Skip to main content

मेंदूतला विनोद

संकल्पना

मेंदूतला विनोद

- तिरशिंगराव

लहानपणापासून मला विनोद का आवडत होता, हे सांगणे कठीण आहे. पण साधारण चार-पाच वर्षांचा असल्यापासून मला विनोद कळत होता आणि करताही येत होता, एवढे आठवते. त्यावेळची एक आठवण म्हणजे, घरातले सगळे, एकदा साठवणाच्या डब्याला रंग लावत बसले होते. मी बाजूलाच खेळत होतो आणि अचानक, 'डबे अगदी रंगात आलेत वाटतं', अशी टिप्पणी केली होती. त्यावर सगळेच मनापासून हसले होते.

बहुधा, या स्वभावामुळेच मला पुढे, विनोदी साहित्य, विनोदी नाटके आणि लॉरेल्-हार्डी, चार्ली चॅप्लिन आणि 'टॉम अँड जेरी'चे चित्रपट फार आवडू लागले. कॉलेजच्या दिवसांत तर मी, दादा कोंडक्यांच्या 'विच्छा...'च्या प्रेमातच पडलो होतो. घरी जेव्हा टीव्ही आला तेव्हा कार्यक्रम अगदी मोजकेच असायचे. त्यातील बबन प्रभू आणि याकुब सईदचा जो काही आचरटपणा चालायचा तो कधीच आवडला नाही. पण बऱ्याच हिंदी मालिका मात्र आवडायला लागल्या. 'देख भाई देख', ओम पुरीचे 'कक्काजी कहीं', मोहन गोखलेचे 'मिस्टर योगी', ह्या मालिका आवर्जून बघायचो. 'ये जो है जिंदगी' मधल्या सतीश शहा, स्वरूप संपत आणि शफी इनामदारनेही मजा आणली होती. आता म्हातारपणीसुद्धा, बाथरुमला जाऊन आल्यावर, सतीश शहाचे ते 'व्हाट अ रिलीफ' शब्दशः आठवतं. नंतर पंकज कपूर 'करमचंद' बनून आला आणि 'जबान संभाल के', 'ऑफिस-ऑफिस'च्या द्वारे लक्षात राहिला. मराठीत त्या वेळेस फार काही विनोदी नव्हते. तसे 'गजरा'चे कार्यक्रम व्हायचे, पण ते सगळेच काही चांगले नसायचे. पुलंचे एकपात्री वाचन मात्र चुकवायचो नाही. 'श्वेतांबरा' ही पहिली मराठी मालिका काही विनोदी नव्हती, पण मालिका संपल्यावर शेवटचा भाग म्हणून सर्व कलाकार, दिग्दर्शक यांचा मिळून जो एक 'अहो रुपम्, अहो ध्वनिम्' कार्यक्रम झाला तो खूपच विनोदी होता. वय वाढत गेले तसतसा चोखंदळपणा वाढत गेला.

काही काळानंतर घरात रंगीत संच आला, अनेक बेसुमार वाहिन्या आल्या आणि सगळंच बदलून गेलं. हिंदीमध्ये कपिल शर्मा अवतरला आणि विनोदाची व्याख्याच बदलून गेली. स्त्रीचे रूप घेतलेले, कमीतकमी एक पुरुष पात्र विनोदासाठी आवश्यक ठरले. मोलावर हसणेकरी मागवले गेले. त्या हसणाऱ्या प्रेक्षकांतही आपल्या सातमजली हसण्याने उठून दिसणारा सिद्धू आला. तो इतका हसायचा की आपल्याला विनोद कळतच नाही, असा न्यूनगंड यायला सुरुवात झाली. जाड म्हणजे अगदी गलेलठ्ठ व्यक्तींच्या पोटापाण्याचाही प्रश्न सुटला. भारती सिंग नावाच्या महाजाड मुलीने भलतीच लोकप्रियता मिळवली. तिचे बहुतेक विनोद हे अत्यंत घिसेपिटे असायचे आणि स्वतःच्या जाडेपणावर असायचे.

तिचा फक्त एकच किस्सा मला हसवून गेला होता. तिचा म्हणे, एअर होस्टेसच्या नोकरीचा पहिला दिवस असतो आणि एका प्रवाशाला खोकल्याची सारखी उबळ येत असते. तिची सिनियर तिला औषध द्यायला सांगते. ही औषध देऊन येते. त्यानंतर प्रवासी उबळ दाबून धरत असतो. सिनियर विचारते की तू काय औषध दिलंस? त्यावर ही उत्तरते की त्याला जुलाबाच्या गोळ्या दिल्या. बघ, तो आता खोकायला पण घाबरतोय! तर असले तिचे विनोद!

हिंदीत अशा प्रकारांना उत्तेजन मिळाल्यावर मराठीवाले मागे कसे राहणार? मराठीतल्या प्रत्येक वाहिनीवरही 'फू बाई फू', 'कॉमेडी एक्सप्रेस', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' वगैरे शो चालू झाले. त्यातून एक नवीन विनोदी नट-नट्यांची फौजच जन्माला आली. त्यांना शोभेसे परीक्षकही तयार झाले. ते सगळे शहाणे आणि अतिशहाणे परीक्षक इतके हसायला लागले की सुमार दर्जाच्या नट-नट्यांनाही मोठे स्फुरण चढले. जाडेपणा, अंगविक्षेप आणि एंट्रीलाच नाचत येणे, हे बाय डिफॉल्ट होऊन बसले. या सगळ्यावर मी टीका आणि नाराजी व्यक्त करत होतोच. पण घरोघरी सुजाण, सुशिक्षित आणि उच्च दर्जाचे लेखन एकेकाळी वाचलेले प्रौढ प्रेक्षकही हसू लागले आणि माझा आत्मविश्वास डळमळला. हे सगळेही एवढे बेफाम हसत आहेत त्याअर्थी मलाच वयानुसार विनोद कळेनासा झालाय, असे वाटू लागले. त्याची खात्री करून घेण्यासाठी मी मेंदूच्या यच्चयावत तपासण्या करून घेतल्या. डॉक्टरांनी गंभीर मुद्रेने सांगितले की माझ्या डोक्यातले विनोदग्रहण केंद्र नष्ट झाले आहे. माझा विश्वास बसेना. मी घरी येऊन पुलंच्या सीडी लावल्या. त्या ऐकूनही हसू येईना. पुलंना आऊटडेटेड वा ओव्हररेटेड म्हणण्याचे धैर्य नव्हते माझ्यांत! निष्कर्ष स्पष्ट होता. मीच आऊट झालो होतो. वयाच्या फक्त साठाव्या वर्षी माझी अशी अवस्था झाली होती.

तेवढ्यात एक आशेचा किरण दिसला. माझ्याहूनही वयाने ज्येष्ठ आणि साहित्यिक मित्राने सांगितले की, 'चला हवा येऊ द्या' नावाचा एक उत्तम दर्जाचा कार्यक्रम सुरू झाला आहे, तो पहा. मी हा शो पहायला सुरवात केली. त्यातले कलाकार तर पट्टीचे इरसाल होते. पण माझी, 'खुलता कळी खुलेना, म्यिटले तस्सेचि वोठ', ही अवस्था काही बदलेना. मला तरी, ती 'कपिल' च्या शो ची भ्रष्ट नक्कलच वाटत होती. आता काय करावे? अॅलोपथीचे दरवाजेतर बंद झाले होते.

शेवटी, एका आप्ताच्या सल्ल्याने, एका तज्ज्ञाच्या भेटीस गेलो. हे तज्ज्ञ विज्ञानातले उच्चविद्याविभूषित होते. तरीही विज्ञानातला फोलपणा जाणवला म्हणून की काय, अध्यात्माच्या मार्गाला लागले होते. प्रत्येक गोष्टीला वैज्ञानिक कोंदणात कसे बसवायचे, यात त्यांचा हातखंडा होता. त्यांचा शिष्यपरिवार त्यांना स्वामी म्हणे. शिष्यांच्या मते, स्वामींजवळ प्रत्येक प्रश्नाचे उत्तर होते. येताना त्यांनी मला सर्व मेडिकल रिपोर्ट्सही आणायला सांगितले होते. त्याप्रमाणे, जय्यत तयारीनिशी ठरलेल्या वेळेला गेलो. त्यांनी मला अगदी वेळेवर आत घेतले. त्यांच्या दिवाणखान्यातले वातावरण प्रसन्न होते. स्वतः स्वामी अगदी साध्या पांढऱ्या कपड्यांत होते. कुठेही उदबत्त्या लावलेल्या नव्हत्या. माझ्याबरोबरच्या शिष्याने त्यांच्यासमोर डोके ठेवून नमस्कार केला. मी नुसताच लांबून नमस्कार केला. त्यावर ते हसून म्हणाले," हे आपल्यातले दिसत नाहीत. काही हरकत नाही. काय प्रॉब्लेम आहे तुमचा?" मी, एकीकडे बोलत असताना त्यांनी हात पुढे केला. मी सगळे मेडिकल रिपोर्ट्स त्यांना दिले. माझे सगळे रिपोर्ट्स त्यांनी अगदी मन लावून वाचले. अचानक ते ध्यानस्थ झाले. थोड्या वेळाने त्यांनी डोळे उघडले. ते प्रसन्न हसले आणि म्हणाले,

"अहंकार!"
"कोणाला, मला? पण असे कधी, कोणी मला म्हणाले नाहीये, आत्तापर्यंत."
"इथे दिसतोय ना मला स्पष्ट!", माझा एमआरआय समोर नाचवीत ते म्हणाले.
"एमआरआयमध्ये अहंकार दिसतो?", मी अविश्वासाने विचारले.
"आम्हाला दिसतो. तुमचा अहंकार हाच तुमचा प्रॉब्लेम आहे. अहंकार स्वतःला कधीच दिसत नाही. पण दुसऱ्याला बरोबर दिसतो. मी तुम्हाला काही सोपे प्रश्न विचारतो, त्याचे प्रामाणिक उत्तर द्या. हे विनोदी कार्यक्रम पाहताना मधूनमधून तुम्ही स्वतःशीच, 'हुं:' असा तुच्छतापूर्वक उद्गार काढता नं?"
"हो, काढतो, कारण मला ते अत्यंत फालतू वाटत असते, त्यामुळे ते उत्स्फूर्तपणे तोंडातून येतेच!"
"तेच ते! हाच तुमचा अहंकार आहे. आणि अशाच समविचारी लोकांमध्ये तुम्ही कंपू करून राहात असाल, तर तो आणखीनच वाढीस लागतो. विनोद सामान्य असला तरी काय झालं? कोणीही विनोद केलेला नसतानाही, तुम्ही सकाळी हास्यक्लबात जाऊन सातमजली हसताच नं? तसंच समजून इथेही हसायचं. कारण हसण्यामुळे स्ट्रेस रिलीज होतो."
"अहो, पण पूर्वीच्या थोर लेखकांनी केलेल्या विनोदांनी आमचा स्ट्रेस तर रिलीज व्हायचाच, आणि निखळ आनंदही मिळायचा."
"तुम्हाला विनोदाचं, करुण कथांचे आणि एकुणांत सगळ्याचंच अजीर्ण झाले आहे. आणि त्यातच हा मूळचा अहंकार वाढीस लागलाय."
"मग, यावर उपाय काय?"
"नास्तिकपणा हे अहंकाराचे मूळ आहे. तो सोडून द्या. भगवंताच्या चरणी लीन व्हा. नामस्मरण करा. त्यामुळे तुमच्या मनातली निगेटिव्हिटी कमी होईल आणि पॉझिटिव्ह विचार डोक्यांत येतील. तुम्ही मेंदूवरची पुस्तके वाचलीच असतील ना? त्यांत जे लिहिले आहे की, मेंदूत सतत नव्या जोडण्या होत असतात. जुन्या मोडल्या जातात. नामस्मरणाने हेच होतं. तुमच्या जुन्या जोडण्या नष्ट होतात. त्याजागी, सकारात्मक विचारांनी, नवीन जोडण्या होतात. एका प्रकारे, तुमच्या मेंदूतला सगळा कचरा, अडगळ दूर होते, मन स्वच्छ होते. मनातील सगळे पूर्वग्रह दूर होतात. बघाच तुम्ही. एकदा नामस्मरणाची सवय लागली ना की, हे सगळे जग सुंदर वाटू लागेल. साध्या विनोदालाही खदाखदा हसणाऱ्या लहान मुलासारखे, तुमचे मन निरागस होईल. मी तुम्हाला कसलेही धार्मिक कर्मकांड सांगणार नाही. फक्त नामस्मरण करा आणि महिन्यानंतर या. हसत हसत याल."

त्यांचे शिष्य भारावून गेले होते. इतका वेळ मांडी घालून बसल्यामुळे, माझे मात्र फक्त पाय भारावले होते. जडावलेल्या पायांनी, पण माझ्या अहंकाराला कुरवाळत मी घरी परतलो.

घरी आल्यावर बराच विचार केला. पण अजून हे ठरत नाही की, नामस्मरण करून मेंदू धुवून काढावा की जे चालले आहे, तोच उत्तम विनोद, असे मनाला बजावून, प्रत्येक विनोदाला परीक्षकांपेक्षाही जास्त हसावे?

विशेषांक प्रकार

प्रकाश घाटपांडे Sun, 04/11/2018 - 19:32

हुं:

चिमणराव Sun, 04/11/2018 - 19:46

विनोदी लेख नसून प्रामाणिक कबुली आहे.
हवा येऊ द्या मधली श्रेया बुगडे ही कलाकारांच्या नकला फार छान करते. विशेष सइ ताम्हणकरची.
साबळेचेही राज ठाकरे,बाबा पवार,नागनाथ मंजुळे फार छान होते. बाकी साडी नेसलेले इतर तिघे हे त्या मालिकांतल्या स्त्री कलाकारांना खिजवण्यासाठीच आहेत.

तिरशिंगराव Sun, 04/11/2018 - 22:13

In reply to by चिमणराव

दिवाळी अंकाचे लेख जसजसे येत गेले, तसतसा मी अस्वस्थ होऊ लागलो. आदुबाळ, बॅटमन आणि इतरांचे सुंदर लेख व कथा वाचून, आपण साहित्यिक नाहीच, याची जाणीव झाली. हा लेख विनोदी नाहीच, ही आचरटबाबांची टिपण्णी अगदी माझ्या मनांतलीच आहे. याचबरोबर, दिवसेंदिवस, आपण काळाच्या मागे पडलेले, एक किरकिरे म्हातारबुवा झालो आहोत, या आधीच स्वत:बद्दल काढलेल्या निष्कर्षाला पुष्टीच मिळाली.
सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. पण त्यातही विशेष आवडलेली प्रतिक्रिया, घाटपांडे सरांची आहे. 'हुं:' म्हणून कुठल्याही गोष्टीला, फडतुसांच्या फडताळांत भिरकावून देण्याच्या माझ्या मिजासखोर वृत्तीला दाखवलेला तो आरसा आहे, असे मी मानतो, त्याबद्दल मी त्यांचा शतश: आभारी आहे.

राजेश घासकडवी Sun, 04/11/2018 - 22:36

In reply to by तिरशिंगराव

तुमचा हा प्रतिसाद वाचल्यावर तुमचा अहंकार फुललेला नसून तो कोमेजलेला आहे असंच म्हणावंसं वाटतं. लहानपणी जे विनोदी वाटलं ते आता 'हं, ठीक आहे' असं वाटणं हे वयाबरोबर आपली बुद्धी आणि अपेक्षाही वाढल्याचं लक्षण आहे हे लक्षात ठेवा. मग 'वर्हाड चाललंय लंडनला'मधल्या हरभर्याप्रमाणे तुमचा अहंकारही टरारून वर येईल. 'टवाळा आवडे विनोद' असं समर्थांनी म्हटलं आहे, पण खरं तर 'बालका आवडे (बालिश) विनोद' असं म्हणायला हवं. निरागसत, बाल्य हरवून सिनिक बनणं ही अकारण शोकांतिका मानली जाते. माझ्या मते दुधाचे दात गळून खरे दात येणं चांगलंच.

लेखाला पाच तारे देतो आहे.

'न'वी बाजू Mon, 05/11/2018 - 03:12

In reply to by तिरशिंगराव

दिवसेंदिवस, आपण काळाच्या मागे पडलेले, एक किरकिरे म्हातारबुवा झालो आहोत

ही भावना ('मौत और टट्टी'प्रमाणे) कोणालाही, कोठेही आणि कधीही येऊ शकते. आणि त्यात काहीही गैर नाही.

टाइम्स हॅव चेंज्ड, टाइम्स विल कीप ऑन चेंजिंग; कालप्रवाहपतित होऊन काय वाटेल ते बदल स्वीकारायचे, की 'O tempora o mores' म्हणून 'ठेविले अनन्ते तैसेचि', 'जैसे थे' (अ)स्वस्थ राहायचे (की अधलेमधले कोठलेतरी टोक गाठायचे) हा ज्याचातिचा प्रश्न!

तूर्तास, (१) आपल्या भावनेशी आम्ही सहानुभूत आहोत, आणि (२) To thine own self be true, एवढेच सुचवून आम्ही खाली बसतो. (बाकी दुनिया गेली तेल लावत!)

- (फेलो अकाली वृद्ध) 'न'वी बाजू.

..........

बोले तो, 'अनन्ता'च्या अस्तित्वावर आपला विश्वास असेल, तर. अन्यथा, ही ष्टेप ऑप्शनल आहे.
तूर्तास वय वर्षे ५२.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/11/2018 - 19:58

संपूर्ण लेख म्हणजे तिरशिंगरावांची सही आहे. मालिकांची टिंगल केल्ये का स्वतःची, हे ठरवता येत नाही.

'न'वी बाजू Sun, 04/11/2018 - 20:53

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वतःची टिंगल करण्याच्या मिषाने मालिकांची टिंगल केलीय (किंवा व्हाइसे व्हर्सा) असे काहीसे म्हणता यावे काय?

(प्रतिसादांप्रमाणे लेखांना श्रेणी देण्याची सुविधा नाही; एकाहून अधिक श्रेण्या देण्याची तर नाहीच नाही. तूर्तास लेखास पंचतारांकित केले आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/11/2018 - 22:40

In reply to by 'न'वी बाजू

एकूण सगळंच व्यर्थ आहे, अशा छापाचे विनोद मला आवडतात. मालिका रटाळ, त्या बघणारे लोक काय विचार करत असतील हे समजत नाही, ते समजत नाही म्हणून स्वतःबद्दलच शंका घेणं; आणि या सगळ्यात किरकीर करण्यापेक्षा विनोदी वृत्ती हे सगळं वाचून मला मजा आली.

तक्रार एकच, तिरशिंगराव फार लिहीत नाहीत.

राजन बापट Tue, 06/11/2018 - 03:45

लेख आवडला. आपल्याकडून पाच तारे लागू.

विनोद हे प्रकरण हे इतकं सार्वकालिक आणि वैश्विक आहे की तो आवडणं किंवा विविध प्रमाणात नि स्वरूपात आवडणं हे खाण्यापिण्याइतकं मूलभूत आणि त्यामुळे चित्रविचित्र आणि विविधरंगी शक्यतांनी भरलेलं आहे असं वाटतं.

प्रत्येक व्यक्तीला, ती ती व्यक्ती पौगंडावसस्थेपासून ते तिशीपर्यंत असेपर्यंत अनुभवलेला विनोद अधिक आवडतो असं माझं एक ढोबळ निरीक्षण आहे. आपल्याआधीचा काळ unsophisticated वाटतो, आपल्यानंतरचा काळ उथळ किंवा बटबटीत वाटतो. (इथे "आपल्या आधी/नंतर" मधे हाच उपरोल्लेखित पंधराएक वर्षांचा काळ अभिप्रेत आहे. ) अर्थात हे सरसकट खरं नाहीच. प्रस्तुत लेखातच त्या अपवादांचे दाखले सापडतील.

साहित्य कला आदि अनेक गोष्टींप्रमाणेच विनोदाच्या बाबतही, तो पचायला सोपा, एकंदर मूल्यव्यवस्थेला धक्का न लावणारा असला तर त्याची स्वीकारार्हता वाढते. त्यामुळे ब्लॅक कॉमेडी, सेक्स कॉमेडी, राजकीय व्यंग यांचा अ‍ॅक्सेप्टन्स हा सामाजिक विसंगतींवरच्या विनोदापेक्षा कमी वाटतो. अर्थात हे सर्व आडाखे निसरडे आहेत. अपवादभूत अनेक गोष्टी सापडू शकतील.

तोच मुद्दा भेदक/हिंसक विनोदाचा. राजकीय प्रतिस्पर्ध्यावर केलेलं व्यंग बहुतांशी क्रूर आणि हिंसक ठरू शकतं. अत्रे आणि ठाकरे ही आपल्याकडची दोन चटकन आठवणारी उदाहरणं. हेही शंभर टक्के खरं नाही. अमेरिकेतले लेट नाईट शोज् - जॉन ऑलिव्हर प्रामुख्याने - अतिशय दर्जेदार असा राजकीय विनोद सादर करतात. तीच गोष्ट चाळीसेक वर्षांपूर्वी आलेल्या "यस मिनिस्टर"ची.

मध्यमवर्ग हा विनोदाच्या सामाजिक अभिसरणाचा मुख्य ग्राहक-वाहक-संप्रेरक ठरतो असंही (आणखी) एक ढोबळ विधान करावं वाटतं. कष्टकरी समाजाचा विनोद रासवट, प्रसंगी शिव्यांनी युक्त, लैंगिकतेच्या उघडउघड निर्देशवजा असू शकतो. मध्यमवर्गीयांचा विनोदही त्यांच्या मूल्यव्यवस्थेसारखाच म्हण्टलं तर नेमस्त आणि म्हण्टलं तर नेभळट असा. अतिश्रीमंत वर्गाच्या विनोदाच्या संकल्पनांबद्दल प्रस्तुत प्रतिसादक त्याच्या अनुभूतीच्या अभावामुळे त्रिकाल-अज्ञ आहे. ;-)

अस्वल Tue, 06/11/2018 - 04:17

कबुली आवडली. तिरशिंगराव तुम्ही माँटी पायथन वापरून पहा .. कदाचित आवडतील!

राघा आणि मुसु ह्यांच्या प्रतिसादाला +१

अतिशहाणा Tue, 06/11/2018 - 06:05

आपल्याला तर लेख आवडला ब्वॉ

चिमणराव Wed, 07/11/2018 - 06:17

प्रांजळपणे विनोद आवडत नाहीत किंवा समजत नाहीत अथवा यावर हसायला येत नाही हे सांगणारे थोडेच.
पण आपण दुसऱ्यांना विनोदाच्या तरवारीखाली कापायचे पण त्यांनी आपली टर उडवली की भडकायचे हे काही लोक पाहिले आहेत. त्यात दोन नेतेही आहेत.

१४टॅन Wed, 07/11/2018 - 12:20

एकेकाळी 'असा मी असामी' वाचून मी जितकं हसलेलो तितकं परत काहीही वाचताना हसल्याचं आठवत नाही. काही अपवाद आहेत जे नेमके आत्ता आठवत नाहीत. कॉमेडी नाईट्स, फू बाई फू, हवा येऊ द्या ह्यांतला विनोद अत्यंत सुमार आहे. सर्व व्हॉट्सॅप जोक अतिशय रटाळ असतात. गुड ओल्ड रेसिस्ट, सेक्सिस्ट जोक मात्र बेष्ट होते, आणि त्यांतला विनोद कधी कमी होणं शक्य नाही.
ह्या स्टेजला असताना मला 'रसेल पीटर्स' मिळाला. परत एकदा गडाबडा लोळेपर्यंत हसलो. भारतात इस्ट इंडिया कॉमेडीचा 'अझीम बनाटवाला'ही उत्तम जोक करतो. साधारण सगळे विनोदवीर अंती रास्वसंघ, भाजप, मोदी-मोदीचंच तुणतुणं वाजत बसल्याने अस्सल सप्तरंगी विनोदाची धारच निघून गेलेली आहे, असे नमूद करावेसे वाटते.
माझ्याकडून पंचतारांकन.

भांबड Wed, 07/11/2018 - 13:13

मध्ये तुमचा विनोद चांगला फुलायला लागला होता पण एकदम (ऊजाला मधून) तिमीरात ढकलून दिलेलं आठवलं. तोडलात तुम्ही तिमीराचा न्यूनगंड

उज्ज्वला Wed, 07/11/2018 - 19:01

नव्याने ऐसीवर दाखल होऊन मी ऐसपैस हातपाय पसरले त्यात माझा तडाखा (सकारण !) अनेकांना बसला. अनेकांच्या बाबतीतलं माझं फर्स्ट इंप्रेशन वाईट होतं (उदा. अनंत_यात्री) पण आता सहप्रवासी हळूहळू ओळखीचे होऊ लागलेत.
सध्या तातडीचा उपाय सही पुसली आहे :)

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 07/11/2018 - 20:38

In reply to by उज्ज्वला

तुमच्याकडून असा प्रतिसाद येण्याची अजिबात अपेक्षा नव्हती.

भांबड Sat, 10/11/2018 - 20:20

In reply to by उज्ज्वला

मला काय माहीत तुम्ही मनावर घ्याल. पण मला चला हवा येऊ द्या चे सो काॅल्ड पुचाट विनोद कधीकधी आवडतातच.

उज्ज्वला Wed, 07/11/2018 - 19:10

लेख आवडला.
माझ्या मेदूला 'खास रे' हे 'हवा येऊ द्या' इतकंच अल्पजीवी / उठवळ वाटलं. तुमचं काय मत ?

अमुक Wed, 07/11/2018 - 21:20

तुमच्या लेखांतला प्रांजळपणा नेहमीच फार आवडत आला आहे.
हा लेखही तुमची सेल्फी असावी असा आहे. अजोंनी सेल्फीसाठी प्रांजली हा शब्द सुचवला होता तो इथे चपखल ठरतो!

नि३सोलापुरकर Thu, 15/11/2018 - 15:28

लेख आणि राघांचा प्रतिसाद आवडला.

adam Wed, 28/11/2018 - 16:48

प्रकटन स्वतंत्रपणे वाचलं तर ज्याम आवडलं. पण ....
इतरत्र जे लिहिलेलं दिसतं त्याच्याशी ताडून पाहिलं तर खटकतं.
त्याबद्दल वेगळा धागा काढतोय.

सामो Wed, 28/11/2018 - 21:21

घरी आल्यावर बराच विचार केला. पण अजून हे ठरत नाही की, नामस्मरण करून मेंदू धुवून काढावा की जे चालले आहे, तोच उत्तम विनोद, असे मनाला बजावून, प्रत्येक विनोदाला परीक्षकांपेक्षाही जास्त हसावे?

:)
लेख आवडला. विशेषत: ते नामस्मरण वगैरे.