"आहिताग्नि राजवाडे : आत्मवृत्त"
आहिताग्नि शंकर रामचंद्र राजवाडे (१८७९- १९५२) यांचं आत्मचरित्र नुकतंच वाचायचा योग आला. त्यांच्या बद्दल, त्यांच्या कार्याबद्दलची माहिती असणारी वेबसाईट नंतर वाचली. (http://www.ahitagni-rajwade.com/rajwade.html) वेब्साईटवरून एकंदर कामाची आणि आयुष्याची, विद्वत्तेची कल्पना येईल.
पुस्तकातला वाचनीय भाग म्हणजे, सर्वसाधारणपणे १८९७ ते टिळकांच्या मृत्यूच्या अलिकडे पलिकडच्या काळामधलं राजवाड्यांचं पुण्यातलं सार्वजनिक आयुष्य, त्यात तत्कालीन धुरीणांशी, प्रोफेसर्सशी, विद्वज्जनांशी आलेला त्यांचा संपर्क आणि त्या सर्वांबद्दल राजवाड्यांनी आपल्या स्वतःच्या तीक्ष्ण आणि तर्हेवाईक/तिरकस वाटेल अशा दृष्टीने केलेलं मतप्रदर्शन. यामधे त्यांनी कुणाचाही मुलाहिजा ठेवलेला नाही.
त्यामागचा कळीचा मुद्दा मला असा दिसतो की, आपल्या मृत्यूच्या आधी एखादं वर्षं त्यांनी हे निवेदन लिहिलं. वयाच्या सुमारे वीसाव्या वर्षापासून एकही दिवस न चुकता लिहिलेली रोजनिशी आणि अर्थातच स्वतःची तल्लख स्मरणशक्ती तिथे कामी आली. पण गमतीचा भाग असा की पुस्तकाचं प्रकाशन वर्ष आहे १९७९, बहुदा त्यांच्या हयातीतच नव्हे तर त्यांच्या मृत्यूनंतरही सुमारे तीन दशकं कुणाला इतका स्पष्टपणे लिहिलेला मजकूर छापण्याची छाती झाली नसावी. आणि ती न होणं समजण्यासारखं आहे. काही व्यक्ती १९५२ पर्यंत हयात तरी होत्या किंवा त्या आधी काहीच वर्षं त्यांचं निधन झालं असण्याची बाब कुठल्याही प्रकाशकाला वादंग आणि कोर्टकज्जे होण्याची धोक्याची घंटा ठरली असणार.
काही मासले देतो. यालाच स्पॉईलर अॅलर्ट समजावे.
२२ जून १८९७चा प्रसंग त्यांनी जवळून पाहिला. चाफेकर बंधू, द्रवीड बंधू, यांच्या सुरस आणि चमत्कारिक कथा, प्लेगची, थरकाप उडतील अशी वर्णनं - प्लेगमधली क्वारंटाईनची व्यवस्था जवळजवळ ऑशविट्झसारखी भासली - त्यातला सोजिरांचा आणि देशी शिपायांचा जुलूम, हे सगळं वर्णन वाचनीय. रँडवरच्या हल्ल्याच्या आधी चाफेकरांनी व्हिक्टोरिया राणीच्या कार्कीर्दीनिमित्त आखलेल्या दुसर्या एका कार्यक्रमाच्या मांडवाला कशी आग लावली होती, २२ जूननंतर बरेच दिवस कुणीच सापडत नव्हतं तेव्हा टिळक आणि सरदार नातूंसारख्या असामींना कसा त्रास दिला गेला, त्यातून हाती काही लागलं नाही. द्रवीड बंधूनी चुगली केली हे मानत आलो तरी त्यांनी निव्वळ "बड्या असामींना निष्कारण छळ्ण्याऐवजी व्यायामशाळावाल्यांना विचारा" इतकंच म्हण्टलं होतं पण त्यात चाफेकरही आलेल्या मुळे चुगलीचं भूषण/दूषण त्यांना कसं मिळालं, तपास करणारा ब्रूईन हा अधिकारी कसा मराठी उत्तम बोलत असे आणि मुख्य म्हणजे चौकीवर येताजातां द्रवीडांच्या आईशी (जी कशी "सुस्वरूप" बाई होती!) अस्खलित मराठीत कशा गप्पा मारी, कहर म्हणजे, दामोदर हरी चाफेकराला तासन तास चौकशी करून काहीही कसं हाती लागत नव्हतं आणि शेवटी ब्रूईनने त्याच्या अतुलनीय धैर्याची आणि ऐतिहासिक (!) कृत्याची अतोनात स्तुती केल्यानंतर त्याने खूष होऊन होकार कसा दिला हे सर्वकाही किमान मला तरी याआधी माहित नसल्याने अतीव वाचनीय झालेलं आहे. प्लेगमधे आपली सर्व भावंडं निधन पावणं, त्यावेळी रोग्याला क्वारंटाईनमधे टाकू नये म्हणून केलेल्या (निष्फळ) हिकमती, त्यात कोवळ्या मुलांची घरच्यांपासून केलेली ताटातूट यातून क्रांतीकारक विचारांच्या लोकांनी खून का पाडले असावेत याची कल्पना येते.
तत्कालीन डेक्कन कॉलेज आणि फर्ग्युसन कॉलेजची वर्णनं येतात तेव्हा विष्णुशास्त्री, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांची नावं येतात, टिळकांचा उल्लेख येतोच. मात्र या सर्वात प्रिन्सिपल बेन यास, इतिहास शिकवणार्या मूळच्या स्कॉटलंडच्या असणार्या गुरुजींचं चित्रण विस्मयकारक झालेलं आहे. अनेक प्रसंग आहेत. एक सांगतो. भांडारकरांचं व्याख्यान होतं आणि त्यात ब्रिटिश साम्राज्यामुळे झालेल्या आधुनिकीकरणाबद्दल , सोयीसुविधांबद्दल सरकारची वारेमाप स्तुती होती. त्याची या गृहस्थाने प्रच्छन्न चेष्टा केली आणि "आज शिवाजी असता तर कदाचित अव्वल दर्ज्याचा सायकलपटू असता" वगैरे म्हणून, तंत्रज्ञान आणि ब्रिटिश सत्ता यांचा असलेला संबंध कसा दूरान्वयाचा आणि बादरायण प्रकारचा होता हे दाखवून दिलं. बेनचं व्यक्तिचित्र असलेली एकूण एक पानं या पुस्तकातली माझी सर्वाधिक आवडती बनलेली आहेत.
खुन्या मुरलीधराला पडलेलं नाव हे नाना फडणवीसाच्या काळातलं कसं नि त्याची अत्यंत सुरस कथा, डिडेरो, व्होल्टेअर, डॉ. जॉन्सन, बोसवेल, स्पेन्स, मिल्ल वगैरे लोकांचा अभ्यास करण्यामागचे संदर्भ आलेले आहेत.
मूर्तीभंजनाच्या बाबत भाऊ कोल्हटकर ऊर्फ भावड्या याच्या तुलनेत बालगंधर्व कसा कमअस्स्ल होता (सगळे उल्लेख एकेरी !) , देवल-खाडीलकराची नाटकं कशी भाकड होती, श्री कृ कोल्हटकर कसा पांचट होता , रहिमतखान हा कसा स्वर्गीय आवाजाचा होता (आणि त्याच बरोबर तो गाणं गाताना मधेच उठून आरशात कसा पहायचा नि त्याकरता आरसा कसा होता) आणि त्याच्या तुलनेत भास्करबुवा बखले कसा फालतू होता, गणपतराव जोशी या (ओरिजिनल !) नटसम्राटाबद्दल, तो कसा नकल्या म्हणूनही उत्तम होता ....आणि ही सर्व सर्व वर्णनं एकेरीमधे.
सर्व किस्से कहाण्या देणं अशक्य आहे. पण एकेका वाक्यात सांगतो. टिळकांचा स्वभाव अत्यंत करारीच नव्हे तर प्रत्यक्ष सहवासात ज्याचं इंग्रजीत वर्णन हार्ड-नोज्ड असं होईल असा होता. जो काही थोडा संबंध राजवाड्यांचा टिळकांशी आला त्यात "ते मला पटकन खेकसून म्हणाले" अशी वर्णनं सहज केली आहेत. नरसिंह चिंतामण केळकरांची नको तितकी व्यवहारवादी आणि पैशावर नजर ठेवलेली वृत्ती, टिळकांच्या समस्त शिष्यांपैकी "एकदाही तुरुंग न पाहिलेले ते हेच !" असं त्यांचं वर्णन केलं आहे. रँग्लर परांजपेंनी कशी चहाडी केली इत्यादि आणि खुद्द रँग्लरांची योग्यता खरमरीत शब्दांत आलेली आहे. टिळक तुरुंगात सहा वर्षं जाण्याच्या काळात त्यांच्या अनुयायांचे मातीचे पाय कसे दिसले हे सर्व अजिबात भीडमुवर्त न ठेवता आलेलं आहे.
असो. अहिताग्नि राजवाड्यांची धर्म नि समाज संदर्भातली मतं पुराणमतवादी होती; सुधारकांवर त्यांचा दांत होता आणि टिळकांचे ते परमभक्त होते. विसाव्या शतकातला पुण्याचा सार्वजनिक पोत, त्यातल्या विसंगती, गमतीजमती, खरीखोटी विद्वत्ता, पुराणमतवाद आणि सुधारकी विचार यांच्यामधे चाललेला संघर्ष हे सर्वाधिक वाचनीय होतं. पुस्तक जरूर जरूर वाचावे असे.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
चांगला परिचय
अहिताग्निंबद्दल काही उल्लेख इतर संदर्भानं सदानंद मोऱ्यांच्या लिखाणात वाचले होते ( सदानंद मोऱ्यांचे " लोकमान्य" वगैरे) पण तुम्ही सांगत असलेल्या ठिकाणी मुख्य विषय अहिताग्नी हाच दिसतो आहे. वाचण्यात रस वाटतो आहे.
मोऱ्यांचा एक लहानसा लेख "सप्तरंग" मधल्या सदरात आलेला होता, तो हा --
http://www.esakal.com/saptarang/sadanand-more-article-18859
मुक्तसुनीत , परिचयाबद्दल
मुक्तसुनीत , परिचयाबद्दल धन्यवाद .
मन , लिंक बद्दल धन्यवाद .
श्री कोल्हटकर म्हणतात त्याप्रमाणे अत्यंत कर्मठ व जुनाट विचारांचे असले तरीही अहिताग्निचे आत्मवृत्त हा नक्कीच इंटरेस्टिंग रीड असणार मुक्तसुनीत यांनी वर्णन केलेल्या मासल्यांवरून वाटते . ( बुकगंगा वर दिसत नाहीये . कुठे मिळेल अशी माहिती कोणी दिल्यास आभारी असीन .)
अवांतर : आदूबाळ कि गली के बडे बडे लोग
सुदैवाने घरी हे पुस्तक आहे
सुदैवाने घरी हे पुस्तक आहे अन कैकवेळेस वाचलेले आहे. चाफेकरबंधू आणि सावरकरबंधू या दोहोंशी त्यांचे कसे पटत नसे ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे. तत्कालीन पुणे विशेषत: या पुस्तकातून जसे भिडते तसे क्वचितच दुसऱ्या कुठल्या पुस्तकातून भिडत असेल. मजा म्हणजे कट्टर सत्यशोधक खेड्यांत जातिव्यवस्थेच्या समर्थनार्थ त्यांनी भाषणे दिली आणि आपल्या संस्थेकरिता फंडिंगही मिळवले. =)) डेक्कन कॉलेजच्या बेन नामक प्रिन्सिपॉलचे वर्णन फार बहारीचे उतरले आहे. फार भारी आहे.
पण नासदीयसूक्तभाष्याबद्दल उल्लेख नसल्याने निषेध! ते त्यांचे मुख्य कॉंट्रिब्यूशन आहे. साला त्यावर एक लेखच लिहिला पाहिजे कधीतरी.
पुण्यात नुकता आलो होतो तेव्हा त्यांचे घर शोधायला म्हणून पेठेत हिंडलो होतो पण ते कै दिसले नै. नंतर लोकेशन कळूनही समहाउ जाणे झाले नाही.
.... पुण्यात नुकता आलो होतो
.... पुण्यात नुकता आलो होतो तेव्हा त्यांचे घर शोधायला म्हणून पेठेत हिंडलो होतो पण ते कै दिसले नै. ....
याकरिता आदूबाळ किंवा माझी मदत घेणे . घर मलाही माहित नाहीये पण सहज शोधता येईल हा माजी सदाशिवपेठकरी विश्वास आहे .
पुस्तकाची pdf प्रत वगैरे काही माहिती आहे का ?
अवांतर : घर बघण्यातला इंटरेस्ट का ब्रे ?
नाही रे. ब्राह्मण कार्याल
नाही रे. ब्राह्मण कार्यालयाचा नंबर १०००+ असावा.
२८६ सदाशिव माझ्या अंदाजाप्रमाणे लोकमान्य वाछनालयाच्या जवळ असावं. त्याचा नंबर २३० सदाशिव आहे.
आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार: भावेस्कूल ते विजय टॉकीज रस्त्यावर राजहंस लॉंड्रीशेजारचं घर. पुण्यात आलो की खात्री करून सांगतो.
अर्वाचीन अनारसे सामोसेवाल्याच्या गल्लीत. त्या गल्लीचं नावही आहिताग्नी राजवाडे पथ आहे.
तिथे कार्यालय आहे, पण ते
तिथे कार्यालय आहे, पण ते ब्राह्मण कार्यालय नाही.
भावेस्कूलकडून विजय टॉकीजच्या दिशेने यायला लागलास की ब्राह्मण कार्यालय पहिल्या उजव्या रस्त्यावर आहे. तिथे न वळता सरळ गेलं की राजहंस लॉंड्री पुढच्या चौकात (राजाराम मंडळाच्या चौकात) उजव्या कोपऱ्यावर, आणि डाव्या रस्ता म्हणजे आहिताग्नी राजवाडे पथ. ते घरही तिथेच कुठेतरी असावं.
भूतकाळ
>>तिथे न वळता सरळ गेलं की राजहंस लॉंड्री पुढच्या चौकात (राजाराम मंडळाच्या चौकात) उजव्या कोपऱ्यावर, आणि डाव्या रस्ता म्हणजे आहिताग्नी राजवाडे पथ. ते घरही तिथेच कुठेतरी असावं.<<
माझ्या आठवणीनुसार त्यांचा वाडा तिथे होता. काही वर्षांपूर्वी तो पाडला गेला. आता तिथे नवी इमारत उभी राहिली आहे.
नो एक्स्पर्ट बट २ सेंट्स्
हिंदू धर्माचरणाचे जुन्या पद्धतीने दोन भाग पडतात: श्रौत आणि स्मार्त. श्रुतिग्रंथांमध्ये (म्ह. वेद-उपनिषदे) सांगितल्याप्रमाणे धर्माचरण करणारे ते श्रौत, स्मृतिग्रंथांमध्ये (म्ह. पुराणे, मनु-नारद-याज्ञवल्क्यादि ग्रंथ) सांगितल्याप्रमाणे आचरण करणारे ते स्मार्त.
वेद-उपनिषदांमधला धर्म आणि पौराणिक धर्म यांच्यात खूप फरक आहे. ज्या देवांची प्रार्थना करतात ते देव वेगळे आहेत, शिवाय उपासनापद्धतीही वेगळ्या असतात. वेदकाळात देवळे बांधायची चाल नव्हती. खुल्या आकाशाखाली बसून यज्ञ करून आहुती समर्पण करून मंत्र म्हणायचे असे त्याचे स्वरूप होते.
सध्या भारतात अत्यल्पसंख्य श्रौत ब्राह्मण उरलेत. त्यातले बहुतेक केरळात आहेत. महाराष्ट्रात थोडेसे आहेत.
तर या श्रौत उपासनापद्धतीतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे अग्निहोत्र. अग्निहोत्र म्हणजे अभिमंत्रित केलेला अग्नी घरात कायम मेण्टेन करणे. प्राचीन काळी कैकदा एखाद्या गावाची स्थापना करायची असेल तर त्याकरिता जो अग्नी लागेल तो अशा अग्निहोत्र्याच्या घरून घेत असत. किंवा नवीन देऊळ बांधल्यावर त्याच्या प्रतिष्ठापनेसाठीचे विधी करताना जो अग्नी लागेल तो. जुन्या काळी असे अनेक अग्निहोत्री असत. ज्याच्या घरी असा अखंड अग्नि मेण्टेन्ड आहे तो आहिताग्नी.
मुळात श्रौत मार्गाचे अनुयायी नसलेल्यांना अग्निहोत्र घेता येते असेही दिसते राजवाड्यांच्या वर्णनावरून, परंतु नॉट शुअर अबौट द्याट.
अग्निहोत्र उगम
अग्निहोत्राचा उगम असा झाला असावा असा माझा तर्क आहे. ह्याला पुरावे उपलब्ध नाहीत पण commonsense च्या चष्म्यातून पाहिले तर ते पटण्याजोगे आहे.
वैदिक आर्यांचे पूर्वज ज्या अतिप्राचीन काळी लहानलहान कबिल्यांमधून राहात असतील आणि आपल्या पडावाच्या जागा शिकारीची उपलब्धता कमीअधिक झाल्यामुळे अथवा अन्य काही कारणाने वारंवार बदलत असतील तेव्हा अतिशय मौलिक संसाधन जो अग्नि तो सांभाळून नवीन जागी नेणे हे मोठेच जबाबदारीचे काम असणार कारण प्रत्येक नव्या जागी पहिल्यापासून नवा अग्नि प्रज्वलित करणे हे फार अवघड आणि वेळखाऊ काम आहे. एक मनुष्य आणि त्याचे कुटुंब ह्यांची जुना अग्नि नीट संभाळून नव्या जागी न्यायचा ही जबाबदारी असणार. हे वैदिक आर्य जसेजसे शेतीवाडी करायला लागून स्थिर होऊ लागले तसेतसे अग्नि सांभाळणारे आपल्या घरातच अग्नि चेतवून ठेवायला लागले आणि त्याला कर्मकांडात मोठे महत्त्व प्राप्त झाले.
शक्य आहे
पण एकंदरीतच होम, यज्ञ, त्यांचे आकार वगैरे प्रस्थ पाहता कर्मकांडच असण्याची शक्यता वाटते.
शिवाय, असा कुठलाच प्रकार इतर भटक्या अन पुढे स्थिरावलेल्या जमातींनी केलेला दिसत नाही. त्यांनाही आगीची गरज तितकीच लागत असणार. उलट, या आगींमुळे गवत वगैरे पेटून नुकसान होत असण्याची शक्यता पाहता, चांगलं स्थिरस्थावर झाल्यानंतरच 'प्रोटेक्शन' मध्ये आगी लावायला लागले असतील.
भटक्या आणि नंतर स्थिरावलेल्या जमाती.
सगळ्याच भटक्या जमातींमध्ये जुन्या पडावातून नव्याकडे अग्नि नेण्याची प्रथा असणार कारण दर जागी नव्या कोरड्या काटक्याकुटक्या जमा करून प्रत्येक वेळी चकमकीने प्रयत्नपूर्वक अग्नि निर्माण करण्याच्या प्रश्नाला ते सहज सुचणारे उत्तर आहे. पण सर्वच भटक्या जमाती स्थिर झाल्यानंतर त्यांच्यामध्ये वैदिक समाजात जसे जुन्या चालीरीतींचे ritualization झाले तसे झाले असे नाही. स्थैर्य आल्यावर आणि अग्नि सांभाळून न्यायची गरज संपल्यावर जुनी प्रथा विस्मरणातच गेली असणार. केवळ आर्य टोळ्यांमध्येच अशा ritualization मधून यज्ञसंस्था निर्माण झाली आणि तिच्याबरोबरच अग्नि सांभाळण्याचे ritual अग्निहोत्राच्या स्वरूपात टिकून राहिले असे म्हणायचे आहे.
आर्यांमध्ये गेलिगांची, केल्टांची सुद्धा गणना व्हावी
>>केवळ आर्य टोळ्यांमध्येच अशा ritualization मधून यज्ञसंस्था
घरचा अग्नी वर्षभर प्रज्वलित ठेवण्याची प्रथा होती म्हणे. दर वर्षी सौविन सणाच्या दिवशी घरचा अग्नी विझवून पुढच्या वर्षासाठी गावच्या मध्यवर्ती होळीमधून अग्नी आणत.
https://en.wikipedia.org/wiki/Samhain
--
मेक्सिकोच्या अॅझ्टेकांमध्ये सुद्धा ५२ वर्षातून एकदा विधिवत् बळी दिलेल्या माणसाच्या छातीवर पेटवलेला अग्नी आणून मग वर्षभर तो सर्व देवळात आणि घरी पेटवत अशी प्रथा होती असे शोधयंत्रांत सापडले...
https://en.wikipedia.org/wiki/New_Fire_ceremony
पण मधल्या काळात घरांमध्ये किंवा देवळांमध्ये अग्नी अव्यायत पेटलेला ठेवत की नाही, तो तपशील सापडला नाही.
अनेक ठिकाणचे पवित्र अग्निरक्षक
https://en.wikipedia.org/wiki/Firekeeper
Brigid - Irish Goddess served by women who tend an eternal flame
The Flying Head - Iroquois spiritual being
Hajji Firuz, Zoroastrian firekeeper.
Inipi - Lakota purification lodge
Sauna - Scandinavian sweat house
Sweat lodge - Ceremonial structures involving purification by fire and steam
Vestal Virgin - Roman flametenders
Sun Dance - Indigenous Ritual
धन्यवाद
आगीचं महत्त्व पृथ्वीवरील बहुतेक जमातींनी ओळखलेलं होतं आग ही त्यांच्या रोजच्या जीवनात ऊबेपासून ते संरक्षण वगैरेपर्यंत होती त्यामुळे याबाबत आश्चर्य वाटत नाही.
मला असं म्हणायचं होतं की, यज्ञ वगैरे कर्मकांड जशी एक प्रकारच्या धार्मिक समजुतीने वा पगड्याने रुजली आणि पुढे चालत आली तसाच हा प्रकार असावा.
कोल्हटकरांच्या प्रतिसादाशी विशेष असहमती नाही. पण त्यातून असे जाणवते की एका जीवनपद्धतीचे हे केवळ रूप पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. मला असं म्हणायचं आहे की काही गोष्टी अशा चालत येतात तर काही गोष्टी धर्माचा भाग होऊन पुढे त्या कर्मकांडं बनतात - थोड्या बहूत प्रमाणात अनिवार्य होतात.
हा फरक तसा सूक्ष्म असेल. पण ज्याप्रमाणे वरूणदेवाला साकडं वेगवेगळ्या जमाती घालतात. नागाची पूजाही जवळजवळ सगळेच करतात. वगैरेंशी तुलना करता अहिताग्नीतील वेगळेपण जाणवण्यासारखे आहे असे वाटते.
वाचलेले आहे...
हे पुस्तक मी अनेक वर्षांपूर्वी वाचलेले होते आणि तेव्हाच त्यातील विस्फोटक आणि मूळ हिंदु कर्मठपणाकडे जाणाऱ्या विचारांचे आश्चर्य वाटले होते. माझ्या आठवणीनुसार पुस्तक सनातनी विचारांचे अनेक जागी समर्थन करते म्हणजेच ते fundamentalist आहे. ब्राह्मण आणि ब्राह्मण्य हे सर्वश्रेष्ठ आहेत, मनूने म्हटलेले काही चूक नाही अशा प्रकारची विधाने जागोजागी आढळतात. उदाहरण द्यायचे तर ते सध्याच्या मुस्लिम विचारविश्वामध्ये जे चालले आहे त्याचे देता येईल. आपण ओसामा, सौदी राजवट इत्यादींना कडवे मुस्लिम मानतो पण आयसिसच्या विचारानुसार ते कडवे नसून शारियापासून भटकलेले पाखंडी आहेत आणि मृत्युदंड हीच शिक्षा त्यांना योग्य आहे. तसेच आहिताग्नींच्या मते ते स्वत: सनातन धर्माचे कडवे समर्थक आहेत पण बाकी सर्वांमध्ये काही ना काही उणे आहे.
त्यातील विचार वाचून ह्या पुस्तकावर वर अजून कोणी हल्ला कसा केला नाही, त्याच्यावर बंदी आणावी अशी मागणी कशी पुढे आलेली नाही असे विचार मनात आले होते असे आठवते. http://www.ahitagni-rajwade.com/rajwade.html ह्या वेबसाइटवर जेव्हा हे पुस्तक येईल तेव्हा ते जरूर उतरवून घेऊन पुन: वाचेन असे वाटते.
ह्या कडव्या सनातनी गृहस्थांना इंग्रज प्राध्यापक बेन ह्याचे मात्र अतोनात कौतुक होते ह्याचेहि आश्चर्य वाटले होते.
आत्ता हे लेख वाचून त्यांच्या वाड्यात माझी एक वर्गभगिनी राहात असे आणि तिच्याकडे मी कधीकधी गेलो होतो ही जुनी आठवण जागी झाली.