जाणते भ्रम : अस्मिता आणि विवेक

संकल्पना

जाणते भ्रम : अस्मिता आणि विवेक

- राहुल पुंगलिया

आजच्या घडीला अनुभवाच्या पोताबद्दल बोलायचे झाल्यास चटकन, अगदी सामान्य माणसाच्या ओठांवरही आभासी असे विशेषण येते. ही आभासमयता कोठून आली? कधी आली?, ह्या प्रश्नांची उत्तरेही सहसा तयार असतात. ही आभासमयता युरोकेंद्री म्हणजे पाश्चिमात्य आहे, ती जागतिकीकरणात म्हणजे १९९०नंतर वाढीस आली, असे सामान्य मत असते. आभासी जग म्हणजे अवास्तव, तथ्यहीन जग. सत्य-असत्याची जागा प्रतिमांच्या, दृश्यांच्या अनुभवांनी घेतली असेही सर्वमान्य आहे. ह्या अनुभवांत जगाची अपरिहार्यताही कबूल असल्याने अनुभवांच्या फेरफारांचे, चढाओढींचे खेळ समाजात हिरिरीने खेळणे, हे प्राक्तनही स्वीकारले जाते. समाज, राजकारण, आर्थिक घडामोडी, करमणूक आणि ज्ञानही अंतिमतः वास्तवप्राय (virtual) आहे, हे मान्य करून पुढे जाणे हा आजचा शहाणपणा आहे.

आता इतके सारे उघड असल्याने, सामान्यज्ञानाचा भाग असल्याने सत्योत्तर जगात सत्याचे काय होते, हेदेखील सर्वांनाच ठाऊक आहे. मोदींच्या भारतातील प्रसारमाध्यमे दामटून खोटे बोलतात. प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमे हाताशी ठेवून राज्य करता येते. हेही कोणी अमान्य करत नाही. भक्तगणांचा (troll) वावर हा अफवा, आवया पसरवून बदनामी, कुचाळक्या करून दडपण आणण्यासाठी आहे, हे देखील विदित आहे.

थोडक्यात, ह्या काळाचे वैशिष्ट्य हे आहे की सगळेजण जाणतेपणी भ्रमिकतेचा भाग होतात. पूर्वी जेव्हा (idealogy) रूढ विचारधारेची संकल्पना सामाजिक विश्लेषणात वापरली जायची, त्यावेळी त्याजोडीने छद्मभानाची - false consciousness - संकल्पनाही वापरली जायची. रूढ विचारव्यूह स्वीकारल्याने व्यक्ती व समाजाची जाणीव मिथ्या बनायची. हा रूढ विचारव्यूह भांडवली समाजातील अंतर्विरोध लपवण्यासाठी; भांडवली शोषण, सामाजिक उतरंड, अन्याय व परात्मभाव नैसर्गिक वाटण्यासाठी प्रस्थापितांकडून वापरला जायचा. सामाजिक व्यवस्थापनाचे ते महत्त्वाचे अंग होते. परंतु, ह्या छद्मभानातून बाहेर पडण्याची शक्यताही भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या काळात होती. ही शक्यता आता विरली आहे कारण सगळ्यांना सारेच माहीत असूनही खेळ चालू आहे.

जुन्या रूढ विचारव्यूहांची संकल्पना आजच्या काळाला लागू केल्यास उजवे, हिंदुत्ववादी पक्ष, नवउदारमतवादी भांडवल, जागतिक भांडवल हे अतिशय कुशल गारुडी आहेत, असे म्हणावे लागेल. त्यांच्या खोटेपणाचे गारुड हे भोळ्या, असहाय्य जनतेवर चांगलेच राज्य करते आहे. सर्वसामान्यांचा हिंदुत्ववादापासून, नोटाबंदी ते विकासाच्या योजनांवर पुरता विश्वास आहे असे म्हणावे लागेल.

ह्याचे स्पष्टीकरण म्हणून रूढ विचारव्यूहाची समीक्षा (idealogy critique) वेगवेगळ्या पद्धतींनी करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आजच्या विचारव्यूहाची अधिमान्यता ही आधुनिकता म्हणजे सरधोपटपणे स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, व्यक्तिवाद, विवेक, नागर समाज (civil society) ह्या तत्त्वांना असलेल्या प्रतिक्रियेमधून आलेली आहे. प्रतिक्रियावादी विचारव्यूहाचे स्पष्टीकरण/समर्थन देताना जातींची व्यामिश्र उतरंड व त्यातले ताणतणाव, सरंजामदारीचे - म्हणजेच ज्यात लिंग, वर्णव्यवस्थेचे - अवशिष्ट अस्तित्व वा पुनरुज्जीवन, जागतिकीकरणामुळे राज्यसंस्थेचे दुबळे होणे व दमनकारी होणे, व अर्थव्यवस्थेचे स्वरुप मुख्यत: वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवस्थेपासून बदलून अधिक आभासी (वित्तीय, सेवाक्षेत्र) होणे अशा घटितांचा उल्लेख आपोआपच येतो.

आधुनिकतेेचे अपयश, आधुनिकतेला भारतीय वास्तव समजण्यात आलेले अपयश अशा आत्मताडनाच्या, अपराधीपणाच्या मानसिकतेतून आलेले सबाल्टर्न स्टडीज, देशीवाद आणि उत्तरवसाहतवादी प्रवाह हे जात, धर्मसमूह, वांशिकता व साधारणपणे विविध अस्मितांमध्ये वास्तव शोधू पाहतात. वास्तवाचा आधार सुटण्याचे भय इतके मोठे आहे की ज्या गोष्टींकडे पूर्वी लक्षण म्हणून बघण्याचा प्रघात होता - जात, धर्म, वांशिक अस्मिता, एकूण अस्मिता, प्रादेशिकता, संस्कृती - त्या गोष्टी आता वास्तव म्हणून स्वीकारल्या जाऊ लागल्या. आताच्या उजव्या भांडवली हिंदुत्वाचे स्पष्टीकरण देताना मग ह्या सगळ्या जात वगैरे आजवरच्या सुटलेल्या गोष्टींमधील अस्वस्थतेतून वर्चस्ववादी हिंदुत्वाचा उगम झाला अशी मांडणी करण्यात येते. म्हणजे मुक्त भांडवलशाही व विविध पातळ्यांवरील अस्मितांचे उद्रेक हे मुळातच खंडित असलेल्या वास्तवाचा आविष्कार आहे. एकल भांडवली उत्पादनव्यवस्था, लोकशाही राज्यव्यवस्था व प्रागतिक आधुनिकता हेच मुळात idealogical रूढ काल्पनिक विचारव्यूह होते व आत्ताचे अस्मितांचे राजकारण हे कमीअधिक प्रमाणात वास्तवाच्या जवळ जाते. ज्या अस्मिता अधिकाधिक सूक्ष्म, स्थानिक त्या अधिक खऱ्या व ज्या सरधोपट, व्यापक, वैश्विक वा राष्ट्रीय त्या तुलनेने खोट्या असे समीकरण मान्यता पावत आहे.

ह्या विचारपद्धतींच्या पलीकडे जाऊन आताच्या वास्तवाच्या प्रश्नाचा घोळ उकलण्याचा प्रयत्न ल्योतार (Lyotard), बॉद्रियार (Baudrillard), झिझेक (Zizek) इत्यादी विचारवंतांनी केला आहे. त्याप्रमाणे विचार केल्यास काहीसा वेगळा अर्थ आजच्या वास्तवाचा निघू शकतो. ह्या विचारवंतांनी मार्क्स, फ्रॉईड, नित्शे आणि लाकॉच्या विचारपद्धती विकसित करत, आजच्या उत्तरआधुनिक काळाचा उहापोह केला आहे.

आजची आभासी जाणीव, अनुभव व आजचे आभासी वास्तव हे तसे ऐतिहासिक व मनोविश्लेषणात्मक विश्लेषणात अपवादात्मक नाहीत. ऐतिहासिक व मानववंशीय अभ्यासामध्ये असे नेहमीच आढळून येते की माणसाचे निसर्गाचे व भोवतालाचे आकलन कायम कथनाच्या स्वरूपात असते. निसर्ग व भोवताल हे मानवाने बनवलेले मिथक आहे; ती त्याने स्वतःला सांगितलेली कथा आहे. आपल्या संकल्पनांनी, प्रतिभेने आपण निसर्गाची व्यवस्था लावतो. आणि असे नीटनेटके केलेले आपल्या विचारांवर बेतलेले वास्तव आपण सत्य म्हणून स्वीकारतो. म्हणजे सुरुवातीपासूनच निखळ सत्य, निव्वळ वास्तव नावाची काही स्वतंत्र शक्ती असलेली गोष्ट नसते.

ह्या जोडीने, मनोविश्लेषणातदेखील (psycho analysis) कल्पित ज्ञानवस्तू (fantasy object) ही तिच्या उगमाशी असलेल्या वास्तविक वस्तूपेक्षा अधिक सत्य असते हे स्पष्ट झाले आहे. कल्पित ज्ञानवस्तू ही ‘स्व’ची धारणा असते. कुठलेही मन ह्या कल्पनेलाच सत्य मानत असते. सांकेतिकतेमध्ये जग लपेटलेले असते. सांकेतिक आकलनाला अधिकारी रूप असते. ह्या अधिकाराला आव्हान देणारे वास्तवाचे भूतही काही काल्पनिक नसते. उदाहरणार्थ, लोकशाही उदारमतवादी वा साम्यवादी मानवतावादाला आव्हान देणाऱ्या स्थानिक, जातीय, एतद्देशीय, धार्मिक वगैरे अस्मितादेखील घडवलेल्या, कल्पलेल्या, कथन केलेल्या असतात. हिंदुत्ववाद्यांचा राष्ट्रीय एकात्मतेचा इतिहास, वर्गलढ्याचा इतिहास जितके रचलेले आहेत तितकेच जातीय, लैंगिक शोषणाचे इतिहासही रचलेलेच आहेत. कुठलेही सूत्र हे आतून (immanent) येत नसते, ते कायमच बाहेरून (transcendent) असते.

आजच्या काळातले वास्तव व समाजाचे अचूक सत्य आकलन हे अशा पद्धतींनी मुळातच संशयास्पद झालेले आहेत. ह्याला काही विद्याशाखीय अभ्यासपद्धतींचीही कारणे आहेत. विज्ञान, विज्ञानाधिष्ठित विवेक स्वतःला कायम नैसर्गिक, स्वाभाविक सत्य समजत असतात. ह्या उलट समाजशास्त्रातील critical theory व त्या प्रभावळीतील इतर विचारपद्धतींमध्ये आत्मावलोकन व आत्मटीका हे रूढ आहे. आपल्याच गृहीतकांचा, विचारपद्धतीचा अर्थ लावण्याची जबाबदारी हा विचारप्रवाह स्वीकारतो. वैज्ञानिक विवेकामध्ये असा मूलगामी संदेह नसतो. त्यामुळे आपल्याकडच्या वैज्ञानिक विवेकवादामध्ये (डॉ. दाभोळकरांची मोहीम) व हिंदुत्ववादामध्ये कमालीचे साधर्म्य आढळते. आपल्या विचारपद्धतीची सत्यावर मक्तेदारी आहे, असा ठाम दावा एवढेच साम्य ह्या दोन विचारसरणींमध्ये नाही. दोन्ही सामाजिक चळवळी गुंतागुंतीच्या मानवी रचनेत (धर्म, श्रद्धा) अकस्मात आक्रमक हस्तक्षेप करून काही ठरावीक सोपे निकष सक्तीने लागू करण्याचा प्रयत्न करतात. बऱ्याचदा वरवर वाटणारी अंधश्रद्धा ही वैज्ञानिक नियमांना दिलेले आव्हान नसते. त्यामध्ये सत्याचा, तथ्याचा दावा नसतो. तो निसर्गावर हुकुमत गाजवण्याचा वैज्ञानिक गर्व असतो. ती एक व्यामिश्र, सामाजिक घटना असते. त्यामध्ये तात्कालिक गरजा (आजारांपासून सुटका, वैद्यकीय सेवेचा अभाव इ.) पासून देह व जगाकडे बघण्याची वेगळी पद्धत वेगळे भाग, जे सांगीतिक, काव्यात्मक, मिथकात्मक असू शकते; अनेक अपघात, सामाजिक विद्रोह, वेगळेपण जपण्याची भावना अशा अनेक घटकांचा समावेश असू शकतो. ह्या गुंतागुंतीच्या व वैज्ञानिकतेला मूलगामी आव्हान देणाऱ्या गोष्टींचा सामना वैज्ञानिक प्रयोगांनी व सामाजिक अवहेलना करून करणे आणि गोहत्येसारख्या गुंतागुंतीच्या सामाजिक बाबीवर अचानक बंदी आणणे ह्या काही फार वेगळ्या गोष्टी नाहीत. गायीबद्दल कृतज्ञता वाटणे, भूतमात्रांवर प्रेम करणे आणि असहाय्य, गरीब जनतेला भोंदूबाबांच्या फसवणुकीपासून वाचवणे हे उदात्त हेतू आहेत. पण त्यांच्या आडून मुसलमानांचा व अवैज्ञानिक विकल्पांचा काटा काढणे हे समर्थनीय होऊ शकत नाही. जसा भारत देश फक्त हिंदूंचा नाही तसे फक्त विज्ञानाला सत्य कळते असे होत नाही. ह्या दोन्ही आग्रही चळवळींमधली सहानुभूती दाभोळकरांचा सावरकरांबद्दलचा लेख वाचताना कळते.

आजच्या आभासी जगात, भासमयतेमध्ये आणि पूर्वीच्या भ्रामक रूढ विचारव्यूहांमध्ये एक मूलभूत फरक आहे. संप्रेषण आणि माहिती-तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे हा फरक पडलेला आहे. पूर्वीच्या विचारव्यूहांच्या रूपामागे भांडवली वर्गाची अधिसत्ता होती. आताची भासमयता ही खरोखरच सर्व जनतेने सहभाग घेऊन तयार केलेली आहे; मग ती विज्ञानाच्या यशाची असो वा हिंदुत्वाच्या यशाची वा विकासाची वा हिंसेची.

आपण एका उच्चतर लोकशाही जगाची नांदी बघत आहोत. जिथे सर्वजण स्वेच्छेने स्वतःसाठी मिथ्या जग तयार करत आहोत.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आधुनिकतेेचे अपयश, आधुनिकतेला भारतीय वास्तव समजण्यात आलेले अपयश अशा आत्मताडनाच्या, अपराधीपणाच्या मानसिकतेतून आलेले सबाल्टर्न स्टडीज, देशीवाद आणि उत्तरवसाहतवादी प्रवाह हे जात, धर्मसमूह, वांशिकता व साधारणपणे विविध अस्मितांमध्ये वास्तव शोधू पाहतात. वास्तवाचा आधार सुटण्याचे भय इतके मोठे आहे की ज्या गोष्टींकडे पूर्वी लक्षण म्हणून बघण्याचा प्रघात होता - जात, धर्म, वांशिक अस्मिता, एकूण अस्मिता, प्रादेशिकता, संस्कृती - त्या गोष्टी आता वास्तव म्हणून स्वीकारल्या जाऊ लागल्या. आताच्या उजव्या भांडवली हिंदुत्वाचे स्पष्टीकरण देताना मग ह्या सगळ्या जात वगैरे आजवरच्या सुटलेल्या गोष्टींमधील अस्वस्थतेतून वर्चस्ववादी हिंदुत्वाचा उगम झाला अशी मांडणी करण्यात येते. म्हणजे मुक्त भांडवलशाही व विविध पातळ्यांवरील अस्मितांचे उद्रेक हे मुळातच खंडित असलेल्या वास्तवाचा आविष्कार आहे. एकल भांडवली उत्पादनव्यवस्था, लोकशाही राज्यव्यवस्था व प्रागतिक आधुनिकता हेच मुळात idealogical रूढ काल्पनिक विचारव्यूह होते व आत्ताचे अस्मितांचे राजकारण हे कमीअधिक प्रमाणात वास्तवाच्या जवळ जाते. ज्या अस्मिता अधिकाधिक सूक्ष्म, स्थानिक त्या अधिक खऱ्या व ज्या सरधोपट, व्यापक, वैश्विक वा राष्ट्रीय त्या तुलनेने खोट्या असे समीकरण मान्यता पावत आहे.

हे निरीक्षण रोचक आहे. पुढे लेखक म्हणतात्
ह्या विचारपद्धतींच्या पलीकडे जाऊन आताच्या वास्तवाच्या प्रश्नाचा घोळ उकलण्याचा प्रयत्न ल्योतार (Lyotard), बॉद्रियार (Baudrillard), झिझेक (Zizek) इत्यादी विचारवंतांनी केला आहे.

याची अगदी किमान प्राथमिक तरी झलक लेखकाने दिली असती तर बरे झाले असते. किमान कुठल्या पुस्तकांमध्ये ही मांडणी आहे त्यांची नावे तरी दिली असती तर शोधायला बरे पडले असते.
लेख रोचक आहे मात्र्

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0