Skip to main content

चूक की बरोबर

संकल्पना

चूक की बरोबर

मूळ लेखक- रेमों दव्होस (१९२२-२००६)

भाषांतर - उज्ज्वला

रेमों दव्होसबद्दल - जन्म फ्रेंच आई-वडिलांच्या पोटी बेल्जिअममधला. बहुतेक सर्व वास्तव्य फ्रान्समध्येच. त्यांनी सर्कशीत विदूषक होण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. सुरुवातीला विदूषकी, जगलिंग असेच उद्योग केले. पण ते चेंडूंइतकंच शब्दांशीही खेळत. पुढे त्यांनी स्वतंत्रपणे एकपात्री विनोदी प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांना अभिनयाची पारितोषिकं, विनोदासाठीचं मोलिएर पारितोषिक इ. तर मिळालीच, पण त्यांची फ्रेंच भाषा समितीवरही नियुक्ती झाली होती. पुढील उतारा त्यांच्या विनोदबुद्धीची आणि शब्दप्रभुत्त्वाची साक्ष देतो.

---

कोण बरोबर कोण चूक कधीच सांगता येत नाही.
कठीण असतं ठरवणं.
मी बराच काळ सगळ्यांचंच बरोबर मानत आलो.
मग एक दिवस मला जाणवलं की मी ज्यांचं बरोबर मानत होतो त्यातल्या बऱ्याच जणांचं चूक होतं!
म्हणजे मी बरोबर होतो!
म्हणजेच माझं चूक होतं!
ज्यांना आपलं बरोबर वाटायचं त्यांचं चूक होतं, आणि मला त्यांचं बरोबर वाटायचं - तर माझं चूक होतं!
म्हणजे असं की, माझं चुकीचं नसताना आपलं चुकीचं असूनही ते बरोबरच आहे असं जे भासवत होते, त्यांचं मी बरोबर मानणं हे चूकच होतं.
बरोबर आहे ना माझं ? कारण त्यांचं चूक होतं!
आणि ते ही निष्कारण!
हे मात्र मला म्हटलंच पाहिजे कारण
कधी कधी माझीही चूक असतेच.
पण जेव्हा माझं चुकतं तेव्हा त्याला कारण असतं, ते मी सांगत नाही.
कारण मग माझी चूक कबूल करणंच होईल ना ते!!!
बरोबर आहे ना माझं?
बघा ना, ज्यांचं बरोबर असतं त्यांना कधी कधी मी बरोबर असंही म्हणतोच.
पण ते सुद्धा चुकीचंच बरं का.
कारण हे म्हणजे ज्यांचं चूक त्यांचं चूक असं म्हणण्यासारखंच आहे.
काही खरं नाही!
थोडक्यात, आपलं चूक असण्याचं काही कारणच नाही असं ज्यांना वाटतं त्यांना बरोबर काय ते सांगायला जाणं हे चूकच आहे !

मूळ ध्वनी आणि गती कळण्यासाठी हा व्हिडिओ :

विशेषांक प्रकार

१४टॅन Tue, 27/11/2018 - 19:41

अतिउच्चभ्रू टॉटोलॉजी-कॉन्ट्रॅडिक्शन-कन्जन्क्टिव्ह सिलोजिझ्म आहे ते पाऽर डोक्यावरून गेलंय. पार. बाऊन्सर.

उज्ज्वला Wed, 28/11/2018 - 10:22

गुन्हा दखलपात्र ठरवल्याबद्दल आभार

अस्वल Wed, 28/11/2018 - 11:18

टायमिंग जर्रा क्वचित कळलं पण बाकी फ्रेंच न समजत असल्याने बोंब आहे :(

थोडक्यात, आपलं चूक असण्याचं काही कारणच नाही असं ज्यांना वाटतं त्यांना बरोबर काय ते सांगायला जाणं हे चूकच आहे !

हे मात्र पर्फेक्ट.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 28/11/2018 - 18:43

मी हे पुन्हा पुन्हा वाचते. मज्जा येते. पण प्रत्येक वेळेस किंचित हसण्यापलीकडे काय प्रतिक्रिया द्यावी, ते समजत नाही.

सामो Wed, 28/11/2018 - 20:57

बघा ना, ज्यांचं बरोबर असतं त्यांना कधी कधी मी बरोबर असंही म्हणतोच.
पण ते सुद्धा चुकीचंच बरं का.
कारण हे म्हणजे ज्यांचं चूक त्यांचं चूक असं म्हणण्यासारखंच आहे.
काही खरं नाही!

हे कळले नाही. बाकी गोलमगोल सर्व कळले.

उज्ज्वला Wed, 28/11/2018 - 23:18

रेमों दव्होस यांच्या युक्तिवादाचे स्वरूप साधारण असे आहे.
(१) ज्यांचं चूक त्यांचं बरोबर मानणे
(२) ते लोक चुकीची भूमिका घेताहेत हे कळणे
(३) त्यावरून आपलं बरोबर आहे हे समजणे
(४) म्हणजेच (१) ही स्थिती चुकीची होती हे समजणे
(५) ती कशी ते पुन्हा एकदा (२) व (३) मांडून सांगणे
इथवर एक कसरत पूर्ण होते.
(६) बरोबर आहे ना माझं ? कारण त्यांचं चूक होतं !
ही मल्लीनाथी तितकी पोचत नाही कारण फ्रेंचमध्ये एका ‘कारण’साठी तीन शब्द आहेत. इथे वापरलेला puisque हा शब्द जेव्हा श्रोत्याला कारण ज्ञात असतं तेव्हा वापरतात. (इंग्रजीतील since हा बराचसा तसा आहे : since Diwali is over life is back to routine)
(७) (त्यांचं चूक होतं !) आणि ते ही निष्कारण ! हे मात्र मला म्हटलंच पाहिजे कारण
कधी कधी माझीही चूक असतेच.
“माझंच बरोबर असतं” या साक्षात्काराविपरीत आपल्याकडूनही चूक होते ही जाणीव व्यक्त करणे आणि इतर करतात त्या चुका निष्कारण असतात हे तर्कट धकवणे. यातही एक शब्दाचा खेळ आहे – avoir raison म्हणजे बरोबर असणे आणि raison म्हणजे कारण किंवा कारणमीमांसा reasoning (sans raison !) निष्कारण, किंवा अतार्किक (सयुक्तिक नाही असे)
त्याच वेळी पुढची पुस्ती जोडणे
(८) पण जेव्हा माझं चुकतं तेव्हा त्याला कारण असतं, ते मी सांगत नाही.
कारण मग माझी चूक कबूल करणंच होईल ना ते !!!
असे समर्थन करणे व त्याला
(९) बरोबर आहे ना माझं?
असा दुजोरा मागणे
या नंतर येते त्याला अजून एक क्रमपरिवर्तन ऊर्फ शाब्दिक कसरतच म्हटले पाहिजे @शुचि
(१०) बघा ना, ज्यांचं बरोबर असतं त्यांना कधी कधी मी बरोबर असंही म्हणतोच.
(११) पण ते सुद्धा चुकीचंच बरं का.
(१२) कारण हे म्हणजे ज्यांचं चूक त्यांचं चूक असं म्हणण्यासारखंच आहे.
चुकीचे बरोबर आहे असे म्हणणे हे चूक असले तरी मी नेहमी तसे करत नाही, योग्य ते योग्य असेही म्हणतो (१०) मात्र असली द्विरुक्ती होणे चुकीचे आहे (११) कसे तर (१२).
यापुढील il n’y a pas de raison (शब्दशः there is no reason म्हणजेच it is absurd या अर्थाने घेतले तर
(१३) काही खरं नाही !
असे मराठीकरण [‘बरोबर’ला समांतर पण तत्त्वज्ञानाच्या परिभाषेला जवळचा शब्द (खरे-खोटे --- सत्य-असत्य)] एकंदर वेळोवेळी भूमिका घेताना होणारी पंचाईत अधोरेखित करते.
शेवटच्या वाक्यातले सार हे कदाचित त्यांना सुचलेला मूळ विचार असेल (आधी कळस) आणि त्यासाठी बाकी शब्दांचा इमला !
---
१. बाउन्सर गेला म्हणणं ही फिरकीही असू शकते, पण तरी.
२. ''म्हणजे असं की, माझं चुकीचं नसताना आपलं चुकीचं असूनही ते बरोबरच आहे असं जे भासवत होते, त्यांचं मी बरोबर मानणं हे चूकच होतं.'' हे सफाईदार वाक्य रा. जंतू यांनी सुचवले. इतरही बारीकसारीक. त्यांचे आभार.

सामो Wed, 28/11/2018 - 23:23

In reply to by उज्ज्वला

बघा ना, ज्यांचं बरोबर असतं त्यांना कधी कधी मी बरोबर असंही म्हणतोच.
पण ते सुद्धा चुकीचंच बरं का.
कारण हे म्हणजे ज्यांचं चूक त्यांचं चूक असं म्हणण्यासारखंच आहे.
काही खरं नाही!

हां कळलं मला. बरोबर वाल्यांना बरोबर आहे असा निर्वाळा दिला की अपरोक्ष (इन्डायरेक्ट्ली) चूक करणाऱ्याला तो चुकला असे सांगणेच होते.