सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक पहिला

ललित

सातशे (वाचण्यासाठीचे एक नाटक) - अंक पहिला

- जयदीप चिपलकट्टी

अंक पहिला

पहिला: घे.

दुसरा: नको.

पहिला: घे रे.

दुसरा: नको.

पहिला: थोडीशी घे.

दुसरा: नको. थुंकायची पंचाईत होते.

पहिला: काहीसुद्धा पंचाईत नाही. मागे अोणवं होऊन दोन्ही चाकांमधोमध नेम धरून नि:शंकपणे पिचकारी मारायची. कुणी काही म्हणणार नाही, आणि तो रंग नंतर वेगळा उठूनही दिसणार नाही.

दुसरा: बरं, दे.

पहिला: घे. सुईच्या अग्रावर मावेल इतकीच दिली आहे.

दुसरा: (घेता घेता) रांडीच्या, तू असा वाह्यात बोलत जाऊ नको बरं! आजूबाजूला ऐकणारे खूप आहेत. हकनाक कुणाच्या भावना दुखावशील.

पहिला: हे पाहा, माझ्यावरचा स्नेह व्यक्त करण्यासाठी जर तू अपशब्द वापरणार असशील तर निदान पारिभाषिक चुका तरी करू नकोस. ‘रांडीच्या’ बरोबर नाही. मी रांडीचा नव्हे तर कांडीचा आहे. पैसे घेऊन संभोगासाठी शरीर देणं माझ्या आईला शक्य नव्हतं.

दुसरा: हो, आत्ता आठवलं. चुकलोच मी. तू म्हणतोस ते खरं आहे. दाती तृण धरून तुझी क्षमायाचना करायला हवी.

पहिला: नको! माझ्या आईला चावलास तर खराच रागावेन तुझ्यावर. पण आता थोडा वेळ विनोद स्थगित करूयात. दिलीय ती चाखून बघ.

दुसरा: (हुंगत) गोडमिट्ट वास आहे. मी काही ह्यातला दर्दी नव्हे, पण चांगल्या प्रतीची असावी.

पहिला: आहेच.

दुसरा: (कातरलेल्या सुपारीत मिसळून दोन्ही हात भरपूर चोळून फक्की मारत) पण तोंड अगदी कडूजार होतं बुवा.

पहिला: चांगल्या प्रतीची आहे असं मी म्हणालोच होतो. परिणाम अजून थोड्या वेळाने जाणवेल.

दुसरा: वाट पाहीन. ऐकलं आहे मी खूप, पण ह्या प्रांतात मला अनुभव बेताचाच आहे.

(यावर ‘शू! ऐकू द्या हो जरा…’ अशासारखे आवाज कुठूनकुठून येतात.)

पहिला: ऐकू काय द्या? सगळे एकजात मठ्ठ आहेत. इतक्या अंतरावरून ऐकू यायला ती काय गाईच्या गळ्यातली घंटा आहे?

दुसरा: पण किती वेळ चालणार आहे कुणास ठाऊक.

पहिला: किती वेळ चालणार आहे ते ठाऊक नाही, आणि नक्की काय चाललं आहे तेही ठाऊक नाही.

दुसरा: मला तशी घाई नाही. मी थांबायला तयार आहे.

पहिला: अर्थात मीही आहे, पण तरीदेखील एक ढोबळ अंदाज असलेला बरा.

दुसरा: विचारून पाहतो. (आजूबाजूला अोरडून) यादवांनो, काय चालू आहे ते काही कळतंय का?

(एक घोडेस्वार दौडत सामोरा येतो.)

घोडेस्वार: काही नीट समजत नाहीय, सेनाधिपती. मघाशी मी कोसभर पुढे जाऊन बघून आलो. थोरले गोपाळ अर्जुनाशी काहीतरी बोलताहेत. अर्जुनाने धनुष्य बाजूला फेकून दिलं आहे आणि तो गुडघ्यांत डोकं घालून नुसता बसून आहे.

पहिला: पण काय बोलताहेत ते ऐकू येत नाही?

घोडेस्वार: नाही, काही ऐकू येत नाही. सगळ्यांचा खोळंबा करून ठेवला आहे. सेनाधिपती, तुम्ही म्हणत असाल तर इथूनच एक बाण टाकून अर्जुनाचा प्रश्न सोडवतो. तसं करू का?

दुसरा (= कृतवर्मा): नको. धर्मयुद्धाच्या नियमांत ते बसत नाही.

घोडेस्वार: मग नाही करत. तुम्ही यादवांचे सेनापती आहात. हे नियम तुम्हाला जितके पक्के समजतात तितके मला अजून समजत नाहीत. पण मी प्रयत्न करत राहीन. हळूहळू मला ते पाठ होत जातील तसतसे आणखी चांगले समजत जातील.

पहिला (= कृपाचार्य): हे पाहा, आत्ताच्या प्रसंगी लागू होणारा नियम खूप सोपा आहे. रथातल्याने रथातल्याशीच आणि घोडेस्वाराने घोडेस्वाराशीच युद्ध करायला परवानगी आहे. अर्जुन रथात आहे आणि तू घोड्यावर आहेस. परस्परविरोधी सैन्यांत जरी असलात तरीदेखील तुम्ही थेट प्रतिस्पर्धी नव्हेत. सबब तुला त्याच्यावर बाण टाकता येणार नाही.

घोडेस्वार: समजलं.

(खट्टू होऊन धीम्या गतीने निघून जाऊ लागतो, पण थबकतो आणि वळून परत फिरतो.)

घोडेस्वार (कृतवर्मा आणि कृपाचार्य अशा दोघांनाही उद्देशून): आता विषय निघालाच आहे म्हणून विचारतो. हा एक नियम कळला, पण इतरही नियमांबद्दल मला राहून राहून शंका येतात. स्वस्थ बसवत नाही आणि लढण्याकरता मनाची पूर्ण तयारी झालेली आहे असं वाटत नाही. तुम्हाला विचारू का? तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुमच्याशी बोलून फायदा होईल.

कृपाचार्य: तू विचार, आम्हाला ठाऊक आहे तेवढं आम्ही सांगू. पण तुझं मन अगदी निवळशंख होईल अशी अपेक्षा बाळगू नकोस. कारण शंका मलाही आहेत.

घोडेस्वार: तुम्हालाही आहेत म्हणजे मी काय परिस्थितीत असेन पाहा. पण म्हणूनच विचारून घेतो.

कृतवर्मा: मग चला तर. नियम डोळ्यांसमोर ठेवूनच बोलू.

(युद्धाच्या तयारीचा भाग म्हणून कुरुक्षेत्राच्या धुळीत लाकडी खुंट्या ठोकण्यात आल्या होत्या. दक्षिणोत्तर आणि पूर्वपश्चिम जाणारे लांबलचक सुंभ ह्या खुंट्यांना ताणून बांधून चौरसांची जाळी बनवण्यात आली. प्रत्येक चौरसाची लांबीरुंदी एक सप्तमांश कोस आहे. धर्मयुद्धाचे नियम जिच्यावर ठसठशीत अक्षरांत कोरलेले आहेत अशी दीड हात गुणिले दोन हात आकाराची सपाट दगडी फरशी प्रत्येक चौरसाच्या वायव्य कोपऱ्यात जमिनीलगत पुरण्यात आली. माणूस कुरुक्षेत्रात कुठेही असला तरीदेखील फार अंतर कापावं न लागता त्याला हे नियम संदर्भासाठी उपलब्ध व्हावेत, असा यामागचा हेतू आहे. सध्या दक्षिणायन चालू असल्यामुळे, नियम वाचत असताना माणसाचं तोंड उत्तरेकडे व्हावं अशी योजना आहे जेणेकरून दिवसाच्या कुठल्याही वेळी सूर्य डोळ्यांवर येऊ नये. फरशा लावण्याचं काम पुरं झाल्यानंतर अर्थातच आता खुंट्या आणि सुंभ काढून टाकलेले आहेत. यांपैकी सर्वांत जवळच्या फरशीकडे कृतवर्मा आणि कृपाचार्य आपापले रथ नेतात. घोडेस्वार त्यांच्या मागोमाग येतो. शिलालेख असा आहे - )

धर्मयुद्धाचे नियम

(१) घोडेस्वाराने घोडेस्वाराशी, हत्तीवर बसलेल्याने हत्तीवर बसलेल्याशी, रथीने रथीशी आणि पदातिने पदातिशीच युद्ध करावे.


(२) वार करण्यापूर्वी प्रतिस्पर्ध्याला पूर्वसूचना द्यावी.


(३) वार करण्यापूर्वी प्रतिस्पर्धी तुल्यबळ आहे की नाही, आपल्याच वयाचा आहे की नाही, व हातघाईवर येण्याला आपल्याइतकाच उत्सुक आहे की नाही याचे भान ठेवावे.


(४)एखाद्याला शब्दांनी युद्ध खेळावयाचे असल्यास त्याला शब्दांनीच प्रत्युत्तर द्यावे.


(५)लढाईतून विश्रांती घेतेवेळी उभयपक्षांनी परस्परांशी स्नेहभावाने वागावे. एकमेकांना त्रास देऊ नये.


(६)जो दुसऱ्याबरोबर युद्धात गुंतला असेल किंवा गांगरलेला असेल किंवा पाठमोरा असेल अशास ठार मारू नये.


(७)ज्याचे शस्त्र नीट चालत नसेल किंवा चिलखत निकामी झाले असेल अशास ठार मारू नये.


(८)मैदान सोडून गेलेल्याला अथवा स्वत:च्या सैन्यगटातून बाजूला पडलेल्याला ठार मारू नये.


(९)गाडे हाकणारी किंवा शस्त्रांची वाहतूक करणारी माणसे, ढोल किंवा शंख वाजवणारी माणसे, तसेच अोझ्याची जनावरे यांच्यावर वार करू नये.


३७-पश्चिम २२-दक्षिण

घोडेस्वार (कृतवर्म्याला उद्देशून): सेनाधिपती, हे नियम बनवण्यात तुमचा सहभाग होता अशी यादवसेनेत बोलवा आहे.

कृतवर्मा: दोन्ही बाजूच्या सेनापतींनी एकत्र वाटाघाट करून ते बनवलेले आहेत. त्यात मीही होतो, पण नियमांतले सगळे कंगोरे मला माहित आहेत असा ह्याचा अर्थ नव्हे. आठपंधराजण मिळून एखाद्या गोष्टीला जेव्हा संमती देतात तेव्हा आपण कशाला संमती देतो आहोत याबद्दलच्या त्यांच्या कल्पना एकमेकांशी तंतोतंत जुळतातच असं नाही.

घोडेस्वार: हे नियम मोडणाऱ्याला शिक्षा काय आहे? मी वेगवेगळ्या अफवा ऐकलेल्या आहेत. काहीजण म्हणतात नुसती कानउघाडणी होईल, काहीजण म्हणतात तुरुंगात टाकतील, काहीजण म्हणतात पैशांचा दंड होईल तर काहीजण म्हणतात मृत्युदंड होईल.

कृतवर्मा: एकतर कुठला नियम कितपत मोडला यावर शिक्षा अवलंबून आहे. आणि अफवा म्हणशील तर त्या आम्ही सेनापतींनी मुद्दाम पसरवलेल्या आहेत. फायदा होतो म्हणून माणूस नियम मोडतो. पकडले जायची शक्यता किती आणि शिक्षा काय होईल हे त्याला आधी खात्रीने कळलं तर तो उजवा-डावा हिशेब करून नियम मोडायचा की नाही ते ठरवेल. तसा हिशेब करता येऊ नये म्हणूनच शिक्षा जाहीर केलेल्या नाहीत.

घोडेस्वार: आता कारण कळलं, पण ते मी इतरांना सांगत नाही. अफवा तशाच राहू देत. पण ह्या शिक्षा देणार कोण?

कृतवर्मा: कुणा सैनिकाने नियम मोडला तर त्याचा गणनायक त्याला शिक्षा करील. सैनिकाला जर ही शिक्षा मान्य नसेल तर तो वाहिनीनायकाकडे फिर्याद करू शकेल. त्यापुढे मात्र फिर्याद नाही. अर्थात गणनायकानेच आगळीक केली तर ते प्रकरण थेट वाहिनीनायकाकडे जाईल, किंवा वाहिनीनायकाने केली तर पृतनानायकाकडे जाईल. अशी ती चढण आहे.

आता असं पाहा की आपली कौरवसेना अकरा अक्षौहिणी आहे, म्हणजेच तिच्यात आठ हजार नऊशेदहा गणनायक आणि दोन हजार नऊशे सत्तर वाहिनीनायक आहेत. शिक्षा देताना किंवा फिर्यादीची दखल घेताना हे सगळेजण एकसारखे निर्णय घेणार नाहीत. इथेतिथे विसंगती उद्भवणारच, आणि ही चांगलीच गोष्ट आहे. न्याययंत्रणेत थोडासा गोंधळ असला तर तिचा वचक वाढतो. ती फार शिस्तशीर झाली तर गुन्हेगार तिचा फायदा घेतात.

घोडेस्वार: पण आता उदाहरणार्थ दुसरा नियम घ्या: वार करण्यापूर्वी प्रतिस्पर्ध्याला पूर्वसूचना द्यावी. समजा आपल्या सैनिकाने पांडवांच्या सैनिकावर पूर्वसूचना न देता वार केला. तर त्याला शिक्षा कोण देणार? आपला गणनायक की त्यांचा?

कृतवर्मा: दोघांपैकी कुणीही चालेल. जो लवकर हजर होईल तो किंवा ज्याला कमी काम असेल तो. पण असे प्रसंगच जितके तुरळक येतील तितके चांगले. ह्यात अडचण अशी की समजा शूरसेनाने धैर्यधरावर वार केला. ह्यात जर धैर्यधर दगावला तर तो वार पूर्वसूचना देऊन केलेला होता की नाही हे कसं सिद्ध करणार? तर संकेत असा आहे की शूरसेनाने धैर्यधराला पूर्वसूचना द्यावी, ती आपण दिलेली आहे हे आजूबाजूच्यांना अोरडून सांगावं आणि आपल्याला पूर्वसूचना मिळालेली आहे हे धैर्यधराने आजूबाजूच्यांना अोरडून सांगावं. इतकं झाल्यानंतरच धैर्यधर आणि शूरसेन हातघाईवर येऊ शकतात. ह्यामुळे नंतर वाद राहणार नाही.

कृपाचार्य: हाच धडा तिसऱ्या नियमालाही लागू आहे. म्हणजे हातघाईवर येण्यापूर्वी हे दोघे तुल्यबळ होते की नाही याची आजूबाजूच्यांनी खात्री करून घ्यायला हवी. कारण नाहीतर समजा शूरसेनाच्या हातून धैर्यधर मारला गेला तर ते दोघे तुल्यबळ नव्हते, धैर्यधर कमकुवत होता म्हणून मारला गेला असा विपर्यस्त अर्थ नंतर कुणीतरी काढू शकेल.

घोडेस्वार: मी गणनायक नाही हे एकूण बरंच आहे तर. कारण वाद झाला तर निवाडा करण्याचं काम माझ्या आवाक्यातलं वाटत नाही.

कृतवर्मा: तसं ते थोडंसं गुंतागुंतीचं आहे खरं. आता तिसऱ्या नियमाचंच पाहा. हातघाईला येण्याकरिता दोन सैनिक एकमेकांइतकेच उत्सुक आहेत का हे ठरवण्याचा प्रश्न आहे. आम्ही जेव्हा हा नियम बनवला तेव्हा एका सेनापतीने काढलेली शंका सांगतो. कौरवांकडच्या सरासरी सैनिकाला सोयीसाठी आपण शंभू म्हणू आणि पांडवांकडच्या सरासरी सैनिकाला पंचू म्हणू. आता असं समजा की शंभू हा पंचूपेक्षा लढायला जास्त उत्सुक आहे. ह्यामागचं कारण काहीही असेल; कदाचित आपली बाजू जास्त न्यायाची आहे असं कौरवांना वाटत असेल, पण ते महत्त्वाचं नाही. नियमाप्रमाणे हे दोघे एकमेकांशी लढू शकणार नाहीत. शंभूला पंचूपेक्षा जास्त उत्सुक प्रतिस्पर्धी शोधून काढावा लागेल, आणि शंभूपेक्षा उत्सुक असलेल्या कौरवसैनिकाला पंचूपेक्षा खूपच जास्त उत्सुक पांडवसैनिक शोधून काढावा लागेल. होता होता होईल काय की कौरवसेनेतल्या अनेकांना जोडच मिळणार नाही. आधीच आपली कौरवसेना संख्येने जास्त आहे. त्यात असं होऊ लागलं तर आपल्यातल्या निम्म्यांना बसूनच राहावं लागेल.

कृपाचार्य: ही अडचण आहे खरी. आणि अशीही शक्यता आहे की नुसतं बसून राहिल्यामुळे कौरवसैनिकांचे हात शिवशिवत जाऊन ते हातघाईला आणखी जास्त उत्सुक होतील, आणि याउलट लढाई करून करून पांडवांचं अौत्सुक्य कमी होईल. यामुळे ही तफावत वाढतच जाईल.

कृतवर्मा: तर यावर दुसऱ्या एका सेनापतीचं म्हणणं पडलं की अौत्सुक्य हे आपापल्या सैन्याच्या सापेक्ष मोजावं, म्हणजे शंभू आणि पंचू एकाच पातळीचे समजावेत. मग ते एकमेकांशी लढतील, आणि शंभूच्या दीडपट उत्सुक असलेला कौरवसैनिक पंचूच्या दीडपट उत्सुक असलेल्या पांडवसैनिकाशी लढेल. ही मोजणीपद्धतही चुकीची म्हणता येण्यासारखी नाही. आणखी एका सेनापतीचं मत पडलं की जर प्रतिपक्षातला सैनिक तितकासा उत्सुक नसेल तर त्याला शिवीगाळ करून चिथवावं आणि उत्सुक बनवावं. चौथ्या नियमात ही तरतूद केलेली आहेच. पण एकदा ह्या आडरानात शिरलं की खूप फाटे फुटतात. समजा एखाद्या सैनिकाला लढण्यात काही रस नाही. तर तो इतरांना चिथावून आपल्यापेक्षा खूप जास्त उत्सुक बनवू शकेल, जेणेकरून त्याला स्वत:ला कुणाशीच युद्ध करावं लागणार नाही. शेवटी आम्ही असं ठरवलं की युद्धाचे पाच दिवस लोटल्यानंतर परिस्थितीची पाहणी करून तिसऱ्या नियमाचा अर्थ निश्चित ठरवावा. युद्ध मार्गी लागल्यानंतर जे अौत्सुक्य टिकेल ते खरं. आधीचं खरं नाही.

घोडेस्वार: एकूण एवढं कळलं की नियमाचा अर्थ लिहिल्यालिहिल्या निश्चित होत नाही. तो सावकाश उलगडत जाईल. पण असं सगळ्याच बाबतीत होऊ लागलं तर मूळ सेनापतींच्या मनात जे अर्थ होते ते बाजूलाच राहतील.

कृतवर्मा: म्हटलं ना, मूळचे अर्थ असे पक्के नव्हतेच. सगळ्या सेनापतींनी सगळ्या नियमांना हो म्हटलं असलं तरी प्रत्येकाला अभिप्रेत असलेला अर्थ थोडाथोडा वेगळा होता.

घोडेस्वार: ठीक आहे, शेवटी तुम्ही जसं म्हणाल तसं. मी काही एवढा हुशार नाही. पण आता एक सोपा प्रश्न विचारतो. ढोल किंवा शंख वाजवणाऱ्या माणसावर वार करू नये असं नवव्या नियमात लिहिलेलं आहे. पण उदाहरणार्थ तुतारी वाजवणाऱ्यावर वार केलेला चालेल असा याचा अर्थ नसणार.

कृतवर्मा: नाही, तसा अर्थ नाही.

घोडेस्वार: पण मग ‘वाद्य वाजवणाऱ्यावर वार करू नये’ असं सरळ का नाही लिहिलं?

कृतवर्मा: कारण नियम बनवताना कोणत्या परिस्थितीत माणसं तो पाळतात याचा विचार करावा लागतो. ‘वाद्य’ हा अमूर्त शब्द आहे. तो वाचून डोळ्यांत निश्चित असं चित्र उमटत नाही किंवा कानांत निश्चित असा आवाज उमटत नाही. ‘ढोल’, ‘शंख’ असे स्पष्ट शब्द वापरण्यामुळे मनावर नेमका परिणाम होतो. ह्यामुळे होतं काय की रणधुमाळीत असतानाही हा नियम लक्षात राहतो. अमूर्त नियम तितक्या ठाशीवपणे लक्षात राहात नाही. पण अर्थात तुतारीचा आवाज जरी ढोलासारखा किंवा शंखासारखा नसला तरी तिलाही तोच नियम लागू आहे. तेवढं तारतम्याने समजून घ्यायचं आहे.

घोडेस्वार: पण मला शंका अशी आहे. समजा कुणीतरी एका सैनिकाने - त्याला बलवंत म्हणू - एका तुतारीवाल्यावर वार केला. इतरांनी त्याला जाब विचारला तेव्हा बलवंत म्हणाला की तुतारीचा उल्लेख तुम्ही केलेला नाही तेव्हा तुतारीवाल्यावर वार करण्याची मला मुभा आहे. तर मग काय?

कृपाचार्य: मला वाटतं हा बचाव आपल्याला स्वीकारावा लागेल, आणि बलवंतला निर्दोष सोडावा लागेल. यामागचं कारण असं की अध्याहृत नियम लादता येत नाही.

कृतवर्मा: ते मान्य आहे, पण अशीही एक शक्यता आहे की ह्या घटनेनंतर तुतारीवाले, ढोलवाले आणि शंखवाले हे सगळेच बलवंतला वाळीत टाकतील. तसं झालं तर तो लढाई करत असताना आजूबाजूला वाद्यं वाजवून त्याला प्रोत्साहन द्यायला कुणी नसेल, आणि बलवंतला ह्याची टोचणी लागेल. ढोलवाले, शंखवाले आणि तुतारीवाले ह्यांच्यात आपापसांत एक आपुलकीची भावना असते. आपण सारे एक असं ते समजतात. तसं पाहिलं तर बलवंत हा शब्दश: अर्थ घेऊन चालणारा माणूस असल्यामुळे शंखढोलवाल्यांना त्याच्यापासून धोका नाही. पण तरीदेखील आपल्यातल्या एकावर वार म्हणजे आपल्या सर्वांवर वार असं त्यांना वाटू शकतं.

कृपाचार्य: आता यापुढे समजा बलवंतला तुतारीशंखढोलवाल्यांनी वाळीत टाकल्याची बातमी सर्वदूर पसरली. तर त्यानंतर नववा नियम जो कोणी वाचेल त्याला ‘कुणाही वादकावर वार करू नये’ हे अलिखित कलम आपोआपच दिसायला लागेल. पण ह्या नियमापुरतीच ही बाब मर्यादित राहणार नाही, तर सगळीच अलिखित कलमं आवर्जून लक्षात ठेवायला हवीत ही जाणीव मूळ धरू लागेल. तेव्हा एक तुतारीवाला मरेल कदाचित, पण लोकजागृती करून मरेल. जर तुतारीवाल्यांचा उल्लेख आधीच केला असता तर हा परिणाम झाला नसता. तेव्हा नियम मुद्दाम अर्धवट लिहिण्यातून कधी कधी फायदा होतो तो असा.

घोडेस्वार: हो, तेवढं मला आधीच समजलं होतं. सगळ्याच गोष्टी लिहिता येणार नाहीत. तसं करायला गेलं तर शिलालेख फार मोठा आणि किचकट होईल. पण आता तुम्ही अलिखित म्हणता त्यावरून विचारतो. सातव्या नियमात असं आहे की एखाद्याचं शस्त्र नीट चालत नसेल किंवा चिलखत मोडलं असेल तर त्याला मारू नये. शंखढोलाबरोबर तुतारी अलिखित आहे तसंच चिलखताबरोबर शिरस्त्राण अलिखित आहे असं मी समजतो. पण अशी कल्पना करा की शूरसेन आणि धैर्यधर ह्या दोघांची जुंपलेली आहे आणि शस्त्रं, चिलखतं वगैरे ठीकठाक आहेत. अशावेळी समजा शूरसेनाने धैर्यधराच्या चिलखतावर वार करून ते मोडलं. तर आता ताबडतोब लढाई थांबवायची असा त्याचा अर्थ होतो का?

कृतवर्मा: नाही. मी म्हणेन की त्यांनी जर सगळे नियम पाळून लढाईला सुरुवात केली असेल तर नंतर नियम मध्ये येणार नाही. कारण कुणाचं तरी शिरस्त्राण किंवा चिलखत निकामी झाल्याखेरीज तो मरणं अवघड आहे. निकामी या शब्दाचा अर्थच तो आहे. पण युद्ध जर केव्हातरी संपायला हवं असेल तर सैनिक मरणं त्यासाठी आवश्यक आहे, म्हणजेच केव्हा ना केव्हा तरी शिरस्त्राण आणि चिलखतं निकामी होणं आवश्यक आहे. तेव्हा नियमांचा अर्थ लावताना आपल्याला व्यापक उद्दिष्टं विसरून चालणार नाहीत.

घोडेस्वार: हे चांगलं सांगितलंत तुम्ही. हीच पद्धत मी सगळीकडे लावत जाईन. म्हणजे समजा शूरसेन आणि धैर्यधर युद्धाला तितकेच उत्सुक होते, आणि सगळे नियम पाळून त्यांनी लढाई सुरू केली. आता समजा धैर्यधराची पीछेहाट होते आहे, आणि म्हणून हातघाई चालू ठेवण्याबद्दलचं त्याचं अौत्सुक्य कमी व्हायला लागलेलं आहे. अशा वेळी शूरसेनाने थांबायचं का? तर नाही. कारण युद्ध जर केव्हातरी संपायला हवं असेल तर सैनिक मरणं त्यासाठी आवश्यक आहे, आणि एखाद्याचा उत्साह कमी पडतो आहे हे काही त्याला न मारायला सबळ कारण नव्हे. तेव्हा इथेही एक मार्गदर्शक तत्त्व म्हणून व्यापक उद्दिष्ट उपयोगी पडतंच. बरोबर आहे ना माझं?

कृतवर्मा: अगदी बरोबर आहे.

घोडेस्वार: चिलखत आणि अौत्सुक्य ह्या गोष्टींना एकमेकांची उपमा देता येईल हे माझ्या आधी लक्षात आलं नव्हतं. प्राचीन काव्यातल्या अनेक प्रतिमा अशाच आहेत. आपल्याला त्या अोढीवताणीव वाटतात, पण त्यांच्यामागे विचार असतो.

कृतवर्मा: हो ना! काव्यरम्यता आणि युद्ध यांचा संबंध जुना आहे.

कृपाचार्य: मी तर याहीपुढे जाईन. ही जी व्यापक उद्दिष्टं तुम्ही म्हणता ती नियमांचा अर्थ लावतानाच उपयोगी पडतात असं नाही. आपण नियमांचा गैरफायदा घेऊ नये याबद्दल दक्षता म्हणून सैनिकांनी ती सतत मनात ठेवायला हवीत. आता चौथ्या नियमाचंच पाहा. जर धैर्यधराला शब्दांनीच युद्ध करायचं असेल, म्हणजे प्रतिपक्षाला नुसती शिवीगाळ करायची असेल तर शूरसेनाने त्याला मारू नये, फक्त उलटी शिवीगाळ करावी असा तो नियम आहे. पण सगळेच सैनिक जर नुसती शिवीगाळ करू लागले तर कोणी मरणार नाही आणि युद्ध कधी संपणार नाही. तेव्हा शिवीगाळीला परवानगी जरी असली तरी ती अधूनमधूनच करावी. हे नियमांत जरी उघडपणे लिहिलं नसलं तरी व्यापक उद्दिष्ट आणि नियम ह्यांच्या संयोगातून स्पष्ट होतं.

घोडेस्वार: एकूण तुम्हाला प्रश्न विचारत गेलो ते बरंच झालं. सगळंच जरी नाही तरी पुष्कळसं कळलं. युद्धात एकदा पडलो की अनुभव गोळा होत जाईल आणि माझी समजही वाढेल. तसंच व्हायला पाहिजे. माझा अंदाज असा आहे की दोन्ही बाजूंचं सैन्य जसजसं घटत जाईल तसतसे आम्ही उरलेले सैनिक धर्मयुद्धाच्या नियमांत जास्त जास्त निष्णात होत जाऊ. गर्दी कमी होत गेली की विचार करायलाही पोषक वातावरण मिळेल. आजूबाजूला धांदल-धबडगा असला की काही सुचत नाही.

कृतवर्मा: आणि युद्ध नाहीच झालं तरी आपण केलेली चर्चा वाया जाणार नाही.

कृपाचार्य: बिलकुल वाया जाणार नाही. शब्दच्छल करण्याचा सराव कधी वाया जात नाही.

कृतवर्मा: ते ठीकच आहे, पण युद्धाचं काय होणार याबद्दलची अनिश्चिती संपवायला हवी. असाच वेळ जात राहिला तर सैनिक बिथरतील. त्यांना कधीतरी काहीतरी ठाम सांगून टाकावं लागेल: युद्ध होणार आहे की नाही?

कृपाचार्य: संजयला ठाऊक असेल. दूरवरचं दिसतं किंवा दूरवरचं ऐकू येतं असा कसलासा वर त्याला मिळाला आहे म्हणे. धृतराष्ट्राचा नोकर म्हणून सध्या त्याची नेमणूक आहे. धृतराष्ट्राला युद्धाची हकिकत सांगण्याचं काम त्याच्याकडे सोपवलेलं आहे.

कृतवर्मा: त्याला विचारून येऊ का? नाहीतरी इथे करण्यासारखं दुसरं काही नाही.

कृपाचार्य: त्याला घेऊनच ये.

कृतवर्मा: पण त्याच्या कामाचं काय?

कृपाचार्य: धृतराष्ट्राला सतत झोप येते. ती त्याची जुनी सवय आहे. युद्धाची हकिकत त्याला नंतर ऐकवली तरी चालण्यासारखं आहे. आपल्याला काही गोष्टी इतरांपेक्षा उशीरा सांगितल्या जातील ह्याची आंधळ्या माणसाला सवय असते.

कृतवर्मा: ठीक तर, मी संजयला घेऊन येतो. पण तू इथेच थांब. नाहीतर तुला शोधणं फार अवघड होईल.

कृपाचार्य: तू ये, मी जागचा हलत नाही. (समोरच्या शिलालेखाकडे निरखून पाहून) सदतीस पश्चिम आणि बावीस दक्षिण हा संदर्भबिंदू लक्षात ठेव. पण सांभाळून जा. गर्दी खूप आहे.

कृतवर्मा: गर्दी माझ्या लक्षात आलेली नाही असं तुला वाटतं का?

घोडेस्वार: माझा घोडा घेऊन गेलात तर बरं पडेल. गर्दी फार आहे. रथ सहजी नेता येणार नाही.

(घोडेस्वार घोड्यावरून उतरतो, आणि लगाम धरून अदबीने उभा राहतो. कृतवर्मा घोड्यावर मांड ठोकतो.)

घोड्यावरून उतरलेला सैनिक: संजय बहुतेक त्या दिशेला कुठेतरी आहे. (बोट दाखवतो.) आपलं यादवसैन्य पुष्कळ मागे आहे, तेव्हा कुरुक्षेत्राच्या सीमारेषेपासून आपण फार लांब नसणार. तुम्हाला घटकाभरापेक्षा जास्त वेळ लागू नये. नाहीतर रस्ता चुकलात असं समजा.

कृतवर्मा: आलोच. (घोडा दौडत दूरवर निघून जातो.)

कृपाचार्य (घोड्यावरून उतरलेल्या सैनिकाला उद्देशून): कौरवसेनेमध्ये यादवांचं स्थान विशेष प्रतिष्ठेचं नाही, हे सगळ्यांना ठाऊक आहे. खोचक शेरे मारून त्याची आठवण करून दिली पाहिजे असं नाही.

सैनिक: चुकलो. तसं काही माझ्या मनात नव्हतं. मी आपला सहज बोललो. पण यापुढे सैन्याची शिस्त पाळत जाईन.

कृपाचार्य: आता तू स्वत:च्या गणाकडे परत जा. निश्चित काही कळलं तर सैन्यात बातमी पसरवण्याची व्यवस्था आम्ही करू. तुझा गणक्रमांक काय आहे?

सैनिक: पंधरा हजार सातशे सोळा. घोड्याच्या गळपट्टीवर लिहिलेला आहे.

कृपाचार्य: तुझा घोडा मी नंतर पाठवून देईन. नीघ तू आता.

(सैनिक नमस्कार करतो आणि चालत निघून जातो.)

कृपाचार्य (स्वत:शीच): तजवीज पुरेशी आहे ना हे पाहावं. (कमरेची चंची काढून पाहतो, पण त्यात काही नाही.) हं! संपलेली दिसतेय. (आजूबाजूला आवाज देत) अरे, कुणाकडे शिल्लक आहे का रे थोडीशी?

(काहीजण आपापल्या चंच्या धुंडाळण्याचा अभिनय करतात, तर काहीजण त्या खरोखरीच धुंडाळतात. ‘नाही, शिल्लक नाही. संपली आहे’ अशी प्रत्युत्तरं येतात. ‘साठा करून ठेवला पाहिजे. सीनूला बोलवा. तिच्याकडे असते.’ असे आवाज जागोजागी निघतात. ‘सीनू! सीनू! कुठे आहेस तू? सीनू!’ अशासारख्या आरोळ्या सैन्यात पसरत जातात.)

(एक सैनिक दबक्या पावलांनी कृपाचार्याजवळ येतो.)

सैनिक: नमस्कार, आचार्य.

कृपाचार्य: नमस्कार.

सैनिक: आपलं दर्शन घ्यावं म्हणून आलो. मी गणक्रमांक बहात्तर हजार तीनशे पंचावन्नमध्ये असतो.

कृपाचार्य: आहे का थोडी?

सैनिक: थोडा आहे. हा घ्या. (एक सुरई पुढे करतो.)

कृपाचार्य: थोडा आहे?

सैनिक: तुम्हाला आवडतो हे मला ठाऊक आहे म्हणून आणला. चांगल्या प्रतीचा आहे.

कृपाचार्य (वास घेत): सोमरस?! मला सोमरस आवडतो म्हणून तुला कुणी सांगितलं?

सैनिक: नाही, मला ठाऊक आहे. आपण घ्या. मी कुणाजवळ बोलायचा नाही.

कृपाचार्य: अरे, मी त्यातला नाही.

सैनिक: नाही, आपण घ्या. मी कुणाजवळ बोलायचा नाही. नंतर आणखीही आणून देईन. मी गणक्रमांक बहात्तर हजार तीनशे पंचावन्नमध्ये असतो.

कृपाचार्य: तुला काही हवं आहे का?

सैनिक: नाही, माझी काही अपेक्षा नाही. मेलेला माणूस तुम्ही जिवंत करू शकता असं ऐकलं, म्हणून दर्शन घ्यायला आलो. अपेक्षा काही नाही. युद्धात मेलेला माणूस स्वर्गात जातो, तेव्हा उगीच पुन्हा जिवंत कशाला व्हायचं? माणसाला घराची अोढ वाटली, बायकोची अोढ वाटली तरी अशा मोहांत त्याने अडकून पडू नये. तळहातावर शीर घेऊन लढावं. इथे आलो आहे तो मरायच्या तयारीने आलो आहे. नंतर मला जिवंत वगैरे काहीही व्हायचं नाही. घ्या, आपण घ्या.

कृपाचार्य (त्रासिक चेहरा करून): बाबारे, सोमरस आवडतो आणि मेलेला माणूस जिवंत करू शकतो तो शुक्राचार्य. मी कृपाचार्य. तो मी नव्हे.

सैनिक: असं होय! चुकलोच की. आता आम्हाला अक्षरज्ञान नाही. जे कानी पडतं त्यावर विसंबून राहावं लागतं. त्यात कधीमधी घोटाळा होतो. आणि गर्दी खूप आहे हो. चेहरे लक्षात ठेवायला अवघड जातं.

कृपाचार्य: मी कौरवांचा शिक्षक होतो. त्यांच्या बाजूने लढतो आहे. पण इथे कुणी अोळखत नाही. विद्वान माणसाची किंमत सर्वत्र पूज्य असते अशी जी एक शब्दचमत्कृती आहे, ती असायला नको तितकी खरी आहे.

सैनिक: चुकलो म्हणतोच आहे. माफ करा. पण ते राहू द्या. आपण घ्या. (सुरई पुढे करतो.)

कृपाचार्य (चेहरा आणखी त्रासिक करून): बाबारे, मी त्यातला नाही! तो सोमरस तुलाच ठेव, आणि मरण्यापूर्वी सगळा संपवूनच मर.

(सैनिक अोशाळा चेहरा करून परत जातो.)

कृपाचार्य (स्वगत): मला सोमरस नको. बुद्धीला बथ्थड बनवणारा तो सोमरस मला नको. स्वसंतुष्टतेची लिबलिबीत साय मनावर लिंपणारा तो सोमरस मला नको. संपूर्ण त्रिखंडामध्ये सोमवर्मा आणि गोमवर्मा हे दोघेच माझे मित्र असल्याचा आभास उत्पन्न करून, मध्यरात्रीच्या किर्र शांततेत गळ्यांत गळे घालून आम्हाला रडायला लावून, दुसऱ्या दिवशी सकाळी तिघांनाही तिघांचीही घृणा वाटायला लावणारा तो सोमरस मला नको.

मला अफू हवी. बुद्धीच्या नागिणीला डिवचून फणा काढायला लावणारी अफू मला हवी. इंद्रियांचे निरोप हृदयापर्यंत पोहोचवणाऱ्या नीलरज्जूंमध्ये ताण भरून त्यांच्या झणत्काराने विचारशक्तीला खणखणून जाग आणणारी अफू मला हवी. पायात लटपट भरणारा सोमरस मला नको, तर मनाच्या वारूवरची मांड पक्की करणारी अफू मला हवी.

सोमरस हा अस्वस्थ पदार्थ आहे. शरीरातल्या ज्या द्रवाच्या सान्निध्यात तो येतो त्यामध्ये खळबळ आणि बंडाळी माजवल्याखेरीज तो राहात नाही. सोमरस रक्तद्रवामध्ये क्षोभ माजवतो, जेणेकरून नाक लाल होतं आणि माणसाचा विदूषक बनतो. सोमरस हा चंद्राचा अंश आहे. शरीरातल्या समुद्राच्या अंशामध्ये तो क्षोभ माजवतो, जेणेकरून माणसाला लघुशंकेची भावना होते. पण ऐंद्रिय संवेदनांची सोमरसामुळे अशी हबेलहंडी उडते की कितीही वेळा जरी ती केली तरीदेखील पुन्हा लागायची म्हणून राहात नाही. शरीरातल्या वीर्यद्रवामध्ये सोमरस क्षोभ माजवतो, जेणेकरून माणसाचा कामज्वर उफाळून येतो. परंतु कामज्वर शमवणारा अवयव हाच नेमका लघुशंका करणारा अवयव असल्यामुळे दोन जिभांनी केलेल्या ह्या दुहेरी आर्जवासमोर बिचारा गोंधळून जातो, आणि एकाग्रतेची ज्या वेळी सर्वाधिक गरज असते त्याच वेळी ती अशक्य होऊन बसते. कामक्रीडा जर करायची तर त्यासाठी इंद्रिय टक्क जागं असायला हवं, आणि हे इंद्रिय कोणतं तर बुद्धी. पण सोमरस नेमका ह्या बुद्धीलाच गोंधळून टाकून तिचा ताठर कणा लेचापेचा करून सोडतो. आणि म्हणूनच मला सोमरस नको.

पण याउलट अफूची मातब्बरी पाहा! मनातल्या शक्तींचा ती संमेळ करते, जे विखुरलं आहे ते सुरचित करते, आणि ज्याचा क्षोभ झाला आहे त्याचं शांतवन करते. बुद्धीवरची अभ्रं अफूमुळे विरून जातात आणि प्रखर सूर्यप्रकाशाने मन न्हाऊन निघतं. सोमरसातला आनंद हा रेम्याडोक्याचा आनंद आहे, तर अफूतला आनंद हा बुद्धिमंताचा आनंद आहे. मी बुद्धिमंत आहे. मला अफू हवी.

हे माझ्या डोळ्यांनो! आईच्या हिरव्या पदरावर आशाळभूतपणे दृष्टी खिळवून असणाऱ्या तृष्ण बालकासारखे वायव्येकडे काय पाहता?! हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी योजनगणती पसरलेल्या शिवारांत डोलणारे ते कोवळे लुसलुशीत हिरवे अमृतकुंभ तुम्हाला इथून थोडेच दिसणार आहेत? ते आहेत गांधारात आणि आपण आहोत भारतात. इथून ते खूप लांब आहेत. आणि इथेच जरी असते तरी काय उपयोग होता? ह्या घुमटदार स्तनांमधून जो चिकट दुग्धस्राव पाझरतो तो लगबग करून तसाच नाही काही चुरूचुरू पिता येत! दगडी कलशामध्ये ह्या पयोधरांना दोहून, सूर्यनारायणाच्या भाजऱ्या किरणांखाली त्यांच्यातला सारा भावनेचा अोलावा बाष्पीभवित करून टाकावा लागतो; आणि अशा प्रकारे तर्ककठोर बनलेला तो किरमिजी घनपदार्थ, चिंचोळ्या आणि धोकेबाज अशा खैबरखिंडीतून, तीन पापण्या असणाऱ्या बेदरकार उंटांच्या पाठींवरून वाहून इथपर्यंत आणावा लागतो, तेव्हा कुठे त्या आईच्या पदराआडची गोड माया ह्या कडवट हृदयाच्या कृपाचार्याला प्राशून घेता येते. पण हरकत नाही. अठरा अक्षौहिणींच्या गराड्यात सापडलेलं आणि हत्तीघोड्यांच्या लीदेने व सहबांधवांच्या विष्ठेने लिडबिडलेलं हे वास्तव इतकं असह्य आहे की थोड्याशा मायेला मी नाही म्हणणार नाही.

नको, मला सोमरस नको. काहीही लभ्यांश न देणाऱ्या एका युद्धासाठी, आयुष्यात एकदोनदाच लांबून पाहिलेल्या कोण्या राजाच्या हुकुमावरून घरदार सोडून देऊन माझे भोळे सैनिक इथे जमले आहेत. त्यांनी जरूर प्यावा तो सोमरस आणि जरूर साजरे करावेत ते कृतकवीरश्रीचे सोहळे, पण त्यांच्यात रमणारा मी नव्हे. सोमरस पिणाऱ्याचा आनंद हा कळपात राहणाऱ्याचा आनंद आहे, तर अफू घेणाऱ्याचा आनंद हा एकट्या माणसाचा आनंद आहे. कुरुक्षेत्राच्या ह्या कोलाहलात सत्तेचाळीस लक्ष तेवीस हजार नऊशे एकोणीस माणसांनी वेढलेला असताना मनातून मात्र मी एकटा आहे. आणि म्हणूनच मला सोमरस नको, अफू हवी.

(‘सीनू येते आहे! कुठे आहे? ती पाहा! सीनूला वाट सोडा! ह्या मातकट मैदानात आम्हाला मातेची ममता देणारी स्नेहाळ सीनू इकडेच येते आहे!’ अशा आरोळ्या सैन्यात दूरवर जन्म घेऊन जवळ येऊ लागतात. लाकडाच्या हातगाड्याला चामड्याच्या वाद्या बांधून अोढत आणणारी लहान चणीची पण दणकट हाडापेराची एक स्त्री कृपाचार्याच्या दिशेने येते आहे. तिचा गोल चेहरा नेहमी हसरा असतो. तिने घातलेल्या पिवळ्याधमक रेशमी झग्यावर शेंदरी रंगाची आग अोकणारे लांबलचक हिरवे साप चितारलेले आहेत. उंच, शेलाटा आणि खिन्न चेहऱ्याचा एक पुरुष तिच्या सोबतीला आहे. त्याचा डगला आणि पाटलोण दोन्हीही मंद निळ्या रेशमाचे आहेत. पुरुषाच्या चेहऱ्यावर असलेल्या भाजल्याच्या खुणा त्याने पांढऱ्या दाढीमागे लपवल्या आहेत.

चामड्याच्या वाद्या खांद्यावरून उतरवून सीनू त्या सोडून देते आणि कृपाचार्यासमोर येऊन गाड्यापुढे उभी राहते. तिचे खांदे आपल्या लांबलचक बोटांनी अलगद दाबून धरत उंच शेलाटा माणूस तिच्या मागे येऊन थांबतो.)

स्त्री: नमस्कार, मी सीनू! आणि हा माझा खूप जुना मित्र मयाहुर. तुम्ही अडचणीत आहात असं कळलं.

कृपाचार्य: अडचणीत नाही, पण चणचणीत आहे. माझ्याजवळची अफू संपली आहे.

सीनू: काळजी नको! माझ्याकडे भरपूर आहे. गाड्यातली पुष्कळशी जागा मला तिच्यासाठीच राखून ठेवावी लागते. युद्धात इतकी भरभर खपणारी दुसरी वस्तू नाही. घ्या! (काळसर किरमिजी रंगाच्या चिकट पदार्थाची एक चौकोनी वडी त्याला आणून देते. तो कमरेच्या कशाचे बंद सोडू लागताच ती नम्रपणे ‘नको’ म्हणते.) तुमच्याकडून मी पैसे घ्यायची नाही. सैनिकांना किरकोळ वस्तू विकून मी पोट जाळते. अशा धंद्यात वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. तेव्हा तुमच्याकडून मी काही घ्यायची नाही. याला लाचलुचपत म्हणत नाहीत. याला जनरीत म्हणतात. अंगदेश असो, मद्रदेश असो की पांचालदेश असो, सगळीकडे ती एकच असते. घ्या!

(इतर सैनिक आजूबाजूला दाटी करू लागतात.)

(सैनिकांना) अरे, थोडा दम धरा. द्वाडपणा नका करू. सगळ्यांना देते. रीतसर रांग लावा पाहू. सैन्याला शिस्त हवी. हे बघा, माझा दर ठरलेला असतो. मी घासाघीस ऐकून घ्यायची नाही. सोन्यात देणार असाल तर दोन माष आणि रुप्यात देणार असाल तर तीन शतमान असा दर एका वडीचा पडेल. तांब्यात देणार असाल तर रांगेच्या बाहेर व्हा. कुणाच्याही शिक्क्याची नाणी चालतील. अंगदेश असो, मद्रदेश असो, पांचालदेश असो की यवनदेश असो. धातूला किंमत आहे. त्याला द्राख्मा म्हणता की दिनार म्हणता ह्याला महत्त्व नाही. देश बदलतो तसे राजे बदलतात, पण धातू बदलत नाही. खरं नाणं दिलंत तर खरी अफू देईन, खोटं दिलंत तर टिर्रीवर फटका देईन. नाणं घेताना मी बघून घेते, वडी घेताना तुम्ही बघून घ्या.

(सीनू प्रत्येक सैनिकाकडून पैसे वसूल करते आणि आपल्या कमरेच्या थैलीत हात घालून सराईतपणे मोड देत जाते. पैसे मिळाले की एकेक सैनिकाला गाड्याजवळ मागे पाठवते. मयाहुर आता तिथे उभा आहे. प्रत्येक सैनिकाच्या हातात तो एकेक वडी ठेवत जातो.)

सीनू: सध्या मी माणसांसाठी देते आहे. घोड्यासाठी हवी असेल, हत्तीसाठी हवी असेल तर थांबा. त्यांच्या वड्या वेगळ्या आहेत. माणसाची वडी हत्तीला दिली तर फुकट जाते. हत्तीची वडी माणसाने खाल्ली तर धाडकन माणूस मरतो. आपापली शरीरप्रकृती असते. ती सांभाळायला हवी.

कृपाचार्य: बरीच कमाई केली आहेस.

सीनू: जमेल तितकी करते. माया विकून माया जमवते असं म्हणा!

कृपाचार्य: अफू सोडून आणखी कायकाय ठेवतेस?

सीनू: तसा नक्की नेम नाही. जे विकेल ते ठेवते. मला सीनू म्हणतात. उत्तरेला चीन नावाचा एक भलाथोरला देश आहे. तिथल्या भाषेत सीनू म्हणजे रेश्मा. चीनमध्ये मोठाले डोंगर आहेत, तिथून दऱ्याखोऱ्यांतून रस्ता खाली येतो आणि बख्तरमधून हिंदुकुश पर्वताच्या बाजूने निघून पुढे पर्सिकेपर्यंत जातो. महिनोनमहिने चाललं तरीदेखील संपत नाही. रेशीम वाहून नेण्यासाठी हा रस्ता तयार केला, म्हणून त्याचं नाव रेशीमरस्ता. तिथे माझा सततचा वावर असतो, म्हणून माझं नाव पाडलं रेश्मा. जे विकेल ते मी खरेदी करते, जे खरेदी होईल ते विकते. ह्या रस्त्यावर मिळत नाही असं काही नाही. खूप पैसे मिळतात आणि खूप शिकायला मिळतं. केव्हातरी काहीतरी जंमत हाती लागते. (गाडीकडे जाऊन एक चोपडं घेऊन येते.) हे बघा. मजेदार गोष्टी आहेत. विरंगुळा होईल तेव्हा वाचा.

कृपाचार्य: हे काय बाई?

सीनू: गोष्टी आहेत. एक राजा असतो म्हणे. त्याला पाच मुलगे असतात. पाचही ढड्डोबा असतात, म्हणजे राजा स्वत: किती हुशार असेल ते दिसतंच आहे. पण राजपुत्रच ढड्डोबा निघाले तर पुढे पंचाईत झाली असती. त्यांना शहाणं करायचं म्हणून तो एका साधूला बोलावतो. साधू काय करतो तर पोरांना गोष्टी रचून सांगतो. पहिल्या गोष्टीच्या पोटात दुसरी गोष्ट, दुसरीच्या पोटात तिसरी गोष्ट असा इब्लिसपणा तो मुद्दाम करतो. त्यामुळे झक मारत लक्ष द्यावं लागतं, नाहीतर मनात गोंधळ होतो. ढ राहून चालत नाही.

त्यांतली एक गोष्ट सांगते. एक गरीब बाई होती आणि तिचं पाळण्यातलं लहान मूल होतं. बाईने प्रेमापोटी एक अजगर पाळलेला होता. एकदा बाई पाणी भरायला गेली. आल्यावर बघते तर अजगर भलंमोठ्ठं पोट घेऊन अंगणात सुस्त लोळतो आहे. बाईला वाटलं की त्याने आपलं मूल गिळलं. तिला राग आला आणि डोक्यावरचा हंडा अजगराच्या तोंडावर फेकून तिने त्याला चेचून मारला. आत येऊन बघते तर मूल शांत झोपलं आहे आणि पाळण्याभोवती तरसाच्या पंजाचे ठसे आहेत. मुलाला खायला तरस आलेलं होतं आणि अजगरानं तरसाला गिळून मुलाला वाचवलेलं होतं. बाईला वाईट वाटलं आणि ती धाय मोकलून रडली. अविचाराने वागू नका अशी शिकवण यात आहे.

मयाहुर: शिकवण रास्त आहे. एकदा वस्तू गिळली की ती बाहेरून दिसत नाही हे अजगराला उमगायला हवं होतं. बाईला मूल आधी दिसेल आणि मग आपण दिसू इतकी दक्षता त्याने घ्यायला हवी होती.

(‘हा सुधारणेच्या पलीकडे गेलेला आहे’ अशा आविर्भावात सीनू मयाहुराकडे पाहते. मयाहुर तिच्याकडे पाहून मंद हसतो.)

सीनू: आणखी एक अगोचर गोष्ट आहे. एका राजाला म्हणे मुलगी होते. पण तिला तीन अम्मे असतात. त्यामुळे तिचं लग्न होत नसतं.

कृपाचार्य: असं कसं होईल? मी तर म्हणतो की लग्न झटकन व्हायला पाहिजे. अधिकस्य अधिकं फलम्.

सीनू: चावट बोलू नका! अहो, तीन अम्मे असणं अशुभ असतं म्हणे. तर राजा दवंडी पिटतो की हिला बरं करील त्याला मी बक्षीस देईन. तर तिथून एक आंधळा आणि एक कुबडा चाललेले असतात. आंधळा काय करतो तर कुबड्याचे पाय धरून त्याला राजकन्येच्या मधल्या अम्म्यावर दाणकट आपटतो. त्या दणक्यानं कुबड सरळ होतं आणि अम्माही आत घुसून जिरून जातो. यानंतर राजाकडून बक्षीस घेऊन दोघेही हिच्याशी लग्न करतात आणि सगळेजण सुखाने राहतात. आता तुम्हीच सांगा: असली गोष्ट ऐकून कुठल्या राजाचा कुठला मुलगा शहाणा होईल? तर तुम्हाला गंमत सांगत्ये. पहलवांच्या देशात हे पुस्तक मला मिळालं. पैसे देऊन मी त्याच्या प्रती काढून घेतल्या आणि बख्तरला जाऊन विकल्या. पाच वर्षांनी तिथे पुन्हा जाऊन बघते तो काय! सगळ्या गोष्टी लोकांनी बदलून टाकल्या होत्या. उंटाचा सिंह काय केला आणि मच्छीमाराचा शिंपी काय केला! मग मी नवीन पुस्तकाच्या प्रती काढून घेतल्या आणि उलट येऊन त्या पहलवांच्या देशात विकल्या. राजाचे पाच मुलगे बाजूलाच राहिले आणि मीच यातून शहाणी झाले. म्हटलं यात पैसा फार चांगला आहे. तर असेच सगळीकडचे लोक मनाला येईल तशा गोष्टी बदलत राहतात. नव्यानव्या घुसडतात, न आवडलेल्या वगळून टाकतात. मी आपली इकडचं तिकडे करते आणि सगळ्या बाजूंनी पैसे काढते. घ्या! मजा आहे.

कृपाचार्य: घेतो बाई! पण नंतर वाचतो. गोष्टी आवडल्या तर पैसेसुद्धा देईन. (चोपडं किंचित चाळून रथात काळजीपूर्वक ठेवून देतो.)

(संजय आणि कृतवर्मा येऊन दाखल होतात. संजय कृतवर्म्याच्या मागे घोड्यावर बसला आहे. दोघेही उतरतात. घोडा थकलेला आहे. जवळचा एक सैनिक घोड्याच्या गळपट्टीवरचा क्रमांक बघून त्याचा लगाम धरून हलक्या हाताने त्याला योग्य दिशेला घेऊन जातो.)

कृतवर्मा: हा घे संजय. कबूल केल्याप्रमाणे आणला आहे. पण खूप सायास पडले. मला आधी वाटला तितका तो जवळ नव्हता. वाट काढत जायचा प्रसंग असेल तर भोवताली अठरा अक्षौहिणींची गर्दी फार त्रासाची होते.

कृपाचार्य: अठरा कुठले? आपले अकराच आहेत.

कृतवर्मा: आपले अकरा आणि त्यांचे सात. धृतराष्ट्राचा हेका असा की कौरवसेना समोरून दिसली पाहिजे. संजयाला घेऊन तो पार पांडवसेनेच्या पाठीमागे जागा धरून बसला होता. त्यामुळे मला शत्रुसैन्यातूनही वाट काढत जावं लागलं. धर्मयुद्धाचे नियम माझ्या पथ्यावरच पडले, आणि त्यांनी कुणी मला इजा अशी केली नाही. नपेक्षा माझं नखसुद्धा शिल्लक राहिलं नसतं. पण शत्रूला घाणेरड्या शिव्या देणं याविरुद्ध धर्मयुद्धाचा कुठलाच दंडक नसल्यामुळे त्या मात्र सतत ऐकून घ्याव्या लागल्या. (आपल्या रथात जाऊन बसकण मारतो.)

संजय: नमस्कार कृपाचार्य! (अचानक मयाहुराला पाहून त्याला आनंद होतो.) अरे बाबा, तू इथे कसा?! कित्तीक वर्षांनी भेटतो आहेस. (त्याला घट्ट मिठी मारतो. मयाहुर फारशी प्रतिक्रिया देत नाही.) तू मला अोळखणं शक्य नाही, पण मी तुला बिलकुल विसरलेलो नाही! पांडवांसाठी तू जी मयसभा बांधलीस तिचा मोठा गवगवा झाला होता.

मयाहुर: त्याला सत्तावीस वर्षे झाली.

संजय: मी त्यावेळी अगदी पोरगेलासा होतो. मयसभेची स्तुती करणारं एक ऐसपैस कवन रचण्यासाठी पांडवांनी पैसे देऊन माझ्या वडिलांना बोलावलं होतं, तेव्हा त्यांच्याबरोबर मीही तिथे आलो होतो. तुझ्याकडे बोट दाखवून वडील मला म्हणाले की ह्या माणसाच्या जिवावर बेतलं होतं, पण तो मनाने धसकला नाही. सगळ्या जगाने तोंडात बोट घालावं अशी इमारत त्याने बांधून दाखवली. असं स्वत:चं कर्तृत्व पाहिजे. दुसऱ्यांची खुशामत करणारी गाणी गाऊन पोट जाळण्यात अर्थ नाही. पण शेवटी वडिलांनी केलं तेच मीही केलं.

मयाहुर: मी इथेतिथे हिंडलेलो आहे. माझं निरीक्षण असं की बांधल्यानंतर दोनतीनशे वर्षांच्या आत बहुतेक इमारती लढाईत सापडून जमीनदोस्त होतात. गाणी त्यापेक्षा जास्त टिकतात. तेव्हा तुझा निर्णय चुकला नाही.

संजय: पण त्या दिवसानंतर तू हरवलास तो आज दिसतो आहेस. खूप बरं वाटलं तुला बघून!

मयाहुर: मी भारतात क्वचितच असतो. मयसभेची प्रसिद्धी होत गेली तसतशी पैसा ज्यांच्याकडे फार झाला आहे अशा अनेक घराण्यांतून मला बोलावणी येऊ लागली. त्यांच्या एकापेक्षा एक अचाट लहरी सांभाळून मी राजवाडे, किल्ले आणि तुरुंग बांधत गेलो. चीन, गांधार, पर्सिके, तूर्किया, त्रुविशा आणि त्यापुढे समुद्रमार्गाने यवनांची बेटं आहेत तिथपर्यंत माझा वावर असतो.

संजय: पण पुन्हा इथे आलास हे उत्तम केलंस.

मयाहुर: मला विश्रांती कमीच घेता येते. सहा महिन्यांपूर्वी मला असा निरोप मिळाला की कुरुकुलातला वाद विकोपाला गेलेला आहे, वाटाघाटी फिसकटल्या आहेत आणि युद्धाची तयारी सुरू आहे. अठरा अक्षौहिणी सैनिक आणि त्यांच्याबरोबरचे युद्धसाहाय्याला लागणारे इतरेजन ह्यांची अठरा दिवस राहण्याची, जेवणाची, खंदकांची, सांडपाण्याची आणि अंत्यसंस्कारांची व्यवस्था करण्याचं काम तू पत्करशील का अशी विचारणा मला करण्यात आली. मोबदला पुरेसा वाटला आणि इतक्या मोठ्या कामातून जो अनुभव पदरी पडेल तोही मोलाचा वाटला. त्याप्रमाणे मी प्रस्ताव स्वीकारला आणि पाच महिन्यांपूर्वी इथे येऊन दाखल झालो. काम खूप होतं, पण ते वेळेत पुरं करता आलं ही समाधानाची बाब आहे. व्यवस्थेत काही कसूर राहिली असेल तर मला तसं सांगा, जेणेकरून यथाशक्ती सुधारणा करता येईल.

सीनू: हा मला रेशीमरस्त्यावरच भेटला. युद्ध म्हटलं की माझी बरकत असते. तेव्हा आम्ही दोघे एकत्र इथे आलो. बिचाऱ्याचा काही त्रास नाही. गोड माणूस आहे. (संजयाला उद्देशून) नमस्कार, मी सीनू.

संजय: तुला कोण अोळखत नाही बाई? दोन्ही सैन्यांची भिस्त तुझ्यावर तर आहे.

सीनू: अहो, मला लाजवताय काय असे?! जमेल तेवढं करते.

कृपाचार्य: पण संजया, माझा प्रश्न असा की युद्ध होणार आहे की नाही? काय चालू आहे हे समजणं अवघड होऊन बसलं आहे.

सीनू: मी सांगते. मघा मी समोरून चालले होते, तर एक मोठा रथ मोकळ्यावर आलेला दिसला. रथातला माणूस मागे कोसळला होता. त्याचं अंग कापत होतं. धनुष्य हातातून घरंगळून खाली पडलं होतं. मला वाटलं की याला फेफरं आलं. माझ्या गाड्यात एक अौषधी नेहमी असते. सांबरशिंग आणि जुनं चामडं एकत्र ठेचायचं. अथर्ववेदात लिहिलेलं आहे. नाकाखाली कुपी धरली की गुण येतो. तर ती घेऊन मी पुढे झाले, पण रथ चालवणारा माणूस म्हणाला की याचा काही उपयोग व्हायचा नाही. हे मनाचं फेफरं आहे. खाली पडलेल्या माणसाला तो काहीतरी सांगू लागला. काय चाललंय मला कळेना, पण काहीतरी महत्त्वाचं आहे एवढं कळलं. माझी आठ वर्षांची पोरगी आहे. तिला तिथेच सोडून आले. रथाच्या मागच्या दोन चाकांमधोमध तिला लपवली आहे. मी तिला म्हटलं, काही कळो न कळो, कोण काय बोलतंय ते भराभर लिहून काढ. नंतर बघू. त्याच्या प्रती काढून विकल्या तर चार पैसे मिळतील. काय करतेय बघूया.

संजय: बाई, आता मी सांगतो.

सीनू: सांग बाबा! मी गप्पच बसते कशी…

संजय: बाब अशी आहे की अर्जुनाची युद्ध करायला तयारी नाही. तो म्हणतो की विरुद्ध पक्षात माझे चुलतभाऊ आहेत, मला गुरुस्थानी असलेली कितीतरी मोठी माणसं आहेत. ह्या सगळ्यांबद्दल माझ्या मनात खूप प्रेम आहे. आणि म्हणून निव्वळ राज्य घशात घालण्यासाठी त्यांच्याविरुद्ध मी हत्यार उचलावं हे काही मला पटत नाही. अर्जुन फार खिन्न झालेला दिसतो आहे. आजारी असावा तसा वागतो आहे.

कृपाचार्य: मी पांडवांचा शिक्षक होतो. कुणात फार गुंतून पडावं हा माझा स्वभाव नव्हे, आणि शिक्षकाचा पेशा संपल्यावर माझ्या मनातून तो विषय संपला. पण तरीदेखील अर्जुन मला गुरुस्थानी मानतो हे ऐकून बरं वाटलं.

संजय: त्याने तुमचा नाव घेऊन उल्लेख नाही केला. भीष्म आणि द्रोण ह्या दोघांचा केला.

कृपाचार्य: इतक्या तपशीलात कशाला शिरायचं? ते दोघे मानाने मोठे आहेत म्हणून त्यांचा केला असणार, पण बाकीचेही त्यात आलेच. पण ते काही असलं तरी त्याला युद्ध करायचं नसेल तर माझा आग्रह नाही.

सीनू: मला अर्जुनाचं बरोबर वाटतं. आपल्याच भाईबंदांना मारायला माणूस कचरणं हे समजण्यासारखं आहे. युद्धावर माझं पोट आहे हे मी कबूल करते. पण म्हणून काहीही किंमत देऊन युद्ध होवो असं मी म्हणायची नाही. दोन्ही पक्षांत समझोता झाला तर चांगलं होईल. माझा माल काय तसाही खपेल.

मयाहुर: हे मलाही पटतं. ह्या युद्धाचा माझ्याशी असलेला संबंध बाकी कुणाहीपेक्षा निराळा आहे. युद्धाच्या पायाभूत सोयी करून देण्याचं काम कुरुकुलाने मला दिलेलं होतं, ते मी पार पाडलं. पैसे आधी मिळायला हवेत असा मी आग्रह धरला होता, कारण युद्धानंतर ते चुकते करायला कोण शिल्लक असेल याबद्दल निश्चिती नव्हती. त्याप्रमाणे ते मला मिळाले, तेव्हा माझी तक्रार नाही. पण सगळ्या सोयी जरी आत्ताच जागेवर असल्या तरीसुद्धा युद्ध एकदाचं सुरू झाल्यावर त्या पुऱ्या पडतील ना ह्याची शहानिशा करून घ्यायला हवी. फक्त ह्या कारणासाठी मला युद्ध पाहायचं आहे. एक शास्त्री म्हणून माझी प्रतिष्ठा माझ्या कामात गुंतलेली असते. ते माझ्या दर्जाला साजेसं हवं. पण मी इथे एकटा नाही. युद्ध झालं तर खूप माणसं मरतील आणि मेलेल्यांच्या आप्तेष्टांना खूप दु:ख होईल इतकं उघड आहे. ते जर टळलं तर मला आनंदच होईल. माझं काम वाया गेलं तरी चालेल.

कृतवर्मा: हे पाहा, अर्जुन जे म्हणतो आहे त्यात मलाही तथ्य दिसतं. पण कौरव आपले भाऊ लागतात हे त्याला आज सकाळी कळलं का? आधी का नाही सांगितलं? शेकडो योजनं अंतरावरून आम्हाला इथे बोलावून घेऊन आयत्या वेळी सगळ्यांसमोर गळा काढायचा तो कशाला? द्वारकेहून अख्खं यादवसैन्य घेऊन मला इथे यावं लागलं. अतिशय कटकट झाली. माझे सैनिक म्हणजे मूळचे गुराखी आहेत. गवताळ कुरणांत बागडत जरी असले तरी त्यांची बुद्धी कुशाग्र म्हणता येण्यासारखी नसते. गावंढळ सवयी त्यांच्या रक्तात मुरलेल्या आहेत. गुरं सोडून देऊन झाडाखाली लोळून वाईट कविता करण्यात ह्यांची आयुष्यं वाया जातात. असल्या माणसांमधून मला सैन्यभरती करावी लागली. दोनचा पाढा ज्यांच्या कधी लक्षात राहिला नाही, त्यांच्यासमोर तीन गुल्म म्हणजे एक गण, तीन गण म्हणजे एक वाहिनी, तीन वाहिन्या म्हणजे एक पृतना असले हिशेब घोकावे लागले. असल्या मेंघळटांच्या पलटणी उभ्या करून त्यांना कुरुक्षेत्रापर्यंत फरपटत आणावं लागलं. तीन गुराखी एका दिशेने शिस्तीत चालताना कधी बघितले आहेत का तुम्ही? अतिशय ताप झाला. एवढं करून आम्ही इथे येऊन ठेपलो न ठेपलो, तर हा म्हणतो मला आता लढायचं नाही.

कृपाचार्य: तेवढं आता आपण समजून घ्यायला हवं. अनेकदा होतं असं माणसाचं. आपल्याला अमुक हवं आहे असं वाटतं, पण समोर आल्यावर ते नकोसं वाटतं. शत्रुपक्षात आपले भाऊ आहेत हे अर्जुनाला अर्थात ठाऊकच होतं. आणि त्यांच्याशी युद्ध करायचं म्हणजे त्यांना मारायचा प्रयत्न करायचा हेही अोघाने आलंच. पण एखादी कृती तर्काला जरी पटलेली असली तरीदेखील जी एक भावना त्या कृतीला चिकटून येते ती काहींना सहन होत नाही. आता असं पाहा: काही माणसांना उंदरांचा त्रास होतो आणि उंदीर पकडायला ते पिंजरा लावतात. पण पकडलेला उंदीर समोर दिसल्यावर त्याला जेव्हा पाण्यात बुडवायचा प्रसंग येतो तेव्हा काहीजण कचरतात. तर अशा वेळेला जो कचरत नाही त्याने कचरणाऱ्याला समजून घ्यायला हवं.

कृतवर्मा: पण हा दाखला मला पुरता पटलेला नाही. जो माणूस उंदीर पकडायला निघतो त्याने तो पकडल्यानंतर पुढे काय करायचं याबद्दल मनाची तयारी आधीपासूनच करायला हवी. तो बुडवताना आपल्याला वाईट वाटेल ही भावना मूळ निर्णय घेतेवेळीच हिशेबात धरायला हवी. तेवढं स्वत:चं मन स्वत:ला ठाऊक असायला पाहिजे.

कृपाचार्य: तू म्हणतोस ते खूप लोकांना हे जमत नाही. मनाच्या रचनेतलाच हा काहीतरी दोष असावा.

कृतवर्मा: पण अर्जुन आयत्या वेळी कचरला हेच मला खरं वाटत नाही. तुम्हाला कारण सांगतो. पांडवांच्या वनवासाचं तेरावं आणि शेवटचं वर्ष चालू होतं, तेव्हाचा हा प्रसंग आहे. हे पाचजण आपल्या बायकोसह विराटाजवळ आसरा घेऊन गुप्तपणे राहात होते. त्यावेळी भीष्म, कर्ण, दुर्योधन आणि इतर काही कौरवांनी विराटाच्या राज्यावर हल्ला करून त्याच्या गायी पळवल्या. पांडवांना डिवचण्याचा बहुतेक त्यांचा हेतू होता. तो वाखाणण्यासारखा नव्हता हे मान्य, पण खरा मुद्दा पुढेच आहे. त्यावेळी वेष पालटून अर्जुन रथात चढला आणि कौरव मंडळींना युद्धात हरवून त्याने गायी परत आणल्या. आता गाईंचा कळप परत मिळावा म्हणून जर तो आपल्या भावांशी लढायला तयार झाला असेल, तर राज्य मिळावं म्हणून का नाही? एखादी गोष्ट लहान फायद्यासाठी करणं त्याला जर गैर वाटत नसेल तर तीच गोष्ट मोठ्या फायद्यासाठी करणं गैर का वाटावं हे मला कळत नाही. म्हणून म्हणतो की हे कारण मला पटत नाही. भावना ही गोष्ट पूर्णपणे तर्कात सामावली जात नाही हे मी तात्पुरतं मान्य करतो. पण तरीदेखील भावनेने निदान आपली स्वत:ची तर्कसंगती पाळायला नको का? उंदीर बुडवायचा नसेल तर नका बुडवू. पण पहिला पद्धतशीर बुडवून झाल्यानंतर दुसरा बुडवताना कचरण्यात काय अर्थ आहे?

कृपाचार्य: मुद्दा चांगला काढलास. पण कौरवांनी त्यावेळी त्याला न अोळखल्यामुळे कदाचित अर्जुनाच्या मनाची टोच कमी झाली असेल. काहीजणांना उंदीर बुडवताना वाईट वाटत नाही, पण मरण्याआधी उंदराने त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवला तर मात्र वाटतं.

सीनू: बाई गं! केवढी ती चर्चा! उंदीर साध्या पाण्यात बुडवायचा की वाग्गंगेत बुडवायचा हे आधी ठरवा. मी काही एवढी हळुवार झाले नसते. टोपलीभर रेश्माचे किडे उकळत्या पाण्यात बुडवलेले मी इतक्या वेळा बघितले आहेत की माझं मन कठोर होऊन गेलं आहे.

संजय: सीनू, तुझ्या मनाला कुणी कठोर म्हणणार नाही. पण ते एक असो. हा विषय एवढ्यावर संपत नाही. युद्ध नको म्हणण्याचं दुसरंही एक कारण अर्जुनाकडे आहे. मला ते नीटसं कळलेलं नाही, पण त्याने कृष्णाला जसं बोलून दाखवलं तसंच तुम्हाला सांगतो. तो म्हणतो की जर मी माझ्या भावांना मारून टाकलं तर कुरुकुलाची पडझड होईल. पुरुष जर मोठ्या संख्येने मारले गेले तर कुलातल्या बायका वाईट नादाला लागतात. त्यांची कामवासना शमेनाशी होते आणि त्या बाहेरच्यांशी संग करू लागतात. अशातून वर्णसंकर होतो आणि हिणकस प्रजा निपजते. परिणामी सगळ्या बाजूंनी कुलाचं वाटोळं होतं.

सीनू: नुसता संग केला म्हणजे प्रजा होते असं नाही. मध्यंतरात खूप लटपटी करता येतात. पण हा विषय बायकांबायकांतला असतो आणि पुरुषांना त्याची नीट माहिती नसते. अर्जुनाचंही तेच झालेलं दिसतंय.

मयाहुर: तुझं म्हणणं काय आहे?

सीनू: माझं म्हणणं इतकंच की एकतर कामवासनेबद्दल बोला किंवा प्रजेबद्दल बोला. दोन्हींची गल्लत नका करू.

मयाहुर: आत्ताच्या घडीला आजूबाजूला फार लोक आहेत. निवांतपणा नाही. तेव्हा ह्या लटपटींबद्दल न बोललेलंच बरं.

सीनू: ह्या विषयावर माझ्याकडे एक छोटंसं पुस्तक आहे. पण ते विकण्यासाठी नाही. माझं मीच वाचून नडेल तिला मदत करते.

कृपाचार्य: पण अर्जुन जिथून सुसाट चालला आहे, तो रस्ता अंधारा आणि नागमोडी आहे. स्त्रीची कामवासना हा प्रांत पुरुषाला नुसता विचार करून माहित होण्यासारखा नाही. समजा एखाद्या बाईचा पुरुष युद्धात मारला गेला तर मनाला हादरा बसून तिची कामवासना कदाचित विझूनसुद्धा जाईल. निश्चित काय होईल हे त्या परिस्थितीतून गेलेल्या कुलस्त्रियांकडे बघूनच ठरवायला पाहिजे.

सीनू: काय होतं ते सांगते. कितीतरी लहानमोठी युद्धं मी पाहिलेली आहेत. घरचा पुरुष मेला तर बाईवर एकदम जबाबदाऱ्या कोसळतात. शेतीची कामं सांभाळावी लागतात, शिवाय पोरं वाढवावी लागतात. पैसे कमी पडतात. अोढाताण होते. त्यामुळे सुरवातीच्या दिवसांत कामवासना चांगलीच कमी होते. पण नंतर ती पहिल्या पातळीला आपसूक येते. अशा वेळी बाईला दुसरा पुरुष शोधावासा वाटला तर त्यात नवल नाही. पण हे सगळं जिच्यातिच्यावर अवलंबून आहे. काही बायका अशा असतात की घरचा पुरुष जिवंत असला तरीसुद्धा त्या बाहेर संग करतातच. तो मेलाच पाहिजे असं त्यांचं नसतं.

कृतवर्मा: पण बाहेरचा संग केल्यामुळे प्रजा हिणकस निपजेल हे मला पटत नाही. असं का होईल? म्हणजे अर्थात लटपटी न केल्यामुळे प्रजा निपजली तर. नाहीतर प्रश्नच नाही.

कृपाचार्य: मी कौरवपांडवांचा शिक्षक होतो, त्यामुळे मी कुरुकुल जवळून पाहिलेलं आहे. आमच्यापेक्षा श्रेष्ठ कुल दुसरं नाही असा त्यांचा गंड आहे. त्यांची दृष्टी अशी की कुरुकुलाबाहेरचे पुरुष हिणकस असतात, त्यांचं बीही हिणकसच असतं, आणि म्हणून प्रजाही हिणकस होईल.

मयाहुर: ठीक आहे, आपण वादासाठी असं गृहीत धरू की पुरु नावाचं दुसरं एक कुल कुरुकुलापेक्षा हिणकस आहे. आता पुरुकुलातल्या पुरुषांनी जर कुरुकुलातल्या बायकांत बी टाकलं तर दोन्ही कुलांचा जो सरासरी दर्जा आहे तशी पुढची प्रजा होईल. यामध्ये पुरुकुलाचा उत्कर्ष नाही का होणार? एक कुल जरी खाली गेलं तरी दुसरं वर येईल. यात वाईट काही नाही.

कृपाचार्य: तसंही होईल कदाचित, पण इतरांच्या कुलापेक्षा स्वत:च्या कुलाबद्दल अर्जुनाला जास्त काळजी वाटणं साहजिक आहे.

मयाहुर: हो, तेही बरोबर आहे. पण वर्णसंकर झाला तर प्रजेच्या दर्जात फरक पडतो का हा मात्र अभ्यास करण्यासारखा विषय आहे. एकाच कुलातल्या दहा हजार बायका घेऊन त्यांतल्या पाच हजारांचा वर्णसंकर केला आणि बाकीच्या पाच हजारांना कुलातच फळवलं तर ह्या प्रजेची त्या प्रजेशी शेजारीशेजारी तुलना करता येईल. मगच कळेल. पण असा प्रयोग करणं अवघड आहे. अर्जुनालाही नक्की माहिती नसणारच, तो बहुतेक अंदाजानेच बोलतो आहे. पूर्वी यवनांचा एक तरुण राजा होता, तो पर्सिकेमधून पुढे बख्तरपर्यंत घुसला होता. त्यावेळी त्याचे सैनिक आणि स्थानिक लोक यांच्यात वर्णसंकर फार झाला. पण स्थानिक बायकांच्या राजीखुषीनेच तो दरवेळी झाला असं नाही. त्यातून झालेली प्रजा आता रेशीमरस्त्याच्या आसपास कुठेकुठे विखरून आहे. मी त्यांच्याबरोबर राहिलेलो आहे आणि ते लोक मला सरसकट हिणकस कधी वाटले नाहीत. याउलट शुद्ध कुलातले लोक हिणकसपणे वागलेले मला अनुभवाने माहित आहेत. पण माझ्या एकट्याच्या मतावर विसंबून चालायचं नाही. दोन्ही गट शेजारीशेजारी ठेवून पूर्वग्रह न बाळगता अभ्यास हवा. यात अडचण अशी असते की मोठ्या प्रमाणावर वर्णसंकर असा युद्धानंतरच होतो. आणि युद्धामुळे भोवतालची परिस्थिती इतकी बदलते की तुलना पार बिघडून जाते.

कृतवर्मा: ज्याला सवड असेल त्याने असा अभ्यास जरूर करावा, पण अर्जुनाच्या ह्याही आक्षेपात मला जीव दिसत नाही. वर्णसंकराबद्दल जर अर्जुनाचं इतकं वाईट मत असेल तर त्याने जन्माला यायला नकार द्यायला हवा होता. तो स्वत: वर्णसंकराचंच पिल्लू आहे. अर्जुन झालेला आहे तो कुंतीने इंद्राशी संग केल्यामुळे. इंद्र हा कुरुकुलातला मुळीच नव्हे. आता अर्जुनानेच हा विषय काढला म्हणून मी बोलतो आहे, नाहीतर त्याच्या आईच्या कामवासनेबद्दल मी आवर्जून मत द्यायला गेलो नसतो.

कृपाचार्य: काळजी करू नकोस. तो इथून खूप लांब आहे, त्याला काहीसुद्धा ऐकू जाणार नाही.

सीनू: मला काय दिसतं ते सरळ सांगते. अर्जुनाला युद्धात मरायची भीती वाटते आहे, आणि स्वत:जवळ त्याला ती कबूल करायची नाही. लपवाछपवी म्हणून तो कुलाची पडझड वगैरे अवांतर मुद्दे काढतो आहे. त्याला म्हणायचं आहे ते इतकंच की युद्धात खूप माणसं मरणं ही वाईट गोष्ट आहे. आणि त्याने स्वत: मरणं ही आणखीन वाईट गोष्ट आहे.

कृतवर्मा: पण हे आधी नाही का सांगायचं?

सीनू: हो, ते बोललो आपण मघाशी, पण मी म्हणते राहू दे. निदान आत्तातरी सांगितलं ना? मी काय विचारते की ह्या अर्जुनाचं वय किती आहे?

कृपाचार्य: नक्की ठाऊक नाही, पण अंदाज करता येईल. लग्न झालं तेव्हा तो कोवळा होता, सोळासतराचा असेल. त्यानंतर एकदा युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात असताना तिथे तो घुसला आणि प्रायश्चित्त म्हणून त्याला बारा वर्षं वनवासात जावं लागलं. परत आल्यानंतर युधिष्ठिर जेव्हा द्यूतात हरला तेव्हा आणखी तेरा वर्षं वनवासात जावं लागलं. सोळा अधिक बारा अधिक तेरा मिळून एक्केचाळीस झाली. मधली एखाददोन मिळून त्रेचाळीस समजा.

सीनू: मग साहजिक आहे. ह्या वयात पुरुषांना वाटतं की आपलं आयुष्य सगळं चुकलंच की काय. असं खूपदा झालेलं मी बघितलं आहे. मग त्यांना विरक्ती तरी येते, नाहीतर ते स्वत:चं पौरुष सिद्ध करायला जातात आणि काहीतरी आततायी करून बसतात. मी म्हणते विरक्ती आलेली जास्त चांगली. दुसऱ्यांना हानी पोहोचायची तरी टळते. तसंच काहीसं असावं. अर्जुनाला हे सगळं नकोसं झालं असावं, आणि स्वत:चा जीवही धोक्यात घालायचा नसावा. पण तसं थेट बोलून दाखवता येत नाही. म्हणून मग तो सुचतील ती कारणं देत सुटला आहे. तेवढं आपण समजून घ्यायला पाहिजे. कारणामागची कारणं म्हणतात ती बघितली पाहिजेत.

कृपाचार्य: पण हे आपण बोलून फायदा नाही. ती कृष्णाने बघितली पाहिजेत, कारण उपदेश करणारा तो आहे. त्याचं ह्या सगळ्यावर काय उत्तर आहे?

संजय: सुरवातीला तो अर्जुनाला म्हणाला की तू षंढपणा करू नकोस. तू लढवय्या आहेस आणि लढणं हे तुझं नेमून दिलेलं काम आहे, तेव्हा तू युद्धाला तयार हो.

सीनू: मी म्हणाले ते अगदी हेच. असल्या पुरुषांना कसं चिथवायचं हे बेरकी लोकांना बरोबर माहित असतं. शेवटी भरीला पडून ते हमखास आततायी वागून स्वत:चं पौरुष सिद्ध करायला जातात.

संजय: हो, पण अजून तरी अर्जुन बधलेला दिसत नाही. तो तसाच बसून आहे. त्यामुळे चर्चा आता फार भरकटली आहे. इकडचे तिकडचे खूपसे विषय एकत्र करून कृष्णाने मोठा काला केलेला आहे. आधी तो म्हणाला की प्रजापतीने देव आणि मनुष्य निर्माण केले. नंतर म्हणाला की माणसाने इंद्रियांचं दमन करायला पाहिजे. यापुढे अर्जुनाने त्याला विचारलं की योगी माणसाची लक्षणं काय आहेत, आणि कृष्णाने बऱ्याच तपशीलात जाऊन ती त्याला सांगितली. मला तरी ह्या सगळ्यांत सुसंगत धागा असा अोळखू येत नाही. आत्ताच्या घटकेला लढाई करायची की नाही हे ठरवण्यासाठी इतका पसारा घालण्याची गरज नव्हती. एकतर लढाई करून नंतर ही चर्चा करा, नाहीतर लढाई बरखास्त करून बाकीच्यांना घरी पाठवून मग करा. इतरांची अडवणूक कशाला करता?

कृतवर्मा: लढाई होईल असं मला वाटत नाही. का ते सांगतो. कृष्ण ह्या सगळ्यात अविचाराने घुसला असा माझा कयास आहे. पांडवांच्या वतीने तो कौरवांकडे शिष्टाई करायला गेला होता. त्यावेळी तो मुद्दाम ताणून धरून गुर्मीत बोलला, जेणेकरून शिष्टाई फसेल आणि युद्धाला तोंड फुटेल. पांडव जिंकले तर आपल्यालाही राज्यात वाटा मिळेल असं त्याचं गणित असावं. सीनू म्हणते आहे तशी पौरुष सिद्ध करायची उबळ त्यालाही आली असेल.

पण नंतर सगळा बेत फिसकटला. झालं काय तर हा म्हणे झोपला होता. तेव्हा दुर्योधन येऊन त्याच्या डोक्याशी बसला आणि युधिष्ठिर पायाशी बसला. कृष्ण झोपेतून उठला तेव्हा त्याला युधिष्ठिर आधी दिसला, आणि दुर्योधन नंतर दिसला. म्हणून त्याने आधी युधिष्ठिराला विचारलं की तुला काय हवं आहे? तर युधिष्ठिर म्हणाला की तू हवा आहेस. यानंतर त्याने दुर्योधनाला विचारलं की तुला काय हवं आहे? तर दुर्योधन म्हणाला की मला तुझी यादवसेना हवी आहे. त्यामुळे कृष्ण एकटा तिकडे गेला आणि यादवसेना कौरवांकडे आली. हा सगळा ठार वेडेपणा झाला. जर कौरव हरले तर ह्याचंच सैन्य खलास होईल, आणि द्वारकेला परत गेल्यानंतर मेलेल्या सैनिकांच्या बायका ह्याला आईमाईवरून शिव्या देतील. याउलट जर कौरव जिंकले तर ह्याचं सैन्य जिंकलं पण हा हरला अशी विनोदी परिस्थिती येईल. आपल्याच सैन्याला विरुद्ध पक्षासाठी लढायला पाठवणं ही चक्रमपणाची परिसीमा नाही का झाली? आणि कहर म्हणजे यादवसेनेचं नेतृत्व माझ्यावर लादून माझी कात्री करून ठेवली आहे. माझे सैनिक मला विचारतात की मोठे गोपाळ विरुद्ध पक्षात का आहेत? हा प्रकार काय आहे तो आम्हाला समजावून सांगा. आता काय कर्म समजावून सांगा?! मलाच तो समजलेला नाही. तेव्हा माझा धोशा हाच आहे. आम्हाला मोकळं करा. मनात राग न ठेवता आम्ही आपले घरी जाऊ. इंद्रियांचं दमन करत तुम्ही दोघे इथेच राहा.

कृपाचार्य: एक शंका अशी येते की समोर जे चाललं आहे ते पाचही पांडव आणि कृष्ण यांच्यामधलं साटंलोटं असावं. कृष्ण पेचात सापडलेला आहे हे त्यांना कळलेलं आहे, आणि अब्रू न गमावता त्याला युद्धातून बाहेर आणता यावं म्हणून अर्जुन धडपड करतो आहे. अर्जुनाने कच खाल्ल्यासारखं करायचं, कृष्णाने त्याला युद्धाला प्रवृत्त केल्यासारखं करायचं, आपला धीर होत नाही असं कबूल करून अर्जुनाने युद्धातून माघार घ्यायची, आमचा भाऊ लढत नसेल तर आम्हीही लढत नाही असं बाकीच्यांनी म्हणायचं आणि शेवटी कृष्णाने नाईलाज झाल्यासारखं दाखवायचं असा हा बनाव दिसतो. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलून सध्या ते दोघे वेळ काढताहेत.

संजय: मलाही तसं वाटतं, पण तरीदेखील एक गोष्ट मनात खुपते आहे ती बोलून दाखवतो.

सीनू: आता काय आणखी? ‘मला का लढायचं नाही’ ह्याचं अजून तिसरं एक कारण अस्तनीतून बाहेर काढलंन की काय?

कृतवर्मा: शक्य आहे. अर्जुन सव्यसाची आहे, त्यामुळे त्याला डाव्याउजव्या दोन्ही अस्तन्या तितक्याच सफाईने वापरता येतात.

संजय: नाही, तिसरं कारण नाही. मुद्दा वेगळाच आहे. मघाशी जे मी म्हणालो की कृष्णाने खूप विषयांना हात घालून फापटपसारा केलेला आहे, ते खरं आहेच पण नंतरचा भाग बुचकळ्यात टाकणारा आहे. कृष्ण म्हणतो की माझं वय सूर्यापेक्षा जास्त आहे. सूर्याला मी योग शिकवला होता, सूर्याने तो मनूला शिकवला आणि मनूने इक्ष्वाकूला शिकवला. तोच मी आता पुन्हा सांगतो आहे, म्हणून फापटपसारा आहे.

सीनू: काही कळलं नाही.

संजय: मलाही नाही. ही बोलणी तिकडे चालू असताना मी कृतवर्म्याच्या मागे घोड्यावर बसण्याच्या प्रयत्नात होतो, त्यामुळे नीट लक्ष दिलं नाही. द्यायला हवं होतं. पण त्यापुढे कृष्ण असंही म्हणाला की सगळ्या माणसांचा, जनावरांचा आणि वनस्पतींचा मी मालक आहे. दुर्जनांना ठार मारण्यासाठी आणि सज्जनांचं रक्षण करण्यासाठी मी अधून मधून जन्म घेतो. आता ह्याचा अर्थ काय घ्यायचा?

कृतवर्मा: काही अर्थ लागत नाही. तो द्वारकेचा राजा आहे इतपत मान्य आहे, पण सगळ्या माणसांचा मालक केव्हापासून झाला? आणि झाला असेल तर आम्हाला आधी सांगायचं नाही का?

मयाहुर: मीही तेच म्हणतो. इथून तीनशे कोसांवर तुम्ही खैबरखिंडीतून एकदा पलीकडे गेलात की तिथे ह्या कृष्णाचं नावसुद्धा कुणी ऐकलेलं नाही.

संजय: मालक म्हणजे गुलामांचा मालक किंवा शेतजमिनीचा मालक ह्या अर्थाने नव्हे. त्याच्या म्हणण्याचा रोख असा दिसला की निसर्गसृष्टीला आणि माणसांना त्याने निर्माण केलेलं आहे.

मयाहुर: केव्हा?

संजय: ते माहित नाही.

सीनू: हे काही पटण्यासारखं नाही. जर त्याने आपल्या सगळ्यांनाच निर्माण केलं असेल तर जाहीरपणे तसं स्वच्छ सांगितलं का नाही? अर्जुनाला एकट्यालाच का सांगतो आहे?

संजय: तेही माहित नाही.

कृतवर्मा: आणि मारायचेच होते तर दुर्जन तयार कशाला केले? खरोखरीच ह्या गृहस्थाच्या बोलण्यात बोलणं नसतं. घोळ न घालता काहीसुद्धा त्याला करता येत नाही.

कृपाचार्य: दुर्जन म्हणजे आपणच बहुतेक, कारण तो अर्जुनाला आपल्यालाच मारायला सांगतो आहे. तेव्हा दिसतं असं की वेळ जात नव्हता म्हणून त्याने दुर्जन तयार केले आहेत, आणि ते मारताना आणखी वेळ जावा, काम फार पटकन संपू नये, म्हणून आपलीच फौज दुर्जनांची मदत करायला विरुद्ध पक्षात पाठवली आहे.

सीनू: तुम्हाला काय वाटतं? काही कारणाने कृष्ण भ्रमिष्ट झाला नसेल ना? उन्हाचा तडाखा बसला असेल म्हणावं तर वातावरण तसं नाही. थंडीचे दिवस आहेत आणि सकाळ आहे.

संजय: म्हणजे कृष्ण म्हणतो आहे त्यातलं तुम्हाला कुणालाच काही खरं वाटत नाही? खात्री करून घेतलेली बरी. कारण खरं निघालं तर पंचाईत होईल.

सीनू: नाही, काही खरं नाही. तू उगीच घाबरू नकोस. तुम्हाला सांगते काय चाललंय ते. माझी पोर पाचेक वर्षांची असतानाची गोष्ट आहे. शेजारच्या एका पोराशी तिची घट्ट मैत्री झालेली होती, आणि त्या दोघांनी मिळून आपापसांत एक सांकेतिक भाषा तयार केली होती. काही शब्द नेहमीचेच होते, काही नवे बनवले होते, आणि काही नेहमीच्या शब्दांचा अर्थ बदलून टाकला होता. एकमेकांबरोबर ते तासनतास काही ना बाही बोलत राहायचे, पण तिऱ्हाईत माणूस ऐकू लागलं तर दुग्ध्यात पडत असे. कृष्णाचं आणि अर्जुनाचं मिळून तेच चालू आहे. प्रजापती, इक्ष्वाकू, इंद्रियदमन वगैरे त्यांचे आपल्या-आपल्यातले गंमतीचे शब्द असणार. संजय त्यांचं बोलणं चोरून ऐकून आपल्याला सांगेल हे त्यांना कुठे माहित आहे? ते आपले आपापसात मस्करी करताहेत.

कृतवर्मा: पण मग हा समोरचा खोळंबा किती वेळ चालणार आहे? निदान ते समजलं तरी बरं होईल.

मयाहुर: नक्की ठाऊक नाही, पण संजयची मदत झाली तर आपल्याला ठोकताळा बांधता येईल. ह्या युद्धासाठी तजवीज करत असताना काही बाबी माझ्या लक्षात आल्या आहेत. अठरा दिवस युद्ध चालावं असा तुमचा बेत आहे. सैन्य अठरा अक्षौहिणी आहे. एका अक्षौहिणीत २१८७० हत्ती, ६५६१० घोडे आणि १०९३५० पदाति असावेत असं तुम्ही नेमून दिलेलं आहे; ह्यापैकी प्रत्येक संख्येतल्या आकड्यांची बेरीज अठरा येते. थोडक्यात अठरा हा आकडा जिथे तिथे आणण्याचा तुम्हाला सोस आहे. हा शहाणपणा नव्हे. हा एककल्लीपणा झाला. शत्रूची ताकद काय आहे ह्याचा विचार करून कोणतं दळ किती हवं ते ठरवायचं असतं. मनात घट्ट धरलेला एकच एक आकडा चिवडत बसून नव्हे.

कृतवर्मा: तुझं म्हणणं मला शंभर हिस्से मान्य आहे, पण आम्ही सैन्यातले लोक असेच असतो. रूढीने जे चालत आलेलं आहे तेच आम्हाला बरं वाटतं. आणि असं पाहा: हा एककल्लीपणा तू म्हणतोस तो दोन्ही सैन्यांनी केलेला आहे. तेव्हा फिट्टंफाट होऊन कुठल्याच बाजूचा विशेष तोटा होणार नाही.

कृपाचार्य: पण ह्या सगळ्याचा रोख कुणीकडे आहे? यावरून वेळेचा हिशेब कसा करणार?

मयाहुर: सांगतो. तर माझा कयास असा आहे की ह्या रूढीच्या प्रभावाखालून कृष्णसुद्धा सुटणार नाही. ह्या दोघांचं जे काही बोलणं चालू आहे ते अठरा तुकड्यांत विभागलेलं असणार असं मी गृहीत धरून चालतो आहे. अर्थात इथून आपल्याला काहीच ऐकू येत नाही, ते फक्त संजयला येतं. म्हणून त्याची मदत हवी.

संजय: ठीक तर. (कानोसा घेतो.) हे जे तू तुकडे म्हणतोयस ते अध्याय आहेत. आत्ताच सहावा अध्याय संपला आहे. आपल्या गृहीतकाप्रमाणे अजून बारा व्हायचे आहेत. तेव्हा आत्तापर्यंत जितका वेळ गेला त्याच्या दुप्पट आणखी लागेल असं समजूया का?

मयाहुर: ह्यापेक्षा जास्त नेमकं गणित करण्याचा प्रयत्न करू. ह्या अध्यायांमध्ये काय आहे?

संजय: अनुष्टुभ छंदांमधले श्लोक आहेत. त्रिष्टुभ छंदामधलेही आहेत, पण ते तुरळक आहेत.

मयाहुर: किती?

संजय: प्रत्येक अध्यायात वेगवेगळे आहेत. पहिल्यात ४६, दुसऱ्यात ७२, तिसऱ्यात ४३, चौथ्यात ४२, पाचव्यात २९ आणि सहाव्यात ४७ आहेत. पुढचं अर्थात माहित नाही.

मयाहुर: आत्तापर्यंतचे २७९ झाले. जर याच दराने पुढेही असतील तर एकूण २७९ गुणिले ३ म्हणजे ८३७ होतील. पण माझ्या मते प्रत्यक्षात तितके होणार नाहीत. अठरा भाग करायचेच असा जर हट्टाग्रह असेल आणि आपल्याला काय सांगायचं आहे ह्याचं नियोजन जर नीट नसेल तर हमखास सुरवातीचे भाग मोठे होतात. नंतर बोलायला फारसं उरत नाही, तेव्हा छोटे भाग करून प्रसंग साजरा करून न्यावा लागतो. जर शेकडा पंधरा ते वीसची घट धरली तर याचा अर्थ असा की ६७० ते ७११ यादरम्यान श्लोकांची संख्या येईल. गोळाबेरीज सातशे धरून चालू. एक श्लोक म्हणायला किती वेळ लागतो ते ठरवायला हवं.

संजय: मी एक म्हणून दाखवतो.

मयाहुर: थांब. (मयाहुर गाड्यात शिरतो आणि शोधाशोध करून एक तांब्या घेऊन बाहेर येतो. अणकुचीदार पात्याने त्याच्या आतल्या बाजूला ठराविक अंतरावर खुणा केलेल्या आहेत. तांब्याच्या तळाला असलेलं लहान भोक त्याने आपल्या तर्जनीने बंद केलं आहे. जवळच्या एका घोड्याजवळ जाऊन त्याच्या पार्श्वभागावर तो विशिष्ट पद्धतीने थापटतो. घोडा धार सोडू लागताच मयाहुर ती तांब्यात भरून घेतो.)

संजय: कृतवर्मा, तुझा इथे उपयोग होणार आहे. तू सतत यादवसेनेत वावरत असल्यामुळे द्वारकेतले लोक कसे बोलतात हे तुला माहित आहे. तशासारखा हेल काढून मी जे म्हणतो ते माझ्यामागोमाग म्हण.

कृतवर्मा: सांग.

संजय: हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम्

कृतवर्मा: हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम्

संजय: जित्वा वा भोक्ष्यसे महीम्

कृतवर्मा: जित्वा वा भोक्ष्यसे महीम्

संजय: तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय

कृतवर्मा: तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय

संजय: युद्धाय कृतनिश्चय:

कृतवर्मा: युद्धाय कृतनिश्चय:

संजय: आता हे सगळं पुन्हा एकसंध म्हण. (मयाहुराला खूण करतो.)

कृतवर्मा: हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम् जित्वा वा भोक्ष्यसे महीम् तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चय:

(कृतवर्म्याने श्लोक म्हणायला सुरुवात करताच मयाहुर तांब्याखालचं बोट दूर करून जमिनीवर धार पडू देतो. श्लोक संपताक्षणीच बोट पुन्हा धरतो आणि किती द्रव बाहेर गेला ते आतल्या खुणेने पाहतो. हे सारं चालू असताना भोवताली मोठा घोळका जमत आलेला आहे.)

मयाहुर: एक श्लोक म्हणायला तुला तीस लिप्त इतका वेळ लागला. असे सातशे श्लोक म्हणजे तीस गुणिले सातशे बरोबर एकवीस हजार लिप्त झाले. छत्तीसशे लिप्तांची एक घटका होते, तेव्हा - (खाली वाकून धुळीत आकडेमोड करीत) पाच पूर्णांक पाच सष्ठांश घटका होतात. यातल्या एक तृतीयांशापेक्षा थोडासा जास्त वेळ सरलेला आहे, ह्याचा अर्थ आणखी पावणेचार घटका पुढे आहेत असं समजा.

(आजूबाजूच्यांना एकदम वाचा फुटते. ‘अजून पावणेचार घटका - अजून पावणेचार घटका’ असे सार्वत्रिक उद्गार निघतात आणि मोठमोठ्या होत जाणाऱ्या वर्तुळातून सैन्यात पसरत जातात. अनेकजण रथातून उतरतात आणि आळोखेपिळोखे देत इकडेतिकडे फिरू लागतात. मैदानाच्या परीघालगत जे चर खणलेले आहेत तिकडे अनेकजण चालू लागतात. ‘समोरच्यांना सांगायचं का?’ असं कुणीतरी विचारतो. ‘सांगा - त्यांनाही सांगा’ असा अोरडा होतो, आणि लागलीच ‘अजून पावणेचार घटका - अजून पावणेचार घटका’ असे उद्गार पांडवसेनेतही पसरतात. उरलेला द्रव मयाहुर जमिनीवर अोतून देतो, आणि तांब्या गाड्यात परत ठेवून देऊन त्याच घोड्याच्या शेपटाला हात पुसतो.)

सीनू: पावणेचार घटका म्हणजे खूप वेळ आहे अजून. मी आपली इथेच बसते. कुणाला काही हवं झालं तर इथेच येऊ देत. (पायातल्या वहाणा काढून ठेवून युद्धाचे नियम कोरलेल्या शिलालेखावर ऐसपैस मांडी घालून बसते.) बाई गं! दगड चांगलाच गार पडला आहे.

मयाहुर: यांगझीमधून मी मुद्दाम मागवून घेतलेला तो ज्वालामुखी खडक आहे. अंगातली उष्णता तो शोषून घेतो. दगडाला स्पर्श करणारा अंगाचा भाग जितका जास्त तितकी जास्त उष्णता बाहेर जाते. त्यामुळे जरत्कारूपेक्षा रंभोरुला त्यावर जास्त गार लागेल.

सीनू: पुरे! उगीच माझ्या मांड्यांवर टीकाटिपणी कशाला करायची ती? (दगडाशेजारीच धुळीत फतकल मारून बसते.) पण संजया, तुला इतक्या दुरून ऐकू येतं ही बरीक मोठी सोय आहे.

संजय: तितकीशी मोठी नाही.

सीनू: अरे, तितकीशी मोठी काय नाही? तुला व्यासाकडून तसा वर मिळाला आहे ना?

संजय: हो.

सीनू: मी काय म्हणते ते ऐक. वर म्हणजे फायद्याचं कलम. नाहीतर त्याला वर म्हणायचं कशाला? हे बघ, माझी अफूची खरेदीविक्री सतत चालू असते. ह्या धंद्यात फार कटकटी आहेत. बख्तरमध्ये अफू पिकते. शेतकऱ्याकडून ती विकत घेऊन उंटांवरून वाहून न्यावी लागते. तिथे सगळ्या डोंगरदऱ्याच आहेत, आणि रस्ते फार खराब आहेत. तेव्हा होतं काय की ह्या वस्तीत काय चाललं आहे त्याची त्या वस्तीला बातमी नसते. चार कोस ह्या दिशेला गेलं तर दीडपट भाव, चार कोस त्या दिशेला गेलं तर निमपट भाव असं असतं. अशा ठिकाणी दूरवरचं ऐकू शकणारं माणूस मिळालं तर ते फार किफायतशीर होईल. मी तुला भागीदारी देते. दोघे मिळून आपण सगळा धंदा काबीज करू. बघ, विचार कर. नाहीतरी भाटगिरी करत राहून तुझी भरभराट होणार नाही. आपलं चांगलं होईल तिकडे माणसाने जावं. आपल्यापाशी जे कसब आहे ते वापरून घ्यावं.

संजय: नाही, ते तसं नाही. मला असं तिन्ही त्रिकाळ दूरवरचं ऐकता येत नाही. कसं झालं ते सांगतो. युद्धात काय घडतं ते धृतराष्ट्राला समजून घ्यायचं होतं. आता तो आंधळा असणं ही अडचण आहे. पण तरीदेखील त्याला युद्धापुरतं दिसेल असा वर द्यायला व्यास राजी होता. पण धृतराष्ट्र म्हणाला की इतकी मोठी कत्तल झालेली मला पाहवणार नाही. त्यामुळे युद्ध स्वत: बघून त्याचं वर्णन धृतराष्ट्राला सांगायचं काम माझ्यावर येऊन पडलं. ह्यात मला आनंद काही नाही. पण बोलूनचालून मी राजेलोकांच्या आसपास घोटाळणारा, त्यांच्या सदिच्छेवर पोट भरणारा माणूस. नाही म्हणण्याचा पर्याय माझ्यासमोर नव्हता.

कृपाचार्य: पण तुला लांबचं ऐकू येतं की दिसतं की दोन्ही? वर नेमका काय आहे?

संजय: धृतराष्ट्राशेजारी मी उभा होतो. तेव्हा व्यास धृतराष्ट्राला उद्देशून म्हणाला की ‘हा संजय तुला युद्धाचं वर्णन करून सांगेल. युद्धामध्ये त्याच्या अपरोक्ष असं काहीसुद्धा घडणार नाही. त्याला मी दिव्यदृष्टी देतो आहे, जेणेकरून तो तुला युद्धाचा वृत्तान्त सांगेल. त्याला सर्व काही कळेल, मग ते गुप्त असो की सुप्त, रात्री घडो की दिवसा. मनातले विचारही त्याला समजतील. त्याला थकवा येणार नाही, आणि शस्त्रं त्याला जखम करू शकणार नाहीत. युद्धातून त्याची जिवंत सुटका होईल.’

कृतवर्मा: म्हणजे हा वर तुला थेट न देता धृतराष्ट्राला परस्पर सांगून टाकला आहे.

संजय: त्याचं मला नवल वाटलं नाही. मी काय करावं हे इतरांनी आपापसांत ठरवलेलं आहे असं पुष्कळदा घडतं.

सीनू: चांगला घसघशीत वर आहे.

संजय: वर अगदी सढळ जिभेने दिलेला आहे, पण म्हणावा तसा मला धार्जिणा नाही. आता हेच पाहा. युद्धाला सुरुवात झालेली आहे का? म्हटलं तर हो आणि म्हटलं तर नाही. शंख फुंकले गेलेले आहेत याचा अर्थ अौपचारिक सुरुवात झालेली आहे, पण हातघाईला सुरुवात झालेली नाही. अर्धवट परिस्थिती आहे. पण ह्याचा वाईट परिणाम म्हणजे मला दिलेला वरही सध्या अर्धवटच लागू आहे. कृष्ण आणि अर्जुन तिथे काय बोलताहेत हे मी इथून ऐकू शकतो, पण अधलेमधले उच्चार पुसट आहेत. अंदाजाने अर्थ लावून सध्या मी सगळं लक्षात ठेवायचा प्रयत्न करतो आहे.

कृतवर्मा: तुला पुसट ऐकू येतं हे तू आम्हाला आत्ता सांगतो आहेस?

संजय: अंमळ पुसट.

कृपाचार्य: अंमळ म्हणजे किती ते मला ठाऊक नाही, पण मी म्हणतो जाऊ दे. नाही स्पष्ट ऐकू आलं तरी बिघडत नाही. संगनमत करून दोघे वेळ काढताहेत अशी माझी खात्री झालेली आहे. एकदाचं हे संपलं की युद्ध रद्द करतील आणि आपल्याला परत जाता येईल.

संजय: ते ठीक, पण हे दोघे काय बोलले ते धृतराष्ट्राला नंतर सांगावं लागेलच. म्हातारा खमक्या आहे. आणि माझी बिदागी त्याच्या मर्जीवर अवलंबून आहे. पण हे सोपं नाही. एकतर ऐकू नीट येत नाही, आणि शिवाय कृष्ण फार विस्कळीत बोलतो आहे.

सीनू: मग मी माझ्या पोरीला तिथे रथाखाली बसवली आहे ते चांगलंच झालं. एकदाचं हे संपल्यावर कृष्ण आणि अर्जुन कायकाय म्हणाले ते तू आठवून लिहून काढ. माझी पोरगी लिहिते आहेच. दोन्ही आपण ताडून बघू. मग त्याच्या प्रती काढून त्यातली एक धृतराष्ट्राला भेट देऊ. बाकीच्या खपवायचा पत्कर मी घेते. त्याचा अर्थ कसा लावायचा ते वाचणारे बघून घेतील. लोक बाकी कायकाय वाचतात ते एक नवलच आहे. काहीही लिहा, वाचणारे सापडतात.

कृतवर्मा: पण सीनूच्या मुलीने लिहिलं आहे ते आणि संजयला आठवतं आहे ते यात जर तफावत निघाली तर कुणाचं बरोबर ते कसं कळणार?

संजय: नाही ना कळणार. ती अडचण आहेच.

कृपाचार्य: आणि सातेकशे श्लोक म्हटले म्हणजे इथेतिथे तफावत ही निघणारच.

मयाहुर: अशा वेळी काय करायचं ह्याचं एक शास्त्र आहे. गणिताइतकं अचूक नाही, पण उपयोगाचं आहे. हे शास्त्र का शोधून काढावं लागलं ते सांगतो. बाबीलची वसाहत मागे सोडून पुढे दक्षिणेला गेलं की फिलेस्तान नावाचा देश लागतो. तिथे एक तरुण माणूस होऊन गेला. तो चक्रम होता पण स्वभावाने गोड होता. एके ठिकाणी तो फारसा राहिला नाही; गोष्टी सांगत एका गावातून दुसऱ्या गावात असा तो सतत हिंडत असे. नंतर त्याला कुणीतरी आकसाने मारून टाकला. त्याने कुठल्या गोष्टी सांगितल्या, तो कसा जगला ही हकिकत त्याच्या जवळच्या माणसांनी तो मेल्यानंतर काही वर्षांनी चामड्याच्या तुकड्यांवर लिहून काढली. फिलेस्तानच्या सगळ्या बाजूंनी समुद्र असल्यामुळे हे तुकडे दमट हवेने खराब व्हायला लागले. त्यामुळे त्यांच्या नव्या प्रती काढाव्या लागल्या, आणि त्याही नंतर कुठेकुठे नेऊन लोकांनी प्रतींवरून प्रती काढल्या. पण एकीवरून दुसरी प्रत काढणं हे काम कंटाळवाणं असतं, आणि लिहिताना चुका होतात. चुकीच्या प्रतीवरून नवी प्रत काढली की चुका वाढत जातात. तर असे चामड्याचे तुकडे आता खूप झालेले आहेत, आणि ते एकमेकांशी जुळत नाहीत. जागोजागी तफावत निघते. पण ह्या तरुण माणसाच्या बोलण्यात शहाणपण होतं असा लोकांचा विश्वास आहे, आणि त्यामुळे तो नक्की काय म्हणाला हे ठरवण्यासाठी खूप कष्ट घ्यायची त्यांची तयारी असते. आणि म्हणूनच, प्रती काढताना चुका का होतात आणि त्या दुरुस्त कशा करायच्या ह्याचं एक वेगळं शास्त्रच त्यांनी उभं केलं आहे.

कृपाचार्य: इथे आपल्यालाही ह्या शास्त्राची गरज पुढेमागे पडेलच. असं पाहा, कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये काय बोलणं होतं ते संजय लिहून काढणार आहे. आपल्याकडे चामड्यावर लिहिण्याची पद्धत नाही. भुजीच्या झाडाची साल काढून आपण त्यावर लिहितो. इथली हवा गरम असते, वाळवी असते, पाऊस पडतो, आणि ह्या सगळ्यामुळे झाडाच्या साली लवकर कुजतात. तेव्हा आपल्यालाही प्रतींवरून प्रती काढाव्या लागणारच, आणि कितीही काळजी घेतली तरी चुका होणारच.

सीनू: खरं आहे. मी तर म्हणते हे शास्त्रसुद्धा आपण लिहून काढायला पाहिजे. पण त्याच्याच प्रती काढताना चुका झाल्या तर काय घ्या?

संजय: हुशार आहेस हो बाई तू. तुझ्या तावडीतून काही सुटत नाही.

सीनू: पण मी म्हणते तसं तू सगळं लिहून तर काढ. आपण ते मयाहुराला दाखवू. त्याची नजर तिखट आहे. त्याला पटकन चुका काढता येतात.

मयाहुर: ह्या शास्त्राची मला खोलात जाऊन माहिती आहे असं मी म्हणत नाही. पण त्यातली काही तत्त्वं अशी आहेत की आपली आपण बुद्धी लढवून ती शोधून काढू शकतो. तुम्हाला एक किस्सा सांगतो. युद्धाचे नियम जेव्हा तयार झाले तेव्हा त्याचे शिलालेख बनवावेत आणि कुरुक्षेत्रावर ते ठराविक अंतराने लावावेत ही कल्पना माझी आहे. पण दगड खूप लागतात. तुम्हाला नेमकं सांगतो. कुरुक्षेत्र हे एक लंबवर्तुळ आहे. त्याचा मोठा व्यास तेरा कोस आहे, आणि त्याला काटकोन करून लहान व्यास नऊ कोस आहे. मोठा व्यास, लहान व्यास आणि तीनशे पंचावन्न अशा तीन आकड्यांचा गुणाकार करून त्याला चारशे बावन्नचा भाग दिला कीलंबवर्तुळाचं क्षेत्र ठरतं. ही पद्धत मी यवनांकडून शिकलो. तर हिशेब असा होतो की कुरुक्षेत्र झाकायला एक कोस लांबीरुंदीचे ब्याण्णव चौरस लागतील. मी असं ठरवलं की संपूर्ण कुरुक्षेत्राचे एक सप्तमांश कोस लांबीरुंदीच्या चौरसांत तुकडे करून प्रत्येक चौरसाच्या वायव्य कोपऱ्यात एक शिलालेख लावावा. असे सुमारे साडेचार हजार शिलालेख मला तयार करून घ्यावे लागणार होते.

मूळ शिलालेख मी स्वत:च्या हाताने कोरून घेतला. बाकीच्या प्रती ह्या मूळ शिलालेखाची नक्कल करून बनवाव्या लागणार होत्या, पण इतके दगड आणि इतके पाथरवट एकाच ठिकाणी आणणं सोयीचं नव्हतं. त्यामुळे मी योजना अशी केली की मूळ लेखाच्या तीन प्रती काढून मैदानात त्या तीन ठिकाणी न्याव्यात. त्यातल्या प्रत्येकीवरून पुन्हा तीन प्रती काढून त्या आणखी दूर न्याव्यात आणि हा शिरस्ता असाच पुढे चालू ठेवावा. पण माझ्या लक्षात आलं की प्रतींवरून प्रती काढताना चुका होऊ लागल्या आहेत. चुकांचा अभ्यास म्हणजे मनाचा अभ्यास असतो. तुम्हाला उदाहरण देतो.

सहावा नियम असा आहे:

जो दुसऱ्याबरोबर युद्धात गुंतला असेल, गांगरलेला असेल किंवा पाठमोरा असेल अशास ठार मारू नये.


हे वाक्य आधी संपूर्ण पाठ करून मग फरशीवर कोरून काढायचं अशी आमची कामाची पद्धत होती. पण ‘गुंतला’ आणि ‘गांगरलेला’ यामध्ये तोच ध्वनी तीनदा येत असल्यामुळे पाठ चुकत असे आणि कित्येक पाथरवट ‘गुंतला’ ऐवजी ‘गुंगला’ लिहीत असत. ह्या दोन क्रियापदांचा अर्थ सारखा नाही. युद्ध करणारा पूर्ण तरतरीत मनाने ते करत नव्हता अशी जी अर्थछटा ‘गुंगला’ मध्ये येते ती नको आहे. त्यामुळे मी

गुंतला असेल किंवा गांगरलेला असेल

असा बदल केला. पहिला ‘ग’ आणि नंतरचे दोन ‘ग’ यांच्यात जास्त अंतर पडल्यामुळे ही चूक होईनाशी झाली. काम वाढलं पण त्याबद्दल तक्रार नाही. हे वाक्य आत्ता जसं आहे त्यात ‘किंवा’ ची विनाकारण पुनरुक्ती झाली आहे असं काहींना वाटतं. पण ती विनाकारण नाही.


अशी खूप उदाहरणं सापडतात. त्यांच्यातला सामाईक गुण कुठला हे अोळखून यवनांनी ह्या शास्त्राचा एक नियम बनवला आहे. तो असा की जर पाठभेद असेल तर जास्त आडनिडा पाठ हा बरोबर समजायचा, म्हणजेच जास्त सोपा पाठ चुकीचा समजायचा. कसं ते सांगतो: ‘गुंगला असेल, गांगरलेला असेल’ हा पाठ सोपा आहे कारण चार ‘ग’ मिळून म्हणायला सोपे होतात. पण याउलट ‘गुंतला असेल, गांगरलेला असेल’ हा पाठ आडनिडा आहे, कारण साऱ्या बाजूंनी ‘ग’ असताना मधला एक ‘त’ तगवून धरावा लागतो. यवनांचं म्हणणं असं की माणूस चूक करताना आडनिड्याचं सोपं करतो पण सोप्याचं आडनिडं करत नाही. म्हणून आडनिडा पाठ हाच खरा पाठ असायची शक्यता जास्त असते.


संजय: आडनिडा पाठ हाच खरा पाठ. नियम मजेदार आहे. मी आवर्जून लक्षात ठेवीन. कृष्ण आणि अर्जुन आपसांत काय बोलले हे मला नेमकं आठवेनासं झालं तर अर्धवट जे आठवतं आहे ते मुद्दाम आडनिडं करून लिहीन. लोकांना तेच खरं वाटेल. सीनूची मुलगी अजून कोवळी आहे, तिला वेगाने लिहिता येत नसणारच. ती आपलं सगळं सोप्पंसोप्पं करून टाकेल. म्हणजे जिंकणार मीच.


सीनू: तसं नाही हं. माझी पोरगी खूप झरझर लिहू शकते. भोवताली ऊन असो, पाऊस असो, गोंगाट असो, तिचं मन चळत नाही. ती आपली लिहीत जाते.

मयाहुर: हे खरं आहे.

सीनू: पोट राहण्याच्या वेळी बाईचं अंग जसं असतं तसं तिचं मूल होतं. त्या वेळी मी श्रीनगरीला एका तरुण संन्याशाबरोबर राहात होते. त्यानं स्वत: एकदाही कुणा बाईचा भोग घेतला नाही. पण त्याचा अभ्यास खूप होता. तो म्हणायचा की बाई आणि पुरुष जुगत असताना दोघांनाही त्यातून आनंद मिळायला हवा. इंद्रियांचं दमन करा असं कधी तो म्हणाला नाही. बायापुरुषांची बिनचूक मोजमापं घेऊन बायांचे किती प्रकार पडतात, पुरुषांचे किती पडतात, कुणाची जोडी कुणाबरोबर जमवली म्हणजे आनंद वाढतो ह्याचे त्याने ठोकताळे बसवले होते. मी खाली चिंचोळी आहे म्हणून मला तो हरणी म्हणायचा. माझ्यापेक्षा रुंद असलेली बाई म्हणजे घोडी, आणि खूप रुंद असेल तर हत्तीण. बाप्यांमध्ये जो खाली तोळामासा असेल तो ससा, त्यापेक्षा जाड असेल तो बैल आणि खूप जाडजूड असेल तो घोडा. नुस्ता आकार बघितला तर जुगण्याचे तीन त्रिकं नऊ प्रकार होतात. पण चिंचोळी विरुद्ध जाडजूड अशी जोडी असेल तर बाईला त्रास होतो. याउलट रुंद विरुद्ध तोळामासा अशी जोडी असेल तर बाईची खाज पुरती भागत नाही. पण हे सगळं नीट समजून घ्यायचं म्हणजे खूप प्रयोग करावे लागतात. तर असे वेगवेगळे पुरुष तो मला भेटायला घेऊन यायचा. जुगत असताना प्रत्येक क्षणी किती सुख होतं आणि किती त्रास होतो हे तो मला नोंद करून ठेवायला लावत असे. आसन कुठलंही असो, डाव्या हातात तालपत्र आणि उजव्या हातात लेखणी धरून मी आपली लिहीत राहायची. खाली काहीही चालू असलं तरी मन चळू न देता लिहायची सवय मला तेव्हापासून लागली. त्याच दिवसांत कधीतरी मला पोट राहिलं. म्हणून माझ्या पोरीला जन्मापासून लिहिता येतं. दूध पीत असताना अम्म्यावर बोटांनी रेघा अोढायची तेव्हा मला शंका आली.

कृतवर्मा: एकूण ह्या संन्याशानं तुला बरंच सहन करायला लावलं.

सीनू: नाही, तसं नाही. मलाही मजा आली. ही सगळी माहिती एकत्र करून त्यानं नंतर एक पुस्तक लिहिलं. ते तर मी वारेमाप खपवलं. माझ्या पोरीला त्यातून सोन्याचे डूल घेतले. माझाही फायदा झाला आणि इतरांच्याही आनंदाची सोय झाली. एकूण पाहता माझ्या खाजगी रेशीमरस्त्याचा फार चांगला उपयोग झाला. तर सांगत काय होते की पोट राहतेवेळी बाईने आपलं अंग सांभाळायला पाहिजे. कारण मूल तसं होतं.


कृतवर्मा: तू म्हणतेस तसा अनुभव अनेकांना आलेला आहे. आमचा हा कृपाचार्य असा एकलकोंडा होण्यामागचं कारण तेच असावं.


सीनू: म्हणजे?


कृतवर्मा: त्याची जन्मकथाच तशी आहे.


कृपाचार्य: माझी जन्मकथा इथे जगजाहीर केलीच पाहिजे का?


कृतवर्मा: जगजाहीर नाही करत, पण तोंडी लावण्यापुरती सांगतो आहे. ती मनोरंजक असल्याबद्दल तुला कुणी दोष देणार नाही.


कृपाचार्य: ठीक आहे, सांग तर. पण फार रोखठोक शब्द वापरू नकोस.


कृतवर्मा: सांगायचं ते असं की शरद्वान नावाचा एक ऋषी होता. तो शस्त्रविद्येत तरबेज होत चालला होता, आणि त्यामुळे इंद्राला त्याची धास्ती वाटू लागली. शरद्वानाचं ब्रह्मचर्य मोडून काढण्यासाठी त्याने एक अप्सरा पाठवली. अप्सरेने शरद्वानासमोर येऊन आपले सगळे कपडे उतरवले आणि लांबून काही नखरे करून ती परत गेली. इकडे शरद्वानाला राहवेना. एका पाणथळ जागेत रानगवत माजलेलं होतं तिथे तो लपतछपत गेला, आणि हाताने हलवू लागला. एकच गवताची कांडी वर आलेली होती, तिच्यावर नेमका शरद्वानाच्या पांढऱ्याचा फवारा उडाला आणि कांडी मधोमध सोलून निघाली. एका भागातून कृपाचार्य जन्माला आला आणि दुसऱ्या भागातून त्याची बहिण कृपी जन्माला आली. नेमक्या वेळी त्याची आई आपल्या मैत्रिणींपासून अशी फटकून राहिल्यामुळे कृपाचार्याच्या मनाचा कल जमावापासून वेगळं राहण्याचा झालेला आहे.


सीनू: बघा, मी म्हणत नव्हते?


कृपाचार्य: पण हे काहीच्या बाही स्पष्टीकरण झालं! माझा स्वभाव मी घडवलेला आहे. गर्भधारणेच्या वेळी माझी आई कशी वागली ह्याच्याशी त्याचा बादरायण संबंध कशाला जोडता?

कृतवर्मा: पाहिलंत?! म्हणजे फिरून फिरून आपण पुन्हा व्यासावर आलो. त्याचा ससेमिरा काही सुटत नाही. पण सीनूचा सिद्धान्त मला केव्हाचाच पटलेला आहे. धृतराष्ट्र आणि पंडूच्या आयांना तो ठाऊक असता तर आपल्यावर ही वेळ आली नसती.

सीनू: हा काय किस्सा आहे? इथे सगळ्यांना माहित आहे की काय? मी हिंडते खूप, त्यामुळे कुठे ना कुठे काही ना काही ऐकत असते. पण नेमक्या वेळी दुसरीकडे असले तर काहीतरी चविष्ट बातमी ऐकायची राहून जाते.

कृतवर्मा: तुला आणि मयाहुराला ही चित्तरकथा नवी असेल, पण इथे कित्येक वर्षे तो टवाळीचा विषय झालेला आहे. तू व्यासाला पाहिलं आहेस का?

सीनू: नाही.

कृतवर्मा: एकदा पाहिलंस तर दुसऱ्यांना पाहावंसं वाटणार नाही. त्याच्या दाढीचे केस डुकरासारखे राठ आहेत, आणि डोळे गुंजेसारखे तांबडेभडक आहेत. शिवाय अंगाला घाणेरडा वास येतो.

सीनू: मी एक चांगला साबण विक्रीला ठेवते. अंगाला वाईट वास असेल तर त्यानं लगेच जातो. मघाशी मी तुम्हाला तरुण संन्याशाबद्दल सांगितलं तो हे नेहमी म्हणायचा. पुरुषमाणसाने रोज दात घासावेत, आंघोळ करावी, छान वासाचं तेल लावावं. नाहीतर बाईला किळस येते. काखेत घामाचा वास राहून गेला तर फार उबग येतो.

कृतवर्मा: तुला हकिकत ऐकायची असेल तर पुढे सांगतो. आमच्या भरतकुलामध्ये शंतनू नावाचा राजा होता, तिथून हे सगळं सुरू झालं. त्याची बायको सत्यवती. तिला चित्रांगद आणि विचित्रवीर्य नावाचे मुलगे होते. त्यांतला थोरला चित्रांगद लवकर वारला, आणि शंतनूनंतर विचित्रवीर्य गादीवर बसला पण तोही नंतर लगेचच वारला. विचित्रवीर्याला अंबिका आणि अंबालिका नावाच्या दोन राण्या होत्या, पण राज्याला वारस नव्हता. व्यास हा सत्यवतीचा आधीचा मुलगा. तिने त्याला बोलावून घेऊन सांगितलं की अंबिकेत तू बी टाक म्हणजे तिला मुलगा होईल. पण तो रात्री जेव्हा तिच्या खोलीत गेला तेव्हा त्याचा किळसवाणा अवतार बघून ती घाबरली आणि तिने डोळे घट्ट मिटून घेतले. व्यास तसाच तिला जुगला. त्यामुळे तिचा मुलगा आंधळा निपजला. तोच धृतराष्ट्र. आंधळा मुलगा राजा म्हणून चालत नसल्यामुळे सत्यवतीने व्यासाला पुन्हा बोलावून घेतला आणि अंबालिकेत बी टाकायला सांगितलं. त्याला बघून तिचा चेहरा फिकट पडला, म्हणून तिचा पोरगा पंडुरोगी झाला.

सीनू: काय अभंड गोष्ट आहे! पण माझ्या धंद्याला उपयोग होईल. एकेक गबाळग्रंथी बाप्या गाठून त्याला सांगते की हा वस्तरा घे, साबण घे आणि स्वच्छ राहात जा. नाहीतर बायकोला किळस येईल आणि तिला आंधळं पोरगं होईल. धंद्याचं असंच असतं. आपल्याला काय पाहिजे ते लोकांना नीट माहित नसतं. थोडं ढकललं की आपसूक विकत घेतात. आता व्यास हा मोठा माणूस. त्याला साबण विकायची माझी टाप नाही. पण माझ्यासारखीचं आधीच ऐकलं असतं तर चांगलं झालं असतं. धृतराष्ट्राची पोरं आणि पंडूची पोरं यांच्यात हेवेदावे झाले नसते आणि हा एवढा मोठा युद्धाचा डांगोरा वाजला नसता.

मयाहुर: यहुदी लोकांत ही चाल आहे हे मला माहित होतं. त्यांच्यात मोठा भाऊ मेला तर लहान भावाला त्याच्या विधवेचा भोग घ्यावा लागतो. भारतात पूर्वी कधी असं ऐकलं नव्हतं. पण व्यास हा सत्यवतीचा आधीचा मुलगा कसा हे मला समजलं नाही.

कृतवर्मा: सत्यवती ही पूर्वी कोळीण होती. ती एकदा पराशर ऋषीला बोटीतून यमुनेच्या पैलतीरावर घेऊन चालली होती. सत्यवतीला बघून तो पाघळला आणि त्याने तिला जोराचा आग्रह करकरून बळेच जुगायला तयार केली. ती बिचारी भेदरली होती, पण पराशर तिला म्हणाला की तुझ्या अंगाला जो माशांचा घाणेरडा वास येतो आहे तो घालवून तुला चांगला वास येईल अशी मी व्यवस्था करीन. त्याखेरीज तुझी फाटलेली योनी मी पुन्हा दुरुस्त करीन, म्हणजे तू नंतर दुसऱ्याशी लग्न करायला मोकळी राहशील. एवढ्या आमिषावर ती तयार झाली. पराशराने बोटीत अंधार केला आणि तिला तो जुगला. त्याचीही ती पहिलीच वेळ होती, त्यामुळे सगळं पटकन झालं. सत्यवती गरोदर राहिली आणि तिला जो मुलगा झाला तो व्यास. माशांचा वास तिच्या कातडीवरून उडाला खरा पण पिशवीतून गेलेला नसल्यामुळे व्यासाच्या अंगाला अजूनही येतो. सत्यवतीने नंतर शंतनूशी लग्न केलं, पण आपला पूर्वेतिहास त्याला सांगितला नसावा.

कृपाचार्य: अंगाचा वास आईकडून आलाही असेल. पण समोरची बाई गर्भगळित झाली तरी आपलाच हेका दामटणं हा गुण थेट बापाकडून आलेला दिसतो आहे.

संजय: व्यास हा इतरांची तमा बाळगणारा माणूस नव्हे. आता माझंच पाहा: जर धृतराष्ट्राला युद्धाचं वर्णनच हवं असेल तर डोळ्यांनी बघून ते मी करू शकतो. त्यासाठी मला लांबचं दिसायला हवं आणि लांबचं ऐकू यायला हवं इथपर्यंत ठीक आहे. पण ‘मनातले विचारही त्याला समजतील’ हा जो वर मला न मागता दिलेला आहे, त्याची काहीसुद्धा आवश्यकता नव्हती. आणि तोदेखील नीट लागू पडत नाहीच. ही गुंतागुंत व्यासाने निष्कारण वाढवून ठेवली आहे.

कृपाचार्य: मी तुला हे विचारणारच होतो. इतरांच्या मनातले विचार तुला नेमके समजतात तरी कसे?

संजय: म्हटलं ना, नेमके समजत नाहीत. फार निसटते समजतात.

सीनू: पण तरीदेखील हे होतं कसं? बघायला डोळे असतात, ऐकायला कान असतात तसं मन समजायला काय असतं?

कृतवर्मा: माहित नाही. पण ह्याच्या उलट्या टोकाकडून पाहायला हवं. ऐकण्यासाठी आवाज हवेत असतो, बघण्यासाठी वस्तू प्रकाशात असते, तसं मन कुठे असतं हे माहित नाही. तिथून सुरवात करायला हवी.

मयाहुर: मला काय वाटतं ते सांगतो. मन हृदयात असणार इतकं उघड आहे. कान, नाक, डोळे, हात, पाय अशा सगळ्या अवयवांतून हृदयाकडे रक्त जातं. अवयवांत ज्या संवेदना उमटतात त्या हृदयाकडे नेण्याकरता ते असणार, कारण नाहीतर वीसपंचवीस फुलपात्रं भरून हा लाल द्रवपदार्थ अंगात सगळीकडे असायचं काहीच कारण नाही. मला जेव्हा समोर घोडा दिसतो तेव्हा डोळ्यातून त्याचं चित्र आणि कानातून त्याचा आवाज हे दोन्ही रक्ताबरोबर हृदयाकडे जातात. हृदयात हे दोन प्रवाह एकत्र येतात आणि घोडा खिंकाळलेला मला कळतो.

सीनू: पण रक्तात जर संवेदना असतील तर सांडलेल्या रक्तात त्या दिसत का नाहीत?

मयाहुर: त्या दिसत नाहीत याचं मला आश्चर्य वाटत नाही. रक्त दाट आणि चिकट असतं, तेव्हा त्या सहज कुठेही लपत असतील.

कृपाचार्य: इथपर्यंत मला बरोबर वाटतं. समजा जखम होऊन अंगातलं पुष्कळ रक्त निघून गेलं तर हृदयाचा बाकी अवयवांशी संपर्क तुटत असणार. त्यामुळे मन थांबून माणूस मरतो.

कृतवर्मा: पण ठार मारलेल्या माणसाचं हृदय मी कापून काढून आतून पाहिलेलं आहे. त्यात मन मावलेलं मला कुठे दिसलं नाही.

मयाहुर: पण त्याने काही सिद्ध होत नाही. समजा एका दमलेल्या माणसाला आपण ठार मारला आणि त्याचे हातपाय चिरून पाहिले, तर त्याच्या स्नायूंतला थकवा डोळ्यांना दिसणार नाहीच. स्नायूंत थकवा असतो तसंच हृदयात मन असणार.

कृतवर्मा: मला अजून पटलेलं नाही. लढाई करतानाचा माझा एक अनुभव सांगतो. शत्रूने माझ्या हृदयावर बाण सोडला तर तो माझ्या हृदयाच्या रोखाने येतो आहे अशी जाणीव मला होते. पण माझ्या डोळ्यांवर सोडला तर तो माझ्या रोखाने येतो आहे अशी जाणीव होते. म्हणून मला वाटतं की मन हे दोन डोळ्यांच्या मधोमध डोक्यात असावं, हृदयात नाही.

मयाहुर: ह्या वाटण्यावर मी फार भिस्त ठेवणार नाही. का ते सांगतो. माणसाच्या पाच ज्ञानेंद्रियांपैकी चार, म्हणजे डोळे, नाक, कान आणि जीभ ही निव्वळ योगायोगाने डोक्यात आहेत. पाचवं अंगभर विखुरलेलं आहे. त्यामुळे डोकं फार महत्त्वाचं आहे असं आपल्याला विनाकारण वाटतं. बाण तुला डोळ्यांनीच दिसत असल्यामुळे डोळ्यांकडे येताना तो तुझ्याकडे येतो आहे असं वाटतं. पण तुझं मन कुठं आहे याच्याशी त्याचा संबंध नाही. तुझं मन तुझ्या अंडकोषात जरी असतं तरीसुद्धा डोळ्यांच्या रोखाने येणाऱ्या बाणाची तुला तितकीच भीती वाटली असती.

सीनू: पण मग मेंदूचा उपयोग काय? त्याचा हृदयाशी काही ना काही संबंध असणार. कारण डोक्याला जोरात लागलं तरी माणूस मरतोच.

मयाहुर: मी यवनांच्या देशात असताना काय ऐकलं ते सांगतो. अशा गोष्टींवर ते सतत चर्चा करत असतात. त्यांचा तर्क असा आहे की संवेदना वाहून वाहून रक्त गरम होतं, आणि ते मेंदूत जाऊन थंड होऊन बाहेर येतं. मेंदूचा उपयोग हा आहे. पण जर मेंदू निकामी झाला तर खूपसं गरम रक्त हृदयात एकदम घुसून मनही निकामी होतं. म्हणून माणूस मरतो.

संजय: इथपर्यंत थोडंसं समजलं. पण मला वर मिळाल्यानंतर ह्यात काय फरक पडला असेल?

मयाहुर: ते मलाही नीट समजलेलं नाही. पण एक सर्वसाधारण तत्त्व म्हणून असं सांगता येईल की काही वस्तू इतर वस्तूंवर लांबवरून प्रभाव पाडू शकतात. चंद्राचा समुद्रावर प्रभाव पडून त्याला फुगवटा येतो, किंवा सूर्याचा गवतावर प्रभाव पडून ते वाळतं. व्यासाने जेव्हा तुला वर दिला तेव्हा तुझ्या कानांवर आणि डोळ्यांवर प्रभाव पाडून ते त्याने जास्त तिखट केले असावेत. म्हणूनच तुला लांबचं ऐकू येतं आणि लांबचं दिसतं. पण असा प्रभाव सगळ्याच वस्तूंचा सरसकट नसतो. सूर्याचा समुद्रावर प्रभाव पडत नाही, किंवा चंद्राला गवत वाळवता येत नाही. वर हा प्रकारही तसाच असावा. विशिष्ट माणसांना विशिष्ट कामीच तो देता येत असणार. कुणीही देऊन उपयोग नाही.

संजय: मला पुरतं कळलं असं वाटत नाही.

मयाहुर: हे पाहा, ह्या सगळ्याचा शक्य तितका सुसंगत अर्थ लावता यावा एवढाच माझा प्रयत्न आहे. तो लागला आहे असं मी म्हणत नाही. आपल्या हातात दुसरं काही आहे का?

कृपाचार्य: ठीक आहे, तूर्तास असं समजू की मयाहुर म्हणतो ते बरोबर आहे. पण मग दुसऱ्या माणसाच्या मनातलं संजयला कसं समजू शकेल? हा काही संजयच्या एका कुठल्या अवयवावर व्यासाने पाडलेला प्रभाव नव्हे. तर संजयचं हृदय आणि दुसऱ्या माणसाचं हृदय ह्यांच्यात संबंध जोडून आणायचा असा हा वेगळ्याच जातकुळीतला प्रश्न आहे. पण तसं कसं करणार?

मयाहुर: ढोबळपणे बोलायचं म्हणजे पिकलेला आंबा कैरीशेजारी ठेवला तर कैरी पिकते तशासारखं काहीतरी हे आहे. संजयचं मन ही कैरी आहे असं समजलं तर ह्या कैरीला असा वर दिलेला आहे की जवळ असलेल्या आंब्यांचं पिकलेपण तू वेगाने आत्मसात करू शकशील. आता ह्यापेक्षा जास्त चांगली उपमा मला तरी सुचत नाही, कारण उपमेयातच गोंधळ आहे.

संजय: हा वर मिळाल्यापासून तो पडताळून पाहण्याचा मी थोडाफार प्रयत्न केला आहे. माझा निष्कर्ष सांगतो. पिकलेल्या आंब्याशेजारी कैरी ठेवली तर ती पिकते, आणि पिकलेल्या केळ्याशेजारी ठेवली तरीही पिकते. पण तुपाच्या हंड्यात बुचकळली तर पिकत नाही. कैरीच्या सालीत तुपाचा वास शिरून तिची चव फक्त किंचित बदलते. दुसऱ्याचं मन समजावून घेणं हा प्रकार मला काहीसा असाच वाटतो. कधीकधी ते जमतं, पुष्कळदा जमत नाही. जमायचं तर रसायन जुळलं पाहिजे.

मयाहुर: पण हे काही स्पष्टीकरण नव्हे. आपण नुसती उपमा पुढे रेटतो आहोत.

संजय: खरं आहे, पण मी तरी आणखी काय करू शकतो? मघाशीच घडलेला एक प्रसंग आहे, थोड्या विस्ताराने सांगतो. कृतवर्मा आणि मी इथे येत असताना घोड्याला तहान लागल्यामुळे आम्ही थांबलो. आम्हाला पाणी देणारा सैनिक इरावानाच्या सैन्यातला, म्हणजे पांडवांकडून लढणारा होता. तो जातीने भिल्ल आहे आणि पोषाखही तसाच करतो. घोडा पाणी पीत असताना हा माणूस अदबीने माझ्यासमोर उभा होता. एक चाळा म्हणून त्याच्या मनातले विचार समजून घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो असातसा नसून एक विशिष्ट भिल्ल आहे.

हे कळण्यासाठी तुम्हाला लाक्षागृहाची हकिकत सांगावी लागेल. खूप पूर्वीची म्हणजे पांडवांचं अजून लग्न व्हायचं होतं तेव्हाची गोष्ट. पांडव खूप बलाढ्य होऊ लागल्यामुळे धृतराष्ट्राला वाटू लागलं की त्यांचा काटा काढावा. वारणावतामध्ये त्याने एक लाखेचं घर बांधून घेतलं, आणि पांडवांना कुंतीसह तिथे राहायला पाठवलं.

मयाहुर: मला त्या घराबद्दल खूप कुतूहल होतं, म्हणून ते बांधणाऱ्याला मी शोधून काढून भेटलो. त्याचं नाव आता मी विसरलो, पण तो मूळचा चीनमधला. लाखेला मजबुती आणता यावी याकरिता चतुराई वापरून त्याने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले होते. त्याच्याशी बोलून मला खूप शिकायला मिळालं. मी हे घर कधी पाहिलं नसल्यामुळे माझी कल्पना होती की ते नुसतं लालेलाल असेल. पण तसं नव्हतं. तो मला म्हणाला की लाखेत कितीतरी रंग आणता येतात. त्या घराच्या दिवाणखान्यात त्याने रेशीमरस्त्यावरच्या वेगवेगळ्या देखाव्यांची भित्तिचित्रं काढली होती. पण नंतर ते सगळं जळाल्याचं ऐकून त्याला फार वाईट वाटलं.

संजय: ते जळण्यासाठीच बांधलेलं होतं. पांडव त्यात राहायला गेल्यानंतर एके रात्री ते पेटवून द्यावं असा दुर्योधनाचा कट होता. पण युधिष्ठिराला हे आधीपासून ठाऊक होतं. त्याने त्या रात्री एक भिल्लीण आणि तिचे पाच मुलगे ह्यांना एकत्र जेवायला बोलावलं आणि सरसकट सगळ्यांना खूप दारू पाजून झोपवलं. रातोरात पांडव कुंतीसह पळून गेले. घर एकदाचं जळाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी जी प्रेतं सापडली ती काही अोळखता येण्यासारख्या परिस्थितीत नव्हती. एक बाई आणि पाच पुरुष आहेत इतकंच दिसलं, तेव्हा दुर्योधन खूष झाला. पांडव जिवंत आहेत हे त्यानंतर कित्येक दिवस त्याच्या लक्षात आलं नाही.

कृतवर्मा: त्यावेळी पांडवांना खूप यातायात झाली म्हणतात. हवी तशी बाई मिळायला फार शोधावं लागलं. एका बाईला पाच मुलगे होते पण ती दारू पिणाऱ्यातली नव्हती. दुसरी एक दारू पिणारी मिळाली पण तिला तीनच मुलगे होते. तिसरी एक दारूबाज होती आणि तिला पाच मुलगेही होते पण त्यांतला एक थोटा निघाला. जळाल्यानंतर एका प्रेताचा हात संशयास्पद दिसला असता, आणि पांडवांना तो धोका पत्करायचा नव्हता. एक ना दोन. पण शेवटी जमलं.

संजय: तर मला भेटलेला सैनिक म्हणजे त्या दिवशी जळून मेलेल्या भिल्लिणीचा नवरा. त्या रात्री तो शिकारीला गेलेला होता आणि मचाणावरच झोपला होता. आल्यानंतर त्याला सगळी हकिकत कळली. त्याच्या मनात मला दिसलं ते असं की शेजारच्या गावात त्याने दुसरी एक भिल्लीण ठेवलेली होती. जुनी बायको दारू पिऊन कजागपणा करत असे आणि पोरंही त्याच नादाला लागलेली होती. त्यांना पैसा पुरवून पुरवून बापाच्या कमरेचा काटा ढिला झालेला होता. हे लोढणं रातोरात आपसूक गळ्यातून उतरल्यामुळे तो भलताच खूष झाला, आणि आठवडाभरातच राजरोस दुसरीबरोबर राहायला गेला. पांडवांचे उपकार मानून तो आता त्यांच्या बाजूने लढतो आहे.

ह्या भिल्लाच्या जागी मी असतो तर बायकामुलं मेल्याचं मला प्रचंड दु:ख झालं असतं. त्याला ते थोडंसुद्धा झालेलं नाही. माझ्या मनात पांडवांविरुद्ध प्रचंड सूडाची भावना असती. ती त्याच्यात थोडीसुद्धा नाही. ह्या भिल्लाचं मन मला अगम्य वाटलं. मी कैरी असेन तर तो तुपाचा हंडा आहे. वरून वास लागेल पण आतल्या गराचं तूप होणार नाही. माझ्या आजूबाजूला असे तुपाचे हंडे खूप आहेत आणि पिकलेले आंबे थोडेच आहेत. व्यासाला हे आधी कळायला हवं होतं, पण अघळपघळ वर देऊन तो मोकळा झाला आहे.

कृतवर्मा: मी तर म्हणतो की व्यासाला काय अभिप्रेत होतं हे तुला समजलेलं नाही याचाच अर्थ वर फसला आहे. कारण नाहीतर त्याचं मन तुला समजायला हवं होतं. तो स्वत: तुपाचा हंडा नव्हे तर कुजलेल्या मासळीची टोपली आहे. त्याचा वाससुद्धा न लागलेला बरा.

मयाहुर: हे पाहा, व्यासावर तरी आपण कशाला इतकी धार धरायची? माणूस हुशार आहे म्हणतात, पण ह्या प्रांतात तोही चाचपडत असणार. तुम्हाला मी मघाशी म्हणालोच: यवनांना ह्या विषयाचा कधी कंटाळा येत नाही. मन कशाचं बनलेलं असतं, त्यात विचार कसे येतात, मनाला गोष्टी लक्षात कशा राहतात आणि विसरतात कशा, बायकांचं मन वेगळं असतं का, अशा मुद्द्यांवरून त्यांच्याकडे खूप धुमश्चक्री चालते. कुणाच्या मतात कुठे भेग आहे ह्याची डोळ्यात तेल घालून छाननी होते. पण इतकं करूनही त्यांना स्वच्छ उलगडा कशाचाच झालेला नाही.

माझा एक अनुभव सांगतो. तिथले लोक ‘सुराशार समुद्र’ असं खूपदा म्हणतात. हा शब्दप्रयोग त्यांच्या नाटकांत येतो, कवितांत येतो. मला चमत्कारिक वाटला. समुद्र निळाशार असेल, काळाशार असेल, पण सुराशार कसा असेल? एकतर त्यांची सुरा जगावेगळी नसते. वेगवेगळ्या द्राक्षांपासून बनवलेली सुरा इथे जशी वेगवेगळ्या प्रकाशांत वेगवेगळी दिसते तशीच त्यांच्याहीकडे दिसते. त्यांचा समुद्र दिसायला जगावेगळा नसतो. वेगवेगळ्या प्रकाशांत जसा भारतातला समुद्र वेगवेगळा दिसतो तसाच त्यांच्याहीकडे दिसतो. म्हणून माझ्या अोळखीतल्या कितीतरी यवनांना मी खोदून खोदून विचारलं की ‘सुराशार समुद्र’ म्हणजे काय? पण सगळ्यांना मान्य होईल असं एकच एक उत्तर मला काही मिळालं नाही. काहीजण म्हणाले की मावळतीच्या समुद्राचा रंग सुरेसारखा दिसतो. काहीजण म्हणाले की समुद्राकडे पाहिल्यावर जो एक गहिरा खिन्न भाव मनात येतो तो सुरा प्यायल्यावरही येतो. रंगाशी त्याचा संबंध नाही. काहीजण म्हणाले की हा शब्दप्रयोग कवितेत ऐकायला छान वाटतो आणि वृत्तात घट्ट बसतो म्हणून आम्हाला तो आवडतो, पण त्याला नक्की असा अर्थ नाही. म्हणजे ‘सुराशार समुद्र’ असं जेव्हा दोन यवन एकमेकांसमोर म्हणतात तेव्हा त्यांना बहुतेक वेळा परस्परांचं मन समजलेलं नसतं. पण हे ठाऊक असूनही ते म्हणतातच याचा अर्थ त्यांना त्याची विशेष पर्वाही नसते. तसंच दामटून नेतात पण बिघडत काही नाही.

कृपाचार्य: एखादा यवन पकडून इथेच आणला पाहिजे. संजयचं हे मनसामुद्रिक त्याच्यावर कितपत चालेल ते बघायची मला फार उत्सुकता आहे.

संजय: मला तर काहीच समजणार नाही, कारण मी कधी समुद्र पाहिलेला नाही. इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापुराच्या पंचक्रोशीबाहेर मी अजून पडलेलो नाही.

सीनू: म्हणतोस काय?! संजया, तुझं आयुष्य नुस्तं वाया चाललं आहे! समुद्र बघितल्याखेरीज माणसाचं खरं नाही. मघाशी मी म्हणाले ते धंद्यातल्या भागीदारीचं वगैरे राहू दे. हे सगळं संपलं की तू माझ्याबरोबर समुद्र पाहायला चल. एकदा बघितलास की विसरणार नाहीस.

कृतवर्मा: सीनू, ‘सगळं संपलं’ हा शब्दप्रयोग करून माझा अंत पाहू नकोस. हा पटांगणातला प्रकार कुठवर आला आहे? आधी तो संपल्याखेरीज सगळं कसं संपेल?

कृपाचार्य: माझ्याही मनात तोच प्रश्न होता. कितवा अध्याय सुरू आहे?

संजय: नववा आत्ताच सुरू झाला आहे.

सीनू: नऊ दुणे अठरा. हात्तिच्या! म्हणजे निम्मासुद्धा काथ्या अजून कुटून झालेला नाही. अजून खूप वेळ जायचा आहे!

कृतवर्मा (भुवया आक्रसत): हो. जायचा आहे खरा. पण तो जाणार कसा?

सीनू: तर माझा प्रस्ताव ऐका. आत्ताच्या आपल्या चर्चेचं सार काय होतं? हेच की माणसांना एकमेकांचं मन समजणं अवघड जातं. याहीपुढे जाऊन मी म्हणते की दुसऱ्याचंच काय तर स्वत:चंही मन स्वत:साठी अंधाऱ्या फडताळासारखं असतं. तिथे शोधल्यावर काय सापडेल ह्याचा आधी अंदाज नसतो आणि जे सापडतं ते नकोसं वाटतं. अर्जुनाचं तुम्ही बघताच आहात. तर ह्या विषयावरची एक छोटेखानी गोष्ट माझ्याकडे आहे. बाबीलमध्ये ती मी ऐकली आणि लगोलग लिहून घेतली. तुम्हाला ऐकायची असेल तर वाचून दाखवते. वेळ छान जाईल.

कृपाचार्य: मी तयार आहे.

कृतवर्मा: मीही तयार आहे.

सीनू: मग थांबा, मी आलेच. (उठून गाड्याकडे जाते आणि एक चोपडी घेऊन येते.) तर ऐका! गोष्टीचं नाव आहे ‘समद्विभुजा.’

कृतवर्मा: समद्विभुजा?

सीनू: समद्विभुजा.

(गोष्ट वाचली जात असताना आपलं लक्ष नाहीसं दाखवत मयाहुर शून्यात नजर लावून बसला आहे.)

समद्विभुजा

दमास्कस शहरामध्ये सायरस आणि घनीम हे दोघे तरुण मित्र राहत होते. एकमेकांना वरचेवर भेटल्याखेरीज त्यांना चैन पडत नसे, आणि गप्पा मारण्यात त्यांचे तासनतास खर्च होत असत.

एके दिवशी अथीना नावाच्या एका देखण्या मुलीशी सायरसची अोळख झाली. दोघे पटकन प्रेमात पडले, आणि ह्यानंतर लवकरच त्यांनी लग्न करून एक टुमदार घर घेतलं. सुरवातीच्या काही दिवसांत घनीम दोघांना भेटून जात असे, पण हळूहळू तो येईनासा झाला. सायरस म्हणाला, बाबारे, आपली दोघांची इतक्या वर्षांची मैत्री आहे. ती इतक्या सहजासहजी अडगळीत टाकणं तुला कसं जमतं? यावर घनीम म्हणाला की मला मैत्री नको आहे असं नाही, पण लग्नानंतर तरुण जोडप्याला आपल्यात तिसरं कुणी नसावंसं वाटतं. म्हणून मी चार हात लांब राहतो आहे. आणि त्याखेरीज अथीना चारचौघांत उठून दिसण्यासारखी असल्यामुळे तिऱ्हाइताने तुमच्या घरी वारंवार येणं प्रशस्त नव्हे. ह्यावर सायरस म्हणाला की तू असा ग्रह करून घेऊ नकोस. तू आपला येत जा. तुझ्याशी बोलल्याखेरीज मला बरं वाटत नाही.

एके दिवशी ठरवून सायरस घनीमला घराबाहेर भेटला. तो म्हणाला, मी तुला इथे बोलावलं ह्यामागे तसंच कारण आहे. अथीना माझ्यावर प्रेम करते आणि ती माझ्याशी एकनिष्ठ आहे याबद्दल माझी पक्की खात्री आहे. परंतु तिच्या निष्ठेची पुरेशी कसोटी लागली आहे असं मला वाटत नाही. कदाचित फारसे पुरुष तिने जवळून पाहिलेले नसल्यामुळे तिला मी आवडलो आणि तिने माझ्यापलीकडे विचार केला नाही असं शक्य आहे. एखाद्या गबाळ्या माणसावर ती लट्टू होणार नाही हे मान्य. पण सरासरीच्या खूपच वरचा असा कुणी तरुण जर तिच्याकडे लक्ष पुरवू लागला तर तिच्या मनात चलबिचल होणार नाही याचा काय भरवसा आहे? तेव्हा माझी इच्छा अशी आहे की तू तिच्याकडे प्रेमयाचना करून पाहावीस. हे ऐकून घनीम अवाक झाला. तो म्हणाला, अशी विषाची परीक्षा बघणं हा शुद्ध वेडेपणा आहे. आणि मी असं करणं हा अथीनाचा अपमान नाही का होणार? ह्यावर सायरस म्हणाला की काही बायकांना गरोदर असताना लाकूड, चिखल, खडू असल्या विचित्र गोष्टींची खावखाव सुटते. त्यावर काही इलाज नसतो. माझी तशीच अवस्था आहे असं समज. ही चाचणी मला घेऊन बघायचीच आहे, तेव्हा माझी तेवढी एक हौस तू पुरी कर. पण घनीम ह्याला तयार होईना. तेव्हा सायरस खिशात हात घालून म्हणाला की आपण नाण्याचा कौल घेऊन बघू. जर एनकिडू आला तर तू माझ्या मनासारखं कर, आणि सिंह आला तर मी माझा हट्ट सोडून देईन. ह्यामागचा सांकेतिक अर्थ स्पष्ट आहे. एनकिडू आणि गिलगामेश यांची मैत्री प्रसिद्ध आहे, तेव्हा एनकिडू आला तर तू तुझ्या मित्राचं म्हणजेच माझं ऐकायला हवंस. ह्याउलट सिंह हा निष्क्रिय प्राणी असल्यामुळे तो आला तर आपण सध्याची परिस्थिती बदलू नये असा त्याचा अर्थ होईल. घनीम याला कसाबसा तयार झाला. सायरसने नाणं वर उडवलं, ते खाली पडताच एनकिडू दिसला. सायरस घनीमला म्हणाला की उद्याच तू चाचणीला सुरुवात कर.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जेव्हा घनीम ह्या जोडप्याला भेटायला आला तेव्हा सायरस त्यांना म्हणाला की काही तातडीच्या कामासाठी मला बाहेर जाऊन यावं लागेल, तोपर्यंत तुम्ही बोलत बसा. कुणाला काही प्रत्युत्तर करण्याची सवड न देताच तो तडकाफडकी निघून गेला. प्रत्यक्षात तो घराला एक वळसा घालून किल्लीच्या भोकातून बघत बसला होता. यानंतरच्या दिवशी जेव्हा घनीम आणि सायरस भेटले तेव्हा घनीम म्हणाला की मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे अथीनाकडे प्रेमयाचना करून पाहिली पण तिने मला मुळीच दाद दिली नाही. यावर सायरस म्हणाला की तू खोटं बोलू नकोस. माझ्यावरच्या प्रेमापोटीच तू खोटं बोलतो आहेस हे मला ठाऊक असलं तरीसुद्धा बोलू नकोस. मी घर सोडताक्षणीच तू आरामखुर्चीत झोपून गेलास आणि माझी चाहूल लागताच खडबडून उठलास हे मला चांगलं ठाऊक आहे. तू मला शब्द दिलेला आहेस, तेव्हा पुन्हा रीतसर आणि निकराचा प्रयत्न करून बघ. या फंदात कुठून पडलो असं घनीमला वाटत राहिलं, पण आता वेळ निघून गेलेली होती. पण त्याने विचार असा केला की हे सगळं संपल्यानंतर मी अथीनासमोर सफाई देऊन तिची सपशेल माफी मागेन. त्यामुळे ह्या प्रकरणावर पडदा पडेल आणि सारं काही पूर्वीसारखं होईल.

त्या दिवसानंतर ही ना ती सबब सांगून सायरस सतत प्रवासावर जाऊ लागला, जेणेकरून घनीमला पुरेसा वेळ मिळावा आणि हा प्रयोग नीट राबवता यावा. त्याच्या ह्या वागणुकीमुळे अथीना बुचकळ्यात पडली. घनीम तिला भेटत राहिला, आणि आपल्या नवऱ्याचा मित्र म्हणून ती त्याचं आदरातिथ्य करत राहिली. घनीमने असं ठरवलं की प्रेमयाचनाच जर करायची तर ती कशीबशी उरकून घेण्यापेक्षा नीट करावी. ह्या त्याच्या बेतानुसार तो अथीनाकडे भरभरून लक्ष देऊ लागला. अथीनाने आपल्या नवऱ्याला एकदा हे बोलून दाखवलं की घनीम माझ्याशी फार संशयास्पद वागतो आहे, आणि मला काही हे आवडत नाही. सायरसला कळून चुकलं की घनीमने चाचणी मनावर घेतलेली आहे. तो अथीनाला म्हणाला की मला कामासाठी बाहेरगावी जावं लागत असल्यामुळे घनीमला एकटं वाटत असेल, म्हणून तो आपल्या घरी येतो. त्याला तू दूर लोटू नकोस. स्वत:च्या वागण्यात सायरसने तसूभरही फरक केला नाही, आणि पूर्वीसारखाच तो वारंवार शहर सोडून जात राहिला.

घनीम येतच राहिला. तो दिसायला उमदा असल्यामुळे आणि बोलण्यात चतुर व कोटिबाज असल्यामुळे हळूहळू अथीनाच्या मनाचा कल त्याच्या दिशेने होऊ लागला. ती स्वत:शी असं म्हणाली की माझ्या नवऱ्याचं बहुतेक काहीतरी प्रकरण आहे आणि म्हणूनच तो नेहमी बाहेर असतो. त्याला जर माझ्याबद्दल काही वाटत नसेल आणि हा इतका छान माणूस जर माझ्या प्रेमात असेल तर मी नाही का म्हणावं? आणि अशा रीतीने अथीना घनीमला वश झाली. घनीमला हे पूर्णपणे अनपेक्षित होतं, पण सायरसला ते सांगितल्यामुळे त्याला दु:खच होईल अशा विचाराने तो काही बोलला नाही. सायरसला तो म्हणाला की तुझी बायको तुझ्याशीच एकनिष्ठ आहे, आणि माझ्या प्रियाराधनामुळे संतापून जाऊन तिने मला तुझ्या घरी यायची बंदी केलेली आहे.

एके दिवशी सायरस शहर सोडून गेलेला असताना घनीम अथीनाच्या घरी आला. पण सायरस प्रत्यक्षात गेलेलाच नव्हता तर आपल्याच घराच्या दिवाणखान्यावर बाहेरून पाळत ठेवून होता. अथीना घनीमचं चुंबन घेताना त्याला नेमकी दिसली. ह्या वेळी घनीम पाठमोरा असल्यामुळे सायरस तिथे असल्याचं त्याला कळलं नाही, पण अथीनाला मात्र सायरस तिच्याकडे पाहताना अोझरता दिसला. तिने आपल्याला पाहिलं आहे हे सायरसच्या लक्षात आलं नाही. सायरस जेव्हा परत आला (अर्थात तो खरा गेलेला नव्हताच) तेव्हा पोटात बाकबूक होते आहे अशा अवस्थेत अथीनाने त्याचं स्वागत केलं. आता कोणत्याही क्षणी तो आपल्याला जाब विचारणार ह्या भीतीमुळे अथीनाचं मन तिला खाऊ लागलं. पण प्रत्यक्षात जेव्हा तसं काहीच झालं नाही, तेव्हा आता कसं वागावं हे अथीनाला समजेना. तिने तर्क असा केला की सायरस स्वत: बाहेरख्याली असावा आणि या गोष्टीची शरम वाटत असल्यामुळे बायकोला जाब विचारण्याची त्याची हिंमत होत नसावी. आपली प्रतारणा सायरसला ठाऊक असल्याचं तिने घनीमला सांगितलं नाही. ती सायरसला म्हणाली की घनीम माझ्याशी संशयास्पद वागतो आहे असं जे मी पूर्वी बोलले होते तो माझाच गैरसमज होता, प्रत्यक्षात तसं काही नाही.

एक व्यक्ती म्हणून घनीमला अथीना आवडत असली तरीदेखील तिच्यावर त्याचं प्रेम नव्हतं. पण सायरसच्या वागण्यामुळे ती अधिकाधिक दु:खी झालेली पाहून तिला सोडून देणं त्याला आता शक्य राहिलेलं नव्हतं. खोटं भांडण काढून आपण अथीनाला तोडून टाकण्याचा प्रयत्न केला तर तिला आणखी वाईट वाटेल ह्या कल्पनेने तो हतबल झाला. आपण पुरते फसलो ही भावना त्याच्या मनात बळावत चालली.

एके दिवशी संध्याकाळी सायरसने घनीमला निरोप पाठवला की अथीना बाजारहाट करायला गेलेली आहे, तेव्हा तू घरी यायला हरकत नाही. घनीम आला. तो सायरसला म्हणाला की मला थोडाच वेळ थांबता येईल, कारण अथीनाने मला इथे बघितलं तर डोक्यात राख घालून ती मला हाकलून देईल. एक बाब तुला आवर्जून सांगायची आहे ती अशी की ही सत्वपरीक्षा आता आपण दोघांनी निष्कारण ताणू नये. तुझ्या बायकोची तुझ्यावरची निष्ठा अढळ आहे याबद्दल मला खात्री कधीचीच होती, पण तुझ्याही मनातला किंतू आता तू कायमचा सोडून द्यायला हवास. तिला तू सगळा बनाव सांग, त्यानंतर आपण दोघेही तिची क्षमा मागू आणि पूर्वीसारखे राहायला लागू. ह्यावर सायरसने खिशातून सुरा बाहेर काढला आणि चवताळून तो घनीमच्या अंगावर धावून गेला. घनीम जास्त चपळ असल्यामुळे त्याने सायरसकडून सुरा हिसकावून घेतला, पण हातापायीमध्ये सायरसला वर्मी जखम झाली. घनीम घाबरून गेला, आणि पळ काढण्याच्या बेतातच होता तेवढ्यात अथीना हजर झाली. ती घनीमला म्हणाली की इथे थांबलास तर तुला शिपाई धरून नेतील. आणि मलाही आता ह्या घरात राहणं जिवावर आलेलं आहे. तेव्हा तू मला घेऊनच चल. नाही म्हणणं घनीमला शक्य नव्हतं. खर्चाला पैसे असावेत म्हणून त्याने बेशुद्ध पडलेल्या सायरसच्या खिशातलं एकुलतं एक नाणं हस्तगत केलं. जीव मुठीत धरून दोघेही रातोरात शहराबाहेर पळाले.

दुसऱ्या दिवशी रस्त्यालगतच्या एका भटाऱ्याकडून घनीमने पाव विकत घेतला. खिशात घातलेला हात बाहेर काढताच त्याच्या लक्षात आलं की नाण्याच्या दोन्ही बाजूंना एनकिडू आहे. परंतु नाण्यात चांदी असल्यामुळे भटाऱ्याने ते किंमत पाडून का होईना पण घेतलं.

अथीना आणि घनीम ह्यांना घर करावं लागलं. सायरसने त्या दोघांना चोरून बघितल्याचा प्रसंग अथीनाने जेव्हा घनीमला सांगितला, तेव्हा सायरस का संतापला हे त्याला कळून चुकलं. मात्र ह्या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल तो अथीनाकडे अवाक्षरही बोलला नाही. तिला आनंदात ठेवण्याचा तो यथाशक्ति प्रयत्न करू लागला, आणि आपल्या चतुर बोलण्याचं प्रमाण त्याने वाजवीपेक्षा जास्तच वाढवलं. पण दिवसांगणिक घनीमचा उमदेपणा कमी झाला होता, आणि जो कोटिक्रम अथीनाला आधी आवडत असे तो सतत ऐकावा लागल्यामुळे कंटाळा येत चालला होता. घनीमचं आपल्यावर प्रेम नाही हे अथीनाला लवकरच कळून चुकलं, पण त्याने तशी बतावणी का करावी हे मात्र तिला कधी कळलं नाही. इतक्या चांगल्या माणसाला सापळ्यात अडकल्यासारखं वाटावं ह्याला आपण काही अंशी कारणीभूत झालो ह्या भावनेने ती कायमची दु:खी झाली. आपली जी मैत्रिण होती ती प्रेयसी असल्याचं ढोंग करून तिला आपण फसवलं आणि स्वत:देखील फसलो ह्या भावनेने घनीमही कायमचा दु:खी झाला. ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम नाही तिच्याबरोबर आयुष्य काढण्याचा प्रसंग अशा प्रकारे दोघांवर येऊन ठेपला. परंतु संसार तसाच पुढे ढकलत राहण्याव्यतिरिक्त त्यांच्यासमोर पर्याय उरलेला नव्हता.

सायरसची जखम हळूहळू बरी झाली. पण त्याला दारूची सवय लागली आणि लवकरच तो कफल्लक झाला. चिडचिडेपणा हा त्याचा स्थायीभाव बनला, आणि स्त्रीजातीविषयीचं त्याचं मत कायमचं बिघडून गेलं.

कृपाचार्य: गोष्ट आवडली. ‘तिघेही सुखी होते’ पासून ‘तिघेही दु:खी झाले’ पर्यंतचा प्रवास गंमतीचा आहे. अर्थात गोष्ट ऐकणाऱ्यासाठी गंमतीचा आहे, त्यातल्या पात्रांसाठी गंमतीचा नाही.

कृतवर्मा: गोष्टीमागची कल्पना मला अशी दिसते की पांढऱ्या रंगाचा एक समद्विभुज त्रिकोण होता, आणि तो मधोमध उंचीवर पलटवताच त्याचा काळा त्रिकोण झाला. अथीना हा त्रिकोणाचा शिरोबिंदू आहे आणि दोघे पुरुष हे तिच्यापासून समान अंतरावर असलेले पायाचे दोन बिंदू आहेत. आधी तिची एका बिंदूशी जोडी होती, ती तुटून दुसऱ्या बिंदूशी झाली. हा संकेत गोष्टीतच आहे, कारण नाणं पलटवलं तरी एनकिडूचा एनकिडूच राहतो. काटेकोर विचार करणाऱ्या कुणीतरी ही गोष्ट रचलेली आहे.

कृपाचार्य: मयाहुरा, तू काहीच कसा बोलत नाहीस? गोष्ट तू पूर्वी वाचली होतीस की काय?

सीनू: तो लाजतो आहे. गोष्ट त्यानेच लिहिलेली आहे. बाबील वगैरे ती माझी थाप होती.

संजय: हे मला आधीच ठाऊक होतं, पण म्हटलं आपण कशाला बोला?

सीनू: अरे हो! तुला समोरच्याचं मन वाचता येतं नाही का? मी विसरलेच होते. पण ह्याचा अर्थ तुला गोष्टीत काय होणार हे आधी कळलं असेल.

संजय: नाही. माणसांच्या मनातलं अोळखताना जिथे पुरेवाट होते, तिथे गोष्टीतल्या माणसांच्या मनातलं अोळखणं शक्य नाही. मी गोष्टीच्या आत असतो तर वेगळं होतं. मग अथीनाला आधीच सगळं सांगून सावध केलं असतं.

(‘अरे, तिकडे बघा!’, ‘कुठे?’, ‘तिथे समोर बघा!’, ‘दिसतंय का?’, ‘काय झालं?’, ‘काही कळत नाहीय’ असे आवाज अचानक चोहोबाजूंनी येऊ लागतात. सीनू उठून मागे पळत जाते. अनेक सैनिक तिच्या गाड्यावर चढून एकटक दूरवर पाहताहेत. इतर काही सैनिक त्यांच्या खांद्यावर चढले आहेत.)

सीनू: अरे, आधी खाली उतरा बघू! माझा गाडा मोडाल तुम्ही. (सैनिक दाद देत नाहीत.) अरे, उतरा म्हणते ना! माझा धंदा बंद पडला तर अफूच काय फुटाणेदेखील मिळायचे नाहीत.

(हे ऐकून सैनिक नाईलाजाने खाली उतरू लागतात.)

कृतवर्मा: काय झालं?

एक सैनिक: अर्जुन उताणा पडून एकटक सूर्याकडे बघतो आहे. त्याला उर्ध्व लागला आहे. मोठे गोपाळ अोणवे होऊन उजव्या हाताचा तळवा त्याच्या डोळ्यांसमोरून फिरवताहेत.

कृपाचार्य: हा पुन्हा ढेपाळलेला दिसतोय! आता मात्र युद्ध होत नाही एवढं नक्की आहे. कुणीतरी त्याला बाजूला घेऊन जा म्हणावं, आणि आम्हाला रीतसर मोकळं करा. आम्ही आपापल्या घरी जाऊ.

संजय: मी बघतो काय चाललंय ते. (भुवया कुस्करत मन एकाग्र करतो.) काहीतरी विचित्रपणा चालू आहे. मलाही नीट समजत नाहीय.

(सीनू गाड्याकडे जाऊन पाहणी करते आहे.)

सीनू: मेल्यांनी गाड्याचं चाक पार जमिनीत रुतवलं. आता हे काढणार कसं? (सैनिकांना) काय रे ए शिंदळीच्यांनो, मी तुमच्यासाठी इतकं अोझं वाहते त्याचे असे पांग फेडता का?

(सैनिक अोशाळे होऊन चाक बाहेर काढायचा प्रयत्न करतात, पण त्यांना फारसं यश येत नाही.)

एक सैनिक: जमीन अोलसर आहे. जितकं अोढावं तितकं चाक आतच चाललं आहे.

सीनू: माझ्यावरचा शाप भोवला ग!

कृतवर्मा: तुला कोण शाप देईल बाई? इतके लोक तुझ्यावर प्रेम करतात.

सीनू: मला भूमातेचा शाप आहे हो!

कृपाचार्य: भूमाताने तुला का म्हणून शाप द्यावा?

सीनू: खूप वर्षांपूर्वी रेशीमरस्त्यावर घडलेली गोष्ट आहे. मी गाडा अोढत चालले होते. रस्त्याच्या कडेला एक म्हातारा रडताना दिसला. जवळ जाऊन बघितलं तर तो झिंगलेला होता. मला म्हणाला की सोमरसाचा एक बुधला मी सकाळी विकत घेतला होता. अर्धा लगेच प्यायलो आणि अर्धा रात्रीसाठी ठेवला होता. पण चालताना अडखळलो आणि सगळा सांडून गेला. नवा घ्यायला माझ्याकडे पैसे नाहीत. मी त्याला म्हणाले की रडू नकोस. जिथे सांडला होता तिथली माती मी गोळा केली, हंडाभर पाण्यात घातली आणि एका तलम रेशमी शेल्यातून ते मिश्रण गाळून घेतलं. माती शेल्यात राहिली आणि सोमरस पाण्याबरोबर खाली आला. चव गेलेली होती पण म्हाताऱ्याला काही फरक पडत नव्हता. मला दुवा देऊन तो निघून गेला. पण भूमातेच्या वाट्याचा सोमरस मी चोरून घेतला म्हणून मला शाप लागला. तिनेच माझं चाक गिळलं आहे.

(सैनिक निकराचा प्रयत्न करताहेत. ‘अश्वत्थाम्याला बोलवा. त्याला नक्की जमेल. अश्वत्थाम्याला बोलवा’ असा अोरडा होतो. सीनूने गाड्यातलं एक मडकं बाहेर आणलं आहे. ती धुळीत गुडघे टेकून बसते आणि क्षमायाचना पुटपुटत मडकं हळूहळू जमिनीवर रिकामं करते.)

सीनू: माते, क्षमा कर! तू आधार दिला नाहीस तर माझा गाडा चालायचा नाही. तू बाई आहेस, मी बाई आहे. मला मदत कर.

मयाहुर (अर्धवट स्वगत आणि अर्धवट इतरांना उद्देशून): युधिष्ठिराचा रथ जमिनीपासून दोन बोटं वर हवेत चालतो. असं का असावं ह्याची वेगवेगळी स्पष्टीकरणं मी ऐकली आहेत. काहीजण म्हणतात की तो पुण्यवान असल्यामुळे त्याला मिळालेलं हे बक्षीस आहे. काहीजण म्हणतात की आपण जगापासून अलिप्त आहोत असं दाखवण्याचा त्याचा हा मार्ग आहे. सीनूला पुण्यवान कुणी म्हणणार नाही आणि जगाला इतकी लिप्त असलेली बाई दुसरी मिळणार नाही. पण अशी सोय करून घ्यायची गरज तिलाच जास्त आहे, कारण मग चिखल असला किंवा जमीन भुसभुशीत असली तरी तिचा गाडा रुतणार नाही. ह्या युद्धातून एकदाचा बाहेर पडलो की तसं काही करता येतं का ह्यावर मी विचार करणार आहे.

(‘अश्वत्थामा येतो आहे, वाट द्या!’ असा अोरडा होतो. ‘आला, आला’ असे आवाज येतात, आणि मग ‘बाजूला व्हा. जागा करा. आस्ते! शाबास’ असे आनंदोद्गार ऐकू येतात. स्वत:ची प्रचंड ताकद लावून अश्वत्थामा चाक बाहेर काढतो, आणि काही अंतर गाडा अोढत नेऊन एका कातळावर अलगद ठेवून देतो. सीनूचे डोळे पाण्याने भरले आहेत.)

सीनू (अश्वत्थाम्याला): अरे, वा! वा! माझं खूप मोठं काम केलंस तू!

अश्वत्थामा: मला सवय आहे. इथे येण्यापूर्वी हे माझ्यासाठी नेहमीचं होतं.

सीनू: बस. विश्रांती घे. (अश्वत्थामा खाली बसतो. सारेजण त्याच्याकडे टक लावून पाहताहेत.)

कृपाचार्य: कपाळावरची जखम बरी आहे का आता?

अश्वत्थामा: बरी आहे. पण अधूनमधून दुखते.

सीनू: पाणसापाच्या रक्तात शतावरीचा मध घालून केलेली एक दवा माझ्याकडे आहे. थोडीथोडी लावत राहिलास तर नक्की गुण येईल.

अश्वत्थामा: नको. इतकी जुनी जखम जायची नाही. मी आहे तोपर्यंत ती आहे.

दुसरा अंक इथे वाचा.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

जबरदस्त आहे! पुभाप्र!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नक्की कशाचे सेवन केले असता हे असले काही सुचते? एकदम पॉवरबाज स्टफ असले पाहिजे. (बेकायदेशीर असावे बहुधा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा पहिलाच भाग आहे आणि कथानक कोणीकडे चालले आहे ते अजून स्पष्ट दिसत नाही. मी तरी गोंधळलेल्या अवस्थेमध्ये आहे हे प्रांजळपणे मान्य करतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त प्रकरण आहे. काही भाषांतरे पासूनच मी तुमचा एकनिष्ठ पंखा झालोय शिवाय मागे एकदा सादच्या तुकड्यांचे मराठी भाषांतर तर फक्कडच जमलं होतं. आणि आता हे नाटक तर ह्या सगळ्यांवरच कडी करणारं झालंय.

पंचतंत्र, सिल्क रुट्स आणि हर्मेन्यूटीक्स पासून ते शेवटची डॉन क्विक्झोट मधली त्रिकोणी कथा आणि गणित, भाषा आणि परंपरा यांच्या परिघात वावरणाऱ्या कायदा नामक उपक्रमाच्या आत्मभानाचा अफाट बारकाईनं केलेला शब्दच्छल. असली भन्नाट भानगड नाटकाच्या पुढच्या अंकांत कुठल्या दिशेनं जाईल याची फार उत्सुकता आहे. नाटकाचा पुढचा अंक लवकर टाकावा.

निवडक चिपलकट्टी लवकर प्रकाशित करा अशी आग्रहाची विनंती.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

தநுஷ்

आखिर केहना क्या चाहते हो?

किती चिव्वटपणे लिहिले आहे!

हा पाइप नसून स्वर्गात जायचे धुरांडे आहे हे परवाच खफवर खरडले होते.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय असामान्य प्रतिभा आहे.
काय व्यासंग आहे.
किती पैलु किती विविध थीम्स यात एकवटलेल्या आहेत वाचुन मती गुंग होऊन जाते.
जयदीप चिपलकट्टींचे हे लेखन गेल्या १० वर्षांतील जर संपुर्ण मराठी आंतरजालावरील टॉप टेन लेखन निवडले
तर त्यातील एक आहे.
ग्रेट !
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कहर --/\--
.
बरोब्बर मुद्दे गुंतवायला, त्यांची सांगड घालायला आणि कथा रचायला किती वेळ लागला असेल?
मला हे सगळंच कॉकटेल/मिश्रण वाटतय. वैचारिक, मिश्किल/विनोदी, तत्वद्न्यान , कारुण्य , भावनांपासून अलिप्त तार्किक/गणितीय मांडणी, इतिहासातले - लोककथांतले -धार्मिक पुस्तकांतले संदर्भ नि पार त्याचे भलतेच (अप्रचलित) निष्कर्ष...अशा सगळ्या बाबींचं कॉकटेल वाटतय.
म्हंजे... इसापनिती, पंचतंत्र, यहुद्यांची Levirate marriage , होमरचा वाइनसारखा तांबडा समुद्र , पॅलेस्टाइनमधला ख्रिस्त नि बायबलमधल्या आपसातल्या विसंगती (तिघा चौघा लेखकांच्या कथनात येणारे काहीसे वेगळे तपशील), वात्सायन अन त्यानं केलेले स्त्रियांचे ते प्रकार ( शंखिनी नि पद्मिनी वगैरे)..... हे सगळे संदर्भ ठौक असले तर लिखाण अधिक प्रभावी वाटतच. किंवा अफुच्या नशेत विश्वरुपाचा भास! रोफल. पण ते ठौक नसले, तरी निव्वळ वाचत गेल्यानंसुद्धा निव्वळ एक आनंद मिळतो. जबरदस्तय हे. अर्थात असे अजुन कोणकोणते संदर्भ सुटून गेले असावेत, लक्षात आले नसावेत , असा मात्र प्रश्न पडत राहतो स्वत:शीच. अशा धाग्यासाठी वर्षभर थांबणं वाया जात नाही!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ एक शिर साष्टांग घालण्या व्यतिरिक्त वाचकाच्या हाती काहीही उरु नये असे लेखन!
पुढ्ल्या भागाच्या प्रतिxएत

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जबरदस्त आहे हे प्रकरण! आता दुसरा भाग वाचतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0