स्मरणकळा!

सारखं सारखं नॉस्टॅल्जिक होणं आम्हांला मंजूर नाही. लोकांना 'ते दिवस' आठवून खूप काय काय होतं असतं. आपली शाळा, शाळेतले मित्र वगैरे आठवून ते भावुक होत असतात. शाळा सोडल्यानंतरच्या दुसऱ्या वर्षातही आम्हांला असलं काही झालं नव्हतं. शाळेत असताना ज्यांनी जखमा केल्या अशा काही मुली मात्र आठवत राहिल्या काही दिवस. पण तो फारच व्यक्तिगत - 'पर्सनलाइज्ड नॉस्टॅल्जिया' झाला. (शब्द कमाल आहे!) शिवाय बालपणी नदीत पोहणं, सूरपारंब्या, विहीर आणि विहिरीतलं पोहणं इ. हिट प्रकार न केल्याने नॉस्टॅल्जिया म्हणावा तसा खमंग झालाच नाही. बालपणापासूनच गर्दी, धूर, चार-सहा तास वीज नसणे, उघडी गटारे, डास, उकाडा, पावसाळ्यात घरात येणारं पाणी असे सवंगडी भेटल्याने निसर्गाचं विहंगम इ. दर्शन झालंच नाही. आणि शिवाय ज्या त्या काळात माणसं ज्या त्या काळाविषयी कुरबुरी करत असतातच. त्यामुळे 'आज मागे वळून बघताना डोळ्यांच्या कडा ओलावतात' ते तो काळ पन्नास वर्षांपूर्वीचा असतो म्हणून. एरवी आहे त्या काळाविषयी 'आनंदी आनंद गडे' असं कुणी म्हणत नाही. (बालकवींचा काळ सुखाचा!) शिक्षणपद्धती बदलली पाहिजे हे तर मला वाटतं ॲडम आणि ईव्हच्या काळापासून चालत आलेलं वाक्य आहे. मुळात 'शिक्षण' हाच शिक्षणपद्धतीतला दोष आहे. रोज एकाच ठिकाणी जाऊन एकाच माणसाकडून एकाच जागी बसून काहीतरी 'शिकणे' हा प्रकार अजबच म्हणावा लागेल. आजचं सोडा, पण 'गुरुकुल' पद्धतीतही मुलं काय मास्तरांवर वैतागत नसतील? समोरचा जरी सांदीपनी असला तरी केव्हा ना केव्हा तरी 'काय बोअर मारतात राव' असं मुलांना वाटून गेलेलं असणारच. पितृभक्तीचे आधुनिक काळातले आयाम 'आमचे तीर्थरूप म्हणजे धन्य आहेत च्यायला'पाशी आले असले तरी बळंच आपला बकरा केला हे समजल्यावर रामाच्याही मनात 'वडील म्हणजे ना...तीन लग्न करायला यांना सागितलं कुणी?' असं आलंच नसेल याची काय शाश्वती? तर काळाचा महिमा प्रामुख्याने वाईटच असतो याविषयी वाद नसावा. सत्ययुगातही बायका पळवणारे अस्तित्वात होते यावरूनच काय ती कल्पना करावी. खुद्द रामाच्याच तोंडी 'दिवस वाईट आले आहेत' अशी भाषा उत्खननात सापडलेल्या एखाद्या रामायणाच्या प्रतीत सापडली तर अगदीच आश्चर्य वाटायला नको. काळावर रागावणे हा माणसाचा गुणधर्मच आहे. 'संस्कृती बुडाली' ही काही नव-आरोळी नव्हे. बाई उंबरठाही ओलांडत नव्हती तेव्हाही संस्कृतीच्या नाका-तोंडात पाणी जायचंच. स्लीव्हलेस ब्लाऊज घालणाऱ्या आद्य स्त्रीने स्त्रियांच्या दंडात किती सामर्थ्य आहे हे दाखवून संस्कृतीला फेफरं आणलं होतंच. संस्कृतीची वेसण पुरुषांनी चलाखीने आपल्याच हाती ठेवल्याने त्यांना त्यामानाने कमी त्रास त्रास होते (आणि आहेत!). उगीच कुठे केस वाढवले म्हणून बोलणी खा, हॉटेलमध्ये भजी खाल्ली म्हणून बोलणी खा असे मामुली त्रास होते. संस्कृती भारी पडली ती बायकांनाच. असो.

गतकाळाच्या आठवणीने गळे काढणं आणि वर्तमानावर तोंड सोडणं हे माणसाचं व्यवच्छेदक लक्षण आहे असं आम्हांला वाटतं. आम्ही त्याविषयी चिंतन करीत आहोत. महाराष्ट्रातील आद्य 'भाई' पु.ल.देशपांडे, ज्यांची साहित्यिक भाईगिरी मशहूर होती, त्यांच्यावरही गतकाळात रमण्याचा आरोप केला गेला आहे. आखाड्यातले दुसरे वस्ताद हिंदुराव  नेमाडे यांच्यावरही देशी खुंटीवरचा पंचा काढून वारंवार डोळे पुसण्याचा आरोप केला जातो. पण हिंदुरावांबाबत एक गोष्ट आम्ही नम्रपणे इथेच कबूल करतो. पुढल्या वर्षी पन्नास वर्षं पुरी होतील (कादंबरीला, आम्हांला नाही) तरी 'कोसला'चं भूत अजून मानगुटीवरून उतरत नाही. बाकी सब एक तरफ और कोसला एक तरफ! याबाबतीत आम्ही जामच नॉस्टॅल्जिक होतो. (नेमाडे कधी भेटले तर आम्हांला त्यांना घाबरत का होईना पण एकच विचारायचे आहे. 'कॅचर इन द राय' ही 'कोसला'ची प्रेरणा होती का हो? त्याचे उत्तर 'नाही' असेल तर आम्ही इतके आनंदित होऊ की 'हिंदू'च्या पुढील सर्व खंडांचे पैसे तत्क्षणी त्यांच्याचकडे देऊ आणि देशीवादाची दीक्षाही घेऊ!) मराठी साहित्य हे एकूणच जुन्यात रमते असा दावा मराठी(च) अभ्यासक-समीक्षकांकडून केला जातो. आणि वैश्विक साहित्यात मान मिळवायला ते  कमी पडतं असंही म्हटलं जातं. (पण ही वैश्विक साहित्याची भानगड नक्की काय आहे ते कुणी सांगेल का? इंग्लिश साहित्य वैश्विक म्हणावं तर चीन, जपान, सिंगापूर, फ्रांस, जर्मनी, इटली, स्पेन, युक्रेन, अफगाणिस्तान, आफ्रिका वगैरे प्रदेशात ते कुठे आहे? आणि स्पॅनिश किंवा जपानी कवी-लेखक तर त्यांच्याच भाषेतून लिहितात. मग तेही वैश्विक कसं? की जितकं जास्त भाषांतरित तितकं वैश्विक? 'आशय वैश्विक असावा लागतो. जाणिवेच्या पातळ्या सोलणारा आणि आपल्याला नग्न करणारा' असं एक जबराट उत्तर एकदा आम्हांला एका घनगंभीर समीक्षकांनी दिलं होतं. (हे स्वतः अर्थातच काही लिहीत नाहीत! आपल्याला कोण सोलून काढतंय याची वाट बघत असतात आणि कुणीच सोलत नाही म्हणून मग स्वतःच लेखकांना सोलतात!) म्हणजे आमचा पांडुरंग सांगवीकर सांगतो ते वैश्विक नाही? गोनीदांच्या मृण्मयीचं मागणं वैश्विक नाही? विश्वातून एका प्रांताला वेगळं कसं काढतात काही कळत नाही. अर्थात 'टोरांटो' म्हणजे विश्व नव्हे हे आपल्यालाही कळत नाहीच म्हणा! अलिकडे तर साहित्यिक मित्रांची लोणावळ्याची सहकुटुंब ट्रिप कॅन्सल झाली तरी ट्रिपचा 'टोरांटो' झाला असं म्हणतात असं आम्ही ऐकलं. असो.)

नॉस्टॅल्जिक होणं हा काही जागांचाही गुणधर्म असतो. पुणे नामक क्षेत्री 'नॉस्टॅल्जिया'चे मळे जागोजागी फुलले आहेत हे आम्ही वेगळं  सांगायला नको. मुंबई वर्तमानाच्या काळज्यांमध्ये गळ्यापर्यंत बुडालेली असल्याने तिला नॉस्टॅल्जिक व्हायला वेळच नाही. आणि ती उणीव सिनेमावाले भरून काढतातच. (पहा: खोया खोया चांद, परिणिता, देवदास, ओम शांती ओम आणि इतर) मुंबई बिचारी रोज सकाळी रुळांवरून धावत ऑफिसला जाते आणि संध्याकाळी रुळांवरून धावत घरी येते. आणि हे कधीपासून? तर बालपणापासून. त्यामुळे गतकाळाच्या उमाळ्यांपेक्षा आजचा मेगा ब्लॉक महत्वाचा. याबाबत पुण्याला अर्थातच तोड नाही. पण भाई देशपांडेंनी मुंबई-पुण्याबद्दल पुष्कळच लिहून ठेवल्याने आवरतं घेतलं पाहिजे. नाहीतर 'नॉस्टॅल्जियातला नॉस्टॅल्जिया' व्हायचा. (शिवाय 'ओरिजिनल वाटत नाही हो' म्हणून लेख संपादकांकडून परत यायची भीती!) असो.

नॉस्टॅल्जिया फक्त महाराष्ट्र देशी ठाण मांडून बसला आहे की इतर ठिकाणीही तो वास्तव्यास आहे? खरं सांगायचं तर इथे आमची गोची होते. कारण तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळी, गुजराती, पंजाबी आणि हिंदी भाषांमधील साहित्य हे भारतीय साहित्यच असले तरी ते मराठी साहित्य नव्हे आणि 'प्राचीन आणि अर्वाचीन मराठी वाङमयाचा इतिहास' वाचता वाचता डोळे, पाठ, हात सगळेच दुखू लागल्याने इतके सर्व वाचायचे बाकी असताना इतर भाषांकडे वळणार तरी कधी असा प्रश्न आहे. शिवाय ऑफिसात कीबोर्ड बडवायला लागतो ते वेगळंच. (मराठी लेखकांचं एके काळी बरं होतं का हो? ना.सी.फडक्यांकडे पगारी लेखनिक होता असं ऐकतो. फडक्यांना लेटमार्कवरून बोलणी खावी लागली नसावीत. एकूणच लेखन होईल इतका ऐसपैस वेळ आणि त्याचे ऐसपैस नसले तरी बऱ्यापैकी पैसे मिळत असावेत असं वाटतं. हो, त्या काळचे 'बऱ्यापैकी' म्हणजे विशेष बरे नव्हेत, पण खर्चाच्या मानाने बरेच ना? अहो, आत्ताच्या मानधनात महिन्याचे डाळ-तांदूळही येत नाहीत. बाकीचं सोडाच. शेंगदाणे हा पदार्थ तर पेट्रोलसारखाच मध्यपूर्वेतून येतो की काय असं वाटतं सध्या. असो.) त्यामुळे नॉस्टॅल्जियाचा दक्षिणोत्तर आणि पश्चिम-पूर्व अंगाने विचार करणे आम्हांला जमेलसं वाटत नाही. (मात्र एकंदर भारतीय मानसिकता पाहिली तर अठ्ठावीसच्या अठ्ठावीस राज्यांमध्ये नॉस्टॅल्जियाचं राज्य असावं असं वाटतं. तज्ज्ञांनी जरूर मार्गदर्शन करावे!) जी गत राष्ट्रीय तीच गत आंतरराष्ट्रीय नॉस्टॅल्जियाची. अमेरिकन किंवा ब्रिटिश माणूस अजूनही लिंकन आणि चर्चिलला आठवून हळवा होतो का आणि 'हेमिंग्वेनी लिहिली ती कादंबरी' आणि 'वुडहाऊस करतो तो विनोद' अशी वाक्यं आंग्ल आकाशात फिरत असतात का याविषयी आम्ही अनभिज्ञ आहोत. एकंदर युरोपियन माणूस अमेरिकन माणसापेक्षा जास्त परंपराप्रिय आहे हे आम्हांला माहीत आहे. (भाई देशपांडेंमुळे. यांच्या भाईगिरीला एक मर्यादाच नाही. जिथे तिथे आडवे येतात.) पण ते तेवढंच. त्यामुळे नॉस्टॅल्जिया आपल्या राकट कणखर देशात आम्हांला कसा दिसतो एवढ्यापुरतंच आम्हांला बोलता येईल. गतकाळात रमणे हे 'ह्यूमन' आहे, तो विशिष्ट समुदायाचा गुण नाही असं काही जाणकार सांगतात आणि ते आम्हांला पटतंही, पण मराठी ह्यूमन्स हे या बाबतीत विशेष पुढे आहेत असं दिसतं. गुजराती ह्यूमन्सची 'नैसर्गिक निवड' जशी 'आजचा नफा' आहे तशी मराठी ह्यूमन्सची 'नैसर्गिक निवड' ही 'आठवणीतला तोटा' आहे!    
शिक्षणपद्धती जशी कायमच दोषपूर्ण असते तशी नवीन पिढी ही कायमच वाया गेलेली असते. तरुणांबद्दलचे आक्षेप पाहिले तर असं दिसून येईल की 'चुकीचं वागणं' हे नॉर्मल आहे. 'बरोबर वागण्यासाठी' क्लास लावावे लागतात. त्यामुळे 'हल्लीचे तरुण' ही नॉस्टॅल्जियाने केलेली पहिली शिकार असते. हा वर्ग हिमेश रेशमियाची गाणी ऐकतो, अर्धवट मराठी-हिंदी-इंग्लिश मधून बोलतो, नाही त्या ठिकाणी पैसे उधळतो पण टेक्स्ट मेसेज पाठवताना मात्र अक्षरांची काटकसर करतो. शिवाय रेव्ह पार्टी ही एक नव-काळजी आहेच. बरं दारू पिऊन नाचावं तर तेही 'दम मारो दम'वर. म्हणजे तिथे नॉस्टॅल्जिया! आमच्यापेक्षा चांगल्या दहा-बारा वर्षांनी लहान असणाऱ्या (हं...आम्ही पस्तीस पूर्ण!) एका मित्राने फेसबुकवर दूरदर्शनचा जुना लोगो आणि ये जो है जिंदगी, बुनियाद, विक्रम-वेताळ वगैरे जुन्या मालिकांचे फोटो टाकले होते. 'दोज वर द डेज' हे पंचविशीतल्या मुलानं म्हणावं आणि आम्हांला तसं काहीच होऊ नये याचं आम्हांला आश्चर्य वाटलं. एकूण नॉस्टॅल्जिया सर्वव्यापी आहे असं दिसतं. अर्थात तरुण जनता 'रेट्रो' लुकवर 'इन थिंग' म्हणूनही भाळते. एरवी चांगली जीन्स वगैरे घालणारी आमची एक भाची काही दिवस मुमताज टाईप घट्ट पंजाबी ड्रेस घालून आणि केसांचा इमला रचून वावरत होती. ओल्ड इज न्यू!

जुनी गाणी, जुने सिनेमे, जुने अभिनेते आणि जुन्या अभिनेत्री आणि खूपच मागे जाऊन 'सांस्कृतिक संचित' म्हणून जे सापडेल ते सगळं साहित्य-सिनेमा-टी.व्ही.तून नीटच प्रस्तुत होतं. एकूणच आपल्याकडे 'कल्चरल कंटेंट' भरपूर! 'नव्याने ओळख' म्हणून 'तुकाराम' आला. 'बालगंधर्व' पडद्यावर आले. शिवाजी महाराज तर कित्येकदा आले. (महाराज आता रागावून 'मला आता मोकळं करा' असं फर्मान लवकरच काढतील असं वाटतं). रमाबाई रानडे आल्या. हिंदी चॅनल्सनी तर नॉस्टॅल्जियात हात धुऊन घेतले. शंकर पार्वतीपासून झाशीच्या राणीपर्यंत आणि विष्णुपुराणापासून बाजीराव मस्तानीपर्यंत! अर्थात हा रूढार्थाने नॉस्टॅल्जिया नाही म्हणता यायचा पण एकेकाळी प्रचंड संख्येने 'आयबॉल्स' मिळवलेल्या रामायण-महाभारत या मालिकांचं यश आठवत पुन्हा त्याच मार्गाने जायचा निर्णय नॉस्टॅल्जिकच म्हणावा लागेल. बायका सपासप 'ऑनसाईट' अमेरिकेला गेल्या तरी मंगळागौरीचे खेळ वगैरे बहरले. सामुदायिक हळदीकुंकू, भोंडला वगैरे प्रकारही बघायला मिळाले अलिकडे. कैरीचं पन्हं आणि सोलकढी बाजारात सहज मिळते आणि 'आमच्याकडे चुलीवरचं भाकरी-पिठलं मिळेल' असं बोर्ड हायवेवरच्या हॉटेलावर दिसतो. 'जुन्याचं पुनरूज्जीवन' हा नवीन फंडा आहे!

मराठी माणसं भूतकाळात रमतात हे तर कुठल्याही काळातल्या सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ आहे. 'सुधीर गाडगीळ यांनी घेतलेली आशा भोसले यांची मुलाखत' यात वास्तविक काय नवीन आहे? पण लोक तोबा गर्दी करतात. आपल्या मुलीला लावणी नृत्यांगना व्हायचं आहे हे ऐकूनही ज्यांना चक्कर येईल ते लोक 'लावणी म्हणजे काय! वा! अहो, अस्सल मराठी कला आहे ती' असं म्हणतात. मराठी शाळा वाटेना का डाऊनमार्केट, पण पहिला बाजीराव, माधवराव पेशवे, तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांच्या आठवणीने मराठी मन गहिवरतं. मराठी नीट वाचता न येणारी बेबी गुढीपाडव्याला नऊवारी घालते आणि मुलगा मोठेपणी अमेरिकेला जाणार हे नक्की असलं तरी त्याची मुंज केलीच पाहिले याबद्दल दुमत नसतं. (शेवटी आपलं कल्चर आहे!) प्रत्यक्षात जे 'जगता' येत नाही ते सगळं ‘एथनिक फील, ट्रेडिशनल ब्यूटी’ म्हणून हातोहात खपतं. 'मराठी मनाला अजूनही भुरळ पाडणाऱ्या’ बऱ्याच गोष्टी आहेत. (पुलं इंक्ल्यूडेड. आपण प्रामाणिक आहोत!) व.पु.काळेंचे 'कोट्स' अजूनही फेसबुकच्या वाऱ्या करतात आणि कुठल्याही पुस्तकप्रदर्शनात पुलं आणि वपु दर्शनी शेल्फ पटकावून असतात. 'गीतरामायणा'ची अजूनही पारायणं होतात आणि 'श्यामची आई' अजूनही खपतं. जुनी नाटकं पुन्हा लागतात आणि हाऊसफुल होतात. 'आमच्या वेळी बरं का…' हे सांगून वरची पिढी चालू पिढीला वात आणते. 'आमच्यावेळची गाणी' हा विषय तर वरच्या पिढीला फार प्रिय. 'पण त्या काळी एकही गाणं 'जमलं नाही' कॅटॅगरीत कसं नाही? प्रत्येकच गाण्याला 'अहाहा..' कसं काय?' हा चालू पिढीचा प्रश्न अनुत्तरीत राहतो. चालू पिढीने प्रत्येक जुन्या व्यक्तिमत्वासमोर (हिंदी-मराठी संगीत, राजकारण, इतिहास) हात जोडले पाहिजेत अशी अपेक्षा असते. संगीत नाटकात रमायला काहीच हरकत नाही हो, पण 'हल्लीची नाटकं म्हणजे...' ही पुस्ती कशाला? मराठी मन एकूणच आपल्या भूतकाळाविषयी फार हळवं आहे. एरवी म. टा. सध्याच्या रूपातही 'मराठी मनाचा मानबिंदू' कसा काय ठरला असता आणि खपला असता?

'जुनं ते सोनं' ही म्हण महाराष्ट्रातच पैदा होऊ शकते. पण आम्ही इतके एकांगीही नाही. नॉस्टॅल्जियाचं सिगरेटसारखं आहे हे आम्ही जाणतो. इन्ज्युरिअस असला तरी झुरका घ्यावासा वाटतोच. त्यामुळे 'नॉस्टॅल्जिया नकोच' अशी घोषणा द्यायची आमची इच्छा नाही. मात्र 'बी केअरफुल विथ नॉस्टॅल्जिया' ही आमची घोषणा नक्कीच असेल. मराठी माणूस नॉस्टॅल्जिक का होतो याचाही आम्ही विचार केला. हिंदी सिनेमा संस्कृतीचं अबाधित वर्चस्व? की 'चांगल्या नाविन्या'चा अभाव? की नवीन आविष्काराबद्दल मुळातूनच अनास्था? व्यक्तिगत लक्षणाचा हा सामूहिक परिणाम आहे का? काही नवीन आविष्कार भीतीदायक आहेत हे खरं. आम्ही 'देव डी'वर फिदा आहोत. 'इमोशनल अत्याचार'वर तर आम्ही जामच खूष झालो. हिंदी सिनेमा गाजराच्या हलव्याच्या आणि अश्रूंच्या कारखान्यातून बाहेर येऊ लागलाय आणि काही निवडक मंडळी भन्नाट प्रयोग करतायत ही उत्साहवर्धक बाब आहे. पण तरी रीमेकचं व्यसन आहेच. शिवाय 'गोलमाल'चा रीमेक म्हणून 'बोल बच्चन' बघायची आमची हिंमत नाही. काही वर्षांपूर्वी एकदा कुठल्यातरी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये 'क्या मैं जवानी का अचार डालूंगी?' हे गाण्याचे शब्द ऐकून आमचं काळीज हादरलं होतं. त्यानंतर मग यथावकाश शीला की जवानी, चिकनी चमेली आणि आता हलकट जवानी हे काव्य ऐकलं. अशा वेळी आम्ही डोळे मिटून घेतो आणि ‘हम आपकी आंखों में इस दिल को बसा ले तो' किंवा ‘ये दिल और उनकी निगाहों के साये’ किंवा  'मलमली तारुण्य माझे' हे आठवतो  आणि मग कैफी आझमीं, जांनिसार अख्तर आणि सुरेश भटांना आठवतो. अशा वेळेस नॉस्टॅल्जिक नाही होणार तर काय? नॉस्टॅल्जिया म्हणजे भूतकाळ पण तो ट्रिगर होतो वर्तमानकाळातून! आणि ज्याअर्थी तो ट्रिगर होतो त्याअर्थी वर्तमानाची प्रकृती तपासून घ्यावी का? माणूस काळाबरोबर वाढतो पण त्याचा काळ मात्र तिथेच थांबलेला असतो का? जेव्हा जगणं शांत होतं, टी.व्ही. दिवसातून चारच तास होता आणि म्हणून सुसह्य होता, गाण्यात शब्दांना महत्व आणि अर्थ दोन्ही होतं, पावसाळ्यात पाऊस पडायचा, घरी दोन्ही वेळेला ताजा स्वयंपाक केला जायचा...अशा काळापाशी?

आधीच कबूल केल्याप्रमाणे आम्ही काही सारखं सारखं  नॉस्टॅल्जिक होत नाही. पण नवीन आविष्कारांचे राखी सावंत आणि रोहित शेट्टी प्रणित काही धक्के आणि रिॲलिटी शो प्रणित काही धक्के बसल्याने आम्ही 'कधीकधी नॉस्टॅल्जिक' होतो हे मान्य करावं लागेल. नृत्याच्या एका रिॲलिटी शो मध्ये आपल्या 'पानिपत'कारांना परीक्षक म्हणून बघून असाच धक्का बसला होता. ('मल्टीटास्किंग' म्हणतात ते हेच बहुधा!) लग्न, कुटुंब, परंपरा, श्रद्धा यांच्या जंजाळात अजूनही अडकलेल्या टी.व्ही. मालिका, प्रत्येक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सुरू असणारा संस्कृतीचा न संपणारा गजर, वर्षभर येणारे परंपरेचे उमाळे आणि एकूणातच  सुरू असलेल्या 'सांस्कृतिक धांदली'कडे पाहिलं की आम्हांला आमच्या आजीची आठवण येते. आम्हांला रागवताना तिचं एक पेटंट वाक्य असायचं, 'बोलू नये पण बोलायची वेळ येते!' त्याच चालीवर आम्हांला म्हणावसं वाटतं, 'नॉस्टॅल्जिक होऊ नये पण व्हायची वेळ येते!' आमेन!

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

हाण्ण तिच्यायला... केवळ जबरदस्त हाणलाय. संपादक, गाडगीळ, मटा ते आमची आज्जी... जमलंय!
दिवाळी अंकातला लेख म्हणावा असा झाला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता कधीही कुठंही एखादा नॉस्टॅल्जिक लेख वाचला (गेले ते दिवस, गेली ती संस्कृती, कसं होणार आमच्या समाजाचं. आमच्या भाषेचं, तरुण पिढीचं, टेस्ट क्रिकेटचं, कुटुंबव्यवस्थेचं...इत्यादी) की मला या लेखाची आठवण येईल!
म्हणजे हा एक नवा नॉस्टॅल्जिया निर्माण होतोय का माझ्यासाठी? Smile

लेख खूप आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुजराती ह्यूमन्सची 'नैसर्गिक निवड' जशी 'आजचा नफा' आहे तशी मराठी ह्यूमन्सची 'नैसर्गिक निवड' ही 'आठवणीतला तोटा' आहे!

मार्मिक निरीक्षण!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी!!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

फराळासारखाच खुसखुशीत लेख.. अतिशय आवडला!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वाक्यावाक्याशी सहमत. लेख खुसखुशीत आणि रंजक आहेच पण मार्मिक अधिक; मुद्द्यांवर नेमके बोट ठेवणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खुसखुशीत लेखन आवडले. याच साईटीवरच्या http://www.aisiakshare.com/node/292 या लेखाची आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

एक नंबर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार....

@आतिवास - हो...'नवा नॉस्टॅल्जिया' कायम तयार होत असतोच.... Smile

@ मुक्तसुनीत - तुम्ही शेअर केलेला लेख आणि त्यावरील चर्चा वाचली आहे.... Smile

पुन्हा एकदा सर्वांचे आभार...

उत्पल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही.. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मस्त कलंदर
उदरभरण नोहे

कैच्याकै भारी लेख आहे!
काही काही विशेष खवचट लोकांना सहज जाता जाता संबंध नसलेल्या लोकांनाही खुबीनं लाथ मारायचं कसब साधलेलं असतं, आपण चरफडत पाहत राहतो. त्या तसल्या लोकांचेही बाप म्हणून तुम्ही पुरून उराल. कसले भारीपैकी शालजोडीतले हाणलेत हो, वा!
ज-ह-ब-ह-रा-हा मजा आली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

प्रचंड मजा आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मेघना, ३_१४ विक्षिप्त अदिती, मस्त कलंदर....प्रतिक्रियेबद्दल आभार....

उत्पल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

निव्वळ जबरदस्त

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

नॉस्टल्जिया म्हणल की हा लेख आठवतो. परवा मेंदुच्या मनात हे सुबोध जावडेकरांचे पुस्तक वाचल त्यात नॉस्टल्जिया विषयी वैज्ञानिक माहिती आहे. अच्युत गोडबोलेंच्या 'मनात' पण या विषयी माहिती आहे.
उत्पल ने हा लेख स्मृती विव्हल होउनच लिहिला आहे अशी दाट शंका येते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/