मुक्तचिंतन

संकल्पना

मुक्तचिंतन
-आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक

- राहुल बनसोडे

सत्योत्तर परिस्थितीच्या आधी म्हणजे सत्याच्या काळात किंवा मग आधुनिक सत्ययुगात 'नमनाला घडाभर तेल' अशी एक म्हण होती. ही म्हण प्रारंभिकदृष्ट्या पुनरुज्जीवनवादी वाटू शकते. नमन कुठल्याही धार्मिक कार्याच्या सुरुवातीला, इशस्तवनाच्यावेळी आणि मंगलसमयी सर्वात सुरुवातीचा एखादा श्लोक, ओवी, ओव्या किंवा वचनांनी होत असे. नमन एखाद्या गोष्टीचा प्रारंभ दर्शविते म्हणून आपण सोयीसाठी 'प्रारंभालाच घडाभर तेल' असे म्हणूयात. आता घडाभर तेलाचा संबध. आपल्याकडे सकल समाजात विजेचे दिवे येऊन आता अर्धशतकाहून अधिक काळ लोटला आहे, काही ठिकाणी अद्याप विजेचे दिवे येतच आहेत, पण ते यथावकाश येतीलच. घडाभर तेलाचा संबध निश्चितपणे दिवे पेटवण्यासंदर्भात आहे आणि ही म्हणही निश्चितच विजेच्या शोधापूर्वीची आहे. नमनालाच घडाभर तेल वापरायचे झाल्यास त्यातून एकूण किती दिवे पेटवावे लागतील असा प्रश्न इथे उपस्थित होतो.

साधारण एका घड्यात तीन गॅलन तेल मावते आणि एका दिव्यात साधारण अर्धा फ्लुईड औंस तेल मावते. दिवा साधारण दोन तास जळतो. नमनाला घडाभर तेल वापरायचे असेल तर चौसष्ठ दिवे आठ तास जळत ठेवायला हवेत. आठच तास का? तर जगाचे ढोबळ आकलन होण्यासाठी जी समकालीन पुस्तके उपलब्ध आहेत त्यांतली बरीचशी वाचण्यासाठी सरासरी आठ तास लागतात. अ‍ँथ्रोपॉलॉजीतून इतिहास शिकायचा असल्यास युवाल हरारी ह्यांचे ‘सेपियन्स’ वाचायला साधारण आठ तास लागतात; तर माणसाच्या भविष्याच्या संभाव्यतेविषयी विचार करायचा असेल तर हरारी ह्यांच्याच 'होमो ड्युयुस' ह्या पुस्तकाच्या वाचनासाठी आठ तास लागतात. जगाची आर्थिक परिस्थिती समजून घ्यायची असेल तर थॉमस पिकेटी ह्यांचे ‘कॅपिटल इन ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ वाचायलाही साधारण आठ तास लागतात. (त्याच्या आकलनासाठी मात्र वर्षही लागू शकते.) ह्यानंतर पर्यावरणाचा विचार करायचा झाल्यास नेओमी क्लेनसारख्या लेखकांची पुस्तके प्रत्येकी आठ तासांत वाचून होतात. जगाच्या राजकीय व्यवस्थेचा अंदाज येण्यासाठी जर्गन ऑस्टरहॅमेल ह्यांचे 'द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द वर्ल्ड' हे मात्र बरेच मोठे आहे आणि ते वाचण्यासाठी आठ-आठ तासांचे सुमारे पाच पिरीयडस लागतात. जेनेटीक इंजिनियरिंगच्या संदर्भातले सिद्धार्थ मुखर्जींचे ‘द जीन’, अतर्क्य आर्थिक संकटाबद्दल भाष्य करणारे बील बॉनर ह्यांचे ‘हॉर्मिगॉडन’, सायबरयुद्धाविषयी माहिती देणारे शेन हॅरीस ह्यांचे ‘@वॉर’ ही पुस्तकेदेखील साधारण आठ तासांच्या आतबाहेरच आहेत.

एकूण जगावर भाष्य करायचे किंवा निदान एखाद्याच गोष्टीवर सहज प्रतिवाद करता येणार नाही असे काही अ‍ॅब्सोल्युट मांडायचे असल्यास ह्या आठ-आठ तासांच्या किमान चाळीस तुकड्यांचे वाचन आणि आकलन कुठल्याही माणसाजवळ असणे आवश्यक आहे. ह्यातले किमान एक पुस्तक आपल्यांतल्या प्रत्येकाने वाचलेलेच असेल आणि ह्यांतली जवळजवळ सर्व पुस्तके वाचली आहेत किंवा लवकरच वाचायला घेणार आहेत असेही लोक आपल्यात असतील.

सत्योत्तर परिस्थिती किंवा मग समकाल जिथे कुठे आहे ती परिस्थिती चिमटीत पकडून तिच्यावर मेटा स्वरुपाचे लिखाण केले जावे आणी ते एखाद्या दिवाळी अंकात छापले जावे, हा विनोद असाही आहे पण त्यापलिकडे असे काही प्रयत्न होणारच असतील तर त्या प्रयोगांशी संबंधित आणखी काही पॅरामीटर्स विचारात घ्यावे लागतील. वरती पुस्तकांचा जसा उल्लेख झाला आहे तसाच ‘नेटफ्लिक्स’, ‘बीबीसी अर्थ’ आणि ‘एएमसी’सारख्या टिव्ही सॉफ्टवेअर कंपन्यांनी बनवलेला कंटेंटही विचारात घेणे आवश्यक आहे. ह्यात पुन्हा ‘हाउस ऑफ कार्डस’, ‘बिफोर द फ्लड’, ‘प्लॅनेट अर्थ’, ‘ब्लॅक मिरर’, ‘ह्युमन्स’, ‘मिस्टर रोबाट’ आणि अशीच जवळजवळ एकशे दहा ते एकशे पंचवीस नावे आहेत. ह्यातल्या काही सिरीज ह्या तिसऱ्या सिजनमध्ये असून ज्ञान आणि फ्युचरीस्टीक कंटेंटचा विचार केल्यास हा साधारण अडीच ते तीन हजार तासांचा कंटेंट आहे. ह्यात पुन्हा साधारण वीस हजार तासांच्या कंटेटची भर अवघ्या सहा महिन्यात पडण्याची शक्यता आहे. हा एकाचवेळी मनोरंजन आणि विचारक्षमता उद्दिपित करणारा कंटेंट ओव्हरलोड विचारात घेतला तरी माणसाच्या बुद्धीच्या मर्यादेची लगेचच कीव येऊ शकते. मनोरंजन वजा करून फक्त ज्ञानार्जनाचा विचार केला तरी पुस्तकांची संख्याही खूप मोठी आहे. ही पुस्तके त्या-त्या लेखकांनी मूलभूत स्वरूपाचे शोध लागल्यानंतर त्याचा गोषवारा म्हणून तीन-तीन वर्षे खपून लिहली आहेत आणि ज्या वेगाने मूलभूत शोध लागत आहेत ते पाहाता सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत हे शोध पोहचवायचे झाल्यास ज्ञानाच्या कंटेटचा आकार कितीसा असेल ह्याचाही हिशेब मांडावा लागेल. हा लेख लिहीत असताना अश्रुंपासून वीजनिर्मिती करण्याचा, पूर्णतः माणूसविरहीत ट्रेन चालवण्याचा, बॉडीक्लॉक पूर्णतः रिसेट करण्याचा, अंधत्वाची प्रक्रिया रिव्हर्स करण्याचा शोध लागला आहे. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत आपण कदाचित अँटीबायोटिक्सला न जुमानणाऱ्या बॅक्टेरियांवर पुन्हा एकदा विजय मिळवून औषधाची पूर्णतः नवी जनरेशन विकसित करण्याच्या मार्गी लागलेले असू.

नमनाला घडाभर तेल वाहिल्यानंतर जग कुठे चालले आहे आणि आता मानवजातीचे काय होणार, ह्यासंबधी कुठलाही एक माणूस काहीही ठोसपणे सांगू शकत नाही. वर्तमानात जे काही चालले आहे त्याचे ट्रिगर माणसाला होमो सेपियन्सपासून होमो ड्युईस बनवतील अशी काहींची खात्री पटत चालली आहे, तर ह्या सगळ्या परिस्थितीत काहींना काही उलटे घडून मानव प्रजातीच नष्ट होईल असे वाटत आहे. ह्याच्यापलीकडे मानवजात पुन्हा एकदा अश्मयुगात जाऊन प्रजातीच्या प्रवासाची नव्याने सुरुवात करेल अशीही एक शक्यता वर्तवण्यात येते. ह्या भूत-भविष्य-वर्तमानाच्या फेऱ्यात मेंदू सतत अपडेट ठेवणे हे काहींच्या दृष्टीने इतके अवघड होत आहे की त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासाची लवकरच नव्याने वर्गवारी करण्यात येणार आहे. ह्याला मानसिक रोग मात्र म्हणता येणार नाही कारण हळुहळू ह्या रोगाने सर्वच विचारी लोक ग्रासले जातील आणि त्यावर औषध शोधून काढायचे झाल्यास विचारी माणसांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ताब्यात द्यावे लागेल आणि ती परिस्थिती वेगळ्याच बौद्धिक गुलामगिरीला जन्म देईल पण विचारवंत किंवा रादर 'विचारी माणसे' म्हणजे काय ह्याचीही व्याख्या एकदा तपासावी लागेल, कारण विचारवंत अशी काही व्याख्या लवरकरच कालबाह्य होऊन विचार करण्याचे काम हे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स करील आणि आर्टिफिशियल इंटेलिजेन्स काय विचार करतो आहे ह्याची फक्त माहिती आपल्याला ठेवावी लागेल. पुन्हा ही माहिती इतकी अजस्र आहे की ती एकाच माणसाला नुसती मोघम स्वरूपातही खूप जास्त माहिती असणार नाही.

'हे जग कसे चालते?' ह्या प्रश्नाचे उत्तर आता अंत:प्रेरणेतून बाह्यप्रेरणेकडे झुकले आहे आणि उत्तर शोधायचेच ठरल्यास त्याचे उत्तर माणसांपेक्षा संगणक अधिक चांगल्या प्रकारे देऊ शकतात. एक माणूस म्हणून मी संगणकाकडे ह्या प्रश्नाचे उत्तर मागू शकतो. एकच एक सोपे आणि सहज उत्तर हवे असल्यास ते ‘४२’ येते हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना ठाऊकही आहे; पण त्याच्या एक किंवा अधिक पायऱ्यांअगोदरचा विचार करून आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कलात्मक, पर्यावरणीय, वैज्ञानिक, तत्त्वचिंतनात्मक ह्या विषयांवर आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला काय वाटत असेल ह्याचा घेतलेला हा मागोवा.

१) आर्थिक

२००८च्या आर्थिक पडझडीनंतर आर्थिक मंदी येण्याची शक्यता आगोदरच वर्तवणाऱ्या लोकांचा उदोउदो झाला. फायनॅन्शिअल थ्रीलर हा पुस्तके आणि सिनेमाचा एक नवा जाँर (genre) म्हणून २०११पासून पुढे यायला सुरुवात झाली. अर्थव्यवस्थेवर टिपण्णी करणाऱ्या काहींना मुख्य धारेतल्या माध्यमात जागा मिळू लागली; ह्यांतले काही बुद्धिवाद्यांचे आदर्शही झाले. सबप्राईम लोनच्या वाटेने आलेल्या ह्या आर्थिक संकटानंतर जग हळुहळू जसे सावरू लागले तसतसे संकट नेमके का आले, कुठून आले, त्याची ढोबळ आणि बारीकसारीक कारणे काय होती आणि असे संकट पुन्हा येऊ द्यायचे नसेल तर काय करता येईल ह्यावर बरेच चिंतन जगाने केलेले आहे. सबप्राईम लोन्स क्रायसिसच्या काही समीकरणांची नंतरच्या काळात इथेतिथे पुनरावृत्ती झाली तेव्हा कदाचित त्याचा शेअरबाजारावर काही परिणाम होईल असे काहींना वाटले; पण ते तसे झाले नाही. भविष्यकाळात अर्थव्यवस्थेत संकट उद्भवू शकते असे सांगायला काहींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली पण तरीही अर्थव्यवस्थेवर संकट आले नाही. आज जगभरातल्या अर्थतज्ज्ञांना पुढचे आर्थिक संकट एकच एक मोठा फुगा फुटण्याच्या स्वरूपात दिसत नसून असंख्य लहानसहान फुगे फुटण्याच्या स्वरूपाचे दिसत आहे. भांडवलवाद इतक्या टोकाच्या गरमागरम वातावरणातून जात असताना त्याला चटका तर बसत नाहीच; पण ते एकदम एखाद्या ‘कूल-किड’सारखे आत्मविश्वासाने जगभरातल्या निर्देशांकाना वर कसे घेऊन जाऊ शकते ह्याचे आश्चर्य अनेकांना वाटते.

साधारण २००२ ते २००५ ह्या काळात भांडवलबाजारात गुंतवणुकीचे रियल टाईम विश्लेषण देणारी काही सॉफ्टवेअर्स बाजारात आली होती. ह्या सॉफ्टवेअर्सना बाजारावर परिणाम करणाऱ्या बातम्यांच्या फीडस पुरवण्यात येत असत. ह्या बातम्यांचे मेटा विश्लेषण करून ते सॉफ्टवेअर मोठ्या गुंतवणुकदारांना गुंतवणुकीचे सल्ले देत असे. बातम्या वाचता-वाचता हे सॉफ्टवेअर थोडेफार शहाणे होत होते. २००४च्या आसपास ह्या सॉफ्टवेअरने फक्त गुंतवणुकीचाच सल्ला न देता जगाच्या अंताची संभाव्य तारीख सांगण्यास सुरुवात केली. सॉफ्टवेअरचा मूळ उद्देश फक्त बातम्यांचे विश्लेषण करून त्यायोगे शेअरमार्केटच्या भविष्यासंदर्भात काहीतरी आउटपुट देण्याचे होते. त्याच्या प्रोग्रॅमला अतिवाईट परिस्थितीची शक्यता फक्त एक पूर्वअट म्हणून पुरविण्यात आली होती आणि ही अट लगेच कधी पूर्ण होईल असे कुणाला वाटले नव्हते. ज्ञात जगाची परिस्थिती इतकी वाईट नाहीये, हे त्या सॉफ्टवेअरवर काम करणाऱ्यांना माहिती होते त्यामुळे त्या सॉफ्टवेअरच्या तत्कालीन सांगण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.

२०१२ साली बाजारात नव्याने दाखल झालेली काही सॉफ्टवेअर्स ही अगोदरच्या सॉफ्टवेअर्ससारखीच जगाचे भावनात्मक विश्लेषण (sentiment analysis) करत असतात पण ह्यावेळी त्यांना पुरविण्यात आलेल्या विदेमध्ये सोशल मिडीया, न्यूज मिडीया, हवामानाचे अंदाज, हेल्थकेअर इंडस्ट्रीशी संबंधित डेटा आणि आणि इन्स्टॉलमेंटच्या परताव्याचे पॅटर्न्स आणि इतर अनेक गोष्टी पुरविण्यात आलेल्या आहेत. त्यांचा प्रमुख उद्देश निर्देशांकावर नजर ठेवत गुंतवणूक सुरक्षित ठेवणे आणि त्यावरचा परतावा वाढवणे इतके मर्यादित वाटत असले, तरी ह्या सॉफ्टवेर्सच्या मुळाशी असेलेली इतर काही व्यवहारी साध्ये एका व्हर्चुअल फॅब्रीकची निर्मिती करतात ज्यामुळे फक्त शेअर बाजार वा अर्थव्यवस्थाच नव्हे तर जगातल्या सद्यस्थितीतल्या भांडवलवादालाच सुरक्षित ठेवतात. बाजारात गुंतवणूक करणारे लोक शेवटी माणसेच असल्याने त्यांच्यावर आजूबाजूला चालत असलेल्या बऱ्यावाईट गोष्टींचा मानसिक परिणाम होऊन, क्वचित त्याचे प्रतिबिंब कधीकाळी बाजारात दिसत असे. आज एखादी प्रचंड अस्वस्थ करणारी सार्वजनिक दुर्घटना घडल्यानंतर माणसे दु:खी होत असली तरी त्याचा कसलाही परिणाम निर्देशांकांवर होत नाही. बाजारातल्या गुंतवणुकीतून मानवी भावनांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस कमी होत असून त्यात यंत्रांचा हस्तक्षेप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शेअरबाजार कोसळला म्हणजे सबंध अर्थव्यवस्थाच धोक्यात आली असे काही नसते, किंबहुना अनेक अर्थतज्ज्ञ शेअर निर्देशांकांना अर्थव्यवस्थेचा तापमापक मानू नये, असे स्पष्टपणे म्हणत असतात; ते एका अर्थाने खरेही आहे. पण काही देशांमध्ये सध्या अर्थव्यवस्थेचा वेग मोजण्यासाठी जी सरकारी संसाधने वापरली जातात त्यापेक्षा जास्त संसाधने शेअर मार्केटच्या विश्लेषणासाठी वापरली जातात. अर्थव्यवस्थेचा वेग मोजण्याची सरकारांना जेवढी गरज भासते वा महत्त्व वाटते त्यापेक्षा कित्येकपट जास्त महत्त्व शेअर मार्केटच्या विश्लेषणाचे गुंतवणुकदारांना वाटते. शेअर निर्देशांक हा अर्थव्यवस्था मोजण्याचा तापमापक तर नाहीच पण उद्या एखाद्या देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असली तरी त्याचे सर्व परिणाम शेअर बाजारावर दिसतीलच असे नाही.

जगभरातले अनेक लहानमोठे गुंतवणुकदार रोज मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना मूलभूत मानवी आशावाद, गर्व आणि जोखमींच्या भावनातून जातात आणि आपल्या गुंतवणुकीवर आपले पूर्णतः नियंत्रण आहे असे त्यांना वाटत असते. हे नियंत्रण आता बरेचसे गुंतवणुकीशी संबंधित सॉफ्टवेअरकडे गेलेले असून बाजार महिनाभर पूर्णतः ऑटोमॅटीकली चालवायचा ठरवला तरी तो व्यवस्थित चालू शकतो इतपत शक्यतेपर्यंत आपण आलेले आहोत. ह्यामुळे काही राष्ट्रीय आर्थिक समस्यांचा शेअरबाजारावर काहीही परिणाम दिसून येत नाही आणि अर्थव्यवस्था त्रासात असली तरी शेअर बाजार व्यवस्थित वर जाताना दिसतो. ह्याचा सरळ अर्थ असाही आहे की ह्यावेळी जेव्हा केव्हा भांडवली बाजार कोसळतील तेव्हा त्याचा प्रभाव जागतिक पातळीवर पडेल; तो एका देशापुरता मर्यादित राहाणार नाही; यापुढे कोसळलेला बाजार चार वर्षे वा चाळीस वर्षांनी पुन्हा जागेवर न येता तो थेट भांडवलशाहीला घेऊन बुडून जाईल आणि जगाला भांडवलवादासाठी पर्याय शोधावा लागेल. भांडवलवाद कोसळल्यानंतर भांडवलासंदर्भात केल्या गेलेल्या इतर समाजवादी, मार्क्सवादी, पिकेटीवादी, धार्मिक वा सांस्कृतिक व्याख्यांकडे माणसाला परतावे लागेल ज्याची व्यवस्थित पूर्वतयारी अजूनही कुणी केलेली नाही. हे असे काही होण्याची शक्यता तशी कमी असल्याने ती पूर्वतयारी करायलाच हवी का, असाही प्रश्न अनेकजण विचारतील. इतक्या प्रचंड साधनसामुग्री, कॉम्पुटींग पॉवर आणि कोट्यावधी समीकरणांची आकडेमोड करणारा बाजारही जर कोसळला तर तो मानवी इतिहासातला सगळ्यात मोठा अपघात असेल आणि त्यानंतर ज्ञात अर्थव्यवस्थेच्या मूलभूत व्याख्या मुळापासून बदलल्या जाऊन एका नव्या जगात मानवी सभ्यता प्रवेश करेल. तिथली अर्थव्यवस्था नेमकी कशी असेल ह्यावर काही आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे प्रोग्रॅम वेगवेगळ्या शक्यता आतापासूनच वर्तवू लागले आहेत; पण त्यांचे म्हणणे कितपत बरोबर आहे हे तपासण्यासाठी त्याना अजून काही गोष्टी शिकण्याची गरज आहे आणि त्यावर सध्या तरी काही महत्त्वाची सरकारे, कंपन्या आणि व्यक्ती व्यवस्थित नियंत्रण ठेवून आहेत.

सामाजिक + राजकीय

जगभरातल्या लोकसंख्येचे सद्यस्थितीत धर्म, जात, राष्ट्र, वंश, लिंग, आर्थिक स्थिती, वय, शिक्षण अशा विभिन्न पातळ्यांवर वर्गीकरण करता येते. ह्या पातळ्यांशिवाय डव्ह साबण आवडणाऱ्या स्त्रिया आणि पिअर्स साबण आवडणाऱ्या स्त्रिया, डव्ह साबण आवडणाऱ्या आणि लिव्हाईसची जीन्स वापरणाऱ्या स्त्रिया, डव्ह आवडणाऱ्या आणि सृष्टी ब्रँडचे पंजाबी ड्रेस घालणाऱ्या स्त्रिया असे मार्केटींगच्या विभिन्न प्रकाराने वर्गीकरण करता येते. ह्यांतली पुढची पातळी एनफिल्ड मोटारसायकल चालविणाऱ्या बेरोजगार युवकाला तो पेप्सोडेंटची टुथपेस्ट वापरत असल्यास मार्लबरो व्हाईट सिगरेट आवडेल का, किंवा दर दोन दिवसाला बाहेर जेवण करणाऱ्या एखाद्या पन्नास वर्षीय विवाहीत पुरुषास डीएसपी व्हिस्की आणि त्यासोबत हल्दीरामची मूगडाळ आवडेल का, अश्या नानाविध पातळ्यांवरती विभागणी करता येते. फोन आणि इंटरनेट वापरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची एक सविस्तर मार्केटींग कुंडली आज इंटरनेट कंपन्यांकडे असून त्यानुसार जाहिरातींचा, त्रासदायक वाटणार नाही, असा भडीमार प्रत्येक इंटरनेट वापरकर्त्यावर चालू आहे. मार्केटींगच्या विश्वात जगातल्या एकूण लोकसंख्येचे ढोबळ पातळीवर १६ स्वभावांमध्ये काही कंपन्यांनी वर्गीकरण केले आहे. ह्या वर्गीकरणाचा मुख्य उद्देश मार्केटींग असला तरी अब्जावधींची लोकसंख्या फक्त सोळा प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांच्या पट्टीवर मोजता येणे हे तसे फार सहज-सोपे वाटू शकते.

मार्केटिंगच्या सोयीसाठी माणसांच्या व्यक्तिमत्त्वाचे जसे सोळा उपप्रकार केले जाऊ शकता तसेच ऑनलाईन समाजाच्या एकूण वागणुकीसाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कने चार प्रमुख प्रतिक्रियात्मक भावना चार वेगवेगळ्या इमोटीकॉनमार्फत आणि एक सहमती/निर्णय/पोच/व्हॅलीडेशन आयकॉनच्या मदतीने उपलब्ध करून दिले आहेत. माणसाला झोपेत डास चावला आणि त्याची झोप मोडली, किंवा नवविवाहित स्त्रीला लग्नाच्या नवऱ्याबरोबर पहिला सेक्स करीत असताना माहेरून वडीलांचा फोन आला, किंवा एखादा माणूस शॉवर घेत असतांना त्याचा पाय सरकला पण वेळीच सावरलाही गेला अशा निरनिरळ्या गोष्टीनंतर माणसाला 'नेमके' काय वाटते ह्या भावना फेसबुकच्या रिअ‍ॅक्शन पट्टीवर कधी येत नाहीत, त्या कित्येकदा वैयक्तिक पातळीवर असल्याने अशा संमिश्र भावनांचा एकूण सामाजिक वातावरण बदलण्यात थेट सहभागही असूच शकतो असे नाही. सार्वजनिक परिस्थितीत केलेले एखादे भाष्य, चित्र, संभाषण, बातमी आणि इतर कंटेट प्रकार अनुभवल्यानंतर वा वाचल्यानंतर तुम्ही त्यावर चार मुख्य प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकता. एकतर तुम्हाला ते आवडेल किंवा ते आवडणार नाही. ते आवडत असेल आणि त्यामुळे तुम्हाला चांगलेही वाटत असेल तर तुम्ही 'लव्ह' अर्थात प्रेमाची भावना पुढे करू शकता. ह्याच बाबतीत तुम्हाला ती गोष्ट आवडली नसेल तर तुम्ही एक तर त्यावर फक्त दु:खी होऊ शकता किंवा मग रागही व्यक्त करू शकता. तुम्ही एकाच वेळी राग आणि दु:ख व्यक्त करू शकत नाही तसेच दु:ख आणि प्रेमही व्यक्त करू शकत नाही. ह्या चार परिमाणांशिवाय तुम्ही फक्त ‘आवडले’ (लाईक) अशी प्रतिक्रिया देऊन पुढे सरकू शकता.

एखादी घटना घडते आणि त्यानंतर त्या घटनेच्या संदर्भात जगभरात गुगलशी कनेक्टेड असलेले लोक काय शोधत आहेत, त्याक्षणी फेसबुकवर टाकल्या गेलेल्या कंटेंटला कुठल्या प्रकारच्या रिअ‍ॅक्शन्स मिळत आहेत, एखादा हॅशटॅग कुठल्या प्रकारे ट्रेंड होतो आहे ह्यावरून एखाद्या भौगोलिक भागाचे हिटमॅप्स आजकाल सिलीकॉन व्हॅलीच्या मोठमोठ्या कंपन्यांच्या ऑफिसांत महत्त्वाच्या ठिकाणी, स्क्रीनवर, चोवीस तास दिसत असतात. काही ठिकाणी अगदी विशिष्ट माहितीचे हिटमॅप्स दाखविले जातात तर काही ठिकाणी अगदी विशिष्ट भौगोलिक भागांचे हिटमॅप्स दाखविले जातात. ह्याच्या पुढच्या पातळीवर जगभरातल्या लोकांचा आजचा मूड काय आहे, एखाद्या विशिष्ट देशातल्या लोकांचा आजचा मूड काय आहे, त्याचीही आकडेवारी हिटमॅपवर दिसत असते. ह्या समीकरणात माहितीला प्रतिसाद देणाऱ्या लोकांच्या भावना जशा विचारात घेतल्या जातात, तशाच माहिती देणाऱ्या व्यक्ती, वृत्तसंस्था आणि माध्यमसंस्थाही विचारात घेतल्या जातात.

बराक ओबामा ह्यांच्या पहिल्या चार वर्षांच्या कारकीर्दीत जन्म झालेल्या ह्या सोशल नेटवर्कींकच्या भावनाशास्त्राचा अभ्यास २०११च्या आसपास जास्त प्रगत झाला. फेसबुककडे जमा होणारा प्रचंड डेटा वेगवेगळ्या अंगाने वर्गीकृत करून, त्यायोगे ह्या माहितीचा उपयोग कुठल्या-कुठल्या प्रकारे केला जाऊ शकतो, ह्याची संभाव्य चर्वितचर्वणे त्यांच्या अंतर्गत वर्तुळांत मोठ्या प्रमाणावर झाली. चीन वगळता आशियातल्या इतर देशांमध्ये, मागासलेल्या युरोपीय देशांमध्ये आणि आफ्रिकेतल्या विकसनशील देशांमध्ये फेसबुकची लोकप्रियता वाढू लागल्यानंतर निदान प्रातिनिधिक पातळीवर फेसबुकला जगाच्या बदलत्या भावनांचा अंदाज रोजच्यारोज आणि अगदी तासागणिकही घेता येऊ लागला. फेसबुकवर व्यक्त होण्याच्या नादात लोकांनी त्याला इतकी वैयक्तिक माहिती दिली की ह्या माहितीचा वापर करून फेसबुक काय काय करू शकते, हे शोधण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी फेसबुकची मदत न घेता तसाच सँपल डेटा तयार करून त्यावरून काय काय निष्कर्ष काढले जाऊ शकतात, ह्यावर काही प्रयोग केले. हा लेख लिहिला जात असताना एखाद्या माणसाच्या लैंगिकतेचा भावनात्मक कल, त्याच्या राजकीय धारणा, त्याच्या धार्मिकतेचे प्रमाण, त्याची सहिष्णुतता हे सगळे एक ते शंभर वा एक ते हजार ह्या फुटपट्टीवर मोजता येते. फक्त फोटो पाहून एखादी व्यक्ती समलैंगिक आहे किंवा नाही हे समजणारे अल्गोरिदम अलीकडेच तयार झालेले आहे; एखाद्या माणसाची राजकारणासंदर्भात वैयक्तिक जडणघडण कशी आहे आणि तो कुठल्या पक्षाला निश्चितपणे मत देऊ शकतो ह्याचे अल्गोरीदम अगोदरच तयार करण्यात आलेले आहे. पण त्याचा फेसबुक अधिकृतरीत्या वापर करीत नाही आणि ज्या खाजगी संस्था फेसबुकशिवाय ह्याचा वापर करत आहेत त्यांना अजून काही कळीचे पॅरामिटर्स हाती लागलेले नाहीत.

व्यक्तीला स्वतःबद्दल असलेल्या माहितीपेक्षा त्याच्या फोनला ज्याप्रमाणे तिच्याबद्दल जास्त माहिती आहे त्याचप्रमाणे समाजाला समाजाबद्दल जे माहिती नाही ते अल्गोरिदम्सला माहीत आहे. पुढच्या टप्प्यात जेव्हा निरनिराळ्या कंपन्यांचे अल्गोरिदम्स एकमेकांशी जोडले जातील तेव्हा त्यातून सामाजिक परिस्थितीचे आकलन अधिकाधिक अचूक होत जाईल. मायक्रोसॉफ्ट ह्या बलाढ्य कंपनीने अ‍ॅमेझॉन ह्या दुसऱ्या बलाढ्य कंपनीशी प्रारंभिक सहयोगाला सुरुवात केली आहे, ज्यात ट्विटर हे सोशल नेटवर्क सामील होऊ शकते. फेसबुक इतक्यात दुसऱ्या काही कंपन्यांशी सहयोग करील ह्याची शक्यता कमी आहे; गूगलची मातृसंस्था अल्फाबेट आपल्या अनेक उपकंपन्यामार्फत इतके मोठे काम करीत आहे की त्यांच्या एकूण कामासमोर फेसबुकही खुजे वाटावे. अल्फाबेटला अगदी रोज लागणाऱ्या नवनव्या शोधांचे प्रमाण इतके जास्त आहे की भविष्यात त्यांना इतर अल्गोरिदम्ससाठी कुणाशीही करार करण्याची, कुठलीही गरज लागणार नाही. गूगलमार्फत तयार केलेले काही आर्टिफिशियल इंटेलिजेन्स सॉफ्टवेअर्स मानवी बुद्धीच्या पलीकडे गेले असून कुठल्या एका माणसाला ते नेमके कसे काम करतात हे सांगणे अवघड झाले आहे. ह्याच कारणामुळे गूगलला लागलेले आर्टिफिशियल इंटेलिजेन्सचे शोध तूर्तास बाजूला ठेवले गेले आहेत. भविष्यात त्यातून काय निपजेल हे आत्ताच सांगता येणार नाही.

फेसबुक, अ‍ॅमेझॉन, गूगल आणि अल्फाबेटमधल्या इतर कंपन्या ह्या अत्यंत अशक्य वाटणारे काही ध्येय घेऊन तीन वर्षांपूर्वी काम करत होत्या. त्यातल्या बहुतांशी गोष्टी सहजपणे पूर्ण झाल्या असून आता पुढच्या तीन-चार वा जास्त वर्षांत अशक्य वाटणाऱ्या ध्येयांवर ह्या कंपन्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ह्यावेळी त्यांनी स्वतःसमोर उभी केलेली आव्हाने मागच्या काळापेक्षा दसपट मोठी आहेत आणि तरीही त्यांना यश मिळण्याची शक्यता पूर्वीइतकीच आहे. ह्या शोधांसाठी आजही कोट्यावधी लोक प्रत्येक सेकंदाला ह्या कंपन्यांना हवा असलेला डेटा पुरवत आहेत. ही संशोधने जसजशी पूर्ण होऊ लागतील तसतसे मानवी आयुष्य अधिकाधीक आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या कह्यात जाईल. प्रथमदर्शनी हे वाईट आहे किंवा त्यावरून व्यक्तीचे स्वातंत्र्य हरपेल असे वाटू शकते, पण ही संशोधने लोकांच्या सुखाच्या गरजा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण करण्याची हमी देणार असल्याने लोक लोक तिचा हसतहसत किंवा अजाणतेपणाने स्वीकार करतील.

कॅनाबॉईडस आणि टिएचसीच्या प्रभावाखाली डेन्व्हरमधल्या माझ्या एका मैत्रीणीशी संवाद करतांना ह्या विषयावर झालेल्या चर्चेचा इथे उल्लेख करावासा वाटतो. तिच्या मते आपण प्रत्येक क्षणाला कुठल्यातरी मतदानात भाग घेतो आहोत. असंख्य छोट्याछोट्या गोष्टींवर मते देत असतांना अजाणतेपणाने कुठल्यातरी मोठ्या निवडणुकांचा भाग झालो आहोत आणि ही निवडणूक नेमकी कोणती, हे तिचा निकाल लागल्यानंतर आपल्याला कळणार आहे. आपल्याजवळ इंटरनेटशी कनेक्टेड कुठलेही डिव्हाईस असेल तर ह्या मतदानात आपण अगोदरच भाग घेतला आहे आणि इंटरनेटशी पूर्णतः डिस्कनेक्ट होऊन आपण नेटवर्क नसलेल्या भागात जरी निघून गेलो तरी निवडणुकीच्या पश्चात होणाऱ्या परिणामांपासून आपली सुटका नाही. जगभरात लाखो लोकांचे मोर्चे एखाद्या पक्षाचे छुपे अजेंडा असल्यासारखे वाटतात; पण हे शक्य आहे की मोर्चे आर्टिफिशियल इंटेलिजन्स घडवून आणत आहे. अशा मोर्चांचे नेते वाटणारे कुणीतरी नेते असतीलही, त्याला पैसे पुरवणारे लोकही असतील, पण ह्या मोर्चाचा कणा व्हॉटसअ‍ॅपसारखे मेसेजिंग सॉफ्टवेअर आणि फेसबुकसारखे सोशल नेटवर्क आहे. आत्ता जे काही घडते आहे त्याचा वर्तमानातला अर्थ काय असेल तो असोत, पण नेमके काय घडले होते ते पंधरावीस वर्षानंतर मागे वळून पाहातानाच कळेल.

तिचे हे म्हणणे इथपर्यंत मला थोडेफार स्वीकारार्हही वाटले, पण पुढच्या टप्प्यात तिने सोशल हिटमॅप्सच्या पर्यायी संकल्पनाची केलेली मांडणी तिच्याकडे दुर्लक्ष करण्याइतपत अ‍ॅब्सर्ड होती. सद्यस्थितीतले अनेक हिटमॅप द्विमिती आहेत. तिने सुचवलेले हिटमॅप्स द्विमितीय न राहाता होलोग्राफीक स्वरूपात त्रिमितीय आहेत. पृथ्वीचा होलोग्राम आपण सायफाय सिनेमांमध्ये बघितलेला असतो, पण हा होलोग्राम रियलटाइममध्ये बदलत्या डेटाशी जोडून एखाद्या खोलीतल्या अवकाशात प्रोजेक्ट कसा करता येईल, ह्याबाबत मी साशंक होतो. हे तंत्रज्ञान बरेच अगोदरपासून उपलब्ध असून त्याचा वापर काही ठिकाणी सुरू आहे असे मला अलिकडे समजले. ह्या होलोग्रामला फेसबुकचा डेटा जोडल्यास जगाचा भावनात्मक हालहवाला दिसतो, शेअरमार्केटचा डेटा जोडल्यास जगाची आर्थिक स्थिती वा कॅपिटलीझमचे सेंटीमेंट इंडेक्स दिसतात. येत्या दिवसांत हा होलोग्राम मानवजातीचा 'कलेक्टिव्ह कॉन्शसनेस' असू शकतो, असे माझे मैत्रीण मानते. आपण अधिक प्रमाणात सॅटेलाईट डेटा गोळा करून, त्यांत माणसांच्या हातात असलेले फोन्सही वापरले तर पृथ्वीचा एकूण कॉन्शियसनेस किंवा मग त्याची निदान प्रातिनिधिक प्रतिकृतिचा होलोग्राम बनवू शकतो असे तिचे म्हणणे आहे. आपल्याला ह्या आयुष्यात परग्रहांवरचे जीवन सापडत नसले तरी आपल्या ग्रहाच्या कलेक्टिव्ह कॉन्शसनेसचा होलोग्राम आपण आपल्या अवकाशगंगेच्याही पलिकडे पाठवू शकतो. अगदी पुढच्या टप्प्यात आपल्या ग्रहाचा कलेक्टिव्ह कॉन्शसनेस आपण कंम्प्रेस्ड प्रकाशीय होलोग्राममध्ये परावर्तित करून जसा दुसऱ्या ग्रहावर पाठवू शकतो तसा तो दुसऱ्या ग्रहावर पोहचल्यानंतर अनकंम्प्रेस्डही करू शकतो.

तिचे हे म्हणणे क्वांटम फिजिक्सच्या पातळीवर कदाचित बरोबर असूही शकेल पण ह्यामागची तिची भूमिका थेट परमेश्वराच्या पातळीवर येऊन पोहोचली आहे ह्याशिवाय ती कदाचित बिगबँगचे लहान वर्जनही प्रपोज करते आहे. अश्या सिद्धांतांमुळे आता आधुनिक जगाच्या परमेश्वराचा उगम होऊ शकतो, त्याच्या धर्माचा वा त्याच्या पंथाचाही उगम होऊ शकतो. एरवी व्यवस्थित ऑफिसात जाऊन काम करणारे आणि संध्याकाळी नेटफ्लिक्सचा आनंद लुटणारे काही लोक परमेश्वराची नवी व्याख्या करू लागले आहेत आणि सोबत त्या परमेश्वराचा धर्मही स्थापू लागले आहेत. एकीकडे सामान्य माणसे अजाणतेपणाने डेटा देऊन आर्टिफिशियल इंटेलिजेन्सला समर्थ करीत असताना ह्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या जोरावर परमेश्वर बनण्याचे, प्रेषित होण्याचे, स्वर्गात जाण्याचे, अमर होण्याचे स्वप्न काही लोक पाहू लागले आहेत. ते अशा पातळीवर जेव्हा विचार करू लागतात तेव्हा ते स्वतःला पराकोटीचे विद्वान समजत असले तरी त्यांच्या धारणा दोन-पाच हजार वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या धर्मांसारख्याच होऊ लागतात.

हे नवे टेक्नोधर्म जुन्या धर्माची जागा घेतील का एकमेकांसमोर लढाईसाठी उभे ठाकतील एवढाच काय तो प्रश्न आहे.

क्रमशः

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

एकच एक सोपे आणि सहज उत्तर हवे असल्यास ते ‘४२’ येते

डोल्याला टॉवेल लावला आहे!

(लेख वाचता वाचता हे दिसल्यामुळे त्वरित प्रतिसाद.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ते ’४२’ मलाही कळलं नाही.
एकूण समजायला जड लेख. ए अाय हे एक अत्यंत शक्तीमान तंत्रज्ञान असून त्याच्या पुरत्या परिणामांची अजून कुणालाच कल्पना अाली नाही, असे सुंदर पिचाई यांनीही कबूल केले अाहे. (संदर्भ: एनडीटीव्ही वर अाॅक्टोबरच्या पहिल्या अाठवड्यात प्रसारित मुलाखत). जाता जाता अमेरिकेतल्या एका बलाढ्य ए अाय सिस्टीमने भारतात येत्या ४ वर्षात सिव्हील वाॅरची शक्यता बोलून दाखवली अाहे, असे प्रणब राॅय यांनी मुलाखती दरम्यान म्हटले अाहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>ते ’४२’ मलाही कळलं नाही.<<

संदर्भ
आणि टॉवेलचा संदर्भ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डग्लस अॅडम्सच काही वाचलेलं नाही. असो.
राहूल यांचे सेपियन्स वरचे लोकसत्तेतले लेख वाचले होते, अावडले होते. त्या मानाने हे जरा जड अाणि बरेच मागचे संदर्भ असल्याशिवाय समजणारं वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा या लेखनाला पास.
१. यात क्रिप्टोचलनांबद्दला काहीच मतेपिंक मारलेली नाही.
२. गुंतवणूक आणि बाजारातली खरेदीविक्री ह्या गोष्टी पूर्णत: एकजिनसी नाहीत.

जगभरातले अनेक लहानमोठे गुंतवणुकदार रोज मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना मूलभूत मानवी आशावाद, गर्व आणि जोखमींच्या भावनातून जातात आणि आपल्या गुंतवणुकीवर आपले पूर्णतः नियंत्रण आहे असे त्यांना वाटत असते. हे नियंत्रण आता बरेचसे गुंतवणुकीशी संबंधित सॉफ्टवेअरकडे गेलेले असून बाजार महिनाभर पूर्णतः ऑटोमॅटीकली चालवायचा ठरवला तरी तो व्यवस्थित चालू शकतो इतपत शक्यतेपर्यंत आपण आलेले आहोत.

मोठ्या गुंतवणूकदारांना आपले पूर्णत: नियंत्रण आहे असं छातीठोकपणे अजिबातच वाटत नाही.

पण काही देशांमध्ये सध्या अर्थव्यवस्थेचा वेग मोजण्यासाठी जी सरकारी संसाधने वापरली जातात त्यापेक्षा जास्त संसाधने शेअर मार्केटच्या विश्लेषणासाठी वापरली जातात. अर्थव्यवस्थेचा वेग मोजण्याची सरकारांना जेवढी गरज भासते वा महत्त्व वाटते त्यापेक्षा कित्येकपट जास्त महत्त्व शेअर मार्केटच्या विश्लेषणाचे गुंतवणुकदारांना वाटते.

क्रमांक दोनच्या विरुद्ध समजूतीतून वरील विधाने आली आहेत. गुंतवणुकदार केवळ बाजाराच्याच विश्लेषणावर अवलंबून नसतात. सरकारांचे स्थैर्य, पर्यावरणीय ऱ्हास, सामाजिक शांतता इत्यादी गोष्टी अवश्य तपासल्या जातात.

आज एखादी प्रचंड अस्वस्थ करणारी सार्वजनिक दुर्घटना घडल्यानंतर माणसे दु:खी होत असली तरी त्याचा कसलाही परिणाम निर्देशांकांवर होत नाही.

हे आजही बऱ्यापैकी खरं नाही. किम जाँगच्या पादण्यामुतण्याने सुद्धा आजही बाजार थरथरतात. आणि जरी ए.आय. आले, तरी ते स्वत: मानवी भावनांपासून फारकत घेतील असे वाटत नाही. अगदी ए. आय. साठी सुद्धा बरीच वाट तुडवायची आहे. ए. आय. सारख्या तांत्रिक प्रगतीमुळे बाजारांचे स्वरूपसुद्धा आजच्या सारखेच असणार आहे का? अगदी ब्लेडरनरसारखा चित्रपट देखील फ्लॅट स्क्रीन्स चे भविष्य वर्तवू शकत नाही तिथे आपण पामर म्हणजे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला