भ्ऊलोक-गुड्डूभ्ऊ

।।गुड्डूभऊ।।

( या चित्रणातील गुड्डूभाऊ हे पात्र वास्तविक आहे तरी कोणत्याही काल्पनिक वा स्वप्नील पात्रास पोटदुखी झाल्यास मले 'म्याट' करू नका रे बा! तथापि अनामिकता टिकवून ठेवण्यासाठी मी काही व्यक्ती आणि ठिकाणांची नावे बदलवली आहेत. )

जेव्हा तो डेरीजवळ आहे अशी खबर लागली, तेव्हा मैदानात बेंचवर बसलेली पोरं भामट्यासारखी सैरा-वैरा पळत सुटली. पळता पळता टकल्याची स्लीपरही निसटली... ती स्लीपर तो हातातच घेऊन जोडता जोडता पळत होता...

या व्यक्तीचे वर्णन करताना फक्त डोळे नाही पण कानही उघडावे लागतील.
सुरुवातीला कुठूनतरी रिकाम्या कॅटल्यांचा कडकड-खडखड, कडकड-खडखड असा आवाज येत असे.
(उकडा देऊन झाला की भाऊ कॅटल्या वाजवत पूर्ण कॉलोनीभर आम्हाला शोधत फिरे.)
कोणीकोणीतर तेव्हडा कॅटल्यांचा आवाज एकूनच वजा होई.
नंतर कोणत्यातरी दिशेने एकदम कडक आवाज....."अन काय म्हनते?"
हे ऐकताच झाडाची सुकून पडलेली पानेही राप्पकन पुन्हा फांद्यांवर जाऊन बसत, चरत्या म्हशी फटाफट गोठ्यात जमा होई, अन ज्याच्याही खांद्यावर हा "अन काय म्हनते?" चा हात पडला त्याच्या पांढऱ्या डोळ्यातून त्याले तासभर तरी फक्त अंधार दिसे.

गुड्डूभाऊचा साक्षात्कार !!??

लक्कूचे स्वगत : "श्वास आत घेत ...हम्म्म्म अन आता?!"
टकल्याचे स्वगत : "चला फाटदिशी पया इथून".
मंगेश अन गोलाचे स्वगत : "घरचे आजकाल काही कामचं देत नाही यार मले.नेहमी खोट कारण बनवून सटकावं लागते इथून."
माट्याचे स्वगत : "चला घरी जाऊन झोपावं, संध्याकाळचे पावणे सहा झाले आहेत. आजकाल आपल्याला तर पावणे सहालाच झोप येते बुवा."
माझं स्वगत : "पयते आता सारे, मलेच झेलनं आहे..आलीया भोगासी .....पुढचं काय होत?.. असो.."
दात्याचे स्वगत : "उधारी तर देत नाही तुयी तू कितीही म्याट कर."
गिरीशचे स्वगत : "तारकरच्या लाईनीत ह्यो सुंदर पोरगी आली आहे. चला चक्कर मारून येऊ. इथे कुठे म्याट होत बसता...पयाss"
मजनू-लैलाचे स्वगत : "हात तिच्या खटाखट..बसते आजही होतकाडात..पया"
ईशानचे स्वगत : "यवसायमाला आनालें जायच होत..चला.."

मग कोणीतरी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो: "नमस्कार गुड्डूभाऊ, काय म्हणता?"(स्वगत : "काई म्हणू नका बावा आजतरी")

गुड्डूभाऊ म्हणजे धडधाकट बांधा, शुभ्र वर्ण, तिक्ष्ण डोळे आणि अणुकुचीदार नाक, तरी असेन सहा सव्वासहा फूट उंची, घरचे उच्च
मध्यम वर्गीय तरी राहणी अगदी साधी. निळं शर्ट इन न केलेल पण स्वच्छ धुतलेलं. जसं शर्ट स्वच्छ तशीच कॉलरही राखली. राखडी साधी पॅन्ट, चामड्याच्या चपला, दाढी कधी ठेवत होता, कधी सपाट, पण कॅटल्या अगदी साफ ठेवत होता. बोलचाल अगदी गंभीर. एखाद्या चांगल्या जोकवर हसलाही तरी दिड पावणेदोन पेक्षा जास्त दात दाखवत नव्हता.
पण एखाद्या वेळी त्याच्या आवडत्या राजनैतिक विषयावर विनोद झाला की झालं काम, हसताना तर त्याची पडजिभही दिसत होती.
गुड्डूभाऊ आणि माझी ओळख माझ्या वयाच्या ६-७ वर्षांपासूनची. भाऊंची आजी आणि माझी आजी एकदम घट्ट मैत्रिणी तसेच मग आम्हीही स्नेही झालो. माझा अनुभव आहे की बालवयात आणि म्हातारपणात झालेल्या मैत्र्या घट्टच राहतात कारण त्यांची सुरुवात निस्वार्थ मनाने झाली असते...आवरतो

पूर्ण परिस्थितीची गंभीर दखल घेऊन झाल्यावर गुड्डूभाऊ आपल्या डोक्यातला रोम स्टोअरड डिफॉल्ट प्रोग्रॅम रन करत होता तो खालीलप्रमाणे..

if(बैठकीत पोचलो)
{
if (मजनू-लैला बैठकीत हजर)
{
executeFunction(कानाखाली देणे, २,मजनू-लैलाच्या )
// सायलेंट एक्सिक्युशन विथ लो इनपुट अँड हाय आउटपुट नॉईस//

टाल्कलॉउड("निंग भोस्स्स.., मजनू-लैलास उद्देशून );
if(दात्या बैठकीत हजर)
{
while (बाचाबाचीला ५ मिनिट होईपर्यंत)
{
Execute (उधारी वापस मागणे , ५मिनीट, दात्या);
}
टाल्कलॉउड("तू काई देत नाही माये पैशे !", दात्याला उद्देशून );
}

//मेन प्रोग्रॅम
टाल्कलाउड("काम हुन नाही रायलं यार आपल्या वार्डात/इलाक्यात/जिल्ह्यात/शहरात/विदर्भात/राज्यात/देशात/जगात/ब्रम्हांडात आजकाल!", सगळ्यांना उद्देशून);

/*आता हा सापळा होता. जो कोणी यावर उत्तर देणार होता तो आज 'म्याट' होणार होता, कोणीही उत्तर नाही दिले तर मी तर डिफाल्ट होतोच.*/

scanAnsweree (ABC );

if (ABC == NULL )
आजचे टार्गेट=असीम;
else
आजचे टार्गेट = ABC ;
//टार्गेट लॉक्ड

while (टार्गेटची बॅटरी पूर्ण डाउन होईपर्यंत. || बॅटरी नेगेटिव्ह होईपर्यंत)
{
Execute (म्याट करणे, आजचे टार्गेट);
}
return (घरी);
}
else
return (घरी);

आता मजनू-लैलाच्याच कानाखाली काउन?मजनू-लैला म्हटल्यावर सुंदर देखणी, आठवी नववीची स्वच्छ गणवेश घालून B .S .A सायकलवर शाळेत जाणारी, जिच्या मागे बारा शाळेची मुले लागली असतील अशी मुलगी नजरेसमोर येत असेल तर तसं काहीही नाही.
मजनू-लैला हा ऐक नाक बुझलेलं आणि दुसरं वाहत वाहत शर्टवर थेम्ब पडणार त्याआधीच फरकनं ते शेंबूड ओढून त्याचा घोट घेणारा वर्ग ९ इ मध्ये बेलपुरा शाळेत शिकणारा अवकाली पोट्टा.
सकाळी शाळेत जाताना २५ पैश्याच चिंगम चावत-चावत जात असे. वर्गात गेल्यावर पहिल्याच पिरेडला सर मारतील म्हणून आधीच ते चिंगम तोंडातून काढून बॅगच्या आतल्या भागाला चिटकवत होता. शाळा सुटली कि मग तेच चिंगम ओढून पुन्हा घरापर्यंत चावत होता. आता मला कसं माहित? तर एकदा त्याच्या सांगण्यावरून मी पण तसं करून पाहिलं होत. पण शाळा सुटल्यावर तो काढायचा विसरलो. घरी येपर्यंत ते चिंगम इतिहासाच्या पुस्तकात जाऊन लागलं होत आणि मला सरोजिनी देवी, खुदिराम बोस या धड्यांची तीन पाने फाडावी लागली होती...आईनी शर्टच्या गुंड्या तुटेस्तोर ओढूओढू धूतलं ते वेगळं..असो..तर असा होता मजनू-लैला
ऐकदा तर मजनू-लैलाला गुड्डूभाऊंनी देशपांड्यांच्या घरातून नाकडेंच्या घरासमोर पहिले(मध्ये लांब सर्व्हिस गल्ली होती जिथे डुकरांची अद्वैतसंमेलने भरली असायची ), अनावर झालं की काय, गुड्डूभाऊ तर सरळ गल्लीतुनच पळत सुटला आणि त्या नांगरतोंड्याला नाकडेंच्या घरासमोर पकडून बदडले.
मजनू-लैलाची खाज काही कमी विवश नव्हती. तो राहत होता मशानाच्या मागच्या भागात जो गावाबाहेर पश्चिमेकडे येतो. मोजकी साडेनऊ घरे ( साडेनऊ यासाठी की राजुभाऊ खवारतोंडयाचं अर्ध घर अतिक्रमणात आल्याने महानगर पालिकेने उडवले होते ) दिसतील तिकडे मग तो पण काय करणार होता?
मग येऊन बसत होता धांदल्या करायला .

कायले मारता त्याले रोज गुड्डूभाऊ?
भाऊ: "नई त्याले तर सांगितलंच आहे का कॉलनीत जिथं दिसला तिथं मार खाशील.
बरं मी काय म्हणतो, कल्चरल गोष्टींमध्ये आपला वॉर्ड थोडा माग पडून राहिला राजेहो."
काई म्हणता गुड्डूभाऊ!
आपले गणेशोत्सव, शारदोउत्सव तर प्रसिद्ध आहे अमरावतीत.
भाऊ: " नाही म्हटलं तरी शारदोउत्सवासारखी मजा गणेशोत्सवात कुठे आहे?
तेव्हा समजा कितीही म्हटलं समजा तरी कार्यक्रम ओरिजनल राहत होते.
शास्त्रात तर तेच आहे ना कि जिथेही महिला पुढे असेल तिथे कार्यसिद्धी होतेच समजा
आता काय राहीलं ?
गणेशोत्सवात मार वर्गणी घेतो अन कार्यक्रम बाहेरून बोलावतो.
कॉलनीतल्या प्रतिभेला जास्त वाव नाही."
दात्या: "नाही हो गुड्डूभाऊ अर्धेतरी कार्यक्रम तर आपले राहते आणि बाहेरून लोक पाहायला येतात"
भाऊ: आता समजल तुले का अर्धे कार्यक्रम फ्लॉप काऊन होते म्हणून ..अन हाहाहा
मी: हे असे नाही किंवा असेनही कदाचित मग आता काय करावं? मी तर कॉलेज मध्ये आहे.
हे कल्चरल म्यानीपुलेशन थांबवावं लागते आपल्याला. कॉलोनीतले पोर एकत्र राहिलेच पाहिजे
पोंगा: "चला येतो मी, थोडा अभ्यास करावयाचा आहे कारण उद्या माझी परीक्षा आहे (बारा महिने नाकातून बोले हा )
भाऊ: हिवाळ्यात कायची परीक्षा बे?
पोंगा: अरे तस नाही गुड्डूभाऊ. मी प्रश्नसंच आणला आहे ना म्हणून सरळ फायनल ची प्रश्नपत्रिका सोडवणं सुरु आहे, त्यात व्यत्यय नको ना म्हणून निघतो" पोंगा निघाला.
गिरीश: हं काय म्हणत होतो मी ....हे कल्चरल म्यानीपुलेशन म्हणजे हो गुड्डूभाऊ?
भाऊ: गिरीश कडे पाहत (परीक्षा सुरु होण्यापूर्वीच ज्या प्रश्नाचा अभ्यास केला तो प्रश्नपत्रिकेत पहिलाच दिसल्यावरचे भाव)
"म्हणजे कस असते समजा, आपली कॉलनी तशी चांगलीच आहे..पोट्टे मस्त्या करतात पण ते तर करणारच आहे पण आजपर्यंत कधी पोलीस आले नाही ना कॉलनीत.
त्या मजनू-लैलानं कायले चुगले काम करावं?...छोट्या मोठ्या भांडणात रक्त निंगतच रायते समजा, त्यानं त्याच्या पोलीस मामाले फोन केला अन काऊन ? त मजा पाहाले.... एकतर कॉलनीचा नई तो मग सवालच नाई येत तेव्हापासून त्याले सांगितलंच आहे का कॉलनीत दिसला तर कानाखाली खाशील पण रक्त निगू देणार नई....हाहाहा सांग मंग मामाले सांग का काकाले: अन हाहाहा..मंग आपलं तर माहितच आहे कॉलनीला का मानूस अष्टपैलू आहे म्हणून." अन हाहाहा
मी: ह्म्म्म बरोबर आहे
भाऊ: "तर आपल्याला हे थांबवायचं आहे. यासाठी पाहिजे युनिटी.
आता पायनं तूच, बाहेरचे पोट्टे आपल्या कॉलनीत येते समजा, त्याले नकार नई
पण त्याईनं कोणाला बिघडवायचा किंवा शांतिभंग करण्याचा प्रयत्न केला तर खराब काम आय आपल.
आता कसं करनार मंग तुमी ?
तिकडून दात्या गिरिशला जोरात आवाज देतो
"अरे ओ गिरीश, तुले आई बलावून रायली "
गिरीश निरोप ना घेता घराकडं हात दाखवत "हो आलो" म्हणून निघू लागतो.
गुड्डूभाऊ ला थोडं अपमानास्पद वाटते. त्याची भरपाई म्हणून तो लगेच ईशानकडे वळून आपल बोलणं सुरु ठेवतो. (बहुतेक असे होत नाही कारण सगळ्यांना माहित आहे का गुड्डूभाऊ खट आहे म्हून. एखाद्याचा डास घेतला तर खराब काम आहे.)
भाऊ: "ते काय आहे ईशान , प्रत्येक गोष्टीसाठी पोलिटिकल प्रोसिजर असते आणि त्यानुसार चालावं लागते"
मी: कल्चरल कामासाठी पोलिटिकल प्रोसिजर ?
भाऊ: "तेच सांगून राहिलो मी, तू आइक तर सही. सगळ्यात पहिले आले ते समाज कार्यकर्ते, कार्यकर्ते असे पायजे का त्यांच्यात एकी पायजे , संघटन पायजे.
कागदावरचे संघटन तर कित्येक बनून फाटले, विचारच संघटन पाहिजे. खूप लचांड नई पाहिजे.
निवडक लोक समजा जे निस्वार्थी आणि सेवाभावी असनं असेच आणि त्यांचा नेता पाहिजे. नेता असा समजा का सेवाभाव असणारा, म्हणजे अष्टपैलूच समजा."
मी मनात म्हटले ..म्हणूनच स्वतःसाठी अष्टपैलू शब्द वापरला यानं
"मलाच करावं असा माझं म्हणणं नाही ". इथे माझा गैरसमज गैर झाला.
भाऊ: "सगळ्यांना घेऊन चालणारा पण कसा का टाईम टेस्टेड पाहिजे, दुष्काळात सगळ्यांची तहान भागवून पाण्याचा घोट शेवटून घेणारा,
अनुभवी लोकाईचं ऐकनारा..विद्यार्थीच समजा एक प्रकारचा. स्वतःले पंडित न समजनारा
काय आहे आजकाल लोकांना पंडित म्हटलं तर ते स्वतःला पंडितच समजतात आणि मग परिस्थितीतून शिकण्याचे प्रयत्न बंद करतात".
मी: पण निवडणूक असते ना चांगले लोक काढायला.
भाऊ: "निवडणूक असावी पण सेवेची कसोटी, मतांची नाई. चार सहा महिन्यात दूध-पानी वेगळ होते मग अशेच उमेदवार उभे करा रिंगनात. शिवाजी महाराज असो का गुरु गोविंदसिंग, सगळ्याईनं आपले मानसं अशेच निवडले"
ईशान: "अरे पण गुड्डूभाऊ, मी तर सहावीतच आहे हो. मले नाई समजत येवड!"
भाऊ: " अरे हो, जा मग तू घरी हं".
ईशान :"अरे नई मी यवसायमाला आनाले चाल्लो , येतो मी"
भाऊ: आबे बोलताना उच्चार तर बरोबर करत जा कमीत कमी व्यवसायमाला म्हन.
ईशान: " व्य-व -सा -य -मा -ला म्हणत ईशान हसत-हसत सटकला. आता उरलो मी, गोला आणि मंगेश म्हणजे मोर्चा मलाच सांभाळणं होतं.
मी: "बरोबर आहे गुड्डूभाऊ, पण कल्चरल कामासाठी पोलिटिकल प्रोसिजर?
भाऊ: "तुले आवडो का नावडो, राजनीती प्रत्येकात पायजेच. हं फक्त त्याचा दुरुपयोग होऊ नये पण आपला गाठोडं शाबूत ठेवण्यासाठी कमीत कमी पुडिभर राजनीती खिशात येताजाता पायजेच.
मी: "पण मले राजनीती नाई आवडत गुड्डूभाऊ".
भाऊ: "राजनीती नावाडायला तो काई विषय आहे इतिहास भूगोलसारखा?
"कुठे भेटते ही राजनीतीची पुडी गुड्डूभाऊ. पावभार विकत घेतो न मी....गुंड किराणामध्ये भेटते का? असा म्हणत मंगेश उभा झाला.
भाऊ: "हसत तं मार खातं!"..(भाऊले फालतू मजाक आवडत नाही.)
झोप आल्यासारखे डोळे चोळत गुड्डूभाऊला विनवत" गुड्डूभाऊ मले काहीच नई समजून रेलं मी घरी जाऊ काय?" म्हणत मंगेश निघाला.
मी: वाईट नका वाटून घेऊ गुड्डूभाऊ मॅच होती आज दुपारी बाबा-११ सोबत म्हणून थकला आहे तो.
भाऊ: "आपल्या पोट्ट्यायीच कुठे रेबा वाईट वाटून घेतं?. कॉलनीतले पोट्टे सगळे सारखेच आहे आपल्याले आज न उद्या त्याले समजनं आहेच सगळं. ..हं तर कुठे होतो आपण?
मी ऐक दीर्घ श्वास सोडत प्रार्थमिक शाळेत १०० च्या जागी ९८ उठाबशा काढल्याने शिक्षा म्हणून पुन्हा १०० उठाबशा काढण्याचा फर्मान भेटल्यावरचे भाव.
मी: "शाळेत"
भाऊ: "आss?"
मी: "अरे आपण कल्चरल म्यानीपुलेशन वर बोलत होतो".
भाऊ:"हम्म तर नवीन सुरुवात म्हणून माझा असा विचार आहे की सर्व कार्यक्रम स्वतःच घेऊ आपण यावेळी. बैठकीत मांडू हा प्रस्ताव.
सर्व वर्गात चांगली एकी झाली पाहिजे मग बालमंडळी असो का जवान का गृहस्थ असो.....बर चला येतो मी आज थोडा उशीरच झाला."
मी ताडकन उठून घराकडे चालू लागलो..माझी बॅटरी क्रिटिकल लेवल पार झाली होती .."बार गुड्डूभाऊ भेटू"
असा दिवस गेला..
वरचे सगळे संभाषण एकूण आता तुम्ही पण 'म्याट' झाले असलाच. आम्ही असेच रोज 'म्याट' व्हायचो.
असाच ऐका सुटीच्या दिवशी तर गुड्डूभाऊ सकाळी ९ ला येऊन संध्यकाळीच गेला आणि त्यादिवशी चर्चा झाली घराजवळच्या नाल्यावर ...माझ्या बॅटरीला तेव्हातर रिस्टार्टचं लागली(दीर्घ झोप).

अमरावतीत महानगर पालिकेच्या निवडणूका होत्या. आमचा होता वॉर्ड क्र ६१. गुड्डूभाऊ निवडणूक जवळ आल्या कि स्वतःला इलेकशन स्पेशालिस्ट (निवडणूक विशेषज्ञ) समजत होता.कॉलोनीतले सर्व युवा आपल्याच मुठीत आहे असा त्याचा घट्ट (गैर)समाज होता.
२००१ ची वेळ असेल तेव्हा निवडणुकीत घड्याळ जोरावर होते पण त्याचबरोबर दुकानदारीतून उबलेले आणि पैसे जास्त झालेले काही गृहस्थ हि स्वतंत्र उमेदवार म्हणून उभे राहिले होते. राजकारणाला खाजकारण समजून या निवडणुकांचा ते इच-गार्ड म्हणून उपयोग करत. यात पिंपळाचं झाड, ढाल-तलवार इतरही होते. कॉलोनीतल्या पोरांचा जम त्या वर्षी तराजूकडेच होता.
निवडणूक म्हणजे पोट्ट्यांसाठी मेजवानीच होती. उमेदवारांना असे भासवायचे कि कॉलोनीतले मुलं आपल्याकडूनच आहेत. आणि मग तो उमेदवार वाटेल तो खर्च पोरांसाठी करायला तयार होई. (तुमच्याही वॉर्डात असच असेल ना?वाटलंच!)
निवडणुकीत गुड्डुभाऊंचे अहिंसाप्रेमी स्नेहीं आबाराव ढाल-तलवार घेऊन उभे होते.
प्रचार सुरु झाले होते..असेच एकदा...
"हे पहा रे भई, या इलेकशन मध्ये ढाल तलवार येणार". आधीच उमेदवार मोठा असल्याचे जाहीर केले कि ऐकणारे अलर्ट होतात आणि महत्व देतात.
"काऊन हो गुड्डूभाऊ?"..ऐक बोलला.
"आपला माणूस आहे तो. आबा दिवाळीत भूतेश्वरच्या नाल्या स्वतःच्या खर्चानी दुरुस्त करून घेतल्या. पैसेवाला जास्त नसेन पण समाजसेवा रक्तातच आहे त्याच्या. मला माहित आहे ना?"
मग हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं.......
एक: "ते जाऊद्या गुड्डूभाऊ, जुगाड कशाचं जमते ते सांगा?"
"जेवण दिन म्हणे पन पंगतीत बसावे लागेल, दारू देणार नाही आणि ढाब्यावर नाही पण भूतेश्वर मंदिरात कार्यक्रम ठेवू."..गुड्डूभाऊ
"घरी जमा हो म्हणा मंग त्या आंबाले, म्हणे पंगती!! हाहाहा!(सामूहिक)
भाऊ: "तुम्ही लोक भल्ले हुशार झाले आजकाल, दारू चिकननं विकास होत नाही शायनेहो. चांगल्या उमेदवारानं होत असते."
दारू चिकन काय आज खान अन उद्या ...., तरी विचारून पाहीन मी.
अन आपण वॉर्डातले युवा लोक आहे , आपण जिकडे पाहिजे तिकडे कॉलोनीले पलटवू शकतो"..
"बरं गुड्डूभाऊ, तुम आगे बढो , हम तुम्हारे साथ है".
भाऊ: "चला मग येतो मी" [ return (घरी) ]

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी लगेच पोट्टे टापटीप होऊन बुथवर बताल्या झाडंत गुड्डूभाऊंची वाट पाहंत बसले होते. ऐक कॅरम बोर्ड दिला होताच आबाभाऊंनी पन त्यावर कॅरम सोडून पोर निशानेबाजीच जास्त खेळायचे आणि सौम्य धांदल्या...
दात्या: "का रे मंग्या, जिम गेल्ता म्हन्ते तू"
"हो थोडं बिल्ड-अप सुरु केला आहे" .. (छाती वर करत , मसल्स आवळून मंगेश )
दात्या: "बाप्पा!! काय पा लागते, पाह्यलं ना आम्ही त्या दिवशी... बॅगेत टॉवेल अलग नॅपकिन अलग, नवीन स्पोर्ट शू वैजयंतीचे. बाटली पाण्याची अलग आणि जुसची अलग,....स्पोर्ट वाच दाखवू नको थे , हात खाली कर!! शेमन्या"
"लेका दोन दिवसात बिस्कीट मुरलं तुय. ऐक हप्ता झाला आता गेला नाही म्हणते"..अन हाहाहाहा
मंगोद्धार सुरु झाला होता..सर्वांना स्फूर्ती आली
गोटू म्हणाला... "मागच्या वर्षी स्विमिंग लावलं राजा यानं. ३०० रु भरले. अन पहिल्याच दिवशी स्विमिंग किट विसरला तरी पहिला दिवस होता म्हणून कानतुटे सरानी चड्डीवर उतरू दिला त्याले.
पण एका घंट्यात काय केलं त्या पाण्यात काय माहित लेका यान.
दुसऱ्या दिवशी पाहता तर काय, सकाळी कानतुटे सरांन उडी मारली म्हन्ते पान्यात अन बेहोशच झाले म्हन्ते बापा सर."
"अन बेहोश होता होता सर हळूच म्हने म्हणते....अरे बाप्पा...पानी हूऊऊय , का काय हूऊऊय !" ..दात्या
चॊकिदारायनं दोन हातानं दोन कानं धरून बाहेर काढला म्हन्ते कानतुटे सरले"..गोटू
अन हाहाहाहाहा....(सामूहिक)
मंगेश : "जाय ना बे"
दात्या : "दुसऱ्या दिवशी सारं पानी बदलावा लागलं म्हन्ते टॅंकचं, सारे क्लोरीनचे सिलेंडरं संपले म्हने बावा अमरावतीतले.
"दुसऱ्या दिवशी टॅन्कच बंद केला म्हणते बावा" अन हाहाहाहा(सामूहिक)
एव्हडी आदरांजली ऐकून मंगेशला उत्तर देणे भाग होते..... न राहवत..
" जाना रे गोटू, त्या दिवशी तुझी लुना तर बंद पडली होती !"...
असा रहस्यमय विनोद केला आणि स्वतःच हसून सर्वांकडे मोठ्या अपेक्षेने पाहून राहिला होता.
पण त्याची नजर गोटूवर जाऊन स्थिर झाली...सर्व शांत होते पण गोटू गंभीर चेहऱ्यांनी मान हळूच 'नाही'मय हलवत कुजबुजला ..."फुकट...... हसणार....नाही, .नाश्ता.... चारा.... लागन, नाश्ता......आज.....नाही, नाश्ता उद्या..., ......आज........पार्टी". अन हाहाहाहा(सामूहिक)

तेव्हड्यात गुड्डूभाऊ आला. ठरल्याप्रमाणे सगळे रानमाळवर गेले. झंन्न पार्टी झाली.
रानमाळ म्हणजे अमरावती बडनेरा रोडच्या मध्ये कुठेतरी अनिवासी क्षेत्रात जमलेला ढाबा. निवडणुकांमध्ये तिथे आधीच टेबल बुक करावे लागत. सगळ्या झेंड्यांच्या कार्यकर्त्यांची मिलनरेषा.
परतीत मी गुड्डूभाऊंच्या गाडीवर होतो. (तेव्हा मी पीत नव्हतो. म्हणजे अर्थातच नंतरच्या काळात पीत होतो. म्हणजे अर्थातच आता पीत नाही.)

"दुश्मनोका सीना पार, आईरे ढाल तलवार"....गाडीवर बसल्या बसल्या पोरं सुरु.
"गुड्डूभाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है." ..सामूहिक
"आबे गुड्डूभाऊ नई ना बे , आबाभौ म्हना पोट्टेहो".....दात्या
"अरे हवं यार.. आबाभौ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है".....सामूहिक
पोर ओरडत, पडत होती..मधेच मंगेशने जोरात ओरडून पुकारा केला...
"आबाभौ निवडून येणार म्हणजे येणार !, आबाभौ निवडून येणार म्हणजे येणार !".
"आबाभौ निव.............काय?!!...हाड बे हमाल !!, असा नसते पुकारा, चाल निंग !!, यमक नई ना गमक नाही..हाडSSS !! ".. दात्या

"असा कसा येत नाही, आला नाहीतं पेत नाही"..(.खांदे वर खाली करत).....हे जमलं
"असा कसा येत नाही, आला नाहीतं पेत नाही"....पोरांना ऊत आला होता..
तोच...
"आता ज्याच्या तोंडातून ऐक शब्दही निघाला तो फक्त मार खाईन !! फक्त मार !!"..गुड्डूभाऊ.
सन्नाटा..... किर्रर्र किर्रर्र...अचानक रात्रीचा आवाज येणं सुरु झालं.
अश्या रीतीने पौर्णिमेला जाऊन प्रथमेला मुलं शांतपणे घरी परत आली.

दुसरा दिवस उजाडला, आज आबांची परतफेड होती. सकाळी ११ वाजता ढाल तलवार घेऊन रॅली न्यू गणेश कॉलनी चौकातुन राजापेठ होऊन वापस चौकात येणार होती. सर्वांना १० वाजता हजर व्हायचे होते.
आम्ही सर्व नवयुवक आबांच्या रॅलीसाठी पोचलो तेव्हा जवळपास ११ वाजलेच होते.
भाऊ: "किती वाजले बे! आणि बाकी पोट्टे कुठाय.?
"सॉरीय गुड्डूभाऊ, पोट्टे जमवायला वेळ लागला आणि बाकी पोट्टे येऊन राहिले "
भाऊ: "घड्याळ लावून विसरता राजेहो तुम्ही जाऊ द्या लवकर ते पॉम्पलेट द्या दारादारात टाकायचे आहे.... आणि कोणीही फालतू मस्त्या करणार नाही, जो करन तो तिथेच मार खाईन "
तेव्हा सगळ्यांना समजलं की आता काम चालू मस्त्या बंद...गंभीर वातावरण
अश्या वेळी गुड्डूभाऊला शांत करण्यासाठी आत्मीयता दाखवणे जरुरी होते.
"गुड्डूभाऊ, मी सगळे पोट्टे ट्रकच्या अंदर भरले आहे"
भाऊ: चला सुरु करू, तू मायिक वर बस रे "
मी ट्रकवर बसून माईकवर स्थापन झालो. माझं काम एवढच कि थोड्याथोड्या वेळाने, कॅसेट पॉझ करून दिलेला मजकूर वाचणे.
बर जमलं बावा, नाहीतर दारादारात पॉम्पलेट वाटावे लागले असते.
रॅलीला सुरुवात झाली. आबाराव पुढे झाले. त्या दिवशी टापटीप होऊन आले होते.
क्लीन शेव, लाल टिक्का पण साधे कपडे कारण तो माणूस नकली नव्हताच तसा
माझी कॉमेंटरी सुरु झाली..."वॉर्ड क्र. ६१ चे अपक्ष उमेदवार आपल्या सर्वांचे लाडके आबाराव यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. लक्षात ठेवा ढाल तलवार...ढाल ढाल ढाल ढाल,,तलवार तलवार तलवार तलवार.
येवडा कंटाळा तर मला आमची माती आमची माणसं पाहतानाही आला नव्हता.
ऑडियो स्टार्ट..मेरे देश की धरती.... पॉझ....ढाल ढाल स्टार्ट ...दिल दिया है.. पॉझ...तलवार तलवार...स्टार्ट ...जान भी देंगे
पॉझ ... आबाराव आबाराव...स्टार्ट...ए वतन तेरे लिये..
असा करता करता रॅली शारदा नगर चौकापर्यंत आली आणि जसे उजवे वळण घेतले, समोर पाहतो तर काय पिंपळाच्या झाडाची रॅली...अन आता ?
माझी नजर गेली पिंपळाच्या रॅलीच्या काही लोकांवर जे अचानक उलट्या दिशेने चालायला सुरुवात करतात, काही लोक दोन दिशेने सर्व्हिस गल्लीतून पळाले. कोणी भिंती फांदुन लपले..पण ते तर पिंपळाचे कार्यकर्ते होते..असं कसं?
आम्ही क्रॉस करून पुढे जातो तर काय, त्यांनी पुकारेच बदलवले "दुश्मनोका सीना पार, आ गयी ढाल तलवार...आबाराव तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...अस कस बावा?
मग समजलं की मी वर असल्याने मलाच हा प्रकार दिसला होता.
ते आधी पिंपळासोबत होते .."आर अकात आहे गुड्डू किती वेळची वाट पाहत आहे आम्ही इथं...हे पहा बिल्ला..कुठाय पॉम्पलेट?
त्यातला कोणीतरी बोलला.
ते लोक कॉलनीतले तर नव्हते पण परवा आबांच्या पार्टीत होते...गुड्डूभाऊंचा खोफ अजून काय?
पण सगळ्यांजवळ ढाल तलवारीचा बिल्ला कुठून आला? का तयारीतच होते दोन्ही तळ्यात पोहायच्या?
अश्या तऱ्हेने रॅली आटपली, निवडणुकही.
निवडणुकेच्या दिवशी कॉलोनीतली बहुतेक पोरं बिमार होती.. काजीना बाप्पा
आबा बहुमताने पडला!
पण या निवडणुकातून एक गोष्ट मला त्या वयातही साफ झाली की गुड्डूभाऊ एकपक्षीच राहील आणि तो पक्ष असेल त्याची 'विचारधारा'. कोणतंही अमिश या वृत्तीला पलटवू शकणार नाही.

गुड्डूभाऊ फक्त क्रियापद नव्हता पण तो एक सुकर्मी कर्ताही होता.
जागृती युवामंचाची स्थापना गुड्डूभाऊने २००३ ला केली. मी तेव्हा अभियांत्रिकी मध्ये आलो होतो (वेळ घालवायला) आणि महाविद्यालयीन स्नेह संमेलनात सक्रिय आयोजक होतो कधीकधी जागृती कला मंचाद्वारे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्येही आयोजन करत होतो. त्यात फॅशन शो कोरियोग्राफ करणे, नृत्यक्रम सेट करणे वैगेरे अशी कामे करत होतो.
आश्चर्य मला तेव्हा झाले जेव्हा नुकत्याच आयोजित वार्षिक जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धेबद्दल गुड्डूभाऊ मला बोलावून म्हणाले
"अरे असीम आपला कार्यक्रम आहे टाउन हॉल मध्ये, जिल्हा स्तरीय नृत्य स्पर्धेचा"
"येतोना गुड्डूभाऊ, कोणता डान्स बसवायचा आहे?"
"बसवायचा नाही, तुल जज बनून याव लागते"
मला आश्चर्य झाल, मी तेव्हा त्या लायकीचा नसेन कदाचित.(आजकाल तो विषय सुटला आहे हि गोष्ट निराळी )
"मी?!! मी तर लहान आहे गुड्डूभाऊ"
"लहान मोठं काई नसते, तुले डान्स समजते अन राजनीती समजत नाही, एवढच पायजे "
"अजून कोण आहे जज?"
"मयूर सर"
"ते बुगी-वुगी वाले?"..मी आश्चर्याने
"हवं"
"काई काय गुड्डूभाऊ, एवढ्या समोरच्या लाईनीत बसवता काय मले"
चार वास्ता येशीन, तारिक तर माहीतच आहे तुले. चल काम आहे थोडं डेकोरेशनचं " असं सांगून गुड्डूभाऊ निघाला.
२४ जानेवारी, २००४ तारिक ती. शनिवार होता. त्या दिवशीचा संपूर्ण कार्यक्रम हिट झाला होता. तरी असतील २५-२७ प्रवेश पण जज म्हणून मला जेव्हा स्टेजवर बोलावण्यत आले तेव्हा मला पाहून सर्वांचे हावभाव म्हणजे...

स्वागता तव मयूरा, उत्सुन्ग चारू लतिका |
शीतल दवं क्षितिजी, फुलली इंद्रपताका |
स्वानंद बहरला मंडपी, गाती जाई नि जुई |
अन मधांतच कर्कट-मर्कट हे, कुनिकुन धसलंगं बई! |..असेच होते.

आज गुड्डूभाऊ समाजकारणात आहे, तेही आपला प्रखर साधेपणा टिकवून. आज त्यांच्या कामाची पातळी चांगलीच उंचावली आहे. जागृती सुरूच आहे. कधी शेतकऱ्यांना तुरीचे भाव मिळून देण्यासाठी, तर कधी इलेक्ट्रिक मीटर वितरणात केलेले घोटाळे उघडकीस आणण्यासाठी, कधी प्लास्टिक प्रदूषणाविरुद्ध तर कधी आरोग्य प्रश्नावर, कोणत्याही शासनासोबत दोन हात करण्यासाठी हा माणूस जागाच आहे. एकदम बिनधास्त कारण भाऊला आधीच ते कळून चुकलं होतं जे कित्येकांना कित्येकदा चूकूनही कळत नाही की काही मिळकती हिसकता येत नाही, त्या कायमच्या श्रीमंत करतात.

कधीकधी एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला समजण्यासाठी एकतर आपण प्रथमानुभवी असतो किंवा जुन्या अनुभवांचे जळकट लादून गोंधळलेले असतो. पण व्यवस्थित वयात व्यक्ती समजण्यात जास्त चुका होत नाही. गुड्डूभाऊंच्या बाबतीतही आमचे असेच झाले. तो तर आमचा सक्खा भाऊच होता.
त्याची चूक येव्हडीच की आम्ही त्या विचारांसाठी तेव्हा परिपक्व नव्हतो तरीही तो ते सुंदर विचार आमच्यावर नकळत लादत होता.
पण आज पुन्हा तेच विचार त्याच आठवणी जेव्हा डोक्यात येतात तेव्हा वाटते ..भल्ले हुतीया होतो राजेहो आपण लहानपणी...हद हुतीया होतो.

खरंच, जगण्यासाठी ऐकतरी सामाजिक कारण अIसावं..
हे समोरचं साधं झाड पहाना, ज्याला हालचाल करायला हातपायही नाहीत, आपल्या पूर्ण आयुष्यात प्राणवायूचे असंख्य रेणू समाजाला देऊन जाते, मानवी जहर गिळत.
मानवी शरीर त्यापेक्षा प्रबळ मग समाजासाठी झाडांपेक्षा जास्त योगदान अपेक्षित नाही करावं काय?

'भ्ऊलोक' मध्ये पुढे भेटू डॅशिंग बलदंड बाळादादास(मुंबई पोलीस), तोवर शुभेच्छा--असीम

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

भाषा थोडी समजली. धरून आणलेले कार्यकर्ते असा काही विषय वाटतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0