वसंत बिरेवारचा दुसरा दिवस

ललित

वसंत बिरेवारचा दुसरा दिवस

- १४टॅन

'वसंत बिरेवारचा एक दिवस' ह्या कै. अरुण साधूकृत कथेचा, सध्याच्या काळातला पुढचा भाग. लेखकातर्फे ही अरुण साधूंना आदरांजली.

सायंशाखेत एकाएकी जास्त डोकी दिसायला लागून बरेच दिवस झाले होते. त्या पहिल्या दिवसापासून बिरेवारचं डोकं भणाणायचं कमी झालं होतं. तेवढीच प्रचाराला जरा मदत व्हायची. पोरं ध्वज गुंडाळणं, संख्या-संचलन घेणं वगैरे कामं भराभरा आटपून टाकायची. अलीकडचं नवीन, आणि प्रचाराचं प्रभावी माध्यम म्हणून व्हॉट्सॅप, फेसबुक, युट्यूब, इन्स्टाग्राम वगैरेवर प्रचार करायला म्हणून वसंतानं MS-CIT करून घेतलं होतं. त्यासाठी गावातल्या एकमेव सायबरकॅफे-कम-MS-CIT प्रशीक्षण केंद्रात भर दुपारी रखरखत्या उन्हात सायकल हाणत जाण्याचं कामही त्यानं केलं होतं. त्याचा मालक शिंदे. त्याच्या पोराला बापूसाहेबांनी नोकरी लावून दिली, आणि वसंतभौ बापूसाहेबांचे खास, म्हणून त्याला भरघोस सवलत दिली होती.

बापूसाहेबांच्या आठवणीनं वसंताच्या मनात सूक्ष्मशी कळ उठली. बापूसाहेब गेल्याला साधारण चार वर्षं होत आली असतील. मधुमेह बराच चिघळून अंथरुणाला खिळलेले शेवटच्या दिवसांत. बापूसाहेब आज असते तर बदललेल्या वसंताला पाहून त्यांना नक्की काय वाटलं असतं, ह्याचा विचार करुन स्वत:बद्दल थोडं वाईट वाटण्याचेही दिवस सरले होते. सगळेच दिवस सरले होते. बापूसाहेबांना एकदा बौद्धिकात चक्कर आली, आणि आपण सगळे धावलो. गुल्हाने आणि आपण त्यांना त्या इब्राहिमभाईच्या गाडीतून हॉस्पिटलात नेलेलं. डॉक्टर तसे सज्जन वाटलेले, त्यांनी निदान केलं, इब्राहिमभाईची ओळख निघाल्यावर त्यांनी पैसेही घेतले नाहीत. चांगलीच वाढली होती शुगर बापूरावांची. नंतर त्यांना डायबेटीक फूट का काय तो झाला. पाय अखंड प्लास्टरमध्ये. नंतर काही शाखा म्हणाव्या तशा भरल्या नाहीत. उगीच घरी करमत नाही म्हटल्यावर शाखेत येणारे, बापूरावांनी म्हटल्यासारखे 'कुंपणावरच बसून राहणारे शिखंडी'च वाढले. आता कुंपणावर बसलेला बलराम, आणि काही असलं तरी लढलेला तो शिखंडी हे वसंताला माहीत होतं. पण बापूरावांच्या धगधगत्या वाणीपुढे ह्या शंका काढणं त्याच्या कुवतीत नव्हतं. नंतर तेही गेले. गुल्हाने, हळदणकर वगैरे एक दोन दिवस आले, पण शाखा शाखा म्हणतात ती काय आधीसारखी झाली नाही. नंतर नंतर तर बरेचदा मैदानात वसंता एकटाच जाऊन बसून रहायचा. इब्राहिमभाईनं त्याला थोडे दिवस दिले पैसे, पण नंतर मात्र अगदीच हातातोंडाशी गाठ येऊ लागली, तेव्हा ४ मैलांवरच्या सरकारी शाळेत बापूरावांच्या ओळखीनेच त्याला पीटी शिक्षकाची नोकरी मिळाली. तिथे दररोज सायकलीवरुन जाणं, तिथेही मुलांबरोबर उड्या मारणं आणि संध्याकाळच्या अंधुक प्रकाशात परत येणं ह्यामुळे वसंताला लागायची सपाटून भूक. आजींनी दिलेलं दही-कोशिंबीर-पोळीभाजी असली तर असली, आणि तीही मिळणार घरी गेल्यावर. आताशा वडापाव वगैरेंच्या गाड्या बऱ्याच फोफावल्या होत्या. त्यातही एक आधीचा स्वयंसेवक. वसंताला ओळखून तो त्याला एखादा पाव असाच देई, वडे-भजी तळल्यावर उरणारा चुरा वगैरे असला तर फुकट देई. कधीमधी उधारी चालवून घेई. वसंता मात्र दोन दिवसांच्या वर उधारी ठेवत नसे. पाव खरंतर त्याज्य. पण पोटातल्या आगीपुढे कसलं त्याज्य नि कसला धर्म. त्याला अजूनही आठवतं - एकदा प्रचाराला तो कांबळेच्या घरी गेला होता. त्याचा मुलगा साधारण पाचवीत वगैरे असेल. इंग्लिश शाळेत शिकणारा. बापाचं मराठी आधीच दिव्य, त्यात पोराची शाळा इंग्लिश म्हटल्यावर त्याला काही वसंताशी बोलता येईना. वसंताचं माथं बरंच सणकलं होतं त्या दिवशी. पण कमीअधिक ह्याच प्रकारच्या गोष्टी सगळीकडे पाहून तो व्यथित झाला होता आणि आता तर असा काळ आला होता की...

त्याला अजूनही कांबळेचं वाक्य आठवतंय - "वसंतभौ, संस्क्रिती आन धर्म काय ताटात चाटायला यायची नाय! ह्या सर्व शिकलेल्या अमीर लोकांच्या हॉबी... हितंतितं गांड मरवायला आपल्यासारखेच पोरं लागतात. आता तुमी इतके दिवस पाव खाता. पयल्यांदा आठीवतंय काय, निस्ता वडा खाल्लेलात आनि मग परत आलेला, चार वडे बसवले तुमी तेवा. दुसऱ्या दिवशीपासून इज्जतीत दोन दोन वडापाव खायला लागले की नाय? तसंच आस्तं... सोडा तुमी. मी म्हनतो च्यामारी लात घाला त्या शालेला आनि माज्याबरोबर गाडीवर या. दोन टाईमचा नाश्टा आपन देतो. फक्त पुड्या बांदा, चटणी बांदा एवडाच करा." वसंताचा स्वाभिमान काय डिवचला गेला होता त्यादिवशी! मी? कट्टर धर्मोपासक, संस्कृतिरक्षक हे म्लेंच्छांचं खाणं वाटायला येऊ? जमणार नाही! कदापि जमणार नाही! वसंत तेथून तडक निघाला होता आणि त्यानं एक महिना एकभुक्त रहायचा निर्णय घेतला होता. त्यातही वडापाव बाद. पाव तर नाहीच. पण साधारण आठवडाभरात त्याचा निर्णय क्षीण झाला. त्याच्या प्रखर विचारी मनानं आणि अत्यंत हिशोबी मनानं एक अघोरी द्वंद्व मांडलं होतं. त्यांच्यातल्या वादविवादांच्या आवर्तात त्याला त्याचं स्वत्व हरवल्याची प्रचंड जाणीव व्हायची. कधीतरी समाधिस्थ शरीर पोटातल्या वणव्यानं प्रचंड बंड करायचं. अशाच एका क्षणी तो आवेगानं उठून दुसऱ्या वडापावच्या गाडीवर गेला होता. नेमका हातात आलेला खमंग, पिवळाधमक वडा खाताना त्याला कांबळे दिसला. वसंतानं आपला चेहरा लपवायचा इतका क्षीण प्रयत्न कधीच केला नसेल. त्यावेळी त्याला एकाएकी प्रखर वस्तुस्थितीची जाणीव झाली. लख्खकन त्याच्या मनात तो विचार, जो इतके दिवस, इतक्या निकरानं दाबायचा त्यानं प्रयत्न केला होता, तो उफाळून आला. त्यानंतर त्यानं शाखेत जाणंच सोडलं. शाखेच्या मैदानाच्या जवळपास जरी गेलं तरी ते भयाण, भेसूर वाटू लागायचं. मोडका ध्वजदंड अजूनच केविलवाणा वाटू लागायचा. सायंशाखेत एकाएकी पोरं दिसू लागली ती ह्या गेल्या दोन तीन वर्षांत. साधारणत: शाखेत येणारा तरुणवर्ग कधीच गायब झाला होता.

सगळा तरुणवर्ग, आणि थोडे प्रौढही दिसायचे ते 'त्या' बैठकांना. गावातलं ते एक घर. त्या घराबाहेर इलेक्ट्रिक बेलऐवजी एक घंटा. एक टागोर, आणि एक मदर तेरेसाचा फोटो. मदर तेरेसाचा फोटो पाहून वसंताची तळपायाची आग मस्तकात जायची. त्यानं व्हॉट्सॅप, फेसबुकवर बरंच वाचलं होतं मदर तेरेसाबद्दल. चांगलं तर लहानपणीच वाचून झालं होतं. आता हे ह्या वयात वाचायला मिळालं. त्या घरात महिन्यातून एक-दोनदा काय इतकं घडतं की ही शहरी फुलस्लीवचे टीशर्ट आणि तट्ट टाईट जीन्स घालणारी पोरं इथे जावीत? फक्त तेव्हढीच असती तर उत्सुकता वाटायची गरज नव्हती म्हणा, पण जोशीसर, त्यांचे मित्र वगैरे गावातले 'बुद्धिवादी'ही तिथे जमायचे. दिवसभर आपले काड्यावाले चष्मे सांभाळत, गाड्यांमधून फिरायचे. साड्या आणि ते सदरे मात्र खादी. काहीही करायला गेलं की ह्यांचा विरोध आहेच. तरीही, आधी शाखा घ्यायचो आणि मध्यंतरी इतके दिवस नाही घेतली म्हटल्यावर. आपणही शोधत होतोच जरा अर्थ. गेलो. तर, त्या जोशी 'सरां'नी एकदा खास येऊन बोलवलं बैठकींना. म्हणे, धर्माचा खरा अर्थ तुला तिथे कळेल. आमच्याबद्दल जे तुझं मत आहे ते बदलायची आशा आहे. वसंताला तसंही घरी करमत नव्हतंच तेव्हा. तो गेला एका त्यांच्या एका चर्चेला. तिथे एक अजून 'सर' आलेले होते. विशी ते साठीपर्यंतची माणसं. सगळे आपले सर. बायका मॅडम. त्यांच्या खादीच्या झब्ब्यांत आणि पायजम्यांमध्ये वसंताला स्वत:च्या शर्ट आणि लेंग्याची फारच लाज वाटत होती. ह्यांचा धर्म दिसण्यासारखं ह्यांनी काहीही घातलं नव्हतं. पहिल्यांदा हे जोशी सर उठले - "आज आपल्यात एक खास माणूस आलेला आहे. आपण त्याचं स्वागत वगैरे फॉर्मल शब्द वापरणार नाही मी, अभिनंदन करू या - की आपल्या विचारसरणीशी बंड पुकारण्याची हिंमत त्यानं केलेली आहे म्हणून." वसंताला आपण काहीतरी घोर महापाप करतो आहे असं वाटत होतं. पण सगळ्यांनीच एकदम हसून त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा त्याचीही भीड जरा चेपली. कसंनुसं हसून त्यानं त्या अभिनंदनाचा स्वीकार केला. पण त्याला जास्त फुटेज न देता एकदम जोशीसरांनी - "आता आपले प्रमुख पाहुणे-" म्हणून अजून एका नवीन सरांची ओळख करून दिली. लोकांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. वसंताला वाटलं, हे ह्यांचं बौद्धिक. चला, ह्यात वेळ बरा जाईल. शिवाय, हे जरा अनौपचारिक असल्यामुळे आपल्याला परत प्रश्न वगैरे विचारता येतील. ते सर बोलायला उठले. खरं तर विषय होता 'संविधानाचं श्रेष्ठत्व' का काही तरी. पण साधारण पाच मिनिटं संविधान कोणी लिहिलं, कसं लिहिलं इत्यादी सामान्य ज्ञान झाल्यावर, त्यांनी नेहमीची पट्टी घोकायला घेतली. "आजकाल खूप कोलाहल माजला आहे, मनं बधीर झाली आहेत, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची गरज आहे..." वसंताला ते मनोमन पटलेलं असलं तरी त्याला त्यामागचं मर्म लक्षात आलं. नंतर आजूबाजूला कुजबूज सुरू झाली. कोणाचंही लक्ष त्या भाषणात नव्हतं. वसंत मात्र अगदी मनापासून ऐकत होता. ह्यानंतर एक इवलीशी मुलगी उभी राहिली. तिनं एक कविता वाचायला आणली होती.

"आई, का गं लोक इतके चिडतात?
सगळ्यांमध्ये ब्लड सेमच
पण धर्मावरून वाद घालतात?"
हे ऐकल्यानंतर वसंताला काय चाललंय ह्याची जाणीव झाली. ह्या कवितेचा संविधानाशी काय संबंध बुवा, हा विचार त्याच्या मनाला स्पर्शून गेला. मग त्याला कळलं की ती मुख्य पाहुण्यांची मुलगी आहे. अर्थात, ते शब्द त्या मुलीचे नाहीत हे त्याला कळून चुकलं होतं. तरुणवर्ग आपल्याच गोटात काहीतरी कुजबुजण्यात मग्न होता. प्रौढ काहीतरी गप्पा मारत होते. बायका मात्र ते ऐकून आनंदानं माना वगैरे डोलावत होत्या. गर्दी गोळा करण्यासाठी इतकं तर करावंच लागतं हे त्याला ठाऊक होतं. पण बाकी ह्यांचे विचार त्याला फार आवडले. तो नियमित त्यांच्या बैठका, परिसंवाद, व्याख्यानं इत्यादींना जाऊ लागला.

कालांतरानं त्याला त्याचाही कंटाळा येऊ लागला. संघाच्या विचारसरणीत आणि प्रात्यक्षिकांत जे कालानुरूप बदल झाले, त्यातून त्याला त्यामागचं मर्म उलगलं होतं. पण ह्या लोकांचंही काही वेगळं नव्हतं.

अण्णा कधीकधी वसंताची त्यांनी चांगलीच हजेरी घ्यायचे - "अरे, त्या धर्मबुडव्यांच्या नादाला नको लागूस, नको लागूस, म्हणून कित्तीदा बोललो, कधी येणार डोकं ताळ्यावर तुझं? दररोज बघतोस ना काय पाठवतो मी ते? अरे, त्यांना नाहीत उद्योग! स्वत:च्या पोरांना लावून दिलंन् परदेशास, नी आपल्याला इकडे उपदेश करतात होय रे! ते काही नाही, तूही धर्मबुडवाच झालाएस आजकाल!" खरंतर इतके दिवस नेटानं शाखा घेऊन, जवळपास दहा तरी निवडणुकांमध्ये एकही पैसा न करता प्रचार करणं, संघाचा प्रचार करणे ही कामं, काहीही मोबदला न घेता करणं ह्याचा इतकाच मोबदला मिळावा! वसंताला एरवी फार वाईट वाटलं असतं पण त्याला सध्या हे अपेक्षितच होतं. स्वत:चं डोकं वापरलं की व्यवस्थेचा विरोध हा होणारच हे त्याला अनुभवांती कळून चुकलं होतं. कधी कधी अण्णांचा फार राग यायचा. जोशीसरांचे शब्द आठवायचे - तुम्ही इतकी सोवळी पाळून, झाडांभोवती प्रदक्षिणा घालून, षोडशोपचारे पूजांवर पूजा करून आणि सांगून काय साध्य केलंत? तुमचा मुलगा गेला का हम्रिकेत? तेच तुमचं अंतिम ध्येय ना तसंही? धर्म आला का मदतीला तिथे? असो. ते बोलले म्हणून आपण मर्यादांचं उल्लंघन करणं योग्य नाही. येईल. एक दिवस आपलाही येईल. दाखवून देऊ. तरीही, संघाचे लोक उगा बुद्धिभेद करायचे नाहीत. 'ते' जोशीसर आणि इतर लोक मात्र त्याच्या शाखा घेणं, दररोज देवळात जाणं ह्यावर भलतेच वादविवाद करायचे. सगळ्याचा सारांश थोडक्यात अजून कशी अक्कल आलेली नाही हाच असायचा. त्याला 'अंत:चक्षू उघडणं, नवे विचार समजून घ्यायला वेळ जावा लागणं' वगैरे गोड गोड शब्दांत अक्कलच काढली जायची. वसंता कंटाळून ह्या सगळ्याबाबत विचार करायचा. खरं तर वसंताचंही 'स्वत:चं असं मत' आजकालच बनलं होतं. तेही नीट बनलं होतं का, ह्याचं उत्तर त्याच्यापाशी नव्हतं. सगळ्यापासून अलिप्त रहावं, आपलं काम करत रहावं हे त्याला दररोज वाटत असलं तरी संघ आणि जोशीसर ह्या दोन्ही जबाबदाऱ्यांतून एकाएकी मुक्त होण्याची त्याची हिंमत नव्हती. अण्णांना तो जोशीसरांच्या घरातल्या सभांना जातो म्हटल्यापासून वसंतावर खास राग होता. त्यांनी बोलणंच टाकलं जवळपास त्याच्याशी. गुल्हाने, हळदणकर, कांबळे इत्यादी आणि अण्णा कानगोष्टी करू लागले. सगळे शाखेवर यायचे, पण वसंताशी अवांतर बोलणं बंद. जेवढ्यास तेवढं. वसंताला ह्याचाही फरक पडेनासा झाला होता.

वसंताला क्षणोक्षणी संघाच्या बैठकी आठवायच्या. कसं रोम-रोम चेतवून उठणारी बौद्धिकं असायची. तिथे फार व्यक्तिकेंद्रित विचाराला वाव नसायचा. प्रात:स्मरणीय, पूजनीय ह्यांच्यातून जे विचारसरणीला पोषक तेच विचार नेमके गाळून उचलले जायचे, हे वसंताला केव्हाच कळून चुकलं होतं. त्याच्या उदासीनतेमागे हेच एक मोठं कारण होतं. बापूरावांनी काढायला लावलेली सावरकरांची तसबीर त्यानं व्यवस्थित पुसून परत टांगली होती. सावरकरांच्या अतोनात हालअपेष्टांमधून, खिळ्यानं 'कमला'सारखं दर्जेदार काव्य लिहीणं, हे आदर्श लहानपणापासून डोळ्यासमोर असल्यानं त्यानं कधीच अशा अवस्थेबद्दल तक्रार केली नव्हती. पण, इतक्या सुधारणावादी, आदर्शवादी, बुद्धिवादी लोकांकडून त्याला जास्त अपेक्षा होत्या. पण वेगळं वेगळं म्हणता म्हणता, अंतस्थ प्रवृत्ती सारख्याच आहेत हे त्याला आता कळून चुकलं होतं. एका व्याख्यानात एक 'अ' सर एका 'ब' बाईंचे विचार कसे समर्पक आहेत, आणि कसं मनातलं बोलून जातात इत्यादी म्हणायचे. पुढच्या परिसंवादात त्या 'ब' बाई अजून एका 'क' सरांच्या 'लेखानं भारावून जाऊन स्फुरलेली कविता' सादर करायच्या. मग हे 'क' सर पुढच्या व्याख्यानात परत पहिल्या 'अ' सरांच्याच मार्गदर्शनाखाली आपली विचारसरणी कशी घडत गेली हे म्हणायचे. संघाकडे स्वत:ची सुप्रतिष्ठित, कर्तृत्वामुळे वादातीत अशी 'लोकप्रतीकं' होतीच. पण ह्या लोकांनी तशीच पहिले 'घडवायला' सुरुवात केलेली होती. म्हणजे मूलत: विचारपद्धतीवर टीका करून तीच अंगिकारायची, पण स्वत:चा मात्र बुद्धिवादी म्हणून प्रचार करवून घ्यायचा ह्या प्रवृत्तीचा त्याला कंटाळा येऊ लागला.

हे जवळपास रोजचंच झालं होतं. दोन्ही बाजूंचे परस्परविरोधी विचार सांगणारे दोन वसंत त्याच्या मनात उभे रहायचे, आणि तुटून पडायचे अक्षरश: एकमेकांवर. मुख्य म्हणजे, दररोज हजारो संदेश, व्हिडिओ इत्यादी पाहून वसंताला इतकं कळलं होतं की फक्त भावनांशी खेळण्यामध्ये दोन्ही बाजूंना रस आहे. संघ कायम धर्मभावनेला खतपाणी घालत आला आहे, आणि हे लोक म्हणे लोकांच्या तर्ककुशलतेला खतपाणी घालतात. स्वत:च्या तर्काशी निष्ठा ठेवणं, आपण तर्कशुद्धच राहणं हीही एक मानवी भावनाच नाही का? आणि काय मिळालंय हे तर्कशुद्ध राहून? दिवसभर जरा येता जाता रामनाम घेतलं तर किती तरी कामं इतकी सहज होतात, ती नुसती करताना वेळ खायला उठतो. देव ह्या ह्यासाठीच असावा. 'फिरी पिकावर येणाऱ्या' मनाला एक शीड म्हणून. त्याचा धंदा बराच झाला तो सोडा. धंदा कशात नाही? हे लोक काय धंदा मांडून बसले नाही आहेत? तुकडोजी, विनोबाजींची चरित्र वसंतानं लहानपणी वाचली होती. 'मा फलेषु कदाचन' कर्म करणारे जवळपास ह्या जगात आपणच राहिलो आहोत, आणि आपल्यासारखे गुल्हाने वगैरे नादान लोक असं काहीतरी त्यानं अनुमान काढलं होतं.

गुल्हानेही एकदम कुठे अमेरिकेत गेलेला तो परत आला. कायतरी तिकडचा साहेब बदलला, तो म्हणे सगळ्यांना पळवणार. म्हटल्यावर गुल्हाने निमूटपणे तिकडचा गाशा गुंडाळून आधीच निघून आला. खरंतर एमेशीआयटीच्या शिंदेबाबापेक्षा गुल्हानेनंच वसंताला फेसबुक, इन्स्टाग्राम कसं वापरायचं हे जास्त दाखवलं होतं. त्या MSCIT च्या कोर्समध्ये वसंताला पैकीच्या पैकी मार्क मिळालेले. नंतर मात्र पेपरात येणारं 'सेल्फी, हॅशटॅग, ट्रेंडींग, मीम्ज, ट्वीट्स' आदी शब्द डोक्यावरून जायला लागले तसे त्यानं हे सगळं काये, असं शिंदेला विचारलं, तेव्हा शिंदे म्हणालेला की "हे समदं पोरांना माहिती, मला आयड्या नाय. मी फक्त वॉट्सॅप आनि पिच्चर बगतो." मग गुल्हाने आणि त्याच्या पोरानं एकदा वसंताचा चांगला कोर्सचा घेतला छोटेखानी. सेल्फी कसे काढतात, स्नॅपचॅट काय अस्तं, इन्स्टाग्राम काय अस्तं... वसंताला एकदम जादूची कांडी हातात आल्याचा भास झाला होता. साधारण पाच वर्षांपूर्वी प्रचार कसा होता, आणि आता काय भारी झालाय! घरोघर हिंडण्यापेक्षा ह्या कांबळेच्या पोरांसारख्या पोरांच्या फेस्बुक फीडवर प्रचार केला तर ते नक्कीच पाहतील एरवी घराबाहेरुन भलाथोरला रथ नेला तरी पाहणार नाहीत, एवढं त्याला कळून चुकलं होतं. आताशा वसंतालाही जमू लागलेलं बऱ्यापैकी हे सगळं. कधीकाळपासून केलेली साठवण एकत्र करुन तो 'इंटरनेट असलेला' फोन घ्यायलाही गेला होता. पण पेपरांत चिनी लोकांची आगळीक पाहून तापलेल्या त्याच्या मनानं दुकानदारावर भलतीच आगपाखड केली होती. "पाखंडी! अरे स्वत:ला हिंदू म्हणवण्याची हिंमत होते तरी कशी तुझी इतका चिनी माल विकून?" बिचाऱ्या दुकानदारानं शेवटी कार्बनचा एक फोन त्याला दिला. तोही एका महिन्यात बिघडल्यावर, कर्तव्य महत्त्वाचं, अशी स्वत:च्या मनाची समजूत घालून वसंतानं सॅमसंग घेतला होता. त्यावर असलेल्या 'मेड इन चायना'च्या लेबलवर तो नियमितपणे अबीराचे बोट फिरवी. व्हॉट्सॅपवरचे चिनीमाल रोखण्याचे संदेश वाचून दररोज दुप्पट व्यथित होई.

त्यावर स्वत:चं फेसबुक खातं उघडणं, गावाच्या शाखेचं पेज चालवणं, इन्स्टाग्रामवर कधीकधी स्वयंसेवकांबरोबर कामं करताना सेल्फीज, ध्वजाचे फोटो, एखाददुसरा संस्कृत श्लोक अपलोड करणं वगैरे त्याला जमू लागलं होतं. त्याच माध्यमांवरच्या पोस्ट्स बघून त्याला परत शाखा चालू करायची उर्मी दाटून आली होती. आताशा ह्या माध्यमांवर त्यानं 'तशा' पोस्ट्स पाहिल्या होत्या. पहिले पहिले नुसती कोल्हेकुई म्हणून सोडून दिलेल्या ह्या गोष्टी नंतर मात्र भलत्याच वाढत चालल्या. वसंताचं रक्त बाकी उसळायचं. काहीही असलं, आपलं आधी कित्तीही ठरलेलं असलं तरी जननी जन्मभूमिश्च मात्र स्वर्गादपि गरीयसी. हे असलं ऐकून घेण्यापेक्षा मात्र आपलं धर्मसंघटन वाढवावं. आपलाही आवाज वाढवावा. म्हणजे अक्कल येईल एकेकाला. नेहमी शाखेच्या मैदानासमोरून जाताना वसंताला असं अंगात तेज ओसंडत असल्याची जाणीव व्हायची. ते मैदान, आपला धर्म, आपल्याला कसल्या खाईतून बाहेर काढायचाय हे जाणवत असताना त्याला अगदी जाववायचं नाही. दररोज, नित्यनेमानं हिशेबी वसंत त्याला आवरायचा, पण दुसरा वसंत घरी पोहोचल्यावर प्रचंड बंड करायचा.

मग एक दिवस तो उजाडलाच. दिवसभर जवळच्या दुसऱ्या शाळेतली रखवालदाराची नोकरी करून घरी आला. मोबाईल उघडून त्यानं व्हॉट्सॅप पाहिलं. गुल्हाने आणि बऱ्याच समविचारी लोकांनी एक संदेश पाठवला होता.

लोक कसे मूर्खासारखे बरळतात आपल्या पक्षांबद्दल. आपणही सडेतोड प्रत्युत्तर दिलं पाहिजे. फक्त हे बोटांची वाफ दवडून नाही! सक्रिय... शाखा परत सुरू झालीच पाहिजे! आमच्या दैवतांची चित्रं रेखाटता, बिंधास्त विडंबनं करता, 'त्यांच्या'बद्दल जमतं का काही असलं करायला? एकेकाच्या पाठीवर प्रहार केले पाहिजेत धरून म्हणजे सरळ होतील. हे लोक आणि बाकी त्यांना खतपाणी घालणारे- म्हणे अभिव्यक्तिस्वातंत्र्य. ते पेपर वाचायला जातो तिकडचे अण्णा नाही का म्हणायचे- "काय नाय, ह्यांना चांगला बांबू दिला पाहिजे. तिकडे सौदी वगैरेमध्ये चाल्तं काय अस्लं? आं? तिकडे एक 'नि' काडा 'निधर्मी' मद्ला, तेचायला दगड घालतील टाळक्यात." बरोबरच आहे त्यांचं. आम्ही ऐकून घेतो, ऐकून घेतो म्हणून आवाज करतात हे. परवाच व्हिडीओ आलेला व्हॉट्सॅपवर, की हे लोक कसले पाखंडी आहेत, त्यांचे आपल्या मातृभूमीबद्दल काय विचार आहेत...

अण्णा सेन्सिबल माणूस. फुकट कायतरी फॉरवर्ड करणार नाही. ह्यां लोकांनाच चांऽगलं.... हे विचार नेहमीच, ह्याच क्रमानं मनात येणं त्याला सवयीचं झालं होतं. खरंतर संघापासून विरक्ती घेतल्याला काहीच दिवस झाले होते, पण फेसबुकवरची लोकांची वक्तव्ये पाहून वसंताची तळपायाची आग अगदी टकलापर्यंत जायची. हे लोक आता आपली सद्दी संपल्यानं उगीच गरळ ओकताहेत हे त्याचं मत झालं होतं. पण दुसरा, हिशोबी वसंता मात्र ह्या वसंताला कायम लगाम घालायच्या प्रयत्नात असायचा. बापूरावांच्या वेळचा अनुभव त्याला होताच. परत कांबळेनंही परिस्थितीचं वर्णन एकदा यथार्थ शब्दांत केलंच होतं. पण नवीन नवीन आपण जे युट्यूबवर पाहतो, ते सगळं काय खोटंय? 'ते' लोक सरळ हिंदुस्थानविरोधी घोषणा देतात, स्वत:च्या धर्मासाठी इतकं करतात ते काय उगीच? व्हॉट्सॅपवर तर लोकांनी मोबाईलमधून काढलेलेच व्हिडीओ असतात... ते कसे काय काहीतरी बदलून पाठवलेले असतील? युट्यूबवर एकवेळ हा प्रतिवाद मान्य आहे. ते काही नाही, आपणही आपल्या धर्माची मोट बांधली पाहिजे. गावातल्या युवकांना आपल्या अतिप्राचीन, मूल्याधिष्ठित संस्कृतीची यथार्थ ओळख करून दिली पाहिजे. आणि शाखेहून दुसरं चांगलं माध्यम ह्यात नाही.

वसंताला अजूनही आठवतो तो दिवस.

तो शुभ्र दाढीवाला पहिल्यांदाच दिसलेला. गावाच्या वेशीवरच्या रामाच्या देवळात. सदरा, धोतर, झोळी. दाढी चांगली पोटापर्यंत. वसंत तेव्हा देवळातून निघतच होता. तेव्हा तो त्याला येताना दिसला. त्यांची जेमतेम एक सेकंद नजरानजर झाली. वसंत विसरूनही गेला तो दिवस.
नंतर नंतर वसंता देवळात जेव्हा जायचा तेव्हा त्याला तो नेहमी दिसायचा. काय खायचा, काय प्यायचा माहित नाही. निवांतपणे जपमाळ ओढत बसलेला असायचा. जपही मनातल्या मनात. दररोज पांढरंशुभ्र धोतर आणि पांढराशुभ्र सदरा. वसंताला बरंच वाटलं त्याच्याशी बोलावंसं; पण त्याच्याजवळ गेल्यावर तो अगदीच मुखस्तंभ व्हायचा. देवळाला तसा राजरोस पुजारी वगैरे नसल्यानं देवळाची अगदी वाईट अवस्था होती बाकी. ह्या साधूनं देवळात ठाण मांडलं खरं, पण पहिल्या दिवशी हातात झाडू घेऊन देऊळ लख्ख झाडून काढलं. दुसऱ्या दिवशी रामाची मूर्ती धुवून काढली. सगळं निर्माल्य, देवळाबाजूच्या जागेत खड्डा करून त्यात विसर्जित. त्याच्या डोळ्यांत तेजच इतकं, की कोणीही यायचं नाही विचारायला की बाबा काय करतोएस. वसंताला हे पाहून त्याच्याबद्दल फारच आदर वाटू लागला होता. एक दिवस वसंता बोललाच त्याच्याशी.

साधू काही बोलला नाही. त्यानं वसंताकडे मख्खपणे पाहिलं. त्या नजरेत बेफिकीर, किंवा अलिप्तता अशी नव्हती. किंबहुना सगळंच माहीत असलेल्या माणसाला काहीतरी नवीन असं दाखवावं आणि त्यानं त्या गोष्टीकडे, "ह्यात नवीन काय आहे?" अशा काहीशा नजरेनं पहावं असं काहीसं भासून गेलं. मग तो एकदम म्हणाला -

"ध्यान करतोस ना रोज? इथे, जरा पवित्र ठिकाणी येऊन करत जा! सगळे वसंत पळून जातात की नाही बघ!"

वसंताला धक्काच बसलेला ते ऐकून. ह्याला आपलं नाव कसं माहीत? आपल्या मनानं आपल्या तत्त्वांशी मांडलेला उभा दावाही कसा ह्याला माहीत? खरोखर साक्षात्कारी असावा का हा? वसंतानं त्यादिवशी काढता पाय घेतला खरा तिथून, पण दिवसभर एक तीक्ष्ण आवाज त्याला कशातही लक्ष देऊ देत नव्हता. त्याला प्रचंड उत्सुकता लागलेली होती ह्या साधूबद्दल; आणि त्याला दुसऱ्या दिवशी परत जाऊन त्याला भेटल्याशिवाय बरं वाटणार नव्हतं. मन अस्वस्थ, बेचैन होतं. बंदच झाल्यासारखं वाटत होतं जणू. दुसऱ्या दिवशी वसंता गेलाच परत, देवळात जायच्या बहाण्यानं. साधू होताच तिथे. ध्यान लावून बसलेला. वसंतानं त्याचं ध्यान भंग करायची हिंमत केली नाही.

हळूहळू, कालांतरानं वसंता आणि साधूची मैत्री जमली. साधूनं आपलं नावही सांगितलं नाही, ना आपलं गाव. त्याला ज्ञानेश्वरी, तुकोबाची गाथा, दासबोध मुखोद्गत होते. वसंतानंही हे लहानपणी वाचलं असल्यानं त्यांच्या ह्यावर बऱ्याच गप्पा रंगायच्या. दिक्कालांचं भान विसरून. वसंताला, आयुष्याला एक अर्थ मिळाल्यासारखा वाटू लागला होता. त्याची शाखा घेणं, आणि त्या बैठकांनाही जाणं थांबलं नव्हतंच. त्याचे बरेच भंडावणारे, परस्परविरोधी प्रश्न त्याला कायम अस्वस्थ करत असायचे. साधूशी संध्याकाळी गप्पा व्हायच्या. वसंतला एकाएकी निरर्थक, पोकळ होत जाणाऱ्या दिवसात जरा जीव आल्यासारखा वाटायचा. का कोण जाणे, ह्या साधूशी एक अंतस्थ नातं असल्याचा त्याला नेहमी भास व्हायचा. साधूमुळे देवळालाही जरा कळा आली होती. एरवी देऊळ म्हणजे सगळा आनंदच होता.

वसंताला जुन्या, अगदी ३-४ वर्षांपूर्वीच्या काळात जर हा साधू असता तर काय धमाल आली असती, हा विचार करून नेहमी विषण्ण वाटायचं. अण्णा, गुल्हाने, हळदणकर, बायकांचं भजनी मंडळ, इतरही लोक आपले देवळात दुपारी जमायचे. साधूनं झकास प्रवचन, कीर्तन केलं असतं. गाव कसं जिवंत वाटलं असतं एकदम. पण आजकाल सगळे लोक त्या हातातल्या जादूई डबीत डोकं घालून. ती डबीही हरहुन्नरी म्हणा. पटापट, एकामागून एक रतीब सुरूच आहे मनोरंजनाचा. उघड्यावाघड्या भावनांचा. कल्लोळ. आपल्यालाही तो हवासाच वाटतो म्हणा, घरी कितीही उकडत असलं तरी पडल्या पडल्याच, एकेक गमतीशीर विनोद, देशोदेशींचे फोटो, कसले कसले भन्नाट व्हिडिओ पाहण्यात वेळ कसा जायचा कळायचंच नाही. शाखा घेणं, चटचटत्या उन्हात सायकल चालवत कुठेही जायचं जिवावर यायचं. एक मस्त सुस्ती चढते डोळ्यांवर, पर्यायानं मेंदूवरही. आपला धर्म कसा संकटात आहे, आणि सगळेच बिगरहिंदू हिंदूंमध्ये फूट पाडायला कसे टपले आहेत हे ह्यातूनच तर कळायचं.

पण ह्या 'हिंदूविरोधी' जमातीत तो बराच वावरून आलाही होता. आधी आधी तर त्याला त्यांचे एकेक विचार ऐकून रोमरोम पेटून उठल्यासारखं व्हायचं. त्याला त्यांची साधारण बैठक आठवायची. सगळ्या बायका एकूणएक मानेपर्यंत कापलेल्या केसांत आणि पुरुष, ते दोरीचा चष्मा, किंवा जुन्या फ्रेमचा चष्मा लावून. सगळ्यांच्या कपड्यांचे रंग उदासीन. खादी खादी आणि फक्त खादी. बरं, राहणी अगदी साधीच म्हणावी तर सगळ्यांकडे गाड्या, दुचाक्या आहेतच. वसंता आणि संघाचे बरेच कार्यकर्ते गेली चाळीस वर्षं त्याच त्या 'हर्क्युलीस'वरून फिरताहेत. पोरासोरांना उद्योग नाही म्हणून मारुतीची पालखी जरा काढली की काय म्हणे 'ब्रह्मांडाभोवते वेढे वज्रपुच्छे' करणाऱ्याला पालखीत बसवताय, दिवाळी आली काय प्रदूषण करताय, होळी आली की काय पाण्याची नासाडी करताय, वटसावित्रीमध्ये काय गुलामगिरी चालवल्ये स्त्रियांची इत्यादी आरडाओरडा करायला सगळ्यात पुढे. वसंताला तेही पटायचं. हिंदूंकडे 'त्यांच्या'त चालतं तर आमच्यात का नाही? हे सोडून वाद घालायला काहीच मुद्दा नाही हेही त्याला कळून चुकलं होतं. सकाळी सकाळी शाखेत मनातला 'तो' वसंत हे विचार घेऊन तयार असायचाच. प्रहार चुकायचे. संचलन विसरायला व्हायचं. सगळं सोडून साधूसारखंच देवळात बसावं असं वसंताला जवळपास दररोज वाटायचं. पण, कधी तरी त्या लोकांची बैठक असली, की जुना, तोच वसंत मनात उभा रहायचा. म्हणायचा, की अरे, तर्क तर्क विज्ञान विज्ञान किती दिवस खेळणार? मनाला जो आधार हवा आहे तो देवाहून चांगला शोधणार आहेस का दुसरा? आहे हिंमत? आणि जर हे मान्य असेल तर मग ही तुझ्या तर्काशी विसंगती नाही काय? दररोज दोन्ही वसंत एकमेकांना ओरबाडायचे. चावे घ्यायचे. रात्री थकून सतरंजीवर आडवं झालं, की मोबाईलमधले सगळे मेसेजेस पाहणं हा वसंताचा छंद होता. दररोज अगदी भावुक, पाषाणालाही पाझर फोडतील असे स्वत:चाच अजेंडा रेटणारे कमीत कमी शेदीडशे मेसेजेस असायचे. ते वाचून दोन्ही वसंतांना शस्त्रंच मिळायची जणू त्या लढाईसाठी. मोबाईल बंद केला तरी ते तुटून पडत असायचे एकमेकांवर. ह्या दोन मनांच्या युद्धात वसंत मात्र पार गलितगात्र व्हायचा. अगदी थकून जाऊन त्याचे डोळे कधी मिटायचे हे त्याला कधीच कळायचं नाही. सकाळी उठून मात्र हे विचार नाहीसे व्हायचे. आजच्या दिवसात काहीतरी नवीन करू, सगळ्यांना धडा शिकवू असे आशादायी विचार त्याच्या मनात गर्दी करत. मनातले ते दोन वसंत मात्र थकलेले असायचे. पण जसा तो आंघोळ करून शाखेवर जायला निघे, तसा जुना वसंत परत उभा राही. सगळ्यांना धडा शिकवू, हिंदू असून हिंदूंवर दुगाण्या कशा झाडतात, एकेकाला अक्कल शिकवू असा तो विचार करे. नवा वसंत लगेच त्यांनी गाय मारली म्हणून... भूमिका घेई.

त्यांनी गाय मारली म्हणून...

हं! तो अजून एक वादाचा विषय. राहू दे. सावरकर-सावरकर करणाऱ्या कोणालाच त्यांचे विचार झेपणारे नाहीत. सोयीचे गांधी क्वोट करता येतात तसेच सावरकरही सोयीचेच क्वोट केले जातात. असो. आपण आपली शाखा घ्यावी. बौद्धिक घेणं आपलं काम नाही. बापूरावांनंतर बौद्धिक घेणारं जबाबदार माणूस नाही. सांगितलं पाहिजे, शाखा सुरू झालीये, बौद्धिकासाठी व्यक्ती पाठवा. साधूलाच विचारावं काय? पण साधू आपल्याच दुनियेत. काहीतरी व्यवहार्य विचारायला जावं तर तो दोन अभंग फेकून आपल्याला गप्प करणार हे आपल्याला माहिताहे. तरी वसंतानं मनाचा धडा करून एकदा विचारलंच साधूला. खरं तर वसंताला साधूही बराच हिंदुत्ववादी वाटला होता. अभक्ष्य भक्षण नाही. पण गावात भिक्षा मागायला जायचा तेव्हा जे अक्षरश: काय मिळेल ते खायचा. लोकही तसलं काही त्याला द्यायच्या फंदात पडायचे नाहीत. शुभ्र दाढी वाढवलेला साधू आणि त्याच्या तोंडी अखंड असणारे अभंग ऐकून त्याच्याभोवती एक वलय असल्याचा भास व्हायचा. लोकांना थोडा आदरयुक्त दराराच होता त्याच्याबद्दल. हे प्रश्न तरी ऐकून साधू पेटून उठेल, आणि काहीतरी सडेतोड उत्तर देईल ही वसंताची अपेक्षा होती.

कसचं काय.

"विद्वान आहेस!" उद्गारुन त्यानं शाबासकीच दिली आपल्याला. मन काय भन्नाट गांगरलं होतं... कुठेतरी, छान, मोकळं वाटत होतं. काहीतरी, बरीच वर्षं मनावर ठेवलेलं जू क्षणभर काढून ठेवलंय असं वाटून गेलेलं. पण परिस्थितीची जाणीवही झाली लवकरच. साधूनं वेड्यात काढलं असावं बहुतेक आपल्याला. पण तो इतकंच म्हणाला- "तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुखदु:ख जीव भोग पावे!"
आणि मग गप्पच झाला तो एकदम. साधू हा इसम बापूराव, जोशीसर, कांबळे, शिंदे, अण्णा ह्यांच्यापेक्षा कैकपटीनं जास्त व्यवहारी आणि पुस्तकी ज्ञान बाळगून आहे असं आपल्याला नेहमी वाटायचं. ते का, हे कधी कळलं नाही. मध्यंतरी ते गायप्रकरण उद्भवलेलं तेव्हाही साधू गप्प होता. श्रेष्ठींकडून आदेश आलेले नसले तरीही अण्णा, गुल्हाने, हळदणकर इ. पेटलेले बरेच. काय तरी बघून येतात त्या युट्यूबावर आणि उगीच भडकलेले राहतात सदैव. ते यूट्यूब अजून एक. एकदा तुम्ही ते धर्माधारितच काहीतरी बघायला लागलात की फक्त त्याच धर्तीचे व्हिडीओ दाखवले जातात. हे व्हॉट्सॅपवरचं पब्लिकही तसंच. एकाला साधा विवेकानंदांचा - साध्य आणि साधनेतला उतारा पाठवला तर लगेच दर दिवशी आहे सकाळी सकाळी हनुमान चालिसातलं विज्ञान आणि आपल्या परंपरांतलं विज्ञान. एकदा साधूला हे दाखवलं होतं वसंतानं उत्साहात. त्याचा काही प्रतिसाद नाही. मग एकदा त्याला स्वच्छ प्रश्नच टाकलेला, की तुला काय वाटतं ह्या सगळ्याबद्दल. एरवी तुकोबा, रामदास, ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेबद्दल निर्झरासारखी ओघवणारी त्याची वाणी हे प्रश्न आले की एकदम गप्प व्हायची. का कोण जाणे, सदा प्रसन्न असणारा साधू एकदम गप्प गप्प व्हायचा. एखादा अभंग वगैरे म्हणत राहायचा. वसंत बराच वेळ ते ऐकत बसे, आणि कंटाळा आला की घरी जाई. देवळात तसंही कोणी फिरकायचं नाहीच.

मग आल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका.

एरवी निवडणुका म्हटलं की वसंताच्या अंगात दहा हत्तींचं बळ येई. पण आजकाल त्याला त्यातही रस उरलेला नव्हता. पक्षाकडून कोणी 'क्ष' उभे राहिले होते. वसंताला त्यांचं नाव जाणून घ्यायची गरज भासली नाही. विरुद्ध पक्षाकडून कोणी उभं राहण्याची चिन्हं नव्हती. मात्र जिल्हापरिषदांच्या निवडणुका आल्यावर जोशीसर एकाएकी पहाटे त्याच्याकडे अवतरले.

"काय वसंता, कसा आहेस बाबा?" वसंत ध्यान लावून बसला होता. चुकूनमाकून गुल्हाने, कधी अण्णा इ. वगळता कोणीही त्याच्याकडे फिरकायचं नाही. त्याची तंद्री एकदम भंग पावली. जोशीसर घराच्या उंबरठ्यावरून, डोकावून पाहात होते.

"सर! अहो या, या ना आत." वसंतानं त्यांचं स्वागत केलं. जोशीसर आत आले. वसंताच्या खोलीची अवस्था पाहून त्यांच्या मनात नक्कीच काहीतरी भाव येऊन गेले असणार. वर करकरत घोंघावणारा पंखा काही उन्हाच्या झळांनी होणारी काहिली थांबवू शकत नव्हता. बसायला एक खुर्ची, आणि एक स्टूल. सर खुर्चीवर बसले.

"काय रे वसंता, इतक्या गर्मीत कसं ध्यान लावून बसता येतं तुला? काय रे ही घराची दशा..." वसंताला जे आधीच अवघडल्यासारखं होत होतं त्यात अजून भर पडली. त्यात परत त्यांच्याबरोबरचे पोलिस बाहेरच थांबले होते.

"आहे आपली गरिबाची झोपडी... तुम्ही कसं काय येणं केलंत सर?" वसंतानं चेहेऱ्यावर आत्यंतिक अजिजी आणून म्हटलं.

खरं तर वसंताला माहीत होतं. झेडपीच्या निवडणुका जवळ म्हटल्यावर लोक कसे त्याच्या घरी यायचे, त्याच्या आर्थिक/वैयक्तिक स्थितीबद्दल त्यांना अपार पुळका कसा दाटून यायचा, एकाएकी वसंत त्यांचा 'आपला माणूस', 'वसंतभैया' कसा होई. मात्र निवडणुकांचा प्रचार म्हटल्यावर वसंताला एक निराळाच उत्साह येई. नवीन कार्यकर्त्यांना प्रभाग वाटून देणं, पत्रके छापून घेणं, प्रत्येक प्रभागातल्या 'कळीच्या' माणसांशी बोलणं, त्यांना पटतील, असे मुद्दे काढून उमेदवारांना ते भाषणात अंतर्भूत करायला सांगणं इत्यादी कामं तो फक्त दोन वेळच्या जेवणावर करे. तरीही, इतके दिवस परिस्थितीचे चटके खाल्लेल्या त्याच्या मनाला जोशीसरांकडून अपेक्षा होत्या. पण, वर्षभर न फिरकलेले, जोशीसर घरी येऊन प्रचार करताहेत म्हटल्यावर त्याला सगळं कळून चुकलं.

"तुझ्यासारख्या, अगदी दोन्ही बाजू पारखून एका बाजूकडे राहिलेल्या हाडाच्या कार्यकर्त्याची आज आपल्या चळवळीला गरज आहे. आधी आपले मतभेद होते तरी तुझा निवडणुकांच्या वेळी काम करायचा झपाटा मला चांगलाच ठाऊक आहे वसंता. शिवाय आपल्या तरुण कार्यकर्त्यांसाठी एका अनुभवी कार्यकर्त्याचं मार्गदर्शन हवंच आहे."

वसंताला ह्यापुढचं भाषण पाठ होतं. "हो, हो मी आहेच ना सर," वगैरेची पखरण करत वसंतानं जोशीसरांना रवाना केलं. तिकडे शाखेतलं न बोलणं, अण्णांच्या वाढत्या कानगोष्टी इत्यादी असूनही दुसऱ्या दिवशी गुल्हाने आणि हळदणकर फ्लेक्स घेऊन आले. वसंत स्वत: उत्साहानं शाखा घेतो म्हटल्यावर आपसूकच पक्षाच्या प्रचाराची सगळीच धुरा त्याच्याच खांद्यावर होती. जणू वसंताचा होकार गृहीतच धरला होता प्रचारासाठी. वसंतही काही बोलला नाही. वसंतानं दोघांनाही फ्लेक्स वाटून दिले. देवळाच्या आजूबाजूच्या जागा स्वत: फ्लेक्स लावण्यासाठी ठेवल्या. तितकंच साधूला भेटता यावं म्हणून.

सगळे फ्लेक्स एका झोळीत बांधून वसंता ते देवळाजवळाच्या झाडावर टांगायला निघाला. देवळाकडे येता येता त्याला देवळाच्या भिंती बाहेरचं एक झाड दिसलं. त्यानं त्यावर फ्लेक्स लावायचा निर्णय घेतला. सगळे फ्लेक्स एकाच झोळीत टाकलेले, त्यामुळे लावायच्या फ्लेक्सची गुंडाळी काखोटीला मारून तो झाडावर चढला. उरलेले फ्लेक्स त्यानं झाडाला लागून उभे ठेवले. खिशात सुतळीचे तुकडे ठेवले होतेच. ते झाडाला बांधता बांधता त्याला खाली धप्पकन गुंडाळ्यांचं भेंडोळं पडल्याचा आवाज आला. तिथे झोपलेला एक कुत्रा त्या आवाजानं एकदम दचकून उठला. वसंताचा फ्लेक्स बांधून झाला असल्याने, त्यानंही खाली उडी मारली. त्यानं अधिकच बिचकलेला तो कुत्रा दुप्पट वेगानं पळाला. पळाला, तो त्या देवळातच शिरला. वसंतानं उरलेले फ्लेक्स उचलले आणि तो देवळात शिरला. देवळात कधी नव्हे ते अण्णा आलेले होते. अण्णा जोरजोरात रामरक्षा म्हणत होते. त्यांच्या पायाला त्या कुत्र्यानं दिली धडक. अण्णांची तंद्री भंग पावली आणि त्यांनी क्रोधानं खाली नजर टाकली. चिखलात पाय बुडवून आलेल्या त्या कुत्र्यानं त्यांच्या पांढऱ्या लेंग्यावर आणि देवळाच्या, इतक्या वर्षांनी रंग दिसलेल्या पांढऱ्या फरशीवर नक्षी उमटवली होती. पण त्या कुत्र्याला पकडावं तर कपडे आणि हातपाय अजूनच खराब झाले असते, म्हणून अण्णा फक्त पराकोटीच्या रागानं त्याच्याकडे पाहत राहिले. वसंतानं हे सगळं पाहिलं. नेमका साधू तिथे होता. साधूनं जाऊन त्या कुत्र्याला उचललं. अण्णांचा पारा चढला. ते ओरडले, "अरे, फेक त्या कुत्र्याला! घाल तो दंड त्याच्या पेकाटात! लेंगा खराब केलीन माझा..." साधूनं चुपचाप त्या कुत्र्याला उचललं आणि तो तिथून निघाला. अण्णा ओरडतच होते - "अरे, जरा पावित्र्याची पर्वा तुला? देऊळ चिखलानं बरबटलंन!" वसंतानं ते ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि त्वरित त्या साधूबरोबर कुत्र्याला बाहेर सोडून आला. अण्णा शिव्याशाप उद्गारत बाहेर पडले. साधूला ह्या सगळ्यानं काहीच फरक पडला नाही. त्याच्या धोतराला जरा चिखल लागला होता. पण त्याला त्याची पर्वा नव्हती. त्यानं त्या कुत्र्याला खाली ठेवलं. वसंतानं फ्लेक्स उचलले, आणि निर्विकारपणे चालत घरी गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी वसंत उठला. त्यानं बाहेर जाऊन पाहिलं. गुल्हाने, अण्णा इत्यादी बाहेर जमले होते. गावातले थोडे मोठे लोकही, काही फुटकळ गावकरी. नेमके जोशीसरही नाहीत. वसंताला कळेना काय चाललंय.

"काय झालंं? सगळे इथे कसे आज?" अण्णांनी त्याच्याकडे क्रुद्ध नजरेतून पाहिलं.

"अरे, माझं सोवळं काल नासवलंस आणि परत वर विचारतोएस काय इथे कसे म्हणून? अरे, ह्यानंच सोडलं ते कुत्रं आत! मी हाणणारच होतो, पण हा आला, सगळं देऊळभर नाचवलीन त्याला नि घेऊन गेला बगलेस धरुन!" वसंताला हळूहळू सगळं कळू लागलं. गावकऱ्यांचा रोष एका दिवसात गावातल्या सगळ्यात निरुपद्रवी प्राण्यावर आला होता. अर्थात ते पद्धतशीरपणे भडकावण्याचं काम कालच्या दिवसात अण्णांनी केलं होतं ह्यात शंकाच नव्हती. पण हे सगळं का, हे त्याला उमजत नव्हतं. अण्णांच्या साधारण जास्तच असलेल्या हिंदुत्ववादाला इतकं खतपाणी मिळावं कुठून की त्यांनी वसंताच्या मागे पडावं? वसंताला काहीच समजेना. काल तो सगळा उद्योग तर साधूनं केला होता! आपण फक्त उभे होतो तिथे... तरीही हे सगळे लोक आपल्यावर का खार खाऊन आहेत? जमलेल्या गर्दीच्या क्रुद्ध नजरा त्याला बघवेनात.
"मला काहीच कळत नाही... तो साधू होता ना तिथे अण्णा? त्यानंच-"

"गप ए! काय साधू साधू लावलाय कळत नाही... कोण साधू? काय साधू? तुलाच बाटवायचा होता धर्म म्हणून ही थेरं चाल्लीएत तुझी! आम्हाला काय कळत नाय? त्या जोश्याबरोबर बस्तो आणि आमच्या गप्पा ऐकून त्यांना सांगतो होय रे? बघतो तुला बरोबर... चला रेऽ!" अण्णा तरातर चालते झाले. त्यांच्याबरोबर सगळे बघेही. वसंत सुन्न झाला होता. साधूनं ते का केलं? ह्यात आपण कुठे गोवलो गेलो? त्याला काहीच कळेना. एकाएकी त्याला स्थलकालाचं नवीन भान आल्यासारखं झालं. तो तसाच उठला आणि तडक देवळाकडे निघाला. देवळाकडे जाताना लोक आपल्याकडे पाहून कुजबुजतायत, बोटं दाखवतायत ह्याचं त्याला भान नव्हतं. त्याला, आत्तापर्यंतच्या मनातल्या संग्रामातलं एक शल्य खुपत होतं. त्याचं उत्तर त्याला खुणावून गेलं होतं, आणि आता ते त्याला स्वस्थ बसू देणार नव्हतं.

इतक्यात जोशीसर दिसले. त्यानं एकदम त्यांना गाठलं. "सर, हे लोक बघा ना-"

"मला माहित्ये वसंता. हे करायला हवंच होतं, पण लोक इतक्यात एकदम इतक्या मोठ्या पॅरॅडाईम शिफ्टसाठी तयार नाहीएत. तुझी कंडिशन मला माहितीए. तू ते करणार होतासच, पण इतक्यात, आणि इतक्या कट्टर व्यक्तीबरोबर करशील असं वाटलं नव्हतं. आता गावाचा रोष तू स्वत:वर ओढवून घेतला आहेस, वसंता. मलाही लगेच तुझ्या बाजूनं बोलता येणार नाही, कारण तू केलंस ते सध्याच्या परिस्थितीत अयोग्य होतं. शिवाय आता निवडणुका येताहेत. पहिल्यांदाच गावाला वेगळं नेतृत्व मिळण्याची शक्यता होती, ती तू ह्या कामानं नाहीशी केलीस. पण अण्णा बाकी काही असलं तरी देवभोळे, धर्माभिमानी आहेत. त्यांच्या श्रद्धांवर असा सरळ जाऊन वार करणं सयुक्तिक नव्हतं. तू चुकलास वसंता. आता हे विष पचवून दाखवलंस तर तू खरा आमचा कार्यकर्ता. एरवी ही प्रत्येक लढाई आपली आपणच खेळायची असते! आता तू हे गाव सोडणंच योग्य. तुला निवडणुकीचं तिकीटच हवं असेल तर परत पाच वर्षांनी ये. अशीच काहीतरी, गाव सगळ्यावर एकमत होईल अशी एखादी घटना घडवून आण. मग बघ तुझे मार्ग खुले होतात की नाहीत ते...!"

ह्या परिस्थितीत ज्यांचा आधार मिळावा त्यांचं हे वक्तव्य ऐकून वसंताला एरवी भयानक चीड आली असती. पेटून उठला असता तो. पण त्याला आता एकाएकी सगळं कळल्यासारखं वाटत होतं. त्याला एकाएकी मोकळं वाटू लागलं होतं. छान. मनावरचं मळभ दूर सरल्यासारखं, एक जड मानेवरचं, फारा वर्षांचं जू बाजूला ठेवल्यासारखं.

साधूला पहिल्यांदा तो प्रश्न विचारला तेव्हा ज्या भावनेची एक लाट येऊन गेली होती, तो अख्खा समुद्र समोर होता. भकास असा. निस्तेज. ह्यापासूनच पळायचा इतकी वर्षं आपण प्रयत्न केला. तंद्रीत चालता चालता तो देवळापाशी आला. त्यानं पाहिलं. देवळात कोणीही नव्हतं. कालच्या कुत्र्याचे पाय तसेच उमटलेले होते. साधूनं एरवी ते लख्ख पुसून ठेवलं असतं. पण त्याचा मागमूसही नव्हता. पारावरच्या त्याच्या पथारीपाशी वसंत आला. त्यानं पहिल्यांदाच, त्या वस्तूंना हात लावायचं धारिष्ट्य केलं. एक सतरंजी. आईची आठवण म्हणून आपण आणलेली. एक सदरा आणि लेंगा असलेली झोळी. वसंताचीच. जपमाळ. बाबांची. दासबोध. पहिलं पान - कु. वसंत बिरेवार ह्यास मौजीबंधनानिमित्त - बापूराव आणि संघपरिवार.

शेवटी त्यानं झोळीखाली ठेवलेली ती वस्तू उचलली.

तडा गेलेल्या काचेआडून सावरकर, तीच करारी नजर शून्यात रोखून होते.

आणि वसंताचं मनही एक शून्य झालेलं होतं.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मस्तच.... लांबली आहे बरीच... पण छाने...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

आता वसंताचा एक दिवस शोधून पुन्हा वाचेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

गोष्ट/लेख अतिशय आवडला. संघीय , सावरकरवादी आणि समाजवादी लोकांच्या वर्तणुकीवर आणि धुतलेल्या मेंदुवर नेमकं बोट ठेवलं आहे. तुमच्या निरीक्षणशक्तीची दाद दिली पाहिजे. मुख्य म्हणजे, अरुण साधूंच्या कथेचा पुढचा भाग त्यांनीच लिहिला आहे की काय, अशा तोडीचे लेखन झाले आहे.
अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरूण साधूंच्या तोडीचं लिखाण तुम्हाला वाटतंय ह्यातच भरून पावलो. तुमचंही वाचून बरेच दिवस झाले बाकी...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.