्व्हासवर ब्रश टेकवण्याआधी उभं राहून राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे.

लेखकाने लिहीण्यासाठी कागदावर लेखणी टेकवण्याआधी. संगणकावर लिहीत असल्यास वर आदितीने सुचवलेली सोय आहेच.

मारवा Thu, 01/12/2016 - 16:59

In reply to by अंतराआनंद

चालताना रस्त्यावरल्या खड्ड्यात पाय गेल्यास "आई गं!मेले" "देवा रे" असे उद्गार बाहेर न पडता ’जय हिंद’च उच्चारले गेले पाहिजे.

माझा अजुन एक पर्याय देवा रे पेक्षा " भारत माते गं " भारत माते गं " असे कण्हावे. किंवा भामागं भामागं होइल ह्ळुहळु सवय. शिवाय भारत माता हा ही एक हट्ट पुर्ण होइल.

अर्थातच असा बेदरकार वाहनचालक पकडला गेल्यास त्याने वाहन सुरू करण्याआधी उभे राहून राष्ट्रगीत म्हटले असल्याचा सेल्फी सादर केला तर त्याची शिक्षा सौम्य व्हावी.

याचाच सृजनात्मक विस्तार करायचा तर सिग्नल तोडणारे जे घाई करतात म्हणुन तोडतात. त्यांच्याकडुन दंड न घेता त्यांना सिग्नल तोडल्यावर जर पकडले तर अर्धा तास बसवुन ठेवावे आणि राष्ट्रगीताची आवर्तने ११ किंवा २१ अशी शुभ आकड्यात करावयास लावावी. त्याच्यातला उतावळेपणा उत्साह कमी होउन तो अजुन राष्ट्रानुकुल तापमानात येइल.

चित्रकाराने कॅन्व्हासवर ब्रश टेकवण्याआधी उभं राहून राष्ट्रगीत म्हटलं पाहिजे.

याचाच सृजनात्मक विस्तार मी राष्ट्रवादी चित्रकार आहे तर तिरंगा चौकट कॅनव्हास वरच चित्र काढेल. म्हणजे ज्याची चौकट तिरंगी आहे असा एक वर्ग व ज्यांची नाही असा दुसरा विभागणी करता येइल. याने अराष्ट्रवादी वेगळे छाटता येतील.
किंवा अजुन म्हणजे खरा राष्ट्रवादी चारच रंगात हिरवा केशरी निळा पांढरा या चारच रंगात वा यांच्या विविध छटांचा वापर करुनच चित्र रंगवेल याने चित्रकलेतील अनावश्यक असे वैविध्य कमी होइल जी ए नी ते कोणाच कोट दिलेल आहे ना शॅलो पीपल डिमांड व्हरायटी.....
शिवाय तो सी वाय एम के ऐवजी आपला ओ जी बी ए एक नवा प्रति पॅटर्न ही तयार होइल नाही तरी माणसाला इतके रंग हवेच कशाला मी म्हणतो ?
रंग दे तु मोहे गेरुआ शाहरुख म्हणुनच गेलाय

आदूबाळ Thu, 01/12/2016 - 17:30

In reply to by मारवा

त्यांच्याकडुन दंड न घेता त्यांना सिग्नल तोडल्यावर जर पकडले तर अर्धा तास बसवुन ठेवावे आणि राष्ट्रगीताची आवर्तने ११ किंवा २१ अशी शुभ आकड्यात करावयास लावावी. त्याच्यातला उतावळेपणा उत्साह कमी होउन तो अजुन राष्ट्रानुकुल तापमानात येइल.

ही आयड्या एक नंबर आहे!

'न'वी बाजू Thu, 01/12/2016 - 19:33

In reply to by मारवा

माझा अजुन एक पर्याय देवा रे पेक्षा " भारत माते गं " भारत माते गं " असे कण्हावे. किंवा भामागं भामागं होइल ह्ळुहळु सवय. शिवाय भारत माता हा ही एक हट्ट पुर्ण होइल.

त्यापेक्षा, नुसतेच 'भारतमाता की...' एवढेच ओरडावे.

(आणि हो, हे राष्ट्रभाषेत म्हणजे हिंदीतच ओरडावे. याचे मराठी भाषांतर करून ओरडल्यास - आणि तसे करताना चुकून 'भारतमाता' या समासाचा षष्ठी तत्पुरुष असा विग्रह केल्यास - उगाच नसती आफत यायची!)

अभ्या.. Thu, 01/12/2016 - 19:51

In reply to by मारवा

वा, वा, वा, मारवाजी. भारीच.
अगदी बारकाईने बघता तिरंग्यातल्या तीन रंगापैकी पांढरा हा रंगच मानला जात नाही. बाकी दोन्ही भगवा व हिरवा हे दुय्यम रंग आहेत. दोन्हीत पिवळ्या रंगाचे प्रमाण निम्मे निम्मे आहे आणि तो पिवळा रंग राहिलेल्या एका निळ्या रंगाचा परफेक्ट विरुध्द रंग आहे.
ह्याचा काही गूढ अर्थ असल्यास लावण्याचा प्रयत्न केला पण कै कळेनाच. :(

नितिन थत्ते Fri, 02/12/2016 - 11:03

In reply to by मारवा

>>याने अराष्ट्रवादी वेगळे छाटता येतील.

छाटता येतील हा शब्द मारवा यांनी हिंदी अर्थाने (सॉर्ट या अर्थी) वापरला आहे की मराठी अर्थाने (फांद्या छाटणे) या अर्थाने वापरला आहे? दुसरा अर्थ इथे अधिक सयुक्तिक होईल असे वाटते.

मारवा Thu, 01/12/2016 - 22:00

In reply to by अभ्या..

इतक रामायण महाभारत झालय आणि यांना अजुन माहीतच नाही पेपर बिपर वाचता की नुसत्या पत्रिकाच वाचता हो ?
ध्यानसे देखो इस आदमी को
हाच तो देशद्रोही
अभ्या देद्रो

राजेश घासकडवी Thu, 01/12/2016 - 18:12

या मागण्या एक पहिली पायरी म्हणून ठीक आहेत. पण पुरेशा नाहीत. कारण लोक नुसतेच राष्ट्रगीत ऐकतात, उभे राहातात. त्यामुळे राष्ट्रगीताला मान मिळतो हे खरं असलं तरी त्यांच्या मनात त्यावेळी राष्ट्रप्रेमाची भावना भरून येतेच असं नाही. तेव्हा एक राष्ट्रव्यापी कार्यक्रम सरकारने हाती घेतला पाहिजे.

१. दारू प्यायली आहे की नाही हे शोधण्यासाठी जसा ब्रेथ अॅनलायझर असतो तसा एक इमोशन अॅनलायझर बनवावा. त्यातून माणसाच्या मनात 'च्यायला काय कटकट आहे, उभं राहावं लागतंय.' हा विचार आहे का हे समजलं पाहिजे. तसा दिसला तर तो बदलून 'मी राष्ट्रासाठी म्हणजेच सरकारसाठी प्राणही अर्पण करेन. आणि ते अर्पण करण्यासाठी मी बारा दररोज बारा तास रांगेत उभा राहायला तयार आहे.' असा विचार होईपर्यंत त्याला सतत राष्ट्रगीत ऐकायला लावावं. (यातल्या 'उभा राहीन' या शब्दप्रयोगावर अदिती 'जगात काय फक्त पुरुषच असतात का?' असा धारदार प्रश्न विचारेल याची मला खात्री आहे. मात्र स्त्रियांच्या मनात काय आहे हे साक्षात ब्रह्मदेवालाही कळत नसल्याने असल्या डिव्हाइसचा त्यांच्यावर उपयोग होणार नाही हे गृहित धरलेलं आहे.)
२. हा इमोशनल अॅनलायझर बनवण्याचं काम अंडानी प्रॉडक्ट्सना द्यावं. मार्केटिंग मात्र पतंजलींच्या रामदेवबाबांकडे द्यावं.
३. नुसतं राष्ट्रगीताच्याच वेळी नाही, तर थिएटरमध्ये खुर्चीवर बसल्यावर ते युनिट डोक्याला जोडून मनातल्या भावनांचं सतत रेकॉर्डिंग करावं. या महाप्रचंड विदचं विश्लेषण करून कोणती माणसं देशद्रोही आहेत हे कळेल. इतकंच नाही, तर कुठचे चित्रपट देशद्रोही भावनांना खतपाणी घालताहेत हेही कळेल.

आत्ता एवढंच.

अरविंद कोल्हटकर Thu, 01/12/2016 - 19:59

जनतेकडून राष्ट्रगीत वारंवार म्हटले जाऊन त्यांचा पुण्यसंचय वाढावा ह्यासाठी एक सोपी technology आहे आणि तिबेटने ती कैक शतके आधीच शोधून ठेवली आहे.

व्यक्तीने खिशात बाळगायच्या छोट्या prayer wheels पासून कार्यालयांच्या दारात, स्टेडियमांच्या बाहेर, देवळांमधून ठेवण्यायोग्य अशी मोठी प्रार्थनाचक्रे उत्पादन करण्याचे सरकारी कंत्राट रामदेवबाबांना दिले जावे. त्या prayer wheels च्या आत एकापासून हजार-लाख-दहा लाख-कोटि असे बसतील तितके कागद, त्यावर राष्ट्रगीत लिहून, ठेवावे. प्रत्येकाने फावल्या वेळात आपली खाजगी आणि कार्यालयातील वगैरे सार्वजनिक चक्रे येताजाता फिरवीत जावीत. prayer wheelच्या प्रत्येक रिंगणामागे तिबेटमध्ये 'ओम मणि पद्मे हुं' हा मन्त्र एकदा म्हटल्याचे १ युनिट पुण्य गुणिले prayer wheelच्या आतील कागदांची संख्या इतके एकूण पुण्य त्या त्या व्यक्तीच्या पुण्यखात्यामध्ये आपोआप भरले जाते. आपल्याकडे राष्ट्रगीत तितक्या वेळा म्हटल्याचे पुण्य आपोआप देशप्रेम खात्यात भरले जाईल.

वेळ मोकळा असेल तेव्हा प्रत्येक व्यक्तीने कोठले ना कोठलेतरी यन्त्र फिरवीतच बसले पाहिजे असा कायदा करावा. मोकळा वेळ नुसताच जांभया देत वाया घालविणर्‍यांना पकडण्यासाठी स्वयंसेवक दल उभारावे. हे स्वयंसेवक लाठ्यांचे फटके अशा लोकांना मारून त्यांना देशप्रेमाच्या सरळ मार्गावर संचलन करीत राहण्यास उद्युक्त करतील. सौदी अरेबियामध्ये नमाजाच्या वेळी मशिदीत न जाता बाहेर चकाट्या पिटत बसणार्‍यांना फटके मारून मशिदींमध्ये पाठविणारे moral police असतात तसेच कार्य हे स्वयंसेवक करतील.

ह्यातच थोडी variety पण निर्माण करता येईल. प्रत्येक व्यक्तीच्या इच्छेनुसार त्याला 'जन गण मन' च्या ऐवजी 'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' हे गीतहि आपापल्या चक्रात भरता येईल आणि त्यालाहि तितकेच पुण्य मिळेल.

अबापट Thu, 01/12/2016 - 20:37

In reply to by अरविंद कोल्हटकर

मस्त कोल्हटकर काका , उत्तम जमलंय !! ( आता तुम्ही कुठेही राहत असलात तरी याला पुणे30 किंवा जुने पुणे 2 चा वास येतोय .कधी होतात का या भागांत .. ) ...हे share करता येईल का , आणि कसे करावे

मारवा Fri, 02/12/2016 - 11:15

बेवारस प्रतिसाद इथे अप्रस्तुत अदिती ताईंनी उचलुन न्यायला नकार दिला.
म्युनिसीपालटी पण नाही नेणार त मग कोण उचलणार ?
प्रकाटाआ

चिमणराव Sat, 03/12/2016 - 21:26

पेट्रोल पंपावर या पेट्रोल नव्हते. पुढच्या पंपापर्यंत पोहोचण्याइतके नव्हते. बाबा म्हणाले xx xxx जप करा सर्वांनी. पुढच्या पंपाच्या होजापर्यंत जाऊन गाडी बंद पडली.
-
### पेप्रातून .तिरुवअनंतपुरम,बंगळुरु,मुंबई,नागपूर,इंदोर,दिल्ली येथून एकाचवेळी प्रकाशित.

**
बातमीचे templateमध्ये xxxx आणि ###च्याजागी आवडती नावे टाकून घेणे.
जनहितार्थ जारी केले.

मिलिन्द Tue, 06/12/2016 - 23:15

In reply to by चिमणराव

असे होय! मला वाटले शिव्या झाकल्या आहेत फुल्यांनी ! पेट्रोल संपल्यावर त्या स्वाभाविकपणे येणारच!

तिरशिंगराव Tue, 06/12/2016 - 16:31

राष्ट्रगीत हे प्रातःस्मरणीय म्हणून घोषित करावे. सत्यानारायणाऐवजी 'देशनारायणाची' पूजा करावी.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 06/12/2016 - 23:24

In reply to by मिलिन्द

कळ काढा असं नमोजींनी सांगितलेलं आहेच. दोन हजारांच्या नोटेवरचे गांधी चालवून घेताय तसे काही दिवस हे सिक्युलर 'जनगणमन' चालवून घ्या.