मालिका-बिलिका, सण-बिण

संकल्पना

मालिका-बिलिका, सण-बिण

- मीच ती सोनल

लहानपणी कधी हॉटेलात जाऊन खाण्याचा प्रसंग आला की मेन्यू कार्ड डावीकडून उजवीकडे वाचणं या आवडत्या सामूहिक प्रकारानंतर आई-वडलांचा पहिला डायलाग असायचा, “घरी खातो तेच मागवू नका. ते काय आपण कधीही खाऊ शकतो.” आज मोठं झाल्यावर मला ते बघतात त्या मालिका बघून वाटतं की ते दोघं ते वाक्य विसरलेत. नाहीतर मनोरंजनासाठी जे घरात दिसतंय तेच ते टीव्हीवर का बघत असावेत? मेसबाहेर 'आपल्या घरासारखी चव' ही पाटी वाचून आणि सिरीयलच्या जाहिरातीत 'आपल्या घरातलीच गोष्ट' वाचून समजून जावं, इथे आपल्या घरापेक्षा शेरभर मसाला जास्तच असणारे. वर या मसाल्याला कट-कारस्थानाची फोडणी, रडण्या-भेकण्याचं पाणी आणि सणावाराच्या महाएपिसोडची 'मंद' आच असणारच आहे.

खरंतर परिस्थिती नेहमीच एवढी बिकट नव्हती. आम्ही पोरंटोरं कॉटवर उभं राहून, 'स्टॅच्यू ऑफ लिबर्टी' प्लस 'सब का मालिक एक' टाईप पोज घेऊन गिरकी मारत खाली उडी मारण्यात (आणि धड्कन पडण्यात) खुश होतो. आई-वडील बडकी-छुटकी-बसेसर बघत, तर कधी धोतर घातलेला डिटेक्टीव्ह बघत आनंदात होते. पण हा सुरम्य काळ फार टिकला नाही. कोणे एके दिवशी एका भद्रमहिलेच्या स्वप्नात बहुदा 'माहेरची साडी' आली, आणि ते स्वप्न x१०० करून तिनं सास-बहूंच्या कहाण्या प्रकटवल्या. तेव्हापासून आमच्या घरचे झाले सिरीयल-लव्हर्स (इश्श!) आणि आम्ही सिरीयल-व्हिक्टीम्स.

बॉलीवूडनं जसं प्रत्येक भारतीयाला रोमान्स कसा करायचा ते शिकवलं, तसं या मालिकांनी त्याला (किंवा खरंतर तिला) संसार कसा करावा हे शिकवलं. अजूनही तो भारतीय रोमॅंटिक 'पोज दे' म्हणलं की हात पसरून उंचावतो आणि कंबर एकीकडे झुकवतो… आणि लग्न झालं की तीन पदरी मंगळसूत्र घालायची स्वप्न बघतो. लाईफ इमिटेट्स आर्ट नसून ते करेक्ट उलटं आहे हे सिद्ध करून एका युनिव्हर्सल द्विधेला आपल्यापुरतं चोख उत्तर देतो. मग या दैनंदिन जगण्यातला एक चमचमता भाग असलेले सणवार तरी यातून कसे सुटतील?

झक्क रांगोळी, पक्क मेजवानी, सदैव हळदी कुंकवाला निघाल्यासारख्या असणाऱ्या बायकांचं अजून कैक पटीनं नटणं असे प्रत्येकच सणात टीव्हीदर्शन घडतं. पण हे होळी-दिवाळी सण आता ओल्ड-फॅशन्ड झाले. होळी एकतर बॉलीवुडनं हायजॅक केली आणि दिवाळीचे फटाके दर महिन्याच्या महाएपिसोडला फोडून फुसके झाले. मग मालिका-मार्केटमध्ये नवीन सणाचा स्टॉक येणं क्रमप्राप्त झालं. पाश्चात्य संस्कृतीचा त्याग हे जरी देशी मालिकांचे आद्य कर्तव्य असलं तरी त्यांचे फंडे वापरून देशी संस्कृतीस सुवर्णकाळ आणणं हे त्याहूनही अग्रक्रमाचे कर्तव्य होय. ते स्मरून मग वटसावित्रीचा धावा करण्यात आला आणि तिच्या रूपानं मालिका-निर्माते प्रसन्न झाले.

त्याचं कसंय, मालिकाविश्वाचे काही न सरणारे भोग असतात. मुख्य पात्र त्यागमूर्ती असल्यानं त्याला (किंवा पुन्हा खरंतर तिलाच) रडणं, ओरडा खाणं, कधी कधी मार ही खाणं आणि शेवटी कधीतरी घरचा टी. आर. पी. वाचवायला प्राण अर्पण करणं हे लेखकानं पाचवीच्या एपिसोडलाच पुजलेलंच असते. यथावकाश प्रेक्षकांच्या आक्रोशाला प्रतिसाद देत मग पुनर्जन्म अवतारही होतो. या जन्मा-मरणाच्या फेऱ्याशी इमान राखत मग वटसावित्रीस आवाहन हे साहजिकच म्हटलं पाहिजे.

अशा या व्हॅलेंटाईनला मराठी टशन एपिसोडमध्ये मग सकाळपासून हिरॉईन झोपेतून जागी होणं, तिनं आपलं सौभाग्य निरखून पाहणं, लग्नाच्या वरताण नटून घरातून निघणं, शूटिंगसाठी पकडून आणलेल्या वडापाशी पोचणं हे अगदी बारकाईनं दाखवलं जातं. यात अर्थातच पसाभर जाहिराती आणि खंडीभर फुटकळ दुय्यम पात्रांचे संवाद असल्यानं महाएपिसोडातला एक मोठा भाग संपतो. मग प्रेक्षक अमेरिकेत जन्माला येऊन आजच भारतात आलेले आहेत तेव्हा त्यांना भारतीय लोककथा माहीत नसणार असं अचानक समजून सावित्री-सत्यवानाची गोष्ट दर वर्षी न चुकता, न उतता, न मातता ऐकवली जाते. बदलत्या काळाबरोबर आपण जसे WhatsAppवर गुडमॉर्निंग करायला शिकलो तसंच पर्यावरण जपायला शिकलो हे ठसवायला वडाचं महत्त्व सांगून वृक्षारोपण वगैरे प्रसंग दाखवले जातात. नंतर वर्षभर जितकी कथा गायब असते तितकंच हे झाडदेखील.

सगळे आचार-उपचार, रीतीरिवाज पार पडतात आणि पडद्याअलीकडे ते 'छान' ग्रहण केले जातात. पण संपूर्ण रामायण सांगितल्यावर कधी कधी रामाची सीता कोण हे कळत नाही. तसाच कधी कधी प्रश्न पडतो, की हा सगळा वरचा मेकपतर झाला, पण या सणाच्या मुख्य सावित्रीचं खरं रूप काय? ही सत्यवान पुन्हा जिवंत झाल्याची मेजवानी आहे का दोरा विक्रेत्यांची बरकत? माझ्या भाबड्या मनाला या गोष्टीतून तिची हुशारी दिसते. यमासारखा साक्षात काळ एक्सटर्नल एग्झामिनर म्हणून अवतरलेला असताना, व्हायवाला पटापट चोख उत्तरं देणारी विदाऊट वाय. डी. पास सावित्री दिसते. पण मालिका-महिलावर्गाला असले पेच प्रसंग येत नसतात. त्यांना दिवसभर उपवास करून टवटवीत दिसण्याचं केवळ चॅलेंज असतं आणि त्या त्यातच व्यग्र असतात.

म्हणून मग हा विडा कथाबाह्य मालिकांना उचलावा लागतो. गृहलक्ष्मीला उत्तरांच्या बदल्यात नवरा नाही पण नवीकोरी साडी मिळते. आणि घरोघरीच्या गृहलक्ष्म्यांना मालिकांनी कितीही भुरळ घातलेली असली तरी त्यांना नक्की माहीत असतं… नवरा बदलून हिरो होवो न होवो, साडी नक्कीच मिळवून देऊ शकतो.

जोवर ही सावित्री अशाच तिथल्या तिथे चकरा मारतीये, तोवर हे मालिकाचक्र सुरूच राहणार आहे.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

लेखाच्या विषयात प्रचंड विस्ताराची संधी असता, दोनतीन उदाहरणांत गुंडाळून, एकाच सणाबद्दल सविस्तर लिहून एकाच परिच्छेदात सगळ्या सणांचा लसावि काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने लेख पार पाणचट झालेला आहे. शेवटचं वाक्य अत्यंत आशयघन असताना त्याबद्दल लेखात स्वतंत्र विचार फारसा दिसत नाही. मराठी मालिकांचा व्यासंग वाढवायला हवा! Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.