लाटांवर लाटा

संकल्पना

लाटांवर लाटा

- कुमार केतकर

युरोप-अमेरिकेतील वैचारिक आणि सांस्कृतिक वर्तुळात दर काही वर्षांनी सैद्धांतिक लाटा येत असतात. बऱ्याच विचारवंत मंडळींवर, विद्यापीठांमध्ये, लेखक-कवींमध्ये, नाटक-चित्रपट आणि चित्रकला-वास्तुकलाशास्त्र क्षेत्रात या लाटा खूप पडझड करतात. काही लाटा तर अगदी त्सुनामीसदृश असतात. मग त्या सैद्धांतिक लाटांचे विवेचन, विश्लेषण, विवरण करण्यासाठी जाडजूड ग्रंथ लिहिले जातात, बौद्धिक नियतकालिकांमध्ये वाद झडतात, त्यावर चर्चा-परिसंवाद होता, भरपूर खल होऊन काही लाटा विरून जातात तर काही विचार-सागरात स्थिरावतात.

विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात पोस्ट-मॉडर्निझम, पोस्ट-इम्प्रेशनिझम्, पोस्ट-थिएटरची (मग अॅब्सर्डिझम म्हणून ती नाट्यक्षेत्रात स्थिरावली) मोठी लाट आली होती. काहींच्या मते सार्त्र आणि काम्युचे (वेगवेगळे) एक्झिस्टेन्शिअॅलिझमचे तत्त्वज्ञान पोस्ट-मॉडर्निझमचाच भाग होते तर काहींच्या मते त्याला समांतर! आर्कीटेक्चर, पेन्टिंग्ज आणि साहित्य-तत्त्वज्ञानात तर पोस्ट-मॉडर्निझमच्या त्सुमानीने प्रचंड पडझड घडवून आणली होती. सध्या 'पोस्ट-ट्रूथ' नावाची लाट म्हणा, ट्विस्टर म्हणा वा टोर्नेडो — मीडिया, मुख्यतः सोशल मीडियात इतका धिंगाणा घालत आहे की आता 'ट्रूथ' उर्फ सत्य काही असते का असा 'पोस्ट-मॉडर्निस्ट' सवाल 'पोस्ट-ट्रूथ' नावाने पुन्हा उपस्थित केला आहे. आपले चित्त विचलित न होऊ देता या 'पोस्टिझम्'च्या लाटांकडे पाहायला हवे!

तसे पाहिले तर अशीच एक लाट 'एन्डिझम्'च्या रूपाने विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात आली होती. डॅनिएल बेल नावाच्या लेखकाने 'एन्ड ऑफ आयडियॉलॉजी' हा ग्रंथ लिहिला त्याच सुमाराला ऑर्थर कोसलरचे 'द गॉड दॅट फेल्ड' प्रसिद्ध झाले होते. जॉर्ज ऑरवेलचे '1984'ही त्याला समांतर. अर्थातच या तिघांचाही ब्लड ग्रूप वेगवेगळा होता; पण सोविएत सोशॅलिझम आणि स्टॅलिनची राजवट यांना संशयाच्या खोल दरीत ढकलून देण्याचे काम त्यांनी केले होते. पुढे 'एन्ड ऑफ फीजिक्स', 'एन्ड ऑफ सायन्स', 'एन्ड ऑफ फीलॉसॉफी' असा प्रवास करत 'एन्ड ऑफ हिस्टरी' या फ्रान्सिस फुकुयामाच्या सिद्धांतापर्यंत 'एन्डिझम'ची लाट आली.

आजच्या घडीला मात्र या 'एन्डिझम' आणि 'पोस्टिझम'ने 'पोस्ट-ट्रूथ' नावाची प्रलंयकारी त्सुनामी राजकारण-समाजकारणात आणि संस्कृतीकारणात आणली आहे. या त्सुनामीमुळेच भारतात नरेंद्र मोदी, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एका अर्थाने इस्लामिक स्टेटचा महाराक्षस जन्माला घातला आहे. आपल्या परिभाषेत आता असेही म्हणता येईल की हा प्रवास कलियुगाकडून कलकीकडे नेणारा आहे.

अतिशय उंच इमारतीच्या गच्चीवरून खालून उसळणाऱ्या त्सुनामीचे तांडवनृत्य हे जितके भयावह दिसते तितकेच ते हॉलिवूड चित्रपटात मनोरंजक भासते. 'पोस्ट-ट्रूथ'चे तसेच आहे. जे मीडिया आणि सोशल मीडियाच्या त्सुनामी तडाख्यात सापडले आहेत ते गुदमरून लाटांमध्ये इतस्ततः वाहात जात आहेत आणि जे लोक ते तांडव वरून पाहात आहेत त्यांना धास्ती वाटते आहे की त्यांचा टॉवर कोसळून ते त्या प्रलंयकारी लाटांमध्ये सापडणार आहेत. अर्थातच असाही एक वर्ग आहेच की ज्याला हे सर्व (विकृत) मनोरंजन वाटते आहे! 'पोस्ट-ट्रूथ' नावाचे बारसे साधारणपणे दोन वर्षांपूर्वी झाले असले तरी ते 'फीनॉमीनन' तसे नवे नाही. पण आज सोशल मीडियाने या कलकीसदृश किंवा 'डूम्सडे' जवळ आणणार्या लाटांना, धरणांची दारे पूर्ण उघडून वाट करून दिल्याने जगभर हाहाकार माजण्यासारखी परिस्थिती निर्माण केली आहे.

परंतु 'पोस्ट-ट्रूथ'चा अधिकृत जन्म होण्यापूर्वी म्हणजे सुमारे ८० वर्षांपूर्वी, तत्कालीन मीडियाने या 'फीनॉमीनन'चा 'प्रोमो' किंवा 'ट्रेलर' दाखवला होता. जगप्रसिद्ध अभिनेता-दिग्दर्शक ऑर्सन वेल्स याने रेडिओवरून 'वॉर ऑफ द वर्ल्डस्' या एच. जी. वेल्स यांच्या कादंबरीचे अभिवाचन केले, तेव्हा त्यातील परग्रहवासियांचे पृथ्वीवरील भयंकर आक्रमण हा भाग वाचायला सुरुवात केल्यावर न्यू यॉर्क शहरात प्रचंड धावपळ सुरू झाली. भयग्रस्त लोक जीव मुठीत धरून सैरावरा धावू लागले. ऑर्सन वेल्स यांच्या आवाजातील वास्तवदर्शी वर्णन त्या आक्रमणाची 'लाईव्ह कॉमेन्ट्रीच' लोकांना वाटली. प्रत्यक्षात अर्थातच तसे आक्रमण नव्हते. परंतु वेल्स यांच्या कादंबरीतील त्या वर्णनाचा थरार आणि ऑर्सन वेल्सच्या आवाजातील रोमांचकारी कंपयुक्त आवाज यामुळे सर्वत्र घबराट उडाली होती. ही घटना १९३८ची. दुसऱ्या महायुद्धाला प्रत्यक्ष तोंड फुटण्याच्या अगोदर एक वर्ष. तेव्हा तर टीव्हीसुद्धा नव्हता. टेलिफोनही अगदी अमेरिकेतसुद्धा अतिशय कमी घरांमध्ये होते. कार फोन, मोबाईल फोन, स्मार्ट फोन, इंटरनेट, कॉम्प्युटर्स हे काहीही नव्हते. त्यामुळे सोशल मीडियाचा महाराक्षस जन्मालाच आला नव्हता. परंतु समजा तीच वेल्सची कादंबरी, तोच ऑर्सन वेल्सचा थरारयुक्त आवाज आजच्या माध्यमातून प्रसारित झाला असता तर त्याच्या कित्येक हजारपट घबराट उडाली असती.

मुंबईतील एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील घबराट, चेंगराचेंगरी आणि हाहाकारी मृत्यू-तांडव हेसुद्धा एका अर्थाने 'पोस्ट-ट्रूथ'चेच उदाहरण म्हणता येईल. गर्दी होतीच. ती नेहमीचीच. धोधो पावसामुळे थोडी जास्त. पण अफवा पसरली की कदाचित पूल कोसळतोय किंवा तसलीच काहीतरी — आणि लोक जीव मुठीत धरून पळू लागले; पण पळणार कुठे?

अर्थातच हे केवळ घबराटीचे आणि बेभान चेंगराचेंगरीने, सापळ्यात सापडलेल्या लोकांचे मृत्यू नव्हते. मुंबईतील जवळजवळ सर्व स्टेशन्सवर आणि पुलांवर आणि रस्त्यांवर असे मृत्यूचे सापळे आहेत. ते मात्र 'पोस्ट-ट्रूथ' नाही ते 'अगदी अस्सल ट्रूथ' आहे! पण असा मानसिक परिसर बेदरकार प्रशासनाने, संवेदनाशून्य राजकीय वर्गाने आणि जीवनच हरवलेल्या मुंबईकरांनी तयार केलेला आहे. ऑर्सन वेल्सच्या अभिवाचनाने जे घाबरले त्यालाही लोकांच्या मनातील अनामिक भीती, अस्वस्थता, अनिश्चितता हे घटक कारणीभूत होते.

जागतिक मंदीतून अमेरिका घायाळ अवस्थेत बाहेर येत होती, जर्मनीत हिटलरचा उदय झाला होता, वर्तमानपत्रात संभाव्य महायुद्धाची चर्चा-भाकीते प्रसिद्ध केली जात होती. लोकमानस अस्थिर आणि असुरक्षित होते. त्यामुळेच रेडिओ या त्यावेळच्या एकमेव मीडियाने 'पोस्ट=ट्रूथ'ची पहिली झलक दाखवली. गेल्या तीन-चार वर्षांत अरब देशांमध्ये असे अनेक प्रसंग आहेत. 'मीडिया रिव्होल्यूशन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माध्यम-माहिती क्रांतीने आता तमाम मानवी समाज-संस्कृतींना वेढलेले आहे. घरात जेवायची भ्रांत असेल, किंबहुना घरच नसेल, व्यक्तिगत-कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हातावर पोट अशी असेल, पण त्या हातात मोबाईल फोन असेलच! हे वास्तव दूरस्थ आदिवासी वस्तींपासून ते गुदमरवून टाकणाऱ्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीतही आहे. अवघ्या काही क्षणात 'जे कधी घडलेचि नाही' ते लक्षावधी, नव्हे, कोट्यवधी लोकांपर्यंत पोचण्याची किमया या माध्यम-माहिती क्रांतीने आणली आहे. जेव्हा हा मोबाईलचा झंझावात निर्माण होत होता, तेव्हा (म्हणजे आता 'प्राचीन' म्हणता येईल अशा १९९५ साली) देशातलेच नव्हे तर जगभरचे गणपती दूध गटागटा पिऊ लागल्याचे आपण बहुतेकांनी पाहिले आहे. तोही 'पोस्ट-ट्रूथ'चा प्रोमो होता.

'पोस्ट ट्रूथ'चे कांड जितके टेक्नॉलॉजीने आणले आहे तितकेच राजकारण आणि मानसशास्त्रानेही आणले आहे. आता तर राजकारण, सामाजिक मानसशास्त्र आणि हे नवे तंत्रज्ञान असा हिंस्र त्रिकोण तयार झाला आहे. आता हा त्रिकोण कुठच्या देशापुरता, विशिष्ट धर्मातील समाजापुरता, काही ठरावीक जातसमूहांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

मीडिया रिव्होल्यूशन जेव्हा नुकतीच कुठे 'टेक ऑफ' घेत होती, तेव्हा म्हणजे साठीच्या दशकात (जेव्हा अमेरिकेतही कलर टीव्ही नव्हता) मार्शल मॅक्लुहान या द्रष्ट्या माध्यममहर्षीने दोन सिद्धांतसूत्रे मांडली होती. 'मिडियम इज द मेसेज' आणि 'द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज'. मॅक्लुहानची सैद्धांतिक मांडणी अर्थातच या दोन प्रचलित सूत्रांपेक्षा खूप प्रदीर्घ, गुंतागुंतीची आणि प्रगल्भ आहे. (अलिकडेच लंडनच्या टेलिग्राफ दैनिकाने 'द मॅन हू प्रेडिक्टेड इंटरनेट अॅन्ड मोबाईल' या शब्दात मॅक्लुहानचा गौरवलेख प्रसिद्ध केला आहे. (दुवा) निमित्त होते ५० वर्षांपूर्वी १९६६-६७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्याच्या सिद्धांतांचे).

'पोस्ट-ट्रूथ'चा विदारक आणि विध्वंसक परिणाम होण्यासाठी सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक वातावरण पोषक असावे लागते. हिटलरच्या काळातील 'पोस्ट-ट्रूथ' हे गोबेल्सच्या एकूणच प्रचार मोहीमेचा भाग होते. रेडिओ हे एकमेव माध्यम. सोशल मीडिया वगैरे संकल्पनेतसुद्धा नव्हते. परंतु एकूणच समाजात द्वेष, उग्र अस्मिता, न्यूनगंड, पहिल्या महायुद्धातल्या पराभवामुळे निर्माण झालेली सूडाची भावना अशी सार्वत्रिक मनःस्थिती होती. जागतिक मंदीनंतर (१९२९) झालेली महाभयंकर महागाई, बेकारी, वृथा जर्मन अभिमानातून येणारा हिंस्र उद्रेक, नैतिकता आणि सदसद्‌विवेक बुद्धी हरवलेला समाज, युरोपात जर्मनी एकटा बाजूला पडल्याची भावना हे सर्व घटक नसते तर गोबेल्सने कितीही प्रचार केला असता तरी तो त्या प्रमाणात रुजला नसता. आपल्या देशात व अमेरिकेतही तो रुजत आहे. कारण वरील सर्व घटक वास्तवात आहेत. त्याला राष्ट्रभक्ती आणि भडक अभिमानाची जोड दिली की जे रसायन तयार होते तेच आज 'पोस्ट-ट्रूथ' या नावाने जगभर स्मार्ट फोन-इंटरनेट-सोशल मीडिया या माध्यमांतून पसरत आहे — पसरवले जात आहे. 'पोस्ट-ट्रूथ' पॉलिटिक्सला आज जगभर जे अनुयायी लाभत आहेत त्याचा 'सोशिओ-सायकॉलॉजिकल-मीडिया लेड फॅसिझम'च्या दृष्टिकोनातून विचार करावा लागणार आहे.

याच सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रवृत्तीच्या विरोधात बोलणे-लिहिणे-प्रचार करणे शक्य आहे हे खरे पण धादांत खोटे, बेभान मूड, अचाट अफवा याचा सामना सुज्ञता, विवेक, समंजसपणा अशा मार्गाने होत नाही. फार तर विध्वंस थोडा फार आटोक्यात येऊ शकेल इतकेच.

मार्टिन रीज या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने (अॅस्ट्रोफीजिक्स) 'अवर फायनल सेंच्यूरी' हे पुस्तक लिहिले तेव्हा त्याने अशी भीती व्यक्त केली होती : पर्यावरणातील धोकादायक बदल, विज्ञानाने नैतिकता सोडून केलेले संशोधन, कॉर्पोरेट कंपन्यांनी त्या विज्ञान-तंत्रज्ञानाला बाजारपेठ मिळवून दिल्यामुळे लोकांपर्यंत पोचलेले विघातक तंत्रज्ञान, अण्वस्त्रांचा प्रसार आणि दहशतवाद यांमुळे मानवी संस्कृतीचे हे अखेरचे शतक असेल. सुमारे ४० वर्षांपूर्वी एका विचारवंत गटाने (क्लब ऑफ रोम) अशी भीती व्यक्त केली होती की वाढती लोकसंख्या, संपत आलेले ऊर्जास्त्रोत, धान्योत्पादनाच्या मर्यादा, पिण्याचे पाणी उपलब्ध करताना होणारे अडथळे आणि पर्यावरण नाशाने हे 'सिव्हिलायझेशन' धोक्यात आले आहे. या दोन्ही शक्यतांना 'डूम्स डे' भाकित म्हणून त्यांची टिंगल उडवली गेली होती. त्यांनी तर 'पोस्ट-ट्रूथ'चा विचारही केला नव्हता. आता 'पोस्ट-ट्रूथ' विनाशकाले विपरीत बुद्धीचे भविष्य सत्यात आणण्याची शक्यता आहे.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

प्रतिक्रिया

काहीच्याकाही संबंध जोडलेले वाटताहेत. मोदी,ट्रंपचा महाराक्षस काय,पुल पडण्याच्या अफवेचे काय अन वाढती लोकसंख्या अथवा कमी पडणारे अन्नधान्य काय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अर्थहीन वाटला, कुठला तरी अजेंडा घ्यायचा आणि भिती पसरवायची ह्या क्याटागिरीतला दिसतोय.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आजच्या घडीला मात्र या 'एन्डिझम' आणि 'पोस्टिझम'ने 'पोस्ट-ट्रूथ' नावाची प्रलंयकारी त्सुनामी राजकारण-समाजकारणात आणि संस्कृतीकारणात आणली आहे. या त्सुनामीमुळेच भारतात नरेंद्र मोदी, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एका अर्थाने इस्लामिक स्टेटचा महाराक्षस जन्माला घातला आहे. आपल्या परिभाषेत आता असेही म्हणता येईल की हा प्रवास कलियुगाकडून कलकीकडे नेणारा आहे.

संपूर्ण लेखात ही वाक्येच फक्त महत्त्वाची आहेत. मोदीला शिव्याच घालायच्या होत्या तर असं आडून आडून तरी का लिहायचं? एकूणच केतकरी परंपरेप्रमाणे सुमार लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+११
लेख तद्दन पाडूच वाटला.

आजच्या घडीला मात्र या 'एन्डिझम' आणि 'पोस्टिझम'ने 'पोस्ट-ट्रूथ' नावाची प्रलंयकारी त्सुनामी राजकारण-समाजकारणात आणि संस्कृतीकारणात आणली आहे. या त्सुनामीमुळेच भारतात नरेंद्र मोदी, अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प आणि एका अर्थाने इस्लामिक स्टेटचा महाराक्षस जन्माला घातला आहे.

हे देखिल काहीच्च्या काहीच आहे. ट्रम्प हे पोस्ट ट्रूथसाठी योग्य उदा. आहे पण इस्लामिक स्टेटचा महाराक्षस कुठल्या अर्थाने पोस्ट ट्रूथ ची परिणिती आहे म्हणे? इस्लामिक स्टेट कडव्या इस्लामचेच अपत्य आहे, कडवा इस्लाम काय पोस्ट ट्रूथ काळात निर्माण झाला काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कुठल्यातरी धारेची मारली असेल ओ, यद्वातद्वा भविष्यति म्हणतात त्यातलाच प्रकार न काय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इस्लामिक स्टेटचा महाराक्षस कुठल्या अर्थाने पोस्ट ट्रूथ ची परिणिती आहे म्हणे? इस्लामिक स्टेट कडव्या इस्लामचेच अपत्य आहे, कडवा इस्लाम काय पोस्ट ट्रूथ काळात निर्माण झाला काय?

मी त्याचा अर्थ असा घेतो : इस्लामिक स्टेटची विचारसरणी काही सगळ्या मुसलमानांची संस्कृती नाही. (उदा. इथेच इतक्यात कुठे तरी चर्चा झाली होती की दारू पिणं अनेक देशांत मुळात निषिद्ध नाही वगैरे.) पण 'त्यां'नी असा समज करून दिला आहे की इतका कडवा धर्म तुम्ही पाळाल, तरच तुम्ही खरे मुसलमान. ह्याला इतिहासात आधार नाही. म्हणजेच ते खरं नाही. तरीही तसा समज करून दिला जाणं आणि लोकांनी ते मानणं हे पोस्ट-ट्रुथ म्हणता यावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण 'त्यां'नी असा समज करून दिला आहे की इतका कडवा धर्म तुम्ही पाळाल, तरच तुम्ही खरे मुसलमान.

पण या "त्यां"मध्ये अगदी अब्दूल वहाब, देवबंद स्कूल, तालीबान, खामेनी, जमाती इस्लाम, बोको हराम, सलाफी हे सगळेच येतात ना. या साऱ्यांनी दशकांपासून जमीन तयार केलीये, आयसीस त्या वृक्षाला लागलेले दांडगे फळ म्हणता येईल. पोस्ट ट्रूथ तर ५- ६ वर्षांपासून आलं ना? शिवाय इतका कडवा धर्म तुम्ही पाळाल तरच तुम्ही मुसलमान असे म्हणणारे सगळीकडेच आहेत की, इस्लामिक स्टेटवरच का बरं आळ? आता इथेच देवबंदवाले आयसीसला लाजवील असले फतवे काढतातच की(अगदी 1866 पासून). त्यांच्यावर विश्वास असणारे मुस्लिम होतेच की अस्तित्वात. सत्याचा अपलाप बहुसंख्यांनी डोळे झाकून स्विकारणे म्हणजेच ना पोस्ट ट्रूथ? की आणखी काही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पोस्ट ट्रूथ तर ५- ६ वर्षांपासून आलं ना? शिवाय इतका कडवा धर्म तुम्ही पाळाल तरच तुम्ही मुसलमान असे म्हणणारे सगळीकडेच आहेत की, इस्लामिक स्टेटवरच का बरं आळ?

इस्लामिक स्टेटवर आळ नाही. उलट, ते ५-६ वर्षांहून मागे जाताहेत आणि म्हणताहेत की आधी झालेल्या सत्याच्या अपलापातून 'इस्लामिक स्टेट'चा महाराक्षस जन्माला आला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तरीही तसा समज करून दिला जाणं आणि लोकांनी ते मानणं हे पोस्ट-ट्रुथ म्हणता यावं.

म्हंजे गेल्या अनेक शतकांचे वर्णन पोस्ट ट्रुथ असे च करता यावे. राम जन्मला व तो अस्तित्वात होता असा समज करुन दिला गेलेला आहे. व लोकांनी तो सत्य मानलेला आहे. (स्वत: अलाहाबाद न्यायालयाने सुद्धा तसेच नमूद केलेले आहे. ). व गेली अनेक शतके लोक रामाचे अस्तित्व होते हे सत्यच मानत आलेले आहेत. त्यामुळे हे पोस्ट ट्रुथ हे गेली अनेक शतके नॉर्मल च आहे. नवीन काहीही नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर1
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राम जन्मला व तो अस्तित्वात होता असा समज करुन दिला गेलेला आहे. व लोकांनी तो सत्य मानलेला आहे. (स्वत: अलाहाबाद न्यायालयाने सुद्धा तसेच नमूद केलेले आहे. ). व गेली अनेक शतके लोक रामाचे अस्तित्व होते हे सत्यच मानत आलेले आहेत.

ह्याविषयीचं विवेचन उदयन वाजपेयी यांच्या भाषणात/लेखात आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

महाराक्षस हा शब्द लहानपणीच गोंष्टींमधे ऐकला होता. त्यानंतर तो गो.रा. खैरनारांच्या प्रसिद्ध वाक्यांत ऐकला होता. ते वाक्य युती सरकारच्या काळातले महाराष्ट्रापुरते होते. खैरनार म्हणाले होते,' भ्रष्ट मंत्र्यांची तक्रार शिवसेनाप्रमुखांकडे करायची म्हणजे , राक्षसाची तक्रार महाराक्षसाकडे करण्यासारखे आहे.' याच चालीवर मला वाटते की, समाजातला द्वेष, अफवा, आरोप, गैरप्रचार हे लोकांपर्यंत जास्त कोण पोचवते, तर त्या महाराक्षसाचे नांव आहे, मीडिया. आता त्याची तक्रार कोणाकडे करायची ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगल्या नॉलेज बाईट्स असलेला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.